मला ना कधी कधी जाम भारी कल्पना सुचतात. खरं तर त्यांना भारी म्हणण्यापेक्षा विचित्र म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्याचं असं झालं, नुकताच माझा वाढदिवस झाला. सगळ्यांना येतात तशाच भरभरून व्हाट्सअप शुभेच्छा, काहीजणांच्या चारोळ्या, काहींचे फोन... सगळं काही नेहमीप्रमाणे! पण रात्री उगाच एक चुकार विचार डोक्यात आला. म्हणजे बघा हं, आपल्याला काही कळत नसते त्या एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत नित्यनेमाने आपला वाढदिवस साजरा होत असतो. कुणीतरी म्हटलं आहे ना, पृथ्वीतलावर आपण घेतलेला पहिला श्वास आणि अखेरचा श्वास यातले अंतर म्हणजे जीवन! हे अंतर किती ते कुणालाच माहिती नाही. यातल्या पहिल्या श्वासाचे कौतुक आपण दरवर्षी नेमाने करतो, पण शेवटच्या श्वासाचे कौतुक मात्र आपण पाहुच शकत नाही की! म्हणजे लोक पुण्यस्मरण वगैरे करतील ही, पण सालं ते आपल्याला नाही ना बघता येणारं!
आणि तेव्हाच ती कल्पना सुचली.... जर खरंच आपल्याला या शेवटच्या श्वासाची तारीख नक्की कळली तर धमाल येईल ना ! मला तरी ही कल्पना सर्वप्रथम सॉलिडच आवडली. म्हणजे बघा हं, आपल्या वाढदिवशी आपले वय एक एक वर्षांनी पुढे सरकते त्याचे आपण सेलेब्रेशन करतो, तसंच या मृत्यूदिनाच्या तारखेला एक एक कमी करत जायचे. अर्थात अशी काहीतरी आयडिया असावी की समजा वयाच्या पन्नाशीनंतरच ही तारीख त्या व्यक्तीला समजावी. कारण वयाच्या पन्नाशीपर्यंत असणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्या अनुषंगाने करावी लागणारी धावपळ, भौतिक सुखामधील आनंद घेण्याची संधी या सर्वापासून व्यक्तीला दूर करता कामा नये. आयला, पण ही जर अशी नक्की तारीख समजण्याची काही व्यवस्था झाली ना, तर मला त्या तारखेला आपले इथून जाण्याचे सेलेब्रेशन आपल्याच उपस्थितीत करायला नक्की आवडले असते. कारण जर आपल्या पृथ्वीवरच्या येण्याचे आपण एवढे कौतुक करतो तर इथून जायचे सुद्धा कौतुक करायला काय हरकत आहे? जेवढे इथे येणे सहज आहे तेवढेच सहजपणे इथून जाणे का नसावे? उलट ही पूर्वकल्पना असेल तर माणसाला त्या अनुरूप आयुष्याचे छान प्लँनिंग करता येईल ना!! उगाच नंतरच्या पुण्यस्मरणचे सोहोळे करण्यापेक्षा त्या व्यक्तीला आधीच या सोहोळ्यांची मजा घेता येईल की!! अर्थात, हे ही खरे की ज्याचा जन्म आणि मृत्यू याच्या शाश्वततेवर विश्वास आहे आणि या दोन अविभाज्य घटना आहेत यावर श्रद्धा आहे त्यांनाच ही कल्पना थोडीफार रुचू शकेल.
आपल्यापैकी बहुतेकांनी आनंद सिनेमा पाहिला असेल. सहा महिन्यात जाणारा राजेश खन्ना, त्याचे ते दिलदार वागणे, ते सर्वांशी मजेत आनंदात वागणे, त्याचा तो नितांत सुंदर अभिनय तेव्हा आपल्याला खूप भावला होता ना! मग ही मृत्यूची पूर्वकल्पना तर प्रत्येकाला त्या आनंद सारखे लुभावणारे आयुष्य जगायचा पर्याय उपलब्ध करून देईल की! अवघ्या आयुष्याचे सोने होऊ दे म्हणून देवाला विनंती करणारे आपण, देवाने जर ही सूचना आधीच देऊ केली तर मात्र खरेच तसे करू शकू. अर्थात त्यासाठी तेवढी प्रबळ इच्छाशक्ती हवी हे ही खरेच! आणि म्हणूनच ही सूचना वयाच्या पन्नाशीनंतर मिळावी असे मला वाटते. अर्थात हे ही सत्य की आपल्या आजूबाजूस पन्नाशीनंतर पण भौतिक साधनांची ओढ असणारे आणि ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे लोक काही कमी नाहीत . त्यांना ही पूर्वकल्पना कशी भावावी बुवा?
हा विचार आला आणि एकदम लक्षात आले की कुठल्याही वरदानाचे शापात रूपांतर करण्यात आपली ही मानवजात एकदम प्रवीण झाली आहे. आईन्स्टाईनने अणू मधील अमाप शक्तीचा शोध लावला पण अमेरिकेने ओपनहामेरला त्या शक्तीचा उपयोग अणुबॉम्ब बनवायला भाग पडून जगावर काय उपकार केलेत का? मग त्याच प्रमाणे या पूर्व कल्पनेच्या वरदानाचा दुरुपयोग करून एखाद्या निष्पाप माणसाला पाप करायला भाग पाडणाऱ्या खल प्रवृत्ती या समाजात जागोजागी भेटतील. म्हणजे सगळीकडे आनंद पसरवायला निघालेल्या माणसाच्या हातून त्याच्याही नकळत दुःख पसरवले गेले तर! आयुष्याचे सोने करायला जाणारा आपल्याच आयुष्याचा कचरा करू टाकेल ना...आणि तो ही स्वतःच्या नकळत!!छे.. छे!! असे तर नक्कीच व्हायला नको त्यापेक्षा ही अशी पूर्वकल्पना मिळायलाच नको रे बुवा!!!
--- सुनील पोतदार.
13 ऑगस्ट 2023.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा