मंगळवार, ३० मे, २०२३

373. भांडत नका बसू

शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या.
भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.

आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू 
डोक्यात राग भरल्यावर, फुटणार कसं हसू ?

अहंकार बाळगू नका, भेटा बसा बोला. 
मेल्यावर रडण्यापेक्षा, जिवंतपणी बोला. 

नातं आपलं कोणतं आहे, महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी, गोड बोलतो का नाही ?

चुका शोधत बसाल तर, सुख मिळणार नाही. 
चूक काय बरोबर काय, कधीच कळणार नाही.

काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.

चल निघ चालता हो, इथे थांबू नको.
हात जोडून विनंती आहे, अशी भाषा नको.

दारात पाय नको ठेऊ, तोंड नाही पहाणार 
खरं सांगा असं वागून, कोण सुखी होणार ?

सुखाचा अभास म्हणजे खरं सुख नाही. 
आपलं माणूस आपलं नसणे दुसरं दुःख नाही.

करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.

एकतर्फी प्रेम करून उपयोग आहे का ?
समोरच्याला आपली आठवण तरी येते का ?

नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं.
कधी गायीने कधी वासराने एकमेकाला चाटावं.

तुमची काहीच चूक नाही असं कसं असेल? 
पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेलच.

  पण काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू.
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

372. स्वस्तिक

    कल्याणशी लग्न ठरल्यावर सई प्रथमच त्याच्या घरी येत होती. वधू-वर सूचक मंडळाकडून दोन्ही स्थळांनी एकमेकांशी संपर्क साधून पुढची बोलणी केली. कल्याण सैन्यात नोकरीला असल्यामुळे कित्येक मुलींचा नकारच येत होता. सई कल्याणला भेटली आणि त्याचं देशप्रेम, त्याचं सात्विक रूप बघून त्याच्या प्रेमातच पडली. तिने तात्काळ लग्नाला संमती दिली. कल्याणचे वडील डॉ विकास देशपांडे प्रख्यात सर्जन होते आणि आई, सौ नीला देशपांडे कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल होती. दोघेही सईला प्रथम भेटले तेव्हा इतकं मोकळेपणाने बोलले की सईची भीड चेपली. साखरपुडा होऊन दोनच दिवस झाले होते. सईने शनिवारी कल्याणला फोन केला. 
"कल्याण,मी उद्या आपल्या घरी येते आहे. आपलं घर ओझरतच बघितलं होतं. आज छान पूर्ण बघते.आणि उद्या रविवार असल्यामुळे ममा आणि पपांना पण सुट्टी असेल."
 "सई, किती छान वाटलं,तू आपलं घर म्हणालीस. मोस्ट वेलकम! तुला घ्यायला येतो. मला वेळ कळव." कल्याणने गाडी गेटच्या आत घेतली आणि सईचं लक्ष बंगल्याच्या नावाकडे गेलं..'स्वस्तिक'. ती पहिल्यांदा कल्याणला भेटायला आली होती, तेव्हाच तिला ते नाव खूप आवडलं होतं. सईने दारावरची बेल वाजवली. गाडी पार्क करून मागून कल्याण आला. नीलाने दार उघडलं. "सई, मी वाटच बघतेय. माझ्यापेक्षा पपा तुझी जास्त वाट बघताहेत."
"आहेत कुठे पण पपा?" सईने विचारलं.
"पूजा करताहेत." नीला हसत म्हणाली.
"पपा आणि पूजा?" सईने आश्चर्याने विचारले. 
  "रविवारी पूजा विकासच करतो."
         सईला घेऊन नीला देवघरात आली. तिथे विकास डोळे मिटून ध्यान लावून बसला होता. इतकं प्रशस्त देवघर, फुलं आणि उदबत्तीचा मोहक दरवळ आणि फुलांनी सजवलेले सुंदर देव बघून सईला अगदी प्रसन्न वाटलं. तिने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि मनात म्हणाली, "देवा, माझ्या ह्या सौख्याला कुणाची दृष्ट न लागो."
 जेवण झाल्यावर मनसोक्त गप्पा करून सई घरी जायला निघाली. तिच्या हातावर एक सुंदर ड्रेस मटेरियल ठेवत नीला म्हणाली, "आज खऱ्या अर्थाने आमची सून घरात आली. आमच्यात अगदी एकरूप झालीस."
"नीला, त्या ड्रेस मटेरियलवर कुंकवाने एक छोटं स्वस्तिक काढ आणि मग तिच्या हातात दे." विकास म्हणाला.
"पपा,एक विचारू?तुम्ही डॉक्टर असून ह्या गोष्टी इतक्या पाळता? आणि स्वस्तिक तुमच्या खास आवडीचं दिसतंय." सई हसत म्हणाली.
"आता तू विषय काढलास म्हणून सांगतो. नीला, बाईंना अजून एकेक कप चहा ठेवायला सांग. सई थांबते आहे."
 गाडीची किल्ली टेबलवर ठेवत कल्याण हसला, "सुनबाई, आता सासरी अडकलात तुम्ही!" 
"सई, डॉक्टर होणं आणि आध्यात्मिक असणं ह्याचा काहीच संबंध नाही. ही तुमची मतं असतात. रोज मी आणि नीला इतके घाईत असतो. माझं क्लिनिक,तिचं कॉलेज! रोजची पूजा गुरुजी येऊन करतात,पण रविवारी मात्र मीच पूजा करतो. प्रसन्न वाटतं, मानसिक बळ मिळतं. अग,मी हार्ट सर्जन आहे. एक बायपास करताना किती तणाव असतो. ते मानसिक बळ मला ह्यातून मिळतं. आध्यत्मिक माणूस खूप चांगला आणि नास्तिक माणूस वाईट,असंही नसतं. एखादा नास्तिक माणूस,त्याच्या समाजसेवेतून, चांगल्या कृत्यातून पुण्य कमावतो. मी लहानपणापासून बाळबोध वातावरणात वाढलो, त्याचा कदाचित परिणाम असेल,मी ह्या सगळ्या गोष्टी मानतो. आता स्वस्तिक मला आवडतं हे तर नक्कीच! पण त्यामागे भारतीय संस्कृती दडलीय. आपल्या संस्कृतीत स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानतात. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र,वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू,ब्रम्हदेव, शिवपार्वती, श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश आहे. स्वस्तिक हे शांती,समृद्धी आणि मांगल्याचे प्रतिक आहे. स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म,अर्थ,काम,मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून,त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात. सुसंवाद,उल्हास,प्रिती, सौंदर्य ,आशीर्वाद, कल्याण,शांती हे गुण स्वस्तिक ह्या शुभचिन्हात आहेत. स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात. चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेघा छेडतात म्हणजेच मध्यबिंदू! देवाजवळ रोज न चुकता रांगोळीने स्वस्तिक काढावे. तू देखील इतक्या मोठ्या कंपनीत काम करतेस पण तिथे देखील कसली पूजा असेल तर पहिला मान स्वस्तिकाचा असतो,हे तू बघितलंच असशील." 
"हो पपा, स्वस्तिकाची तुम्ही किती छान माहिती दिली. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे,इतकंच मला माहिती होतं."
"माझे आजोबा पौरोहित्य करत असत. ते मला ह्या सगळ्या गोष्टी सांगत."
"आणि माझं नाव कल्याण त्यासाठीच ठेवलं. एम आय राईट पपा?" 
"अबसुल्यूटली राईट कल्याण. तुझा जन्म झाल्यावर विकासने नाव ठरवूनच टाकलं होतं." नीला चहाचा ट्रे टेबलवर ठेवत म्हणाली.
सईचा पाय निघत नव्हता. आता सासरचीच ओढ वाटायला लागली. गाडीत तिने कल्याणचा हात धरला आणि म्हणाली, "कल्याण,मी खूप भाग्यवान आहे. आज माझ्या घरी जावंसं वाटत नाहीय. हेच घर माझं वाटतंय."
"वाटतंय म्हणजे काय सई, आहेच तुझं!"
लग्न अगदी छान वैदिक पद्धतीने पार पडलं. कल्याण आणि सईचा संसार सुरू झाला. कल्याणची रजा असेपर्यंत सईने रजा वाढवून घेतली. एकमेकांच्या सहवासात एकमेकांना समजून घेत गुलाबी दिवस सरत होते. कल्याणला बॉर्डरवर रुजू व्हायची ऑर्डर आली आणि सईची घालमेल सुरू झाली.
"सई, बी ब्रेव्ह! एका सैनिकाची तू पत्नी आहेस." कल्याण सईला जवळ घेत म्हणाला.
"हो मी आहेच रे शूरवीराची पत्नी,पण थोडंसं अस्वस्थ वाटणारच न! पण तू एकदम निर्धास्तपणे जा. मातृभूमीचं रक्षण कर. मला तुझा अभिमान आहे."
कल्याण बॉर्डरवर जॉईन झाला. सईचे रोजचे रुटीन सुरू झाले. रेंज असेल तेव्हा कल्याणशी व्हीडिओ कॉलवर बोलायची. विकास आणि नीला सईला फुलासारखं जपत होते. एक दिवस कल्याणचा विकासला फोन आला. "पपा,इथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित मी ह्यापुढे काही दिवस तुमच्या संपर्कात नसेन. बट यु डोन्ट वरी. आय विल फाईट फॉर माय कन्ट्री."
"ऑल द बेस्ट बेटा! जयहिंद!"
"कल्याण, जयहिंद!" डोळ्यातलं पाणी लपवत सईने कल्याणला हसत विश केलं.
फोन बंद झाला आणि तिला अश्रू अनावर झाले. नीलाचेही डोळे भरून आले. तिने सईला जवळ घेतलं.
 "काळजी करू नकोस. कल्याणला काही होणार नाही."
         दोन दिवस झाले,कल्याणविषयी काहीच कळलं नाही. टीव्हीवर बातम्यात कळत होतं तेवढंच! सईचं कशातही लक्ष लागत नव्हतं. विकासने तिला बोलावलं आणि म्हणाले, "सई, आजपासून देवाजवळ रोज तू स्वस्तिक काढत जा. रांगोळीने स्वस्तिक काढून त्याला हळदीकुंकू वाहायचं आणि तेच कुंकू तुझ्या कपाळावर लाव. स्वस्तिक स्त्रियांच्या सौभाग्याचं पण रक्षण करतं. तुला आत्मिक बळ मिळेल. करून बघ."   सई रोज स्वस्तिक काढून त्यावर हळदीकुंकू वाहून ते कपाळावर लावायला लागली. तिचं मन शांत शांत होत गेलं. अखेर एक दिवस टीव्हीवर बातमी आली  'परिस्थिती आटोक्यात आली आहे. भारतीय सैनिक प्राण पणाला लावून लढले. सगळे सुखरूप आहेत.'
सई विकासला म्हणाली, "पपा,प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. तुमची आणि माझी श्रध्दा फळाला आली असं मी समजते."
विकासने तिच्या डोक्यावर थोपटलं,"खरंय बेटा."
इतक्यात कल्याणचा व्हीडिओ कॉल आला. विकास आणि नीला त्याच्याशी बोलत असताना,सई तिचं सौभाग्य भरल्या डोळ्यात साठवून घेत होती.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

सोमवार, २९ मे, २०२३

371. कुटुंब प्रमुखाला का जपायच?

       गावातलं एक शेतकरी कुटुंब. आई वडील व तीन मुले, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब. वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक व मेहनती, एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली. नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या. मात्र घरातली कामे कोणती कुणी करायची, यात गोंधळ होऊ लागला. आणि कामे खोळंबु लागली. एकीला वाटायच की हे काम मी का करू ? धाकटीने करावं. असं इतर दोघीनाही वाटायच अन त्यात गुंता वाढत गेला.  वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल चक्क वाटणीच त्यांनी करून दिली.
        ते म्हणाले, "सर्वात लहान सून हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिने पाहायचा. बाकी दिवसभर मग तिने वाटलं तर इतरांना मदत करावी मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आराम देखील करू शकेल." मधली सून.... नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिने घरची धुणी भांडी पाहायची. बाकी काही नाही केलं तरी चालेल. थोरली सून.... जुन्या काळातली आहे. कष्टाळू आहे. शेतीभातीचे ज्ञान आहे. परंपरा रीतिरिवाज माहीत आहेत. तर आजपासून तिने फक्त शेताकडे पहायच. बाकी तिन्ही मुले शेतात असतातच. त्यांना हातभार लावायचा. घरची बाकी कामे नाही केली तरी चालेल. 
यावर मग सासू बोलली, "सगळ्यांना कामे सांगितली. मलाहि काम सांगा की काय करू ?"
सासरा म्हणाला, "खूप वर्ष तू माझ्या बरोबरीने कष्ट केले आहेत. त्यामुळे तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं वाटत नाही. आराम कर, सुख घे"
तर सासू म्हणाली, "असं नको. नुसतं बसून आजारी पडेल मी ! काहीतरी काम सांगाच"
सासरा म्हणाला, "बर मग एक काम कर. आजपासून घराची मुकादम तू. सगळीकडे लक्ष ठेवायचं. पै पाव्हणे पाहायचे. आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील तिथं तू त्यांना पाठबळ द्यायच."
कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खुश आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालू लागले. गाडी रुळावर आली.  आणि अशाच एक दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती. भाकरी भात वगैरे झाला होता. फक्त आता भाजी राहिली होती. भाजीही चिरून वगैरे तिने घेतली. कढई चुलीवर चढवली. फोडणी केली. नंतर चिरलेली भाजी टाकली. तिखट, मसाला, हळद टाकली. मीठ मात्र टाकलं नाही. का नाही टाकलं ? तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो. म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते. (गोष्टीच्या निमित्ताने नव्या पिढीच्या महिलांना ही डीडी टीप दिली) आणि रश्यासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली. इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघालीय. तर पाच मिनिट तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटल.  पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती. त्यात वेळ जाणार होता. मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडे (म्हणजे जावेकडे) गेली. अन म्हणाली की, "माझी मैत्रीण निघालीय. मला जायचय तर आजच्या दिवशी जरा भाजी उकळी आल्यावर मीठ तेव्हढं घालता  का ?" त्यावर मधली जाऊ म्हणाली, "माझ्या पेक्षा लहान असून मला काम सांगते ? तुला काय संस्कार बिस्कार आहेत की नाहीत? निघ तू.... तुझं तू बघ" धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली.  थोरलीने तर मधली पेक्षा मोठा आवाज करून धाकटीला "तुझं तू बघ" म्हणून घालवून दिल.  धाकटी मग तोंड लाहान करून शेवटी हाय कमांड (सासू) कडे गेली.  तस सासूनेही नकार देत... तुझं तू पहा. मला आता काम झेपत नाही बाई असं म्हणत घालवून दिल. या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेव्हड्या वेळेत भाजीला उकळी आली पण ! ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ टाकून झाकण ठेवून ती गेली मैत्रिणीला भेटायला आणि मग या दोन सुना व सासू स्वतःशीच विचार करत बसल्या की आपण केलं ते चूक की बरोबर ?मधलीने विचार केला, कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली आपण आपण घालवून दिली. हे बरोबर नाही केलं आपण. असं म्हणत ती स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली. थोरलीनेही तसाच विचार केला आणि थोड्या वेळाने तीनेही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली आणि सासूलाही पश्चाताप झालेला. नको होत इतकं रागवायला तिला. असं म्हणत  थोड्या वेळाने तीनेही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली. सर्वानी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की आपण चुकलो होतो पण नंतर दुरुस्ती केली.  पण आता जिथं एक चमचा मीठ पडायचं होत त्या भाजीत चार चमचे मीठ पडलेलं.
         दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले.  सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं. सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला अन त्यांच्या लक्षात आलं, भाजी खारट झालीय.  त्यांनी सुनेला सांगितलं, "अग बेटा, घरात दही आहे का ? असेल तर वाटीभर आण." सुनेनेही पटकन जाऊन दही आणल. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं अन मस्त मजेत जेवण करून शेताला निघाले सुद्धा. (बाय द वे दुसरी डीडी टीप : पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं. किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा. काम होऊन जात) नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली. त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच्या घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुणेने "काय खरं नाय भाजीचे" असं सांगितलं. 
थोरल्या मुलाने आईला विचारलं, "आबा जेवून गेले का ?"
आईने हो सांगितल्यावर त्याने विचारलं, "काय जेवले आबा?"
तर आई म्हणाली, "हेच जेवण की जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहित त्यांनी दही मागून घेऊन ते भाजीत टाकून खाल्लं बाबा"
यावर पटकन तिन्ही मुले म्हणाली, "आम्हालाही दही आणा"
त्याप्रमाणे मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून शेताला गेले. 
नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूने याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी "मी पण मीठ टाकलं" सांगितलं. शेवटी मग त्यांनीही भाजीत दही मिसळून जेवण केलं. 
गोष्ट इथं संपलीय .
डीडी क्लास : एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं  वाद होऊ शकतो, मने कलुषित होऊ शकतात अशावेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, जी कृती करून नकळत मार्गदर्शन करतो तो बाकीच्यांनी मानला तर मग वरील गोष्टीप्रमाणे  वाद न होता तो मुद्दाच अडगळीत पडतो आणि घरात एकोपा राहतो.  प्रश्न मीठ जास्त पडण्याचा नसतो तर नंतर त्यावर काय करावं ? याचा असतो. प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता पण त्याने तसे केले नाही. कारण त्याने बिनभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचे दही कसे मिसळायचे हे शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली अन तेही जेवण करून खुश झाले. वाद टळले. कुटुंबप्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील पण तुमच्या पेक्षा चार पावसाळे त्याने जास्त पाहिलेले असतात त्या अनुभवाचे भांडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात. *ते लाथाडु नका ! स्वीकारा !! त्यात भलाई आहे.

369. रामभक्त शबरी..

 थोर ऋषींपैकी मतंग ऋषी हे एक होते. पंपासरोवराच्याजवळ त्यांचा आश्रम होता. आजूबाजूला रमणीय व विशाल वनराजी होती. मतंग ऋ षींची पत्नी ही अत्यंत साध्वी व पतिपरायण होती. आश्रमाच्या आसमंतातले वातावरण अतिशय प्रसन्न व पावन असे ती ठेवीत असे. आश्रमात हरिणमयूरादी सुंदर पशुपक्षी पाळलेले होते. सकाळच्या वेळी पाखरांना अंगणात नीवार धान्य टाकताना व हरणांना हिरवा चारा घालताना ऋषिपत्नीस मोठा आनंद होत असे, कारण तीच तिची लडिवाळ मुलेबाळे होती. मतंग ऋषी फार थोर मनाचे होते. प्रातःकाळी नदीवर स्नान करुन नंतर ते संध्या, ईश्वरपूजा व ध्यानधारणा करीत. तदनंतर आश्रमाच्या भोवती जे कोणी रहिवाशी येतील, त्यांना खुणांनी मोडक्या तोडक्या भाषेत सुरेख गोष्टी सांगत. हळूहळू ते त्यांची भाषा शिकू लागले आणि आपले उन्नत व उदात्त विचार त्यांना सांगू लागले. जरी त्या रानटी लोकांना प्रथम प्रथम विशेष समजत नसे, तरी त्या पावन वातावरणाचा, ऋषींच्या व्यक्त्तिमाहात्म्याचा त्यांच्या मनावर संस्कार झाल्याशिवाय राहत नसे. पावित्र्य हे न बोलता बोलते, न शिकविता शिकविते. दिव्याची ज्योत निःस्तब्धपणे अंधार हरण करीत असते. थोर लोकांचे नामोच्चारणही जर मनास उन्नत करते, तर त्यांचे प्रत्यक्ष दर्शन किती प्रभावशाली असेल बरे!
      मतंग ऋषींच्या आश्रमापासून काही कोसांच्या अंतरावर एका भिल्ल राजाचे राज्य होते. राज्य लहानसेच होते. भिल्लांचा राजा जरी रानटी होता, तरी तोही ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा सुधारला होता. या भिल्ल राजास एक पाचसहा वर्षांची मुलगी होती. मुलगी काळीसावळीच होती; पण तिचा चेहरा तरतरीत होता. रानातील हरिणीच्या डोळ्यांसारखेच तिचे डोळे खेळकर व पाणीदार असून ती हरिणीप्रमाणेच चपळही होती. घरात बसून राहणे तिला कधीच आवडत नसे; घडीची म्हणून तिला उसंत माहीत नसे. भिल्ल राजाचीच ती मुलगी. लहानपणी तीही लहानसे धनुष्य घेऊन हरणांच्या पाठीमागे लागे. आपल्या मुलीचे कोडकौतुक राजा-राणी कितीतरी करीत. मनुष्य रानटी असो वा सुधारलेला असो; मनुष्यस्वभाव हा सर्वत्र सारखाच आहे. रानटी मनुष्यालाही प्रेम समजते, त्याला मुलेबाळे आवडतात. रानटी मनुष्यही आनंदाने हसतो व दुःखाने रडतो. आईबापांच्या प्रेमळ सहवासात लहानगी शबरी वाढत होती. एक दिवस भिल्ल राजा आपल्या राणीला म्हणाला, "आपल्या या मुलीला मतंग ऋषींच्या आश्रमात ठेवले तर? मी याविषयी त्यांना विचारले, तेव्हा त्यांच्या पत्नीने मोठ्या आनंदाने संमती दिली. ऋषिपत्नीलाही मूलबाळ नाही. ऋषिपत्नी मला म्हणाली, 'खरंच, तुमची मुलगी आश्रमात ठेवा; मी तिला शिकवीनसवरीन; पोटच्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करीन.' मग बोल, तुझे म्हणणे काय आहे ते. मुलीस तिथे पाठविण्यास तुझी संमती आहे ना? ती तुझ्यासारखीच अडाणी राहावी, असे तुला वाटते का?"
      राणी म्हणाली, "मी आपल्या इच्छेविरुद्ध नाही. मनाला कसेसेच वाटते हे खरे; तरी पण मुलीचे कल्याण होईल, तेच केले पाहिजे. आपल्या लहानपणी आपणांस नाही असे ऋषी भेटले; परंतु आपल्या मुलीच्या भाग्याने भेटले आहेत, तर ती तरी चांगली होवो." उभयता मातापितरांनी मुलीला आश्रमात पाठविण्याचा निश्चय केला. शुभ दिवशी त्या भिल्ल राजाने शबरीस बरोबर घेतले, तिला पालखीत बसविले आणि मतंग ऋषींच्या आश्रमात आणून सोडिले. कन्येस ऋषींच्या स्वाधीन करुन राजा म्हणाला, "महाराज, ही माझी मुलगी आपल्या स्वाधीन करीत आहे. ही सर्वस्वी आपलीच समजा व तिला नीट वळण लावा." ऋषिपत्नी म्हणाली, "राजा, निश्चिंत ऐस. ही माझीच मुलगी मी समजेन. मी तिला मजजवळ घेऊन निजेन, तिची वेणीफणी करीन. ती येथील हरिणांमोरांबरोबर खेळेल-खिदळेल व त्यांच्याजवळ शिकेल. काही काळजी करु नकोस बरं!" राजाने मुलीसाठी तांबड्या रंगाची वल्कले केली होती, ती तिला दिली. मुलीला पोटाशी धरुन नंतर राजा निघून गेला.
       शबरी आश्रमात वाढू लागली. ऋषिपत्नी तिचे कितीतरी कोडकौतुक करी. आश्रमात गाई होत्या. गाईंच्या वासरांबरोबर शबरी खेळे, उड्या मारी. तिने गाईंना नदीवर न्यावे, त्यांस पाणी पाजावे. गाईचे धारोष्ण दूध शबरीला फार आवडे. प्राचीन कालीन आर्यांचे गाय हेच धन असे. 'गोधन' हा शब्द प्रसिद्ध आहे. शबरी सकाळी लवकर उठे. ऋषिपत्नीने तिचे दात आधी नीट घासावेत, मग तिची वेणीफणी करावी. शबरीचे केस नीट विंचरुन कोणीही आजपर्यंत बांधले नव्हते. ऋषिपत्नी शबरीच्या केसांत सुंदर फुले घाली. शबरी म्हणजे राणीच शोभे. मग शबरीने स्नान करावे, देवपूजेसाठी सुरेख फुले गोळा करुन आणावीत. दूर्वांकुरांनी गुंफून तिने हार करावेत व आश्रमाच्या दारांवर त्यांची तोरणे करुन लावावीत. ऋषींची पूजा वगैरे झाली म्हणजे शबरीला जवळ घेऊन ते तिला सुंदर स्तोत्रे शिकवीत, सूर्याच्या उपासनेचे मंत्र अर्थासह तिला म्हणावयास सांगत. उषादेवीची सुंदर गाणी ते तिजकडून म्हणवीत. उषादेवीचे एक गाणे मतंग ऋषींना फार आवड. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे होता- 'ती पहा, अमृताची जणू काय ध्वजाच, अमर जीवनाची जणू पताकाच अशी उषा येत आहे. ही उषा लवकर उठणाऱ्याला संपत्ती देते. ही आकाशदेवतेची मुलगी आहे. सुंदर दवबिंदूंचे हार घालून आपल्या झगझगीत रथात बसून ती येते. ती आपल्या भक्तांना काही उणे पडू देत नाही. ही उषादेवी किती सुंदर, पवित्र व धन्यतम अशी आहे!' अशा प्रकारच्या गोड कविता शबरीला मतंग ऋषी शिकवीत असत. ऋषींच्या तोंडून त्या सुंदर कवितांचे विवरण ऐकताना लहानग्या शबरीचेही हृदय भरुन येई.
        एक दिवस रात्रीची वेळ झाली होती. मतंग ऋषींची सायंसंध्या केव्हाच आटपली होती. गाईगुरे बांधली होती. हरिणपाडसे शिंगे अंगात खुपसून निजली होती. ऋषी व त्यांची पत्नी बाहेर अंगणात बसली होती. फलाहार झाला होता. नभोमंडलात दंडकारण्याची शोभा पाहण्यासाठी एकेक तारका येत होती. शबरी आकाशाकडे पाहून म्हणाली, "तात, हे तारे कोठून येतात? काय करतात? रोज रोज आकाशात येण्याचा व थंडीत कुडकुडण्याचा त्यांना त्रास नसेल का होत?" ऋषी म्हणाले, "बाळ, तू अजून लहान आहेस. मनुष्य कसा वागतो, शबरी कशी वागते, हे सारे पाहण्यासाठी हे वरुणदेवाचे हेर आहेत, हे तारे वरुणदेवतेचे दूत आहेत. डोळ्यांत तेल घालून मनुष्याची कृत्ये ते पाहत असतात व माणसांची वाईट कृत्ये पाहून ते तारे रडतात. त्यांचे जे अश्रू त्यांनाच तू दवबिंदू म्हणतेस. झाडामाडांच्या पानांवर ते दवबिंदू टपटप पडताना तू नाही का ऐकलेस? सकाळी पानांफुलांवर, दूर्वांकुरांवर ते अश्रू कसे मोत्यांसारखे चमकतात!" शबरी म्हणाली, "तात, मी आज त्या हरिणपाडसास बाणाने टोचले, ते त्यांना दिसले असेल का?" ऋषी म्हणाले, "होय. दिवसा लोकांकडे लक्ष ठेवण्याचे काम सूर्य करतो; रात्री ते काम चंद्र व तारे करतात." शबरीचे ते प्रेमळ व निष्कपट डोळे पाण्याने डबडबून आले व ती म्हणाली, "तात, मघा त्या मोराच्या पिसाऱ्यातील पीस उपटण्यास मी गेले, ते पाहून तारे आज रडतील का? मोर कसा निजला होता!" ऋषी म्हणाले, "होय. परंतु हे काय? वत्से शबरी, अशी रडू नकोस. पूस, डोळे पूस आधी. तू त्या ताऱ्यांची प्रार्थना कर व म्हण, आजपासून हरणांना, मोरांना मी दुखविणार नाही." शबरीने हात जोडले व आकाशाकडे तोंड करुन ती म्हणाली, "हे देवदूतांनो, हे तारकांनो, या मुलीला क्षमा करा. माझ्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आजपासून बाणाच्या टोकाने हरणांस टोचणार नाही, पक्ष्यांची पिसे उपटणार नाही. मला क्षमा करा."
ऋषीने शबरीचे वात्सल्याने अवघ्राण केले. व ऋषिपत्नीने तिला प्रेमभराने हृदयाशी धरिले.
ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, तू फार गुणी आहेस."
शबरीच्या गंगायमुना थांबल्या व ऋषिपत्नीच्या मांडीवर डोके ठेवून ती झोपी गेली.
शबरी हळूहळू वयाने वाढत होती, मनाने वाढत होती. सत्य, दया, परोपकार यांचे ती धडे घेत होती. तिचे मन आता फुलासारखे हळुवार झाले होते. झाडांच्या फांदीलासुद्धा धक्का लावताना तिला आता वाईट वाटे.
एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, परमेश्वरास वाहण्यासाठी दोनचार फुले फार तर आणावीत. फुले हे वृक्षांचे सौंदर्य आहे. वृक्षांचे सौंदर्य आपण नष्ट करु नये. फूल घरी आणले तर किती लवकर कोमेजते; परंतु झाडावर ते बराच वेळ टवटवीत दिसते. आपण त्या फुलाला त्याच्या आईच्या मांडीवरुन ओढून लवकर मारतो. सकाळच्या वेळी फुलांचे हृदय, शबरी, भीतीने कापत असते. आपली मान मुरगळण्यास कोण खाटीक येतो, इकडे त्यांचे लक्ष असते. शबरी, आपण दुष्ट आहोत. मनुष्यप्राण्याला आपल्या प्रियजनांच्या संगतीत मरणे आवडते; या फुलांनाही तसेच नसेल का वाटत? शबरी, हे फूल तुझ्यासारखेच आहे. तेही हसते व कोमजते; त्यालाही जीव आहे. झाडामांडाकडे, फुलपाखरांकडे सुद्धा प्रेमाने पाहावयास शिकणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे होय."
शबरी म्हणाली, "तात, लहानपणी मी तर शिकार करीत असे! माझे बाबा हरणे मारुन आणीत; शेळ्या, मेंढ्या आमच्याकडे मारल्या जायच्या."
ऋषी म्हणाले, "शबरी, ते तू आता विसरुन जा. आता निराळे आचरण ठेवावयास तू शिक. उगीच कोणाला दुखवू नकोस, कोणाची हिंसा करु नकोस. शेतीभाती करावी, वृक्षांची फळे खावीत, कंदमुळे भक्षावीत, अशी राहणी चांगली नाही का? शबरी, तुला चिमटा घेतला तर कसे वाटेल?"
         इतक्यात ऋषिपत्नी बाहेर आली व म्हणाली, "मी तुम्हाला सांगू का कालची गंमत? त्या अशोकाच्या झाडावरील फुलांचा तुरा तोडून घेण्याची शबरीला अतिशय इच्छा झाली होती. तिने तीनतीनदा हात पुढे करावेत व आखडते घ्यावेत. शेवटी तिच्या डोळ्यांत पाणी आले व तिने त्या फुलांना चुंबून त्यांच्याकडे कारुण्याने पाहिले आणि ती निघून गेली. शबरी, मी सारे पाहत होते बरं का!" शबरी लाजली व ऋषीला कृतार्थता वाटली. हे रानफूल सात्त्विक सौंदर्याने, गुणगंधाने नटताना पाहून त्याला का धन्य वाटणार नाही? शबरी आता वयात आली, ती यौवनपूर्ण झाली. एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, तू शिकली सावरलीस, सद्गुणी झालीस. आता तू मोठी झाली आहेस. घरी जा. ब्रह्मचर्याश्रम सोडून गृहस्थाश्रमात तू आता प्रवेश कर; विवाह करुन सुखाने नांद." शबरी म्हणाली, "तात, मला हे पाय सोडून दूर जाववत नाही; मी इथेच तुमची सेवा करुन राहीन." त्या वेळेस ऋषी आणखी काही बोलले नाहीत. त्यांनी परभारे भिल्ल राजाला निरोप पाठविला, 'तुझी मुलगी आता उपवर झाली आहे; तरी तिला घेऊन घरी जा व तिचा विवाह कर.' निरोपाप्रमाणे राजाने दुसऱ्या एका भिल्ल राजाच्या मुलाची वर म्हणून योजना केली व शबरीला नेण्यासाठी तो आश्रमात आला. ऋषीने राजाचे स्वागत केले व त्याला फलाहार दिला. शबरीला पित्याच्या स्वाधीन करताना त्याने तिला शेवटचा उपदेश केला- "शबरी, सुखाने नांद प्राणिमात्रांवर प्रेम कर. सत्याने वाग. रवी, शशी, तारे आपल्या वर्तनाकडे पाहत आहेत, हे लक्षात धर. वत्से, जा. देव तुझे मंगल करो व तुला सत्पथावर ठेवो!" शबरी सद्गदित झाली होती. ऋषिपत्नीने तिला पोटाशी धरिले व म्हटले, "बाळे शबरी, अधूनमधून येत जा हो आश्रमात. आम्हाला आता हे घर खायला येईल. चुकल्याचुकल्यासारखे होईल. पूस हो डोळे. जाताना डोळ्यास अश्रू आणू नयेत. आता तुझा विवाह होईल. पती हाच देव मान. नीट जपून पावले टाक. तू शहाणी आहेस." मोठ्या कष्टाने शबरी निघाली. ऋषी व ऋषिपत्नी काही अंतरापर्यंत, गोदेच्या प्रवाहापर्यंत पोचवीत गेली. एक हरिणशावक शबरीने बरोबर नेलेच. शबरी गेली व जड पावलाने ऋषी व ऋषिपत्नी आश्रमात परत आली. त्या दिवशी त्यांस चैन पडले नाही. शबरीची पदोपदी त्यांना आठवण येई. आज दहा वर्षांनी शबरी राजवाड्यात परत आली होती. ती गेली त्या वेळी लहान होती, आज ती नवयौवनसंपन्न झाली होती. गेली तेव्हा अविकसित मनाने गेली; आज विकसित मनाने- सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी सद्गुणांनी फुललेल्या मनाने ती आली होती. शबरी लगेच आईला भेटली. सर्वांना आनंद झाला. दुपारची वेळ झाली होती व शबरी माडीवर दरवाजात उभी राहून आजूबाजूस पाहत होती, तो तिच्या दृष्टीस कोणते दृश्य पडले? एका आवारात चारपाचशे शेळ्यामेंढ्या बांधलेल्या होत्या. बाहेर कडक ऊन पडले होते. त्या मुक्या प्राण्यांना पाणी पाजले नव्हते, खाण्यास घातले नव्हते व त्यांजवर छाया नव्हती. उन्हात ते प्राणी तडफडत होते! शबरीचे कोमल मन कळवळले आणि ती तीरासारखी खाली गेली व आईला म्हणाली, "आई, ती मेंढरे कोकरे तिकडे का ग डांबून ठेविली आहेत? ना तेथे छाया, ना जल, ना चारा; जलविणे कशी माशाप्रमाणे तडफडत आहेत! आई, का गं असे?" आई म्हणाली, "बाळ, त्यांची पीडा, त्यांचे क्लेश उद्या संपतील. उद्या तुझा योजलेला पती येईल. तो श्रीमंत आहे. शेकडो लोक त्यांचेबरोबर येतील. त्यांना मेजवानी देण्यासाठी उद्या ह्या साऱ्यांची चटणी होईल. जा, तिकडे खेळ, मला काम आहे." शबरीच्या पोटात धस्स झाले! ती कावरीबावरी झाली. भिल्लांच्या हिंसामय जीवनाचा आजवर तिला विसर पडला होता. तिच्या मनात शेकडो विचार आले- 'उद्या माझ्या विवाहाचा मंगल दिवस! सुखदु:खाचा वाटेकरी, जन्माचा सहकारी उद्या मला लाभणार! माझ्या आयुष्यात उद्याचा केवढा भाग्याचा दिवस! उद्या आईबाप, आप्तेष्ट आनंदित होतील; परंतु या मुक्या प्राण्यांना तो मरण्याचा दिवस होणार! माझ्या विवाहसमारंभासाठी यांना मरावे लागणार! आणि मला पती मिळणार तोही असाच हिंसामय वृत्तीचा असणार! मी पुनश्च त्या हिंसामय जीवनात पडणार! छेः! कसे माझे मन कासावीस होत आहे! माझे विचार मी कोणास सांगू? माझे कोण ऐकणार येथे! नको, हा विवाहच नको. हा मंगल प्रसंग नसून अमंगल आहे! माझ्या जीवनाच्या सोन्याची पुन्हा राख होणार अं? आपण येथून तत्काळ निघून जावे. रानावनात तपश्चर्येत काळ घालवावा." शबरीचे डोळे भरुन आले. ती आता रात्रीची वाट पाहत बसली. वाड्यात सर्वत्र लग्नघाई चाललीच होती. शबरी फाटकी वल्कले अंगावर घालून विरक्तपणे रात्री निघून गेली! कोणालाही ते माहीत नव्हते, फक्त अंधकाराला माहीत होते. मतंग ऋषी आश्रमात ब्रह्मध्यानात मग्न होते. सकाळचे काम करण्यात ऋषिपत्नी गढून गेली होती. इतक्यात शबरी तेथे आली. शबरीला पाहताच मोर नाचू लागले, हरणे उड्या मारु लागली, गाईंची वासरे हंबरु लागली. ऋषींनी डोळे उघडले. मुखकळा म्लान झालेली, दृष्टी अश्रूंनी डवरलेली अशी शबरी पाहून, ते आश्चर्यचकित झाले. शबरीच्या मुखेंदूवरील अश्रूंचे पटल पाहून ऋषींचे अंतःकरण विरघळले. शबरीने येऊन वंदन केले व एखाद्या अपराधिनीप्रमाणे ती जरा दूर उभी राहिली.
        मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, आज तर तुझ्या विवाहाचा मंगल दिवस. तू आज येथे रडत परत का आलीस? तुला कोणी रागे का भरले? आईबापांशी भांडण का झाले? शबरी, आईबापांसारखे अन्य दैवत नाही. बोल, अशी मुकी का तू?" ऋषी कोणाजवळ बोलत आहेत, हे पाहण्यासाठी ऋषिपत्नी बाहेर आली व पाहते, तो काल परत गेलेली शबरी! ती उद्गारली, "शबरी, अगं इकडे ये ना अशी. तू का कोणी परकी आहेस? अशी रडू नकोस. रडूनरडून डोळे लाल झाले! प्रेमळ पोर! ये अशी इकडे व सांग काय झाले ते." ते प्रेमळ शब्द ऐकून शबरी जवळ आली. सहानुभूतीच्या व प्रेमाच्या शब्दांनी बंद ओठ उघडतात, बंद हृदये उघडी होतात. ऋषिपत्नीच्या खांद्यावर मान ठेवून शबरी ओक्साबोक्शी रडू लागली. ऋषिपत्नी म्हणाली, "शबरी, अशी किती वेळ रडत बसणार तू? उगी नाही का राहत? काय झाले ते सारे सांग तर. या रडण्याने आम्ही काय बरे समजावे?" शबरीने डोळे पुसले आणि ती हात जोडून म्हणाली, "आई, तात, मला येथेच आश्रमात राहू द्या. मला आजपर्यंत आपण आधार दिलात, तसाच यापुढे द्या. मला नाही म्हणू नका. मी माझे आयुष्य आनंदाने येथे कंठीन, आश्रमाची झाडलोट करीन, गाईगुरे सांभाळीन, सडासंमार्जन करीन, आपले चरण चुरीन, तुमचे अमोल बोल ऐकेन." ऋषी म्हणाले, "शबरी, तू तर विवाहासाठी गेली होतीस. तू आता यौवनसंपन्न झाली आहेस. आश्रमात तरुण मुलीला ठेवणे आम्हालाही जरा संकटच वाटते. शिवाय, येथे दक्षिणेकडील राक्षासांचा कधीमधी हल्ला येईल. तू पतीसह संसार करावास, हे योग्य. वेल ही वृक्षावर चढल्यानेच शोभते. शबरी, असा वेडेपणा करु नकोस. जा, घरी माघारी जा. सुखाचा नेटका संसार कर." शबरीला हुंदका आला, तो तिला आवरेना. ती स्फुंदस्फुंदू झाली. पुनरपि धीर करुन सद्गदित स्वराने ती म्हणाली, "तात, असे कठोर नका होऊ. मला मग आजपर्यंत शिकवलेत तरी कशासाठी? सत्य, दया, हिंसा, परोपकार, प्रेम इत्यादी गुण आपण शिकवलेत. मी घरी गेले तर माझ्या विवाहासाठी शेकडो मुक्या प्राण्यांचा संहार होणार! ती मेंढरे कशी तडफडत होती! तात, भिल्लांचे जीवन हिंसामय आहे. मला मिळेल तो पती व सारी सासरची मंडळी हिंसामय जीवनात आनंद मानणार; येथे मी कशी सुखाने राहू? मला इकडे आड, तिकडे विहीर असे झाले आहे. 'बाप खाऊ घालीना, आई भीक मागू देईना' अशी स्थिती माझी झाली. गंगा आसऱ्यासाठी समुद्राकडे गेली व समुद्राने तिला झिडकारले, तर तिने जावे कोठे? नदी जलचरांवर रागावली तर त्यांनी कोठे जावे? महाराज, माझ्याबद्दल आपल्या मनात संशय येऊ देऊ नका. मी तरुण असले, तरी आपल्या पवित्र सान्निध्यात असल्यावर माझे पाऊल वेडेवाकडे पडणार नाही. आपले संरक्षण असले, आपली कृपादृष्टी असली, आपला आशीर्वाद असला, म्हणजे माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाही दुष्टाची छाती नाही. मला नाही म्हणू नका. मी तुमची मुलगी. तुम्ही वाढविलीत, तुम्ही पदरात घ्या. नका पायाने लोटू तात, कृपा करा. आई, कृपा कर!" ते करुणरसाने थबथबलेले शब्द ऐकून ऋषींचे दयामय अंतःकरण वितळले. ऋषी शबरीला म्हणाले, "मुली, तू मनाने फार थोर झाली आहेस. राहा, माझ्या आश्रमात तू राहा." शबरीच्या अंगावर एकदम मूठभर मांस चढल्यासारखे झाले. रडणारे डोळे हसू लागले, प्रेममय व शांत झाले. लगेच शबरी घरच्याप्रमाणे वागू लागली, कामधंदा करु लागली, पंपासरोवराचे पाणी भरुन घट आणू लागली. शबरीच्या जीवनात पावित्र्य, समाधान, आनंद, सरलता यांचे झरे वाहू लागले. शबरीचा पिता आला; परंतु मतंग ऋषींनी त्याला सर्व समजावून सांगितले. पिता न संतापता पुनरपि माघारी गेला. शबरीचे जीवन संथपणे वाहू लागले. शबरी आता तपस्विनी झाली, योगिनी झाली. तिच्या चर्येत, चालचलणुकीत पंपासरोवराची गंभीरता व पवित्रता होती. तेथील वनराजीची भव्यता व स्निग्धता, सुरभिता व सौम्यता तिच्या हृदयात होती. मतंग ऋषींजवळ सुखसंवाद करण्यात तिचे दिवस आनंदाने निघून जात. एक दिवस मतंग ऋषी म्हणाले, "शबरी, परमेश्वर जरी सर्व चराचरांत भरुन राहिला असला, तरी काही वस्तूंत परमेश्वराचे वैभव जास्त स्पष्टपणे प्रतीत होते व आपले मन तेथे विनम्र होते. उदाहरणार्थ, हा वटवृक्ष पहा. सर्व वृक्ष-वनस्पतींत ईश्वरी अंश भरलेला आहेच; परंतु गगनाला आपल्या फांद्यांनी उचलून धरणारा, आजूबाजूस आपले प्रेमळ पल्लवित हात पसरुन विश्वाला कवटाळू पाहणारा, हजारो पाखरांस आश्रय देणारा, पांथस्थांस शीतल व धनदाट छाया वितरणारा हा वटवृक्ष पाहिला, म्हणजे याच्या ठिकाणी असलेले परमेश्वरी वैभव जास्त स्पष्टपणे प्रकट झालेले दिसते आणि आपले मन वटवृक्षाबद्दल भक्तिभावाने भरुन येते. आपण त्याची पूजा करतो. शबरी, सर्व प्रवाहांच्या ठिकाणी परमेश्वर आहेच; परंतु हजारो कोस जमीन सुपीक करणारी, शेकडो शहरांना वाढवून त्यांना वैभवाने नटविणारी एखादी मोठी नदी, तिला आपण अधिक पवित्र मानतो. शबरी, सर्व फुलांच्या ठायी सौंदर्य, सुगंध, कोमलता आहे, पण कमलपुष्पाच्या ठायी हे गुण विशेष प्रतीत होतात; म्हणून त्याला आपण जास्त मान देतो. सर्वत्र असेच आहे. जे जे थोर आहे, उदात्त आहे, रमणीय आहे, विशाल आहे, त्याबद्दल साहजिकच आदर, भक्ती, प्रेम ही आपल्या हृदयात उत्पन्न होतात. शबरी, मनुष्यजातीतही असेच आहे. आपणा सर्वांच्या ठायी परमेश्वरी तत्त्व आहे. परंतु तुझ्या जातीतील लोकांपेक्षा तुझ्यामधील ईश्वरी तत्त्व जास्त स्पष्टपणे दिसून येते. म्हणून तुझ्याबद्दल आदर वाटतो. आकाशाचे प्रतिबिंब सर्वत्र पाण्यात पडलेले असते, परंतु निर्मळ पाण्यात ते स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ पाण्यात स्पष्ट दिसते; त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रतिबिंब निर्मळ हृदयात स्वच्छ पडलेले दिसून येते. शबरी, आपले मन आपण घासून घासून इतके स्वच्छ करावे की, परमेश्वराचे पवित्र प्रतिबिंब येथे पडावे व त्याचे तेज आपल्या डोळ्यांवाटे, वाणीवाटे, आपल्या प्रत्येक हालचालीत बाहेर पडावे. आपण आपले मन व बुद्धी ही घासून स्वच्छ करीत असतानाच इतरांच्याही हृदयाला स्वच्छ करण्याचा आपण प्रयत्न करावा. शबरी, तू तपस्विनी आहेस, तू आपले हृदय पवित्र केले आहेस. तू तुझ्या जातीतील स्त्री-पुरुषांची मनेही निर्मळ व प्रेमळ व्हावीत म्हणून प्रयत्न केले पाहिजेस. स्वतःचे खरे हित साधून परहितार्थ म्हणून सततोद्योग करीत राहणे, हे विचारशील मानवाचे जीवितकार्य आहे." मुनींची ती गंगौघाप्रमाणे वाहणारी पवित्र वाणी शबरी ऐकत होती. ते शब्द आपल्या हृदयात ती साठवीत होती. हात जोडून खाली ऋषींच्या पदकमांलकडे पाहत शबरी म्हणाली, "गुरुराया, ही शबरी अजून वेडीबावरी आहे. ती दुसऱ्याला काय शिकविणार? महाराज, सदैव मला तुमच्या चरणांजवळ ठेवा म्हणजे झाले!" अशा प्रकारचे प्रसंग, असे विचारसंलाप कितीदा तरी होत असत. शबरी आनंदाने जीवन कंठीत होती. वर्षांमागून वर्षे चालली. शबरी प्रेममय व भक्तिमय बनत चालली. तिला पाहून पशुपक्षी जवळ येत. तिच्या डोळ्यांतील प्रेममंदाकिनीने क्रूर पशूही आपले क्रौर्य विसरुन जात. तिच्या हातातून पाखरांनी दाणे घ्यावेत, तिच्या मांडीवर बसून भक्तिभावाने सद्गदित झाल्यामुळे तिच्या डोळ्यांतून घळघळ गळणारे अश्रू मोत्यांप्रमाणे पाखरांनी गिळावेत! शबरी - भिल्लाची पोर शबरी - प्रेमस्नेहाची देवता बनली होती. कधी कधी मतंग ऋषींच्या बरोबर शबरी इतर थोर ऋषींच्या आश्रमातही जात असे. शबरीची जीवनकथा, तिचे वैराग्य, तिचे ज्ञान व तिची शांत मुद्रा, हे पाहून ऋषी विस्मित होत व ते तिच्याबद्दल पूज्य भाव व्यक्त करीत. ऋषिपत्नींजवळ शबरी चराचरात भरलेल्या प्रेममय परमेश्वरांसंबंधी बोलू लागली म्हणजे ऋषिपत्नी चकित होत व शबरीच्या पायाला त्यांचे हात जोडले जात! मतंग ऋषी आता वृद्ध झाले व त्यांची पत्नीही वृद्ध झाली; दोघेही पिकली पाने झाली होती. आता सर्व कामधाम शबरीच करी. सेवा हाच तिचा आनंद होता. रात्रीच्या वेळी ऋषींचे सुरकुतलेले अस्थिचर्ममय पाय चेपताना, कधीकधी तिच्या पोटात धस्स होई. 'हे पाय लवकरच आपणास अंतरणार का?' असा विचार तिच्या मनात येऊन डोळ्यांत अश्रू जमत. झोप न लागणाऱ्या गुरुलाही झोप लागावी; परंतु मृत्यू लवकरच गुरुला नेणार का, या विचाराने शबरीस मात्र झोप लागू नये. ऋषींच्या उपदेशाच्या गोष्टी ऐकताना तिच्या मनात विचार येई की, 'असे अमोल बोल आता किती दिवस ऐकावयास मिळणार? ही पवित्र गंगोत्री लवकरच बंद होईल का? ऋषींचे शब्द सतत ऐकत बसावेत,' असेच तिला वाटे.
एक दिवस मतंग ऋषी तिला म्हणाले, "शबरी, मरण हे कोणाला टळले आहे? केलेली वस्तू मोडते, गुंफलेला हार कोमेजतो. जे जन्मले ते मरणार, उगवले ते सुकणार, सृष्टीचा हा नियमच आहे. शबरी, एक दिवस तुला, मला हा मृण्मय देह सोडून जावे लागणार, फूल कोमेजले तरी त्याचा रंग, त्याचा सुगंध आपल्या लक्षात राहतो. त्याप्रमाणे माणूस गेले तरी त्याचा चांगुलपणा विसरला जात नाही." मतंग ऋषी असे बोलू लागले की शबरीला वाटे, ही निरवानिरवीची भाषा गुरुदेव का बोलत आहेत? हे शेवटचे का सांगणे आहे? आज मतंग ऋषी स्नानसंध्या करीत होते. एकाएकी त्यांना भोवळ आली. शबरी तीराप्रमाणे तेथे धावत आली आणि पल्लवांनी वारा घालू लागली. ऋषिपत्नीही आली व तिने पतीचे मस्तक मांडीवर घेतले. ऋषींनी डोळे उघडले. ते म्हणाले, "आता हा देह राहत नाही. तुळशीपत्र आणा, पंपासरोवराचे पाणी आणून मला दोन थेंब द्या. शबरी, जीवन अनंत आहे. मरण म्हणजे आनंद आहे."
शबरीने पाणी देऊन तुळशीपत्र तोंडावर ठेविले. 'ओम् ओम्' म्हणत मतंग ऋषी परब्रह्मात विलीन झाले! ऋषींचे प्राणोत्क्रमण होताच जिच्या मांडीवर त्यांचे मस्तक होते, ती त्यांची प्रेमळ पत्नीही एकाएकी प्राण सोडती झाली व तीही तेथे निश्चेष्ट पडली. पतिपत्नी ऐहिक जीवन सोडून चिरंतन जीवनात समरस झाली. परंतु शबरी-बिचारी शबरी-पोरकी झाली. तिला आता कोण पुसणार? तिला ज्ञान कोण देणार? रोज नवीन विचारांची नूतन सृष्टी तिला कोण दाखविणार? "शबरी, आज तू काहीच खाल्ले नाहीस. ही दोन फळे तरी खाच." असे तिला प्रेमाग्रहाने आता कोण म्हणणार? शबरीचा आधार तुटला. मूळ तुटलेल्या वेलीप्रमाणे तीही पडली; परंतु सावध झाली. तिने चिता रचली आणि गुरुचा व गुरुपत्नीचा देह तिने अग्निस्वाधीन केला.
मृत्युदेव आला व शबरीची ज्ञान देणारी मातापितरे तो घेऊन गेला. मृत्यू ही प्राणीमात्राची आई आहे. मृत्यू हा तरी कठोर नाही. मृत्यू नसता तर या जगात प्रेम व स्नेह ही दिसतो ना! मृत्यूमुळे जगाला रमणीयता आहे. हे मृत्यो, तुला कठोर म्हणतात ते वेडे आहेत. तू जगाची जननी आहेस. सायंकाळ झाली म्हणजे अंगणात खेळणारी मुलेबाळे दमली असतील, त्यांना आता निजवावे, म्हणजे पुन्हा ती सकाळी ताजीतवानी होऊन उठतील, या विचाराने आई त्यांना हळूच मागून जाऊन घरात घेऊन येते; त्याप्रमाणे या जगदंगणात मुले खेळून दमली असे पाहून आयुष्याच्या सायंकाळी, ही मृत्युमाता हळूच मागून येते व आपल्या बाळांना निजविते आणि पुन्हा नवीन जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी पाठवून देते. अमरजीवनाच्या सागरात नेऊन सोडणारी मृत्युगंगा पवित्र आहे. शबरीच्या मनात मृत्यूसंबंधी असेच विचार येत होते का? त्या आश्रमात ती आता एकटीच बसे. परंतु मनुष्य कितीही विचारी असला तरी त्याला पूर्वीच्या अनेक प्रेमळ स्मृती शेकडो सुखदुःखाचे प्रसंग आठवतात आणि त्याचे हृदय भरुन येते, नव्हे, येणारच. शबरीचे असेच होई. ती सकाळी गोदावरीचे पाणी आणी. तथापि गोदेच्या तीरावर पाणी भरण्याऐवजी तिचा भरलेला हृदयकलश नयनद्वारा गोदेच्या पात्रात रिता होई. परंतु मोरांच्या केकांना ती सावध होई व जड पावलांनी आश्रमात परत येई. शबरीचे लक्ष आता कशातही लागेना. आश्रमातील हरणे, मोर यांना तिने इतर आश्रमांत पाठवून दिले व आपण एकटीच रानावनांत आता ती विचरत राही. झाडेमाडे हे तिचे मित्र, पशु-पक्षी हेच सखे-सवंगडी. ती कधी सुंदर गाणी गाई, स्तोत्रे म्हणे. कधी आकाशाकडे पाहत बसे, कधी हसे, तर कधी रडे. शबरी एक प्रकारे शून्यमस्तक झाली होती.
एक दिवस शबरी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेली होती. तेथे पुष्कळ ऋषिमंडळी जमली होती. बोलता बोलता भारद्वाज ऋषी म्हणाले, "ऐकलेत का? अयोध्येच्या दशरथाचा प्रतापी पुत्र रामचंद्र, पित्याच्या वचनपालनार्थ राज्यवैभव सोडून बारा वर्षे वनवासात घालविण्यासाठी निघाला आहे. त्याची पत्नी सीता व बंधू लक्ष्मण हीही त्याच्याबरोबर आहेत. केवढे हे धीरोदात्त व त्यागमय वर्तन!" दुसरे ऋषी म्हणाले, "हेच परमेश्वराचे अवतार होत. परमेश्वराचे स्वरुप अशाच थोर विभूतींच्या द्वारा प्रकट होत असते. केवढी सत्यभक्ती! केवढा त्याग!" शबरी ऐकत होती ती म्हणाली, "खरेच, पूर्वी गुरुदेवांनी मला असेच सांगितले होते, 'जेथे जेथे विभूतिमत्व दिसेल तेथे तेथे परमेश्वर आहे, असे समज.' असे ते म्हणत. हा प्रभू रामचंद्र. त्याची पत्नी व त्याचा भाऊ सर्व वनवास पत्करतात, खरोखरच देवांचेच हे अवतार! मला केव्हा बरे त्यांचे दर्शन होईल? खरेच केव्हा बरे दर्शन होईल?"
शबरीचे डोळे तेजाने चमकत होते. तपश्चर्येने, शोकाने व वयाने ती आता वृद्ध दिसू लागली होती. तिचे शब्द ऐकून ऋषी मोहित झाले; परंतु एकाएकी शबरी तेथून, 'कधी बरे रामचंद्र पाहीन? कधी ती मूर्ती पाहीन?' असे म्हणत वेड्यासारखी पळत सुटली व बावरलेल्या हरिणीप्रमाणे रानात निघून गेली. 
      "राम, राम. केव्हा बरे तो नयनाभिराम राम मी डोळ्यांनी पाहीन व त्याचे पाय माझ्या आसवांनी भिजवीन? काय रे वृक्षांनो, श्रीरामचंद्राच्या येण्याची वार्ता तुमचा मित्र जो वायू, त्याने तुम्हांस कानात सांगितली आहे का? सांगा ना! केव्हा येईल तो रामचंद्र? केव्हा दिसेल ती सीतादेवी?" शबरी वेडी झाली होती. तिने रोज ताजी फुले जमवावीत, त्यांचे सुंदर हार दिवसभर करावेत आणि मग आज रामचंद्र आला नाही, नाही आला, असे म्हणून ते हार नदीच्या पाण्यावर सोडून द्यावेत. रोज तिने गोड गोड फळे रामचंद्रासाठी गोळा करुन आणावीत आणि- "नाही आला माझा राम, नाही पुरले माझे काम, नाही आला मेघश्याम, नाही संपले माझे काम." असे म्हणत ती फळे वानरांपुढे टाकावीत. कधी कधी पाखरांचे शब्द ऐकून शबरी म्हणे, 'ही पाखरे माझ्या रामाला साद घालीत आहेत का? पाखरांनो, तुम्हाला उडता येते; मग तुम्हालाही जर अजून रामचंद्र आलेला दिसत नाही तर मला कसा दिसणार?' वाऱ्याचे सळसळणे ऐकून, 'राम येत नाही म्हणून का वारा रडतो आहे?' असे तिने म्हणावे. रात्री काळवंडलेला चंद्र पाहून 'राम दिसत नाही म्हणून का चंद्र काळवंडला आहे?' असे तिने उद्गारावे. शबरीला एकच ध्यास, एकच भास, एकच तिला वेड, एकच तिचा विचार. शबरी रामचंद्रासाठी अधीर झाली होती
रामचंद्र, सीतादेवी, लक्ष्मण दंडकारण्यात आली. एक दिवस भारद्वाज ऋषींकडे ती राहिली. तेथे अनेक ऋषी आले होते. रामचंद्रांचा विनय, धीरोदात्तता, तेज, पावित्र्य हे पाहून ऋषिजनांचे हृदय भरुन आले. वैराग्यमूर्ती, त्यागदेवता सीता पाहून त्यांचे हृदय विरघळले. सीता म्हणाली, "इकडील प्रेमळ सहवासात मला काटे फुलांसारखे वाटतात व दगडांची कोवळी पाने होतात. प्रभूंच्या संगतीत मला सर्व स्वर्गच आहे." रामचंद्रांना शबरीची गोष्ट ऋषींकडून कळली व ही वेडी शबरी कोठे भेटेल, असे त्यांनाही झाले.
तिघंजण वनवासार्थ पुढे निघाली. ऋषींच्या आश्रमात स्वागतसत्कार घेत ती फार दिवस राहत नसत. कारण ती सुखोपभोगासाठी आली नव्हती, वनात वैराग्यवृत्तीने व स्वावलंबनाने राहण्यास ती आली होती. त्रिवर्ग पुढे चालले व शबरीच्याच कथा त्यांच्या चालल्या होत्या एक साधी भिल्लकन्या, परंतु सत्संगतीने संस्काराने ती किती उदात्त विचारांची व थोर आचाराची झाली होती, ते ऐकून त्यांना विस्मय वाटला. खरेच, पडीत जमिनीत खते घालून, तिची नीट मशागत करुन जसे उत्कृष

370. बहिरा बेडूक

        6 बेडूक एका नदीमध्ये राहत होते. नदीमध्ये राहुन राहुन ते बोर व्हायला लागले.  ते 6 बेडूक एक दिवस विचार करतात की, आपण सर्वजण जंगलात फिरायला जाऊया आणि सर्व मिळुन ते एक दिवसी जंगलात फिरायला जातात. जंगलात फिरत असताना दुपारी त्यांना तहान लागते ते इकडे तिकडे पाणी शोधतात, थोड्या वेळाने त्यांच्या प्रयत्नांना फळ पण मिळते, त्यांना एक पडकी विहिर दिसते. सर्वजण त्या विहिरीजवळ धावत जातात आणि लगेच त्या विहिरीत उडया मारतात. पोटभर पाणी पितात, विहिरीमधले किडे वैगरे खातात आणि तेथेच मुक्कामी राहतात. काही दिवसानंतर त्या विहिरीतले पाणी कमी व्हायला लागते. त्यामुळे 6 ही बेडूक विहीरी बाहेर निघण्याची तयारी करतात. वरती येण्यासाठी 6 ही बेडूक खूप प्रयत्न करतात परंतु वरती येताना घसरण एवढी होती की, पाय घसरून ते खाली पडायचे. वरती येण्याचा 6 ही बेडूक खूप प्रयत्न करत होते परंतु त्यांना अपयशच येत होते. प्रयत्न करुनसुद्धा यश मिळत नाही म्हणून 5 बेडूक विहिरीतच राहण्याचा निर्णय घेतात. आपलं काय होईल याचा निर्णय ते देवावर सोडतात आणि दुःखी होऊन बसतात.
       6 बेडूकपैकी एक लहान बेडूक असतो तो वरती येण्याचा प्रयत्न चालूच ठेवतो. 5 बेडूक त्या छोट्याशा बेडकाला सांगत, विहिरीतून वरती जाणे अशक्य आहे. आम्ही वरती जाऊ शकलो नाही मग तु कसा जाऊ शकशील. तो छोटा बेडूक वरती जायचा परत खाली पडायचा. एके वेळी तो वरती जाण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच यशस्वी होतो. वरती आल्यावर तो विहिरीत पाहून खाली असणाऱ्या 5 ही बेडकाला धन्यवाद करतो. विहिरीतले 5 ही बेडूक विचारात पडतात.  ते त्या छोट्या बेडकाला हाताने इशारा करुन विचारतात तु वरती कसा जाऊ शकला. तेंव्हा तो लहान बेडूक जोरात सांगतो की, मी वरती जाताना तुम्ही सर्वजन जोरात काही तरी सांगायचे,  मला वाटलं तुम्ही मला प्रोत्साहीत करत आहात. मी तुमचं बोलणं ऐकु शकत नव्हतो कारण मी बहिरा आहे.  तुमच्या सर्वांमुळे मी विहिरीच्या बाहेर येऊ शकलो...त्यासाठी धन्यवाद. आशा प्रकारे एका छोट्या बेडकाने आपला जीव वाचवला.
        या प्रेरणादायी गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, आपल्याला थोडं बहिरं व्हावं लागेल. बहिरं व्हा म्हणजे कानाचा पडदा फाडायचा नाही तर... काही निगेटिव्ह गोष्टीना इग्नोर करायच आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करता असाल किंवा इतर काही करत असाल तर, लोकांच्या निगेटिव्ह बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या नकरात्मक बोलण्याकडे सकरात्मक नजरेने पाहा.जसे की, लहान बेडूक बाकी बेडकाचे बोलणे सकरात्मकतेने पाहत होता तसेच आपण करायला हवे. लोकं जेंव्हा पण आपल्याबद्दल काही निगेटिव्ह गोष्टी बोलतील तेंव्हा असं समजा की, ते तुम्हाला प्रोत्साहीत करत आहेत. लोकं आपल्याला निगेटिव्ह गोष्टी बोलतात, तुझ्याकडून MPSC परीक्षा पास होणार नाही, तु कधी यशस्वी होऊ शकत नाही... वैगरे वैगरे  आशा निगेटिव्ह लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. जेंव्हा पण निगेटिव्ह लोकं काही बोलतील त्यांना Thank You म्हणा. धन्यवाद.

✍️✍️ नरेंद्र दिपके

368. आर्मीतील जावेद शिपाई

 मेरे से ज्यादा कौन जानता होगा?
कदाचित शंभर वेळा जावेदचे आभार मानून झालेले होते, तरीही मी पुन्हा एकदा जावेदजवळ गेलो, त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणालो, "थँक्स जावेद! माझे हात तू वाचवलेस!"
सियाचिन ग्लेशियर, या जगातील सर्वाधिक उंचीवरच्या युद्धभूमीवरचा आमचा कार्यकाळ पूर्ण करून, आम्ही नुकतेच ग्लेशियरच्या पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पवर पोहोचलो होतो. 
"सर, बार-बार थँक्यू बोलके शरमिंदा मत करो!" कसनुसं हसत शिपाई जावेद मला म्हणाला. 
"जावेद, तू असं म्हणतोयस कारण, कदाचित तुला कल्पना नाहीये, एखादा हात किंवा पाय गमावणं किती भयानक असू शकतं!"
"साब, इस बात को मेरे से ज्यादा कौन जानता होगा?" 
माझ्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून जावेद पुढे म्हणाला, 
"साहेब, १९८९ साली माझे वडील याच सियाचिन ग्लेशियरवर तैनात होते. बर्फाच्छादित पर्वतावरून चालताना, एका घळीत पडून त्यांना गंभीर इजा झाली. त्यांचा जीव कसाबसा वाचला, पण त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. ते हॉस्पिटलात होते तेंव्हा मीच त्यांची देखभाल करायचो. दोन्ही पाय गमावल्यानंतरच्या त्या भयंकर मानसिक धक्क्यातून सावरायला मीच त्यांना मदत केली. त्यामुळे ते अपंगत्वाच्या भावनेवर मात करून, त्यांचे कोलमडलेले आयुष्य पुन्हा उभे करू शकले." 
हे ऐकून, काही क्षण मी स्तब्ध झालो, आणि मग एकदम त्याला म्हणालो, "जावेद, मला सांग, तू सियाचिन ग्लेशियरवरचं हे अवघड फील्ड पोस्टिंग स्वतःहून का मागून घेतलंस? तुझी बटालियन तर सध्या पीस स्टेशनमध्ये आहे. तूही अडीच-तीन वर्षे तिकडेच आरामात राहू शकला असतास!"
"सर, माझे वडील नेहमी म्हणतात की प्रत्येक फौजीने एकदा तरी ग्लेशियरवर नोकरी केली पाहिजे. आमचं संपूर्ण कुटुंबच फौजी आहे सर. मला हे आव्हान स्वीकारायचंच होतं."
"तुझ्या आईने तुला अडवलं नाही?"
"तिनं अडवलं सर. पण माझे वडील म्हणाले, की जर तू व्यवस्थित काळजी घेतलीस तर तुला काहीही होणार नाही. आता तिथली परिस्थिती पूर्वीसारखी  राहिलेली नाही. आजकाल नवनवीन साधनं, उपकरणं, आणि पोशाख वापरायला मिळतात. ग्लेशियरवर पुष्कळ सोयीदेखील झालेल्या आहेत." 
सहजच, गेल्या तीन महिन्यांमधला एकेक प्रसंग मी आठवू लागलो. 
ग्लेशियरवर तैनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एकेक जोडीदार (Buddy) ठरलेला असतो. जोडी-जोडीनेच राहायची, आणि सगळीकडे वावरायची पद्धत असते. माझा Buddy जावेदच होता. तो प्रत्येक गोष्ट नेमून दिलेल्या पद्धतीनुसारच करीत असे. मात्र ती त्याच्या वडिलांची शिकवण होती, हे त्याच्याकडून आता नुकतेच मला समजले होते. कधी-कधी तर तो मला सौम्य शब्दात झापायचाही, आणि ग्लेशियरवरचे ठराविक 'ड्रिल' पाळायला लावायचा.
ग्लेशियरवरच्या उणे ३०-४० अंश तापमानामुळे, एकदा माझ्या हातांना 'Chilblain' झाले.
Chilblain, या आजारामध्ये, बोटांतल्या लहान-लहान रक्तवाहिन्या फुटतात आणि बोटांमध्ये रक्त साकळते. बोटे सुजून लाल होतात, असह्य खाज सुटते आणि तीव्र वेदनांमुळे मनुष्य बेजार होतो.
वेळीच त्यावर प्रतिबंधक उपाय किंवा उपचार न केल्यास बोटे सडून, झडून जाऊ  शकतात. 
आमची एकमेव लाईफलाईन असलेले हेलिकॉप्टर, खराब हवामानामुळे ग्लेशियरवर उतरू शकत नव्हते. त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये हलवणे लांबणीवर पडत होते. 
दहा दिवसांनंतर जेंव्हा हेलिकॉप्टर आले, तोपर्यंत आमच्या एका जवानाला High Altitude Pulmonary Oedema (HAPO) चा त्रास सुरु झालेला होता. या आजारात फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधून पाणी बाहेर झिरपते आणि फुफ्फुसात भरते. श्वासोच्छ्वास कमी-कमी होत जातो आणि मनुष्य दगावू शकतो. एका जवानाचा जीव वाचवणे किंवा माझ्या हाताची बोटे वाचवणे, यापैकी एकच काहीतरी, एका वेळी करणे शक्य होते. अर्थातच, मला ग्लेशियरवर सोडून, त्या जवानाला हेलिकॉप्टरमधून नेले गेले. 
त्या दहा दिवसात जावेदनेच माझी शुश्रूषा केली. स्वहस्तेच करण्याची, माझी अक्षरशः सर्वच्यासर्व कामे, तो आपल्या हाताने करीत असे! माझ्या हातांना ऊब पुरवण्याची आणि कोरडे ठेवण्याची दक्षता तो घेई. हळू-हळू माझ्या बोटांवरची सूज उतरत गेली. जर Chilblain बळावले असते तर गँगरीन होऊन, अगदी माझे हात नाही तरी, दोन्ही हातांची काही बोटे मी निश्चितच गमावली असती.  
ही सगळी चित्रमाला माझ्या मनातून सरकत असतानाच, माझ्या दोन्ही हातांची सर्व बोटे मी हलवून पाहत होतो. सियाचिनवरचा कार्यकाळ संपवून, हाती-पायी धडधाकट अवस्थेत मी परत निघालो होतो, आणि याचे श्रेय निःसंशय जावेदलाच होते. 
मी बेस कँपच्या ऑफिसर मेसकडे चालत निघालो. सियाचिन ग्लेशियरवरच्या सर्वात दुर्गम पोस्टवर, अतिशय खडतर परिस्थितीत सेवा बजावून मी परतलो होतो. एखाद्या हिरोसारखे माझे स्वागत झाले. CO साहेबांनी अतिशय उत्साहात माझ्यासोबत हस्तांदोलन केले. इतर अधिकारी माझ्यासाठी ड्रिंक हातात घेऊन सरसावले. पण मला मात्र काहीच खायची-प्यायची इच्छा होईना.
माझे मन सारखे जावेदच्या वडिलांकडे धाव घेत होते. स्वतःचे दोन्ही पाय गमावल्यानंतरही आपल्या मुलाला सियाचिनसारख्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहित करणारा तो सैनिक निश्चितच एक थोर माणूस होता. 
माझे अभिनंदन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे शब्दही माझ्या कानात शिरत नव्हते.
ग्लेशियरवर अधूनमधून हिमप्रपात (Avalanche) होत असत. अशाच एका हिमप्रपातामध्ये, जसबीरसिंग नावाच्या शिपायाने आपला जीव गमावला होता. त्याची आठवण मला अस्वस्थ करीत होती. सदैव उत्साहाने भारलेल्या जसबीरसिंगचा चेहरा राहून-राहून माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
त्याचे शब्द जणू मला ऐकू येत होते, "साबजी, घरी पोहोचल्या-पोहोचल्या मी पल्सार बाईक विकत घेणार आणि तडक अमृतसरच्या हरमंदिर साहिबपुढे माथा टेकायला जाणार आहे!" 
पण आज कुठे होता आमचा जसबीर? 
सलग ९० दिवसांनंतर प्रथमच मी दाढी आणि आंघोळ केली! आरश्यात स्वतःचे रूप पाहताना मनात संमिश्र भावना होत्या. ग्लेशियरवरच्या जीवघेण्या हवामानामुळे झालेली त्वचेची अवस्था माझी मलाच बघवत नव्हती. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, कपाळापासून किमान एक इंच मागेपर्यंतचे केस झडून, मला टक्कल पडू लागले होते. पण, हात-पाय गमावण्याच्या तुलनेत हे काहीच नव्हते! 
त्या रात्री जड अंतःकरणानेच मी अंथरुणावर पडलो. थोडाच वेळ झोपलो असेन. पहाटे तीनच्या सुमारास मला कुणीतरी उठवल्यामुळे मी धडपडत उठलो.
मला उठवणाऱ्या जवानाने सांगितले, "सर, जावेदला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे, त्याला बेस कँपच्या हॉस्पिटलात न्यावे लागले आहे."
मी लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रेस्पिरेटर लावलेल्या, आणि अनेक उपकरणे अंगाला जोडलेल्या अवस्थेत, कसाबसा श्वास घेत असलेला जावेद मला दुरूनच पाहता आला.
मला त्याला भेटायचे होते. जरी त्याची शुश्रूषा करता आली नाही तरी, निदान त्याचा हात माझ्या हातात घ्यायचा होता. पण, डॉक्टर मला त्याच्याजवळ जाऊ देईनात. त्यांनी मला इतकेच सांगितले की, जावेदला Cerebral Veinous Thrombosis  (मेंदूमधील रक्ताची गुठळी) चा अटॅक आला होता. दुसऱ्याच दिवशी त्याला विमानाने चंडीगढच्या कमांड हॉस्पिटलात हलवले गेले. 
दहा दिवसानंतर, जावेद गेल्याची बातमी जेंव्हा मला मिळाली, तेंव्हा मी रजेवर होतो. माझ्या कानावर माझा विश्वासच बसेना. मी आमच्या युनिटच्या डॉक्टरला फोन करून विचारले, "डॉक्, प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट अक्षरशः नियमामध्ये लिहिल्याबरहुकूम करणाऱ्या जावेदला मृत्यूने गाठलेच कसे?"
डॉक्टरने मला शांतपणे समजावले.
सियाचिन ग्लेशियर आणि तिथले हवामान, हे एखाद्या कडव्या शत्रूपेक्षाही भयानक असतात. ते कोणाचा, केंव्हा आणि कसा घात करतील ते परमेश्वरच जाणे. समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचीवर वाहणारे बर्फाळ वारे, जीवघेणी थंडी, प्राणवायूची कमतरता, आणि केवळ डबेबंद अन्न!तेदेखील फक्त शरीराला पोसण्यापुरते!
निसर्गरूपी शत्रूच्या या सैनिकांनी शरीरावर केलेले वार, ग्लेशियरवर असताना काय, किंवा त्यानंतरच्या आयुष्यातही काय, आपल्याला केंव्हा घायाळ करतील याचा काही नेम सांगता येत नाही. हे सर्व आपल्या भौतिक शक्तीपलीकडचेच नव्हे तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे आहे.  
मला पूर्ण कल्पना होती की, सख्ख्या भावासारखे प्रेम ज्याच्यावर केले, अश्या आपल्या सोबत्याच्या हौतात्म्याची वार्ता घेऊन, त्याच्या आईवडिलांना भेटणे, ही एखाद्या सैनिकाच्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा असते. तरीही मी जावेदच्या घरी गेलो. 
त्याच्या आईवडिलांसमोर माझ्या अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून मी उसने अवसान आणले होते. 
पण, परतीच्या वाटेवर मात्र, दुःखाने माझा श्वास कोंडतो की काय असे मला वाटू लागले. 
पुन्हापुन्हा जावेदचे शब्द माझ्या कानात घुमायला लागले, "साबजी, मेरे रिश्तेमें एक लडकी है जिसको मैं तहेदिल से प्यार करता हूँ । अगली छुट्टीमें पक्का उसको मैं शादी के लिये पूछनेवाला हूँ ।"
एका निर्मनुष्य ठिकाणी मी माझी टॅक्सी थांबवली. ड्रायव्हरला सांगितले, "तू गाडीतून उतरून,  दूर कुठेतरी जाऊन, अर्धा तास थांब".
त्या अर्ध्या तासात मी अक्षरशः धाय मोकलून रडलो. अखेर एक सैनिकसुद्धा माणूसच असतो. त्याच्या डोळ्यातून पाणीच नव्हे, तर हृदयातून रक्ताचे अश्रूही वाहत असतात! 
________
मूळ इंग्रजी अनुभवलेखन:
ब्रिगेडियर पी. एस. गोथरा (सेवानिवृत्त)
मराठी भावानुवाद: 
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

शनिवार, २७ मे, २०२३

367. बापाला मिठी मारून बघितलं आहे का?

मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का ?
मारून बघा, ह्रुदय स्थिर होऊन जाईल.

मोठा झाल्यापासुन कधी 
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का? 
घेऊन बघा, बापाची दाढी गालाला रुतल्यावर, 
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे, याची जाणीव होऊन जाईल.

बापाची चप्पल येते म्हणुन कोणी बाप होत नाही, 
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत.
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ? 
घेऊन बघा, बापाची किंमत कळुन जाईल .

बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल, 
साधु लोकांना बाबा म्हंटल, 
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ? 
म्हणुन बघा, 
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.

बापाचं घरावर नाव नाही, 
बापाचं हातावर नाव नाही, 
बापाचं छातीवर नाव नाही, 
बापाचं गाडीवर नाव नाही, 
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका , 
कधी परका होऊन बघितला आहे का ? 
होऊन बघा, बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.

आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला साम्य बघितलं आहे का ? 
बघुन घ्या,  दोघ ही प्रकाश देतात फक्त वेळा वेगवेगळ्या असतात.

बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो, 
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा, 
ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते. आपल्या प्रगती व उन्नतीमुळे फक्त आपले "आई-वडीलच "  खुश असतात.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

366. लोभ...

    एक राजा होता तो अतिशय न्यायप्रिय आणि लोकस्नेही आणि धार्मिक स्वभावाचा होता. तो दररोज मोठ्या भक्तिभावाने शनिदेवाची पूजा व स्तुती करीत असे. एके दिवशी शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन देऊन म्हणाले - "राजन, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे मला सांग, तुझी काही इच्छा आहे का?"
प्रजेवर प्रेम करणारा राजा म्हणाला - "भगवंता, तुझ्या कृपेने माझ्याकडे सर्वस्व आहे, राज्यात सुख-शांती नांदत आहे तरीही माझी एकच इच्छा आहे की जसे तुम्ही मला दर्शन देऊन आशीर्वाद दिलात, तसे माझ्या सर्वांनी प्रजेलाही दर्शन द्यावे.
"हे शक्य नाही" - असे म्हणत शनिदेवाने राजाला समजावले. पण प्रजेवर प्रेम करणारा राजा देवाकडे हट्ट करू लागला.
शेवटी भगवंतांना आपल्या भक्तापुढे नतमस्तक व्हावे लागले आणि म्हणाले - "ठीक आहे, उद्या त्या टेकडीजवळ तुझे सर्व प्रजेला घेऊन या आणि मी सर्वांना टेकडीच्या माथ्यावरून दर्शन देईन."
हे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि त्याने देवाचे आभार मानले. दुसर्‍या दिवशी, संपूर्ण शहराला उद्या माझ्यासह पर्वताच्या पायथ्याशी पोहोचण्यास सांगितले गेले, जिथे देव तुम्हा सर्वांना दिसेल. दुस-या दिवशी राजा आपली सर्व प्रजा व नातेवाईकांसह टेकडीकडे चालू लागला. चालताना एका ठिकाणी तांब्याच्या नाण्यांचा डोंगर दिसला. काही लोक तिथून पळू लागले. म्हणूनच शहाण्या राजाने सर्वांना ताकीद दिली की त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्ही सर्वजण देवाला भेटणार आहात, या तांब्याच्या नाण्यांमागे तुमच्या नशिबाला लाथ मारू नका. पण लोभ आणि लालसेच्या आहारी गेलेले काही लोक तांब्याची नाणी असलेल्या टेकडीकडे पळत गेले आणि नाण्यांचा गठ्ठा बनवून आपल्या घराकडे चालू लागले. तो मनात विचार करत होता, आधी ही नाणी जमा करा, मग आपण देवाला भेटू. राजा खिन्न मनाने पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर चांदीच्या नाण्यांचा चमकणारा डोंगर दिसला. यावेळीही उरलेल्या विषयातील काही लोक त्या मार्गाने धावू लागले आणि चांदीच्या नाण्यांचा गठ्ठा बनवून आपल्या घराकडे चालू लागले.  अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही असा विचार त्याच्या मनात चालू होता. इतकी चांदीची नाणी पुन्हा सापडतील किंवा न मिळतील, देव कधीतरी नक्कीच सापडेल. तसेच काही अंतर चालल्यावर सोन्याच्या नाण्यांचा डोंगर दिसला. आता लोकांमध्ये राहिलेले सर्व लोक आणि राजाचे नातेवाईकही त्या बाजूने धावू लागले. तेही इतरांप्रमाणे नाण्यांचे गठ्ठे घेऊन आपापल्या घरी गेले.
निघून गेले आता फक्त राजा आणि राणी उरली होती. राजा राणीला म्हणू लागला...
"हे बघ किती लोभी आहेत हे लोक. त्यांना देव भेटण्याचे महत्वही कळत नाही. देवासमोर सगळ्या जगाची संपत्ती काय..?"
बरोबर आहे - राणीने राजाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि तो पुढे जाऊ लागला. काही अंतर चालून गेल्यावर राजा आणि राणीला दिसले की सात रंगांची आभा पसरवणारा हिऱ्यांचा डोंगर आहे. आता राणीलाही विरोध करता आला नाही, तीही हिऱ्यांच्या आकर्षणात धावली आणि हिऱ्यांचे गठ्ठे बनवू लागली. तरीही तिचं समाधान झालं नाही, म्हणून तिने साडीचा पल्लूही बांधायला सुरुवात केली. वजनामुळे राणीचे कपडे शरीरापासून वेगळे झाले, पण हिऱ्यांची लालसा अजूनही सुटली नाही. हे पाहून राजाला अत्यंत अपराधी व अनास्था वाटली. अत्यंत दु:खी मनाने राजा एकटाच पुढे निघून गेला.
देव अक्षरशः त्यांची वाट पाहत उभा होता. राजाला पाहून भगवान हसले आणि विचारले - "तुमची प्रजा आणि तुमचे प्रियजन कुठे आहेत. मी त्यांना भेटण्यासाठी खूप दिवसांपासून अधीरतेने वाट पाहत आहे." राजाने शरमेने आपले डोके झुकवले.
तेव्हा परमेश्वराने राजाला समजावले...
"राजन, जे लोक त्यांच्या जीवनात माझ्यापेक्षा भौतिक ऐहिक प्राप्ती अधिक मानतात, त्यांना कदाचित माझी प्राप्ती होत नाही आणि ते माझ्या स्नेह आणि कृपेपासूनही वंचित आहेत..!!"
बोध : जे प्राणी आपल्या मनाने,  बुद्धीने आणि आत्म्याने माझा आश्रय घेतात आणि सर्व सांसारिक नाती सोडून जे मला स्वतःचे मानतात तेच माझे लाडके होतात.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

शुक्रवार, २६ मे, २०२३

364. दोघे....

         जयवंत आजींच्या घरची बेल वाजली, सकाळी आठच्या सुमारास. आणि रोलिंग चेअरवर बसून हलकेसे झोके घेत... चहा पिता पिता 'तलत' ऐकणार्‍या आजींची, तंद्री भंगली. जरा नाखुषीनेच ऊठत, आजींनी दरवाजा ऊघडला. दारात जोग आजोबा ऊभे होते. अनपेक्षीत कोणी असं दारात दिसल्यावर, जो बेसिक गोंधळ ऊडायचा तो ऊडलाच आजींचा. गाऊनचं वरचं बटण लावलंय ना, केसांना चाप बांधलाय ना, कपाळावर टिकली आहे ना वैगरे गोष्टी... अर्ध्याहून कमी मिनिटांत चेक करत, आजींनी दरवाजा ऊघडला. 
         "अरेच्चा जोग तुम्ही?... एवढ्या सकाळी सकाळी?... काही प्राॅब्लेम तर नाही ना?" हे तीन प्रश्न सेफ्टी डोअरच्या दोन कड्या, नी लॅच काढता काढता आजींनी विचारले. सेफ्टी डोअर संपुर्ण ऊघल्यावर, पुर्ण दिसले होते जोग आजोबा त्यांना... आणि त्या बावचळल्याच. अंगात बंडी घातलेले जोग आजोबा, फक्त पंचा गुंडाळून दारात ऊभे होते. आजींच्या चेहर्‍यावरचं हे अवघडलेलं प्रश्नचिन्ह ओळखत,  जोग आजोबा म्हणाले... "जयवंत बाई जरा घोळच झाला अहो... आंघोळीहून बाहेर आलो... बंडी चढवली नी बेल वाजली तेवढ्यात... केर गोळा करणारा आला होता... त्याला केराची बादली दिली... नी जरा जिन्यावरुन झाडू मार सांगायला बाहेर आलो... तोच वार्‍याने दरवाजा धडाम्मकन लागला हो... एक चावी शेजारी कांबळींकडे असते, तर ते तिथे मालवणात अडकलेले... आणिक एक चावी लेकीकडे असते... पण ती गोरेगावात रहायला... बरं तिला कळवायचं तर फोन हातात नाही, अन् तिचा नंबर डोक्यात नाही... कुठे जावं कळेना... बाकीच्या घरांतुन तरणी लोकं रहातात, मुलं - बाळं असलेली... त्यांनी दरवाजा ऊघडला असता - नसता... म्हणून मग आलो ईथेच... आपण समवयस्क आणि समदुःखीही". 
         जयवंत आजींनी कपाळावर हात मारत, जरासं चुकचुकत... आत घेतलं जोग आजोबांना. "तुमचा चहा तरी झालाय का जोग?" आजींनी विचारलं. "नाही हो... ऊदबत्ती दाखवल्या शिवाय चहा घेत नाही ना मी... माझ्या घरी". ह्या पाॅझ नंतर आलेल्या 'माझ्या घरी' चा अर्थ... 'दुसर्‍यांच्या घरी अशी काही अट नाही' असा होतो, हे कळलं आजींना. त्या हसूनच बोलल्या... "तुम्ही बसा जोग... चहा आणते तुमच्यासाठी". असं म्हणतच आजी आत गेल्या. जोग आजोबांनी दोन - तीन वेळा बसायचा प्रयत्न केला... पण त्यांचाच पंचा काही त्यांना तसं करु देईना... मग ऊभ्यानेच ते ऐकू लागले 'तलत'.  फुंकर मारत आपण पीस ऊडवत बसतो ना हवेत, तसं 'तलत' गाण्याचं कडवं ऊडवत होता... हळुवार. 'दिल में रख लेना ईसे हाथोंसे ये छूटे ना कही.. गीत नाजुक है मेरा शीशे से भी टुटे ना कही'. जोग आजोबांनी मस्त मान ऊडवली, नी ऊजवा हात ऊंचावत तलतला कंपनी दिली... 'गुनगुनाऊंगा वोही गीत मै तेरे लिये'. 'तेरे लिये' म्हणता म्हणता ते वळायला... आणि जयवंत आजी चहाचा कप घेऊन पुढ्यात यायला, एकच गाठ पडली. सलज्ज हसल्या त्या, नी जोग आजोबांना नुतनच दिसली त्यांच्यात.
           घसा खाकरत, कल्पनेचं ऊधळलेलं वारु आवरत... आजोबांनी कप घेतला आजींच्या हातातून. "अहो हे काय तुम्ही बसला नाहीत?". आजींनी विचारलेल्या प्रश्नावर, ऊत्तरादाखल आजोबांचा हात पंचावर गेला... आजींना कळून चुकला प्राॅब्लेम. गालातल्या गालात हसतच त्या म्हणाल्या... "थांबा... आमच्या ह्यांचा एखादा लेंगा देते तुम्हाला". आजोबा म्हणाले "अहो नको... हा एवढा चहा संपवून जातो मी". आजींनी विचारलं "कुठे जाणार?... बाहेर सगळं बंद आहे... तुम्ही तर मास्कही लावला नाहियेत... नुसत्या पंचावर जास्त शेकायचे ऊगिच". खळखळून हसल्या त्या... आणि प्रसंग डोळ्यांसमोर येऊन, चहाचा घोट घशातच अडकलेले आजोबा कसेनुसे हसले. आजी आत गेल्या लेंगा आणायला, नी आजोबांनी कप ठेवला टिपाॅयवर. एव्हाना 'तलत' ने तस्विर बनवायला घेतली होती. लेंगा आजोबांच्या हातात देत, आजी कप ठेवायला आत गेल्या. दोन - चार मिनिटं जरा आतच वेळ काढून, बाहेर आल्या त्या. आजोबा छानपैकी लेंग्यात सोफ्यावर बसले होते... 'तलत' ला दाद देत. आजी जाऊन रोलिंग चेअरवर बसल्या. 'तलत' च्या आवाजाने पुन्हा, हलकेसे झोके द्यायला सुरुवात केली होती चेअरला. मस्त तासभर ऊलटला समग्र तलत ऐकण्यात.. आणि जे ऐकलं त्यावर, भरभरुन बोलण्यात. 
आजी बोलल्या आजोबांना "मी मस्त कांदे पोहे करते आपल्याला". आजोबांच्या "नको अहो नको" ला न जुमानता, त्या ऊठल्याच. आजोबा म्हणाले "तुम्ही लोक सोडे घालून जसे करता पोहे, तसे जर केलेत तर चालतील". जयवंत आजींनी डोळे विस्फारुन बघितलं, जोग आजोबांकडे... "जोग तुम्ही हे असलं काही खाता?". आजोबा विचारानेच तोंडात जमू बघणारी लाळ, वेळीच गिळत म्हणाले... "आय जस्ट लव्ह सी फूड.,. सहा महिने बोटीवर असायचो अहो... मेलो नसतो का समुद्राशी दुश्मनी घेऊन". जयवंत आजींच्या अंगात अचानकच, ऊत्साह संचारल्यासारखं झालं. बर्‍याच महिन्यांनी सोडे येणार होते, आज बाटलीतून बाहेर. "आत्ता करते पोहे सोडे घालून... आणि मग जेवायला मस्त भुजणं करते कोळंबीचं आणि कांदे करंदी... मसाला खिचडी बरोबर धमाल येईल खायला". आजींनी नाश्त्याजोडीनेच जेवणाचा खास 'पाठारे प्रभू' मेन्यूही फिक्स करुन टाकला. आणि हा असा बेत, नी आजींचं मन... कसं बरं मोडणार होते जोग आजोबा. पोहे बाकी फर्मासच झालेले. 
        "तुम्हाला रमी खेळता येते?" जोग आजोबांनी विचारलं, जयवंत आजींना... आणि त्यांना जाणवलं, आपण जरा आगाऊपणाच केला. आजींनी एकदम पुढे येत आजोबांकडे, टाळीसाठी हात मागितला... आणि जोरात टाळी मारत म्हणाल्या... "हे आणि मी दिवसभर खेळायचो रमी... आठवड्यातून दोनदा तरी... पैसे लाऊन बरं का... आणि जो जिंकेल, तो रविवारी हाॅटेलींगचा खर्च करायचा... पण दोन वर्षांपुर्वी हे गेले... नी पत्ते बंद झाले माझे... असा अर्ध्यावर 'डाव' मोडल्यावर, एकट्याने 'डाव' लावण्यासाठीही कधी धरले नाहीत मी पत्ते हातात... ह्यांचा एक रमी ग्रुपही होता... प्रत्येक शनिवारी एकाकडे जमून रात्रभर खेळायचे हे लोक... तीन महिन्यांतून एक शनिवार आमचाही यायचा... मग मी ही बसायचे ह्या सगळ्यांसोबत". असं म्हणत आजींनी आणिक एक टाळी मागितली आजोबांकडे. तासभर मस्त डाव रंगला मग रमीचा... आजीच प्लसमध्ये होत्या. "चला आता स्वैपाकाला लागते" म्हणत आजींनी आवरते घेतले पत्ते. "चला मी तुम्हाला चिराचीरीत मदत करतो... फक्त बघाच मी किती फाईन चाॅप करतो कांदा ते... ही ठणठणीत असतांना मी कायम मदत करीत असे हिला... आणि शेवटी शेवटी जेव्हा दोनेक वर्ष, अंथरुणावरच होती ही... मी तर एकहाती सगळा स्वैपाक करत असे... अगदी साग्रसंगीत... अंगारीकेला ऊकडीचे मोदकही बरं का... पण तीन वर्षांपुर्वी ही गेली, नी तेव्हापासून मोस्टली डाळ भातच खातोय... एकट्यासाठी काही करावसंही वाटत नाही... आज पोह्यांनी खरंच चव आली जिभेला". आजी ऊठत म्हणाल्या... "ट्रेलरच झालाय बघून... पिक्चर तर पुढे आहे". 
       आडवा हात मारत जेवले जोग आजोबा, आज बर्‍याच दिवसांनी. जयवंत आजींनीही बर्‍याच दिवसांनी बनवलेलं ईतकं काही, आपल्या व्यतिरीक्त कोणी खाणारं आलंय घरी म्हणून. आपापले जोडीदार गेल्यावर, एकट्याने दिवस ढकलणं चालू होतं दोघांचं. जोग आजोबांची गोरेगावची मुलगी, दोनेक महिन्यातून येत असे एकदा. तर जयवंत आजींची दोन्ही मुलं दोनेक वर्षांतून एकदा, दोघेही फाॅरेनला असल्यामुळे. एका जागी साचलेल्या ह्या एकटेपणाच्या तळ्याचा, आता तर भरती - ओहोटी न येणारा समुद्र झाला होता... या लाॅकडाऊन मुळे. ह्याच तीन खोल्यांतून मुलांना वाढवतांना कमी पडलेली ही जागा, आता अवाढव्य वाटत... खायला येत असे. सत्तरी ओलांडलेले हे दोन जिव, जिवावर आल्यासारखे जिवंत होते बस्स. पण आजचा दिवस निर्विवादपणे छान गेलेला. दोघांच्याही सुटलेल्या सवयींच्या शस्त्रांना, आज बर्‍याच दिवसांनी धार काढली गेली होती. 
बडीशोप खातांंना अचानक लागलेल्या ठसक्यामुळे, जोग आजोबांनी घाईतच रुमाल काढला बंडीच्या खिशातून... आणि चाव्यांचा गुच्छ पडला खाली जमिनीवर.  "हात्तीच्या मारी... साॅरी... म्हणजे पाहिलात माझा वेंधळेपणा... किल्ल्या बंडीच्या खिशात आणि मी आपला बेघर समजत स्वतःला, बाहेर वेळ काढतोय... आत्ता आठवलं... याच जुडग्यात कपाटाचीही किल्ली आहे... मी पलंगावरचं पडलेलं चेकबुक, कपाटात ठेवलं ड्रावरमध्ये... कपाट बंद करत, किल्ली बंडीच्या खिशात ठेवली मी... आणि विसरलो... श्श्या... पण माझ्यामुळे तुम्हाला ऊगिच त्रा....". जोग आजोबांना तिथेच तोडून, जयवंत आजी बोलल्या... "ईतकं एक्सप्लेनेशन द्यायची खरंच गरज नाही अहो... सकाळी चहा पित असतांनाच, मला आवाज आला होता चाव्यांचा, तुमच्या खिशातून... पण मी तुम्हाला काही जाणवू दिलं नाही... असा अभावानेच मिळणारा 'दुकटेपणा', सोडायचा नव्हता मला... आतल्याआत गुदमरायला होतं हो, ह्या छाताडावर बसलेल्या 'एकटेपणा' ने... आणि आज मला तो, छातीवरुन ऊतरवायचाच होता". 
आता दोघांच्याही डोळ्यांतून, पाणी तरळत होतं. जोग आजोबांनी हात जोडले जयवंत आजींना. आणि दार ऊघडून ते म्हणाले "येतो". आजींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना विचारलं "कधी?". 'दोघे' ही खळखळून हसले होते, टाळ्या देत एकमेकांना.

- सचिन श देशपांडे

363. देवीची ओटी

 आज एक मुलगी रेल्वे स्टेशन ला ५ रू मीटर नी ताजेतवाने तोरण विकत होती...
बाजूचे सगळे २०/३० रू  ला विकत होते, 
मी तीला विचारलं, सगळे २०/३० रूपयांनी विकत आहेत, तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे म्हणून पाच रुपयांनी विकतेस का..?
 ती थोडं थांबली व मला म्हणाली...
दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुल ..बाप नाही. आई निघून गेली..  आजी सांभाळते मला.
 सकाळी ₹१००/- दिले आजीने डाळ तांदूळ आणायला...
विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं...
म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वा फुल दोरा सुई विकत घेतली ₹८०/-  खर्च झाले ...
पहिले मी पण विस रुपयांना विकले, 
आजीने दिलेल्या १००/- रुपयाचे ३००/- रुपये केले. आता उरलेले पाच तोरण विकले, तर ठिक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून...
मी शांत पणे खिशात हात घालता १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हंटले पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको माझ्या कडून तुला तुझ्या मेहनतीचे गिफ्ट, घरी जा ह्यातील एक  तोरण तू दरवाजाला लाव आणि हो हे घे अजून ५० रुपये, जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा...
कालंच बायको म्हणत होती... 
देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू...

आज तिची इच्छा पूर्ण झाली.🙏

-रामदास यादव.

365. देव नसलेले देव्हारे . . .

कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे,
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावास्या जास्त आहे.

हल्ली माणसं पहिल्या सारखं दुःख कुणाला सांगत नाहीत,
मनाचा कोंडमारा होतोय् म्हणून आनंदी दिसत नाहीत.

एवढंच काय तर एका छताखाली राहणारी तरी माणसं जवळ राहिलीत कां ? 
हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत कां ?

अपवाद म्हणून असतील काही  पण प्रमाण खूप कमी झालंय्,
पैश्याच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलंय्. 

नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात,
एखाद दुसरा शब्द बोलतात  पण काळजातलं दुःख लपवतात.

जाणे येणे न ठेवणे, न बोलणे या गोष्टी नैमित्तिक घेऊ नका, 
गाठी उकलायचा प्रयत्न करा जास्त गच्च होऊ देऊ नका. 

धावपळ करून काय मिळवतो ? याचा जरा सखोल विचार करा, 
बँकेचं बचतखातं भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मनं भरा.

एकमेकाजवळ बसावं,बोलावं आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी थोडं सरळ रेषेत चालावं.

समुद्री चोहीकडे पाणी आणि पिण्याला थेंबही नाही,
अशी अवस्था झालीय माणसाची  
यातून लवकर बाहेर पडा. चर्चा करून उपाय शोधा

नुसतं Convent, CBSE, MBA,IIT, MS, पॅकेज,
managements Skill, Second Home, Europe Tour,
Registry, Dimond Jwelary याला काहीही अर्थ उरणार नाही. 

माणुसकी नसलेली घरे अन् देव नसलेले देव्हारे,
कितीही सुंदर असले  तरी त्याचा काय उपयोग ? ..      

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

361. ऐ वतन, मेरे वतन...

          बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते. एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती. आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली.  एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन 'फौजी' लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!
        मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले.  त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, "रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे." त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या 'रक्षणकर्त्या' च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले. 
          मी "थँक यू" म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, "Not at all, Ma'am" या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, "तुम्ही सैन्यदलात आहात का?" 
"होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे.  महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो."
"अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते."
         सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील 'आँखोंदेखी' ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही).  ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून! ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले!  युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच  भावना आणि हेच  घनिष्ट  परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात! मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. "सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये" हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.
          एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता! चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली!  काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!    त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले. 
          आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. "माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!" हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, "माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!" काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी 'ताज' हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली).  
        "Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र 'काळ'च ठरवतो!"
मेजर शांतपणे बोलत राहिला, "आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते."  ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो.  मी सहज त्याला विचारले, "अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?"
"नाही, मॅडम."
मी आश्चर्यानेच विचारले, "का बरं? का नाही मिळालं?"
"मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!" तो हसत-हसत म्हणाला. त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती.  कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल. निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, "कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?"
"या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"
अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. "जय जवान, जय किसान" हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 
          आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 
"... मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"
 "जय हिंद" 
******
मूळ इंग्रजी अनुभवलेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]
मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]
९४२२८७०२९४

362. तुला कोणाची आठवण येईल ?

( एका मैत्रिणीच्या forward मधून)
 एका सभेत एका गुरूने 30 वर्षांच्या तरुणाला प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.
 - तुम्ही मुंबईत जुहू चौपाटीवर चालत आहात आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, मग काय करणार?
 तरुण म्हणाला - ती दिसेल, आणि तो तिची व्यक्तिमत्व पाहू लागेल.
  गुरूने विचारले - ती मुलगी पुढे गेल्यावर तू पण मागे वळून बघशील का?
 मुलगा म्हणाला- हो, माझी बायको माझ्यासोबत नसेल तर.  (सभेत सगळे हसतात)
 गुरुने पुन्हा विचारले - मला सांग किती दिवस तो सुंदर चेहरा आठवणार?
 तो तरुण म्हणाला, 5-10 मिनिटे असू शकतात, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही.
  गुरू त्या तरुणाला म्हणाले - आता जरा कल्पना करा.. तू जयपूरहून मुंबईला जात आहेस आणि मी तुला पुस्तकांचे एक पाकीट दिले आणि सांगितले की हे पाकीट मुंबईतील एका व्यक्तीला द्यायला हवे.  आपण पाकिटे पोहोचवण्यासाठी त्याच्या मुंबईतील घरी गेला होता.   जेव्हा तुम्ही त्याचे घर पाहिले तेव्हा तुम्हाला कळले की तो अब्जाधीश आहे.  त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये 10 वाहने उभी आहेत आणि 5 वॉचमन घराबाहेर उभे आहेत.  तुम्ही तुमच्या आगमनाची माहिती पॅकेटसह पाठवली, मग ते गृहस्थ स्वतः बाहेर आले आणि तुम्हाला अभिवादन केले. त्याने तुमच्याकडून पॅकेट घेतले.  मग तुम्ही ते ठिकाण सोडून परत यायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला त्यांच्या घरी येण्याची विनंती केली.  तो तुझ्या शेजारी बसला आणि तुला गरम जेवण दिले. तू परत येत असताना त्याने तुला विचारले - तू माझ्या घरी कसा आलास ?
 तू म्हणालास - लोकल ट्रेनमध्ये.
       त्याने त्याच्या ड्रायव्हरला तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाण्यास सांगितले आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचणार इतक्यात त्या अब्जाधीश मान्यवराने तुम्हाला फोन केला आणि विचारले - भाऊ, तुम्ही आरामात पोहोचलात का..!!  आता सांग किती दिवस या माणसाची आठवण ठेवणार?
तरुण म्हणाला - गुरुजी !  त्या व्यक्तीला मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, जोपर्यंत मी मरेपर्यंत.
तरुणाईच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरु म्हणाले - "हे जीवनाचे वास्तव आहे."
  सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते.  हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे.  तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वागण्याच्या सौंदर्यावर जास्त लक्ष द्या.  आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

360. महिलांना सावध करा...

    एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या.एकाच सीटवर शेजारी बसल्या.बस थोडी पुढे गेली.बाईने दोन चाॅकलेट काढल्या.एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली? कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली.ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या. बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली.  यानंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले.या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली.  पण व्यर्थ.ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे?  ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी,रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला. एक निष्पाप जीव गेला.
       शिक्षा मात्र कुणाला? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा. बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा. आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी,  घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादासाठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते. 
-महाराष्ट्र पोलीस
महिलांना सावध करा.कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा.ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.
आपला एक मेसेज आपल्या- 🙎आईचा...🙆 बायकोचा...👧 मुलीचा...👭 बहिणीचा...🙋 प्रेमीकेचा...
जीव वाचवू शकतो...

--विश्वास नांगरे पाटील, IPS,महाराष्ट्र पोलीस.

359. आम्ही मध्यमवर्गीय होतो ..!!

       साधारण 20-25 वर्षांपूर्वी  "मध्यमवर्गीय" ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड' होता.घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजीआजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती.. एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं...पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,"खाऊन माजावं, पण टाकून माजू नये."
      कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी - भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा 'कुचकरा' किंवा 'फोडणीचा भात'.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.मुलांची शाळा म्हणजे 'टेन्शन'चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा.  पुस्तकांचा जरा ' जुगाड ' असायचा. म्हणजे समजा 'अ' ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर 'ब' ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग 'ब' तीच पुस्तकं  'क' ला 40% मधे विकायचा. Purchase Cost ,Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं "अर्थशास्र"  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची. पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा  "दूरदृष्टी च्या" व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.
       बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत. पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा 'अ' करून मोकळा व्हायचा... म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच "स्कोप" उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापाना वर यायचा. शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ' इगो बिगो' कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही. पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना "यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.." आणि मुलांना, "तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला" अशी  "जागतिक" धमकी मिळायची. 12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं .Proposals.. हे आजच्या काळातले  "Highly Personal Issues"  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. ...बाकी सगळा 'लेकुरवाळा' कारभार!!
       आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा 'बाबा' लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या.....आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा 'एजंट' त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा... Share market म्हणजे जुगार.. हा 'समज' अगदी पक्का होता. ' फॅमिली डॉक्टर' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण 'नीतिमत्ता' वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा 'व्यावहारिक' पवित्रा असायचा. जसा 'फॅमिली डॉक्टर' तशीच एक फॅमिली 'बोहारीण' पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  'बोहारिण' एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी 'तहा' ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई....तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  'Deal' चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..
        खरं सांगू का.. ...मध्यमवर्गीय ही काही 'परिस्थिती' नाहीये, ती  "वृत्ती" आहे......साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा 'कणा'.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित 'कर' भरणारे, वाहतुकीचे काटेकोर 'नियम' पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत 'मतदान' करणारे. असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच,' वादळ ' झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण.. प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही......अचानक 'प्रोफेशनल' झालो.माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं. पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या 'गोंडस' नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

358. भाव, अभाव आणि प्रभाव...

 भोजन हे केवळ भोजन नसते तर काय असते वाचावे.
 श्रीकृष्ण युधिष्ठीर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, त्याचप्रमाणें दुर्योधनानें आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्रीकृष्णानें ते नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेंव्हा दुर्योधनानें एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धां गोविंदानें नाकारलं....
भगवंतानें भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हंटले, "दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात ! "
 १) भाव २) अभाव ३) प्रभाव
१) अन्न देणाऱ्याचा प्रेमभाव
२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव
३) भुकेल्याच्या मनांत अन्नदात्याबद्दलचा प्रभाव
मुरारी म्हंटला, "दुर्योधना, तुझा जेवू घालण्यात प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्यानें माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळें माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५६ भोग मी का स्विकारावें ? "
लहानपणी घरात भरपूर दुध, दही, लोणी असुनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धां सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.
तेंव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतु, दुराचारीचा पक्ष धरल्यानें कान्हानें त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं ! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर !
मन करम वचन छांड चतुराई ।
तबहि कृपा करत रघुराई ।।
मग काय! भगवंत विनाआमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतु, दैव म्हणा किंवा प्रारब्ध विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारांत उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं...
विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हंटली, " लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही ?"
आणि मग काय सांगू ! या साध्वीने आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजुला ठेवलेले केळीचे घड घेतले आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली आणि केळी बाजुला टाकू लागली.
थोड्या वेळानें जेंव्हा विदुर काका आले, तेंव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांनी भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, "हे गिरीधर, केळी गोड आहेत ना ?"
एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुलनंदन म्हंटला, 
"काका, केळी फार गोड आहेत. परंतु काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणीच्या यशोदा मातेनें भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनानें "
आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रुंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान ! विदुर काकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं ?
भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हे भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या ह्रदयांत साठवायला वेळ नाही लागणार.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

357. जगण्याचं सूत्र...

 भाऊ काय बहीण  काय ,
 नुसता फापट पसारा,  
 कोण कोणाला  विचारतंय 
 कुणालाही विचारा ...

कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना, 
जगलात काय मेलात काय 
माया कुणाला येईना ...

संवेदनशीलता आता 
फारशी कुठं दिसत नाही,  
 बैठकीत किंवा ओसरीवर 
 गप्पाची मैफिल बसत नाही ...

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  
यातच हल्ली माणसाचा 
होत आहे The End ...

 Luxury मधे लोळतांना 
 फाटकं गाव नको वाटतं,  
 जवळचं नातं असलं तरी 
सांगायलाही  नको वाटतं ...

उच्च शिक्षित असूनही 
माणूस आज Mad वाटतो
इंटेरियर केलेल्या घरामधे 
लुगडं, धोतर Odd वाटतं..  

 सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
 कसे काय Posh असतील?  
 पार्लर मधून आणल्या सारखे 
 चिकणे चोपडे कसे दिसतील? 

उन्हा तान्हात पळणारी 
माणसं काळी पडणारच,  
गरिबीनं गांजल्यावर 
चेहऱ्याचा रंग उडणारच ...

 कुरूप ते नाहीत 
 कुरूप तू झालास,  
 प्रेम नात्यावर करायचं सोडून
 दिसण्याला भुलून गेलास ..  

  सुख असो वा दुःख असो   
  आपल्या माणसाला विसरू नये.  
   कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 
   माणसावर प्रेम करायचं विसरलास..

  आपल्या पासून दूर जाशील तर मानसिक आरोग्यासाठी 
  दारोदार भिक मागत फिरशील ...

दुसऱ्याचा  छळ करून 
तुम्ही सुखी होणार नाही,  
पॅकेज कितीही मोठं असू द्या 
जगण्यात मजा येणार नाही. .  

 जग जवळ करतांना 
 आपली माणसं तोडू नका,  
 अमृताच्या घड्याला 
 अविचाराने लाथाडू नका..!

मी का बोलू?  फोन का करू?
का कमीपणा घेऊ ? का नमते घेऊ? का नेहमी मिच समजून घ्यायचं ?
असे बरेच सारे "मी" आहेत
जे आयुष्यात विष कालवतात ...
म्हणून शक्य असेल तर मी पणा सोडा....

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...