आपल्या व्यक्तिमत्वविकास च्या समूहावरुन एका मैत्रिणींचा मेसेज आलाय,माझा स्वभाव थोडासा फटकळ आहे,म्हणून मी लोकांच्यात मिसळत नाही पण आता मला खूप एकटं एकटं वाटतयं...!
तर.... कांही लोक लहानपणापासूनच एकलकोंडे असतात.अर्थातच ते तस असण्यामागे ब-याच वेळा कौटुंबिक परिस्थिती अवलंबून असते. पण अशा लोकांनी स्वतःवर मेहनत घेणं फारच गरजेच असतं. आयुष्यात एखादी जवळची व्यक्ति प्रत्येकाला हवीच. कारण ह्या एकलकोंड्या व्यक्ति मनमोकळेपणांनी बोलत नाहीत.यांनी जवळच्या व्यक्तिजवळ बोललं तर पाहिजेच पण रडलही पाहिजे.कारण रडल्याने तुमचा ताण हलका होतो.
निम्मे दुःख,अडचण तिथेच संपेल.स्वतःचे विश्लेषण करत रहावे म्हणजे माणसं आपल्यापासून दूर का जातात याची कारणं कळत रहातात.
कांही लोक स्वतःला न्यायाधीश समजून समोरच्याला फाडकन बोलून जातात..सतत तुम्ही समोरच्याचा अपमान करत राहिला तर कधीतरी त्याची सहनशिलता संपतेच ना...!
आणि अशी फटकळ माणसं एकटी पडतात...मी फार तोंडावर बोलतो किंवा बोलते अशी घमेंड करणारे लोक एकटे पडतात.कारण दुराग्रही लोकांना समोरच्याची बाजू कधी ऐकून घ्यायची ,समजून घ्यायची गरज भासत नसते.
मग ही माणसं एकटी पडतात.त्यांना आयुष्यभर एकटं रहावं लागत...
खरतरं या माणसांना स्वतःवर काम करायला हव,
दुसरों को कहां तराश रहे हो...?
तराशो पहले खुद को...
अगर तुम्हे हिरा बनना है...!
मनाच्या कोपऱ्यात एखादा न्युनगंड आहे का ? कुठली वेदना राहिलीय का ? कारण तुम्ही स्वतःवर काम करुन लोकांच्यात मिसळण्यासाठी स्वतःला समाजाभिमुख करायला हवं. तुसडेपणाचा,दुसऱ्यांचा मत्सर करण्याचा मुखवटा टाकून द्यायला हवा. कारण मुळात कोणीच खूप चांगला किंवा खूप वाईट नसतो.माणूस काळ्या पांढऱ्या गुणांचे मिश्रण असते.आता आपल्या अंतरंगातील कुठल्या झाडाला खतपाणी घालायचे ते तुम्हीच ठरवायचे .
कारण सतत दुसऱ्यांवर जळत राहिलात, कौतुकाचे दोन शब्दही बोलला नाहीत...तर या नकारात्मक स्वभावाचा तुमच्या शरीरावर,मनावर परिणाम होत असतो. तुमच्या जवळच्या व्यक्तिजवळ स्वतःच्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने बोला,मनसोक्त रडा इथेच तुमचे अर्धे प्राॕब्लेम संपत जातील.सतत स्वतःचे विश्लेषण करा.
डायरी लिहीत रहा.प्रसंगातून शिकायचा प्रयत्न करा. खरतरं वेळ काढून नियमित माणसांच्यात मिसळायला हव. कारण वेगवेगळ्या विचारसरणीच्या माणसात गेल्यामुळे आपला विचारांचे क्षितिज विस्तारायला मदत होते.
आपण सतत विद्यार्थी असायला हवं. आपण जेव्हा मला सगळ कळतं,येतं अस जेव्हा म्हणतो तेव्हाच आपला विकास थांबतो,हे स्वतःला सतत बजावत राहिला हवं. मी असचं बोलते किंवा बोलतो असा वृथा अभिमान न बाळगता आपल्या बोलण्याच्या पध्दतीत सुधारणा करा. ठामपणे बोला पण शब्दात आणि स्वरात नम्रपणा असू दे...!
वागण्याबोलण्यातून सहकार्याची भावना समोरच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे.शांतपणे मोकळेपणानं वागा.
तुम्ही किती मोठ्या पदावर आहात,किती श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात.हे महत्त्वाचे आहे नाही का ? ? असे वागला तर तुम्ही एकटे पडणार नाही,आंब्याच्या झाडाच्या सावलीला लोक येतात मंडळी ...
बाभळीच्या झाडाच्या खाली कोणी विसाव्याला जात नाही...!
कसंही असलं तरी..एकीकडे जगणं सुंदर आहेच पण दुसरीकडे प्रसिध्दीने वलयांकित झालेल्या, पण 'जगण्याची कमालीची धास्ती' घेतलेल्या, माणसांचा प्रवाहही आहे. आणि अशाच प्रवाहामधुन 'आत्महत्येच्या मार्गाला' कवटाळुन अशा जीवांच्या कडु-गोड आठवणींची प्रेतं वाहुन येऊन, आपल्या अंर्तमनाच्या काठाशी येऊन अचानकपणे जेंव्हा थडकतात..तेंव्हा आपल्यातल्या 'काळजीवाहु माणसाला' अमुक माणुस हे जग सोडायचा निर्णय कसा काय घेऊ शकतो? अरेरे असं कसं काय होऊ शकतं? ह्या अविश्वसनीय प्रश्नाचे ऊत्तर काही केल्या मिळत नाही. याच्या माध्यमातुन, 'एकटेपणं' घेऊन जगायलाही 'जिगर' लागतं..! या बांडगुळी तत्त्वाचा अक्षरश: मारा आपल्या 'मनावर व मेंदुवर' होत राहतो. माणसांचे कडु अनुभव घेतल्यामुळे अशा माणसांपासुन आपण कसे दुर राहिले पाहिजे..त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष केले पाहिजे..कशा पध्दतीने आपण ' एकटे' जगायला शिकले पाहिजे? याचा पध्दतशीर ' रिसर्च' काहीजण करुन आपल्यासमोर 'रिझल्ट' मांडत राहतात. काहींच्या बाबतीत हे लागु असु शकतं पण..सगळीच माणसं अशी कडु नसतात. प्रैक्टीकली राहायच्या-बोलायच्या व प्रायव्हसी जपायच्या नादात आपण आपल्या आयुष्यातल्या 'गोड' माणसांनाही अनुभवाच्या पातळीवर 'पास' / 'नापास' ठरवायला जातो व शेवटी आयुष्याच्या हजेरीपटावरच्या ख-याखु-या आनंदाला गमावून बसतो. नेहमी माणसांत राहणा-या, माणसांशी नातेसंबंध जोडणा-या, ते टिकवुन ठेवण्यासाठी स्वत:चा वेळ, पैसा, स्वत:चे विचार खर्ची करणा-यांना आजकालच्या जगात 'हा बावळटयं..! हा ना स्वत:साठी जगुच शकत नाही.. हा एकटा जगुच शकत नाही,' हा 'बिझी' नसतो ना..!' म्हणुन माणसांच्या नादी लागुन स्वत:चा टाईम वेस्ट घालवतोय'..! असा संकुचित विचार करणारी 'कुजकट जमातही' आपल्या आजुबाजुला राहते. त्यामुळे होतं काय की..वैयक्तीक आयुष्य जगताना आपण काही 'सामाजिक जबाबदारींचेही' देणे लागतो हे विसरतो. आपण 'बीझी' आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटु लागतो.
प्रसंगी माणसांना टाळु लागतो. एकाकीपणा मध्ये आपण स्वत:लाच शोधतो..व स्वत:लाच सापडतो..आपल्या आतील काही चांगल्या गुणांचा यामुळे सुर गवसतो ह्यात वावगं काहीच नाहीय पण हे एकाकीपण इतकही बोजड असु नये की त्याच्या ओझ्याखाली दबुन आपण आपलं आयुष्य संपवुन टाकावं. आत्महत्येचे कारण कितीही वास्तवाला धरुन असले तरीही..शेवटी नियतीची घटका भरण्याआधी आपण स्वत:ला संपविणे हा कोणत्याही वास्तविक प्रश्नांपासुन सुटण्याचा मार्ग नाहीय असेच वाटते..! रोज भेटणारा मित्र एखाद दिवस भेटला नाही..चार दिवसांआड का होईना पण आवर्जुन फोन करणा-या मैत्रीणीने आठ-दहा दिवस झाले तरी फोन केला नाही..रोज सकाळी न चुकता काळजी करणा-या आई-बाबांची दुस-या रात्रीही ख्याली-खुशाली कळली नाही..रोज दारामध्ये, जिममध्ये, बागेमध्ये दिसणारे शेजारी किती दिवस झाले तरी दिसलेच नाहीयत..तर मित्रांनो, थोडं का होईना 'कासावीस' व्हायला शिका. इतरांसाठी राहुदेत पण जर आपल्यावर प्रेम करणा-या माणसांसाठीही 'कासावीस' होणं, 'कसंतरी होणं अशी लक्षणं तुमच्यात दिसत नसतील..तर सावध व्हा. अतिव्यावहारिकतेचे डोस पाजणा-या अतिशहाण्या संगतीपासुन दुर रहा. पण 'एकटेपणाचा शाप' घेऊन जगु नका. कोणत्या ना कोणत्या मार्गाने 'व्यक्त' व्हायला शिका अर्थात तेही योग्य माणसांसमोरच. म्हणजे आपल्या गोतावळ्यातील एखाद्या घुसमट होणा-या जीवाची 'अव्यक्त एग्झीट' तुमच्या व्यक्त होण्याने, संवाद साधण्याने टळल्याचे समाधान तुमचं जगणं आणखीन खुलवेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा