शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

473. धार्मीक कार्ये - गुरुजी , दक्षिणा आणि दान

          श्रावण, भाद्रपद अश्विन हे महिने हा हिंदु समाजात सणवार, धार्मिक कार्ये,  व्रते, वैकल्ये यांचा महिने मानले जातात. यज्ञ याग व व्रते  हे धर्माचा पाया असल्याने , चातुर्मासातील व्रते व उद्यापने यामुळे घराघरामध्ये मंगलतोरणे, आंब्याच्या पानाचे डहाळे , दरासमोर रांगोळया, धूप आगरबत्तीचा सुवास, ग्रामीण भागात गायीच्या शेणाने सारवणे, मंगलमय संगीत. देवाची गाणी  व सत्यनारायण, अभिषेक , पुजा, व्रते, श्रावणी सोमवारचे शिवपूजन या मुळे एकुणच सर्व वातावरण आनंददायी व उत्साही असते. याकाळात गुरुजीवर्गास धावपळ करावी लागते.  आज काल हे सर्व विधी करणारे गुरुजीही मिळणेही दुर्मिळ झाले आहे. अनेक कुटुंबात परंपरेनुसार अनेक रुढी परंपराचे पालन या महिन्यात केले जाते. कुळधर्म आणि कुळाचार सोबत श्रावण महिन्यातील या विधी साठी गुरुजी आपणांस सामानांची यादी देतात. दर वर्षी आपण सर्व विधी करीत असलो तरी गुरुजींकडून यादी घेतल्या शिवाय समाधान होत नाही.  तो ही एक विधीचाच भाग झाला आहे. आजकाल सर्वकाही गुरुजींवर सोपवले जाते. आगदी सत्यनारायणांच्या प्रसादापासून, घरातील जेवणा पर्यत सर्व काही बाहेरुन मागवले जाते. त्यामुळे त्यातील एक आनंद काही प्रमाणात कमी झाला आहे. पण वेळे अभावी  व जागे अभावी सर्वच गोष्टी घरात करणे आता शक्य नाही.हे सर्व फक्त परंपरा म्हणून करतो आहोत  कि शास्त्र म्हणून याचा विचार कोणी हल्ली करत नाही. या साठी जी  काही "दक्षिणा" दिली जाते ती देताना यजमान कोणत्या विचाराने ती देतो हे त्यालाही माहिती नसते. त्यामुळेच हळूहळू  काही धार्मिक प्रथा कमी होऊ लागल्या आहेत. त्यातुन काही स्वत:ला आधुनिक समजणारे धार्मिकतेचा  त्याग केलेले  गुरुजींची टिंगल करताना दिसतात.  त्याच्या दृष्टीने हा लोकांच्या भिक्षेवर जगणारा आयते खाणारा समाज आहे.  ते तशी बदनामी व  प्रसार सतत करताना दिसतात. पौरोहित्य करणाऱ्या वर्गासाठी "भिक्षुक" हा शब्द  वापरणे व ती  कार्ये करणे म्हणजे ' भिक्षुकी करणे ' हे म्हणणे हेही एका अर्थाने चुकीचे आहे  त्याचा खरा अर्थ सर्वानी समजून घेतला पाहिजे.
        भिक्षा, दान, आणि दक्षिणा याच्या अर्थामध्ये फरक आहे.  परंतु अनेक लोक ते शब्द समान अर्थाने वापरतात. दान - दक्षिणा हा शब्द एकत्रीत उच्चारला जात असला तरी त्याच्या हेतूमध्ये मूलभूत फरक आहे. हा फरक लक्षात येत नसल्याने आज समाजातील काही वर्ग ब्राहमणवर्गासाठी विशेषता पौरोहित्या कर्म करणाऱ्या वर्गाचा  उल्लेख सरसकट "भिक्षूक" असा केला जातो. भिक्षूक  या शब्दाचा शब्दश: अर्थ  "भिक्षेवर जगणारा "  असा आहे.पौरोहित्यकर्म करणे म्हणजे भिक्षा मागणे नाही.  हे धर्माचे कार्य आहे त्यामुळे दान आणि दक्षिणा यातील फरक लोकांना समजून सांगितला पाहिजे. पौरोहित्य कर्म करणाऱ्यांनी स्वत:ला "मी भिक्षुकी करतो" असे म्हणून घेवु नये तर मी पौरोहित्य कर्म करतो असे म्हणावे. शब्दाशब्दातील हा फरक समजविण्यासाठी या मुळ संस्कृत शब्दांचा अर्थ मुळापासून समजून घ्यावा लागेल. त्यातील काही उदारणे पाहू
        याचक -  या शब्दाची व्याख्या "अमरकोष" या ग्रंथात  "वीनयको याचनको मार्गणे याचकार्थिनौ "  याचा अर्थ  वाईट काळात , पडत्या काळात ,  अमिशस्ति म्हणजे विपत्तीच्या काळात प्रार्थना / याचना करुन मदत मागणारी व्यक्ती याचना ही मदत मागण्याच्या अपेक्षेने केलेली असते.  साधारणपणे भक्त देवाकडे संकटकाळात सोडविण्यासाठी याचना करतो. तसेच समाज व्यवस्थेत राजा, प्रमुख प्रतिष्ठीत व्यक्ती जे मदत करण्यास  सक्षम असतात अशा लोकांकडेच अशी मदत मागितली जाते. ही मदत कोणी सुध्दा मागू शकतो त्यास जातीचा संबंध नसतो
        भिक्षा - व भिक्षूक : सरसकट ब्राहृमण वर्गास  भिक्षुक म्हंटले जाते.  त्यामागे " ॐ भवती भिक्षां देहि " हा मंत्र  सांगितला जातो. पण हा मंत्र कोण व केव्हा म्हंणतो हे पहाणे गरजेचे आहे. जेव्हा बटू हा गुरुव्दारी विद्यारंभ करण्या करता जातो. तेव्हा त्याचे मुख्य कार्य विद्याग्रहण करणे हे असते, तेव्हा त्यास उदरनिर्वाहासाठी समाजाकडून विशिष्ट अन्न भिक्षा म्हणून स्वीकारावे लागते. पूर्वी आगदी राजपुत्र सुध्दा हेच करत असत. त्याच प्रमाणे साधू , संन्यासी , बैरागी , गोसावी यांनी सर्वसंगपरित्याग केलेला असतो. त्यांना चरितार्थासाठी पाच घरी भिक्षामागून  किंवा त्या त्या पंथाच्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भिक्षा मागण्याचा अधिकार असतो.  त्यामुळे 
समाजातील प्रत्येक ब्राहृमण वर्ग हा भिक्षूक नसतो.  भिकारी आणि भिक्षुक यात फरक आहे. भिक्षुक हा धर्म कार्यास वाहून घेतलेला असतो. त्यांनी  सुखसोयीचा त्याग  स्वच्छेने केलेला असतो .  उलट  भिकारी हा नाकर्ता असतो. ज्याने विविध शास्त्रांचा अभ्यास  परिश्रम पूर्वक  केला आहे अनेक संहिता ,मंत्र मुखोगत केले आहेत. , जे शब्द सामान्य लोकांना उच्चारता येत नाही. बघुन वाचता येत नाही असे कठिण मंत्र अखंड दोन तीन तास म्हणून शकणाऱ्या गुरुजींची  तुलना  भिकारी वर्गाशी करणे हे बौध्दिक दिवाळाखोरीचे लक्षण आहे. 
 दान : "त्यागो विहापितं दानमुत्सर्जन विसर्जने  | विश्राणनं वितरणं स्पर्शनं प्रतिपादनम"
          दान हा शब्द त्याग या अर्थाने वापरला जातो. काही तरी विचार त्या मागे असतो. कधी कधी पुण्य ही भावना असल्याने दान धर्म केला जातो. दान हा अहंकाराचा मुलक आहे.  मी दान दिले या विचाराने अहंकार वाढू नये म्हणून गुप्त दान केले जाते. विविध वस्तुचा त्याग व विसर्जन उत्सर्जन या आर्थाने दान हा शब्द वापरतात. थोडक्यात दान म्हणजे मनापासून एखादी गोष्ट स्वत:च्या इच्छेने सोडून देणे.  त्यामुळे दान हे सत्त्पात्री करावे म्हणजे पश्चाताप होणार नाही या साठी ज्यास दान दयायचे आहे ती व्यक्ती योग्य अधिकाराची असावी अशी भावना असल्याने ब्राहृमणांस विविध वस्तू दान करावा अशी पध्दती / रीत सुरु झाली.  दान देणे वा स्वीकारणे हे ऐच्छीक आहे. शास्त्र त्या बाबत प्रत्येकास स्वातंत्र देत आहे कोणी कोणास कोणते दान दयावे याचे नियम नाहीत
दान कोणीही कश्याचेही करतो उदा. अन्नदान, भूदान, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदान,  विद्यादान देणगीदान  त्यास धर्म विधी याचे बंधन नसते. दानी व्यक्ती आणि  दान स्वीकारणार याचा परस्पर संबंध असावा असेही नाही. ते एकमेकांना ओळखतही  नसतात. 
         दक्षिणा - कोणतीही पूजा, विधी इत्यादी धार्मिक कार्यात दक्षिणेला खूप महत्त्व आहे. 'दक्षिणा'  या शब्दात भेट, भेट, फी, मोबदला इत्यादी सर्व अर्थ समाविष्ट आहेत. सोप्या शब्दात सांगायचे तर एखाद्याला मान देऊन त्यांने केलेल्या विधीसाठी  मूल्य देणे म्हणजे 'दक्षिणा'. तो मानधन आणि दक्षिणा यात फरक आहे  मोबदला आणि 'दक्षिणा'मधेही मूलभूत फरक आहे. पूजा विधी हे धर्मिक कार्य असते. यात पापपुण्य अश्या सुक्ष्म विचारांचा सहभाग असतो. परमतत्वाजवळ माझी याचना , प्रार्थना पोहच करणारा पुरोहित हा  यजमानाच्या दृष्टीने एक दूत असतो. जो कर्मकांड विधी आपल्या साठी करत असतो. त्यास दक्षिणा दिली कि या विधीच्या पाप पुण्याशी त्याचा संबध्ं रहात नाही. जर दक्षिणा दिली नाही तर यातुन प्राप्त पुण्यात तो वाटेकरी होईल त्या मुळे तो संतुष्ट होवुन त्यांने अर्शिवाद दयावेत व आपले इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी हा हेतू यजमानाच्या मनात असतो दक्षिणा ही कायम पात्र व्यक्तीसाठी दिली जाते. तो विशिष्ट प्रकारचे ज्ञानाचा अधिकारी असतो.  शास्त्राचे विधीचे ज्ञान नसलेले दक्षिणा स्वीकारु शकत नाहीत. दक्षिणा देणे घेणे हे सुध्दा विधीवत केले जाते. इतर बाबतीत तसे मंत्र नसतात. त्या  मुळे पौरोहित्य   करणारी व्यक्ती  म्हणजे गुरुजी त्याच्या दृष्टीने महत्वाची असते. पूर्वी भूदेव असा मान असे. याच भावनेने तो त्यास वदंन करीत असत. त्यामुळे कोणतेही कार्य करताना त्यातील भाव समजून घ्यावा. आजकाल नळाची तोटी बदलणारा प्लंबर सुध्दा त्याच्या मनाप्रमाणे फी आकारतो. त्या वेळी कोणी त्यास विरोध करीत नाही. दक्षिणे बाबत कोणतीच अट नसते ती यथाशक्ती दिली तरी चालते.  आपल्यासाठी , आपल्या सोयीच्या वेळी घरी येवुन तीन ते चार तास खर्च करुन अवघड मंत्रोच्चार करणारे गुरुजी , जो आपल्या चांगल्याची कामना करीत असतात. काही जण  मात्र त्यांची टिंगल करतात आणि परत  त्यांना दान दिले याचा अभिमान बाळगतात. मनातील भाव जसा असेल तसे फळ मिळते त्यामुळे, शुभ कार्यासाठी योग्य दक्षिणा द्या. कारण पौरोहित्य करणारा गुरुजी वर्ग प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरुजींना "भिक्षुक" म्हणू नका. ते दान नसते. त्यांना योग्य तो मान दया. दान, दक्षिणा, भिक्षा  यात फरक आहे तो समजून घेतला पाहिजे शेवटी धर्माचे रक्षण आपण केले तरच धर्म आपले रक्षण करतो.

अजित दि देशपांडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...