कोणे एकेकाळी एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यातील लोकं खूप सुखी होते. त्याच्या राज्यात सुख- संपत्तीची कमतरता नव्हती. राजा आणि प्रजा सुखाने जीवन जगत होते. एक वर्षी त्या राज्यात भीषण दुष्काळ पडला. पाण्याअभावी पिके सुकून गेली. अशा स्थितीत शेतकरी राजाला कर देऊ शकले नाहीत. कर न मिळाल्याने महसूल कमी होऊन, तिजोरी रिकामी होऊ लागली. हे सर्व पाहून राजाला काळजी वाटू लागली. आता राज्याचा खर्च कसा चालेल, ह्याच गोष्टीचा विचार राजा सतत करु लागला. काही दिवसांनंतर दुष्काळाचा काळ संपला. परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली, पण राजाच्या मनातली चिंता मात्र कमी झाली नाही. एका गोष्टीवर तो सारखा विचार करत राहात असे,की जर राज्यात पुन्हा दुष्काळ पडला तर काय होईल? याशिवाय इतर चिंता पण त्याला घेरू लागल्या जशा... शेजारच्या राज्याकडून असलेली भीती, मंत्र्यांची कारस्थानं...अश्या अनेक काळज्यांनी त्याची तहान-भूक आणि रात्रीची झोपही हिरावून घेतली.
स्वतःच्या अशा मनस्थितिमुळे तो खूप अस्वस्थ होता. पण जेव्हा जेव्हा तो राजवाड्याच्या माळ्याकडे बघायचा, तेव्हा त्याला आश्चर्य वाटायचे. दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी कोरडी भाकरी खाऊन, तो माळी मोठया आरामात झाडाखाली झोपत असे. राजाला त्याचा खूप हेवा वाटायला लागला. एके दिवशी एक सिद्ध साधू राजाच्या दरबारात आला. राजाने आपली समस्या साधूला सांगितली आणि त्यावर मात करण्यासाठी सल्ला मागितला. साधूला राजाच्या मन:स्थितीची नीट कल्पना आली.
तो म्हणाला, "राजन, तुझ्या चिंतेचे मूळ कारण, तुझा हा राजपाट आहे. तुझ्या मुलाकडे संपूर्ण राजपाट सोपवून दे आणि तू चिंतामुक्त हो."
त्यावर राजा म्हणाला, "गुरुजी, माझा मुलगा आत्ता फक्त पाच वर्षांचा आहे. ते निरागस बालक राज्य कारभार कसा सांभाळेल?"
"मग असे कर. तू तुझी काळजी माझ्यावर सोपव." साधू म्हणाला.
यावर राजाने होकार दिला. त्याने आपला राजपाट साधूच्या हातात दिला. त्यानंतर साधूने विचारले, "आता तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी काय कराल?"
राजा म्हणाला, "मला वाटतं मी एखादा छोटा व्यवसाय करावा."
"पण व्यवसायासाठी पैशाची व्यवस्था कुठून करणार? आता हा राजपाट माझा आहे.त्यामुळे तिजोरीच्या पैशावर माझा अधिकार आहे. आता त्यावर तुझा अधिकार नाही." साधू म्हणाला.
"खरं आहे. मी ते विसरलोच. मग मी कोणतीतरी नोकरी करेन." राजा म्हणाला.
"ठीक आहे. पण तुला जर नोकरीच करायची आहे तर तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू माझ्याकडेच नोकरी कर. मी तर साधू आहे.आज इकडे तर उद्या तिकडे. माझ्या या राज्याला, तू माझ्या तर्फे सांभाळ आणि राज्यकारभाराची सर्व कामे मनापासून कर."
राजाने साधूची आज्ञा मानली. आणि साधूचा राजकारभार सांभाळण्याचे काम तो करू लागला. मग साधू त्याच्या झोपडीकडे निघून गेला. काही दिवसांनी तो साधू पुन्हा राजवाड्यात आला आणि त्याने राजाला विचारले,
“प्रिय राजन सांग, आता राज्य कारभार कसा चालला आहे?”
राजा म्हणाला, "अगदी शिस्तबद्धरीतीने आणि चांगला चालला आहे."
"तुला आता भूक व्यवस्थित लागते का नाही? आणि झोप व्यवस्थित येते का?" साधूने विचारले.
"महाराज, आता मी खूप व्यवस्थित जेवण करतो आणि गाढ झोपतो. पण मला एक गोष्ट समजली नाही, की पूर्वी सुद्धा मी राज कारभाराचे काम सांभाळायचो, आताही तेच काम आहे... मग हा बदल कसा झाला?" हे सर्व माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. राजाने आपली परिस्थिती त्या साधूला विशद केली आणि मग प्रश्न विचारला.
साधू हसला आणि म्हणाला, "राजन, पूर्वी या राज्य कारभारासोबत 'मी पणा’ चा वा 'माझेपणा' चा भाव होता, जो एक क्लेश आहे. ‘हे साम्राज्य माझे आहे' या विचाराने तुला बंधनात टाकले होते जे खर तर तुझ्या सर्व दुःखांचे, क्लेशचे कारण होते. पण तू तुझा राज्य कारभार माझ्याकडे सोपविल्यानंतर, तू या मानसिक बंधनातून मुक्त झालास आणि तुझ्यातील मी पणा (अहंकार) चा भाव नाहीसा झाला. राजन,आता तुम्ही सर्व कार्य आपल्या हृदयाशी संलग्न राहून आणि आपले कर्तव्य म्हणून करता. म्हणूनच तुम्ही आता आनंदात आहात.” ♾
"आनंद हा कुठे बाहेर नसतो. तर, तो आपल्या ध्येयाच्या स्थिरतेमधे, वृत्तिंच्या स्थिरतेमधे आणि मनाला लगाम घालण्यामधे आहे."
लालाजी
Heartfulness Meditation 💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा