आपला मृत्यू कुठल्या क्षणी होणार आहे, हे आपण जाणतो का? वाराणसी येथील एका विश्रामगृहाबद्दलची ही गोष्ट आहे, ज्या ठिकाणी लोकं मृत्यूसाठी राहायला येतात. त्याला काशी लाभ मुक्ती भवन असे म्हणतात. अनेक हिंदूंच्या मनात अशी धारणा रुजलेली आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपला शेवटचा श्वास काशीमध्ये घेतला, तर त्याला काशी लाभ (काशीचे पुण्यफळ) म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष मिळतो. या विश्रामगृहा बाबतची मनोरंजक गोष्ट ही आहे की तिथे राहून मृत्यू पावण्यासाठी प्रत्येकाला फक्त दोन आठवड्यांचाच अवधी मिळतो. त्यामुळे तेथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्याला आपल्या मृत्यूबद्दल खरोखरच खात्री असावी लागते. जर एखादी व्यक्ती दोन आठवड्यानंतरही जिवंत राहिली, तर त्याला ते विश्रामगृह सोडावे लागते! उत्सुकतेपोटी, मी वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला की ते लोक जीवनाकडून काय शिकले ज्यांनी मृत्यूचे सत्य केवळ स्वीकारलेच नव्हते तर घटिका लावून मृत्यूची प्रतीक्षा करत होते. मी त्या विश्रामगृहात दोन आठवडे व्यतीत केले आणि राहायला आलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या जीवनातील शिकवणी खरोखरीच विचार करायला लावणार्या होत्या. त्याच वातावरणात माझी भेट श्री भैरवनाथ शुक्ला यांच्याशी झाली. गेल्या 44 वर्षापासून ते मुक्ती भवनचे प्रबंधक आहेत. एवढ्या वर्षांमध्ये तिथे काम करता करता त्यांनी बारा हजाराहून जास्त मृत्यू बघितले आहेत.
मी त्यांना विचारले, "शुक्लाजी, तुम्ही जीवन आणि मृत्यू, दोन्हीही इतक्या जवळून बघितले आहेत, तर तुम्ही ह्या अनुभवापासून काय शिकलात?"
शुक्लाजींनी याबाबत जीवनातील बारा धडे माझ्या समोर सादर केले. परंतु या बारा धड्यांमध्ये, एक धडा ज्यामुळे ते अतिशय प्रभावित झाले होते, आणि ज्याने माझ्या अंतर्मनाला पण प्रभावित केले, तो जीवनाचा धडा म्हणजे - जाण्याआधी सगळे कलह मिटवून टाका.
त्यांनी मला त्यामागची एक गोष्ट सांगितली...
त्या काळी राम सागर मिश्रा नावाचे एक संस्कृत विद्वान होते. मिश्राजी सहा भावांमध्ये सगळ्यात मोठे होते आणि सर्वात धाकट्या भावाबरोबर त्यांचे सर्वात जास्त जिव्हाळ्याचे संबंध होते.
बऱ्याच वर्षांपूर्वी, एका मतभेदामुळे त्यांच्या छोट्या भावात आणि त्यांच्यामधे कटुता निर्माण झाली. या कारणामुळे त्या दोघांच्या घराचे विभाजन होऊन मध्ये भिंत घातली गेली!
त्यांच्या अंतिम समयी, मिश्राजी यांनी या विश्रामगृहात प्रवेश घेतला. त्यांनी त्यांच्यासाठी तीन नंबरची खोली आरक्षित करण्यास सांगितले, कारण त्यांना खात्री होती की तिथे आल्यापासून सोळाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू होणार आहे.
चौदाव्या दिवशी मिश्राजींनी, चाळीस वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या, आपल्या भावाला भेटण्याची तीव्र इच्छा प्रदर्शित केली. ते म्हणाले, "ह्या कटुतेमुळे माझं हृदय जड झाले आहे. जाण्याआधी मी सगळे कलह मिटवू इच्छितो.”
सोळाव्या दिवशी एक पत्र त्यांच्या भावाच्या नावाने पाठवले गेले, लवकरच त्यांचा छोटा भाऊ आला. मिश्राजींनी त्याचे हात पकडून दोन्ही घरांना वेगळी करणारी भिंत पाडण्यास सांगितले. त्यांनी आपल्या भावाची माफी मागितली.
दोन्ही भाऊ रडू लागले आणि अचानकच मिश्राजींनी बोलणे बंद केले. त्यांचा चेहरा शांत झाला आणि त्याचक्षणी त्यांची प्राणज्योत मालवली!
शुक्लाजींनी मला सांगितलं की, येथे येणाऱ्या बर्याचशा लोकांची हीच एक गोष्ट त्यांनी बरेच वेळा अनुभवली आहे. ते म्हणाले, "मी पाहिले आहे की, सगळी लोकं आयुष्यभर अशाच प्रकारचे अनावश्यक ओझे वाहात असतात आणि आपल्या यात्रेच्या अंतिम टप्प्यात ते उतरवून टाकू इच्छितात!"
ते म्हणाले, वास्तविक पाहता असं कधीच होऊ शकत नाही की, तुमचे कुणाबरोबर वादच होणार नाहीत. परंतु त्यातील क्लुप्ती ही आहे की,कटुता निर्माण झाल्यावर लगेच त्याचं निराकरण केलं पाहिजे. कोणाशी शत्रुत्व, कुणावर राग किंवा कुणाबद्दल शंकाकुशंका असतील तर, त्या मनात ठेवून झोपी जाऊ नये. त्यांना लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करावा. कारण सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे, की आज आपण जिवंत आहोत, पण वाईट गोष्ट ही आहे की, किती काळ आपण जिवंत राहणार आहोत, हे कुणालाच माहित नाही!
त्यामुळे, काहीही झाले तरी आपापसातील भांडणं आजच मिटवा. कारण उद्याचं आश्वासन या दुनियेत कोणालाही दिले गेलेले नाही!
विचार करा... असे काही आहे का किंवा असे कोणी आहे का, की आपल्याकडे वेळ असेपर्यंत त्याच्या बरोबरचे आपले वाद आपण मिटवू इच्छितो ?
♾
"जेव्हा आपल्याला कोणाकडून कटू अनुभव येतात, तेव्हा त्यांना क्षमा केल्यावरच आपले भावनात्मक ओझे दूर होईल."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा