सदानंद उठला तेव्हा सकाळचे साडेआठ वाजून गेले होते. काल मारलेल्या बियरमुळे डोकं जड झालेलं त्यामुळे उठावसं वाटत नव्हतं. पण मग आईला आणि त्याच्या भावाला वगैरे संशय येईल का बरं झोपलाय म्हणून मग तो बळेच उठला. उठल्यावर आता लगबगीने कामावर जायचं नाटक नीट वठवलं म्हणजे झालं. आज पासून त्याला कंपनीत कामावर वगैरे जायचं नव्हतच. काल त्याच्या साहेबांनी केबिनमध्ये बोलवून त्याला कल्पना दिली होती की काही कर्मचाऱ्यांची कपात करणं भाग आहे म्हणून. त्या कामगार कपातील दुर्दैवाने त्याचं नाव आलेलं. नुकत्याच येऊन गेलेल्या एका महामारी मुळे लॉकडाऊन करावं लागलेलं. त्या टाळेबंदीत कंपनीला जबरी नुकसान झालेलं. त्यामुळे आता काही कर्मचाऱ्यांची कपात करणे अटळ होतं. पायाखालची जमीनच सरकलेली हे ऐकून सदाची. तशी या गोष्टीची कुणकूण त्याच्या कानावर आली होतीच. पण मग आपण त्या कपात झालेल्या दुर्देवी कर्मचारी वर्गात नसू असं का कोण जाणे त्याच्या आशावादी मनाने नाकारलं होतं. पण वास्तव आ वासून त्याच्या समोर उभे राहिलं होतं. सदाचं लग्न होऊन दीड वर्षात घरी पाळणा हलला होता. नुकतेच ऑफिसमध्ये त्याने पहिल्या मुलाच्या आगमनाचे पेढे वाटले होते. बायको मुलाला घेऊन माहेरपणासाठी रत्नागिरीला गेली होती. तिला एक सगळं कसं कळवायचं. बरं तिला कळलं की हे सगळं सासरच्यांना पण कळणार. खरंच पुरुषाच्या बाबतीत नोकरी असलेली गमावून बसणं म्हणजे एक प्रकारे आभाळ कोसळण्यासारखं असतं.
विमनस्क अवस्थेत काल तो आणि त्याच्या सारखेच ही आपत्ती कोसळलेले शरद आणि प्रकाश हे त्याचे सहकारी बारमध्ये बसलेले. काम सुटल्यावर घरी जाण्यापूर्वी. तास दीड तास पुढे काय याची चर्चा केली गेली.
कोणाच्या ओळखीन नोकरी मिळू शकते... दुसरी नोकरी मिळेपर्यंत काय करायचं... इंटरनेटवर कुठल्या साईट्स धुंडाळायचे म्हणजे मग अपेक्षित नोकरीचे बोलावणं येऊ शकेल यावर खलबते झाली. अर्थात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय या विचार करण्याला काही अर्थ नव्हता. " अरे आंघोळ करून घेतोयस ना... नऊ वाजायला आले मग घाई घाई करतोस. डबा तयार ठेवलाय."आई किचनमधून ओरडली आणि सदा भानावर आला. डबा केलाय म्हणे... सदा एरवी तिला विचारायचा काय केलेस डब्यात म्हणून... ती सुद्धा मग आढेवेढे घेत सांगायची. पण आज मात्र सदाचे लक्ष नव्हतं कशात. डबा तरी आज कुठे बसून खाणार होता तो बाहेर गेल्यावर. शरद आणि सदानंदने ठरवलेलं की आज मिलिंदच्या ऑफिसात जाऊन रेजुमे देऊन यायचा. मिलिंद कडून तसाच शब्दच घेऊन ठेवलेला त्यांनी. मिलिंद ने सुद्धा बॉस कडे बोलून ठेवतो म्हणून सारवासारव केली होती. म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार असतो म्हणून. मिलिंदच्या ऑफिसमधून ते दोघे बाहेर पडले तेव्हा दुपारचे दोन वाजलेले. त्या वातानुकूलित कार्यालयातून बाहेर येताच रणरणत्या उन्हात अंगाची काहिली होऊ लागली. ऐन मे महिन्याचे ऊन होते. भूक सुद्धा लागलेली होती. पण मग ऑफिसमध्ये बसून पद्धतशीर कालपर्यंत ते त्यांचा टिफिन खायचे तसं काही खावेसे वाटेना त्यांना. मग दोघांनी वडापाव खाल्ला. खाण्यापेक्षा नोकरीची चिंता सतावत होती. अचानक उभ्या ठाकलेल्या कामधंदा मिळवायच्या नव्या आव्हानापुढे बाकी सगळ्या गोष्टी शूद्र वाटू लागलेल्या.
एवढ्या की पुत्रप्राप्तीचा आनंद सुद्धा स्वतःच्या जीवनातून हिरावून गेल्यासारखा झाला होता. कालपासून मंदाला त्याच्या पत्नीला फोन सुद्धा करावासा वाटला नाही त्याला. मुलाच्या बाळंतपणात भरपूर खर्च झाला होता. आता मुलगा येईल घरी काही आठवड्यात. त्यांच्या औषधावर होणारा खर्च, पुढे तो आणखी मोठा झाला की मग त्याच्या कपड्यालत्यांवर, शिक्षणावर होणारा खर्च सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभे राहू लागलं. छे छे वेळ दवडता कामा नये... लवकरात लवकर नवीन नोकरी लागायला हवी.. आपल्या सहकाऱ्याचा निरोप घेऊन तो जवळच्या एका सायबर कॅफेत शिरला. तिथल्या रजिस्टर मध्ये स्वतःची नोंद करून त्याने कॉम्प्युटर उघडून जॉब सर्च च्या साइट्स उघडल्या. तास दीड तास इंटरनेटवर रेज्युमे पाठवून तो कंटाळला. आणि मग बाहेर पडला. आता पुढे काय हा प्रश्न पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिला. घरी लवकर जाऊन शांतपणे पडावं असं वाटू लागले एकदम. पण एवढ्या लवकर चार साडेचारला घरी परतलो तर घरचे प्रश्नांची सरबत्ती करतील. नकोच ते. त्यापेक्षा एखादा तास दीड तास सिनेमा बघावा असं ठरवलं त्याने.
प्रताप थेटर काही लांब नव्हतं. शिवाय आडबाजूला असल्याने तसं सोयीचं. इंग्रजी सिनेमे लागत तिथं. थेटर वर जाऊन त्याने तिकीट काढलं आणि आत जाऊन बसला. त्याच्या पलीकडे तीन-चार मवाल्यासारखे दिसणारे लोक बसले होते. कुठेतरी मजुरी करत असावेत. आपली शिफ्ट का काम आटपून जीव रमवायला आले असतील बिचारे दोन घटका... पण आपण मात्र वेळ काढायचा म्हणून.. एकाएकी त्याला स्वतःचीच लाज वाटली. नोकरी व्यवस्थित चालू असती तर साडेसहा सात पर्यंत काम करत बसला असता ऑफिसमध्ये तो. हा विचार येताच सदाला उगाचच उदासी वाटू लागली. मग सिनेमा सुरू झाला. समोरच्या दृश्याकडे सदाचा लक्ष होतं आणि नव्हतं ही. नायक आणि नायिका यांचा प्रणय रंगात आला होता. ती प्रणय दृश्य पाहून आजूबाजूचे पब्लिक... ती मजूर पोरे चेकाळली होती. शिट्ट्या मारत होती. ती रंगलेली प्रणय दृश्य पाहून सदानंद च्या मनात आलं.. किती महिने झाले असतील.. आपण मंदा बरोबर बायको बरोबर निवांतपणे असं बसलोच नाही. त्याला आता मंदा जवळ असावी असं वाटू लागलं. स्त्री सहवासच हवा असं वाटू लागला. मनातल्या दाबलेल्या सुप्त उर्मी आकांत करू लागल्या. मंदा आता कधी येईल कुणास ठाऊक. गेले जवळजवळ वर्षभर त्याने सक्तीचे ब्रह्मचर्य पाळलं होतं. सिनेमा सुटल्यावर एरवी वाईट म्हणून बदनाम झालेल्या गल्लीत जाऊन रोख पैसे मोजून मोकळं व्हायचं त्याने ठरवलं.
सिनेमा संपला एकदाचा. सदानंद डोळ्याच्या कोपऱ्यातून इकडे तिकडे पहात बदनाम गल्लीतून चालायला सुरुवात केली. सात सव्वासातची दिवे लागण्याची वेळ. पायऱ्यांवर त्या बसल्या होत्या. निवांत... सगळीकडे बायका... काही उभ्या.. चेहेरे रंगवून उभ्या.. मुरमांनी भरलेले काळसर कुरूप चेहरे. त्यात एखाद दुसरा उजळ चेहरा. मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्नो पावडरचा जाडसर थर. भडक कपडे... काहींच्या अंगावर तर नुसती परकर पोलकी. सदानंद ने आत डोकावून पाहिलं. पलंगाचा ओझरता भाग दिसला. यांच्याबरोबर कसा भाव ठरवायचा? काय बोलायचं मग भाव ठरल्यावर? का काही नाही बोललं तरी चालतं??
" शुक.. शुक... साब..." कुणीतरी सदाला बोलवत होते. " नेपाली हैं.. बटला साइज का ... दिखाऊ क्या??"
समोर भडक मेकअप केलेला तृतीयपंथी त्याला विचारत होता. सदानंद कसा कोण जाणे त्याला एकदम नको म्हणाला आणि तेथून भराभर पावले उचलू लागला. लहानपणापासून परस्त्री कडे आदराने पाहायचं वगैरे केलेले संस्कार त्याला आठवले. मघाचे पेटून वगैरे उठलेले बंडाचे निशाण दाखवत सुटलेले शरीर घामाने थबथबलं होतं. बदनाम गल्लीतून तो बाहेर पडला तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. नऊ सव्वा नऊ वाजत आलेले. रस्त्यावर लोक होते... कुठून तरी कुठे जाणारे. दुकान बंद होत होती. शटर्स खाली ओढले जात होते. कुठून तरी लांब लाऊड स्पीकर वरून कर्कश्य गाणे ऐकू येत होते. कसले तरी भयंकर संकटातून नुकतंच बाहेर पडल्याच्या भावनेने सदानंद घराकडे भराभर पावले टाकत होता.
घरात आला तेव्हा आई दार उघडतात त्याला म्हणाली
" अरे रत्नागिरी वरून तुझ्या करता निरोप आला होता."" रत्नागिरीहून निरोप आलेला?? कसला? " सदा ने अधीरपणे विचारले. आपली नोकरी गेल्याची खबर कानोकानी झाली तर नाही..??
" एक जूनला बारसे आहे तुझ्या मुलाचं... जावईबापूंना रिझर्वेशन करा म्हणालेत..." आईने आता काय ते सांगितलं.
एकाच वेळी सदाला आनंद झाला आणि एकदम जबाबदारीचे ओझे सुद्धा वाटू लागलं. बाप झालोय आता आपण. कामधंद्याचे लवकर काहीतरी बघायला हवं. हो..कुणीतरी आपलं नाव बाप म्हणून लावणार... त्याचा सगळं करायला हवं व्यवस्थित... कसल्या तरी नवीन उमेदीने सदाला उत्साह वाटू लागला. एक जून चे बारसं. खरोखरच थोडे दिवस राहिलेत. मुंबईहून तिकडे जायचं म्हणजे रिझर्वेशन आत्ताच केलं पाहिजे. आपलं आणि घरच्यांचही... शिवाय इतर तयारी तीही करायला हवीच. रत्नागिरीला सदानंद आई आणि भावाबरोबर दोन दिवस आधीच आला. तसं आग्रहाचे निमंत्रण होतं.. चार-पाच दिवस राहण्याचं. मंदाचा मामा स्वतः न्यायला लावता स्टेशनवर.
" जावई बापू सुट्टी टाकली आहे ना... आठ दहा दिवसांची? " मंदाच्या वडिलांनी विचारलं.
" अं... हो.... म्हणजे नाही.. चार.. चार दिवसांची सुट्टी आहे मला. " सदाने काहीच न सूचून उत्तर दिलं.
"काय तुम्ही... ते काही नाही मस्त आंबे फणस खाऊन जा भरपूर.... वाढवून घ्या सुट्टी पाहिजे तर...." सासरे आग्रह करू लागले .
" नाही.. निघतो लगेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाल्यावर... रिझर्वेशन केलेले आहे..." सदा म्हणाला.
सासरच्यांनी नेहमीप्रमाणे छान भरतात ठेवली होती. दोन दिवस सकाळी नाश्ता, दुपारचं रगडून जेवण, संध्याकाळचं मनसोक्त फिरणे झाल्यावर रात्रीच्या जेवणानंतर आंबे, कलिंगड तर कधी आईस्क्रीम असायचं. बारशाचा कार्यक्रम सुद्धा छान झाला. ' प्रतीक ' नाव ठेवलं मुलाचं. मग आता पुन्हा कधी येणार वगैरे सगळं झाल्यावर मंदाला आणि मुलाला घेऊन सदा घरी मुंबई ला परतला. प्रतीक च्या आगमनामुळे आई आणि सगळेच खुश होते.
मोबाईलवर सासरच्यांनी पाठवलेले फोटो सदा पाहत होता. किती सुंदर दिसत होती मंदा त्यात. दोघांचे एकत्र काढलेले फोटो तितके सुंदर आले होते... अरे हो दोघांचे नाही तिघांचे... कधी मंदाच्या मांडीवर तर कधी स्वतःच्या कडेवर घेतलेल्या प्रतिकला विसरलोच की आपण... सदाच्या मनात आले. आणि आपण कुठे वाहत चाललो होतो.. चांगल्या संसाराला गालबोट लावायला चाललो होतो. कुठून अवदसा आठवली आपल्याला कोणास ठाऊक. चांगलेच भरकटलो होतो की आपण. आताही किचनमध्ये काम करत असलेली मंदा फार सुंदर दिसत होती. अंगाने चांगली भरली होती. नुकत्याच पार पडलेल्या बाळंतपणा मुळे चेहऱ्यावर तेज लखलखत होते. सदानंद मनाशी ठरवूनच टाकलं की काही झालं तरी मंदाच्या आज कानावर घालायचं... नोकरी गेलीय ते... मग काय वाटेल ते होवो... तिला कळलंच पाहिजे.
" मंदा... एक गोष्ट सांगायची आहे." दिवे घालवल्यावर एकांतात सदा मंदाला म्हणाला.
" गेल्या आठवड्याभरा पासून कामावर नाहीये मी... नोकरी गेली माझी..." धीर धरून सदा म्हणाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि आवाजत कंप होता. मंदाच्या प्रतिक्रियेकडे सदाचे लक्ष होतं आता.
" खरं सांगू... तुम्ही रत्नागिरीला बारशासाठी आलेला तेव्हाच ओळखलं होतं मी.... की या माणसाचं काहीतरी बिनसलय... काहीतरी खूपत आहे तुमच्या मनात... पण इथं सगळ्यांसमोर नको... निवांत घरी मुंबईला आल्यावर विचारू..." मंदा म्हणाली.
" पण तुम्ही काळजी करू नका. चांगले एम.ए केलंय मी. रत्नागिरीला शिकवायचे मी... गोगटे कॉलेजमध्ये. शेजारची विनिता म्हणत होती त्यांच्या भांडारकर कॉलेजमध्ये प्रायव्हेट लेक्चरर्स हवे आहेत. दिवसांमध्ये लिमिटेड वेळ लेक्चर्स घ्यावी लागतील. बऱ्यापैकी मोबदला देणार आहेत. मी सांगून ठेवते तिला."
मंदा बिनधास्तपणे म्हणाली.
" अगं पण या अवस्थेत तुला जमेल का हे सगळं... तसं मी पण नवीन नोकरी लागेपर्यंत ' झोमॅटो ' डिलिव्हरी करण्याचा विचार ठेवला आहे..." सदानंद म्हणाला.
" आता आपलं पिल्लू आल्यामुळे आपले खर्चही वाढणार... सध्या तू प्रतीक कडे बघ... उगाच ओढाताण होईल तुझी..." समजूतदारपणे सदा म्हणाला.
" हे बघा... परिस्थिती ची जाणीव झाली की पावले आपोआप मापात पडायला लागतात. तुमच्यासारख्या हुशार माणसाला काम मिळेलच आज ना उद्या. पण तूर्तास तुम्ही विश्रांती घ्या. माझाही थोडं हिंडू फिरू न झालं की व्यायाम होईल."
मंदाच्या आश्वासक बोलण्यानं निश्चिंत झालेला सदा मग इतके दिवसांचा नोकरीचा डोक्याला भुगा करणारा प्रश्न बाजूला ठेवून तिच्या कुशीत त्यांच्या लहान मुलासारखा झोपी गेला.
#योगेश साळवी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा