"चल, येतो मी." स्वप्नील बॅग उचलत जुईला म्हणाला.
"ओके" जुईने निरोप देण्यासाठी हात हलवला पण अचानक काहीतरी आठवून म्हणाली
" अहो मी काय म्हणते.. आज गंधे हाॅलमध्ये कवीसंमेलन आहे.जायचं का आपण संध्याकाळी?"
"अं. माझं जमेल असं वाटत नाही. तू जाऊन ये ना संध्या वहिनीसोबत"
"संध्या वहिनींना कुठे इंटरेस्ट आहे अशा कार्यक्रमात! कुठे सेल लागलेला असला की मात्र एका पायावर तयार!"
स्वप्नील हसला.
"बायकांना शाॅपिंग शिवाय दुसरं सुचतं तरी काय? सगळ्यात प्रिय छंद असतो तो त्यांचा"
जुईने तोंड वेडंवाकडं केलं. स्वप्नीलने गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला. जुई स्वतःशी चरफडली. मग तिने कुणी नाही आलं तरी कवीसंमेलनाला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला.
जुईला लहानपणापासूनच कवितांचं वेड होतं. शाळेत असल्यापासून ती कविता लिहायची. अर्थात त्यावेळी निसर्ग हाच तिच्या कवितांचा विषय असायचा. काॅलेजमध्ये गेल्यावर ती मुक्त कविता लिहू लागली. निसर्ग कवितांची जागा आता सामाजिक कवितांनी घेतली होती. "काव्य दर्पण"नावाचं मासिक तिनेच सुरु केलं होतं. काही दिवसांनी सुधीर नावाचा एक देखणा तरुण त्या मासिकात कविता पाठवू लागला. त्याच्या काहिशा बंडखोर कविता जुईला फार आवडायच्या. त्या मासिकाच्या निमीत्ताने सुधीरशी तिची ओळख झाली. भेटीगाठी होऊ लागल्या. हळूहळू कवीमनाची जुई त्याच्या प्रेमात पडली. सुधीर देखणा असल्यामुळे अनेक मुली त्याच्यासाठी जीव टाकायच्या. पण जुई सुधीरवर प्रेमकविता लिहू लागली आणि तिचं प्रेमप्रकरण अख्ख्या काॅलेजमध्ये गाजू लागलं. सिगारेट पित असलेला सुधीर आणि त्याला खेटून उभी असलेली जुई हे दृश्य काॅलेजमध्ये काॅमन झालं होतं. सुधीर चेनस्मोकर होता. एकापाठोपाठ भकाभका सिगारेट प्यायचा आणि तो धुर जुईच्या तोंडावर सोडायचा. जुई त्या वासाने धुंद व्हायची. कधीतरी ती त्याला विचारायची
"का पितोस एवढा? सोडून दे ना." तेव्हा तो एक दमदार झुरका घेऊन धुरांची वलंयं बाहेर काढायचा आणि म्हणायचा
" जमाने की हर फिक्र को धुँएमे उडाना हमे अच्छा लगता है जुई" त्याच्या या स्टाईलवर जुई अजूनच फिदा व्हायची.
जुई बी.ए.पास झाली आणि तिने एम.ए.ला ॲडमिशन घेतली. सुधीर मात्र नापास झाला. सुधीरला त्याचं फारसं दुःख झालं नाही. आता ही जोडी फुटेल असंच सगळ्यांना वाटतहोतं. मात्र जुईचं त्याच्यावरचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही.
जुईच्या घरुन तिच्यासाठी स्थळं बघणं सुरु झालं. हे कळल्यावर जुई कासावीस झाली. सुधीरला भेटून तिने त्याला या गोष्टीची कल्पना दिली. त्याने तिला लवकरच तिच्या वडिलांना भेटण्याचं आश्वासन दिलं. एक दिवस स्वप्नीलचं चांगलं स्थळ सांगून आलं आणि स्वप्नील लवकरच तिला बघायला येणार आहे हे जुईला कळल्यावर मात्र तिने धीर धरुन आईला सुधीरवरच्या प्रेमाची कल्पना दिली आणि 'करेन तर त्याच्याशीच लग्न करेन" असंही सांगितलं. आईने ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर टाकली. जुईचे वडील मोकळ्या स्वभावाचे होते. मुलगा चांगला असेल तर आंतरजातीय विवाहालाही त्यांची आडकाठी नव्हती. शिवाय आजकालची मुलं जरा मनाविरुद्ध घडलं की आत्महत्या करायला मागेपुढे पहात नाही याचीही त्यांच्या मनात भिती होतीच. त्यांनी जुईला सुधीरची माहिती विचारली पण सुधीरचं नांव आणि तो सुंदर कविता करतो यापलीकडे जुईला त्याची काहीच माहिती नव्हती. तरीही वडिल म्हणाले "काही हरकत नाही. तू त्याला घरी घेऊन ये.मी चौकशी करेन त्याची "
जुईने सुधीरला काॅलेजमध्ये गाठलं. त्याला सर्व कल्पना देऊन वडिलांनी घरी बोलावल्याचं सांगितलं. पण सुधीरच्या चेहऱ्यावर फारशी काळजी दिसली नाही. उलट ते ऐकून सुधीर मोठमोठ्याने हसायला लागला.
"अगं जुई मी इतक्या लवकर लग्न कसा करु शकेन? अजून मी ग्रॅज्युएट झालो नाही. कधी होईन सांगता येत नाही. अर्थातच ग्रॅज्युएट झाल्याशिवाय नोकरी नाही. त्यातून तुम तो जानती हो मै आझाद पंछी हुँ. हमे एक जगह रुकना अच्छा नही लगता."
बोलता बोलता त्याने सिगारेट शिलगावली. जुई काकुळतीला आली आणि म्हणाली
"सुधीर मी लग्न करेन तर तुझ्याशीच. तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायची माझी तयारी आहे. पण तू एकदा माझ्या वडिलांना भेटून त्यांना व्यवस्थित समजावून सांग म्हणजे ते माझ्यासाठी स्थळं तरी पहाणार नाहीत."
सुधीरने तिच्या तोंडावर धुर सोडला आणि म्हणाला
"ठिक आहे. येतो मी रविवारी संध्याकाळी तुझ्या घरी आणि पटवतो तुझ्या वडिलांना."
जुई खुश झाली. हवेत तरंगतच ती घरी आली. सुधीर रविवारी येऊन भेटणार असल्याचं तिने आईला सांगितलं. त्या रात्री तिने सुधीरवर एक ह्रदयस्पर्शी कविता लिहिली.
रविवारची संध्याकाळ उजाडली. जुई आणि तिचे आईवडिल आतुरतेने सुधीरची वाट बघत होते. पण सुधीर आलाच नाही. जुई त्याला वारंवार फोन करत होती पण त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. त्याला काही अपघात तर झाला नाही या शंकेने ती व्याकुळ झाली. दहा वाजून गेले तरी तो येत नाही हे पाहून तिच्या वडिलांनी दरवाजा बंद करुन टाकला. जुई रात्रभर झोपली नाही. सुधीरच्या आठवणीने आणि काळजीने रडत राहिली.
दुसऱ्या दिवशी काॅलेजला जाऊन तिने त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्याचा फोनही लागला नाही. चारपाच दिवसांनी तिला कळलं सुधीर काॅलेज सोडून कुठेतरी निघून गेला होता. कुठे गेला हे कुणालाच माहित नव्हतं. तो जिथे रहात होता त्या चाळीतही ती जाऊन आली. शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता. त्याचे आईवडिल विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यात रहात होते. पण त्या खेड्याचं नावही कुणाला माहीत नव्हतं. जुई हताश झाली. यथावकाश जुईचं स्वप्नीलशी लग्न झालं. गळ्यात मंगळसुत्र पडेपर्यंत जुई सुधीरची वाट बघत होती. पण सुधीर काही आला नाही.
जुईचा नवरा, स्वप्नील, स्मार्ट असला तरी सुधीरसारखा देखणा नव्हता आणि मेकॅनिकल इंजीनियर असल्यामुळे त्याचा कवितांशी काहीच संबंध नसणार हे जुईने गृहित धरलंच होतं. पण त्याची स्वतःची इंडस्ट्री होती. गावात दोन वर्कशॉप्स होते. मोठा बंगला होता. दोन फोर व्हिलर होत्या. विशेष म्हणजे स्वप्नीलने ते स्वमेहनतीने कमावलं होतं.कोणत्याही मुलीच्या आईवडिलांना शेवटी काय हवं असतं? आपली मुलगी सुखात रहावी असंच त्यांना वाटतं. शिवाय इतक्या कर्तबगार मुलाला ते नाही म्हणूच शकत नव्हते. शेवटी इच्छा नसुनही जुई लग्नाला विरोध करु शकली नाही. त्यातून सुधीर असा पळून गेलेला. जुईकडे विरोधासाठी कोणतंच कारण नव्हतं.
लग्नानंतर जुई शांतशांत रहायची. गरज पडेल तेव्हाच ती बोलायची. ती नाराज आहे की अशीच अबोल आहे हे स्वप्नीलला कळत नव्हतं. तिचं मन जिंकायचा तो आटोकाट प्रयत्न करायचा. पण जुईला हवा होता तिच्यासारखाच कवीमनाचा नवरा आणि मेकॅनिकल इंजीनियर असलेला स्वप्नील कवीमनाचा असूच शकत नव्हता. आपल्या नाजुक भावना त्याला समजणार नाहीत असंच तिला वाटायचं. कविता लिहिलेल्या तिच्या वह्या ती माहेरीच सोडून आली होती. आताही तिला कविता सुचायच्या पण त्यात विरहभावना जास्त असायच्या. त्या कुठेतरी लिहून ठेवाव्या असं तिला वाटायचं. पण लिहिणार कुणासाठी? या घरात तर कुणाचा कवितेशी दुरदुरचाही संबंध नव्हता. शेवटी तिने कविता लिहिण्याचा नादच सोडला. वर्तमानपत्रातल्या कविता मात्र ती जरुर वाचायची. टिव्हीवर दिसणारी कवीसंमेलनही ती आवर्जून बघायची. तिला कवितांचं वेड आहे हे यावरुन घरात सगळ्यांना कळलं होतं. त्यामुळे कुठेही कविसंमेलन असलं की तिला तिथे जायला कुणी अडवायचं नाही. अशा कवीसंमेलनात तरी कधीतरी सुधीर तिथे भेटेल अशी वेडी आशा तिला असायची. तिच्या दुर्दैवाने आजपर्यंत तरी तो भेटला नव्हता. लग्नाआधी तिने खुप कविता लिहील्या आहेत हे मात्र जुईने कुणालाच सांगितलं नव्हतं. तिचं हे भांडं मात्र एकदा तिची मैत्रिण घरी आली तेव्हा फुटलं.
एके दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली. जुईने दार उघडून पाहिलं तर तिची बालपणीची मैत्रिण अंजू उभी होती. दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. जुई तिला प्रेमाने आत घेऊन गेली.
"अंजू अगं फोन तर करायचास, मी तुला घ्यायला आले असते."
जुई असं म्हणाली खरी पण अंजूचं असं अचानक येणं तिला थोडं खटकलंच.
"अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मावशींकडून पत्ता घेतला आणि सरळ तुझ्याकडे आले. ए पण जुई तुझा बंगला फार सुंदर आहे गं आणि किती एलिगंटली सजवलंय घर. वा खुपच सुंदर.चाॅईस तुझा की जिजूंचा"
" मी लग्न होऊन आले तेव्हापासून हे घर असंच आहे. अर्थातच या सगळ्या आयडियाज स्वप्नीलच्याच"
तेवढ्यात स्वप्नील आला.जुईने दोघांची ओळख करुन दिली. जेवणाच्या टेबलावर सगळे बसले असतांनाच अंजू म्हणाली
"जिजू आमची कवयित्री मैत्रिण तुम्हांला कविता वाचून दाखवते की नाही?"
"जुई कविता करते?"स्वप्नीलने आश्चर्याने विचारलं "तिला कविता आवडतात हे मला माहित होतं पण ती कविता करते हे माहीत नव्हतंं"
"हो मग ! अहो काॅलेजमध्ये असतांना ती काव्य दर्पण नावाचं मासिक चालवायची. त्यात तिच्याही कविता असायच्या. मला तरी वाटतं दोनतीन डायऱ्या सहज भरल्या असतील तिच्या
या कवितांनी.हो ना गं जुई?"
जुईने तिच्याकडे पाहून डोळे वटारले. अंजू सुधीरचा विषय तर काढणार नाही या विचाराने ती अस्वस्थ झाली.
"इतक्या काही चांगल्या नव्हत्या माझ्या कविता शिवाय आपल्या घरात कुणाला कवितांमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मी कधी बोलले नाही त्याबद्दल." स्वप्नीलने काही विचारण्याच्या आतच जुईने स्पष्टीकरण देऊन टाकलं. स्वप्नील काही बोलला नाही पण अंजूकडे बघून त्याने स्मित केलं.
रात्री बेडरुममध्ये अंजूने जुईला विचारलं
"सुधीरची आठवण तुला अजुनही येते का गं?"
"हो गं. मुली आपलं पहिलं प्रेम कधी विसरतात का अंजू?"
"पण जुई तुझा नवरा खुपच चांगलाय गं ! सुधीरसारखा देखणा नसला तरी स्मार्ट आहे आणि जेंटलमन आहे. तो सुधीर कसला सिगारेटी ओढायचा. मला नाही आवडायचं त्याचं ते भकाभका धुर ओकणं"
"मला आवडायचं. काय स्टाईलने तो सिगारेट ओढायचा, खरा पुरुष वाटायचा तो!"
"मला त्याच्या कविताही आवडत नसत."
"मला आवडायच्या. जीवनातलं वास्तव असायचं त्याच्या कवितात"
"बोडख्याचं वास्तव ! सगळ्या घाणेरड्या आणि बिभत्स असायच्या"
"तुला नाही समजायचं ते अंजू. कविता तुझा प्रांतच नाहिये"
"ठीक आहे. नाही कळत मला काही कवितेतलं. पण धन्य आहे बाई तुझी. मॅडम विसरा आता त्या सुधीरला. चांगला वेल सेटल्ड नवरा मिळालाय तुम्हांला. माहितेय,तू जर सुधीरशी लग्न केलं असतं ना तर तुला त्या घाणेरड्या चाळीतल्या नरकात रहावं लागलं असतं. आज तू एवढ्या शानदार बंगल्यात रहातेय"
"केलं असतं गं मी ॲडजस्ट. सुरवातीला येतातच अडचणी. काही वर्ष आम्ही दोघांनीही नोकरी करुन एखादं छोटंसं घर घेतलंच असतं"
अंजूने तिला हात जोडले.
"बाई बस कर तुझं सुधीरपुराण. तुला नको असेल हा स्वर्ग तर सोडून दे नवऱ्याला. मी करेन स्वप्नीलशी लग्न"
"खरंच करशील? मला सुधीर भेटू दे मग खुशाल कर."जुई आनंदाने म्हणाली
"मुस्काटात मारीन मी आता ! एवढा चांगला नवरा सोडला आणि त्या धुराड्याच्या आठवणीने कुढतेय आणि आता त्या सुधीरची तारीफ करुन माझं डोकं पिकवू नको. चल झोप मुकाट्याने" अंजू संतापून म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती गेली तेव्हा जुईला बरंच वाटलं कारण ती सारखी स्वप्नीलची तारीफ करत होती. तुलना करतांना ती चुकून सर्वांसमोर सुधीरचा उल्लेख तर नाही करणार या भितीने जुईचा जीव टागणीला लागला होता.
७ जानेवारीची सकाळ उजाडली. आज जुईचा वाढदिवस होता. उठल्यापासून स्वप्नीलशी तिचं दोनतीनदा बोलणं झालं पण त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानेच काय स्वप्नीलचा भाऊ, वहिनी,त्यांची मुलं कोणीच तिला बर्थडे विशेस दिल्या नाहित. तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल त्यांना कळलं तर नाही या विचाराने ती धास्तावली. स्वप्नील आणि त्याचा भाऊ दोघंही फॅक्टरीत निघून गेले. थोड्या वेळाने तिच्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले. तिला फोनवर बोलतांना तिच्या जाऊने दोनतीनदा बघितलं पण तिने कसलीही उत्सुकता दाखवली नाही. दुपारची जेवणं होऊन गेली आणि तिच्या लक्षात आलं की तिचे आईवडिल, बहिण,मेव्हणे यांनी कोणीही फोन केला नव्हता. इतक्या सगळ्यांना आपल्या वाढदिवसाचा विसर पडावा याचा तिला आता राग येऊ लागला. त्याचबरोबर काहीतरी अशुभ तर नाही ना घडणार या शंकेने ती कासावीस झाली. दुपारी पाच वाजता तिच्या जाऊने तिला हाक मारली.
"जुई लवकर तयार हो आपल्याला एका फंक्शनला जायचंय"
"कसल्या फंक्शनला?" जुईच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
"माहित नाही. मघाशी ह्यांचा फोन आला होता. आपल्याला तयार होऊन हाॅटेल थ्री सिझनवर यायला सांगितलंय. बहुतेक एखादी बिझनेस पार्टी असावी"
जुई नाखुषीनेच तयार झाली. तिच्या वाढदिवसाचा सगळ्यांना विसर पडल्याचा राग तिच्या मनात धुमसत होता.
ती आणि तिची जाऊ, मुलांसोबत हाॅटेलवर पोहोचले. हाॅटेलमध्ये बरीच गर्दी होती. हाॅलमधली गर्दी पाहून तर ती चकीतच झाली. अचानक तिला तिचे आईवडील दिसले. आश्चर्य वाटून ती त्यांच्याकडे पोहचणार तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं तर तिची बहिण आणि मेव्हणे उभे होते.
"अरे तुम्ही इथे कसे काय?"तिने आश्चर्यचकीत होऊन विचारलं
"कमाल करतेस जुई ! तुझ्या प्रोग्रामला आम्ही येणार नाही का?"
"माझा प्रोग्राम? माझा कसला प्रोग्राम?"तिने गोंधळून विचारलं
"आता मात्र हद्द झाली हं !अगं आज तुझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमीत्ताने तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन नाहिये का?"
"माझ्या पुस्तकाचं प्रकाशन?"ती अजुनच गोंधळली.
"वेडाबाई ते समोर बघ"
जुईने स्टेजच्या भिंतीकडे पाहिलं. त्यावर लावलेल्या बॅनरवर "प्राजक्ताची फुलं- कवितासंग्रह प्रकाशन सोहळा" असं लिहीलेलं होतं. सोबत तिचा हसरा सुंदर फोटो होता. प्राजक्ताची फुलं हे तिच्याच एका कवितेचं नाव होतं. डोळे फाडून ती त्याकडे पहात असतांनाच तिचे आईवडील तिथे आले. तिच्या आईने तिला मिठी मारली.
"खुप खुप अभिनंदन बेटा. आज तुझं स्वप्न पुर्ण झालं"
"आई पण मला याची काहीच कल्पना नाहीये. हे तुम्ही करताय का?"
"अगं वेडे तुझ्या नवऱ्याशिवाय कोण करणार आहे?" तिचे मेव्हणे म्हणाले
"काय्य स्वप्नील करताहेत हे सगळं? पण त्यांनी हे सगळं मला कळू न देता कसं केलं?"
"अगं तुझी ती मैत्रिण,अंजू तुझ्याकडे आली होती तिने तू कविता लिहितेस असं सांगितलं होतं वाटतं. ते ऐकून जावईबापू नगरला आले होते तेव्हा घरी आले. तुझ्या कविता त्यांनी मागितल्या. त्या वाचल्यावर त्यांनी याचा संग्रह करुन आपण प्रकाशित करु असा विचार मांडला. आम्हांलाही तो आवडला. आज बघ त्यांनी तो प्रत्यक्षात आणला "
जुईच्या वडिलांनी गुपित उघडं केलं.
"पण आज तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत" जुई रागावून म्हणाली
"अगं तो स्वप्नीलरावांचाच प्लॅन होता तुला सरप्राईज द्यायचा"
तेवढ्यात स्वप्नील तिथे आला.
"स्वप्नील तुम्ही मला...."जुई त्याला काही म्हणणार तोच स्वप्नीलने तिला थांबवलं
"आईबाबांनी तुला सगळं सांगितलं असेलच. उरलेलं मी तुला रात्री सांगेन. आता चल कलेक्टरसाहेब आलेत.दोन मोठे साहित्यिक सुध्दा येऊन बसलेत.प्रकाशन समारंभाला सुरुवात करुया"
समारंभ सुरु झाला. वक्ते काय बोलत होते त्याकडे जुईचं लक्षच नव्हतं. कवितासंग्रहाचं प्रकाशन हे खरंच तिचं स्वप्न होतं. आज ते अनपेक्षितपणे स्वप्नीलकडून पुर्ण होतांना पाहून तिला सारखं गहिवरून येत होतं. भरुन येणारे डोळे ती वारंवार रुमालाने पुसत होती. आज पहिल्यांदाच तिच्या मनात स्वप्नीलबद्दलचं प्रेम जाग्रुत झालं होतं. सुत्रसंचालकाने तिला मनोगत सांगण्यासाठी डायसवर बोलावलं तेव्हा ती जागी झाली. कशीबशी ती उभी राहिली.
"मला काय बोलावं हेच कळत नाहीये इतकं गहिवरुन येतंय. माझे पती स्वप्नील यांनी माझ्या ध्यानीमनी नसतांना आज हा प्रकाशन सोहळा आयोजित केला. त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या प्रोत्साहनामुळेच आज माझं स्वप्न आज पुर्ण झालं. "दोन चार वाक्य बोलून ती खाली बसली. प्रकाशन झालं. स्वप्नीलने काव्यसंग्रहातल्या दोन कवितांचं वाचन केलं.अ गदी एखाद्या नामांकित कवीसारखं त्याचं काव्यवाचन पाहून जुई चाटच पडली.
प्रकाशन सोहळ्यानंतर मोठा केक कापून जुईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वप्नीलने तिला हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली. सगळे जेवणाचा आनंद घेत असतांना जुईला अचानक एक गोष्ट आठवली आणि तिचा जीव एकदम घाबराघुबरा झाला. बोलणं अर्धवट सोडून ती धावतच पुस्तकं ज्या कोपऱ्यात ठेवली होती तिथे पोहोचली. एक पुस्तक हातात घेऊन ती अस्वस्थपणे एक एक पान उलटवू लागली.
"काय झालं जुई?काय बघते आहेस?"
तिने मागे वळून पाहिलं.तिची आई उभी होती.
"आई या कवितात मी सुधीरवर केलेल्या कविता सुध्दा कविता होत्या. त्या पण या पुस्तकात टाकल्या तर नाहीत ना?" रडवेल्या आवाजात तिने विचारलं " बापरे आई त्या कविता या पुस्तकात असतील तर सगळ्या जगाला माझं प्रेमप्रकरण माहीत पडेल " तिच्या गळ्यातून एक हुंदका निघून गेला
"शांत हो बेटा "त्या" सर्व कविता काढून टाकल्या आहेत"
"काढून टाकल्या? कुणी? तुम्ही?"
"नाही बेटा,स्वप्नीलनी!"
" काय्य्यssssस्वप्नीलनी? म्हणजे स्वप्नीलना सगळं माहीत." ती रडायला लागली.
"हो त्यांना सगळं समजलंय. दुसरीकडून कळण्यापेक्षा आम्हीच त्यांना सगळं सांगून टाकलं."
"आई काय केलं हे ! त्यांना काय वाटलं असेल? आपण त्यांची फसवणूक केली असंच ना"
"नाही जुई. आम्ही सांगितल्यावर ते हसले. म्हणाले' या वयात असं प्रेम होणं काॅमन आहे. त्या प्रेमाला काही अर्थ नसतो. खरं प्रेम लग्नानंतरच समजायला लागतं' लाखात एक आहे जुई तुझा नवरा. दुसरा कुणी असता तर हाकलून दिलं असतं तुला घराबाहेर एवढं ऐकल्यावर!"
जुईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली.
"बस कर जुई. अशा शुभप्रसंगी रडायचं नसतं." आईने तिला धीर देऊन शांत केलं.
कार्यक्रम आटोपल्यावर जुई घरी आली पण त्याला आपलं प्रकरण समजलंय या वास्तवतेने स्वप्नीलच्या नजर देण्याचं धाडस तिला होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी स्वप्नील तिला म्हणाला.
"जुई तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आहे"
जुईचं काळीज धडधडू लागलं. सुधीरबद्दल तर तो काही बोलणार नाही याची भिती तिला वाटू लागली.
" येत्या रविवारी आपण आठवडाभरासाठी उटी आणि कोडाईकॅनाॅलला जातोय"
जुईने एक सुटकेचा निश्वास सोडला.
"पण मग फॅक्टरीचं काय? बंद ठेवणार?"
"नाही. दादा बघणार आहे. सध्या कामं कमी आहेत. पंधरा दिवसांनी मात्र खुप लोड येणार आहे. असंही आपण हनिमूनला गेलोच नव्हतो. यालाच हनिमून समजुया" तिच्याकडे प्रेमाने पहात तो म्हणाला.
"खरं तर स्वित्झर्लंडला जायचा माझा विचार होता. पण माझ्या एका मित्राचं उटीजवळ रिसोर्ट आहे. तो कधीपासून बोलवतोय आपल्याला. म्हंटलं चला तिथे अगोदर जाऊन येऊ.पुढच्या वर्षी वेळ मिळाला की युरोपची टुर करुन टाकू. चालेल ना?"
" चालेल.चालेल" जुई खुष होऊन म्हणाली.
उटीपासून थोडं दूर अंतरावरच्या निसर्गरम्य परीसरात त्यांचं रिसोर्ट होतं. स्वप्नीलच्या मित्राने त्यांचं स्वागत केलं. त्याचं मराठी बोलणं ऐकून जुई आश्चर्यचकीत झाली. रुममध्ये आल्यावर तिने स्वप्नीलला त्याबद्दल विचारलं देखील.
"अगं तो पुण्यात माझ्यासोबतच इंजीनियरींगला होता. तिथंच तो मराठी शिकला"
"इंजीनियर असून हाॅटेल कसं काय?"
"त्याच्या वडिलांचं एक हाॅटेल अगोदरच उटीमध्ये होतं. याला मात्र हाॅटेलपेक्षा इंजीनियरींगमध्ये रस होता. इंजीनिअरिंग झाल्यावर तो चेन्नईत नोकरीत लागला. पण दुर्दैवाने त्याच्या वडिलांचं निधन झालं. हाॅटेल चालवायला कुणी नसल्यामुळे यालाच नोकरी सोडून हाॅटेल सांभाळावं लागलं. आता त्याची उटीत दोन आणि हे एक अशी तीन हाॅटेल्स आहेत"
" पण मग इंजीनियरींग करुन काहीच फायदा झाला नाही. खुप कठीण गेलं असेल त्यांना ते स्विकारणं"
"नाही जुई. जीवनाचं वास्तव त्याने स्विकारलं. ईलाजच नव्हता"
जुईला स्वतःचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. सुधीरला ती अजून विसरली नव्हती. स्वप्नील हेच आपलं वास्तव आहे हे तिला अजूनही स्विकारता येत नव्हतं.
रात्री दोघं हाॅटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलीे. स्वप्नीलचा मित्र त्यांच्यासोबत येऊन बसला गप्पा सुरु असतांना अचानक तो जुईला म्हणाला.
"भाभीजी आमचा मित्र तुम्हांला कविता ऐकवतो की नाही?"
जुईला धक्का बसला.
" नाहीतर ! स्वप्नील आणि कविता? शक्य तरी आहे का?"
" काय भाभीजी !अहो आमचा स्वप्नील साधा कवी नाही, बेस्ट कवी म्हणून काॅलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्याचा एक कवितासंग्रहही प्रकाशित झालाय."
"काय? स्वप्नील हे खरं आहे?"जुईने अविश्वासाने स्वप्नीलकडे पहात विचारलं. स्वप्नीलने हसत मान डोलावली.
"माझ्याकडे आहे ते पुस्तक. कधी उदास वाटलंं की मी त्यातल्या कविता वाचतो. खुप प्रेरणादायी कविता आहेत. वाचल्या की लगेच छान वाटायला लागतं. थांबा मी आणून दाखवतो."
तो लगेच त्याच्या खोलीत जाऊन ते पुस्तक घेऊन आला. जुईने ते पुस्तक थरथरत्या हाताने घेतलं. थोडंसं जुनं असलं तरी सुरेख सुबक पुस्तक होतं ते.
"आमच्या एका प्राध्यापकांना माझ्या गॅदरींगमध्ये वाचलेल्या कविता खुप आवडल्या. त्यांनी स्वखर्चाने ते छापून प्रकाशित केलं." स्वप्नीलने सांगितलं. जुईचा अजून विश्वास बसता नव्हता. तिने एक पान उलटून पहिली कविता वाचली. काय सुंदर होती ती कविता!
"जुई नंतर वाच ना.आपण अगोदर जेवून घेऊ. मला खुप भुक लागलीये"
जुईने पुस्तक बंद केलं.
"भाभीजी ते पुस्तक वाचून मला परत करा बरं ! त्याची एकच काॅपी आहे माझ्याकडे." मित्र हसून म्हणाला आणि तिथून उठला.
रात्री एक वाजेपर्यंत जुई त्या कविता वाचत होती. वाचून झाल्यावर भरुन आलेले डोळे तिने पुसले. सुधीरच्या ज्या कवितांसाठी ती वेडी झाली होती त्या कविता तिला आठवल्या. स्वप्नीलच्या उच्च दर्जाच्या कवितांपुढे त्या तिला भिकार वाटल्या. जीवनाचं वास्तव सुधीरसारखंच स्वप्नीलनेही मांडलं होतं पण त्यात सुधीरच्या कवितांसारखा बीभत्सपणा होता. सुधीरच्या कविता मेंदूला झिणझिण्या आणायच्या. स्वप्नीलच्या कविता ह्रदयाला भिडत होत्या. काळजात घर करत होत्या. त्या कवितात एक प्रकारची सकारात्मकता होती. निराश झालेल्या मनाला आशेचा किरण दाखवण्याचं सामर्थ्य त्या कवितात होतं. गाढ झोपलेल्या स्वप्नीलकडे तिने पाहिलं. मशीन्स,लोखंडाच्या भावनाहीन जगात रमणारा हा माणूस, ज्याला ती दगडाच्या काळजाचा म्हणायची. इतका उच्च दर्जाचा कवी निघावा याचं तिला राहून राहून नवल वाटतं होतं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसोर्टसमोरच्या तलावाच्या काठावर दोघं बसलेले असतांना जुई स्वप्नीलला म्हणाली.
"स्वप्नील तुम्ही कविता करायचात हे मला का नाही सांगितलंत? काल मी तुमच्या कविता वाचल्या. फारच सुरेख आहेत. तुमच्यात एवढी प्रतिभा असतांना तुम्ही नंतर कविता लिहिणं का बंद केलंत?"
स्वप्नीलने एक छोटा खडा उचलून पाण्यात फेकला आणि म्हणाला
"माणसाचं आयुष्य त्याला कुठे नेईल काहीच सांगता येत नाही जुई. शाळेत असल्यापासून मला वाचनाची, कवितांची आवड होती. मोठा लेखक व्हायचं माझं स्वप्न होतं. माझे वडिल एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये कामाला होते. कमाई तुटपुंजी. अर्थातच आमचं बालपण फार गरीबीत गेलं. आई इकडचीतिकडची कामं करुन संसाराला हातभार लावायची. एक दिवस वडिलांचा मालक वारला आणि ते वर्कशॉप वडिलांच्या ताब्यात आलं. वडिल फारसे शिकलेले नव्हते. जी काम चालुन यायची ते ती करायचे. मालक झाल्यामुळे थोडा पैसा यायला लागला पण तेवढ्यात माझ्या आईला कँन्सर झाला. येणारा पैसा औषधोपचारात जाऊ लागला. आईच्या आजारामुळे वडीलांना वर्कशॉपमध्ये लक्ष देता येईना म्हणून मोठ्या भावाची दहावी झाल्याबरोबर वडिलांनी त्याला वर्कशॉपमध्ये अडकवून टाकलं. मी मात्र मेकॅनिकल इंजीनियर व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. मला तर इंजीनियरींगमध्ये जराही रस नव्हता. मी सायन्समध्ये बारावी पास होऊनही आर्ट्स काॅलेजला ॲडमिशन घ्यायला निघालो होतो. पण त्याच वेळी माझी आई वारली. मरतांना तिने माझ्याकडून वडिलांचं स्वप्न पुर्ण करण्याचं माझ्याकडून वचन घेतलं. माझा नाईलाज झाला. शेवटी मी पुण्याला मेकॅनिकल इंजीनियरींगला ॲडमिशन घेतली. वडिलांवर माझा भार नको म्हणून मी सकाळी पेपर वाटपाचं काम करायचो आणि संध्याकाळी एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करायचो. इंजीनियरींग पुर्ण करुन मी घरी परतलो. वडिल आता खचले होते. वर्कशॉप कसंबसं सुरु होतं. ते जिवंत ठेवण्यासाठी मी एका कंपनीत नोकरी धरली. माझा पगार वर्कशॉपमध्ये लावू लागलो. काही मशीन्स नवीन घेतल्या. पुण्याला ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होतो त्याचा मालक गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्ट घ्यायचा.ती पध्दत मला माहित असल्यामुळे मी गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो. कामं वाढली. नफा वाढू लागला तेव्हा मी नोकरी सोडून वर्कशॉप बघू लागलो. वेगवेगळ्या नवीन मशीन्स आणून मी वर्कशॉपचं आधुनिकीकरण केलं. दरम्यान भावाचं लग्न झालं आणि वडिल वारले. माझ्यावरची जबाबदारी अजुनच वाढली. कामाचाही व्याप वाढला तेव्हा मग आम्ही जागा घेऊन दुसरं वर्कशॉप सुरु केलं. तिथेही जागा पुरेना मग एमआयडीसीत फॅक्टरी सुरु केली. आता आपण ऑटोमोबाईल पार्ट्सची फॅक्टरी सुरु करतोय हे तुला माहितच आहे. तर या सगळ्या वाटचालीत मी जीवनाचं वास्तव स्विकारलं. ते स्विकारण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं.अर्थातच कवितांपासून मी दुर गेलो. कविता म्हणजे फक्त एक स्वप्नरंजन आहे असं मला वाटू लागलं. आजही मला कविता आवडतात पण मी त्यात गुंतत नाही. किंबहूना जीवनाचं वास्तव मला तसं करु देत नाही"
भारावून गेल्यासारखी जुई ते सगळं ऐकत होती. जीवनातलं वास्तव नुसतं कवितांमध्ये मांडून उपयोग नसतो तर खऱ्या आयुष्यात ते स्विकारावं लागतं हे तिच्याही लक्षात आलं होतं. अचानक आठवल्यासारखं ती स्वप्नीलला म्हणाली.
"स्वप्नील,माझ्या पुर्वायुष्याबद्दल तुम्हाला कळलं तेव्हा तुम्हांला माझा राग नाही आला?
"आला ना ! शेवटी मीही एक पुरुष आहे. बायकोच्या पहिल्या प्रेमाबद्दल कळल्यावर कोणताही पुरुष अस्वस्थ होणारच. खरं तर लग्नात आणि लग्नानंतरही तुझं वागणं, बोलणं यावरुन मला आणि वहिनीलाही तू या लग्नाने खुश नाहिये याची खात्री होती. तुझं लग्नाआधी एखादं प्रेमप्रकरण असावं अशीही आम्हांला शंका यायची. वहिनीने ती एकदोनदा बोलूनही दाखवली पण मी तिला समजावलं. तुला विचारुनही काही फायदा होईल असं मला वाटलं नाही कारण बायकांचं एक वैशिष्ट्य असतं. दुसऱ्याची गुपितं त्यांच्या पोटात रहात नाहीत मात्र स्वतःचं गुपित मनाच्या एका खोल कप्प्यात त्या गाडून टाकतात. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या काॅलेजमध्येही अशी अनेक प्रकरणं होती त्यातली फक्त एक टक्का प्रकरणं यशस्वी झाली होती. याचं कारण ते खरं प्रेम नसून आकर्षण असतं हे लक्षात घ्यायला हवंं. आपण ज्याच्या रिसोर्टमध्ये रहातोय त्याचं पुण्यातल्या एका मराठी मुलीवर प्रेम होतं. अनेक कारणांनी ते यशस्वी झालं नाही. शेवटी त्याने इथल्याच तामीळ मुलीशी लग्न केलं. आता तो सुखात आहे. परीस्थीतीशी,वास्तवाशी त्याला तडजोड करावीच लागली. अशी तडजोड तुही करशील याची मला खात्री होती म्हणून आलेला राग मी विसरुनही गेलो."
जुईला खुप काही बोलायचं होतं पण स्वप्नीलच्या मनाचा मोठेपणा पाहून तिला गहिवरुन आलं होतं त्यात तिला बोलताच आलं नाही.
"चल निघायचं. अंधार पडायला लागलाय." त्याने विचारल. तिने मान डोलावली. त्या अंधारात तिचे भरलेले डोळे त्याला दिसले नाहीत.
घरी परतल्यावर दोनच दिवसांनी जुईला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला.
"हॅलो जुई मी सुधीर बोलतोय"
जुई दचकली तिच्या हातून फोन पडता पडता वाचला.
"काय गं दचकलीस वाटतं" तो मोठ्याने हसला
"हो मी तुझा सुधीरच बोलतोय.कशी आहेस?"
"मी ठिक आहे " आजुबाजुला कुणी नसल्याची खात्री करुन ती बोलली.
" अगं भेटायचंय तुला.कधी भेटशील?"
"सुधीर तुला माहितेय, माझं आता लग्न झालंय.आपल्याला आता भेटता येणार नाही."
" कवी संमेलनात तर भेटू शकशील ना. येत्या रविवारी तुमच्या शहरात कवीसंमेलन आहे.मी तर आहेच त्यात पण मी तुझंही नांव दिलंय. तुझ्या दोन तीन कविता तयार ठेव.अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही"
जुईला काय बोलावं ते कळेना. सुधीरला भेटायची तिला उत्सुकता तर होतीच शिवाय कवीसंमेलनात कविता सादर करायची संधीही तिला मिळणार होती. शेवटी तिने निर्णय घेतला.
"ठिक आहे.मी येईन"
"ये हुई ना बात " तो मोठ्याने हसला." लवकरच ये. जरा गप्पाही मारता येतील. जुन्या आठवणींना तेवढाच उजाळा"
तिने त्याला कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ विचारुन घेतली आणि तो काही बोलायच्या आत काॅल कट केला. थरथरत्या हातांनी मोबाईल ठेवल्यावर अनामिक भीतीने तिचं ह्रदय धडधडू लागलं. आता कुठे नुकतंच तिच्या मनात स्वप्नीलबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. त्या दोघांत आताशी निर्माण झालेल्या मधुर संबंधांना सुरुंग लावण्यासाठी तर सुधीर आला नव्हता? तसं असेल तर सुधीरला दुर ठेवलेलंच बरं. पण आपण त्याचं ऐकलं नाही आणि त्याने घरी येऊन तमाशा केला तर? किंवा या भेटीचं निमित्त करुन त्याने घरी येणंजाणं वाढवलं तर? तिने मनाची चाचपणी केली. तिला सुधीर हवा होता का स्वप्नील? तुलना करता करता तीला स्वप्नीलचं पारडं जड वाटायला लागलं. तिचं लग्नाआधीचं वास्तव त्याने किती सहजगत्या स्विकारलं होतं. तिला कवीमनाचा नवरा हवा होता. स्वप्नील तसा होताच शिवाय सुधीरजवळ देखणेपण आणि कविता याशिवाय दुसरं काय होतं? याविचारा सरशी तिचं मन शांत झालं. आता प्रश्न होता सुधीर प्रत्यक्ष भेटल्यावर तिला त्याच्याबद्दल काय वाटतं याचा ! त्याचा विचार आताच करायची गरज नव्हती.
स्वप्नीलला सुधीरबद्दल सांगावं का याचा ती विचार करु लागली. शेवटी तिने स्वप्नीलला फक्त कवीसंमेलनाबद्दल सांगायचा निर्णय घेतला. सुधीरबद्दल ती त्याला काहीच सांगणार नव्हती. शेवटी सुधीर हे तिचं प्रकरण होतं. ते तिलाच निपटावं लागणार होतं. त्यात स्वप्नीलसारख्या सज्जन माणसाला ओढण्यात काहीच अर्थ नव्हता. रात्री तिने सगळ्यांना कवीसंमेलनात भाग घेत असल्याची कल्पना दिली. कुणी येऊ नये अशी इच्छा असतांना केवळ औपचारिकता म्हणून सगळ्यांना चलण्याचा आग्रहही केला. स्वप्नील आणि त्याच्या भावाला वेळ नव्हता. तिच्या जावेला कवी आणि कविता यामध्ये काडीचाही रस नव्हता.
रविवारी संमेलनस्थळी ती अर्धा तास अगोदर पोहोचली. पार्किंगला जागा नव्हती म्हणून तिने आपली कार सभागृलहाच्या मागच्या बाजुला शांत जागी लावली. गेटकडे ती पायी निघाली. गेट समोरच तिला सुधीर उभा असलेला दिसला बहुतेक तिचीच वाट पहात असावा. त्याला पाहून तिच्या मनात भावभावनांचा सागर उसळला. कधीकाळी तो तिचा सर्वस्व होता. पण त्याच्याच पळपुटेपणामुळे तिला मोठ्या अनिच्छेने स्वप्नीलशी लग्न करावं लागलं होतं. भेटल्यावर त्याच्याशी कसं वागावं हेच तिला सुचेनासं झालं.
ती त्याच्याजवळ आली. तो तिच्याकडे पाहून हसला.
" हाय जुई. कशी आहेस? लग्न चांगलंच मानवलेलं दिसतंय तुला ! पुर्वीपेक्षा खुप सुंदर दिसतेय."
ती नुसती हसली. त्याच्याकडे तिने निरखुन पाहिलं. पुर्वीसारखा तो अजिबात देखणा दिसत नव्हता. जणू तो सुधीर नव्हताच.
"चल सभागृहात जाऊया" त्याने तिचा हात हातात घेतला. तिने तो सोडवून घेतला.
"आता मी परका झालो वाटतं."तो तिच्याकडे पहात हसत म्हणाला. ती काहीच बोलली नाही. असं चारचौघात केलेलं प्रेमाचं प्रदर्शन तिला आवडलं नाही.
"आज संध्याकाळी हाॅटेलवर ये. एकत्रच जेवू. तुझी सगळ्या मोठमोठ्या कवींची ओळख करुन देतो"
"बघूया. नंतर सांगते"
" तुला यावंच लागेल नाहीतर मी तोंडावर पडेन. तुझ्यासारख्या सुंदर कवयित्रीशी माझे प्रेमाचे संबंध आहेत हे मी सगळ्या कवींना आधीच सांगून ठेवलंय."
त्याने आपल्याला ग्रुहित धरलंय आणि तो आपल्यावर हक्क गाजवू पहातोय हे तिच्या लक्षात आलं. पण ती चुप राहिली. पुढे काय काय होतंय हे तिला बघायचं होतं.
दोघांनी सभागृहात प्रवेश केला.तिला पाहून आयोजक पुढे आले. तिला हसून नमस्कार केला.
" जुईजी तुमचीच वाट पहातोय. लगेच कार्यक्रम सुरु करुया"
स्टेजवर सगळ्या कवींसोबत जुईही जाऊन बसली. दोन कवींनी कविता सादर केल्यावर सुत्रसंचालकाने सुधीरला आमंत्रित केलं. बंडखोर कवी म्हणून त्याची ओळख करुन दिली. सुधीरने कविता सादर करायला सुरुवात केली. पण हे काय? ज्या कवितांमुळे जुई त्याच्या प्रेमात पडली होती. ज्या कविता तिच्या मेंदुला झिणझिण्या आणायच्या त्याच कविता तिला बीभत्स आणि अश्लील का वाटू लागल्या होत्या?.सुधीरने पहिली कविता संपवली. मंचावरचे कवी सोडून कुणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. जुईनेसुध्दा नाही. त्याने दुसरी कविता सुरु केली. समाजातली वास्तवता इतकी भीषण असते हे जुईला प्रथमच कळत होतं.प ण ज्या बीभत्स आणि घाणेरड्या शब्दात ती कविता गुंफली होती ते शब्द जुईला ऐकवेनात. एक प्रकारची किळस तिच्या मनात दाटून आली. जगाकडे किळसवाण्या नजरेने बघणाऱ्या सुधीरचा तिला संताप आला. अशा घाणेरड्या माणसावर आपण प्रेम केलं याची तिला लाज वाटू लागली. सुधीर कविता संपवून तिच्याजवळ येऊन बसला. हसत तिच्याकडे पहात म्हणाला.
"काय आवडल्या ना कविता?"
त्याच्या कविता कुणालाच आवडल्या नाहीत हे सांगायचं तिच्या ओठावर आलं होतं. कसाबसा तिने मनाला आवर घातला. सुत्रसंचालकाने तिचं नांव उच्चारलं. जुईने खास स्वप्नीलने निवडून दिलेल्या कविता म्हणायला सुरुवात केली. प्रेक्षकातून "वाह वाह बहोत खुब "असे उद्गार येऊ लागले. कविता संपल्यावर खुप टाळ्या वाजल्या. कविता संपवून जुई आयोजकांकडे गेली. स्वप्नीलची एक कविता म्हणायची तिने परवानगी मागितली. आयोजकांनी मोठ्या नाखुषीनेच ती दिली. जुईने ती कविता सादर करायला सुरुवात केली आणि पहिल्या ओळीपासून टाळ्या मिळू लागल्या. कविता संपल्यावर तर टाळ्यांचा कडकडाट झाला. आयोजक तिच्याकडे घाईघाईने आले आणि म्हणाले.
"जुईजी फारच सुंदर कविता. अजून एखादी असेल तर जरुर वाचा."जुईने आनंदाने पर्समधून स्वप्नीलच्या कवितांचं पुस्तक काढलं आणि आणखी एक कविता सादर केली. यावेळी तर जास्तच टाळ्यांचा कडकडाट झाला. सुत्रसंचालकांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले.
"जुईजी तुमचे पती इतके चांगले कवी आहेत तर तुम्ही त्यांना का नाही आणलंत? ठिक आहे.पुढच्या कविसंमेलनात त्यांना जरुर घेऊन या." ती तिच्या खुर्चीत जाऊन बसली. सुधीरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला
"मला नाही आवडल्या कविता. वास्तव नेहमी एवढं पाॅझिटीव्ह नसतं."
"वास्तव नेहमी एवढं बीभत्सही नसतं सुधीर आणि काय फरक पडतो तुला एकट्याला नाही आवडल्या तर?रसिकांनी तर टाळ्यांचा पाऊस पाडलाय"
" कार्यक्रम संपला की भेट. कविता कशी असते सांगेन तुला"
" जरुर सुधीर. हाॅलच्या मागच्या बाजुला ये. मलाही तुझ्याशी बोलायचंय" त्याच्या नजरेला नजर भिडवत ती धीटपणे म्हणाली.
कार्यक्रम संपल्यावर बाकीच्या कवींनी आणि रसिकांनी तिला घेरलं. तिच्या आणि स्वप्नीलच्या कवितांची मुक्तकंठाने स्तुती केली.
थोड्या वेळाने ती सभागृहाच्या मागच्या बाजुला आली. सुधीर तिचीच वाट बघत होता.
" हं मग येते आहेस ना संध्याकाळी हाॅटेलवर?" हसत त्याने विचारलं. ती हसली नाही
"नाही. अगोदर मला सांग, तू त्या दिवशी माझ्या घरी येणार होतास.आम्ही रात्री दहापर्यंत तुझी वाट बघितली पण तुझा पत्ताच नव्हता. मोबाईलही स्विच ऑफ करुन ठेवला होतास. नंतर तर काॅलेजमधूनच नांव काढून पळून गेलास. का केलंस तू असं?" तिने रागाने विचारलं
"मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की मी आझाद पंछी आहे म्हणून. मला लग्नबिग्न हा प्रकारच पसंत नव्हता. पण तू माझ्या मागेच लागली होती. मला पळून जाण्याव्यतिरिक्त दुसरा मार्गच तू ठेवला नव्हता. आता मात्र योग्य स्थिती आहे"
"म्हणजे?"
"अगं वेडे आता तुझं लग्न झालंय. आता माझ्यावर कसलीच जबाबदारी नाही. आता आपल्याला ऐश करायला हरकत नाही"
तिचा चेहरा रागाने लाल झाला.
" तुला काय मी 'तसली" बाई वाटले?"
" काय हरकत आहे जुई? तुला जगाचं वास्तव कळालंच नाहीये. अनेक बायकांची अशी लग्नानंतर लफडी असतात "
" चुकतोहेस तू ! जगाचं वास्तव हे आहे की अजुनही नव्वद टक्के बायका नवऱ्याशी प्रामाणिक आहेत आणि मी ही त्यातलीच एक आहे.तू फक्त दहा टक्के बायकांचं वास्तव मला सांगतोहेस. बरं ते जाऊ दे. कसं चाललंय तुझं?सध्या काय करतो आहेस? नोकरी,व्यवसाय?"
"नोकरी आणि मी? ती जबाबदारी कशाला घ्यायची? माझं मस्त चाललंय. खायचं, प्यायचं,झोपायचं आणि कविता करायच्या"
"अरे पण या सगळ्याला पैसा तर लागतोच ना ! तो कुठून आणतोस?"
"तुझ्यासारख्या खुप मैत्रिणी आहेत माझ्या. त्या देतात बिचाऱ्या. तुही देशील ना मला?"
जुई काही बोलली नाही. त्याचं असं भीक मागणं तिला अजीबात आवडलं नाही.
" एक पाच हजार आहेत तुझ्याकडे? हाॅटेलचे पैसे द्यायचे होते."
जुई अवघडली. काय करावं या संभ्रमात पडली.
"देतेस ना"
शेवटी अनिच्छेने तिने पर्स उघडून त्याला पैसे काढून दिले.
"थॅक्स. अशीच वेळोवेळी मदत करत जा. तुझा नवरा इंडस्ट्रीयालिस्ट आहे असं ऐकतो." तो हसत म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन ती म्हणाली
"चल मी निघू आता? बराच उशीर झालाय." त्याच्या उत्तराची वाट न पहाता ती निघाली. तो तिच्या पाठोपाठ निघाला. ती तिच्या कारजवळ आली. तिची चकचकीत आलिशान कार पाहून त्याचे डोळे चमकले.
"एक मिनीट जुई " दार उघडता उघडता जुई थबकली.
"तुझ्या नवऱ्याला माहितेय का गं आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल?"
"का रे?"
" नाही म्हणजे त्याला कळलं तर हाकलून द्यायचा तो तुला. शेवटी मोठा उद्योजक आहे तो. नाचक्की होणार नाही का त्याची!"
रागाने तिच्या भुवया वर गेल्या
"कोण सांगणार त्याला त्याबद्दल?"
" समजा मीच सांगितलं तर?"
" तू का सांगशील त्याला?"
" नाही सांगणार. तू मला एक लाख दिले तर नाही सांगणार. शेवटी मलाही पोटापाण्याचं बघावं लागतंच की!" हे तर सरळ सरळ ब्लॅकमेलींग होतं
"इतके पैसे घेऊन फिरत नाही मी"
" काय जुई !त्यासाठी पैसे कशाला हवेत? अगं तुझ्याकडे मोबाईल आहे.मी तुला अकाउंट नंबर देतो पेटीएमवरुन ट्रान्सफर करुन टाक."
तिने गाडीचा दरवाजा बंद केला. त्याच्याजवळ आली आणि फाडकन तिने त्याच्या मुस्काटात ठेवून दिली.थप्पड इतकी जोरदार होती की तो भेलकांडला.
" हा घे माझ्या नवऱ्याचा मोबाईल नंबर आणि सांग त्याला तुला जे सांगायचंय ते ! अरे तू काय सांगशील?तुझ्याअगोदर मीच त्याला सगळं सांगून टाकलंय. स्वतःला वास्तववादी कवी म्हणवतोस, हे आहे तुझं वास्तव. निष्पाप मुलींना प्रेमात फसवायचं आणि त्यांना ब्लँकमेलींग करुन पैसे उकळायचे. वास्तवापासून दुर पळणारा एक नंबरचा पळपुट्या आहेस तू ! तुझ्यापेक्षा माझा नवरा चांगला कवी आहे पण असा कविता करुन पोरींना फसवत नाही. कविता करत असतांनाही त्याने जीवनातलं वास्तव ओळखलं. जबाबदारी स्विकारली. स्वतःच्या कुटुंबाला गरीबीकडून श्रीमंतीकडे नेलं. अनेक जणांना रोजगार मिळवून दिला. अनेक जणांचा तो आज आधारस्तंभ आहे आणि तू काय केलंस ! अनेक मुलींना नादी लावलंस. त्यांचे संसारही तू बरबाद केले असतील. तुझ्यासारखे दहा टक्के लोक आज जातीजातीत, धर्माधर्मात आगी लावण्याचं काम करताहेत. वास्तवतेच्या नांवावर अनाचार वाढवण्याव्यतिरीक्त तुम्ही दुसरं केलं तरी काय? आज माझ्या संसाराला आग लावायला तू निघाला होतास. लाज वाटतेय मला तुझ्यासारख्या घाणेरड्या आणि नालायक माणसावर प्रेम केल्याची."
ती थांबली तशी सुधीरने थरथरत्या हाताने सिगारेट पेटवली. एक झुरका घेऊन त्याने धुर तिच्या तोंडावर सोडला. तिने तो हाताने झटकून टाकला.
"बस कर तुझी ही नाटकं. आता मी पुर्वीची जुई राहिलेली नाही"
त्याच्याकडे रागाने बघत ती कारकडे वळली. अचानक काहीतरी आठवून म्हणाली
"आणि हो पुन्हा कधी मला भेटायचा, मला फोन करायचा प्रयत्नदेखील करु नको. माझ्या नवऱ्याला भडकावायला तू खुशाल जाऊ शकतो. मला खात्री आहे तो तुला धक्के मारुन बाहेर काढेल नाहीतर पोलिसांच्या हवाली करेल."
गाडीत बसून तिने गाडी स्टार्ट केली. वळण घेतांना तिला सुधीर ठसका बसून मोठमोठ्याने खोकलतांना दिसला. त्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली.
" मर मेल्या असाच खोकत !तुझी लायकी तीच आहे"
मुख्य रस्त्यावर ती येताच मोबाईलवर मेसेज आला. सुधीरने आता काही नवीन चावटपणा तर केला नाही या भितीने तिने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. मोबाईल पाहिला तर त्यावर स्वप्नीलचा मेसेज होता "कसं झालं कवीसंमेलन?तुझ्या कविता आवडल्या की नाही?" तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तिने रिप्लाय दिला 'माझ्या कविता तर आवडल्याच पण तुमच्या कवितांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पुढच्या कवीसंमेलनाचं तुम्हांला आतापासूनच खास निमंत्रण आहे. आणि हो स्वप्नील आय लव्ह यू.आय लव्ह यू फ्राॅम बाॅटम ऑफ माय हार्ट'
मेसेज पाठवून तिने त्याचा डी.पी.वरचा फोटो झुम केला. त्याचा हसरा चेहरा पाहून तिला एकदम भडभडून आलं आणि मग स्टियरींगवर डोकं ठेवून ती रडू लागली.
©️ दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा" या पुस्तकातील आहे. कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा