शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1713. मानसशास्त्र

 मी नववी दहावीत असेल. एक दिवस मी शाळेतून घरी आलो त्यावेळी आई कोणते तरी जाड पुस्तक वाचत होती.
“काय गं? तू ही अशी बोगस पुस्तके का वाचते?” मी प्रश्न केला तसे आईच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसला. अर्थात क्षणभरच.
“तूच सांग, मी कोणते पुस्तके वाचले पाहिजे?”
“विज्ञानाची पुस्तके वाच. ती जास्त महत्वपूर्ण आहेत. त्याने तुझा विकास होणार आहे. अशी पुस्तके वाचणे म्हणजे फक्त वेळ घालवणे आहे.” मी म्हटले तसे तिच्या चेहऱ्यावर हसू आले.
“कुणी सांगितले तुला?”
“आमचे जीवशास्त्राचे जोशी सर म्हणत होते.”
“काय म्हणत होते?”
“ते म्हणत होते, गोष्टीची पुस्तके वाचण्यात वेळ घालवू नका, विज्ञानाची पुस्तके वाचा. त्याने तुमचा विकास होणार आहे.”
“अरे पण ते त्यांनी तुझ्यासाठी सांगितले आहे. माझ्यासाठी नाही. आणि तसेही मी गोष्टीचे पुस्तक वाचत नाहीये.”
“मग?”
“मी गीता वाचते आहे.”
“त्यात विज्ञान आहे?” मी विचारले.
“त्यात आध्यात्म आहे.” आईने सांगितले.
“त्याने तुला काय मिळते?”
“मनःशांती.” तिने माझ्याकडे न बघता उत्तर दिले.
“हेहेहे...” मी मोठ्याने हसलो तसे तिने माझ्याकडे बघितले.
“काय हसतोस?”
“जोशी सर सांगत होते की माणसाच्या शरीरात ‘मन’ असा कोणता अवयवच नाहीये. मग त्याला शांत तरी कसे करणार? विज्ञान मनाला मानतच नाही. आता बोल !” मी तिची थट्टा करत म्हटले तसे तिच्या चेहऱ्यावरही स्मित झळकले.
“तू का हसतेस?”
“कारण तू अर्धवट माहितीवर बोलतोस म्हणून.”
“अस्सं? मग सिद्ध कर मी अर्धवट माहितीवर बोलतो ते.” मी काहीसे आढ्यतेने म्हटले आणि तिच्या चेहऱ्यावर मला चिडविण्याचे भाव उमटले.
“जर विज्ञान मनाला मानत नसते तर मानसशास्त्र हा विषय अभ्यासाला का ठेवला असता कॉलेजमध्ये?” तिने हसत प्रश्न केला आणि माझी बोलती बंद झाली. पण इतक्या लवकर आपण हार तरी कशी मानायची?
“तरीही तुझ्या आध्यात्मापेक्षा विज्ञानच श्रेष्ठ आहे. आपल्याला काही लागले तर ते दुखणे बरे व्हावे यासाठी विज्ञानाने बनवलेले औषधच घ्यावे लागते. वेगवेगळे शोध ही विज्ञानामुळेच लागले. आपल्याला देशात काय चालू आहे हे टीव्हीवर दिसते तेही विज्ञानामुळेच.” मी माझा मुद्दा मांडला. वाटले आता तिला माघार घ्यावीच लागेल. पण तिच्या चेहऱ्यावर स्मित आले.
“विज्ञान आणि आध्यात्माची तुलनाच होऊ शकत नाही. कारण दोन्ही गोष्टींचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. फोन वर आपण दूरगावी असलेल्या मित्राशी लगेच बोलू शकतो आणि त्याच्या गावी जायचे तर गाडी वापरतो. आता गाडीची आणि फोनची एकमेकांशी तुलना करता येईल का? जरी दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला आपला मित्र भेटत असला तरी? नाही. कारण दोन्हींचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. विज्ञान आणि आध्यात्म या दोन्ही गोष्टी माणसासाठी त्या त्या वेळी गरजेच्या आहेत. विज्ञानाने माणसाच्या वेदना कमी होतात तर आध्यात्माने माणसाचे दुःख कमी होते.”
“म्हणजे?” मी गोंधळात पडलो.
“म्हणजे शरीराला दुखापत झाली तर होते ती वेदना. औषधाची गोळी घेतली तर वेदना बंद होते पण दुःख असेल तर त्यावर कोणतीही गोळी उपयोगी ठरत नाही. त्यावेळी आध्यात्म उपयोगी ठरते. उद्या तू अभ्यास केला नाही आणि सरांनी तुला छड्या दिल्या तर तुला वेदना होतील आणि मला दुःख. तुझ्या वेदना थोड्या वेळात थांबतील ही, पण आपलं पोरगं मठ्ठ आहे याचे दुःख मला कायम वाटत राहील.” आईने काहीसे हसत म्हटले आणि त्यावर काय बोलावे हे मला समजेना.
“ओके ओके... दे ते पुस्तक इकडे. मीही वाचतो.” मी तिच्यापुढे हात करत म्हटले.
“नाही... तू विज्ञानाचेच पुस्तक वाच. सध्या तुझा विकास त्याने होणार आहे. ज्यावेळी तू माझ्या वयाचा होशील त्यावेळी वाच गीता. त्यावेळीही तुझा विकासच होईल. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि ती गोष्ट त्याच वेळी करणे गरजेचे असते. नाहीतर त्याचा फारसा उपयोग होत नाही.”
“म्हणजे माझी अभ्यासापासून सुटका नाही तर...” मी वैतागून म्हटले.
“बिलकुल नाही. आधी अभ्यास आणि मग सगळे काही.”
“छे... तू आणि ते जोशी सर, बहिण भाऊ आहात अगदी. मुलांना अभ्यास करायला सांगणारे.” आणि त्यावर आई मनसोक्त हसली.
१५ दिवसांपूर्वी माझी भाची रुज्या ( ऋजुता हो ) राहायला आली होती. तिला ही माझ्यासारखी रात्री अभ्यास करण्याची सवय आहे. मी ‘इकीगाई’ पुस्तक वाचत होतो. ती तिथेच बसून रसायनशास्त्राचा ( केमेस्ट्री हो ) अभ्यास करत होती.
“मामा... तू हे काय वाचतो आहेस?” तिने विचारले.
“इकीगाई”
“अरे काहीतरी अभ्यासाचे पुस्तक वाच. याने काय मिळणार तुला?” तिने मला चिडविण्याच्या सुरात म्हटले.
“याने मला मनःशांती मिळते.” जे उत्तर मला आईने दिले होते तेच मी इथे चिपकून दिले.
“अरे पण... मन असा कोणता अवयवच नसतो माणसाच्या शरीरात.”
“पण तरी त्याचे अस्तित्व विज्ञान मानते रुज्या... म्हणून तर मानसशास्त्र विषय अभ्यासाला असतो ना?”
“दे मग... मी पण वाचते ते.” तिने तिच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवत म्हटले.
“रुज्या... गुमान अभ्यास कर. सध्या तुझ्यासाठी तू करते तेच महत्वाचे आहे. माझ्या वयाची होशील त्यावेळी वाच इकीगाई.”
“मामा... तू आणि आई अगदी भाऊ बहिण आहात. तीही अगदी हेच वाक्य जसेच्या तसे बोलते.” तिने काहीशा लटक्या रागात म्हटले आणि मला माझा आणि आईचा संवाद आठवला.
“हो तर... मी आणि तुझी आई भाऊ बहिणच आहोत.” मी तिचे पुस्तक तिच्या हाती देत म्हटले.
खरंच किती गंमत आहे ना? आपली पिढी सध्याच्या पिढीला कायम म्हणते, ‘आमच्या वेळी असे नव्हते. आम्ही आई वडिलांचे सगळे ऐकत होतो. आमच्या मनात शिक्षकांबद्दल खूप आदर होता.’ पण हे विसरतो की त्या वयात आपणही असेच होतो. फरक हाच की विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या सुविधा, आपले खेळ, मनोरंजनाची साधने वेगळी होती. भावना मात्र तीच.
आज आईला जाऊन बरोबर ११ वर्ष झालेत. पण तिची आठवण मात्र हृदयाच्या कप्प्यात कायम आहे. आज मी फक्त त्या त्या प्रसंगात ती कसे वागली त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो आणि लोक म्हणतात, हा लोकांचे मानसशास्त्र चांगल्याप्रकारे जाणतो’ त्यांना काय माहित, मी फक्त माझ्या आईला कॉपी पेस्ट करतोय.

मिलिंद जोशी, नाशिक,
सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...