सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

516. खजिना

 कुठं गेलं चुलीचं धुराडं
अन कोंबड्याचं खूराडं//१//

दुर्मिळ झाली पुरणाची पोळी
अन हुलग्याची शेंगोळी//२//

मिळतय का प्यायला माडगं? 
गेलं कुठं जनावरांचं वाडगं? //३//

गाडगं तर लोपच पावलं
ऊखळ मुसळ केरात गेलं//४//

किती पौष्टिक होती राळ्याची खीर,
आणि रुखवातातील सारनाची पुरी//५//

कधी गायब झालं घरातलं जातं,
लाकडी नांगर, शिवळाटीचं पातं//६//

आता सांगा बांधील का कोणी
गाडीची साकन,औताचं यठण//७//

गेला कुठं पायातला तोढा
अन् ऊधळणारा घोडा //८//

कुठं गेली वावरातली पंगत
 पत्रावळीच्या जेवणाची रंगत//९//

खरोखर विहिरीतच बुडाली
ना पाणी शेंदन्याची बादली//१०//

कसं शोधायचं झऱ्याचं पाणी
आणि पाखरांची मंजूळ गाणी//११//

लोप पावली नऊवारी साडी
अन् मांजरपाट धोतराची जोडी//१२//

गायब झाला हा सारा ऐना
 त्यामुळेच झाली माणसाची दैना//१३//

खरच हरवलं जात्याचं पीठ
अन पांढऱ्या खड्याचं मीठ//१४

गव्हाच्या लापशीचा वास कुठं गेला...
खरच हा खजिना कोणी लुटून नेला? //१५//

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...