रस्त्याने चालतना कोणीतरी कट मारला म्हणून होणारी भांडणं आपण दररोज पाहतो. याच भांडणाचं पर्यावसान एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत झाल्याच्या बातम्याही वाचतो. एखादा तुम्हाला कट मारतो आणि तुम्ही त्याच्याशी वाद घालायला सुरूवात करता. वास्तविक जो विनाकारण कट मारतो, तो मूर्खच असला पाहिजे. जो मूळातच मूर्ख आहे ,याची कल्पना असतानाही तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालून इज्जत खराब करून घेत असाल, तर तुम्ही शतमूर्ख ठराल. मूर्खाशी गाठ पडल्यावर शहाण्या माणसाने मौन धारण केलं पाहिजे, असं आर्य चाणक्य म्हणतात. याऊलट तुम्ही मूर्खाला मूर्ख सिध्द करण्याची खटपट करीत बसता.
*उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।पयःपानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम् ।।
* मूर्खाला उपदेश करायला जाल, तर तो अजूनच बिथरतो. सापाला पाजलेल्या दूधाचं विषच बनणार. मानवी जीवन रस्त्यासारखंच आहे. या प्रवासात अनंत प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला भेटतील. त्यातल्या कोणाशी कसं वागावं, याचं मार्गदर्शन आपल्या शास्त्रकारांनी अत्यंत सुंदरपणे करून ठेवलेलं आहे.
*लुब्धमर्थेन गृह्लीयात् स्तब्धमज्जलिकर्मणा। मूर्ख: छन्दो वृत्तेन यथार्थत्वेन पण्डितम्।।
* लोभ्याला धन देऊन खूश करावं. अहंकार्याला नम्रतेने प्रसन्न करावं. मूर्खाला मोठेपणा द्यावा. विद्वान मात्र सत्याने जिंकावा. जीवनाची वाट चालताना तुमच्या पायत पाय घालणारी मंडळी पावलोपावली भेटतातच. प्रत्येकाला डोकं लावायला जाल, तर तुमचा मार्गच खुंटेल. तुमची उंची कमी होईल. बुटक्याशी वाद घालायचा झाला, तर तुम्हालाच वाकून बोलावं लागेल. तो मात्र ताठ मानेने बोलणार. भुंकणार्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारायचा ठरवलं, तर आयुष्यभर दगडच जमा करीत बसावं लागेल. त्यापेक्षा दुर्लक्ष करा आणि पुढे चला. जीवनाच्या प्रवासाचा कालावधी मर्यादित आहे. यमदूत दारात आल्यावर प्रश्न पडतो, 'अरे इतक्या लवकर कसं संपलं आपलं आयुष्य?' मर्यादित आयुष्याचं सोनं करायचं असेल, तर संत साहित्याचा परीसाचा स्पर्श तुमच्या जीवनाला व्हावा लागेल. जीवनात अनेक प्रश्न असे असतात, त्यांना सोडून देणं हेच उत्तर असतं. कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे, याचा विवेक जागा असायला हवा. बर्याच वेळा जे भांडून साध्य होत नाही, ते क्षमेने साध्य होतं. जो क्षमाशील असतो त्याच्यासमोर दुष्ट पराजित होतो. गवत नसले की, वणवाही आपोआप विझतो. माऊली म्हणतात,
क्षमा शस्त्र जया नराचिया हाती। दुष्ट तयाप्रति काय करी।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा