बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

466. पाठ थोपटणाऱ्या माणसांची गर्दी वाढली, की...

 वडील : कुठे आहेस बाळा?
मुलगी : ऑफिसमध्ये.  
वडील : ओके. 
मुलगी : काय झालं पप्पा?
वडील : सहजच कॉल केला. 
मुलगी : नक्की ना?
वडील : का बरं? 
मुलगी : आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला बाळा म्हणालात ना, म्हणून.. 
वडील : नाही आवडलं?
मुलगी : आवडलं. 
वडील : बोलता येईल ना?
मुलगी : हो. 
वडील : तुझे सर रागावणार तर..
मुलगी : नाही रागावणार. 
वडील : म्हणूनच आधी विचारलं. 
मुलगी : पप्पा लग्नाच्या टॉपिकवर काही बोलायचंय का? 
वडील : नाही.  
मुलगी : मग कशाबद्दल?
वडील : तुझ्या रिल्सबद्दल.  
मुलगी : तुम्ही त्यादिवशी रागावल्यापासून, मी एकही रील नाही बनवलं.  
वडील : ऐक तर.. 
मुलगी : काय?
वडील : परवा ऑफिसवरून घरी येत होतो.  
मुलगी : मग?
वडील : तेव्हा लोकलमध्ये..  
मुलगी : कुणी काही बोललं का?
वडील : माझ्या वयाचे एक गृहस्थ..   
मुलगी : त्यांचं काय?
वडील : ते तुझं रील बघत होते. 
मुलगी : कोणतं रील? 
वडील : तू लग्नाची चौकशी करणाऱ्या काकुंवर बनवलेलं. 
मुलगी : मग?
वडील : ते पाहताना ते अचानक खूप जोरात हसले. 
मुलगी : विनोदी आहे ना ते रील.  
वडील : हो. 
मुलगी : पुढे?
वडील : मी त्यांच्याकडे चौकशी केली. 
मुलगी : कशाबद्दल?
वडील : हेच तुझ्या रीलबद्दल.  
मुलगी : मग?
वडील : तर ते म्हणाले की, आमचं सगळं कुटुंब या पोरीचं फॅन आहे.    
मुलगी : काय?
वडील : हो. ते सगळे तुला फॉलो करतात. 
मुलगी : खरं सांगताय?
वडील : अगं, खरी गंमत तर पुढे झाली. 
मुलगी : म्हणजे?
वडील : मी जेव्हा त्यांना सांगितलं की, तू माझी मुलगी आहे..  
मुलगी : मग?
वडील : त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत सेल्फी काढला आणि व्हिडीओ कॉल लावला.  
मुलगी : कुणाला?
वडील : त्यांच्या घरी. 
मुलगी : वॉव!
वडील : तेव्हा माझी छाती अभिमानाने फुगली पोरी.. 
मुलगी : पप्पा. 
वडील : दहावीला कमी मार्क मिळाले म्हणून मी तुला मारलेलं. 
मुलगी : हो.  
वडील : बारावीला नापास झालीस, तेव्हा तुला उपाशी झोपवलं.     
मुलगी : पप्पा मी अभ्यास करायचे, मात्र..   
वडील : मात्र? 
मुलगी : मात्र प्रश्नपत्रिका पाहिली की, काहीच आठवायचं नाही.
वडील : मला आज कळतंय बेटा.  
मुलगी : काय?
वडील : सगळेच पोलीस झाले, तर मग कुणीतरी चोर व्हायला पाहिजे.  
मुलगी : पप्पा ठेवा फोन. 
वडील : मस्करी करतोय पोरे.  
मुलगी : अशी मस्करी?
©️अक्षय भिंगारदिवे
वडील : बरं एक सांग?
मुलगी : काय?
वडील : 150K म्हणजे किती?
मुलगी : दीड लाख.    
वडील : म्हणजे दीड लाख लोक तुला फॉलो करतात? 
मुलगी : हो.   
वडील : आम्हाला कधी सांगितलं का नाही?
मुलगी : पप्पा भीती वाटायची. 
वडील : कसली?
मुलगी : तुम्हाला हे रील वगैरे बनवणं आवडत नाही.  
वडील : अगं पण मला थोडीच माहिती होतं.  
मुलगी : काय?
वडील : तू एवढा छान अभिनय करते.  
मुलगी : लहानपणापासून मला सिनेमातील हिरॉईनच बनायचं होतं.   
वडील : मग?
मुलगी : कधी सांगायचं धाडसच झालं नाही. 
वडील : का?
मुलगी : कारण ताईला आणि दादाला कायम चांगले मार्क मिळायचे.   
वडील : मग?
मुलगी : आणि मी मंद प्रत्येक परीक्षेत कशीबशी काठावर पास व्हायचे. 
वडील : त्यात काय मग?
मुलगी : म्हणून मनात न्यूनगंड..  
वडील : तुझ्या आजोबांना जाऊन किती वर्षे झाली? 
मुलगी : ९ वर्षे.  
वडील : माझं वय किती आहे?
मुलगी : ५८ वर्षे.  
वडील : माझा बाप आणि तुझा बाप, अगदी सामान्य आयुष्य जगले.    
मुलगी : पप्पा.  
वडील : थांब, बोलू दे. 
मुलगी : नको. 
वडील : आमच्या काळात जेव्हा लोक राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचा ऑटोग्राफ घ्यायचे, तेव्हा..    
मुलगी : तेव्हा काय?
वडील : तेव्हा मलाही मनातल्या मनात वाटायचं..  
मुलगी : काय?
वडील : आपलेही फॅन्स असावेत आणि त्यांनीही आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करावी. 
मुलगी : मग?
वडील : ते स्वप्न, कायमच स्वप्न राहिलं.  
मुलगी : पप्पा.. 
वडील : आज मात्र तुझ्यामुळे मीही काही क्षण सेलिब्रिटी असण्याचा अनुभव घेतला. 
मुलगी : पप्पा तुम्हीही कलाकार आहात. तुमचा तो विनोदी स्वभावच माझ्यात आलाय.     
वडील : परवा तुझ्या आईशी बोलत होतो, तेव्हाही ती हेच म्हणाली.   
मुलगी : काय?
वडील : नाटकी बापाची, नाटकी पोर. 
मुलगी : आईपण ना..  
वडील : तुझी आई दहावी आणि मी बारावी शिकलेलो. 
मुलगी : हो. 
वडील : आम्ही तर त्या फेसबुक अन् इंस्टाचं कधी तोंडही नाही पाहिलं. 
मुलगी : तुमची सोशल मीडिया अकाऊंटही नाहीत.     
वडील : म्हणूनच तर बोलताना तिला खूप भरून आलेलं पोरी. 
मुलगी : का?
वडील : कारण कायमच आम्ही तुला झिडकारलं आणि कमी लेखलं.
मुलगी : जाऊ द्या ना पप्पा.  
वडील : तिला जेव्हा मी दीड लाख फॉलोअर्सचा आकडा दाखवला..  
मुलगी : काय झालं?
वडील : डोळे डबडबले तुझ्या आईचे. 
मुलगी : माझेही. 
वडील : ज्या पोरीला आम्ही खोटं नाणं समजायचो, तिनेच..    
मुलगी : तिनेच काय?
वडील : स्वतःच्या प्रतिभेने आमचे डोळे दिपवले.  
मुलगी : रडवलंत पप्पा.  
वडील : नोकरी नव्हती करत म्हणून, तुझी आई तुला झापायची ना?
मुलगी : हो.. 
वडील : काय म्हणालेली?
मुलगी : किमान १० हजार रुपये तरी महिन्याला कमवून आण.   
वडील : म्हणजे वर्षाचे १ लाख २० हजार रुपये. 
मुलगी : हो. 
वडील : आता पगार किती आहे तुला?
मुलगी : ९ हजार रुपये. 
वडील : तुला आठवतंय? 
मुलगी : काय?
वडील : तुझ्या लग्नासाठी मी एफडी केलेली?
मुलगी : हो. 
वडील : ती आज मी मोडली. 
मुलगी : का?
वडील : तुझ्या अकाउंटवर त्यातलेच १ लाख रुपये डिपॉजिट केले आहेत.  
मुलगी : का?
वडील : आता दर महिन्याला तुझ्या आईला त्यातले १० हजार रुपये आणून द्यायचे. 
मुलगी : म्हणजे?
वडील : आजपासून नोकरी सोड आणि वर्षभर तुला जेवढे रिल्स बनवायचे तेवढे बनव. 
मुलगी : खरं? 
वडील : हो. पुढचं पूर्ण वर्ष अगदी मनमर्जीने जग.   
मुलगी : लग्न?
वडील : लग्न त्यानंतर... 
मुलगी : पप्पा का?
वडील : जे तुझ्या बापाला शक्य नाही झालं, ते मिळवून दाखव बेटा.   
मुलगी : म्हणजे?
वडील : माझी अपूर्ण राहिलेली स्वप्नं, आता तुला पूर्ण करायची आहेत. 
मुलगी : कोणती स्वप्नं?
वडील : आयुष्यात मला तो दिवस पाहायचा आहे.    
मुलगी : कोणता?
वडील : ज्यादिवशी लोक मला तुझ्या नावाने ओळखतील.  
मुलगी : नक्कीच पप्पा. 
वडील : लढ बाप्पू! 
मुलगी : पण आपले नातेवाईक आणि शेजारी?
वडील : त्यांचं काय?
मुलगी : त्यांना तर माझं रील बनवणं आवडत नाही. ते तुम्हाला टोमणे मारतील.   
वडील : मारू दे टोमणे. 
मुलगी : तुमचा अपमान झालेला मला नाही आवडणार.   
वडील : पोरी एक गोष्ट कधीच विसरू नको. 
मुलगी : कोणती?
वडील : जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत असता, तोपर्यंतच लोक तुमच्यावर टीका करतात. 
मुलगी : म्हणजे?
वडील : म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाही.   
मुलगी : सहमत. 
वडील : आणि एक कायम लक्षात ठेव.  
मुलगी : काय?
वडील : टीकाकारांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा, स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत रहा.   
मुलगी : नक्कीच पप्पा. 
वडील : कारण..   
मुलगी : कारण काय?
वडील : कारण पाठ थोपटणाऱ्या माणसांची गर्दी वाढली, की पाय खेचणारे आपोआप दूर होतात. 
मुलगी : ज्जे बात!
©️अक्षय भिंगारदिवे,
८ ऑगस्ट २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...