दिल्लीला जाणाऱ्या माझ्या मित्राला सोडायला मी मुंबई सेंट्रल स्टेशनवर पोहोचलो होतो. गाडी सुटायला जेमतेम अर्धा तास उरला होता त्यामुळे आम्ही दोघे झपाट्याने गाडीच्या दिशेने भराभर पावले टाकत असतानाच कुणीतरी पाठीमागून माझ्या खांद्यावर थाप मारली. मी मागे वळून बघितले तर एक साधारण तिशी पस्तिशीचा युवक मला म्हणाला, ओळखलं का मला? मी आधीच गडबडीत होतो त्यामुळे त्याला चटकन बोलून गेलो नाही ओळखलं आणि मी आता जरा घाईत आहे. हा माझा मित्र दिल्लीला चालला आहे . माझ्या बोलण्यावर तो युवक म्हणाला दादा मी सुद्धा दिल्लीला चाललोय असं म्हणून तो देखील आमच्या बरोबरच चालायला लागला माझ्या मित्राला त्याच्या डब्याजवळ मी सोडले. सुदैवाने या युवकाचा देखील तोच डबा निघाला. आपल्या जागेवर सामान ठेवून तो खाली प्लॅटफॉर्मवर उतरला माझ्याजवळ येऊन माझ्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि तो म्हणाला किती वर्षाने तुम्ही भेटला मला दादा. तुम्ही ओळखलं नसणार मला हे लक्षांत आले माझ्या. गाडी सुटायला वेळ कमी आहे उरलेला म्हणून मीच पटकन सांगतो तुम्हाला. पार्लेश्वर मंदिराजवळ आमचा फुलांचा स्टाॅल आहे. तुम्ही तिथे यायचात अधूनमधून.
आता मला सगळं आठवलं. त्या छोट्या स्टाॅलवर एक मुलगा कायम फुलपुडी बांधण्यात गर्क असायचा. सकाळी शाळेत जाऊन संध्याकाळी तो स्टाॅलवर यायचा वडिलांना मदत करायला. मुलगा जात्या हुशार होता. शिक्षणाचे महत्त्व मी खुपदा त्याच्या मनावर बिंबवले होते. दोन तीन वेळा मी जमेल तेवढी आर्थिक मदत त्याच्या वडिलांजवळ दिली होती. दादा, तुम्ही आणि तुमच्या सारख्या आणखी काही जणांनी केलेल्या मदतीमुळे माझ्या बाबांनी मला शिकण्याचा आग्रह केला. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून सध्या मी दिल्लीत एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीला आहे. लहानपणी जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या स्टाॅलवर आलात तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या मनांत कायम शिक्षणाच्या महत्वाची फुलपुडी बांधत गेलात त्याचाच हा परिणाम आहे. त्या तुमच्या फुलपुडीने माझ्या आयुष्यात आत्मविश्वासाचा, महत्वाकांक्षेचा आणि जिद्दीचा सुगंध कायम दरवळत राहीला आणि त्याच जोरावर आज आईबाबांच्या आयुष्यात मी सुखसमृद्धीच्या आणि समाधानाच्या पुड्या बांधत आहे. जुना व्यवसाय म्हणून आजही बाबा स्टाॅल वर बसतात पण फक्त वेळ जातो म्हणून. आमचं स्वतःचं असं दोन खोल्यांचं घर मी घेतलं तेव्हा आईबाबांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू मी नाही विसरू शकत कधीच. गाडी सुटायला जेमतेम पाच मिनिटे उरली होती. आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. समाधानाने मी त्याला म्हणालो निरंजन तुझ्या मनांत मी जश्या शैक्षणिक महत्वाच्या पुड्या बांधत गेलो तेच काम आता तुला तुझ्या समाजातील मुलांच्या बाबतीत करायचं आहे. दादा अगदी नक्की करीन मी हे काम आणि पुढच्या वेळी जेव्हा घरी येईन तेव्हा तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाईन. आईबाबांना देखील आनंद होईल तुम्हाला बघून. एव्हाना गाडीची शिट्टी वाजली. निरंजन गाडीत चढला. दरवाजातून हात हलवत त्याने माझा निरोप घेतला. डोळ्यांच्या समोरून संथ गतीने पुढे जाणाऱ्या त्या गाडीसोबत निरंजन सारख्या मुलाचे आयुष्य मार्गी लावल्यासाठी मी वेळोवेळी त्याच्याशी केलेली बातचीत मला आठवत गेली.
वाचकांनो तुम्ही देखील तुमच्या आजुबाजुला असलेल्या निरंजन सारख्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या मनांत शैक्षणिक आवश्यकता आणि चांगल्या आचारविचारांच्या जमेल तितक्या फुलपुड्या सोडण्याचा मनांपासून प्रयत्न केलात तर मला ते जास्त आवडेल.
© सतीश बर्वे १९.०२.२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा