परवाच एका तेवीस वर्षाच्या मुलाचे हृदय बंद पडून मृत्यू झाल्याची बातमी ऐकली मन खुपच व्यथित झाले. नुकत्याच उमलू लागलेल्या कलिकेला जणू काळाच्या सहस्त्ररश्मीने करपवून टाकले. ऐन पंचविशीत आपली जीवनयात्रा संपवणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी जगाच्या अंतापर्यंत जीवनदायी अशी अमृताच्या पैजा जिंकणारी अशी ज्ञानेश्वरी अखिल मानव जातीला भेट दिली पण त्या मुलाचं तसं नाही. आज संध्याकाळी मावळता सुर्य पाहताना उद्याच्या उगवतीचा पहिला किरण अंगावर रोमांच उभे करतील का नाही की आजचा सुर्य मी पाहीन की नाही अशी भीती कायम मनात घर करून राहते. आयुष्याचे सुगंधित पुष्प पहाताना त्याच्या भोवतीच्या काट्यांची जाणीव मनाला क्षणोक्षणी पोखरून टाकते. मग त्या फुलाचा सुगंध घेण्याऐवजी त्याच्या क्षणभंगुरतेने मन कोमेजून जाते. या सर्वांचे कारण म्हणजे कुठेतरी आपली सोकाॅल्ड फोरवर्ड विचारसरणी आहे असं नाही का वाटत आपल्याला? मला जे जे मिळाल नाही ते ते सारं माझ्या मुलाला मिळावं म्हणून या चढाओढीत कुठेतरी आपणचत आपल्या बाळांना पांगळं करत आहोत. त्यांच्या ध्यानीमनी नसतानाही त्यांना त्यांच्या वयाच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात गोष्टी आपण त्यांना देतं आहोत त्यामुळे जिवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन ही बदलत आहे. म्हणजे असं बघा आज जरी मोबाईल फोन ही काळाची गरज असली तरी त्याचा वापर आपलं मुलं कसा करत आहे यावर पालकांनी सजगपणे नको का लक्ष द्यायला. पोतभर कोळशापेक्षा एक चमकदार मौल्यवान हिरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे हे मान्यच आहे पण त्या हि-याला योग्य ते पैलू पाडण्याची जबाबदारी ही आपलीच आहे नाही का?
जसं आपलं मुलं काय खातं काय पितं काय वस्तू वापरतं यावर त्याची मानसिकता अवलंबून असते तसच ते कोणत्या संस्कारात वाढलंय त्याच संगोपन करणारा आजूबाजूचा समाज हा कोणत्या मनोवृत्तीचा आहे त्यावर हे सारं अवलंबून आहे. कुवॄत्तीच्या मरूद्यानातही उदात्त आचारविचारांचे जलबिंदू पडले तर स्थिर बुध्दीच्या आणि तात्विक विचारांचे कुलदीपक घराघरात तेवायला वेळ लागणार नाही. सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या चढाओढीच्या जीवनात ते थोडे कठीण आहे हे मान्यच आहे पण ज्ञान आणि संस्कारात हेच साम्य आहे. ज्ञानाचा एक दवबिंदू सुध्दा असंस्कृत मनाची तॄषा शांत करतो आण कधी कुठल्या क्षणी तो ज्ञानाचा दवबिंदू संस्कार सांगतात रूपांतरित होईल हे सांगता येत नाही.
मी टेक्नोलॉजीच्या विरोधात मुळीच नाही पण आज त्यावर अवलंबून राहून आजच्या मुलं आजीच्या मऊसुत गोधडीपासून वंचित झाली आहेत. मऊ तूप भात मेतकूट भरवता भरवता सांगितल्या जाणाऱ्या चिऊकाऊच्या इसापनीतीच्या गोष्टी आता काळा आड नाहीशा होत आहेत."तो की नाही मोबाईल हातात दिल्यावर चटचट जेवतो"हे अभिमानाने सांगणार्या आयांना मला सांगावस वाटत की आपणच आपल्या बाळांना अतिशय पांगळं बनवत आहोत. मोबाईल आणि काॅंम्पूटरवर विसंबून असलेल्या ह्या मुलांना पालखी निमकी पाऊणकी तर सोडाच पण साधे हिशेब ही जमत नाहीत.
काही दिवसांपूर्वी एक सर्वे केला गेला त्यात काही रामायण आणि महाभारत यावर प्रश्न विचारले गेले. त्यात एका सव्वीस सत्तावीस वर्षीय मुलीने रावण आणि कंस हे भाऊ भाऊ आहेत असे तारे पाजळले. आता मला सांगा ज्यांना साधं आपलं रामायण महाभारत माहिती नाही त्या महिला उद्याची पिढी कशी काय घडवू शकतील?
संस्कार आचारविचार ही काही वस्तू नाही की गेलो बाजारात नी घेतली विकत आणि दिली मुलांना. लहान मुलांची मने म्हणजे सुपीक माती असते . जे पएरआलं तेच दुपटीने उगवतं. जो पर्यंत त्यात सुविचारांचं संस्कारांच बीज पेरले जात नाही तोपर्यंत त्यांचे मन आणि बुद्धी सुदृढ होऊन ती योग्य त्या मार्गावर वळणार नाही. जसे डोळ्यांनी पाहिलेल्या सौंदर्यात सात्विकता आनंददायक मांगल्याचा शोध लागायला हवा असेल तर त्या बालबुद्धीला आणि मनाला श्रेष्ठ मुल्यां भोवतीच भ्रमराप्रमाणे रूंजी घालायला शिकवायला हवे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा रसभोग घ्यावाच घ्यावा पण त्यामुळे आपल्या आयुष्याला रोगटपणाचे अधिष्ठान लागू देऊ नका.
अखेरीस इतकंच सांगते की......
"घटा घटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार
तू वेडा कुंभार "
काळ बदलला आहे म्हणूनच त्यांची पावले ओळखून वेळीच सावध व्हा आणि सर्व साधक बाधक विचार करून आपल्या अंकुर आला उचित दिशा द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा