शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

502. बकेट लिस्ट...

 फेसबुकवरच्या एका मैत्रिणी ग्रुपमध्ये , एक नांव बघून मी चमकलेच.  मनांत आलंआपण जिला ओळखतो.  त्याच  सेम नाव- आडनांवाचही कुणी असू शकतं. फोटो निरखून बघितल्यावर खात्रीच पटली  तीचं ती. माझी वर्गमैत्रीण "अंजली !"  पण ही ?आणि फेसबुकवर ?
      मला नवलंच वाटलं ,ग्रूपच्या प्रत्येक  ॲक्टिव्हिटीमधे तिचा  सहभाग  दिसायंचा! मी तिला लाईक द्यायला लागले.
   मेसेंजरमध्ये मेसेज दिला. तिनेही  मला  लगेच  ओळखले.  म्हणाली, "अगं  येत्या गुरुपौर्णिमेला ये माझ्या घरी, दुपारी मी एकटीच घरी असते ,निवांत बोलणं होईल!. पुरणपोळीचा बेत करते, सोबतच जेवण करूया!"
      मलाही खूप आनंद झाला ईतक्या वर्षानंतर  वर्गमैत्रीण भेटणार म्हणून. मी आनंदाने म्हणालेे " नक्की  येईन"  आणि‌  मी  माझी वर्गमैत्रीण अंजूबद्द्ल आठवू लागले. आता मधली बरीच वर्षे निघून गेली होती. ऐव्हढ्या  चौरेचाळीस वर्षानंतर तिची भेट होणार होती..तशी दिसायला बऱ्यापैकी होती अंजु , पण स्वतःकडे लक्ष देत नसे , जरा  गबाळीच ‌ वाटायची,अभ्यासातही जेमतेम. हो,पण स्वभाव छान होता. अगदी शांत स्वभावाची कोणाच्या अध्यांत ना मध्यांत.  शाळेत असतांना कोणत्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये  ती  कधी  भाग घ्यायची नाही. खेळायला सुद्धा यायची नाही, बसुन रहायची बाकांवरआणि वेंधळेपणा म्हणाल तर मला आठवला तिचा वेंधळेपणा आठवला. वर्गात  ती आणि मी एकाच बाकावर बसायचो. त्यावेळी आम्हांला लिहांयला शाईचे पेन होते. एकदां लिहिता लिहिता तिने  शाईचा पेन झटकला आणि...आणि माझ्या मोत्यांसारख्या अक्षरांनी श्रीगणेशा केलेल्यां नव्याकोऱ्या  वहीचं पान खराब झालं. मला तिचा खुप रागआला, पण मी काही बोलले नाही,  दुसऱ्या दिवशी मी माझी जागा बदलवून दुसऱ्या जागेवर बसायला सुरवात केली. शालेय शिक्षणानंतर आमच्या वाटा वेगळ्या दिशेने गेल्या. दोन वर्षांनी तिचे लग्न झाल्याचं कळालं आणि  शाळाकॉलेजमध्ये  अभ्यासाबरोबरच  इतर अँक्टिव्हिटिजमध्ये अग्रेसर  राहून, सुंदर दिसणारी, स्वतःला खूप  स्मार्ट समजणारी मी, लग्नानंतर पुण्यातल्या एका प्रसिद्ध काॅलेजमध्ये तत्त्वज्ञानाची  लेक्चरर म्हणून नोकरीला लागले. पुस्तकी शिक्षणावर जास्त भर दिला. घरी- कॉलेजमध्ये आपले वर्चस्व आणि दरारा कायम राखला.  स्वतःचं ऐक वेगळं  स्टेट्स निर्माण केलं,यश पैसा , कीर्ती  आणखी काय हवं असतं जीवनांत. सर्वस्व कमावल्याच्या आनंद घेऊन मी  आता दोन वर्षांपूर्वी प्रिन्सिपॉल म्हणून  रिटायर्ड झाले. रिटायर्ड नंतरचे  सोपस्कार, सत्कार समारंभ आटोपले..या आधीच  माझी दोन्ही मुलं आपल्या नोकरी, संसारात  रमलेली होती. पूर्वी मला त्यांना द्यायला वेळ नव्हता आणि आता. आता....  मला एकटेपणं जाणवायला लागलं. खरंच कोणीतरी जिवाभावाची मैत्रीण असावीआपल्या मनांतल सांगायला  ज्यामुळे मनावरचा नको तो ताण कमी होईल असं  वाटुन गेलं. बिझी लाईफमुळे इतक्या वर्षात भुतकाळात डोकावायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. नव्हे मीच काढला नाही. माझ्यात असणाऱ्या ईगोमुळे असेल कदाचित मला फारशी कुणाशी मैत्री करावीशी  नव्हती. पण आता मला मीच माझ्याभोवती आखलेले रिंगण तोडून बाहेर यावेसे वाटत होते. यजमानांनी रिटायरमेंट नंतरच्या आपल्या आयुष्याचे आपल्या मित्रांसोबतचे वेळापत्रक  बनवून घेतलेले असल्याने त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता. कुठेतरी वाचल्यासारखे आठवले, आयुष्यात माणसे जोडायला शिका कधीच एकटेपणा जाणवणार नाही आणि मी या माझ्या ऊतारवयांत मैत्रीचा आधार शोधायला निघाले.अंजुच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. अंजु मधील  बदलामुळे ती सध्या काय करते ही ऊत्सुकता माझ्या मनाला लागलेली होतीच. तसंही या वयात मन भूतकाळातच जास्त रमतं आणि त्या जुन्या आठवणी शेअर करायला  शाळेतल्या मैत्रीणींशिवाय योग्य जागा नाही. आठवणिंची लांबच लांब साखळी तयार होते.. पुण्यात ऐरवी काॅलेजला जातांना माझी मीच फोर व्हीलर घेऊन जात असे. पण माझ्या घरापासूनअंजुचे घर म्हणजे दोन टोकं.  ऐन गर्दीच्या वेळी पुण्याच्या ट्रॅफिक मधून गाडी चालविणे  म्हणजे मला  टेंशन वाटले, म्हणून मी ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले. गाडीत बसल्या बसल्या  तिचाच विचार करू  लागले. गाडी केव्हा तिच्या घराजवळ येउन थांबली कळाले नाही. ड्रायव्हरला परत जायला सांगुन, मी माझी स्टार्च केलेली कॉटनची साडी  सावरत  गाडीतून खाली उतरतांना, जाड भिंगाच्या चष्म्यातून तिच्या घराकडे नजर टाकली.    समोर 'ती ' केसांचा शोल्डर कट  केलेली, लाईट कलरचा  सलवार सूट घालून सुहास्य वदनाने तिच्या दारात उभी होती.  मला बघून ती समोर आली.म्हणाली, अगं  इतक्या वर्षांनी भेटतोय "हग" करूया , म्हणून तिने मला आलिंगन दिले. पण माझे हात तिच्या गळ्यात पडले नाही, तीने तेे मनांवर घेतलेले दिसले नाही माझ्या हट्टीस्वभावाची कल्पना होतीच  तिला.
 माझा हात धरून अंजु म्हणाली," ये आंत !" तिच्या स्वरांत अगत्य होते! अंगणातल्या कलात्मक रांगोळी कडे बघतचं मी आत पाऊल टाकले.पाहताक्षणीच घरातला नीटनेटकेपणा लक्षात आला. प्रसन्न वाटलं तिच्या घरात.मनांत  विचार आला , "सूनबाई छान मिळाली वाटतं हिला.."
 मी अंजुला म्हणाले, छान आहे तुझं  घर सून बाईला घर सजविण्याची आवड आहे वाटतं .
  तशी ती  हसून म्हणाली, "अगं अजुन पुरतं बघितलंय कुठं तू माझं  घर ? " म्हणून ती  पाणी आणायला आंत गेली.मीही तिच्या  मागोमाग गेले.तीचं सगळं  किचन कसं लखलखीत.  वस्तू  जागच्या जागी   नीट  ठेवलेल्या. खिडकीतून  बाहेर लक्ष गेलं,कपडेही अगदी 'श्यामच्या आई '  सारखे  एका टोकाला दुसरे टोक जोडून वाळत घातलेले . माझं निरीक्षण चालूच होतं. तिच्यात झालेल्या बदल तर  लक्षात आलाच  होता.  "लवकरच  कामे आटोपली दिसताहेत ! ‌  भरपूर निवांतपणा  मिळत असेल  तुला. मी  सहजच  म्हंटले ."
" हो गं !  अगं,  सगळी कामे  पटापट  आटोपून   घ्यायची म्हणजे मग आपले छंद, बाकी कामे करायला पुरेसा वेळ मिळतो ' नाहीतर पूर्ण दिवस कामातच जातो गं."
घर बघुन आम्ही सोफ्यावर येऊन बसलो. अंजु  म्हणाली तुला आश्चर्य वाटले ना , माझ्यातील बदल बघून.
 "हं  !" मी मान डोलावली. शाळेत असताना अबोल असणारी अंजु आता मात्र चांगलीच बोलकार झालेली दिसली.
  अंजुने सांगायला सुरवात केली माझे लग्न झाले  तेव्हा माझे यजमान  इंडियन नेव्हीत होते. पहिले पाच वर्ष मी सासूबाईं जवळच होते !त्यांच्  प्रत्येक  काम   व्यवस्थित  असायचं . खरकटी भांडी सुद्धा स्वच्छ घासायची की या भांड्याचा त्या भांड्याला पत्ता नव्हता लागत काय शिजवलं त्यात म्हणून ..अगदी नऊवारी साडी  सुध्दा त्या छान चोपून नेसायच्या! एकंदरीत त्यांचे राहणीमान आणि सगळ्यां गोष्टीतच त्यांच्या नीटनेटकेपणा होता.घातलेल्या सैलसर अंबाड्यावर एखादे फूल माळलेले असायचं  आणि मी ? तुला तर आठवतच असेल नं शाळेतली मी  कशी वेंधळी होते ते, कधी कधी माझा  वेंधळेपणा सासूबाईंच्या कामात आडकाठी बनू लागला.पण त्यांनी कधीच मला टोकलं नाही .अगदी मायेने मला समजावून , मला काही न बोलता त्या माझ्याकडून त्यांच्या पद्धतीने काम करून घ्यायच्या!
माझ्या  कामात लुडबूड नसायची!पण  "नजर" असायची. त्या नजरेच्या धाकाने मी लक्षपूर्वक काम करायला शिकले!
        ऐक दिवस " हे" सासूबाईंना सांगताना मी ऐकले, वेंधळीच आहे ग अंजु?
 ती गोष्ट माझ्या मनांला लागली आणि '  पत्नी ,सुन आणि आई ' म्हणुन  मला माझ्यावरच्या जवाबदारीची जाणीव झाली. मी स्वतःमध्ये  बदल करायचं ठरविलं. गुरू म्हणून  मनांत सासूबाईंना प्रणाम केला.  सासुबाईंच्या सकाळी दुधाचे पॅकेट कापण्या पासून ते रात्री गादी घालण्या पर्यंतच्या  सगळ्यां कामांचे निरीक्षण करू लागले! खरं तर  मुलींना उपजतच घरकामाचे बाळकडू मिळाललेे असते ,पण काहींना त्यात कौशल्य प्राप्त होते.सणवार असला की त्या अर्धी तयारीआदल्या दिवशीच करून ठेवायच्या. दुसऱ्यादिवशी सकाळी उठून पूजा अर्चा करून , सगळा पंचपक्वानाचा  स्वयंपाक  अकरा  पर्यंत आटोपून घेत. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा, बाकी तयारी करायला. सगळ्या गोष्टीची भारी हौस होती त्यांना. विणकाम ,भरतकाम ,रांगोळ्या, आणि  विविध कलेत त्या पारंगत होत्याच, वाचन  पण भरपूर असायचे.हळू हळू मी त्यांचे अनुकरण करायला शिकले.माझ्या सगळ्या हौस मौज त्यांनी पूर्ण केल्या.  त्यांना  कधी कोणाविषयी तक्रार  करताना बघितले नाही मी,  सदा  हसतमुख ! दैवी देणगीच असते  एकेकाला म्हणा. 
 ‌‌      मी ऐकदा सासुबाईंना  म्हटलं "तुम्ही इतक्या परफेक्ट कशा आहात हो ?"  तशा मंद स्मित करीत त्या मला म्हणाल्या,अगं अंजु या जीवनात  कुणीच परफेक्ट नसतं ग !मी हे एका दिवसात नाही न शिकले! आयुष्यात प्रत्येकाकडून काहीं  न काही  चांगले गुण घ्यायचा प्रयत्न केला . कधी नातेवाईकांकडून तर कधी,कथा कादंबरीतून . कधी एखाद्या छान सिनेमा मधूनही  आपण काही चांगल्या गोष्टी घेऊ शकतो! " राजहंस " फक्त मोत्याचेच  दाणे टिपतो, असे मी गोष्टीतून वाचले होते. त्याचा अर्थ  लक्षात  घेऊन  मी चांगले  गुण  आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला बसं.  मनुष्याने शेवट पर्यंत विद्यार्थीदशेतच राहुन  सतत काहीं तरी नवीन शिकण्यांचा व काहीं ज्ञान मिळवीण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'रिकामं मन सैतानाचे घरअसते'असे म्हणतात. विनाकारण नको ते विचार मनांमध्ये येत राहतात! माणसाने मुंगी सारखं सतत कार्यरत असलं पाहिजे. कोणाकडून काही अपेक्षा न करता आपलं घरं आपली माणसं जपता आली पाहिजे ,त्यातल्यात्यात "कुटूंब" उभे राहायला स्त्रीचा मोठा आधार असतो"
  सासुबाईंचे  विचार माझ्या मनांला पटले  आणि आम्ही एकमेकींच्या  कधी  मैत्रिणी झालो कळंलेच नाही.  
" त्या" गेल्या, पण त्यांची शिकवण अजूनही माझ्या मनात आहे "शिका ,शिका,आणि शिकतच रहा."  हे लेनिनचे  प्रसिद्ध वाक्य माझ्या वाचनात आले. अजूनही मी स्वतःला विद्यार्थिनी समजून प्रत्येकाकडून काहीतरी नवीन  शिकण्याचा प्रयत्न  करत असते.
  जगात चौसष्ट कला आहेत म्हणे ,स्त्रीला देवाने बऱ्याच कला बहाल केल्यात म्हणे. त्या कोणत्या प्रकारच्या आहेत माहीत नाही . पण आपल्या दैनंदिन जीवनातल्या  कला शिकायचं   चालू ठेवलं मी.
     माझी  सून, मुलगी ह्यांच्याकडूनही काही नवीन गोष्टी  मी शिकून घेते, मलां त्यात  काही कमीपणा वाटतं नाही. आधुनिक जगांच ज्ञानही हवंच की आपल्यांला. आता या वयांत भरपूर वेळ असतो, थोडा वेळ काढून , आपणंच आपल्यात  असलेल्या विविध कलागुणांना  सादर करायचे एखादा प्लॅटफॉर्म बघून. आयुष्यांत सर्वांना आपल्या मनांत  जोपासलेल्या कलेचा  विकास करायला  मिळतोच, असे नाही. लग्नानंतर तर एखादीलाच तशी संधी मिळते, बाकीच्यांच्या सर्व इच्छा "बकेट लिस्ट" बनूनच राहतात.
       या मैत्रिणी फेसबुकवरच्या समुहाच्या माध्यमातून मी जे मी सादर करते, ते फक्त आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी  करते.  खुप मैत्रिणी जमल्या आता, एकटेपणा तो जाणवतच नाही,  एकमेकीच्या सुखदुःखात सहभागी होऊन , एकमेकींना शब्दांनी आधार देत , ख्यालीखुशाली विचारत , कौतुक करण्यात आता वेळ जातो मानसिक ताण कमी होऊन समाधान मिळते, आणि आपलं मन आनंदी राहून प्रकृतीही चांगली रहाते. बऱ्याच वेळा तरूणपणी इगो मुळं मनांत दडलेलं "शल्य" शेअर करण्यासाठी या वयांत कुणीतरी"आपलं मन" जाणणारं लागतंच आणि " ते मन" फक्त आणि फक्त मैत्रीमध्ये गवसतं. 
       ती सांगत होती आणि इतके वर्ष विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकविणारी मी . तिचे ते सामान्य-ज्ञान मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.   मी  अंजुला म्हटले ,कविताही करतेसं, वाचंत असते मी तुझ्या कविता. तशी ती हसून म्हणाली, "आवडतांत माझ्या कविता तुला ? अगं, आपल्या विचारांना जरा शब्दात गुंफले की कविता तयार होते."
        " हं, हे घे !म्हणून तिने एक पाकीट माझ्या हातात दिले आणि म्हणाली,खास तुझ्यासाठी तयार केलीय मी कविता. पण घरी गेल्यावर वाचं" तिच्या चेहऱ्यावरचे प्रेम आणि शब्दांतला आपलेपणा बघून खूप काही हरविलेलं गवसलंआणि माझं मन भारावून गेलं.
         वेळं कसा गेला ते कळलेच नाही. बाहेर गाडी पार्क केल्याचा आवाज आला! तिचा मुलगा व सून  ऑफिसमधून आले  होते. अंजुने माझी  त्यांच्याशी ओळख करून दिली! मी म्हणाले,"अगं बराच वेळ झाला निघते मी आता. छान वाटले तुला भेटून !इथे जवळ पास  रिक्षा  मिळेल ना गं ?"  
        "अगं रिक्षा  कशाला मी येते न तुला सोडायला!" अंजु म्हणाली… आणि मुलाकडे वळून  म्हणाली,  "सुबोध, अरे ती  फोरव्हिलरची   चावी  दे  मला, मी मावशीला  तिच्या  घरापर्यंत  सोडून येते." मी स्तंभित होऊन तिच्याकडे बघितले.  अंजली हसून  म्हणाली, "अजूनही विश्वास नाही न माझ्यावर."
     मी  म्हणाले , "अगं आता ही संध्याकाळची गर्दीची वेळ असते एवढ्या ट्रॅफिक मधून गाडी चालविणे म्हणजे" 
तशी ती म्हणाली.." Don't worry ! अगं,घाबरतेस कशाला ‌? मी आहे न.  गर्दीतून आपला मार्ग आपणच शोधायचा असतो, मग  समोर वाट  दिसतेचं."  मी बघतंच राहिले तिच्याकडे! किती आत्मविश्वास भरला होता  तिच्या शब्दांत.
  माझा हात हातांत धरून ती म्हणाली, .आपली या वयांतील  मैत्री अशीच कायम राहील बघ आता!"  मी तिचा हात सोडवला आणि तिला घट्ट मिठीत घेतले !शालेय जीवनात मी दूर सारलेल्या मैत्रिणीने, आज माझ्या मनांत नव्हे, ह्रदयाच्या कप्प्यात स्थान पटकाविलं होतं.
अंजु म्हणाली "अगं या संध्याछायेच्या वाटेवर आपण तेल संपत आलेल्या पणतीतल्या ज्योती सारखे मिणमिणता प्रकाश देणारे आणि  तेल संपल की विझून जाणारे."
 मी सुचकपणे तिच्याकडे बघत म्हटलं.." होय गं! पण खरं सांगु आपण दिवाळीला ऐक पणती पेटवून त्याच  पणतीने बाकी पणत्या पेटवितो.. मग त्या प्रकाशाने अमावसेच्या रात्री सारा परीसर उजळुन निघतो. सगळ्या पणत्या विझल्या तरी एखादी पणती मिणमिणता प्रकाश देत राहाते आणि त्या मिणमिणत्या प्रकाशातही एखाद्याला आपला हरविलेला मार्ग गवसतो.." सराईतपणे कार चालवित अंजूने मला घरी आणुन  पोहचविले आणि ती परत निघाली.  तीची कार
 दिसेनाशी होईपर्यत मी हात हलवित राहिले. मनांत आले ईतके वर्षे मी ज्ञानार्जन केले पण देण्याबरोबरच काही घ्यायचेही असते हे मला जमलं नाही. पर्स मधून तिने दिलेला लिफाफा मी बाहेर काढला आणि त्यावर नजर फिरवू लागले.     
      जीवनाच्या या संध्या समयी
      दे माझीया हातात हात सखी…
       हसून जगूया मिळून जगूया
       उधळुया मैत्रीचे नवरंग नभी..।

(ज्योतिर्मयी)  (ज्योती विनोद अलोणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...