शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

507. शिक्षित आणि सजग सुशिक्षित नागरिक यातील फरक

 आई : काय झालंय?
वडील : काही नाही.
आई : मग नाराज का वाटतोय?
वडील : आपल्या युवराजांचा व्हॉट्सॲप स्टेटस पाहिला?
आई : हो.
वडील : आश्चर्य नाही वाटलं?
आई : कसलं?
वडील : त्याच्या स्टेटसचं?
आई : त्यात काय एवढं?
वडील : म्हणजे?
आई : म्हणजे असू शकतो एखादा राजकारणी त्याचा आदर्श.
वडील : एखादा?
आई : हो.
वडील : त्याने ज्या माणसाचा स्टेटस ठेवलाय, तो माझा क्लासमेट होता.
आई : ठाऊक आहे.
वडील : दहावीपर्यंत मी वर्गात पहिला असायचो आणि तो शेवट.
आई : मग?
वडील : तो फक्त बारावीपर्यंत शिकला आणि मी इंजिनिअरिंग केलं.
आई : मग?
वडील : तरी आज माझ्या मुलाला तो आदर्श वाटतोय.
आई : एवढंच ना?
वडील : नाही.
आई : मग?
वडील : मागच्या महिन्यात आमच्या बॅचचं गेट टुगेदर झालं.
आई : फोटो पाहिले ना मी.
वडील : त्या कार्यक्रमातही..
आई : काय?
वडील : तो राजकारणी आल्यावर सगळेजण उठून उभे राहिले.
आई : लोकप्रतिनिधी असल्याने आदर..
वडील : तो प्रमुख पाहुण्यांसह स्टेजवर आणि..
आई : आणि काय?
वडील : आणि आम्ही सगळे खाली.
आई : त्याचं वाईट वाटतंय?
वडील : हो.
आई : का बरं?
वडील : कधीकाळी ज्या शाळेत पहिला नंबर मिळवल्यावर माझा दरवर्षी सत्कार व्हायचा..
आई : त्याच काय?
वडील : त्याच शाळेत आज माझ्या टॅलेंटला शून्य किंमत..
आई : असं का बरं वाटतंय तुला?
वडील : कारण जो पोरगा कसाबसा बारावी शिकला, तो त्यांना आमच्यापेक्षा ग्रेट वाटतोय.
आई : कोण आम्ही?
वडील : आम्ही मेहनतीने सरकारी अधिकारी, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकार, शास्त्रज्ञ, डिझायनर, आर्किटेक्ट आणि डॉक्टर झालेलो.
आई : इगो हर्ट झाला?
वडील : होणारच.
आई : का बरं?
वडील : इतरांच ठीक आहे, मात्र माझ्या मुलालाही..
आई : काही प्रश्न विचारू?
वडील : हो.
आई : दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झालं.
वडील : हो.
आई : त्यावेळी तू त्या विकृत घटनेचा निषेध नोंदवलेला?
वडील : नाही.
आई : का?
वडील : सर्वजण तर त्याबद्दल बोलत होते, म्हणून मी टाळलं.
आई : बरं.
वडील : हो.
आई : भारत सरकारने जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारं कलम 370 रद्द केलं.
वडील : हो. माहिती आहे.
आई : त्यावेळीही तू सरकारच्या निर्णयाचा विरोध किंवा समर्थन केलं नाही.
वडील : कारण मग मित्र नाराज झाले असते.
आई : कोणते?
वडील : सरकारचा विरोध आणि समर्थन करणारे.
आई : बरं.
वडील : मला वाद घालायला आवडत नाही.
आई : CAA नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC वरून देशभर आंदोलनं होत असतानाही, तू काहीच बोलत नव्हतास.
वडील : हो. कारण माझा त्याबद्दल अभ्यास नव्हता.
आई : बरं.
वडील : कामाच्या ताणामुळे मला इतर काही वाचायला वेळ मिळत नाही.
आई : चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतरही तू काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
वडील : त्यात काय प्रतिक्रिया द्यायची?
आई : मागच्या आठवड्यात मणिपूरमधील माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल झाला.
वडील : हो. ठाऊक आहे. 
आई : २ महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार..
वडील : चूकच आहे ते.
आई : तरी त्या निंदनीय घटनेबद्दलही तू तोंडातून चकार शब्द काढला नाही.
वडील : आपली मुलगीही ९ वर्षांची आहे.
आई : मग?
वडील : त्यामुळे मलाही तो व्हिडिओ पाहून राग आलेला.
आई : मग व्यक्त का नाही केला?
वडील : म्हणजे?
आई : म्हणजे घरात चर्चा करून किंवा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून तुला राग व्यक्त नाही करावा वाटला?
वडील : नाही.
आई : का?
वडील : पुन्हा मग इकडचे किंवा तिकडचे नाराज झाले असते.
आई : सोशल मीडियावर नाही, पण किमान घरी तरी..
वडील : काय घरी तरी?
आई : तुला एकदाही कोणत्याच चालू घडामोडीवर चर्चा करावी नाही वाटली?
वडील : त्याने काय फरक पडणार होता?
आई : त्यामुळे कदाचित मुलांना तुझ्याही जाणीवा आणि टॅलेंटची कल्पना आली असती.
वडील : पण प्रत्येकाला प्रत्येक विषयातील कळतच असं नाही.
आई : किमान पालक या नात्याने, त्या विषयाची माहिती घेण्याचा एकदा प्रयत्न तरी करायचा होता ना.
वडील : माझा व्हॉट्सॲपवर विश्वास नाही.
आई : मग इंटरनेट, न्युज पेपर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून का नाही माहिती मिळवली?
वडील : गांभीर्य नव्हतं.
आई : तूझ्या याच निष्काळजीपणामुळे, आज तूझ्या मुलाला स्वतःच्या बापाला आदर्श मानावं वाटत नाहीये.
वडील : अरे पण मी तर नियमितपणे मतदान करतो.
आई : तेवढं पुरेसं आहे?
वडील : म्हणजे?
आई : आपल्या आजूबाजूला, राज्यात किंवा देशात घडणाऱ्या घटना नकळत आपलं आयुष्य बदलवत असतात.
वडील : मग?
आई : त्यावर प्रतिक्रिया न देणं, हे मुर्दाडपणाचं लक्षण आहे.
वडील : तोंड सांभाळून बोल..
आई : वाईट वाटलं?
वडील : हो.
आई : मग या वेदना इतर वेळी कुठे जातात?
वडील : इतर वेळी?
आई : एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतरही असंवेदनशीलपणाने शांत कसं बसवतं तुला?
वडील : कारण मी कट्टर नाही.
आई : अरे मग खऱ्याला खरं अन खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस तरी दाखव.
वडील : कळतंय.
आई : फक्त कळून फायदा नाही..
वडील : मग?
आई : वळायलाही हवं.
वडील : हो.
आई : तुझ्यासारखे लाखो शिकले सवरलेले हुशार तरुण निरुत्साही असल्याने, बऱ्याच ठिकाणी आज नको ते लोक समाजाचं नेतृत्व करत आहेत.
वडील : मग काय करू?
आई : कोणताही विषय असो, मिळेल त्या माध्यमातून त्याविषयी माहिती मिळव.
वडील : मग?
आई : मग त्यावर घरात चर्चा कर आणि शक्य झाल्यास समाजातील इतरांपर्यंत ती व्हेरीफाईड माहिती पोचव.
वडील : मग काय होईल?
आई : तरच आजच्या पिढीला चूक आणि बरोबर यातील फरक कळेल.
वडील : नाहीतर?
आई : नाहीतर समाजात विष पसरविण्यासाठी पुरवलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊन, संपूर्ण पिढी भरकटत जाईल.
वडील : अरे पण..
आई : एक पिढी भरकटली, तर संपूर्ण देशाचा विकास भरकटेल.
वडील : मग?
आई : मग मुलं नको त्या गोष्टींना महत्व देतील आणि देशाच्या सर्वांगीण उन्नतीचे प्रमुख विषय बाजूला राहतील. 
वडील : अनुभवतोय.
आई : म्हणूनच जबाबदारी घे आणि बदल घडव.
वडील : नक्कीच.
आई : कारण..
वडील : कारण काय?
आई : कारण हीच वेळ आहे, फक्त एक शिक्षित आणि सजग सुशिक्षित नागरिक यातील फरक अधोरेखित करण्याची.
वडील : ज्जे बात! 
©️अक्षय भिंगारदिवे,
१० ऑगस्ट २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...