आज केसांत माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध नाही तर अभिमान सर्वत्र दरवळत होता.
गाडी चालवताना त्याच दरवळीच्या विचारांसोबत युक्ता मागे भूतकाळात गेली..
.....सहा-सात वर्षांपूर्वी एका शिक्षिकेच्या तीन महिन्यांच्या मेडिकल रजेमुळे नववी 'अ' चा वर्ग तिच्याकडे आला होता. तशी ती ज्युनिअर कॉलेजची अध्यापिका, पण शालेय कामकाज आणि शैक्षणिक गोष्टी गरजेनुसार सर्वसमावेशक असतात. असे मानून तिने ज्यादा भार सांभाळला होता.
नुकतीच परीक्षा संपल्याने पेपरचे गठ्ठे तपासत कॉम्प्युटर लॅबमध्येr बरेच शिक्षकवृंद बसले होते. आपापल्या टेबलावर भरगच्च गठ्ठ्यांत गढून गेलेले प्रत्येकजण, उरक कामं उरकण्यासाठी धडपडत होते.
युक्ता शांतपणे चिमुकल्यांच्या दुनियेत हरवायची. छोट्यांचं जगच अदभुत!
कुतूहल, दंगा, गोंगाट, सर्वमान्य मारामारी-भांडण, एकत्र डबा खाणं आणि जाताना पुन्हा खांद्यावर हात टाकून मस्तीत ‘मैतर’ होऊन जाणं... दुनियेच्या हर तऱ्हेच्या गहन, संभ्रामक, विचारांच्या पलीकडल्या निरागस दुनियेचा युक्ता मनमुराद आस्वाद घ्यायची. शिक्षकी पेशा शिक्षकाला खूप खूप काही दररोज नवीन शिकवतो. महिनाअखेरच्या पगारापेक्षा अनंतकाळ टिकणारी, जगणं शिकवणारी ही मानाची संपत्ती असते.
युक्ता पेपर तपासत होती आणि त्यामध्ये एक पेपर पेन्सिलीने लिहिलेला होता. आवर्जुन लक्ष गेले तिचे, पेपर मधील उत्तरे अचूक आणि धारदार होती. पैकीच्या पैकी गुण मिळवणारा हा नग कोण असावा? आणि पेपर पेन्सिलने का लिहिला असावा ? नाव व नंबर पाहून त्या मुलाला शिपाईकाकांना सांगून वर्गातून बोलावून घेतले.
थोड्याच वेळात तिच्या समोर सावळा, उंच, मध्यम बांध्याचा, सरळ नाक, टपोरे तपकिरी डोळे असलेला, अंगात टापटीप, सुरकुतलेला पण स्वच्छ गणवेश यातला एक मुलगा मागे हात टांगून घाबरलेल्या चेहऱ्याने उभा होता. तिच्या हातात पेन्सिलने लिहिलेला त्याचा पेपर पाहून थोडा बिचकला. आता मॅडम रागवणार! शिक्षा करणार! असं काहीतरी तो विचार करत असावा.
तिने विचारलेच, "तुला माहिती आहे तू काय केलं आहेस ?"
तो नुसतीच मान हलवून हो म्हणाला.
"तुला पैकीच्या पैकी गुण आहेत वर्गात तू या विषयांमध्ये पहिला आला आहेस."
तो पुन्हा नुकताच मानेने हो म्हणाला.
पेन्सिलने पेपर लिहिला म्हणून मॅडम रागवतील अशाच काही प्रश्नांमध्ये अडकलेला-- तिने तोच प्रश्न त्याला विचारला, "पेपर पेन्सिलने का लिहिला ?"
थोडा संकोचून हळू आवाजात म्हणाला, "मॅडम, माझ्याकडे पेन नाही." आम्हाला विद्यार्थ्यांच्या अशा कारणांची सवय झाली होती पण आज या कारणामध्ये खरेपणा जाणवला, त्याच्या आवाजात आणि डोळ्यांतही.....
"आता कशाने लिहितोस?"
"पेन्सिलने." तेवढेच उत्तर.
"जा, ती पेन्सिल घेऊन ये."
तो दारापर्यंत गेला. थोडं थांबून वळून तिच्याकडे पाहून तो पळत गेला. ती पुन्हा पेपर चाळू लागली.
थोड्या वेळाने तो आला. पेपर पाहिला तेव्हा त्याच्या बोटांची करामत त्याच्या हातांतून कळली होती. बोथट झालेल्या पेन्सिलने सुद्धा इतकं वळणदार सुंदर, सुबक आणि स्वच्छ अक्षर काढता येऊ शकतं!
खाडाखोड नव्हती आणि प्रत्येक उत्तर अचूकच होतं.
त्याने युक्ताकडे पेन्सिल दिली. अडीच-तीन इंचाची पेन्सिल, तिच्या हातात होती; आणि 'आता मी कशाने लिहू?' असं काहीतरी प्रश्न घेऊन गोंधळलेल्या चेहऱ्याने तो समोर उभा होता.
तेवढ्यात शिपाई काका आले थोड्या वेळापूर्वी त्याला वर्गात पेन्सिल आणायला पाठवून शिपाई काकांकडे तिने पैसे देऊन एक कंपास बॉक्स आणि दोन पेन आणायला सांगितले होते. त्या वस्तू घेऊन ते आले होते.
वस्तू ठेवून ते निघून गेले.
"हे नवीन कंपास बॉक्स आणि दोन पेन तुझ्यासाठी, घे " ती म्हणाली.
तो मागे हात टांगून नुसताच उभा होता.
एरवी कोणाला असं काही विद्यार्थिदशेत मिळालं असतं तर उड्या मारल्या असत्या पण हा तरीही उभाच होता. शांत चेहऱ्याने.. फक्त त्याच्या मनात चाललेली चलबिचल डोळ्यांतून दिसत होती.
माणसाचे डोळे कधी कधीच खोटे बोलत नाहीत. आणि इतक्या वर्षांच्या शिक्षकी अनुभवाने तिला विद्यार्थी डोळ्यांतून वाचायला नक्कीच शिकवले होते.
"मॅडम, याचे किती पैसे द्यायचे?"
"अरे हे तुझ्यासाठी आणले आहे याचे पैसे नकोत."
"फुकट मला काही नको, माझी पेन्सिल मला परत द्या."
आता तिला राग यायला हवा होता पण नाही आला. थोड्यावेळापूर्वी त्याच्याकडून त्याची पेन्सिल मागवली तेंव्हा जाताना त्याने मागे वळून पाहीले त्याचा अर्थ आता तिला कळाला होता. स्वाभिमानी होता तो.
युक्ताला त्याचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता.
" ठीक आहे, हि पेन्सील मला दे. त्या बदल्यात हे सर्व घेऊन जा."
"मी त्याचे पैसे दररोज एक-एक रुपया देऊन पूर्ण करू का?"
आता तिची सटकली होती! पण मनातून आनंद आणि अभिमान वाटत होता. हा काही ऐकणार नाही आणि तिला त्या चिमुकल्याचं स्वाभिमानी मन मोडावंसं वाटेना. "बरं जा." म्हटल्याबरोबर तो त्या वस्तू घेऊन पळत सुटला.
बऱ्याच वर्षांतून तिच्यासारखा स्वाभिमानी तिला कोणी भेटला होता.
गुरू-शिष्याचं स्वाभिमानी नातं असं तयार झालं.
त्या दिवसापासून पैसे पूर्ण होईपर्यंत एक-एक रुपया येऊन तो दररोज युक्ताकडे देत होता. न चुकता.
युक्ताने त्या स्वाभिमानी फंटरची माहिती काढली. त्याचे आई-वडील पूर्वी नर्सरीची राखण करत होते. दररोज फुलझाडांची निगराणी करणे, खत-पाणी घालणे, अनावश्यक छाटणी करणे, फुले तोडून ती मार्केटला पोहोचविणे इत्यादी कामे आवडीने करत असत. तेंव्हा तो मुलगा पाच वर्षांचा असेल फुलांची, रोपांची गाडी मार्केटकडे घेऊन जाताना रस्त्यात अपघात होऊन त्यामध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याची आई त्याला घेऊन मामाच्या घराजवळ खोली घेऊन राहत होती. इतरांच्या घरी जाऊन आई घरकाम करत होती.
हा दहा-बारा वर्षांचा असल्यापासूनच कष्टाळू आणि जाणीव ठेवणारा होता. सकाळी सायकलवर जाऊन पेपर वाटायचा. शाळा सुटल्यानंतर वाण्याच्या दुकानात कामाला जायचा. आईला मदत करायचा.
त्यानं खूप शिकावं हे स्वप्न बाळगून आई खूप कष्ट करत होती. आता अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून आईने वाण्याच्या दुकानातील नोकरी सोडायला लावली.
तो गप्प बसणारा नव्हताच. आता तो सकाळी मार्केटमधून फुले आणून घरी द्यायचा. आई गजरे बनवायची आणि शाळा सुटल्यानंतर सिग्नल चौकांमध्ये संध्याकाळपासून रात्री साडे नऊ पर्यंत गजरे विकायचा.
फुलझाडांना जोपासून फुलांच्या सुगंधाने दुनियेला सुगंधी दरवळीचा आनंद देणारे त्याचे बाबा फुलांच्या साक्षीने त्याच्यासोबत असतात असा त्याचा बालसमज होता.
बुद्धिवंताला परिस्थितीचा शाप असतो म्हणतात.
खरे आहे!!
ह्या गोष्टीला सात वर्षें होऊन गेली. आज सिग्नलला युक्ताने गाडी थांबली तेव्हा चेहरा पूर्ण बांधलेला असूनही त्याने तिला ओळखलं. पळत पळत आला आणि दोन गजरे पुढे करून, "मॅडम, तुमच्या साठी." म्हणाला. तिने पर्समधील पैसे काढले त्याने पुन्हा दोन्ही हात मागे केले. ती हसली तो ही हसला. मागची आठवण तरळून गेली..
एम. कॉम. करतो आहे आणि एका सहकारी बँकेमध्ये जॉब करत असल्याचं त्यानं सांगितलं.
त्याने पैसे घेतले आणि म्हणाला, "मॅडम, ही वीसची नोट मी जपून ठेवीन. तुम्ही माझी पेन्सिल अजूनही जपून ठेवलीत तशी.."
..आणि हसत हसत गर्दीत निघून गेला.
डोळ्यात विद्यार्थी वाचणारी ती आज तिच्याच एका विद्यार्थ्याने तिच्यातील आर्द्र, हळवं मन वाचलं होतं.
तिच्याच एका विद्यार्थ्याने तिच्यातील गुरुपण वाचलं होतं.
चिमुकल्या मुठीत छोटीशी पेन्सिल घट्ट धरणाऱ्या हातातला हा गजरा आज तिला स्वाभिमानाची साक्ष देत होता, जाणीवेची भाषा बोलत होता. बोथट परिस्थितीच्या पेन्सिलीला स्वावलंबनाची आणि स्वाभिमानाची आत्मविश्वासू धार आलेली दिसत होती...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा