आजोबा!!!! आर्यन स्कुल बस मधून उतरल्यावर धावत नानांना बिलागला...
"आजोबा आज काय केलंय स्पेशेल"
"तू ओळख बघू".
"अ अ अ...पुरी-भाजी??"
"बरोब्बर.. कस ओळखले रे लब्बाड"....हें संभाषण जवळपास रोजचंच.. रोज नाना दुपारी आर्यन ला नाक्यावर घ्यायला जायचे आणि येताना हीच चर्चा दोघांची चालायची. माई गेल्या नंतर पुण्यातील घर अगदीच सूनं वाटायला लागलं म्हणून सुनील-शीलाने नानांना त्यांच्या सोबत मुंबईत येण्याचा आग्रह केला. नानांच्या मनात नव्हते; पण मुलाच्या सोयी करता त्यांना हे मान्य करावे लागले. त्यांना इथं अजिबातच करमत नव्हते; एकतर माईची साथ नव्हती आणि जागाही बदलली होती. एकटं एकटं वाटायचं. पण थोड्याच दिवसात नानांना आर्यनचा लळा लागला. आता त्यांचा दिवस आर्यनला स्कुल बस पाशी सोडायला जाण्यापासून सुरू व्हायचा आणि त्याच्याच भोवती फिरायचा. आता कपडे बदलून हात-पाय धुवून जेवून घे...दप्तर ठेव जागेवर... ते दप्तर नाही स्कुल बॅग असत आजोबा!!! हो रे बाळा तेच ते.
आर्यन जेवला की होमवर्क करून झोपायचा; मग ५ वाजता नाना स्वतः चा चहा आणि त्याला दूध प्यायला लावून क्लासला घेऊन जायचे...तिथेच एक तास बसून रहायचे; खाऊचा डब्बाही घेऊन जायचे कारण त्यानंतर जवळच मैदानात त्याला खेळायला न्यायचे असायचे. ७.३० वाजता दोघे मस्त गप्पा मारत, भाजी घेत घरी यायचे. तो पर्यंत शीला आलेली असायची ऑफिस मधून. सुनील 9 पर्यंत आला की सगळे एकत्र जेवायचे. थोडा timepass करून स्कुल बॅग भरायची आणि आजोबांकडून एक गोष्ट ऐकून झोपून जायचे. नाना इथं आल्यापासून शीलाला बरिच मोकळीक मिळू लागली होती. नाहीतर आर्यन स्कुल मधून आला का? क्लास ला गेला का? तिथून मैदानावर त्याला घ्यायला जायची आणि मग घरी आल्यावर सगळे आवरायला लागायचे. तिची बरीच कामं नाना करून ठेवायचे. भाजी आणली की निवडून ठेवणे, कपड्यांचे मशीन लावणे, ते वाळत घालणे आणि मुख्य म्हणजे आर्यन ची पूर्ण काळजी घेणे. नानांचा खूप आधार वाटायचा तिला. शीलाही त्यांची काळजी घेत असे...त्यांना हवे नको ते पाहणे आणि त्यांच्या आवडी प्रमाणे सगळं करायची.
सुनिल-शीला बहुतेक वेळा शनिवार- रविवारी बाहेर जायचा प्लॅन करायचे...रोजच्या धावपळीपासून विश्रांती साठी....कधी लोणावळा तर कधी अलिबाग अश्या ठिकाणी जाऊन मस्त आराम करून यायचे...नाना इथे आल्यावर त्यांनाही सोबत घेऊन जायचे...कधीच त्यांना एकटं पडून दयायचे नाहीत. नाना !! आज मला उशीर होईल यायला; लक्ष्मीला संध्याकाळीही बोलावलंय जेवण करायला.
अग मी केलं असत; कुकरमध्ये भात आणि आमटी, तिला कशाला परत फेरी? भाजी पण केली असती मी; तेवढाच वेळ जातो माझा.
बर बरं; असु दे पुढच्या वेळी करा आत्ता ती येईल तेव्हा तुम्ही दोघेही जेवून घ्या; हे आले वेळेत तर ठीक नाही तर तुम्ही तुमच उरकून घ्या.असे म्हणून शीला धावपळीत निघाली.
नेहमी प्रमाणे दिवस गेला...संध्याकाळी घरी आल्यावर नाना आणि आर्यन दोघेच... मग गप्पां गोष्टी झाल्या, गाणी झाली, साप शिडी झाली ९.३० होऊन गेले तरी सुनील आला नाही पाहून या दोघांनी जेवून घेतलं... आर्यन झोपून गेला...११ वाजून गेले होते...नानांनीही त्यांच्या गोळ्या काढून ठेवल्या..कारण त्या घेतल्यावर त्यांना लगेच झोप येते आणि अजून दोघे आले नाहीत म्हणून काळजी ही वाटत होती.
वेळ जावा यासाठी टीव्ही वर काहीतरी पाहत बसावे म्हणून बाहेर आले.कोणता तरी न्युज चॅनल चालू होता... त्यावर ट्रेन ऍकॅसिडेंट ची बातमी दाखवत होते.
नानांच्या मनात आता नको नको ते विचार येऊ लागले. इतक्या उशिरा कोणाला फोन करायचा. या दोघांचे नंबर असून उपयोग नव्हता; कारण लँडलाईन तर नव्हताच आणि नानांच्या कडे मोबाईल असावा असे कधी वाटलेच नाही.
नाना या विचारात असतानाच दार उघडून सुनील-शीला आत येतात; त्या दोघांना पाहून नानांच्या डोळ्यात पाणी येते.
अहो; नाना शांत व्हा..तुम्ही झोपला नाहीत अजून!!
सुनील त्यांना पाणी देत विचारतो.
कस झोपणार रे बाबा!! तुम्ही याल तेव्हा दार उघडले पाहिजे या करता जागा होतो शिवाय या बातम्या पाहून मनात नकोते विचार येऊ लागले; बर फोन करायचा तर माझ्या कडे फ़ोन नाही आणि या वेळी कोणाला त्रास द्यायचा अशा असंख्य विचारात होतो.
का रे बाबा उशीर झाला दोघांना??
अहो नाना!!! शीलाची आत्या आजारी आहे, सगळ्यांनी भेटून जा असा निरोप आला, व्हेंटिलेटरवर आहेत त्या आणि कदाचित २४ तास कसेबसे काढतील असे डॉक्टर म्हणालेत म्हणून घाईत जाऊन आलो.
पण तसं कळवत जा रे बाबांनो मी एकटा या बाळाला घेऊन कुठे शोधू तुम्हाला रात्री अपरात्री...
नानांना मुंबईत येऊन जेमतेमच एक-दोन महिने झाले असतील; फोनची अशी गरज भासली नाही कधी; शिवाय शीलाही वेळेत घरी यायचीच.
पहाटेच आत्या गेल्याचे कळलं त्यामुळे आज परत घरी आजोबा आणि आर्यन...
दोघांची आता इतकी गट्टी झाली होती की आर्यन प्रत्येक गोष्ट आजोबांना येऊन सांगत असे...तो स्वतःच्या रूममध्ये नसायचाच. आजोबांचे कपाट, त्यात ठेवलेल्या वस्तू, त्यांची औषधांची पेटी, जेवणा नंतरचे चूर्ण; हे सगळ् बघण्यात त्याला मजा येत असे. जशा आजोबांना आर्यनच्या वेळा माहिती होत्या तशा यालाही त्यांच्या वेळा पाठ होत्या.
एका संध्याकाळी सुनिल लवकर घरी आला आणि सगळ्यांना नानांच्या रूममध्ये बोलावलं.
नाना हे उघडून पहा !! असे म्हणून त्यांच्या हातात चक्क मोबाईल ठेवला....
अरे मला कसं जमेल हे...
आजोबा मी शिकवींन तुम्हाला सोप्प असतं..तुम्ही गेम पण खेळा यावर; आर्यन आजोबांना सांगायला लागला.
नानांना मुंबईत येऊन एक वर्ष होऊन गेले. आर्यनमुळे माईच्या दुःखातून पटकन सावरले याची जाणीव होती त्यांना. कोणी नसताना एकटे माईचा फोटो घेऊन बोलत बसायचे. कधी संध्याकाळी येताना तिच्या साठी गजरा आणायचे. कोणाला कळू नये म्हणून देवाला वाहायला म्हणून घेऊन यायचे. आर्यन लहान असला तरी या गोष्टीं कडे त्याचे बरोबर लक्ष असायचे.
चला, उद्या आपण अलिबागच्या रिसॉर्टला जायचंय.
मस्त चार दिवस लागून सुट्ट्या आल्यात धम्माल करून येऊ. नाना तुमची पण बॅग भरा..
आजोबा बरमुडा घ्या आपण सी मध्ये जाणारे!!!
आर्यनने आजोबांच्या बॅगेत आठवणीने गोळ्या, चूर्ण, चष्मा, मफलर, बाम हे सगळे भरायला मदत केली. कारनी जाताना आजोबांनी कधी काही पहिलेच नाही असं आर्यन त्यांना सगळं दाखवत होता आणि तेही नव्याने बघितले असे करत त्याच्या निरागस बालीश बोलण्याचा आनंद घेत होते. तिथे सुनीलचे अजून दोन मित्र आणि त्यांच्या परिवार असे एकूण १०-१२ जणांनी मिळून एक रिसॉर्ट बुक केलं होतं. दोन-तीन दिवस अगदी मजेत जातात. मुलं समुद्राच्या लाटांवर मनसोक्त डुंबत राहायची, वाळूत माखून जायची. आजोबा सगळ्यांचे कपडे आणि मोबाईल सांभाळत मजा पहात बसायचे. एकूणच सगळे धम्माल करत होते. सगळयांचे आवरले की सुनील आणि त्याचे मित्र यांची ड्रिंक्स चालायची, या बायकांच्या गप्पा आणि मुलं गेम झोन मध्ये नुसता धुडगुस घालायचे.
नाना मात्र जेवून त्यांच्या रूम मध्ये आराम करत. आजकाल त्यांचे थोडे पाय बोलू लागले होते... त्यामुळे पटकन उठताना किंवा खूप वेळ बसून चालताना त्यांना त्रास व्हायचा. पण एकूणच तिथले वातावरण छान असल्याने नाना स्वतःही दुखणे विसरून या सगळ्यात आनंद घेत होते.
कधी एकत्र बसले की तेही सुनीलच्या मित्रांसोबत गप्पां मध्ये रमत असत... कोणत्याही वयाच्या सोबत त्यांच्या प्रमाणे गप्पा मारायला नानांना आवडायचे. असे चार दिवस सुट्टीचे आटपून सगळे निघायच्या तयारीत होते.
रिसॉर्ट चेक आऊट करून निघायचं आणि वाटेत जेवून मग थेट घर असा प्लॅन होता.
चला आता मस्त आराम झालाय उद्या पासून कामाला लागा.
आर्यन उद्या स्कुल आहे बरं! शीला ने आर्यनला थोडे दटावले. सगळ्यांनी निरोप घेतला आणि जेवणासाठी कुठे थांबायचं हे ठरवत होते.
वयोमाना प्रमाणे नानांना परत वॉशरूमला जाऊन यावे असे वाटले कारण आता परत किती वेळ लागेल आणि तिथे सोय असेलच असे नाही.
आजोबा मी येतो तुमच्या सोबत असे म्हणून आजोबांना घेऊन ही बच्चेकंपनी निघाली....
बाबा!! बाबा करत सगळी मुलं धावत ओरडत होती. धापा टाकतच आर्यन म्हणाला; आजोबा स्लिप झाले ते उठत नाहीत; असे बोलून रडायलाच लागला. सुनील आणि त्याचे मित्र धावत गेले.
नाना !! अरे बापरे..जरा प्रयत्न करा,
थोडं हलता येतंय का?? असे बोलून उठवण्याचा प्रयत्न केला पण नानांना कम्बरेला आणि गुढघ्याला मार बसल्याने हालचाल केली की मस्तकात कळ जायची. शेवटी सगळयांनी मिळून उचलून नानांना हॉटेलच्या वैटिंग रुम मध्ये झोपवलं आता इतक्या लांब ४-५ तास प्रवास करून कसे नेणार. त्यांना सहन नाही होणार.
बाबा आपण जोशी Dr. ना बोलवून घेऊयात. आर्यन रडत बोलला. जवळपासचे डॉक्टर बोलवून मोघम उपचार करू आणि घरी जाऊन बाकी ट्रीटमेंट घेऊ असे ठरले. आर्यन आजोबांच्या उशाशी बसून होता. त्यांना सांगत होता बरं वाटेल हा तुम्हाला; आत्ता जोशी डॉक्टर येतील आणि एक टुचुक दिला की एकदम बरे होणार तुम्ही.
त्याला जसं समजावलं जायचं तसंच तो आजोबांना समजावत होता. प्रवासात त्रास झाला खरा पण सगळे घरी पोचले.
नाना सगळ्यांना सारखं बोलत होते माफ करा रे बाळांनो तुमच्या ट्रिपची मजा घालवली मी.
आल्या आल्या सुनीलने नानांना डॉक्टर कडे नेलं.
एक्स-रे , स्कॅनिंग सगळे झाल्यावर नानांना पूर्ण बेड रेस्ट सांगितली; अजिबात उठायचे नाही.
नानांना अगदीच अपराधी वाटत होतं.
आता कसं होणार रे?? आर्यनचे कोण करणार?? शिवाय खर्च वाढलाय तो वेगळाच; उगाच आलो मी, घरी राहिलो असतो तर ही वेळ आली नसती. असे बोलून सारखे त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते.
शीला आणि सुनील आळीपाळीने आठवडाभर सुट्टी घेऊन नानांचे सगळं बेड वर करत असतात.
सुनील तर मुलगाच पण शीलाही त्यांच्या जेवणाच्या वेळा, औषधं अगदी बेड पॅन देणं सुद्धा ती सख्या मुली सारखं करायची. आर्यन तर बघायलाच नको, स्कुल मधून आल्यावर थेट आजोबांना बिलगायचा, त्यांना भरवायला काय यायचा, गोळ्या सुद्धा यालाच कळायच्या..आजोबा ती पिंक वाली गोळी नाई घेत आता??
हो रे बाळा डॉक्टरनी काही गोळ्या बदलून दिल्यात....
या तिघांची धावपळ बघून प्रत्येक वेळी नानांना भरून यायचे स्वावलंबी असलेल्या या पिढीला त्यांच्या करता कोणी काही केलं तर अवघडल्या सारखे होतं आणि वयोमानानुसार मन अगदीच हळवं झालेलं असत.त्यामुळे त्याची समजूत काढणं कठीण असते.
आठवड्यानी डॉक्टरांनी फॉलो up साठी बोलावले होते. चेक केल्यावर थोडं उठून बसायला आणि physiotherapy सुरू करायला सांगितले.
नाना !! उद्या पासून आम्ही दोघे ऑफिसला जाऊ.
एक वॉर्डबॉय आहेत त्यांना दिवसभर तुमच्या सोबत ठेवलंय. फिजीओ साठी एक डॉक्टर येतील त्यांच्या कडुन व्यायाम करायचे, लक्ष्मीने येऊन जेवण केलं की तुम्हाला वाढून आवरून जाईल आणि आर्यन ला आधी सारखं डी विंग मधल्या काकूंकडे ठेऊ.
अरे बापरे हे माझ्या मुळे सगळेच वाढले रे!!
मी असं करू का पुण्यात जाऊ का?
तिथं हाताशी आहे सगळंच सखाराम येऊन एकटा सगळं करून जाईल माझं.
तुमची खूपच अडचण केली मी.
अहो नाना कसला त्रास यात ; सगळी सोय आहे.
तुम्ही आरामात रहा आणि डॉक्टर जे सांगतील तसे करत जा. आम्हाला काही त्रास नाहीये !!
आजोबा मी करिन स्वतःचं मी मोठा झाला आत्ता
तुम्हाला पण संभालीन..आर्यन त्यांना खात्रीने सांगत होता.
नानांना जे लागेल ते सगळं शीला टेबल वर काढून ठेवायची; लक्ष्मी जेवण वाढून सगळेच आवरून जायची...वोर्डबॉय आला की तोच त्यांची अंघोळ, दाढी आणि औषधं अशी सगळी काळजी घ्यायचा...फिजिओ डॉक्टर सकाळी ११ वाजता यायचे त्याच्या आत यांचं आवरायचं सगळं.
दिवसभर आर्यनची खूप उणीव जाणवायची. तो पण लबाड असा होता की स्कुल मधून काहींना काही कारण काढून त्यांना येऊन भेटून जायचा.
जवळजवळ दीड वर्ष दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती..आर्यन शीला सोबत घरीं येताना रस्त्यात गजरेवाले काका दिसताच तो ओरडला आई!!! ते बघ आजोबांचे फुलवाले uncle... चल त्यांच्या कडून फ्लोवर्स घेऊ...ते आजीला घालतात...शीलाला हे माहीत होतं की ते गजरे आणतात पण हे आश्चर्य वाटलं की ते फक्त देवाला नसून माईना असतात आणि आर्यन नी हे लक्षात ठेवलय...
नाना ७.३० झाले की डोळे लावून बसायचे आर्यनसाठी आजोबा!!! एक सरप्राइज आहे...असे म्हणून त्यांच्या हातांत गजऱ्याची पुडी ठेवली. नानांच्या डोळ्यात पाणी आले त्याला कवटाळून रडु लागले.
अहो नाना !! आधी माहीत असते की हे तुम्ही माईसाठी घेता तर मी आणत जाईन एकदिवसा आड.
हळूहळू नानांना जे अवघडल्या सारखं होत होतं ते कमी होऊ लागलं. बऱ्याच वेळा सगळे त्यांच्या रूममध्ये जेवायला आणि गप्पा मारायला बसायचे.आर्यन त्यांच्या सवयी प्रमाणे कधी भेळ तर कधी बटाटे वडे घेऊन जायचा. नाना आता धरून धरून चालायला लागले. बरेच पटकन रिकव्हर झाले. तरी सहा-सात महिने गेलेच. स्वतःला खूप जपू लागले कारण उगाच आपल्या मुळे लेकाला आणि सुनेला त्रास नको.
या त्यांच्या आरामाच्या दिवसात आर्यननी त्यांना मोबाईल पूर्ण शिकवला तसेच त्यांच्या रूममध्ये लॅपटॉप पण ठेवला होता; तो ही या पठयाने त्यांना शिकवलं.... बराच वेळ त्यांचा गाणी ऐकण्यात आणि छान छान कार्यक्रम बघण्यात जाई. सोसायटीच्या काही जणांची ओळख झाल्याने बागेत बसून गप्पा रंगायच्या.
आता ते पूर्वी सारखं सगळं करायला लागले होते.
अहो; या वर्षी नानांचा ७५ वा वाढदिवस आहे.आपण त्यांना सरप्राईज देऊ या!! असे म्हणून सुनील आणि शीला दोघे तयारी ला लागले.
सगळयांना आमंत्रण करताना सांगून ठेवले होते की नानांना कळून देऊ नका.
त्यांच्या आवडीचा मेनू ठरवला, नवीन झब्बा लेंगा घेऊन झाला. सकाळ पासून काय करायचे ते सगळं ठरलं. आर्यनलाही सांगितले होते की अजिबात आजोबांना सांगायचे नाही.
तारीख जवळ आली तरी घरात शांतता होती.नानांनीही फार मनावर घेतले नाही कारण सुनील आणि शीला त्यांच्या साठी सगळेच व्यवस्थित करत होते त्यामुळे कशाला अपेक्षा करायची.
आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागे होते; कोणी १२ वाजता आले नाही पाहून माईचा फोटो उराशी घेऊन खूप रडले...यासाठी नाही की कोणी विश केले नाही पण या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माईची सोबत नाही.
त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माई त्यांना उटण्यानी अंघोळ घालायची. नवीन कपडे काढून ठेवायची. त्यांच्या आवडीची बासुंदी-पुरी करायची. माई स्वतःला गजरा आणून ठेवायच्या आणि नानांच्या हातून डोक्यात माळून घ्यायच्या, दिवसभर आनंदात जायचा. जुने फोटो बघत आठवणीत रमायचे दोघं.
नाना उठले; माईचा फोटो टेबलावर ठेवला, तिला टपोऱ्या मोगऱ्याच्या आणि अबोलीच्या फुलांचा हार घातला... ठसठशीत कुंकु लावलं आणि माईंच्या आवडीचा गुलाबजाम समोर ठेवला. याच आठवणीत कधी डोळा लागला समजलेच नाहीं त्यांना.....
सकाळी सुंदर धून कानावर पडली आणि जाग आली..... दार उघडलं तर दारावर ग्रिटींग लावलं होतं....त्यावर आर्यननी त्याला सुचेल तस चित्र काढलं होतं आणि खाली त्याच्या अक्षरात लाडक्या आर्यन कडून पहिली भेट असे लिहिले होते.... नानांना ते पाहून खूप आनंद झाला....
तिघे त्यांच्या भोवती फेर धरून Happy Birthday To You गाऊ लागले.....
त्यांना काय बोलावं कळेना....
मग शीलाने मस्त ट्रे मध्ये चहा, बिस्कीटस, एक गुलाबाचं फुल आणि त्या दोघांकडून ग्रिटींग ठेवलं होतं....
सगळ्यानी मिळून चहा घेतला आणि आजोबांना सांगितलं तुम्ही अंघोळीची तयारी करा; आपण बाहेर जाऊ जेवायला....
शीलाने उटणं, नारळाचे दूध, छोटा दिवा आणि चाफ्याची फ़ुलं असे तबक तयार केले होते....
सुनील आणि आर्यननी आजोबांना मस्त रगडून आंघोळ घातली...आजोबा दिवाळीत आलोय आपण...आर्यन हे सगळं पहिल्यांदाच पहात होता.... मग त्यांचं आवरे पर्यंत सुनीलने नवीन झब्बा-लेंगा त्यांच्या बेडवर ठेवला....
नानांना आता अश्रू आवरेनात किती करताय रे बाळांनो!! काय चाललंय तुमचं...आता असे सुखद धक्के नाही सोसवत रे!! असे म्हणत सुनीलला मिठीच मारली त्यांनी...आनंदाश्रूने तिघांचे डोळे भरून आले होते...
चला आजोबा अजुन गंमत आहे पुढे.....जेवणाच्या निमित्ताने तिघे एका मस्त पॉश हॉटेलमध्ये पोहोचले.... स्वागत आरतीने केले गेले... फुलांच्या पाकळ्या त्यांच्यावर उधळत होते आणि सनईचे सूर ऐकू येत होते....
अरे ! किती मोठा घाट घातलास रे बाळा...सुनीलला पाठ थोपटून बोलत होते.....पूर्ण हॉल नानांच्या जवळचे मित्र परिवार आणि नातेवाईकानीं भरला होता....
सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या....
७५ दिव्यांनी औक्षण केलं....केक कापला...
आर्यन आजोबांना काही सोडत नव्हता...
आत्ता पर्यंत त्याने स्वतःचे असे लाड पाहिले होते पण मोठ्यांचे सुध्दा असे लाड करतात हे त्याला माहीतच नव्हते....
मग प्रत्येकजण नानाच्या सोबत असलेल्या आपल्या आठवणी सांगत होते...कोणी गाणी लिहून आणलेली तर कोणी त्यांना पैशांचा हार घातला.
मग नानांनीही बोलण्यासाठी माईक हातात घेतला दाटलेल्या कंठातून बोलणे कठीण जात होते, माईक धरलेले हात थरथरत होते.
आजचा दिवस माझ्या आठवणीतील सोन्याचा दिवस...सुनील-शीला आणि या छोट्या आर्यनने मला दिलेली अनमोल भेट आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन मला जो आनंद दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार कसे मानू. आज माई असती तर खूप खुश झाली असती.
हे अचानक ठरवलं त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी मी तयारीच केली नाही.एक गाणं जे मी आर्यन साठी लिहिलंय ते म्हणून दाखवतो.....
( चूप चूप खडे हो जरूर कोई बात है... या चालीत बसवावी )
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना??
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना??
कसे आपण दोघे जण खूप खूप खेळायचो
गोष्टी आणि गाण्यामध्ये खूप खूप रमयचो!!!
मध्येच अबोला धरून कट्टी-फु करायचो;
पुन्हा बट्टी करून खूप मस्ती करायचो....
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना??
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना??
टोपीवाला, कृष्ण बाप्पाच्या गोष्टी तुला आवडायच्या!!
कधी चेंडू कधी सायकल, बॅट-बॉलही आवडायचे!!
कधी फिरत फिरत वसंत विहारला जायचो!!
दगडावर बसून आईस्क्रीम खायचो !!
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना??
मोठा झालास की तुला आजोबांची सांग ना???
आई-बाबा रागावले की माझ्या पुढ्यात झोपायचास;
गोष्टीत रमयचास आणि गुडूप झोपयचास !!
दिवसभर माझ्या पाठी तुरु तुरु फिरायचास,
खेळायला चला म्हणून भुणभुण करायचास !!
गोलगोल फिरून थकून गेलास की
गोड पापा देऊन लपून बसायचास....
येईल का रे आठवण तुला माझी तू सांग ना???
कविता नानांनी संपवली आणि आर्यन त्यांना घट्ट मिठी मारून त्यांचे डोळे पुसत होता....आजोबांनी पण त्याला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाले गोड गोड बाळ माझं...जशी दुधावरची साय...माझी दुधा वरची साय ##
समाप्त
© सोनाली देवळेकर