ऑनलाईन रमीबद्दल आजवर ऐकून होतो पण त्याचे भयानक परिणाम आणि त्यातून निर्माण झालेल्या आगीच्या ज्वाळा आता आपल्या सर्वाच्याच घरापर्यंत आल्यात असं वाटत आहे. नुकताच एका एफ बी फ्रेंडचा कॉल आलेला. तिच्या मुलाच्या काउन्सेलिंग बद्दल ! त्यांना म्हटलं दोघेही या भेटायला ! आई सांगत होत्या, कॉलेज संपवून नुकताच खाजगी जॉब करणारा तरुण मुलगा. पगारही बरा होता. सिंगल वूमन पॅरेंटिंग घर. आई नोकरीवर मुलगाही नोकरीवर ! जे काही बोलणं भेटणं तर थोडावेळ सकाळी अन थोडा वेळ रात्री. मात्र गेले काही दिवस झाले मुलगा गुमसुम आहे. धड बोलत नाहीय. शेवटी नाईलाजाने त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला. इतकं सांगून ती माउली थांबली. मला लक्षात आलं की तो मुलगा समोर आई असताना काहीही बोलणार नाही. त्यामुळे आईंना मी जरावेळ केबिन बाहेर जायला सांगितलं आणि मुलाला माझ्या पद्धतीने बोलते केले. त्याने जे सांगितलं ते खरेच भीषण होते.
मित्राच्या संगतीने याला ऑनलाईन रमी खेळण्याची सवय लागली. का ? तर पगार फार नाहीय तर जोड उत्पन्न होईल या आशेने तो खेळू लागला. सुरुवातीला त्याला दोन चार हजार रुपये मिळाले त्यामुळे उत्साह वाढला. पण मात्र नंतर त्यालाही त्यात कसा अडकत गेला कळलं नाही आणि विविध मित्रांकडून उसने पैसे घेऊन तो खेळू लागला आणि पाहता तब्बल दीड लाखाची उधारी झाली. आता हे कर्ज कसे फेडायचे ? कारण आईच्या पगारावर घर चालतेय प्लस दुचाकी आणि फ्लॅटचे हप्ते फेडले जात आहेत तेव्हा आई तरी कुठून मदत करेल असा विचार करत आणि या टेन्शनमध्ये तो जाऊन पार सुसाईड मोडवर गेलेला. सगळं ऐकून झाल्यावर त्याला पाणी दिलं. शांत केलं आणि आईला केबिनमध्ये बोलावून मी सर्व सांगितलं. आईने डोक्यालाच हात लावला. शेवटी मग माझ्या पद्धतीने मुलाला आणि आईला समजवून सांगून तसेच पुढील सहा महिन्यात आर्थिक नियोजन असे असे करा, म्हणजे मुलगा कर्जमुक्त होईल असं सांगून पाठवलं ! जाताना दोघेही समाधानी होते ! हुश्शह !
तर मंडळी तुम्हीही ऑनलाईन रमीबद्दल ऐकलं असेल आणि एखादी यात अडकलेल्याची बातमी देखील वाचली असेल. त्यावेळी तुम्ही मनाशी म्हणालाही असाल की, "काय हा वेडेपणा ? इतकं कस अडकत जावं ? भान कस राहत नाही ?" इत्यादी इत्यादी... पण मंडळी जसं "दारू कधी सुटते तर पहिला घोट घेण्याआधी" असं वाक्य आहे एकच प्याला नाटकात ! तसेच हे रमीचे आहे. कि कधी सुटेल तर "पहिल्यांदा" खेळायला लागण्याआधीच. तुमची मुलं खेळत नसतील तर चांगलेच आहे. पण किमान इतरांच्या संगतीने पुढील काळात खेळू नयेत म्हणून हि पोस्ट ! नेमकं होतं काय या ऑनलाईन रमी खेळात ?
तर सुरुवातीला रमीवाल्या लोकांकडून तुम्हाला खरोखर हजार दोन हजार रुपये जिंकून दिले देतात. मधेच पाचशे वगैरे रुपये हरवून ते काढून पण घेतात. असं उंदराला जसे मांजर खेळवतो..... खेळवतो आणि शेवटी मारतो तसे हे लोक करतात. पाच हजार द्यायचे, एक हजार परत घ्यायचे. पुन्हा चार द्यायचे, पाचशे घ्यायचे ! असं करत तुम्हाला हळूहळू त्यात गुंतवत नेवून एकदा का पंचवीस पन्नास हजारला तुम्हाला अडकवलं की त्यांचे काम सोपे होते. ते म्हणतात आता तुम्ही "प्रमोशन" होऊन वरच्या क्लास मध्ये एंट्री केलीय. इथं तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त दराने पैसे रिटर्न मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी पूर्वी सारखे हजार पाचशे रुपये तुम्हाला लावता येणार नाहीत तर दहा हजारच्या पटीत लावावे लागतील. आणि तिथंच तुम्ही मोहात पडता. कारण दहा लावले तर तासाभरात पंधरा रिटर्न मिळणार हे गाजर तुमच्यासमोर ठेवलेलं असत. आणि गंमत म्हणजे तिथेही पुन्हा त्यांचा तोच खेळ सुरु होतो. बरेच काढून घ्यायचे, मग थोडे द्यायचे, पुन्हा काढून घ्यायचे ! आणि मग पाहता पाहता तुम्हाला लाख, दोन लाख, चार लाख अशा मोठ्या रकमेने लुटलं जात. आणि त्यावेळी तुम्ही जागे होता. अन कळत की मोठ्या खड्ड्यात पडलोय. कुणाला सांगताही येत नाही आणि ज्यांच्याकडून उसने पैसे घेऊन रमी खेळली, ते लोक आता तुमची कॉलर धरायला पुढं येतात. शेवटी जगणं नकोसे होते आणि आत्महत्येचा विचारात तुम्ही जाता. पेण तालुक्यातील खरोशी गावच्या विश्वनाथ गावंड याचे उदाहरण सांगतो. सत्तेचाळीस लाखाचे पॅकेज असलेला इंजिनियर होता. रमीच्या व्यसनात अडकून थोडे थोडके नव्हे तर चार कोटीचे नुकसान झाल्याचे समजते. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचं समजत आहे. बायको, दोन मुलं आणि घर सगळं रस्त्यावर यायची वेळ आलीय. इतकं भीषण हे सगळं आहे.
त्यातूनही एखाद्याने पाच दहा लाख जिंकले असं दिसलं (तसे तर घडत नाहीच) पण समजा एखाद्या हुशार तरुणाने डोक्याने खेळून जिंकला तरी जेव्हा त्याच्या खात्यावर पैसे जमा होण्याची वेळ येते तेव्हा त्याला पैसे देण्याऐवजी थेट त्याचा नम्बर / त्याचा ईमेल सगळं सगळं ब्लॉक केलं जाते. मग आता या व्हर्च्युअल गेम मध्ये तुम्ही जाब विचारणार तरी कुणाला ? आणि पकडणार तरी कुणाला ? हाही विचार करा. अजून एक सांगतो.... रमीवर विश्वास बसावा म्हणून ते भामटे लोक काय करतात तर अधून मधून एखाद्याचा फोटो टाकून "याला एक कोटी मिळाले" असं जाहीर केलं जातं. ते पाहून तुम्ही ते खरं मानून गेम खेळायला अजून जोशात येता. पण मुळात तसे कुणीच एक कोटी जिंकलेले नसतात तर तो फोटोतला मुलगा हा त्या भामट्या गॅंगचाच माणूस असतो. यात सगळं आलं.
डॉ. डीडी क्लास : रमी जितकी वाईट आहे तितकेच त्या खेळाची "आओ राजा" म्हणत जाहिरात करणारे आपले सेलिब्रेटी अभिनेते देखील लाज आणत आहेत. जेव्हा त्यांची मुलेच अशा खेळात पैसे घालवून आत्महत्या करतील तेव्हाच त्यांचे डोळे उघडणार आहेत का ? कसल्या जाहिराती करताय रे बाबांनो ? पूर्ण पिढी बरबाद होतेय. त्याची तरी लाज ठेवा रे ! नाहीतर अनेक पालकांचे शिव्या शाप लागून मग तुमचा बाजार उठणं ओघाने येईलच ! ती वेळ आणू नका ! वेळीच सावध व्हा ! आता यावर काही लोक म्हणतील की, त्यांनी काहीही म्हणू दे जाहिरातीत, तुम्हाला कळत नाही का योग्य काय आणि अयोग्य काय ? तर त्यांना सांगतो.... अरे बाबानो, या हिरोला खरेतर हिरो म्हणूच नये. कारण असली हिरो तर सीमेवरचे जवान आहेत. हे पडद्यावरचे फार तर मनोरंजन करणारे बाहुले समजले पाहिजेत पण अनेक तरुण मंडळी अशा लोकांना हिरो मानून त्यांच्या मागोमाग जात असतात. म्हणून माझी विनंती आहे या जाहिरातीत झळकणार्या मंडळींना की, नका असं करू ! इतर अनेक चांगली माध्यम आहेत पैसे कमावण्यासाठी ! विचार करा ! आणि पालकांनो, तुम्हीहि जरा मुलासोबत नियमितपणे संवाद साधत राहा. तो काय करतोय जर लक्ष ठेवा. त्याच्या वागल्या बोलण्यात वेगळेपणा जाणवला तर लगेच सावध व्हा ! न जाणो मुलाला पहिल्याच ठेच लागल्यावेळी तुमच्या नजरेस आलं तर पुढचे धोके टळतील आणि आत्महत्या पण रोखल्या जातील. त्यापेक्षा प्रामाणिक कष्ट करून पैसे कमवण्याचे संस्कार मुलांवर करा. ऑफलाईन लॉटरी काय, जुगार काय किंवा हि ऑनलाईन रमी काय... यातल्या इझी मनीचे भूत त्यांच्या मानगुटीवरचे उतरवा ! धन्यवाद
©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि
Head member of Cyber Awareness Foundation, Maharashtra State
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा