एका वडाच्या झाडावर एका पोपटाच्या जोडीने आपले घरटे बांधले. काही दिवसानंतर मादी पोपटाने घरट्यामध्ये दोन अंडी घातली. काही दिवसानंतर अंड्यांमधून दोन पिल्लं बाहेर आली. त्या दोन पिल्लांचे त्यांच्या आई-वडिलांनी चांगल्या तऱ्हेने पालन-पोषण केले. काही आठवड्यानंतर छोटी पिल्लं हळूहळू उडायलाही शिकली. नर पोपट म्हणाला, "आपण आपल्या पिल्लांची चांगली काळजी घेतली आहे. आपण त्यांना चांगले भोजन पण दिले आहे. दोघेही बरोबरीने खेळले आहेत आणि बरोबरीनेच उडायला पण शिकले आहेत. आता ते स्वतः आपली काळजी घेऊ शकतात. आता हळू हळू त्यांना आत्मनिर्भर होऊ दिले पाहिजे." त्या पिल्लांचे आई वडील, रोज आपल्या पिल्लांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर जात असत. संध्याकाळी आपल्या छोट्या पिल्लांसाठी भोजन घेऊन ते परत येत असत. ही त्यांची दिनचर्या, अशीच काही काळपर्यंत चालू होती.
एक शिकारी बऱ्याच दिवसांपासून या दोन पोपटांची ही दिनचर्या पहात होता. त्याला माहीत झाले की दोन्ही पक्षी सकाळीच बाहेर निघून जातात. ते पक्षी बाहेर उडून गेल्यानंतर शिकार्याने त्या पोपटाच्या पिल्लांना पकडण्याचा निश्चय केला. आपल्या योजनेनुसार त्याने त्या पोपटाच्या पिल्लांना पकडले. पिल्लांनी शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. त्या पोपटांच्या, दोन पिल्लांपैकी एक पिल्लू शिकाऱ्याला हातातून निसटून गेले, परंतु दुसऱ्या पिल्लाला मात्र पिंजऱ्यात बंद करून, शिकारी आपल्या घरी घेऊन गेला.
"खरे तर मी पोपटाच्या दोन्ही पिल्लांना पकडले होते, परंतु एक पिल्लू मी हरवून बसलो." शिकारी खेदाने म्हणाला! शिकाऱ्याची मुलं त्या पोपटाच्या पिल्ला बरोबर खेळत असत. शिकाऱ्याच्या घरी असलेलं ते पिल्लू,ल वकरच काही शब्द बोलायला शिकलं. शिकाऱ्याची मुलं आपल्या वडिलांना म्हणाली, "बाबा, आपला पोपट काही शब्द बोलायला शिकला आहे."
दुसरे पोपटाचे पिल्लू, जे शिकाऱ्याच्या हातून निसटून गेले होते, त्याने एका आश्रमात शरण घेतली. आश्रमामध्ये काही साधू राहत होते. त्यांनी त्या पोपटाच्या पिल्लाला कुठलाही त्रास दिला नाही, त्यामुळे ते पोपटाचे पिल्लू तेथेच राहू लागले. ते पिल्लू रोज त्या साधूंचे प्रवचन ऐकत असे. तो त्यातील काही शब्दही बोलायला शिकला होता.
एके दिवशी एक वाटसरू शिकाऱ्याच्या झोपडी जवळून जात होता. तो थकलेला होता म्हणून त्या झोपडी जवळ विश्रांती घेण्यासाठी थांबला. तिथे त्याने पोपटाचा आवाज ऐकला. तो पोपट म्हणत होता, "मुर्खा, तू इथे कशाला आलास? मी तुझा गळा कापून टाकीन.”
असे वाईट शब्द ऐकल्याने, त्या प्रवाशाला खूप खंत वाटली. तो तत्क्षणी उठला व तिथून लगबगीने निघून गेला. थोडे पुढे गेल्यानंतर तो एका आश्रमा जवळ पोहचला. त्या आश्रमातील पोपट, तिथे एका झाडावर बसलेला होता.पोपट म्हणाला, "स्वागतम! आपले या आश्रमात स्वागत आहे. या वनात आमच्याकडे खूप चांगली फळे आहेत. आपल्याला आवडतील ती फळे मनसोक्त खा. येथील भली माणसे आपल्याबरोबर चांगल्या तर्हेने वागतील."
प्रवासी खूपच अचंबित झाला. तो त्या पोपटाला म्हणाला, "मी एका शिकाऱ्याच्या झोपडीत, एक पोपटाचे पिल्लू बघितले. ते खूप वाईट शब्द बोलत होते, त्यामुळे मी तिथून तात्काळ निघून आलो. परंतु आता मी तुला भेटलो आहे आणि तू तर खूप चांगले बोलतोस. तू तर एक दयाळू आणि कोमल हृदय असलेला पक्षी दिसतोस. तू आणि तो दुसरा पोपट, दोन्हीही सारखेच पक्षी असूनही तुम्हा दोघांच्या भाषेमध्ये इतका फरक कसा?"
या वक्तव्यानंतर, आश्रमातील पोपटाच्या पिल्लाने हा निष्कर्ष काढला की दुसरा पोपट, हा दुसरा कोणी नसून त्याचाच भाऊ असावा. आश्रमातील पोपट म्हणाला, " दुसरा पोपट माझाच भाऊ आहे. परंतु आमचे संगोपन दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. माझा भाऊ शिकाऱ्याची रांगडी भाषा शिकला आणि मी सात्विक लोकांची,मृदू भाषा शिकलो. हा संगतीचा परिणाम आहे, जो आपल्या शब्दांना आणि कृतीला आकार देत असतो."
तर,वातावरण म्हणजे काय? जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा आपल्याला शांतता अनुभवास येते. ज्यावेळी आपण पोलीस स्टेशन, दवाखाना या ठिकाणी जातो, तेथे आपल्याला खूप बेचैन वाटते, अशाप्रकारे वेगवेगळ्या वातावरणानुसार आपलीही मनस्थिती बदलत जाते. असे का?तुम्ही कधी या बदलाकडे लक्ष दिले आहे का? क्षणभर थांबा, लक्ष द्या आणि हा बदल का घडतो यावर मनन करा : आपले विचारच वातावरणाची निर्मिती करतात आणि त्यानुसारच आपल्या कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम होतो. ♾
"समजून घेणे म्हणजे, बुद्धीचा कस लावणे नव्हे, तर खऱ्या समजुतीचा उदय हृदयाच्या आत होतो ."
चारीजी
Heartfulness Meditation💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा