शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

8. ...नाहीतर तुमचे आयुष्य शून्य होईल.

            लग्नाची ही  पहिली दोन-तीन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात. हातात हात घालून गप्पा मारायचे असतात. नवनवीन स्वप्ने रंगवायची असतात. पण हे हि दिवस पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बँकेतील शून्य थोडेसे कमी होतात. कारण थोडी हौस-मौज केली जाते. थोडं हिरण-फिरणं होतं, खरेदी होते. मग हळूच चाहूल लागते बाळाची आणि वर्षभरातच पाळणा हालू लागतो. सर्व लक्ष आता बाळावर  केंद्रित होते. त्याच खाणं-पिण, उठ-बस, शी-शु, त्याची खेळणी, त्याचे कपडे, त्याचे लाड, कौतुक... वेळ कसा फटाफट निघून जातो. एव्हाना तिचा हात नकळत त्याच्या हातून सुटलेला असतो. गप्पा मारणं, हिंडणं-फिरणं केंव्हाच बंद झालेलं असतं. पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही. अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला असतो. बाळ मोठं होत जात. ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात. घराचा हफ्ता, गाडीचा हफ्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बँकेत शून्य वाढवायचे टेंशन. तो पूर्णपणे स्वतःला कामात झोकून देतो. बाळाचे शाळेत admission  होते. तो मोठा होऊ लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता-करता संपतो. एव्हाना पस्तिशी आलेली असते, स्वतःच घर असतं, गाडी असते. बँकेत ब-यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी काहीतरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते. त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढत जाते आणि तो मग दार विकेंडला 'एकच प्याला' सुरु करतो. 
       दिवसामागून दिवस जात असतात; मूल मोठं होत असतं. त्याचं  स्वतःच एक विश्व तयार होत असतं. त्याचीही दहावी येते आणि जाते तोपर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते. बँकेत शुन्यांची भर पडतच असते. एका निवांत क्षणी, त्याला मग ते जुने दिवस आठवतात... वेळ साधून "तो" तिला म्हणतो, अग, ये जरा अशी समोर , बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठंतरी फिरायला जावू.... ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, 'कुठल्याही वयात काहीही सुचतं  तुम्हाला; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत' कमरेला पदर खोचून ती निघून जाते. मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरकुत्या डोकावत असतात. केस आपला काळा  कलर सोडू लागलेले असतात... मूल आता college मध्ये असतं. बँकेत शून्य वाढत असतात. तिनं आपलं नाव भजनी मंडळात घातलेलं असतं आणि ह्याचे विकेंडचे 'एकच प्याला' चे कार्यक्रम सुरूच असतात. मूल college  मधून बाहेर पडतं. आपल्या पायावर उभा राहतं, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जातं. आता त्याच्या केसानी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. तिलाही चश्मा  लागलेला असतो. आता तो तिला "म्हतारी" म्हणू लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो. पंचावन्न सोडून 'साठी' कडे वाटचाल सुरु होते. बँकेत आता किती शून्य आहेत हे ही  त्याला माहित नसतं. एकच  प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात... औषध-गोळ्या यांच्या वेळा, वार ठरलेले असतात. डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात. मूल मोठं झाल्यावर लागतील म्हणून घेतलेलं चार-पाच खोल्यांचं घर अंगावर येत असतं. आता मूल कधीतरी परत येईल ही  वाट बघणं तेवढंच काय ते हातात असतं. 
         आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते. म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबूनच हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने जाऊन फोन घेतो, समोरून मुलगा बोलत असतो. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोडा गडबडतो, काय बोलावे हे त्याला सुचत नाही. म्हातारा मुलाला बँकेतल्या शून्याविषयी काय करायचं ते विचारतो... आता परदेशातल्या शून्याच्या मानाने म्हाता-याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते. तो म्हाता-याला एक सल्ला देतो, 'एक काम करा. त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृध्दाश्रमाला द्या आणि तुम्हीही तेथेच रहा.' पुढचं थोडंसं  जुजबी बोलून मुलगा फोन ठेऊन देतो. म्हातारा पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसतो., म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते. "तो" तिला हाक मारतो, 'अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू..' म्हातारी चक्क म्हणते,'हो आलेच' म्हाता-याला विश्वासच वाटत नाही.आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो. त्याच्या डोळ्यांत  अश्रू दाटून येतात. त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रू खाली येतो. तो गालावर येतो आणि अचानक थिजून जातो. डोळ्यातलं तेज कमी-कमी होत जातं... आणि ते निस्तेज होतात. म्हातारी आपलं आटोपून म्हाता-या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसते आणि म्हणते, 'बोला, काय बोलायचंय....' पण म्हातारा काहीच बोलत नाही... ती म्हाता-याला हात लावते. शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातारीला बघत असतात... क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते, तिला काय करावं हेच सुचत नाही. पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते. हळूच उठते. पुन्हा देवघरापाशी जाते. एक उदबत्ती लावते. देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसते. म्हाता-याचा थंडगार हात घेते आणि म्हणते, 'चला कुठे जायचंय फिरायला' आणि 'काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...' असं म्हणत म्हातारीचे डोळे पाणवतात. एकटक नजरेने ती म्हाता-याकडे बघत असते. आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रू गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाता-याच्या खांद्यावर पडते. झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो. झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.....  
                   त्याच्यासाठी नुसते शुन्यच जमा करत बसू नका मुलासाठी नाहीतर तुमचे आयुष्य शून्य होईल... 

लेखक- अज्ञात     
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील           

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...