मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस दिवस रात्र पडत होता. संपुर्ण मुंबई आणि ठाण्याला पावसाने झोडपून काढले होते. कामावर जाणाऱ्यांचे सकाळी निघाल्यापासून घरी येईपर्यंत हाल होत होते. लोकल गाड्या कधी पंधरा मिनिटं तर कधी अर्धा अर्धा तास लेट होत होत्या हे. लेट असल्या तरी लोकल चालू होत्या ही एक गोष्ट चांगली होती . एक लोकल गेल्यानंतर पुढली लोकल यायला पाच मिनिटं उशीर झाला तर पुढल्या दोन लोकल गाड्यांच्या गर्दीने प्लॅटफॉर्म भरून जायचा, ठाण्या सारख्या स्टेशनला तर पाय ठेवायला सुद्धा जागा राहात नसे.
त्यादिवशी ठाण्याला दहा मिनिटे झाली पण मुंबईहुन कल्याण दिशेने जाणारी एकही लोकल आली नाही स्लो नाही की फास्ट नाही. दहाची पंधरा मिनिटे झाली पण लोकल चा पत्ता नव्हता. संध्याकाळचे सात वाजले होते अंधार पडायला सुरुवात झाली होती पाऊस जोराने कोसळत होता.
ठाणे स्टेशन बाहेर मालती काकी भुईमुगाच्या शेंगा विकायला बसायची. कल्याण मार्केट मधून ती पहाटे जाऊन शेंगा आणायची आणि दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी सहा साडे सहा पर्यंत विकून घरी जायला निघायची. त्या दिवशी किलोभर शेंगा संपत नव्हत्या म्हणून तिला आज तिला थोडासा उशीर झाला.
मालती काकी तिची विधवा सुन साक्षी आणि दहा वर्षाची नात रिया अशा तिघीच जणी एका भाड्याच्या खोलीत राहात होत्या. मालती काकींचा नवरा आणि मुलगा दोघेही मोटरसायकलच्या अपघातात पाच वर्षांपूर्वी जागेवरच मरण पावले होते. साक्षीच्या वडिलांनी तिला माहेरी नेऊन एखाद वर्षाने दुसरे लग्न लावून देईन असे सांगून नेण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या सासू कोणाकडे जातील त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही त्यांना आमच्या दोघींशिवाय कोणीही नाही शिवाय मी लग्नही करणार नाही यावर साक्षी ठाम राहिली.
मालती काकू स्टेशन वर आली तर प्लॅटफॉर्म वर उभं राहायला जागा नव्हती. तिच्या हातात नेहमीचे वेताचे टोपलं होते. येताना ती माल डब्यातून यायची पण जाताना लेडीज डब्यातनं दरवाजा जवळ उभं राहून पायाच्या मागे टोपलं ठेऊन जायची. पाऊसच एवढा होता की मालती काकू हातातले टोपलं सांभाळता सांभाळता छत्री असूनही भिजली होती.
आज माझा धनी असता, माझा मुलगा असता तर मला कशाला अशा शेंगा विकायला लागल्या असत्या नातीला सांभाळत तिच्याशी खेळत घरात राहिली असते या विचाराने ती रोजच्या सारखी अस्वस्थ झाली होती. वाढत्या महागाईत एक कमावणार आणि तीन खाणारी तोंड असल्यावर घर कसं चालणार. साक्षी सुद्धा कामावर जायची, घाटकोपरला एका कॉस्मेटिकच्या दुकानात ती काम करायची. रोज सहा साडे सहा पर्यन्त ती घरी पोहचून स्वयंपाक वगैरे करुन ठेवायची. सात वाजता मालती काकूला साक्षीचा फोन आला. आई तुम्ही कुठे आहात मला आज उशीर होईल दुकानात पावसामुळे पाणी आले आहे सगळं सामान उचलून वर ठेवायला लागतंय. मला उशीर होईल रेवा ला भूक लागली असेल तिला जाताना वडापाव नाहीतर भजी घेऊन जा. दुपारी शाळेतुन आल्यापासून पोरगी उपाशी असेल. मालती काकू फोन मुळे आणखीन अस्वस्थ झाल्या. रेवाच्या आठवणीने व्याकुळ झाल्या.
पण कल्याणला जायला लोकलने अर्धा तास आणि स्टेशनला उतरून चालत पंधरा मिनिटं.
तेवढ्यात एक लोकल आली, गर्दीने खचाखच भरलेली जेवढी लोकं उतरली त्याच्या दुपटीने लोकं आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. मालती काकूंनी टोपलं धरून चढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला काही बायकांनी खेकसून, मावशे तुझं टोपलं घेऊन गर्दीत कशाला मरते जाऊ दे की दोन गाड्या, गर्दी कमी झाली तर चढ की.
मालती काकू ने मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीतसुद्धा चढण्याचा प्रयत्न केला पण तिला काही जमले नाही. कामावर जाणाऱ्या तरुण स्त्रिया आणि कॉलेजच्या मुली पन्नाशी ओलांडलेल्या मालती काकूंना ढकलून पुढे जायच्या.
जसजसा वेळ वाढू लागला मालती काकू आणखीन आणखीन बेचेन होऊ लागल्या. हातातलं टोपलं तिथंच टाकून तसेच जावं असा त्यांच्या मनात विचार आला. तेवढ्यात कल्याणला जाणारी ए सी लोकल आली. ए सी लोकलचे दरवाजे उघडले पण गाडीत चढणारे लोकं कमी होते गाडीत गर्दी असली तरी चढता येणे शक्य होते.
मालती काकूंच्या मनात एका क्षणात चढू की नको, माझा सेकंड क्लास चा पास आहे, टी. सी. ने पकडले तर काय करू? लोकं काय म्हणतील मला?
पण माझी लेक उपाशी आहे, एकटी आहे, भुकेली असेल. नेहमी प्रमाणे दरवाजाला आतून कडी लावून आजीची नाहीतर आईची वाट बघत असेल. आमच्या दोघींपैकी कोणाचा आवाज आल्याशिवाय ती आतून दरवाजा उघडत नाही. परका आवाज असला तर खिडकीतून आधी डोकावून बघेल आई आणि आजी आल्याशिवाय दार उघडणार नाही असं त्या व्यक्तीला सांगेल. ते काही नाही आता काही झाले तरी मी चढणार. ए. सी. लोकल चे ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणार इतक्यात मालती काकू गाडीत चढल्या.
दरवाजे बंद होऊन गाडी सुरु झाली आणि डब्यातील लोकं कपाळावर आठ्या आणून त्रासिक चेहऱ्याने हातात टोपलं धरलेल्या मालती काकूंकडे बघायला लागली. मालती काकुंना सगळ्यांच्या कुत्सित नजरा जाणवत होत्या. दोघं तिघे म्हणाले ये ए सी लोकल हैं अगले स्टेशन उतर के साधी लोकल मे जाओ. कोणी म्हणाले फेरीवाले पण आता ए सी लोकल मध्ये यायला लागले वाटते. काही मिनिटात कळवा स्टेशन आले, दरवाजे उघडले आणि बंद झाले लोकल सुरु झाली. मालती काकू गाडीतून उतरल्या नाही. त्या भिजलेल्या असल्याने थंडीने थरथरत होत्या. मघाशी अगले स्टेशन उतर के साधी लोकल मे जाओ बोलणाऱ्या पैकी एकजण पुन्हा खेकसला ओ आंटी आपके पास टिकट हैं क्या?
एरवी गिर्हाईकांशी गोड गोड भाषेत आणि मृदु आवाजात बोलणाऱ्या मालती काकू त्यांच्याकडे तिकीटाची विचारणा करणाऱ्यावर ओरडल्या, तुला तिकीट दाखवायला तू टी. सी. आहेस का? तू कोण मला तिकीट विचारणारा? टी.सी. येईल त्याला दाखवेन तिकीट नाहीतर दंड भरेन तुला काय करायचे आहे.
मालती काकुंचा हा अवतार बघुन गाडीतील सगळेच जण अवाक झाले. काही वेळापूर्वी त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा आता बदलल्या होत्या. पावसामुळे गर्दी, उशीर, आणि त्यात वयस्कर महिलांना होणारा त्रास या परिस्थीतीचे भान बहुतेक जणांना मालती काकुंच्या उत्तराने आले असावे.
मालती काकू उभ्या असलेल्या जागेपासून पुढल्या सीटवर एक तरुण बसला होता. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याने अंगावर जॅकेट घातले होते. ठाण्याला गाडी यायच्या अगोदर पासून तो फोनवर बोलत होता, मालती काकूंचा आवाज ऐकल्यावर त्याने मागे नजर वळवली. गाडी मुंब्र्याजवळ आली होती, तो जागेवरून उठला आणि त्याने मालती काकू ला त्याच्या जागेवर बसायला येण्यासाठी खुणेने बोलावले.
मालती काकू ने त्याला हातानेच राहू दे मी इथेच बरी आहे असे प्रतिउत्तर दिले.
पण तो तरुण तिथून मालती काकू कडे गेला आणि तिच्या हाताला धरून चल ग मावशी बस माझ्या सीटवर असे बोलून नेऊ लागला. मालती काकुंचा थंडीने थरथरणारा हात त्या तरुणाला जाणवला, त्याने त्याचे जॅकेट काढले आणि मालती काकूच्या अंगावर घातले.
त्या तरुणाने जॅकेट काढल्यावर गाडीतील सगळ्याच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. तो तरुण एक पोलीस अधिकारी होता जॅकेट मुळे खाली खाकी पॅन्ट असूनही त्याचा पुर्ण युनिफॉर्म दिसत नसल्याने कोणाच्याही लक्षात आले नव्हते . तो रुबाबदार तरुण ए सी पी डॉ. जयसिंग शिंदे होता असे त्याच्या शर्टावरील नेम प्लेट वरून सगळ्यांना दिसले . आता आजूबाजूला बसलेली लोकं त्याला या ना साहेब तुम्ही बसा ना इथे म्हणून पुढे पुढे करू लागली होती.
मालती काकू त्याला बोलल्या साहेब तुम्ही माझ्यासाठी जागेवरून उठलात, तुमचे जॅकेट मला दिलेत, आणखीन पंधरा मिनिटांनी मी उतरले असते मला रोजची सवय आहे, आज उशीर झाला आणि माझी नात घरी एकटीच आमच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल .
त्यावर डॉ. जयसिंग शिंदे म्हणाले मावशी माझी आई माझा बाबा मेल्यावर ट्रेन मध्ये टोपलं घेऊन पेरू आणि चिकु विकायची. तिनं मला शिकवून डॉक्टर बनवलं आणि मी पुढं जाऊन पोलीस अधिकारी बनलो. जेव्हा मी ही वर्दी घालून पहिल्यांदा तिच्यासमोर गेलो तेव्हा ती बोलली पोरा जेवढा मोठ्या पदावर आणि हुद्द्यांवर असलेल्या लोकांचा मान ठेवावा लागेल तेवढाच मान कष्ट करणाऱ्या लोकांचा पण ठेव. माणूस परिस्थितीने गरीब असला तरी पण त्यांना मनाच्या श्रीमंतीने जवळ ठेव.
डोंबिवलीला गाडी बऱ्यापैकी रिकामी झाली होती. डॉ जयसिंग शिंदे मालती काकूंच्या समोर बसले. डोंबिवलीला गाडीत टी.सी. सुद्धा चढले डॉ. जयसिंग शिंदे युनिफॉर्म मध्ये दिसल्याने आणि मालती काकुंशी बोलत असल्याचे बघुन ते माघारी फिरले. पण मालती काकूंनी त्यांना हाक मारून दंडाची रक्कम विचारली , मी आजपर्यंत कधी फुकट प्रवास केला नाही , आजची कमाई दंड भरण्यात गेली असे समजेन म्हणून पैसे काढू लागली. पण डॉ. जयसिंग शिंदे यांनी त्यांना तसे करण्यापासून थांबवले आणि दंडाची रक्कम स्वतः भरली, माझ्या एका मावशीला ए सी लोकल ची सफर घडवून आणली हे निमित्त पुढे करून.
गाडीतील काहीजणांना त्या तरुण तडफदार पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक वाटले त्याचसोबत त्या वयस्क मावशीला बसायला जागा द्यायचे सोडा पण तिला गाडीत प्रवास नाकारणाऱ्या लोकांना आवरण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल अपराधी वाटू लागले.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
030823
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा