शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1645. माय बॉडी माय राईट

 84 लक्ष योनींमधून फिरल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो असा एक लोकसमज आहे. त्यातही स्त्रीचा जन्म हा नवनिर्माणाचा वाहक आहे. निसर्गाने स्त्रीचे शरीर अतिशय सुंदर बनविले आहे. गर्भाशय ही स्त्रीदेहाची जादुई संपत्ती आहे. स्त्रीच्या शरीरातून स्त्रवणारी संप्रेरके तिच्या देहाला एक अनुपम सौंदर्य आणि डौल प्रदान करतात.
स्त्रीचे शरीर म्हणजे निसर्गाची एक अद्भुत निर्मिती ! या मौल्यवान देहाला योग्य रीतीने वाढविणे, सांभाळणे आणि त्याची काळजी घेणे यासाठी निश्चित प्रयत्न करावा लागतो. 
मुलगी जन्माला आल्यापासून तिचे तरुण वयापर्यंत संगोपन करण्याची जबाबदारी आई-वडिलांची असते. त्यानंतर ती स्वतः स्वतःची काळजी घेऊ लागते. विवाहानंतर  तिचे गरोदरपण-बाळंतपण या काळात तिच्या सासरच्या मंडळींना तिची काळजी घ्यावी लागते.
स्त्रीदेह हा धारक तत्त्वांनी बनलेला आहे. तिच्यामध्ये जिवाला धारण करण्याची क्षमता आहे. याच कारणामुळे या देहाची अखंड काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. हे मौल्यवान शरीर नग्नतेचे प्रदर्शन करण्यासाठी नाही. लोकांना उत्तेजित करण्यासाठी नाही. फॅशनच्या नावाखाली स्वतःची हेळसांड करण्यासाठी नाही. अपत्य जन्माला घालण्याची, त्याला दूध पाजून वाढविण्याची  मोठी जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर सोपवलेली आहे. तिच्या या भूमिकेला साथ देणे, या प्रत्येक जबाबदारीत संपूर्ण सहकार्य करणे हे तिच्या जोडीदाराचे आणि कुटुंबाचे प्रथम कर्तव्य आहे. 
माय बॉडी माय राईट असे म्हणणे म्हणजे महिलांनी आपल्या शरीराच्या सर्व क्षमतांबद्दल अखंड जागरूक राहणे. आपल्या शरीराचा गैरफायदा घेण्याची कुणालाही संधी न देणे. आपल्या देहबोलीवरून कुणाचाही गैरसमज होऊ न देणे..... माय बॉडी माय राईट म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे.....
स्वेच्छेने आणि सन्मानाने मातृत्व मिळते तेव्हा स्त्री शरीराने आणि मनाने संतुलित राहते. लादलेले किंवा अपघाताने मिळालेले मातृत्व स्त्रीच्या भावविश्वाची मोडतोड करू शकते, तिला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर बनवू शकते. 
आपल्यावर कोणत्याही वयात आणि कुठल्याही कारणाने मातृत्व लादले जाऊ नये याची काळजी घेण्याचे मुलींना आणि स्त्रियांना शिकविले पाहिजे. अकाळी मातृत्व लादले गेले तर तिच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. 
आज-काल स्वातंत्र्याच्या भाकड कल्पनांमुळे मुली कमी वयात डेटिंग सुरू करतात. यात व्यवस्थित काळजी घेतली नाही तर पोरवयात गर्भधारणा होऊ शकते. आजकाल अल्पवयीन कुमारींच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे बोलले जाते. कुटुंबातील स्त्रिया आणि जेष्ठ व्यक्तींनी मुलींना याबद्दल वेळीच सावध केले पाहिजे.
यासाठी मुलींचे संगोपन जास्तीत जास्त सुसंस्कारी वातावरणात आणि काळजीने केले गेले पाहिजे. त्या वापरत असलेले कपडे, प्रसाधने, सॅनिटरी नॅपकिन्स, याबरोबरच त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडेही लक्ष ठेवले पाहिजे. कुटुंबात मुलींना भक्कम भावनिक आणि मानसिक आधार असेल तर मुलींचे वर्तन संतुलित आणि संयमित राहण्याच्या जास्त शक्यता असतात. ज्या मुलींना कुटुंबातून सुरक्षिततेची, केअरिंगची भावना मिळते त्या स्थिर वृत्तीच्या बनायला मदत होते.
शरीर जास्तीत जास्त उघडे ठेवून  समाजात वावरणे म्हणजे आधुनिकता नव्हे. सेलिब्रिटी लोकांचे किंवा  रीलमधले कपडे पाहून त्याचे अनुकरण करणे म्हणजे आधुनिकता नव्हे. सेलिब्रिटी आणि सामान्य मनुष्याच्या जीवनात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. सेलिब्रिटींचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मागेपुढे अंगरक्षक नेमलेले असतात. त्यांनी कसेही कपडे घातले तरी त्यांना काही फरक पडत नाही. उत्तान कपडे घालणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. त्यांना कशाचे तरी प्रमोशन करण्याचे पैसे मिळत असतात. लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेणे ही त्यांची व्यावसायिक गरज असते. मुळात उत्तेजक कपडे घालून प्रेक्षकांना आकर्षित करून घेणे ही त्यांच्या व्यवसायाची गरज असते.  लोकांना आकर्षित करून घेणे ही आपलीसुद्धा गरज आहे काय?
सामान्य मुली आणि महिलांचे असे नाही. त्यांनी आपल्या व्यवसायानुसार योग्य ती वस्त्रे प्रावरणे परिधान केले पाहिजेत. दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी ती सुटसुटीत आणि सोयीची असली पाहिजेत. उगीच कोणीतरी नटीने असे असे कपडे घातले म्हणून शरीरावर ताण येईल इतके तंग किंवा सांभाळायला कठीण होईल इतके ढगळ कपडे घातल्यामुळे जिवाची गैरसोय होऊ शकते. शिवाय नटीचे अनुकरण केल्यामुळे तिला जसे त्या कपड्यांचे आर्थिक फायदे मिळतात तसे आपल्याला मिळणार नाहीतच.
एका शाळेतील काही शिक्षिका डीप नेक  ब्लाउज घालत असल्यामुळे त्या संस्थेने सर्व शिक्षिकांना काळा कोट कंपल्सरी केला आहे. 
डीप नेक ब्लाउज घालून शाळेत जाणे कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. प्रत्येक स्त्रीला आपण कसे कपडे घालावे याचे निश्चित स्वातंत्र्य आहे पण आपल्या कार्यक्षेत्राच्या गरजेनुसार कपडे घातले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असे वाटते. कमीत कमी कामाच्या ठिकाणी तरी शिक्षिकेने शिक्षिकेसारखे, नर्सने नर्ससारखे, डॉक्टरने डॉक्टरसारखे, पायलटने पायलट सारखे दिसावे. त्यांच्या खाजगी आयुष्यात मनासारखे वागायला त्या स्वतंत्रच आहेत.
अनेक वेळा आया मुलींसाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत म्हणून विशिष्ट फॅशनचे कपडे खरेदी करतात. मान पाठ पोट दंड पाय प्रमाणापेक्षा जास्त उघडे टाकणारे कपडे मुलींना हौसेने घेऊन देतात. आपल्या लेकराच्या देहयष्टीला ते शोभतील की नाही याची काळजी घेतली जात नाही. अनेक वेळा हे कपडे त्या मुलीच्या देहयष्टीला न शोभल्यामुळे ते लेकरू बाहेर वावरताना अवघडल्यासारखे दिसते.  इनफिरियर फील करते. आरशात पाहताना आपल्याला हे धड दिसत नाही हे तिच्या लक्षात आलेले असते. पण आया मात्र आमची हौस झाली नाही निदान आमच्या मुलीला तरी फॅशन करू दे अशी भूमिका घेतात. खरंतर असले चित्र विचित्र कपडे घालण्याचे काहीही आउटपुट किंवा तर्कसंगत कारण नाही. केवळ बाजारात उपलब्ध आहे म्हणून, सारासार विचार न करता असल्या कपड्यांची खरेदी केली जाते.
आपली मुलगी विशिष्ट कपड्यात कशी दिसते हे आधी कुटुंबातल्या लोकांनी नीट पाहिले पाहिजे. मग ते कपडे घालून तिला समाजात सोडले पाहिजे. तिच्या कपड्यांकडे पाहून  समाजातील काही घटकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.  समाजातले सर्व घटक सुसंस्कृत नाहीत हे विसरता कामा नये.  जास्त अंग उघडे टाकणारे कपडे घातले म्हणजे आपण खूप आधुनिक दिसतो असे अजिबात नाही.
वाढत्या वयात मुलींचे शरीर उठावदार होत असताना त्यांच्या परिधानाची योग्य काळजी घेतली पाहिजे. सुटसुटीत, शोभतील असे आणि उत्तान न वाटणारे कपडे घालायला शिकविले पाहिजे. आपण लग्नकार्यात सजून धजून जातो, प्रवासात हलके सुटसुटीत कपडे घालतो, कामाच्या ठिकाणी ऑफिस वेअर्स आणि पिकनिकला जाताना कॅज्युअल कपडे वापरतो. पिकनिकला जाताना कोणी बारा किलोचा लेहंगा आणि दुपट्टा घालून जात नाही. तिथे हलका-फुलका टी-शर्ट आणि पॅन्टला पसंती दिली जाते. पोहताना स्विमिंग सूट घातला जातो. गिर्यारोहण करताना टाईट कपडे वापरले जातात. एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली असेल तर कुणी जरीची साडी नेसून जात नाही.
याचाच अर्थ आपण घातलेल्या कपड्यांचा आपल्या मनस्थितीवर, वर्तनावर, पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर आणि समाजमनावर निश्चित परिणाम होत असतो.
मी काहीही घातले तरी लोकांनी माझ्याकडे चांगल्याच नजरेने पाहावे असे आपण म्हणू शकत नाही. बेढब शरीर असलेल्या व्यक्तीने विचित्र कपडे घातल्यानंतर आपल्याला सुद्धा त्याच्याकडे पाहताना विचित्र फील येतोच. आपल्या शरीराची योग्य काळजी घेताना आपल्या कपड्यांची सुद्धा योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर आयुष्यभर वेगवेगळ्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. कोवळ्या वयात शरीराची नासाडी होऊ शकते. माय बॉडी माय राईट  म्हणजे आपल्या शरीराची सर्वार्थाने काळजी घेणे असा योग्य अर्थ मुलींना समजावून सांगितला पाहिजे. युवर बॉडी युवर राईट, सो यू मस्ट टेक केअर ऑफ इट.

अमृता खंडेराव.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...