सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

459. दोन दगड

 एकदा एक शिल्पकार मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या दगडाच्या शोधात जंगलामध्ये गेला. तेथे त्याला एक चमकदार आणि चांगला दगड मिळाला. त्या दगडाला बघितल्यावर तो खूप खुष झाला आणि त्या दगडाला घेऊन तो परत आला.आपल्या घरी परत येत असताना रस्त्यामध्ये त्याला अजून एक चांगला दगड मिळाला. त्याने तोही दगड उचलला आणि आपल्या घराकडे निघाला.
जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या हत्यारांनी, पहिल्या दगडावर काम करणे सुरू केले.
ते हत्यार दगडावर आपटताक्षणी दगडामधून आवाज आला, "कृपया, या हत्यारांनी माझ्यावर घाव घालू नका. यामुळे मला खूप त्रास होत आहे. जर तुम्ही माझ्यावर असे घाव घातलेत, तर मी तुटेन. कृपया मला सोडून द्या."
त्या दगडाचे आर्जव ऐकून, शिल्पकाराला त्याची दया आली. त्याने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड घेतला. आता त्याने दुसऱ्या दगडावर आपल्याकडील हत्याराने मूर्ती बनवण्यास सुरवात केली.
त्या दुसर्‍या दगडाने वेदनेची किंवा त्रास होत असल्याची कोणतीच तक्रार केली नाही. काही वेळातच तो शिल्पकार त्या दुसऱ्या दगडामधून परमेश्वराची एक खुप सुंदर मूर्ती बनविण्यामध्ये यशस्वी झाला.
दुसऱ्या दिवशी गावातील लोक परमेश्वराची मूर्ती घेण्यासाठी आले. त्यांना मंदिरामध्ये ठेवण्यासाठी अजून एका दगडाची गरज होती. जेव्हा त्यांनी शिल्पकाराला त्याबद्दल सांगितले, तेंव्हा त्याने तो पहिला दगड त्या लोकांना दिला.
लोकांनी मंदिराला सुशोभित केले आणि परमेश्वराच्या मूर्तीची तिथे स्थापना केली. त्या पहिल्या दगडाला, त्यांनी मूर्तीच्या समोर ठेवून दिले, ज्याचा वापर भक्तलोक , नारळ फोडण्यासाठी करू लागले.
आता जेंव्हा कोणी मंदिरामध्ये दर्शनास येत असत, तेंव्हा ते त्या मूर्तीची पूजा फुलांनी करत असत व त्या मूर्तीला दुधाने स्नान घालत असत आणि नारळ फोडण्यासाठी मात्र समोर ठेवलेल्या त्या पहिल्या दगडाचा वापर करत असत.
ह्यामुळे तो पहिला दगड खूपच त्रस्त झाला. कारण जेंव्हा भक्त नारळ फोडण्यासाठी त्याचा वापर करत असत, तेव्हा त्याला खूपच घाव सोसावे लागत होते.
एक दिवस जेव्हा पहिला दगड रडत होता, तेव्हा तो दुसरा दगड, ज्यातून ती मूर्ती बनली होती, त्याने त्याला विचारले, "तू का बरं रडत आहेस?"
त्यावर पहिल्या दगडाने उत्तर दिले, "तू खूपच भाग्यशाली आहेस, आनंदात आहेस कारण लोकं तुझी पूजा करतात, ते तुला दुधाने स्नान घालतात, आणि तुझी खूपच देखभाल पण करतात. परंतु माझी कोणीच पर्वा करत नाही. जेंव्हा ते माझ्यावर नारळ फोडतात... तेंव्हा तो अत्यंत त्रासदायक अनुभव असतो."
यावर दुसरा दगड एक क्षणभर थांबला आणि मग म्हणाला, "जेव्हा शिल्पकार तुझ्यावर हत्यारांनी काम करत होता, तेंव्हा तू त्याला जर थांबवलं नसतस, तर  आज माझ्या जागी तू असतास... परंतु तू सोपा मार्ग निवडलास, तुला त्या वेळी कोणत्याही त्रासातून जायचे नव्हते. म्हणूनच तुला आत्ता त्रास सहन करावा लागत आहे..."
आपल्याला परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत की रोज सकाळी जेंव्हा आपण उठतो, तेंव्हा आपल्याला काही ना काहीतरी काम करायच असतं, जरी ते आम्हाला पसंत असो वा नसो. आपलं काम उत्तमरितीने करण्यासाठी दृढ संकल्प केल्यामुळे आमच्यामध्ये संयम, आत्मविश्वास, परिश्रम, इच्छाशक्ती प्रसन्नता आणि संतोष हे गुण शंभर पटीने वाढतात. 
आपला शिल्पकारसुद्धा, रोज आपल्याला घडवत असतो... थोड्याशा घावाने किंवा त्रासाने घाबरू नका. माझ्या मित्रांनो, उलट यामुळे प्रत्येक क्षणी आपलं सौंदर्य अधिकच खुलत जातं. चला तर मग, आनंदाने आणि उत्साहाने आपल्या शिल्पकाराला आपल्याला घडवू देऊयात.
                    ♾
नेहमीच सत्यनिष्ठ रहा आणि आपल्या समोरील आव्हानांचा, आपल्या भल्यासाठीच असल्याचा स्वीकार करा.”

बाबूजी
Heartfulness Meditation 💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...