सोमवार, १ मे, २०२३

295. प्रॉफिट अँड लॉस...

            अविनाश काय झालंय?  ऑफिसहून आल्यापासून असा सॅड का आहेस तू? अवनी, तुला तर माहितीच आहे की स्वतःचा बिझनेस सुरु करायचं माझं स्वप्न आहे म्हणून मी ऑफिसमधून थोडा वेळ काढून बँकेत लोनची चौकशी करायला गेलो होतो पण बँकेने बिझनेससाठी जेवढं लोन हवंय तेवढं द्यायला नकार दिला. मला कधी कुठली गोष्ट सहजपणे मिळतच नाही अवनी. मला जसं हवं तसं कधी घडतच नाही आयुष्यात. 
          असं नाहीये अविनाश, आयुष्यात अशा अप अँड डाऊनच्या फेजेस येतच असतात, प्रत्येकाला त्याला सामोरं जावंच लागतं. जीवनात जेव्हा चांगलं काही होतं तेव्हा आपण विचार करत नाही की हे माझ्या बरोबरच का झालं पण थोडं काही वाईट व्हायला लागलं की आपण विचार करायला लागतो हे माझ्याच सोबत का घडतं दरवेळेस? मीच का कायम वाईट परिस्थितीत असतो? माझ्यावरच ही वेळ का आली? 
         अवनी, पण हे माझ्या बाबतीत खरंच खरं आहे, मी काही चांगलं केलं तरी त्याचे वाईटच परिणाम होतात. २००९ ला मला माझा फर्स्ट जॉब अल्मोस्ट मिळालाच होता पण अचानक एक दिवस फोन आला की सॉरी आम्ही तुम्हाला जॉईन करून नाही घेऊ शकत, कारण तुम्हाला ज्या प्रोजेक्टवर घेणार होतो तो प्रोजेक्टच कॅन्सल झाला. नंतर मी मित्राकडे चौकशी केल्यावर कळलं की ती पोस्ट मॅनेजरने त्याच्याच ओळखीच्या कोणाला तरी दिली. २०१६ ला मला जॉबसाठी फॉरेनला जायची अपॉर्च्युनिटी आली आणि माझा कार ऍक्सीडेन्ट झाला. ती पण संधी माझ्या हातून गेली. २०२० च्या जानेवारीत आपलं लग्न ठरल्यावर ठरवलं की आता मस्त धुमधडाक्यात लग्न करायचं आणि २०१६ ला फॉरेनला जायचा चान्स हुकला पण आता हनिमूनला फॉरेनला जायचंच पण तेवढ्यात कुठून तो कोरोना आला आणि तो प्लॅनही बारगळला. माझ्या बरोबर कायम असंच होतं. 
         अविनाश तू फक्त निगेटिव्हच विचार करतो म्हणून तुला तसं वाटतं. तुझ्या बरोबर घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेनंतर काहीतरी चांगलं झालंय याचा तू विचारच करत नाही. २००९ ला तुझ्या हातातून मिळालेला जॉब गेला हे खरंय पण त्यानंतर एक महिन्यातच तुला त्याच्यापेक्षा जास्त चांगला जॉब मिळाला हे तुझ्या लक्षात नाही येत. २०१६ ला कार ऍक्सीडेन्टमुळे तुझी फॉरेन अपॉर्च्युनिटी मिस झाली ही गोष्ट जरी खरी असली तरी झालेल्या भयानक ऍक्सीडेन्टमधून तुझा जीव वाचला, तुला नवीन आयुष्य मिळालं हे पण बघ की. आणि राहता राहिला प्रश्न आपल्या लग्नाचा, जे धुमधडाक्यात नाही करता आलं, आपल्याला हनिमूनला नाही जाता आलं पण या कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात तुला वर्क फ्रॉम होम मिळाल्यामुळे आपल्याला एकमेकांसोबत राहायला, एकमेकांना जाणून घ्यायला किती वेळ मिळाला हे पण एकदा लक्षात घे की. ज्याकाळात अनेक लोक आपल्या फॅमिली सोबत राहण्यासाठी पायी प्रवास करत घरी गेले, अनेकांनी कोरोनामुळे आपले लाईफ पार्टनर्स गमावले त्याकाळात आपण एकमेकांच्या सोबत होतो, एकमेकांजवळ होतो ही किती चांगली गोष्ट होती. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे फक्त निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघायचं सोडून पॉझिटिव्ह विचार कर मग बघ तुला तुझं आयुष्य खूप सुखी आणि आनंदी वाटेल. 
           त्या दोघांचा हा संवाद चालू असतांनाच अविनाशचा मित्र प्रतीक येतो आणि तो अविनाशला म्हणतो की अरे मी ऐकलं की तू बिझनेस सुरु करायचा विचार करतोय? मी पण नवीन स्टार्टअप सुरु करायचा विचार करतोय तर माझ्या डोक्यात असा विचार आला की तुला विचारावं तू माझ्या नवीन बिझनेसमध्ये पार्टनर होशील का म्हणून. कारण मला माझ्या जॉबमुळे सारखं फिरावं लागतं त्यामुळे मला बिझनेसला पुरेसा वेळ नाही देता येणार, त्यामुळे तू जर मला जॉईन झालास तर माझा पैसा आणि तुझी बुद्धी आणि वेळ याची योग्य सांगड घातली तर आपण सक्सेसफुल बिझनेसमन होऊ शकू असं मला वाटतं. हे ऐकून अविनाश खूप खुश होतो आणि प्रतीकच्या बिझनेस प्रपोजलला होकार देतो. 
             मित्र गेल्यावर अवनी अविनाशला आनंदाने मिठी मारते आणि म्हणते, आता झालं तुझ्या मनासारखं? बघ मी म्हणत होते ना की प्रत्येक लॉसमध्ये प्रॉफिट पण दडलेला असतो फक्त तो समजून घेता आला पाहिजे, तो जर आपल्याला समजला तर आयुष्याचं गणित टॅली व्हायला फारसा वेळ लागत नाही.

- © छोट्याशा कथा By Sandip.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...