सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

462. पिकलेल प्रेम...

 कधीही सगळयांसमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा,  आजीच्या हातदुखीचं आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात.
आणि आजीही उठल्या उठल्या  "यांना" चहा लागतो असं म्हणत, दुखर्‍या हातानेच चहा टाकते.
आबांनी जेवणात लोणचं मागितल की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीचं गोडलिबांचंच लोणचं घालते.
एरवी दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे" हे न सांगता "आणि एक पोळी वाढ ग" म्हणून पसंतीची पोचपावती देतात, अन् टम्म फुगलेली पोळी वाढताना, आजी  हळूच लाजते.
बाहेरून येताना पालकाच्या जुडी खाली एक मोगर्‍याची माळ लपलेली असते, अन् " केस कुठे उरलेत आता" असं म्हणत त्या विरळ झालेल्या आंबाड्याचं वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत माळून, वाढवत असते.
आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आबा आजही चोरून ऐकतात, अन आबांनी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतून डोकावताना दिसतं.
आजही आजोबांचे मित्र आले की,  आजी आत जाते आणि न सांगता, भजीची बशी सगळ्यांसमोर येते.
भाजी आणायला जेंव्हा आजी आजोबा बागेजवळच्या मंडईत जातात, तेंव्हा येतांना कधी कधी मातीचे छप्पे धोतरावर  घेऊन येतात.
भांडण झालं दोघांच्यात, की घरी  दुधीची भाजी बनते, पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते.  कधीतरी आबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन्  तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते, आणि कपाटातल्या राजेश खन्नाच्या फोटो वरची धूळ पुसते.
दिवाळीला ओवाळतांना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात.
आजी आजारी पडली की मात्र , आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते.
आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही, मग ती झोपली, की आजोबा हळूच तिचे पाय चेपतात अन् आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगळत उशीला भेटतात.
पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही अन्  बरणीला पण, लोणच्याशिवाय अजिबात करमत नाही.
लेखक: अज्ञात...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...