शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

2500. खिडकी

 रिक्षावाल्यानं बरोबर स्टेशनच्या दारासमोर रिक्षा उभी केली. त्याला हातात चुरगाळत घेतलेल्या नोटांपैकी एक नोट देत पळतच ती तिकीट खिडकीकडे पळाली. 
“आता कोणती ट्रेन उभी आहे…?”
तिचा प्रश्न ऐकून आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघत तो म्हणाला,
“तासाभराच्या प्रवासाची… ह्या पुढचा ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे.”
“मला ना प्रवासाला जायचंय… मला द्या ह्याच ट्रेनचं तिकीट.”
त्यानं हसत पिसीवर टायपिंग केलं… “मॅडम, हीच ट्रेन परतीची आहे तासाभरात. ते पण देऊ का…?”
त्याच्या ह्या प्रश्नावर ती म्हणाली, “म्हणजे परत येऊच का?तिथून पुढं दूर निघून जाणारी ट्रेन असेल ना…!”
तो हसला… “किती दूर जाता मॅडम… कुठंही जा, पळसाला पानं तीनच!”
ती आणखीनच चिडली, “कुठंतरी सापडेल एका पानाचं पळस!”
तो म्हणाला, “काय कामाचं ते एक पानाचं पळस! एखादा दिवस आवडेल तुम्हाला… परत वाटेल, नकोच… आपलं साधंच बरं नेहमीचं!”
एवढं बोलत त्यानं तिकीट तिच्या हातात दिलं. म्हणाला, “खास विंडो सीट येता जाता… अशी खिडकी जी बाहेर डोकवता डोकवता आतही डोकवायला लावते… प्रवासातली खिडकी!”
त्याच्या बोलण्यावर डोळ्याच्या कोपऱ्यातून रागाचा कटाक्ष टाकत ती पळाली. दादरा चढताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे बघतच होता. त्यानं बदमाशपणानं अभिमान मधल्या अमिताभसारखं बोट ओठाजवळ नेत तिला डोळ्यानं खुणावलं, तशी ती चिडून हात उगारत पळाली.
हे सगळं बघणारा शेजारचा पाटणकर उठून त्याच्याजवळ आला. त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला,
“काय हो, ओळखीची आहे का?”
हसत चष्मा नाकावर सरकवत तो म्हणाला, “शी इज मिसेस माने.”
पाटणकर आ करून बघत राहिला… “अरे, तेच म्हणतो मी. तू त्यांना नाव न विचारता तिकीट दिलंस, तेव्हाच वाटलं, पण अरे त्या गेल्या कुठं?”
“खिडकीला भेटायला…” असं माने म्हणताच पाटणकर ओरडला, “what…? काय म्हणालास…? खिडकीला भेटायला? म्हणजे काय??”
“चल कॉफी घेऊ आपण… ए जोशी, जरा काऊंटरवर लक्ष दे. आम्ही आलोच. तसंही आता तुम्ही तिघं आहात.”
माने आणि पाटणकर कॉफी घेण्यासाठी आले. माने म्हणाले, “कसं आहे ना दोस्ता, आपण ह्या आयुष्याच्या प्रवासात पळत असतो. जे वाट्याला आलं, ते आपल्या परीनं रडत-कुढत, स्वीकारत, चिडत आयुष्य जगत असतो.
“खरंतर प्रत्येकाला गरज असते, रेल्वेची खिडकी पकडून मागं पळणाऱ्या झाडासोबत आपलं आयुष्य मागंही कसं होतं, हे कधीतरी बघण्याची… म्हणजे त्या खिडकीत बसून आपल्या मनाच्या आतल्या खिडकीत डोकावण्याची.
“कधीतरी असं वाटलं, की हे असं करायचं… मग ती जरा रिलॅक्स होते. मुळात तिला आयुष्यानं फार त्रास दिलाय. तरीही मनाला सावरत ती आज इथपर्यंत आहे. मला साथ देते, मग मलाही तिला अशा प्रवासाला जाऊ द्यावं वाटतं…
“म्हणजे, आम्हीच हा मार्ग शोधलाय आमच्या जगण्यात. कारण दुःखाची तीव्र किनार आहे आयुष्याला… मग त्यासाठी स्वतःला खंबीर करत राहायचं, डोकावायचं शांत होऊन आतल्या आत…”
हे सगळं बोलताना मानेच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने ते पुसण्यासाठी चष्मा काढला. रुमालानं डोळे पुसताना तो म्हणाला,
“तुला माहितीये ना, हे माझं दुसरं लग्न… पहिल्या बायकोपासून मला मूल झालं पण ते मतिमंद जन्माला आलं आणि तिने चक्क मला घटस्फोट दिला. ‘असलं मूल असलं आयुष्य मी जगूच शकत नाही’ म्हणत तिनं त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी मी तिला मोकळं केलं…
“आता फार मोठा प्रश्न माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांचा होता. तो मतिमंद नातू, घटस्फोटित मुलगा सगळंच त्यांच्या इझी गोईंग आयुष्याच्या विरुद्ध होतं. त्यांना हे सगळं वेगळंच वाटू लागलं. त्यामुळं ताण घेऊन त्यांना आलेले अटॅक… त्यांची उतारवयात वेगळीच परीक्षा!
“पहिल्यांदा मला जाणवलं, फक्त पैसा असून उपयोगाचा नाही… खंबीर साथ आवश्यक आहे जगण्यात! लग्नाच्या बाजारात आता माझ्याशी, माझ्या पैश्याशी, नोकरीशी लग्न करायला बरेच जण तयार होते… पण ह्या मतिमंद मुलाच्या बापाशी कोणाला लग्न करायचं नव्हतं. मला आता फक्त मला सुख देणारी बायको नाही, तर माझ्या आई-वडिलांची आणि माझ्या मुलाची आई होईल अशी जोडीदारीण हवी होती…
“माझी ही अपेक्षा अवास्तव होती… पण मन कुठंतरी शोधत होतंच; कारण हे सगळं आयुष्य एकट्यानं जगण्याची हिम्मतच नव्हती माझ्यात!
“मध्ये असाच माझ्या मावशीकडे कार्यक्रमाला गेलो होतो,.. तिथं ही भेटली. मनाने उगाच कौल दिला… हीच, जिला आपण शोधतोय! मावशीकडे पोळ्या करायला येत होती. सहज चौकशी केली, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली…
“तिच्यावर रेप झाला होता! कॉलेजमधल्याच मुलांचं कृत्य… प्रेम म्हणत फसलेली ती, रेप झाला म्हणताच घरच्यांनी गदारोळ केला… लगेच जख्खड म्हाताऱ्यासोबत लग्न ठरवलं. तो पैसे देणार होता, म्हणून घरच्यांनी तिला विचारलं नाही. तिची आईच तिला म्हणाली, _‘रेप झाल्यावर आता दिवसही राहिलेत… कोण स्वीकारेल तुला? हे लग्न कर म्हणजे तू सुखी आणि आम्ही सुखी!’
“आपली आईच असं म्हणतेय म्हटल्यावर पाठिंबा आता कुणी देणार नाही. तिनं निर्णय घेतला आणि ती घरातून पळाली. स्टेशन गाठलं… मिळेल त्या रेल्वेनं नव्या शहरात आली. रेल्वेच्या खिडकीत बसून आयुष्याच्या फ्लॅशबॅक परत उजळणी करून घेतला…
“तिला आपल्या नात्यातले बरेच जण आठवले, जे लेकरू व्हावं म्हणून नवस, ट्रीटमेंट सगळं करतात… आणि आपल्याला का ही शिक्षा? खिडकीतून उदास होऊन ती सगळं आठवत होती… पण हीच खिडकी तिला नवं आकाश, नवे किनारे दाखवत होती. रेल्वेत आलेले अपंग, आंधळे तिला संघर्ष असून जगण्याची आस बाळगून कस जगावं हे शिकवत होते…
“तिनं ठरवलं, नव्या शहरात मोठ्या घरांसमोर पोळ्याची कामं मागितली. दिवसात वीस-तीस घरं फिरली, तेव्हा कुठं दोन काम मिळाली… हळूहळू जम बसला. नंतर दहा घरच्या पोळ्या करते. शिवाय शिक्षण पूर्ण केलंय…”
माने पुढं म्हणाले, “मावशीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी म्हणालो मावशीला हिम्मत करून, ‘माझ्यासोबत लग्न करशील का विचार तिला…’
“माझ्या प्रश्नावर मावशीनं ‘आ’ केला… ‘अरे, जात पात माहीत नाही आणि रेप झालाय तिच्यावर हे ऐकलंयस ना तू,..?’
“मी उदास हसत म्हणालो, ‘माझी पहिली बायको जातीतली, रेप न झालेली होती… पण पवित्र बंधातून जन्म दिलेल्या माझ्या मुलाला सांभाळलं नाही. हीनं वाईट कृत्यातून झालेलं मुल आईच्या मायेनं सांभाळलं ना! हिच्या मनाची खिडकी मजबूत आहे. मावशी, तू विचार तिला… मी तिच्या मुलीसह स्वीकारतो तिला…’
“मावशीनं विचारलं. ती भेटायचं म्हणाली. भेटीत एवढंच म्हणाली, ‘मी स्वीकारेन तुमच्या मुलाला… पण  हा नवा संघर्ष मला एकटीला पेलवेल असं नाही. तुमची साथ लागेल…’
“मी चटकन म्हणालो, ‘माझी साथ तर असणारच!’ ती हसून म्हणाली, ‘एक वेगळी साथ… आयुष्याच्या प्रवासात मला रेल्वेच्या खिडकीत बसून मनाच्या आतली खिडकी उघडता आली. आपल्या ह्या संसारात मी कधी उबगले तर मला आवडेल त्या खिडकीत बसून एक असा प्रवास करायला, जो परत मला माझ्यातली ‘मी’ शोधून देईल!’
“तिच्या वाक्यावर मी म्हटलं, ‘आणि तू हे सगळं सोडून दूर कुठं निघून गेलीस तर…!’ ती खळखळ हसत म्हणाली, ‘अहो नाही जाणार. मनाची खिडकी एक चौकट बाळगून असते आपल्या भोवती… ती असते जबाबदारीची! त्या जबाबदारीचा कधीतरी शीण आला की अश्या प्रवासाच्या खिडकीतून त्या चौकटीला बघायचं… मग ती आपल्याला तो निसर्ग दाखवते, जो सतत संघर्ष करत जगत असतो. ते अवकाश दाखवते, जे आपल्यावर आशीर्वादाची शिंपण करत असतं, फक्त गरज असते नवं होऊन त्या खिडकीत जाऊन डोकावण्याची. जबाबदाऱ्या टाळायच्या नसतात फक्त त्या स्वीकारायला आपली ताकद अश्या प्रवासानं वाढवायची असते. मला हा प्रवास कुठलंही कारण न विचारता तुम्ही करू देणार आहात का माने…? मग मी तयार आहे, तुमच्या आयुष्याच्या खिडकीत माझ्या लेकीसह येण्यासाठी.’”
कॉफी संपली होती. मानेची लव्ह स्टोरीही संपली. पाटणकर आश्चर्यानं बघत होता… “असंही जगतात माणसं…?”
त्याच्या प्रश्नावर हसत माने म्हणाले, “आम्ही तरी जगतोय… आता तूच विचार कर. स्वतःवर झालेला अत्याचार, त्यातून झालेलं लेकरू, त्यात माझं मतिमंद मूल, माझे आई-बाबा… हे सगळं ती आता समर्थपणे पेलते. अशीच कधीतरी चिडते, उबगते आणि मग तास-दोन तास सगळं सोडून निघून जाते आज गेली तशी…”
त्यावर पाटणकर म्हणाला, “मग घरी सगळे विचारात पडत असतील ना?”
माने म्हणाले, “नाही! तिनं सगळ्यांना अश्या खिडक्या शोधायला शिकवलंय. माझा मुलगा चित्रात अश्या खिडक्या शोधत बसतो, मुलगी गाण्यात शोधते, आई बाबा घराच्याच खिडकीतून त्यांच्या विचारांची खिडकी शोधतात… आणि त्यांना सगळ्यांना हिची खिडकी माहितीये, त्यामुळं तेवढा वेळ सगळे ॲडजस्ट करतात…”
पाटणकर म्हणाला, “आणि माने, तुमची खिडकी…?”
माने हसत म्हणाले, “अरे ही माझी बायकोच माझी खिडकी आहे! तिनं तिचं माझं नातं इतकं छान जोपासलंय की मला तिच्या डोळ्यात माझी खिडकी सापडते. अरे, तुटून गेलेली स्त्री जर एवढ्या ताकदीनं जगते, तर आपण काय…!” असं म्हणत माने निघाले.
काही वेळात परतीच्या ट्रेननं मिसेस माने उतरल्या. खरंच दोघांचं बॉंडिंग जबरदस्त होतं. दोघांनी फक्त डोळ्यात बघितलं. त्यांनी हात पुढं केला, तिनं तो पकडला. तिकडे ट्रेन निघाली, इकडे ही जोडी निघाली.
पाटणकर मनोमन म्हणत राहिला, ‘मनाच्या खिडक्या योग्य मिळाल्या, की रेल्वेच्या सुखकर प्रवासासारखा आयुष्याचा प्रवास सुखकर होत असेल!’

— स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)
         छ.संभाजीनगर

2499. वाळवंटातील प्रवास

     काही वर्षापूर्वीपर्यंत मला ड्रायव्हर नव्हता आणि मी सगळीकडे स्वतःच गाडी चालवत जात असे. मी नेहमी एका विशिष्ट पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकत असे. या पंपाच्या बाजूलाच एक सर्व्हिस स्टेशनही होतं. कधीकधी शनिवारचा दिवस असला की मी माझी गाडी सव्हिसिंगसाठी तेथे घेऊन जात असे आणि सव्हिसिंगचं काम पूर्ण होईपर्यंत तेथेच थांबत असे. तेथे दोन लहान मुलं कामाला होती. 
तेरा-चौदा वर्षांची असतील! ते दोघं जुळे भाऊ होते, दिसण्यास अगदी सारखे होते. एकाचं नाव होतं राम तर दुसऱ्याचं गोपाल. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, त्यामुळे ते शाळेत जात नसत; परंतु त्यांना बऱ्याच भाषा अवगत होत्या.
बंगलोर ही जरी कर्नाटकची राजधानी असली, तरी येथे फक्त कन्नड भाषाच बोलण्यात येते असं नाही. येथे इतर प्रांतातून येऊन स्थायिक झालेले लोकही बरेच आहेत. त्यामुळे बंगलोर हे मिश्र लोकवस्तीचं शहर बनलेलं आहे. या सर्व्हिस स्टेशनमध्ये काम करत असताना त्या दोघा मुलांना इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक रोज भेटत की त्या मुलांना आपल्या कन्नड या मातृभाषेखेरीज तामीळ, तेलगू आणि हिंदी एवढ्या भाषा बोलता येत.
माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग होण्यास साधारण दोन तास तरी लागत. ती मुलं माझ्यासाठी एक खुर्ची आणत. मग मी झाडाच्या सावलीत 
काही काळाने माझी पण त्यांच्याशी चांगली मैत्री झाली आणि त्या दोघांनी मला त्यांच्या आयुष्याविषयी सर्वकाही सांगितलं त्या दोघांना वडील नव्हते. त्यांची आई मोलमजुरी करे. हे दोघे जवळच्या झोपडपट्टीत आपल्या काकांकडे राहत. घरच्या गरिबीमुळे शाळेत जाणं तर शक्यच नव्हतं आणि त्यांना घरी शिकवायला सुद्धा कोणी नव्हतं. याआधी ते दोघं एका दुकानात मदतनिसाचं काम करत होते व त्यानंतर आता त्यांना या सर्व्हिस स्टेशनमध्ये नोकरी लागली होती. 
त्यांना पगार तसा काही जास्त नव्हता. पण इथे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण फुकट मिळायचं. शिवाय कधीतरी गाडी सर्विसिंगला घेऊन येणारे लोक हातावर किरकोळ बक्षिसी द्यायचे. त्या दोघांच्या कामाचे निश्चीत तास असे काही ठरलेले नव्हते. ते रोज सकाळी आठच्या सुमाराला येत आणि त्यांना घरी परतायला रात्रीचे आठ वाजत. फक्त रविवारी तेवढी त्यांना सुट्टी असे.
खरं तर त्या दोघा मुलांचं आयुष्य इतके कष्टाचं होतं... तरीपण त्यांचे चेहरे कायम हसरे असत. त्यांना कोणीही काही काम सांगितलं तरी ती मुलं कधी नाही म्हणत नसत, की कधी कुरकुर करत नसत. कधी कधी अगदी चांगल्या सधन परिस्थितीतील मुलं सगळं काही असून लांब चेहरा करून दुःखी मुद्रेनं बसलेली दिसतात. त्यांना आपण काही काम सांगायला गेलं, तर हजार सबब पुढे करतात आणि ते काम करायची टाळाटाळ करतात. मला वाटतं आयुष्यातील समाधान जातपात, धर्म किंवा बँकेच्या खात्यातील पैशांवर अवलंबून नसतं.
या मुलांच्या उत्साहाबद्दल मला त्यांचे कौतुक वाटत असे. क्वचित कधीतरी मी त्यांच्यासाठी थोडाफार खाऊ आणि थोडे जुने शर्ट घेऊन जात असे. ते कपडे पाहून त्यांना इतका आनंद होई, जसे काही ते गर्भरेशमी कपडे आहेत! पण मी दिलेले कपडे त्यांनी कधीही घातल्याचं दिसलं नाही. मी त्याबद्दल त्यांना विचारताच ती मुलं म्हणाली, मॅडम, आम्ही इकडे कामावर येताना नेहमी खराब कपडे घालून येतो, कारण इथे काम करताना त्याला वंगणाचे डाग पडतात.
एक दिवस मी त्यांच्यासाठी थोडी गोष्टीची पुस्तकं घेऊन गेले. म्हटलं, रात्री वाचायला होतील त्यांना. एकीकडे या मुलांच्याच वयाची इतर मुलं शाळेत जात होती आणि उरलेल्या वेळात हॉकी नाहीतर बुद्धिबळाच्या सामन्यांमध्ये भाग घेत होती. आणि इकडे ही मुलं मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी राबत होती. पण मी जेव्हा ती पुस्तकं त्यांच्या हातात दिली तेव्हा त्यांचे चेहरे उदास झाले. आज पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर विषाद स्पष्ट दिसत होता. ती मुलं म्हणाली, मॅडम, आम्हाला वाचायला खूप जास्त वेळ लागतो. खूप कष्ट पडतात. एकेक वाक्य वाचायचं म्हणजे.... आम्हाला वाचायची सवय नाही ना. तुम्हीच आम्हाला त्यातली गोष्ट सांगाल का?
अरे... पण मी इथे कशी काय तुम्हाला गोष्ट सांगणार? तुम्ही तर सारखे कामात असता!
आम्हाला चार वाजता थोडावेळ विश्रांतीसाठी सुट्टी मिळते. तुम्ही तुमची गाडी सर्विसिंगला त्या वेळेत जर आणलीत, तर आम्ही इथे तुमच्याजवळ बसू आणि तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा, आम्ही ऐकू. त्या दोन डोळ्यांच्या जोड्या माझ्याकडे इतक्या अपेक्षेने बघत होत्या, की मला नाही म्हणणं शक्यच झालं नाही. माझी स्वतः ची मुलंसुद्धा लहान असताना अशीच गोष्टीसाठी हट्ट धरून बसायची, त्याची मला आठवण झाली. मग मी तसं करण्यास राजी झाले.
त्यामुळे मग शनिवारी दुपारी तिथे जायचं आणि त्या मुलांना गोष्टी सांगायच्या, असा शिरस्ताच होऊन बसला. जरी माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग करण्याची गरज नसली, तरीसुद्धा मी नुसती त्या मुलांसाठी तिथे जाऊ लागले. माझ्या गोष्टी ती मुलं अगदी लक्षपूर्वक ऐकत आणि पुढे काय घडतं, यासाठी उत्सुकतेनं जिवाचा कान करून बसत. हे असं कित्येक महिने चालू होतं. 
काही दिवसांनी मी स्वतः गाडी चालवणं बंद केलं आणि ड्रायव्हर ठेवला. त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करायची वेळ आली, की माझा ड्रायव्हरच ती घेऊन जाई. त्यामुळे परत काही माझं त्या सर्व्हिस स्टेशनकडे जाणं झालं नाही व राम आणि गोपाल यांची नंतर भेटच झाली नाही.
काळ तर पाण्यासारखा वाहत असतो. अशी जवळपास दहा वर्ष लोटली. एक दिवस माझी गाडी खराब झाली होती व ड्रायव्हर त्याबद्दल तक्रार करत होता. मी त्याला ती गाडी दुरुस्तीला देण्यास सांगितलं आणि नंतर ते विसरूनसुद्धा गेले. गाडी जुनी झाली होती. तिनं बरीच वर्षे चांगली सेवा केली होती. अजूनही ती चालत होती. माझा ड्रायव्हर ती गाडी दुरुस्त करून परत घेऊन आला. 
तो म्हणाला, या गाडीकडे बघून मेकॅनिकनं तुमची चौकशी केली. 'गुड लक् गॅरेज'चे मालक तुमच्या ओळखीचे आहेत का? मी तर काही ते नाव कधी ऐकलं नव्हतं. 
हे गॅरेज नवीन आहे का?
हो, तसं नवंच आहे. मी नेहमी तरुण माणसांनी चालवलेल्या गॅरेजमधेच गाडी नेतो. हा तरुण मुलगा पण अगदी चांगला आहे, प्रामाणिक आहे. तो तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. तुम्ही अजूनही कॉलेजात शिकवता का, असं तो विचारत होता.
माझ्या ओळखीचा गॅरेजचा मालक कोण बरं असू शकेल? काही केल्या डोक्यात येत नव्हतं. माझ्या ड्रायव्हरला त्याचं नाव माहीत नव्हतं, त्यामुळे हा तरुण कोण असावा ते काही मला आठवेना. म्हटलं कदाचित आपलाच एखादा जुना असेल; पण मी तर कॉम्प्युटर सायन्स शिकवते. मग माझ्या विषयाचा विद्यार्थी अचानक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगकडे कसा काय वळला असावा, हे कोडं काही सुटेना. 
त्यानंतर परत एकदा माझा ड्रायव्हर येऊन मला म्हणाला, त्या गॅरजचा मालक तुमची सारखी चौकशी करत होता. मग मात्र म्हटलं काही झालं तरी आपण स्वत: जाऊन त्याला भेटायला हवे. ज्या माणसाला आपली वी चौकशी करावीशी वाटते, तो आहे तरी कोण?
दुसऱ्याच दिवशी मी त्या गुड लक गॅरेजमध्ये गेले. ते गरज तसं आधुनिक होतं. चांगलं सुसज्ज होतं. आतल्या बाजूला काचेचं एक छोटंसं केबिन होते. गॅरेजचा मालक आत बसला असणार, असा मी अंदाज केला. मी गॅरेजमध्ये पाऊल टाकताच मेकॅनिकचे निळे कपडे केलेला एक तरुण देखणा माणूस पुढे आला आणि त्यानं माझं स्वागत केलं. त्याच्या हातात स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर होता…
मॅडम या ना... आत या... अशा इकडे केबिनमध्ये बसा. मी हात धुवून एका मिनिटात येतो.
त्याच्या ऑफिसातील सोफ्यावर मी बसले. ऑफिस छोटंसंच, पण नीटनेटकं होतं. त्या तरुणाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. याला आपण नक्कीच कुठेतरी पाहिलं आहे... 
पण कुठे बरं?
काही केल्या आठवेना. मी स्मरणशक्तीला ताण देऊन पाहिला... 
आपण याला प्री-युनिव्हर्सिटीच्या वर्गात तर शिकवायला नव्हतो? 
त्या वेळी मुलं सोळासतरा वर्षांची असतात, उत्साहानं सळसळत असतात. नंतर काही वर्षांनी त्यांची गाठ पडली की ती प्रौढ झालेली असतात आणि मी काही त्यांना ओळखू शकत नाही. आज हा तरुण फारच ओळखीचा वाटत होता. इतक्यात तो एका हातात कॉफीने भरलेला कप आणि दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला. 
मॅडम, तुम्ही खूप बदलला आहात. तुम्ही आता जरा वयस्कर दिसता आणि थकलेल्या दिसता.
सॉरी, पण मला तुझं नाव नाही आठवत. रागावू नको... पण काय नाव तुझं? तू म्हणालास ते बरोबर आहे. मी आता म्हातारी होत चालले आहे. त्यावर तो हसला. त्याच्या गालाला छानशी खळी पडली आणि मला एकदम आठवलं…
दहा वर्षांपूर्वी गॅरेजमध्ये ती जी दोन मुलं काम करायची, त्यांच्यापैकी एक होता हा…
नक्कीच! 
पण हा राम होता… की गोपाल? 
त्या काळीसुद्धा मला त्यांच्यातला कोण कुठला, ते कधी ओळखायला येत नसे. मग मी सरळ त्यालाच विचारलं, तू राम की गोपाल?
मी राम, मॅडम.
जरा इथे बस बघू. आज तुला इथे बघून मला फार फार आनंद झाला आहे. माझ्या गाडीची ओळख पटल्यामुळे रामने माझी इतकी का चौकशी चालवली होती, हे आता मला कळलं.
मॅडम, त्या काळी तुम्ही आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल मला फार कृतज्ञता वाटते तुमच्याबद्दल.
मदत? मी कुठे काय मदत केली रे? मी जुने कपडे आणि खाऊ घेऊन येत असे... आणि थोड्याफार गोष्टी सांगत असे.
मॅडम, तुम्हाला कल्पना नसेल, पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. तुम्ही आम्हाला कोणत्या गोष्टी सांगायचात, ते आठवतंय तुम्हाला?
मला काही आठवत नव्हतं. माझ्या डोक्यात भरलेल्या कथासागरातून काही वर्षांपूर्वी मी काही कथा सांगितल्या होत्या.
नाही रे बाबा. काही नाही आठवत.
मग तो माझ्यासमोर बसला, त्याने डोळे मिटले आणि आपली स्वत:ची कथा सांगू लागला…
मॅडम… 
आमचं आयुष्य फार खडतर होतं. तुम्हाला त्याची कल्पना होतीच. आमच्या आयुष्यातील एकमेव आनंद, ज्याची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. तो म्हणजे आठवड्यातला शनिवार. तुम्ही दर शनिवारी यायचात आणि आम्हाला गोष्टी सांगायचात. आम्ही तेव्हा आमच्या काकांकडे राहायचो. आम्हाला जे काही पैसे मिळत, ते सगळे आमचे काका काढून घ्यायचे. आमच्या त्या रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनापासून थोडी सुटका म्हणजे तुमच्या त्या गोष्टी. आम्हाला दिवसभर काम करावं लागायचं. मला वाटायचं आपण पुन्हा शाळेत जायला लागावं, परत शिक्षण सुरू करावं; पण आम्ही जिथे राहत होतो, तिथून रात्रीच्या शाळा फारच लांब होत्या. शिवाय घरातून काहीच आर्थिक मदत नव्हती, की पाठिबाही नव्हता. आमचं शिक्षणाचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय... असं वाटू लागलं होतं. पण त्याच वेळी तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगितलीत. ती गोष्ट ऐकून आमचं सगळं आयुष्यच बदलून गेलं.
आता यानंतर काय घडलं हे त्याच्या तोंडून ऐकण्याची मला उत्सुकता लागून राहिली होती…
कोणती कथा होती ती? मला तरी सांग.
आता आमच्या भूमिका बदलल्या होत्या. आता तो कथा सांगू लागला आणि मी ऐकू लागले...
एका गावात खूप गरीब लोक होते. त्या सगळ्यांची एकच इच्छा होती - वाळवंट पार करून नशीब काढायला पलीकडच्या गावी जायचं, तिथे आपल्याला चांगला भविष्यकाळ लाभेल, चांगलं आयुष्य घालवता येईल, असं त्यांना वाटे.
अनेक तरुण मुलांनी तिकडे जाण्यासाठी मनाची तयारी केली. गावातील वडीलधारी माणसं त्यांना सांगायची, तुम्हाला जर आयुष्यात काही कमवायचं असेल तर त्या पलीकडच्या गावाला जा. जाताना वाळवंटात दुर्मिळ खडे मिळतील ते गोळा करा. पलीकडच्या गावी ते खडे विकत घेणारा कोणीतरी भेटेल.
अशाच एका सकाळी दोन तरुण मुलं त्या गावाला जायला निघाली. त्यांनी बरोबर खाण्यासाठी शिदोरी आणि पाणी घेतलं होतं. सुरुवातीला वाळवंटातील वाळू अजून थंडच होती. सूर्याचे ऊनही तापलं नव्हतं. प्रवास तर छानच चालला होता. त्यांना जराही थकवा जाणवत नव्हता. ते वेगानं पुढे निघाले. काही वेळाने सूर्य डोक्यावर आला. वाळू तापू लागली. ते बराच वेळ चालत होते. आता बहुतेक आपण वाळवंटाच्या पलीकडच्या बाजूला पोचलो असू म्हणून त्यांनी जवळची शिदोरी उघडून जेवून घेतलं आणि पोटभर पाणी पण प्यायलं, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं अजून निम्मं वाळवंटसुद्धा पार करून झालं नव्हतं.
एकीकडे चालता चालता ते रस्त्यात सापडलेले दुर्मिळ खडे वेचत होते. पलीकडच्या गावी नेऊन विकण्यासाठी! लवकरच त्यांच्या जवळच्या थैल्या खड्यांनी भरून जड झाल्या. त्यांच्यातील एका मुलाने विचार केला हे काही खरं नाही. आपण हे खडे फेकून द्यावे आणि परत जावं, हे बरं; पण तो दुसरा मुलगा त्याला म्हणाला, आपण आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे. काय वाट्टेल ते झालं, तरी आपण हे वाळवंट पार करून पलीकडच्या गावी जायलाच हवं.
परंतु त्या पहिल्या मुलानं ते काही ऐकलं नाही आणि तो परत फिरला. दुसरा मुलगा मात्र त्या गावाच्या दिशेने चालतच राहिला. प्रवास खडतर होता. एकतर  गावी जावं; पण श्रद्धा आणि आशा या दोन गोष्टींच्या बळावर तो तसाच चालत राहिला. दीर्घकाळ चालल्यानंतर अखेर तो पलीकडच्या गावी जाऊन पोचला. त्या गावात शिरल्यावर मात्र त्याची घोर निराशा झाली. इतर कोणत्याही गावासारखंच गाव होतं ते. जवळच एक धर्मशाळा होती. अंधार होत चालला होता आणि तो खूप थकला होता. मग त्याने रात्र तिथेच घालवायची ठरवली.
दुसरा दिवस उजाडला. त्याला वाटलं हे जड खड्यांचं ओझं द्यावं फेकून आणि सरळ आपल्या गावचा रस्ता धरावा… त्याने आपली थैली उघडली. बघतो तर काय! त्या सगळ्या मोठमोठ्या खड्यांचे आता हिरे झाले होते. क्षणार्धात तो कोट्याधीश झाला होता.
मॅडम, तुम्हाला आठवतं… त्या वेळी तुम्ही आम्हाला या गोष्टीचा खरा अर्थ समजावून सांगितला होता. विद्यार्थीदशा ही वाळवंटासारखी असते. परीक्षा म्हणजे सूर्याचा दाह. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या तप्त वाळूसारख्या असतात. अभ्यास म्हणजे तहान आणि भूक, विद्यार्थी असताना एकट्यानेच प्रवास करावा लागतो, ज्ञान आणि कौशल्याचे हिरे जमा करावे लागतात. आपण हे जितके जास्त जमा करू, तितकं आपलं पुढील आयुष्य सुखात जातं.
तुमची ही गोष्ट ऐकल्यावरच मी ठरवलं, कितीही अडचणी आल्या तरी आपण शिकायचं. मी दृढ निश्चयाने सर्व संकटांचा सामना करत शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. सर्विस स्टेशनच्या मालकानेही खूप मदत केली मला. मला जेव्हा उत्तम गुण मिळाले, तेव्हा त्याने माझ्या ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या शिक्षणाची फी भरली. मी एकीकडे शिकत होतो आणि एकीकडे काम करत होतो. पुढे मी बँकेकडून कर्ज घेऊन हे गॅरेज सुरू केलं. ईश्वराच्या कृपेने मला यश मिळत गेलं. मी माझं सर्व कर्ज फेडलं आहे. मी आता पूर्णपणे कर्जमुक्त आहे.
मॅडम, त्याचं असं आहे… श्रीमंत माणसांना काहीही नवीन सुरू करायचं, म्हणजे भीती वाटते. त्यांना वाटतं, नवीन धंदा चालला नाही तर आपले सगळे पैसे पाण्यात जातील. पण मला काही गमावण्याची मुळी भीतीच नव्हती!
हे तर मी माझ्या स्वत:च्या आयुष्यातील अनुभवानेसुद्धा शिकले होते.
मग आता गोपाल कुठे असतो?
त्याने तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीचा पाठपुरावा केला. रामचा चेहरा दुःखी दिसत होता. 
का? काय झालं?
तुम्ही आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती. गोपालची स्थिती आज त्या गोष्टीसारखीच आहे. एका वाळवंटात एक लांडगा राहत होता. एक दिवस सकाळच्या वेळी तो चालला असताना त्याचं स्वतःच्या सावलीकडे लक्ष गेलं. ती सावली त्याच्याहून बरीच मोठी दिसत होती. ती सावली इतकी प्रचंड मोठी होती, की त्याने विचार केला आज दुपारच्या जेवणासाठी आपण एखाद्या उंटाची शिकार करावी. मग तो उंटाच्या शोधात बराच वेळ भटकत राहिला. वाटेत त्याची नजर कितीतरी छोट्या प्राण्यांवर पडली; पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर छोटे छोटे प्राणी पकडणं त्याला सहज शक्य होतं. अखेर सायंकाळ झाली तरी त्याला उंट काही मिळाला नाही. एव्हाना त्याची सावली त्याच्यापेक्षा खूपच लहान झाली होती. अखेर त्याने उंटाऐवजी उंदराचा शोध घेण्यास सुरुवात केली.
गोपालच्या बाबतीतही हेच घडलं. तो नेहमी स्वतःच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करायला जायचा आणि त्यात त्याला अपयश यायचं. त्याची तर माझ्याबरोबर येथे काम करायचीसुद्धा इच्छा नाही. आता तो एका ऑफिसात पट्टेवाला आहे.
मी आश्चर्याने थक्क झाले…‌ मी कधी काळी सांगितलेल्या एका छोट्याशा गोष्टीने त्यांच्या आयुष्यात केवढं विलक्षण परिवर्तन घडून आलं होतं. मी त्यांना त्या गोष्टी जेव्हा सांगत असे तेव्हा त्याचा एवढा मोठा परिणाम घडेल, अशी तर मी कधी कल्पनाही केली नव्हती. मुळात या कथा काही मी स्वत: लिहिलेल्या नाहीत. त्या मला नक्की कुणी सांगितल्या, हेही मला आता आठवत नाही. या कथा ज्या कुणाला सुचल्या असतील, त्याला मी मनोमन वंदन करते. आज इतक्या वर्षांनंतर मुलांच्या मनावर त्या गोष्टींचा एवढा सखोल परिणाम होईल, असं त्या लेखकाला किंवा लेखिकेला वाटलं तरी असेल का?
 (सुधा मूर्ती)
-------------------------

2498. निंदकाचे घर असावे शेजारी

      नुकताच दमून आलेल्या अनुराधा बाईंनी आरामखुर्चीवर बसून डोळे मिटले. तेवढ्यात शेजारची शांती आजी आली. वयाची साठी पार झालेली आजी बोलायला फार कडू होती. सतत आपल्या बोलण्याने एखाद्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकवायाची तिची  सवय होती. पण अनुराधा ला कधीही तिचा त्रागा वाटत नसे. वडीलधारी म्हणून ती तिचा नेहमी आदर करी.
"पाहिलंस अनुराधा गेली तुझी सूनबाई..किती केलेस तिच्यासाठी तरीदेखील आता दिवस बदलताच तुझी साथ सोडली म्हणायची."  शांता आजी म्हणाली
आज अनुराधा फार थकली होती म्हणून खुर्चीवरून उठत ती म्हणाली "काकू जाऊद्या ना तो विषय मी दमली आहे. चहा टाकते .बसा तुम्ही." म्हणत अनुराधा आत गेली.
“मला नको चहा मी आता जाते.. रात्री येईल शतपावली करायला” अस सांगून आजी निघून गेली.
   चहाचे आंदण गॅसवर ठेवत अनुराधाला भूतकाळ आठवला. तिचा मुलगा सुयश नावाप्रमाणेच लहानपणापासूनच हुशार होता . ग्रॅज्युएशन करत असतानाच त्याला त्याच्याच कॉलेजमधील जूनियर स्टूडेंटशी प्रेम झालं.. अनुराधाला त्याचा मित्रांकडून ही गोष्ट कळली पण साध आकर्षणही असेल आणि एखाद्या वर्षात सुयश विसरेल ही असं मानून अनुराधाने दुर्लक्ष केले. आणि सतत तीन वर्षे सरले ...एक दिवस सुयशने अनुराधाला त्या मुली विषयी सांगितले त्या मुलीचे घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत आहेत आणि ती खूप sharp माईंड आहे ...
    ..
       ....
           ....परत ...
थोडसं थांबत म्हणाला " आई ..आमचे प्रेम आहे एकमेकांवर " अनुराधा ने  थोडा विचार केला व तिला घरी बोलवायला सांगितलं.  संध्याकाळी छान गोबऱ्या गालाची नाकी डोळे नीट बघताच क्षणी  कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी सुंदर होती ती मुलगी . आपल्या मुलासोबत तिची जोडी तिला लक्ष्मी नारायणा सारखी दिसली. मुलीच्या  घरच्यांना अनुराधाने फार समजवले पण ते मंडळी लव मॅरेज साठी तयार झाले नाही शेवटी त्यांनी निर्णय घेतला जर आमच्या मुलीने प्रेम विवाह केला तर तिचा आमच्याशी कुठलाही संबंध नाही .ती आमच्यासाठी आहे नाही बरोबर.   मुलाच्या प्रेमापोटी अनुराधा त्या मुलीला अंगावरच्या कपड्यांवरच आपल्यासोबत घरी घेऊन आली. एकोनविसाव्या वर्षात नुकताच पदार्पण केलेल्या या तरुणीला तिचे करियर सोडून कसे लग्नाच्याबेडीत अडकवायचे आणि लग्न नाही केले तरी एखाद्या मुलीला आपल्या घरात बिनालग्नाचे कसे ठेवायचे. अनुराधाने  फार विचार केला .सुयश आणि त्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नाच्या वर्षभरातच अनुराधाला आजी होण्याच सुख प्राप्त झाले .ती मुलगी जबाबदारीसाठी तयार नव्हती. दोघांनाही आपल्या करिअरची चिंता होत होती तेव्हा अनुराधा ने त्यांना समज दिली बाळाची संपूर्ण जबाबदारी मी घेईल तुम्ही चिंता करू नका .प्रेग्नेंसी मध्ये अनुराधा ने सुनबाई चे सर्व कौतुक केले त्या काळातही तिने तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केली .अनुराधाच्या मदतीमुळे  बाळाच्या संगोपणा सोबत सुनबाई ने पोस्ट ग्रॅज्युएशन  मध्ये टॉप केला .सर्व वृत्तपत्रांमध्ये सुनबाई ची चर्चा होती आज स्पर्धा परीक्षा पास करून सुनबाई नी मोठ्या पदाच्या गव्हर्मेंट जॉब मिळवला म्हणून तिच्या कौतुक समारंभ होता . सुनबाईने वकृत्व करताना आपल्या यशाचे श्रेय सासुबाईंना व नवऱ्याला दिले. अनुराधा फार खुश होती पण दुःखाचे कारण असे होते की सुनबाईला पोस्टिंग कुठे मिळेल ती दूरवर गेली तर नातवाचे काय होईल आणि ज्या सुनेला मुलीप्रमाणे वागवलं ती दूर जाताना आपला विचार करणार की नाही?
     यशस्वी झालेल्या मुलीला भेटायला तिचे आईबाप माहेरीची मंडळी आली होती. त्यांनी तिला समारंभातून सरळ जेवणाचे आमंत्रण दिले एवढ्या वर्षाची दुराव्याची पोकळी एका आमंत्रणानेच कोठे भरणार होती पण सुनबाईं नकार देऊ शकली नाही परस्पर माहेरी निघून गेली.
       अनुराधाचे मन आज खूप हेलगावत होते .रात्रीची शतपावली करायला शांती आजीने आवाज दिला. अनुराधाचे बाहेर जाण्याचे मन मुळीच नव्हते  पण आजीच्या सहवासाची सवय झाली होती म्हणून ती निघाली. शांती आजी सवयीप्रमाणे सुनबाई चे गाऱ्हाणे  वदत होती ."अगं अनुराधा तू तुझ्या आरामाच्या दिवसात सर्व विसरून राब राब राबली. कधी भजन कीर्तनात गेली नाहीस की कधी गावी लग्नकार्यात गेली नाही. तूझ्या सुनेने जसं तुला मोलकर्णी बनवले."
आता मात्र अनुराधाच्या भावनांचा कंप फुटला. डोळे पाणावले ती आजीला म्हणाली, "आजी तुम्ही सांगा मी काय करायला हवं होतं. माझ्या हुशार आणि जबाबदार मुलाला प्रेम विवाहसाठी नकार दिला असता तर त्याच्या बुद्धीवर आणि मनावर कोणत्याही प्रकारचा आघात झाला असता. त्याला योग्य अश्या मुलीला नकार देण्याचा काही कारणच नव्हतं. म्हणून मी लग्न लावून दिले. लग्नानंतर सुनबाईवर लहान वयातच मोठ्या मोठ्या  जबाबदाऱ्या टाकून तिच्या चुका काढून रोज वाद घालण्यापेक्षा मी तिच्या  मनाने घेतले ज्या मुलीच्या हुशारीवर माझ्या मुलाने प्रेम केले तिला घरात बसून तिच्यातील क्षुल्लक कारणानी चुका काढून रोज वाद घालण्यापेक्षा तिच्या मनाने घेणं... मला पटले. मी असताना बाळाला पाळणा घरात ठेवावे कशाला? ज्या भजन कीर्तनाची तुम्ही गोष्ट करत आहात तिथे नक्की भजन कीर्तन होते ..?”
अनुराधा प्रश्नार्थक नजरेनं बोलत होती..."साऱ्या  स्त्रिया आपले गाऱ्हाणे एकमेकांना ऐकवतात तिची सून हे करते म्हणून आपल्या सुनेकडून त्या अपेक्षा करतात. अनुराधा आपल्या छातीवर हात ठेवत अभिमानाने म्हणाली, 
"माझ्या सुनेने माझ्या कष्टाच चीज केले त्याचा गर्व आहे मला "
"तुला कोण समजावणार," अस म्हणून आजी पुन्हा घरी निघून गेली .
अनुराधाला तिने केलेल्या कर्तव्याचे दुःख नव्हतेच तिला सुनबाईचा विरह नकोसा वाटत होता. सुनबाईंनी सरळ सरळ माहेरी निघून गेल्याने हृदयात कुठेतरी टीच बसली होती विचारांच्या काहूरातच अनुराधा झोपली. सकाळी सकाळी किचनमध्ये आवाज येत असल्याने अनुराधा किचन मध्ये गेली सुनबाई चहा टाकत होती.
"सुनबाई तू कधी आलीस"" अनुराधा म्हणाली
"मी रात्रीच आली  तुम्ही गाढ झोपलेल्या होत्या म्हणून उठवले नाही "सुनबाई म्हणाली
किचनच्या खिडकी बाहेर बघत अनुराधा ने विचारले ,"राहिली नाहीस माहेरी" .
“सासुबाई ,कसलं आणि कोणत माहेर? फक्तं देखाव्याचे. आज जेव्हा मी यशस्वी झाले तेव्हा त्यांनी मला ओळखले इतक्या वर्षात त्यांना माझी आठवण ही झाली नाही असं उगवत्याला नमस्कार करणाऱ्या लोकांपासून थोड लांबच बरं. गरीबाचे खर प्रेम ही क्षुल्लक आणि श्रीमंतांचे खोटे लफडे ही कौतुकाचे अशी ही सामाजिक कीड लागलेली प्रवृत्ती.            
     काल त्यांनी नात्याकडे एक पाऊल पुढे केले म्हणून मीही तेवढेच पाऊल पुढे केले फक्त चहा घेतला आणि निघाले ..”. सुनबाई म्हणाली.                      
 "बर,, कधी शिफ्ट व्हायचे तुला नोकरीसाठी" अनुराधा ने विचारले
“मला नाही आपल्याला शिफ्ट व्हायचे आहे. सासूबाई” अनुराधाला चहा देत सुनबाई पुढे म्हणाली...
 “तुम्ही सुद्धा माझ्यासोबत येणार आहात अशी अर्ध्यावर साथ नाही सोडू देणार मी तुम्हाला सासुबाई... हवी तशी सोयरीक मिळाली असते तुम्हाला तुमच्या मुलासाठी. कदाचित तुमचा मुलगा ही काही दिवसांनी मला विसरून तुमच्या प्रेमापोटी तयार झाला असता दुसरीकडे लग्नाला. पण सासुबाई तुम्ही माझ्या प्रेमावर विश्वास दाखवला.. कधी तुम्हाला माझ्यामुळे चारचौघात मान नाही मिळाला. तरी तुम्ही संतुष्टी राहिले आमच्या प्रेमापोटी..आत्तापर्यंत पळून आलेल्या मुलीची सासू म्हणून जे लोक हिणवत होते त्यांच्यासमोर ऑफिसरची सासू म्हणून मिरवा जरा ..”. सुनबाईनी ऐठ दाखवत अनुराधाच्या हातातील रिकामा  कप घेतला.. आणि म्हणाली "सासुबाई मी जरा शांती आजींना ही मिठाई देऊन आलेच.. काल गडबडीत देण्याची राहूनच गेली होती शिवाय त्यांचा आशीर्वादही घ्यायचा राहिलाच होता."
     बाहेर पेपर वाचत असलेल्या सुयशने जेव्हा घडला प्रसंग ऐकला तेव्हा त्याला आपल्या प्रेमविवाह निर्णयावर आणि बायकोवर अभिमान वाटला.  समोर असलेल्या शांती आजीच्या घराकडे बघून अनुराधाला विचार आला.
“निंदकाचे घर असावे शेजारी..”

आवडल्यास शेअर ऑप्शननेच शेअर करा.
   🖋️ मयुरी

2497. माणसांतील देव

 पप्पा, एक गुड न्यूज आहे, डॅाक्टर घरात शिरताच नेहा म्हणाली. बोल बेटा, सांग लवकर, अधीर होत डॅाक्टर म्हणालेत. मला तुम्ही दहा हजार रुपये देतात का? नेहा बेटा, गुड न्यूज सांगते म्हणतेस नी दहा हजार रुपये मागतेस, हा काय वात्रटपणा? सांगते, सांगते पप्पा, थोडा धीर धरा, गरम चहाचा कप त्यांच्या हातात देत नेहा म्हणाली.
बेटा, दहा हजार रुपये तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करू का? नको, नको, मला कॅश द्या, नेहाने सांगितले. पप्पांकडून पैसे घेत नेहा म्हणाली, तुम्ही चला माझ्या बरोबर. कुठे जायचे? डॅाक्टरांनी विचारले. तुम्ही आधी गाडी काढा, सांगते मी. ते दोघे निघणार तोच नेहाची आई घरात शिरली. बाप-बेटी कुठे निघालेत? मीही येऊ का, की माझी अडचण होईल? मॅाम काही तरीच काय, चल तूही, आईचा हात घट्ट पकडत नेहा म्हणाली.
गाडी सुरू झाल्यावर नेहा बोलती झाली. पप्पा, मम्मी, आज मी ज्या इंटरव्ह्यूला गेले होते तिथे माझे सिलेक्शन झाले आहे आणि मी मागितला त्यापेक्षा जास्त पगार मला मिळणार आहे. 
अभिनंदन बेटा, पप्पा आणि मम्मी खूश होत म्हणाले. नेहा, आता आपण कुठे जात आहोत? आम्हाला ट्रीट द्यायचा प्लॅन आहे का? 
ट्रीट आज नाही, माझा पहिला पगार झाल्यावर देईन. आपण जातोय एका देवाला भेटायला, ज्याच्यामुळे मला ही ॲाफर मिळाली. 
देवाला भेटायला? कुठल्या मंदिरात जायचं? आईने विचारले.
मंदिरात नाही, नेहा ऊत्तरली. 
नेहा तू ठीक तर आहेस ना? आई आणि बाबांनी विचारले.
हो देवालाच भेटायला जायचं, पण मंदिरातील नव्हे तर माणसांतील देवाला.
साधारणतः अर्ध्या तासाच्या ड्राईव्ह नंतर नेहाने गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करायला सांगितले नी ती म्हणाली, हीच ती कंपनी जिथे माझा आज इंटरव्ह्यू झाला, मी ही कंपनी सोमवारपासून जॅाइन करणार आहे.
नेहा, तुझा तो देव कुठे आहे ज्याला भेटायला आपण आलोत? तो ही याच कंपनीत काम करतो का? त्याने तुला रिकमंड केलं का? तोच तुझा बॅास असेल का? तो तुझा फक्त मित्र की अजून काही? त्याने मदत केली म्हणून त्याला दहा हजार रुपये द्यायचे का? 
हो पप्पा, पण ते या कंपनीत काम करत नाहीत, त्यांची चहाची टपरी आहे. 
आमच्या गोल्ड मेडल मिळवून एम टेक केलेल्या कन्येला एका टपरीवाल्याने मदत केली! आश्चर्यच आहे. कुठे आहे तो टपरीवाला? काय आणि कशी मदत केली त्याने? डॅाक्टरांनी विचारले. 
चला मी तुमची भेट करून देते त्या देवाशी पण त्याआधी ऐका काय आणि कशी मदत केली त्यांनी.
मी दुपारी इंटरव्ह्यूसाठी इकडे आले तेव्हा कॅबचे बिल झाले होते ५०० रूपये. बॅंकेच्या सर्व्हरच्या प्रॅाब्लेममळे ॲानलाईन पेमेंट होत नव्हते नी माझ्याकडे कॅश एक रूपयाही नव्हता. जवळपास अेटीएम सुध्दा नव्हते आणि मला इंटरव्ह्यूसाठी पोहोचायला उशीर होत होता. कॅबवाला म्हणाला, मॅम तुमचा फोन ठेवा माझ्याकडे, पैसे मिळाले की मी परत करतो, पण मी फोन कसा देणार त्याला? त्याचं लक्ष माझ्या बोटातील अंगठीकडे गेलं आणि तो म्हणाला, तुमची अंगठी ठेवा, मी त्याला द्यायला अंगठी काढली नी तेवढ्यात समोरच्या टपरीवरचे काका मला म्हणालेत, थांब बेटी, अंगठी देऊ नकोस आणि त्यांनी कॅबवाल्याला ५०० रूपये दिलेत. मी त्या काकांना म्हटलं, ही अंगठी तुमच्याकडे ठेवा तेव्हा ते म्हणालेत, नको नको बेटी, परत कधी इकडे येशील तेव्हा दे पैसे. परमेश्वर तुझे भले करो म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. पप्पा, ८ कॅंडीडेट्स मधून माझ्या एकटीचं सिलेक्शन झालं. हे शक्य झालं केवळ त्या काकांनी ऐनवेळी केलेल्या मदतीमुळे आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे. ते माझ्यासाठी माणसांतील देव आहेत. 
नेहाच्या आईचेच नव्हे पण तीच्या पप्पांचेही डोळे पाणावलेत आणि त्याच क्षणी एक अत्यंत साधे कपडे घातलेला, पायात झिजलेल्या चपला घातलेला मध्यम वयीन इसम म्हणत होता, डॅाक्टर साहेब, तुमच्या मुळेच माझा मुलगा बरा झाला आणि मी तुमचे पैसे दिले नाहीत तरीही तुम्ही आम्हाला घरी जाऊ दिलं, परमेश्वर सदैव तुमचं भलं करो. 
डॅाक्टरांनी त्या इसमाला जवळ घेतलं आणि त्यांनी जे काही केलं ते बघून नेहा, तीची आई आणि तो इसमही चकित झाला. डॅाक्टरांनी खिशात हात घातला आणि एक अंगठी त्याला दिली. हे काय करतात तुम्ही? नेहाने, नेहाच्या आईने आणि त्या इसमाने एकाच वेळी विचारले.
आज सकाळी मुलाला बरं वाटत नाही म्हणून हे हॅास्पीटलमध्ये आले होते. काही टेस्ट्स करून मी इंजेक्शन नी औषधे दिली. ५००० रूपये बिल झाले, मी तासाभरात पैशांची व्यवस्था करतो म्हणत हे एका तासाने परतले. डॅाक्टर साहेब, हे घ्या पैसे म्हणत त्यांनी खिशात हात घातला पण खिसा रिकामा होता. 
डॉक्टर साहेब, पैसे कुठेतरी पडले. ते म्हणालेत पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही खोटं बोलून मला फसवत आहात असा आरोप मी केला. साहेब, माझा मोबाईल ठेवा, मी ३-४ दिवसांत पैसे आणून देतो. ह्या जुन्या मोबाईलची किंमत ५०० रूपयेही नाही, असे म्हणताना माझे लक्ष त्यांच्या बोटातील अंगठीकडे गेले. साहेब ही माझ्या वडिलांची निशानी आहे, मी ३-४ दिवसांत पैसे आणून देईन तेव्हा कृपाकरून मला अंगठी परत द्या, माझ्या पायावर डोकं ठेवत त्यांनी विनवले. ५००० रूपयांसाठी मी ५०००० रूपयांची अंगठी घेतली. तीच अंगठी मी त्यांना परत करतोय.
डॅाक्टर साहेब, मी ५००० रूपये दिल्यावरच अंगठी घेईन, प्रामाणिकपणे तो इसम म्हणाला. मला थोडा वेळ द्या प्लीज. मी जास्त मेहनत करून लवकरच तुमचे पैसे देईन.
तुमचं नांव राज ना? नेहाच्या आईने विचारल्यावर त्या इसमाने होकार दिला हे पाहून चकित झालेली नेहा आणि डॉक्टर एकसुरात म्हणाले, यांचे नांव तुला कसे माहित? तू ओळखतेस का यांना? कसे आणि कघीपासून? 
सकाळी यांनी सोडलेल्या रिक्षेत मी बसले आणि सीटवर मला एक पाकिट मिळाले त्यावर ५०००/- रूपये आणि राज असे लिहिले होते. मी यांना आवाज दिला पण हे पटकन कुठेतरी निघून गेले. नेहाच्या आईने ते पाकिट राजला दिले. या अनपेक्षित आणि सुखद आश्चर्याने राजचे डोळे पाणावलेत, आनंदाश्रुंनी. परमेश्वराचे आणि नेहाच्या आईंचे आभार मानत राजने ते ५०००/- रूपये डॅाक्टरांना दिले आणि त्यांचेही आभार मानत ती अंगठी त्याने त्यांच्याकडून आनंदाने घेतली.
पप्पा, हेच ते माणसांतील देव ज्यांनी मला कॅबवाल्याला अंगठी देण्यापासून रोखले आणि माझ्या कॅबचे पैसे स्वेच्छेने भरले. काका, तुमच्यामुळेच मी इंटरव्ह्यूला वेळेत पोहोचले आणि तुमच्या आशीर्वादामुळे मला समोरच्या कंपनीत माझ्या स्वप्नातील जॅाब मिळाला. ही घ्या तुमच्या या लेकीकडून छोटीशी भेट म्हणत नेहाने पप्पांकडून घेतलेले १००००/- रूपये राज काकांना दिलेत, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवत.
परमेश्वरा, तुझे अस्तित्व आहे रे बाबा, फक्त विश्वास आणि श्रध्दा हवी. तू देव्हाऱ्यात नसतो तर माणसांतच असतो, राज म्हणाला. अगदी बरोबर, नेहा आणि तीचे आई-बाबा एकसुरात म्हणालेत.
डॅाक्टरांनी योग्य उपचार करून तसेच ५००० रूपये न मिळताच राजला अंगठी परत करायची तयारी दाखवून, नेहाच्या आईने राजचे रिक्षात मिळालेले ५००० रूपये देऊन, राजने नेहाला स्वेच्छेने मदत करून नी नेहाने राज काकांनी केलेल्या मदतीची जाण ठेवत तीच्या यशाचे श्रेय आणि प्रेमाची अमूल्य भेट नतमस्तक होत त्यांना देऊन माणसांतील देवाचे दर्शन घडविले होते.
चला तर आपणही सत्कार्य करू या, आज ना ऊद्या नक्कीच होईल आपल्याला माणसांतील देवाचे दर्शन.
हो, पण थोडी वाट पहायची तयारी मात्र हवी. 
शक्य आहे, कदाचित आपणही होऊ शकतो इतरांसाठी माणसांतील देव, पण अथक प्रयत्न नी सत्कर्म मात्र करायला हवे. आहात ना तयार?

2496. जाणीव

     आता थंडी आलीये तर भांडी जरा जास्त पडतील हा, मला पाण्यात हात घालवत नाही, थंडी खूपच वाजते बाई, घरकाम करणाऱ्या मावशींना मनाली हे बोलली. तसं कधी नव्हे त्या मावशीही पटकन बोलून गेल्या, पण थंडी मलाही वाजते ग ताई.
मनालीला एकदम आपल्या चुकीची जाणीव झाली. आपण आपलाच विचार करतो फक्त. बरोबर आहे की त्यांचही, त्याही माणूसच आहेत. थंडी त्यांनाही वाजत असेलच की. बघितलं तर आपल्या आईच्या वयाच्या आहेत जवळपास. पण आपण जशी कामं टाळण्यासाठी कारणं देतो, त्यांच्याकडे ती नाहीत एवढंच !! 
कितीही थंडी वाजली, सर्दी झाली, खोकला झाला, तरी त्यांची कामातून सुटका नाहीच.
मावशी तेवढं बोलून गप्प बसल्या. कधी नव्हे ते त्या असं बोलल्या होत्या. मनालीला एकदम लागलं ते. तिने त्यांची भांडी घासून झाल्यावर त्यांच्या हातात गरमागरम चहाचा कप ठेवला आणि म्हणाली, सॉरी मावशी, चुकले मी. माझ्या मनात माझाच विचार फक्त!
मावशींनाही स्वतःच्या बोलण्याचं कसतरी वाटलं होतच, त्याही म्हणाल्या, तोंडातून निघून गेलं पटकन. मी घासीन जास्तीची भांडी, त्यात एवढं काही नाही. माझं तर कामच आहे ते.
पण झेपेल एवढंच काम करा मावशी, आता बोललात ते चांगलच केलंत तुम्ही. नाहीतर मला जाणीवच नसती झाली कधी, त्रास तुम्हालाही होत असेल त्याची. कधी कधी लक्षात नाही येत माणसांच्या, स्वतःचीच आत्मकेंद्री वृत्ती.
नाही पाडणार मी तुमच्या अंगावर जास्तीची भांडी. तुम्ही रोज न चुकता येता तेच खूप आहे माझ्यासाठी.
मी माझ्यासाठी येते ताई. काम करीन तर खाईन ना...? जरा चूक झाली तर फट्कन काढून टाकतात बायका. विचार पण करत नाहीत आमचा. त्यात माझं वय झालेलं, तरीपण मला तुमच्यासारख्यांनी धरून ठेवलंय ते नशीबच म्हणायचं माझं. शरीर साथ देत नाही म्हणावं तसं, मग तोंडातून निघतो एखादा शब्द. तसा पोरगा बघतो मला. पण त्याच्या तुटपुंज्या पगारात आपला कशाला भार आणखी. पोरगा असला तरी कधी बोलून दाखवलं तर घाव जिव्हारी लागायचा माझ्या, त्यापेक्षा आपण हात- पाय हलवत राहिलेल बरं नाही का? 
एवढं बोलून मावशी चहा संपला म्हणून उठल्या. कपबशी विसळली आणि जाऊ लागल्या, तेवढ्यात परत मनाली म्हणाली, मावशी कधी काय लागलं तर हक्काने सांगा. सगळीच माणसं वाईट नसतात, इतर व्यापात काही गोष्टी क्लिक होत नाहीत एवढंच. 
मावशी मान डोलावून निघून गेल्या. तसं मनालीला काहीतरी सुचलं. तिने स्टुलावर चढून कपाटावरची पेटी काढली. त्यात सर्वात खालती तिच्या आईचा स्वेटर होता. तिने तो बाहेर काढून स्वच्छ धुतला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मावशी आल्या. समोर रोजच्यापेक्षाही कमी भांडी बघून त्यांना वाईट वाटलं आणि त्या म्हणाल्या, ताई खूप मनावर घेतलं तू. तुझ्या पोरांसाठी ठणठणीत रहायला पाहिजे की नको? बारकी आहेत अजून ती. 
काही होत नाही, ती फक्त कारणं होती मनाची. तुम्ही करणाऱ्या समोर दिसत होता म्हणून, आता मनाला बजावलं मी, एवढं बोलून मनालीने आतल्या खोलीत ठेवलेला स्वेटर आणून मावशीच्या हातात दिला आणि म्हणाली, माझ्या आईचा स्वेटर आहे हा. शेवटची आली तेव्हा विसरून गेली होती. मग अगदी जपून पेटीत ठेवला होता दोन वर्ष. पण काल का कोण जाणे एकदम तुम्हाला द्यावासा वाटला. पेटीत पडून पडून असाच जीर्ण होण्यापेक्षा कुणाच्या अंगाला लागला तर त्याचंही सार्थक होईल नाही का?
पण ताई....... मावशींना बोलायचं होतं तरी गहिवरून काही बोलताच आलं नाही.
 मनालीच पुढे म्हणाली, बघा... ही इतकी साधी गोष्टही मला दोन वर्षांनी लक्षात झाली. मी काल म्हटलं नाही का तुम्हाला, सगळीच माणसं वाईट नसतात, काहींना वेळच्या वेळी काही क्लिक होत नाही इतकंच. 
 मावशी काही बोलल्या नाहीत, पण या वयात आपली कोणीतरी काळजी करतंय, ही गोष्ट त्यांची जगायची उर्मी वाढवून गेली एवढं नक्की.......!! 

 ©️ स्नेहल अखिला अन्वित  ✍️

2495. ...पण नियती

 "ए म्हाताऱ्या, आज तरी येणार आहे का तुमची 'ज्युलिएट'? का आज पण फुलांचा गुच्छ सुकणार?" कॉलेजच्या मुलांचं टोळकं मोठमोठ्याने हसत होतं. "जाऊ दे रे, म्हाताऱ्याला वेड लागलंय. ४० वर्ष झाली म्हणे, रोज ६ वाजता इथे येऊन बसतो. ती काय आता भु*ता*च्या रूपात येणार आहे का?" बाकड्यावर बसलेल्या माधवरावांनी त्या मुलांकडे बघून एक स्मितहास्य केलं, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी कोणालाच दिसलं नाही. त्यांनी शांतपणे हातातील मोगऱ्याचा गजरा बाकड्यावर ठेवला आणि घड्याळाकडे पाहिलं... ६ वाजायला ५ मिनिटं बाकी होती.
मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT). अफाट गर्दी, धावपळ आणि गोंगाट. पण या सगळ्या गर्दीत एक माणूस असा होता ज्याला काळाचं भान नव्हतं. माधवराव. वय वर्षे ६५. अंगात साधा सदरा, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा आणि हातात नेहमी एक ताजा मोगऱ्याचा गजरा.
गेली ४० वर्षं, ऊन असो, पाऊस असो वा थंडी, माधवराव रोज संध्याकाळी ५:५५ ला प्लॅटफॉर्म नंबर ४ च्या त्याच ठराविक बाकड्यावर येऊन बसायचे. बरोबर ६ वाजता त्यांची नजर गेटकडे लागायची. ८ वाजेपर्यंत वाट बघायचे आणि मग निराश होऊन, तो गजरा तिथेच बाकड्यावर ठेवून निघून जायचे. स्टेशनवरचे हमाल, चहावाले आणि रोजचे प्रवासी त्यांना 'वेडा प्रेमी' म्हणून ओळखायचे.
एका दिवशी, 'अनिकेत' नावाचा एक तरुण क्रा*ईम रिपोर्टर तिथे आला. त्याला या आजोबांबद्दल कुतूहल वाटलं. तो त्यांच्या जवळ जाऊन बसला.
"काका, कोणाची वाट बघताय?" अनिकेतने विचारलं. माधवरावांनी शून्यात नजर लावत उत्तर दिलं, "माझी 'सुलू'... सुलोचना. आज येईल ती. नक्की येईल." अनिकेतने विचारलं, "किती वर्षांपासून वाट बघताय?"
"४० वर्षे..." माधवराव म्हणाले. "१९८५ सालची गोष्ट आहे. आमचं प्रेम होतं. पण तिचे वडील मोठे सावकार होते आणि मी एक सामान्य कारकून. त्यांनी लग्नाला विरोध केला. म्हणून आम्ही ठरवलं, पळून जाऊन लग्न करायचं. याच बाकड्यावर, संध्याकाळी ६ वाजता आम्ही भेटणार होतो आणि इथून पुण्याच्या गाडीने पळून जाणार होतो."
माधवरावांचा आवाज दाटला. "मी वेळेवर आलो. हातात हेच मोगऱ्याचे फूल घेऊन. ६ वाजले, ७ वाजले, रात्र झाली... पण सुलू आलीच नाही. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेलो, तर कळलं तिचं घर बंद आहे. तिचे वडील तिला घेऊन कुठेतरी निघून गेले होते. मला वाटलं... श्रीमंती बापाच्या दबावाखाली तिने मला धोका दिला. तिने माझं प्रेम नाकारलं. पण माझं मन मानत नाही रे... म्हणून रोज येतो. कदाचित तिला कधीतरी माझी आठवण येईल आणि ती येईल."
अनिकेतला हे ऐकून वाईट वाटलं. 'एकतर्फी प्रेम आणि धोका' अशी साधी स्टोरी वाटली त्याला. पण पत्रकार असल्याने त्याच्या मनात एक शंका आली. "ती आलीच नाही? असं कसं होईल?"
अनिकेतने माधवरावांना त्या दिवसाची तारीख विचारली.
"२५ जून १९८५," माधवरावांनी तारीख सांगितली.
अनिकेत ऑफिसला गेला. त्याला ती तारीख काहीतरी ओळखीची वाटत होती. त्याने जुन्या फाईल्स आणि वर्तमानपत्रांचे अर्काईव्ह (Archives) उघडले. २५ जून १९८५ चा पेपर समोर आला आणि अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली.
त्या दिवशीच्या पेपरची हेडलाईन होती, "व्हिटी स्टेशनवर (आत्ताचे CSMT) बॉ*म्ब*स्फो*ट: १२ जणांचा मृ*त्यू, अनेक ज*ख*मी."
अनिकेतने धडधडत्या छातीने मृतांची यादी वाचायला सुरुवात केली. आणि सातव्या नंबरवर ते नाव होतं, ज्याने अनिकेतचे डोळे पाणावले. "नाव: सुलोचना देशमुख, वय २१ वर्षे. घटनास्थळ: प्लॅटफॉर्म नंबर ४."
अनिकेतला धक्काच बसला.
सुलोचनाने धोका दिला नव्हता! ती आली होती! ती वेळेच्या आधीच आली होती. ती त्या बाकड्यावर माधवरावांची वाट बघत बसली होती. पण ६ वाजण्याआधीच, ५:५० ला झालेल्या त्या स्फो*टा*त ती कायमची निघून गेली होती. त्या काळी मोबाईल नव्हते, संपर्क साधायला साधन नव्हतं आणि माधवराव उशिरा पोहोचले असतील किंवा गोंधळात त्यांना हे कळलंच नसेल.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता अनिकेत धावत स्टेशनवर आला. माधवराव नेहमीप्रमाणे बाकड्यावर बसले होते. हातात गजरा होता.
"काका..." अनिकेतचा आवाज जड झाला होता.
माधवरावांनी आशेने पाहिलं, "काय झालं रे? सुलूचा काही निरोप मिळाला का?"
अनिकेतने तो जुना, पिवळा पडलेला पेपरचा तुकडा माधवरावांच्या हातात दिला. "काका, सुलोचना मावशींनी तुम्हाला धोका नाही दिला हो. त्या आल्या होत्या..."
माधवरावांनी थरथरत्या हाताने तो पेपर वाचला. 'सुलोचना देशमुख... मृ*त्यू... प्लॅटफॉर्म नंबर ४... वेळ ५:५०.'
४० वर्षांचा तो बांध फुटला. माधवराव तिथेच बाकड्यावर कोसळले आणि हंबरडा फोडून रडू लागले.
"सुलू... ग माझी सुलू! मी तुला ४० वर्षे 'बेवफा' समजत होतो... तुला शि*व्या घालत होतो... आणि तू? तू माझ्यासाठी इथेच प्राण सोडले होतेस? अगं एकदा तरी सांगायचं होतंस... मी ४० वर्षे चुकीच्या रागात जगलो ग!"
त्यांचे आक्रंदन पाहून अख्खं स्टेशन शांत झालं. जी मुलं त्यांची चेष्टा करत होती, त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. ज्या बाकड्याला ते 'प्रेयसीची वाट पाहण्याची जागा' समजत होते, ती जागा खरं तर त्यांच्या प्रेमाची 'समाधी' होती.
आजही तो बाकडा तिथेच आहे. पण आता माधवराव तिथे कोणाची वाट बघत नाहीत. ते येतात, तो मोगऱ्याचा गजरा त्या बाकड्यावर ठेवतात, बाकड्याला डोकं टेकवून नमस्कार करतात आणि निघून जातात. फरक इतकाच आहे की, पूर्वी त्यांच्या डोळ्यात 'आशेचा' प्रकाश होता, आता तिथे 'पश्चात्तापाचे' अश्रू असतात. कारण त्यांना सत्य समजलंय, "ती आली होती... पण नियती त्यांच्या भेटीच्या १० मिनिटं आधी आडवी आली होती."

2494. कायम बापाची किट किट

      फॅन चालू आहेत दिसत नाही का बाप ओरडला..कायम बापाची किट किट असते कधी चप्पल पालथी पडली नीट कर तर कधी लाईट च विनाकारण चालु ठेवली लाईट बंद कर सारखी कटकट करतो हा बाप कधी एकदाच इंजिनिअरिंग पुर्ण होतय आणि या बापाला सोडून कायमचा जाईल.
        मुलाला वैताग आला होता. इंजिनीअरिंग च शिक्षण पूर्ण करून एक ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला.   तिसऱ्या मजल्यावर इंटरव्ह्यू होता.
 पहिल्या मजल्यावर झाडांच्या पालथ्या पडलेल्या कुंड्या त्याने नीट केल्या.
दुसर्या मजल्यावर विनाकारण चालु असलेले लाईट ट्युब बंद केले.
तिसऱ्या मजल्यावर खुप गर्दी पण सगळ्यांनी हॉलच्या बाहेर वाकड्या तिकड्या एकावर एक अस्ताव्यस्त चपला टाकलेल्या त्या त्याने नीट केल्या.
     एकदा चांगल्या कामाची सवय झाली ना वाकडे तिकडे उलट पालट डोळ्यांना बघू वाटत नाही. जो आत इंटरव्ह्यू देऊन आला सगळे त्याला बोलावून विचारायचे. ये तुला काय विचारले सांग ना.  पण याने कुणालाच काही विचारले नाही. शेवटचा नंबर त्याचा होता. जणू इंटरव्ह्यू घेणारे साहेब त्याचीच वाट पाहत होते.
तो आत गेला आणि पटकन साहेब उठले आणि त्याच्या हातात हात दिला.
आर यु सिलेक्ट अभिनंदन 🙏 🙏 🙏 
   हा म्हणतो सर पण मला तुम्ही काहीच विचारले नाही.साहेब म्हणाले विचारायची गरज नाही तुझ्या कृतीतूनच तुझी पात्रता कळाली.तुला ज्या बाबांनी घडवले त्यांना माझा सलाम.
  आमच्या कंपनीसाठी आम्हाला नोकर नको तर कंपनी सांभाळणारा सुसंस्कारित मॅनेजर हवा आहे. सिलेक्शन लेटर घेतल घरी जाईपर्यंत मुलाच्या डोक्यात सारख घोळत होते आज मी बाबांची माफी मागणार. त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप राग होता पण त्यांनी दिलेल्या संस्कारांची ही फलश्रुती आहे. परमेश्वराच्या कृपादृष्टीने चांगले घडत असते.  देव दिसत नाही तो प्रत्येकाच्या शरिरात ठाण मांडून बसलेला आहे. मन सैरभैर पळते, वागते, चंचल आहे. स्थिरता नाही, घडीत येथे, घडीत तिथे अशीच अवस्था आहे. 
       मुलगा घरी जातो बाप अंगणात बैल पाणी पाजीत उभा होता. तितक्यात मुलगा धावतच आला आणि बापाच्या गळ्यात पडून रडू लागला. मुलाला रडताना पाहून बापाचा कंठ दाटून आला. रडतोस काय हे बघ जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही. अरे एवढा मोठा धट्टा कट्टा गडी आणि असा इंटरव्ह्यू त नापास झाला म्हणून रडत आसतेत व्हयर पोरा.
  ह्यो बाप आहे ना तुला. आजुन हजार इंटरव्ह्यू दे जोपर्यंत तुला काम मिळत नाही तोपर्यंत हा म्हतारा बाप थकत नाही.
   बापाच हे बोलण ऐकून पोराला अजुनच रडू आलं आणि त्याने सिलेक्शन लेटर बापाच्या हातात दिले आणि पाया पडून आशिर्वाद घेतला.
कसला कागूद हाय र पोरा.
बाबा मी मॅनेजर झालो आणि तेही माझ शिक्षण नाही तर तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे.
बापाने घरात तिजोरीत जपून ठेवलेले काही पैसे काढले. घाईघाईने पेडे आणून जमेल त्याला देत होता आणि डोळ्यात आसव आणून भुषणाने सांगत होता ल्योक मॅनेजर झाला बर.
 🌸🦚 *🌸🦚  कथा हृदयाला भिडली तरच लाईक कमेंट्स शेअर करा.

2493. काळी

     तिचं स्वतःच्या आई - वडिलांवर  , भावावर जीवापाड प्रेम होतं. तसं बघायला गेलं तर ती काळी होती यात तिचा काहीच दोष नव्हता. आता देवानेच तिला तसं घडवलं होतं त्याला ती बिचारी तरी काय करु शकणार होती. 
तरी पण तिला सगळे काळीच म्हणत. तीच तिची जन्मापासूनची ओळख होती. तिचे आई- वडील आणि मोठा भाऊ गोरे होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिच्या काळेपणाचे फारच वैषम्य वाटायचे. विशेषतः तिच्या आईला. तशी ती लख्ख काळी नव्हती. सावळी होती. पण इंग्रजांची गुलामगिरी नसानसात भिनलेले भारतीय लोक सावळ्यालाही काळंच म्हणतात हे मी अनेकदा बघितलं आहे. ती ज्ञानप्रबोधिनीची अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. पुढे बारावीला स्कोरिंग करत तिने वैशंपायन मेडिकलला ॲडमिशन घेतली. मग ती टेनिस खेळायला जाऊ लागली. तिथे  तिला व्हीनस विल्यम्स म्हणून चिडवायला लागले. तिच्या मनाला जणू शेकडो इंगळ्या डसत होत्या. फक्त काळ्या रंगामुळे तिची हुशारी, सगळे गुण, टॅलेंट अक्षरशः मातीमोल झालं होतं. तिने अनेक उपाय केले, कित्येक क्रीम्स वापरली, विविध डाॅक्टर्सची ट्रीटमेंट घेतली. पण परिणाम शून्य. सुई टोचलेल्या फुलपाखरासारखी काळी तडफडत होती. ती एमबीबीएस झाल्यावर पुण्यात नोकरी करणाऱ्या तिच्या भावाने फ्लॅट घेतला. तिच्या कुटुंबियांनी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. सामान हलवायला सुरुवात झाली. त्याच दिवशी तिने मला थांबवले. मला म्हणाली, " तुमच्याशी बोलायचं आहे. " तिला सोयीस्कर अशा निवांत ठिकाणी आम्ही बसलो. तिने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला, " मला कळले आहे की तुम्ही पत्रिका बघता..मला माझ्या काळेपणावर उपाय सांगा. माझी आता पूर्ण कोंडी झाली आहे. " 
मी तिची जन्मपत्रिका पाहिली. तिची शनिची महादशा आता जवळपास संपत आली होती. शनि ही न्यायाची देवता आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचं शनि उशीरा का होईना पण चांगले फळ देतच असतो. तिलाही तिच्या कठोर परिश्रमांचं चांगलं फळ लवकरच मिळणार होतं. पण याक्षणी तिला हे सगळं सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. 
तिला या क्षणी आत्मविश्वास देणं अत्यंत गरजेचं होतं नाहीतर तिचं आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. या कामी तिच्या गुणांचा काहीच उपयोग होणार नव्हता कारण त्याची जाणीव होतीच. मला तिचा असा एखादा प्लस पाॅइंट हवा होता ज्याची तिला अजून जाणीव झाली नव्हती. विचार करता करता मी तिच्याकडे नीट बघितलं आणि मला उपाय सापडला. मी विचारलं, "तुझ्याकडे पूर्णाकृती आरसा आहे का ?" ती म्हणाली, " आमच्याकडे तर नाही पण नव्या फ्लॅटमध्ये आहे ".मी तिला आश्वस्त केलं, " तो आरसाच तुझ्या आयुष्याचा टर्निंग पाॅइंट असणार आहे ". ती माझ्याकडे अविश्वासाने बघत राहिली. मी पुढे बोलू लागलो, " तुम्ही तिकडे शिफ्ट झाल्यावर घरात कुणीही नसताना जमेल तितक्या मोकळेपणाने त्या आरशासमोर उभी राहा आणि आरशात बघ. तिथं एक रेखीव शिल्प तुझ्याकडे पाहून खुदकन हसेल. त्या रेखीवपणाशी असलेलं तुझं नातं तुला जन्मभर सांभाळायचं आहे. त्यासाठी तुला एक हेल्दी पॉझिटीव्ह लाईफस्टाईल जगावी लागेल ज्यात व्यायामाला सर्वोच्च स्थान असेल. तुझ्या काळेपणाविरुद्धच्या लढाईत तुझं प्रमाणबद्ध शरीर हेच तुझं हत्यार असणार आहे. या युद्धाला जिंकण्यासाठी तुला तुझ्या गात्रागात्रांतून रणशिंग फुंकावं लागेल. तुझ्या रंध्रारंध्रातून चैतन्याची कारंजी उसळू देत आणि मग बघ कसा चमत्कार घडेल. तुझ्या सळसळत्या पेशींच्या गगनभेदी जल्लोषात तुझ्या काळेपणाचा आवाज क्षीण होऊन जाईल." मी माझे बोलणे संपवले. ती काही क्षण माझ्याकडे बघत राहिली आणि मग एकेक शब्द ठामपणे उच्चारत म्हणाली, " मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. "
जग फार लहान आहे. काही वर्षांनी आमची परत भेट झाली. मी पहिल्या नजरेत तिला ओळखू शकलो नाही. एक अत्यंत आकर्षक तरुणी माझ्या समोर कमालीच्या आत्मविश्वासाने उभी होती. मग ती कितीतरी वेळ भरभरुन बोलत राहिली  .....  स्वतःविषयी , करिअरविषयी, विदेशातील नोकरीविषयी. आणि मी फक्त समाधानाने ऐकत राहिलो.

- जितेंद्र अभ्यंकर
  8605396156

2492. चाळीशीतला हुरूप

 !! भ्रमणध्वनीची घंटा
खणखणली!!
अज्ञात क्रमांक पाहून त्याने नाक मुरडतच विचारले "कोण "?
समोरचा मंजुळ आवाज विचारत होता," राजू का ? "
आवाज एकदम ओळखीचा वाटला मग त्याने विचारले "हो आपण?"
" मी मिताली," आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले "मिताली "?
"हो ,मी मिताली बोलतेय".
दिवाणखान्यातून तो गच्चीत आला , हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती.छातीची धडधड आता वाढली होती , श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं ,
नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या मितालीला आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला. आता काय बोलाव हे कळताच नव्हता, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला," काय कुठे आहेस ? "खूप वर्षात भेट नाही,फोन नाही, अमितने नंबर दिला म्हणून फोन करतेय." तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत.
आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला," भेटायचा होतं तुला कधी वेळ आहे ?"
त्याला क्षणभर वाटल म्हणावं"तुझ्यासाठी कधीपण" पण मनाला आवर घालत तो म्हणाला रविवारी . तिने पुन्हा विचारले कुठे भेटूयात तुझ्या घरी कि माझ्याकडे येतोस ? आता त्याल स्वर्ग दोन बोटेच उरला होता.अजून हुरूप आला "एखाद्या तटस्थ ठिकणी भेटूयात का ? " ते ही कुठे हि - ती मग त्याने शहरातील एका मोठ्या शानदार हॉटेलच नाव सुचवलं.भेटीचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली . आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही मोठे वाटू लागले. अचानक एक मोदी जाकेट घेवून तो घरी आला. एक दिवस सलून मध्ये जावून फेशिअल मसाज थोड्या भुर्या झालेल्या केसांना रंग, असं सगळा सेट अप बदलला. नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले, तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असं सांगून वेळ मारून नेली.ती भोळी होती तिला गैर काहीच नाही वाटलं . नाकासमोर आयुष्य जगणाऱ्या जोडीदाराला आतून होणाऱ्या गुद्गुद्गुल्या तिला जाणवली नाहीत.हजारो रुपये बूट, गॉगल यावर खर्च होत होता,पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.रविवार उजाडला, सकाळपासून सॉरी एकदम खुशीत होती. पाच वाजले. taxi दारात येवून उभी राहिली.बायकोने शुभेच्छा दिल्या, मुलालाही बाबा कोणत्या तरी कामगिरीवर चाललय असं वाटून नमस्कार केला. गाडी हॉटेलच्या दारात थांबली ती हातात गुलाब घेवून त्याची प्रतीक्षा करत होती,तिच्याकडे पाहून हरखून गेला. आत जावून बसले, महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या, बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरलं,सगळा कस छान पार पडलं, बँक शिल्ल्कीचा फज्जा उडाला होता पण हा आनंद परत मिळणार नव्हता समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून हा तर खुलूनच गेला, नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले आणि यावर सही करशील का ? असं लडिवाळपाने विचारले
विमा policy चे कागद पाहून तो थबकला. ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केलीय, फॉर्म मी नंतर भरेन तू फक्त सही कर.
सही झाली आणि हप्ते सुरु झाले.दर हप्त्याला आठवणी ताजा होत राहिल्या.
😝😝😝😝😝😝

2491. आपण आता एकमेकांसाठी योग्य नाही आहोत. माझे स्टॅंडर्ड्स बदललेत.

 मुंबई... स्वप्नांची नगरी. या शहराच्या धावपळीत रोज लाखो स्वप्नं जन्माला येतात आणि लाखो चिरडली जातात. याच गर्दीत एक होतं आर्यनचं निस्सीम प्रेम आणि प्रियाचं उत्तुंग स्वप्न. आर्यन आणि प्रिया एकाच कॉलेजमध्ये होते. आर्यन मध्यमवर्गीय घरातला, अत्यंत साधा आणि समंजस मुलगा. त्याला फोटोग्राफीची आवड होती, पण पोटापाण्यासाठी तो एका कुरिअर कंपनीत नाईट शिफ्ट करायचा. दुसरीकडे प्रिया, उच्चभ्रू सोसायटीत राहणारी, फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करू पाहणारी महत्त्वाकांक्षी मुलगी.
आर्यनचं प्रियावर जीवापाड प्रेम होतं. पण प्रियासाठी आर्यन फक्त एक 'चांगला मित्र' होता, जो तिला नेहमी मदत करायला तत्पर असायचा. चर्चगेटच्या गर्दीत तिला लोकलमध्ये खिडकीची सीट मिळावी म्हणून आर्यन स्वतः दरवाजात लटकत जायचा. तिला आवडता महागडा कॉफीचा कप मिळावा म्हणून तो स्वतः अनेकदा वडापाववर दिवस काढायचा. प्रियाला वाटायचं, आर्यन खूप 'चिल' आहे, त्याला पैशांची पर्वा नाही. पण त्या प्रत्येक कॉफीच्या कपमागे आर्यनच्या रिकाम्या पाकिटाचा हुंदका दडलेला असायचा, हे तिला कधीच कळलं नाही.
एकदा प्रियाला तिच्या डिझाइन्स एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पाठवायच्या होत्या. ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती. पण त्यासाठी एन्ट्री फी होती - तब्बल एक लाख रुपये. प्रियाकडे इतके पैसे नव्हते. तिने खूप प्रयत्न केले, पण काही जमलं नाही. ती मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसून ढसाढसा रडत होती. "आर्यन, माझं स्वप्न संपलं रे. मी कधीच मोठी डिझायनर होऊ शकणार नाही." तिचे अश्रू आर्यनला बघवले नाहीत. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, "तू रडू नकोस प्रिया. काहीतरी मार्ग निघेल."
दुसऱ्या दिवशी सकाळीच आर्यन प्रियाकडे गेला आणि तिच्या हातात एक लाख रुपयांचे बंडल ठेवले. प्रिया आश्चर्यचकित झाली. "आर्यन, एवढे पैसे कुठून आले?"
आर्यनने सहज हसून खोटं सांगितलं, "अगं, आमच्या गावाची एक वडिलोपार्जित जमीन होती, ती विकली गेली. माझ्या वाटणीला आले हे पैसे. तू घे, तुझ्या स्वप्नांपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही." प्रियाने आनंदाने त्याला मिठी मारली. तिने प्रदर्शनात भाग घेतला आणि तिचे डिझाइन्स सिलेक्ट झाले. तिला थेट पॅरिसवरून ऑफर आली. प्रियाचं नशीब पालटलं.
प्रिया आता एक यशस्वी डिझायनर झाली होती. तिचं जग बदललं. पार्ट्या, इव्हेंट्स आणि नवीन श्रीमंत मित्र. आर्यन हळूहळू तिच्या आयुष्यातून मागे पडत गेला. एका संध्याकाळी तिने आर्यनला एका पॉश रेस्टॉरंटमध्ये बोलावले. ती खूप सुंदर दिसत होती, महागडे कपडे, हातात ब्रँडेड बॅग. समोर आर्यन साध्या शर्टमध्ये बसला होता. प्रिया म्हणाली, "आर्यन, बघ मी आज कुठे पोहोचले. पण तू... तू अजूनही तिथेच आहेस, त्या कुरिअरच्या नोकरीत. मला वाटतं, आपण आता एकमेकांसाठी योग्य नाही आहोत. माझे स्टॅंडर्ड्स बदललेत. यू नो व्हॉट आय मीन?"
आर्यनच्या काळजाचा तुकडा पडला. ज्या मुलीच्या स्वप्नांसाठी त्याने स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, ती आज त्याच्या 'स्टॅंडर्ड'ची लायकी काढत होती. पण त्याने चेहऱ्यावर वेदना दिसू दिली नाही. तो शांतपणे हसला आणि म्हणाला, "तू बरोबर म्हणतेस प्रिया. तू खूप पुढे निघून गेली आहेस. आनंदी राहा." त्याने खिशातून एक छोटीशी भेटवस्तू काढली, एक साधं की-चेन होतं, आणि टेबलावर ठेवून तो निघून गेला. प्रियाला थोडा गिल्ट वाटला, पण तिने दुर्लक्ष केलं. ती बिल देण्यासाठी तिची महागडी बॅग उघडत होती, तेवढ्यात तिच्या बॅगेतून एक जुनी डायरी खाली पडली. ही आर्यनची डायरी होती, जी कॉलेजच्या दिवसात एकदा तिच्याकडेच राहिली होती.
कुतूहलाने तिने डायरी उघडली. शेवटच्या पानावर काहीतरी चिकटवलेलं होतं. ती एक पावती होती.
'रॉयल प्यादेवाले - जुने कॅमेरे खरेदी-विक्री केंद्र'. पावतीवर लिहिलं होतं: "एक व्हिंटेज लाइका (Leica) कॅमेरा विकल्याबद्दल - किंमत रुपये १,००,०००/-"
प्रियाला आठवलं, हा तोच कॅमेरा होता जो आर्यनच्या दिवंगत वडिलांची शेवटची आठवण होता. आर्यन म्हणायचा, "माझा जीव जाईल, पण हा कॅमेरा मी कधीच कोणाला देणार नाही." त्या पावतीखाली आर्यनने पेन्सिलने लिहिलं होतं: "बाबा, माफ करा. आज तुमची शेवटची आठवण विकली. पण काय करू? प्रियाच्या डोळ्यातली स्वप्नं तुटताना पाहण्यापेक्षा, माझा कॅमेरा तुटलेला बरा. तिचं स्वप्न पूर्ण झालं, यातच माझं सर्वस्व मिळालं."
ते वाचून प्रियाच्या हातापायातली शक्तीच गेली. ती रेस्टॉरंटच्या मधोमध मोठमोठ्याने रडू लागली. लोक बघत होते, पण तिला भान नव्हतं. ज्याला तिने 'स्टॅंडर्ड' नाही म्हणून हिणवलं, त्या मुलाने तिच्या एका हास्यासाठी आपल्या बापाची शेवटची निशाणी विकली होती. जमिनी विकल्याची ती गोष्ट धादांत खोटी होती.
तिला स्वतःचीच प्रचंड घृणा वाटू लागली. तिचं यश, पैसा, पॅरिसची ऑफर... सगळं त्या एका कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर शून्य होतं. ती वेड्यासारखी रेस्टॉरंटबाहेर धावली. आर्यनला फोन लावला, पण फोन स्वीच ऑफ होता. ती त्याच्या चाळीतल्या घरी पोहोचली. खोलीला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं, "आर्यनने खोली सोडली. म्हणाला, मुंबईत आता त्याचं कोणी राहिलं नाही, तो कायमचा गावी चाललाय."
प्रियाने आपली गाडी थेट सीएसटी स्टेशनकडे वळवली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, तिला रस्ता नीट दिसत नव्हता. ती प्लॅटफॉर्मवर धावत सुटली. लांब पल्ल्याची गाडी नुकतीच हलली होती.
तिने प्रत्येक खिडकीत पाहिलं. शेवटच्या जनरल डब्याच्या दरवाजात आर्यन उभा होता, मुंबईच्या गर्दीकडे शून्य नजरेने बघत. प्रियाने जीवाच्या आकांताने धावून चालत्या ट्रेनचा दांडा पकडला. आर्यनने चमकून पाहिलं.
"प्रिया? तू इथे?" प्रियाने त्याला ओढून खाली उतरवलं. ती थेट त्याच्या पाया पडली.
"मला माफ कर आर्यन. मी आंधळी झाले होते. तू माझ्यासाठी काय केलंस, हे मला कळलंच नाही. तू तुझं सर्वस्व विकून माझं स्वप्न विकत घेतलंस, आणि मी मूर्ख तुझ्या प्रेमाची किंमत करत राहिले."
ती लहान मुलासारखी रडत होती. "मला नाही जायचं पॅरिसला, मला नाही पाहिजे ते यश, जिथे तू नशील. माझा स्टॅंडर्ड तुझ्या प्रेमापेक्षा मोठा नाही रे." आर्यनने तिला उठवलं. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, "वेडी आहेस का? तुझं स्वप्न पूर्ण झालंय, आता मागे फिरू नकोस." प्रियाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, "माझं सर्वात मोठं स्वप्न तू पूर्ण केलंस आर्यन. पण आता माझं एकच स्वप्न आहे - ज्याने माझ्यासाठी स्वतःला हरवलं, त्याला मला जिंकायचं आहे. मी कुठेही जाणार नाही, तुला सोडून."
मुंबईच्या त्या गजबजलेल्या स्टेशनवर, दोन अश्रूंची भेट झाली. त्या रात्री मरीन ड्राईव्हवर पुन्हा ते दोघे बसले होते, पण यावेळी तिथे अश्रू नव्हते, तर एकमेकांचा हात घट्ट पकडलेला एक अतूट विश्वास होता.

2490. डिलिव्हरी बॉय : ७:४५ ची एक शेवटची ऑर्डर

 मी रवी....
एक साधा डिलिव्हरी बॉय...
माझे आयुष्य म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत सिग्नलवरचा गुदमरवून टाकणारा धूर, भुकेलेल्या ग्राहकांच्या शिव्या, हॉटेलच्या काउंटरवरच्या लांबच लांब रांगा आणि दिवसाअखेर हातात उरणारे काही मोजके रुपये... 
माझ्या स्वभावात ना शौर्य होते ना धाडस.
साध्या झुरळाला बघून दचकणारा मी, त्या रात्री अशा एका चक्रव्यूहात अडकलो जिथून सुटकेचा मार्ग नव्हता... 
ती रात्र माझे भविष्य ठरवणारी रात्र ठरेल असे मला कधीच वाटले नव्हते...
त्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा घरात एक वेगळाच आनंद भरून राहिला होता... 
कारण माझ्या आईची साठावी होती... 
आयुष्यभर काबाडकष्ट करून, लोकांची धुणीभांडी करून मला मोठे करणाऱ्या आईसाठी आम्ही घरीच एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता...
तशी कार्यक्रम करावा अशी माझी आर्थिक स्थिती नव्हती..
पण बायकोच्या हट्टा पुढे कोणाचे काय चालते..
तिनेच तिच्याकडे साठवलेले पैसे देऊन आई साठी नथ आणि एक छोटेसे बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन केले होते..
सायली माझी बायको..
उठल्यानंतर मी अंथरुणात लोळतच होतो.. तेवढ्यात आवाज आला..
"लवकर आवरा आणि निघा... टिफीन तयार आहे..  आज लवकर या.. किंवा निदान वेळेवर तरी या.. आणि हो आई साठी नथ आणायची आहे.. कपाटातील माझ्या साड्यांच्या मागे पैसे ठेवलेले आहेत.... कामावर जातांना पैसे आठवणीने बरोबर घेऊन जा..."  सायली ने फर्मान सोडले..
मी सायलीला शब्द दिला, "अगं, काळजी नको करू... सर्व काही तू सांगितल्या प्रमाणे करेन.. आणि आज काहीही झालं तरी मी आठच्या आत घरी येईन. आज काम नाही, फक्त कुटुंब!"
घाई गडबडीत मी दुकानातून नथ घेऊन ऑफिस ला पोहोचलो..
त्या दिवशी ऑफिस मध्ये एन्ट्री करताच मी मॅनेजरलाही ठणकावून सांगितले होते की रात्री ७.४५ नंतर मला एकही ऑर्डर नको... 
दिवस संपत आला... 
मी माझे शेवटचे पार्सल डिलिव्हर करून बाईकवर बसलो आणि एक सुस्कारा सोडला... "चला, आज अगदी वेळेवर घरी पोहोचता येईल.." मी स्वतःशीच पुटपुटलो...
घड्याळात ७:४५ झाले होते... 
आनंदी मनाने मी घराकडे निघण्यासाठी बाईक सुरू करणार...
नेमक्या त्याच वेळी खिशात मोबाईलची थरथर जाणवली... 
एक 'Urgent' नोटिफिकेशन स्क्रीनवर रक्तासारख्या लाल अक्षरात चमकले..
"URGENT NIGHT DELIVERY FROM HOTEL BLACK LEDGER– EXTRA PAY (1000 rupee Incentive).."
एकच डिलिवरी आणि तब्बल १००० रुपये...
माझे मन डळमळले... 
म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा अर्धा खर्च निघणार होता...
मी हॉटेल चे आणि डिलिव्हरी चे लोकेशन तपासले, तर ते हॉटेल माझ्या घराकडे जाणाऱ्या हायवे वरच होते.. 
आणि डिलिव्हरी लोकेशन थोडेसे पुढे गेल्यावर आत मध्ये अवघ्या दोन किलोमीटरवर होते... 
मी रोज जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावर असून सुद्धा कधी हॉटेल चे नाव वाचल्याचे लक्षात येत नव्हते..
"जाऊदे ना.. ते हॉटेल भाग्यश्रीने ने लोकांसमोर हॉटेल व्यवसाय म्हणजे सोन्याची खाण असल्याचे चित्र उभे केले आहे त्यामुळे रोज कित्येक नवीन हॉटेल सुरू होत आहेत.. असेल असेच एखादे. पंधरा वीस मिनिटांचा तर खेळ आहे, वाढदिवस सुरू व्हायच्या आत पोहोचू," अशी स्वतःला खात्री देऊन मी 'Accept' बटण दाबले.... 
लोकेशन प्रमाणे मी हॉटेल वर पोहोचलो..
हॉटेल मी रोज ये जा करत असलेल्या रस्त्यावरच होते..
पण त्याआधी कधी मी ते हॉटेल बघितल्याचे माझ्या लक्षात येत नव्हते..
तसे हॉटेल चे बाह्य रूप अगदी सामान्य होते..
मनात असंख्य प्रश्न उभे राहिल्यानंतर सुद्धा मी कोणताही विचार न करता हॉटेलमध्ये शिरलो..
ते एखाद्या जुन्या गुहेसारखे होते... 
रिसेप्शनिस्ट काउंटर जवळ पार्सल ची विचारपूस केल्यानंतर एका रिसेप्शनिस्टने माझ्याकडे भावनाशून्य नजरेने बघत पार्सल हातावर टेकवले..
मी पार्सल बॅगेत टाकले आणि बाईक सुसाट पळवली... लोकेशनचा पाठलाग करत हायवे सोडून जसा मी आतल्या वळणावर वळलो, तसा रस्ता बदलला... डांबराची जागा कच्च्या रस्त्याने घेतली आणि पथदिव्यांची जागा झाडांच्या सावल्यांनी...
दोन्ही बाजूला घनदाट, काळीकुट्ट झाडी उभी होती... पावसाळी हवेमुळे वातावरणात एक विचित्र ओलसरपणा होता... आकाशात ढगांनी अशी गर्दी केली होती की चंद्राचा एक किरणही जमिनीवर उतरत नव्हता... अचानक, माझ्या हेडलाईटच्या पिवळसर प्रकाशात एक काळी आकृती चमकली...
एक काळी मांजर रस्ता ओलांडून मधोमध थांबली होती... तिचे डोळे रात्रीच्या अंधारात एखाद्या जळत्या कोळशासारखे पिवळेधमक चमकत होते... 
मी जोरात ब्रेक लावला, गाडी घसरली पण सुदैवाने मी पडलो नाही... माझे हृदय एखादा ढोल वाजवल्याप्रमाणे धडधडत होते.. 
गाडीचा प्रकाश आणि ब्रेकचा आवाज ऐकूनही ती मांजर तसूभरही हलली नाही, ती फक्त माझ्याकडे रोखून पाहत होती...
मला उशीर होत असल्याची जाणीव झाली..
"हट!" मी ओरडलो..
पुढच्याच क्षणी ती मांजर माझ्या नजरेसमोर अंधारामध्ये गायब झाली...
ती एका क्षणात कुठे गेली... नक्की तिचे काय झाले हे माझे मलाच कळले नाही...
मी जे बघितले ते सत्य होते की माझा भ्रम..
तो भ्रम असो की सत्य पण तिचे ते अचानक समोर दिसणे आणि माझ्याकडे बघणे माझ्या काळजाचा थरकाप उडवून गेले होते..
"काही नाही रवी, हा फक्त मनाचा खेळ आहे," मी स्वतःशीच पुटपुटलो, पण आतून कोणीतरी काळजात ओरडून सांगत होते..
'मागे फिर! पळून जा इथून!'
माझे मन द्विधा मनस्थिती मध्ये होते..
पण त्याच वेळी GPS चा आलेला तो कृत्रिम आवाज त्या भयाण शांततेत एखाद्या राक्षसाच्या आज्ञेसारखा वाटू लागला... 
"Turn Right," त्याने आज्ञा दिली आणि मी एका अशा वळणावर आलो जिथे जणू जगाचा आणि माझा संपर्क तुटला..
आता फक्त माझ्या बाईकचा थरथरणारा प्रकाश आणि समोर पसरलेला अथांग अंधार होता... रस्त्याच्या कडेची झाडे वाऱ्यामुळे डोलत नव्हती, तर जणू लांब हात पसरून मला पकडण्यासाठी टपली होती...
थोड्याच अंतरावर मला तो बंगला दिसला...
तो बंगला... की मृत्यूचे घर? एखाद्या जुन्या, पडक्या महालासारखा तो उभा होता. भिंतींवर काळपट शेवाळ साचले होते..
खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या आणि तिथून डोकावणारा पिवळाधमक उजेड मला गिळायला तयार होता...
बंगल्यासमोर असलेल्या पोर्च मध्ये मी बाईक उभी केली... 
तिथे सामसूम होती, फक्त लांब कुठेतरी अनेक कुत्रे एकाच वेळी रडत असल्याचा आवाज येत होता...
मी पायऱ्या चढलो... 
प्रत्येक पावलाचा आवाज त्या शांततेत भयानक वाटत होता..
मी घंटी वाजवली. काहीच प्रतिसाद नाही. मी पुन्हा वाजवली... तरीही शांतता... 
मला उशीर होत होता.. वैतागून मी दरवाजाला हलकासा धक्का दिला आणि ते अवाढव्य दार स्वतःहून उघडले...
झालेल्या घाई मुळे मी वेगाने आत शिरलो..
मनाने नाही पण शरीराने काही तरी वेगळे असल्याची नोंद घेतली..
बाहेर असलेले दमट वातावरण आत नव्हते.. आतले तापमान गोठवून टाकणारे होते... 
हवेत एक विशिष्ट कुबट वास होता..
जुन्या लाकडाचा,.. ओल्या भिंतींचा आणि कशाच्या तरी कुजण्याचा.... 
"हॅलो... डिलिव्हरी... कोणी आहे का?" माझा आवाज थिजला होता...
कोणाचीच चाहूल लागत नव्हती..
मी हॉल चे निरीक्षण करु लागलो..
हॉलमध्ये जुन्या वस्तूंचा पसारा होता... भिंतींवरच्या चित्रांमधील लोकांच्या डोळ्यांत एक विचित्र रिकामेपणा होता, जणू ते मला बघून बजावत होते...
'तू चुकीच्या जागी आलास!' 
भीतीवर ताबा मिळवत मी हॉल भर फिरत होतो..
कोपऱ्यात एक बाहुली चे मुंडके पडलेले होते.. 
त्याचे डोळे बाहेर लोंबकळत होते....
ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला...
मी मोबाईल काढला, पण तिथे रेंज नव्हती...
खरेतर मी भीतीने अर्धा मेलेला होतो, मला तिथून दूर पळून जायचे होते..
पण कोणाचे तरी अदृश्य आकर्षण मला बंगल्याच्या शेवटच्या खोलीकडे खेचत होते...  
तिथून एक मंद पिवळा प्रकाश झिरपत होता. मी थरथरत्या अंगाने प्रकाशाच्या दिशेने निघालो... प्रत्येक पाऊल टाकताना मला वाटत होते की कोणीतरी माझ्या मागे आहे...
मी त्या खोलीच्या दारावर बोटानी ..
टक... टक... केले..
आणि त्याच क्षणी, माझ्या मागचे मुख्य दार प्रचंड वेगाने 'धडाम' आवाज करून बंद झाले... 
बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे समजताच मी वेगाने मागे पळालो, आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते जणू भिंतीचाच भाग झाले होते... 
मी अडकलो होतो! 
तेव्हाच शेवटच्या खोलीतून एक विचित्र हसण्याचा आवाज आला...
माझ्याकडे बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता..
मी हळुवार पाऊले टाकत त्या खोलीकडे गेलो... 
तिचा दरवाजा आता पूर्ण उघडा होता..
आतून रक्ताचा इतका तीव्र उग्र वास आला की मला मळमळायला लागले... 
मी थरथरणाऱ्या शरीरावर नियंत्रण मिळवत..
आत डोकावले आणि जे पाहिले, ते पाहून माझ्या आयुष्याची दोरी कापली गेली की काय असा संभ्रम माझ्या मनात उत्पन्न झाला..
टेबलावर कोणत्यातरी व्यक्तीचे कापलेले डोके रक्ताच्या थारोळ्यात लोळत पडले होते… त्या मुंडक्याचे डोळे हॉल मध्ये बघितलेल्या बाहुलीसारखेच बाहेर लोंबकळत होते...
आणि त्याच्या शेजारी तो उभा होता...
तो...
डोक्याच्या वरचा भाग जवळजवळ टक्कल पडलेला, उरलेले केस लांबट, पातळ आणि करड्या-पांढऱ्या रंगाचे..
ओले, विस्कटलेले, जणू थडग्यातून उकरून काढल्यासारखे...
चेहरा मानवी असला तरी माणुसकीचा लवलेश नव्हता....
त्वचा फिकट, कुजल्यासारखी, गालांवर व कपाळावर जखमांच्या खोल खुणा, आणि तोंडाच्या भोवती सुकलेले व ताजे रक्त लागलेले....
त्याचे ओठ अर्धवट उघडे होते…
आत किडलेले, तुटलेले, काळपट दात उघडे दिसत होते..
आणि त्या दातांमधून एक विकृत, उपहासपूर्ण हास्य झिरपत होते...
डोळे लहान, आत खोल गेलेले… निर्जीव, पण भुकेल्या चमकेने भरलेले...
जणू समोर उभ्या असलेल्या माणसाला नव्हे, तर त्याच्या आत्म्याला न्याहाळत असणारे....
त्याचे शरीर कृश उंच आणि अस्वाभाविकरीत्या वाकलेले होते..
हात मानवी मर्यादेपलीकडे लांब… आणि त्या हातांच्या टोकाला रक्ताने माखलेली, वाकडी नखे, जणू सुऱ्यांसारखी.
त्यातील एक हात पुढे सरसावलेला.. माझ्याच दिशेने...
जणू मला पकडायला, ओढून घ्यायला...
त्याच हातात त्याने रक्ताने माखलेला सुरा पकडला होता...
टेबलावरच्या त्या मृत डोक्याजवळ उभा राहून, तो तो सुरा अगदी निवांतपणे, आनंदाने फिरवत होता...
“उशीर झाला रे रवी…”
त्याचा आवाज घोगरा, खडबडीत, गळ्याच्या आतून घासून काढल्यासारखा होता...
“पार्सल गरम नसेल राहिले आता.……”
हे बोलताना त्याचे ते किडलेले दात पुन्हा उघडे पडले…
आणि ती गचाळ भयानक आकृती ते किडके दात दाखवून किळसवाणे हसू लागली..
ते बघून माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता...
"तू... तू कोण आहेस? मला जाऊ दे... माझ्या घरी कार्यक्रम आहे.. सर्वजण वाट बघत असतील.. माझे कुटुंब.. माझी आई....." मी रडत विनवणी केली...
तो हळूवार पाऊले टाकत.. हातातील रक्ताने माखलेला सुरा हलवत माझ्या जवळ आला, त्याच्या अंगातून प्रेताचा वास येत होता... 
"मी या जगातील अमानवी भूक आहे रवी.. माझ्या बोलावण्यावर जे येतात, ते परत जात नाहीत. ते इथेच माझ्या जवळ राहतात... अगदी कायमचे.." 
त्याने त्या खोलीतील कोपऱ्यात ठेवलेल्या मानवी मस्तकांच्या राशीकडे बोट दाखवले...
त्यात तळाला कित्येक मानवी कवट्या चे थर होते..
सर्वात वरील बाजूला.. 
अर्धवट कुजलेली चार मानवी मुंडकी ठेवलेली होती...
ते बघूनच माझ्या पायातील त्राण नाहीसे झाले.. मी जागेवरच खाली कोसळलो...
खाली जरी कोसळलो असलो तरी माझी शुद्ध पूर्ण हरपली नव्हती..
काय घडत आहे ते मला समजत होते..
त्याने खाली वाकून माझे केस पकडून मला जवळ ओढले.... त्याचे हात बर्फासारखे थंड होते... 
"घाबरू नकोस... फार दुखणार नाही..  एकदा सुरा फिरवला की  सगळे शांत होते.., आणि मग तू कायमस्वरूपी माझा..." तो कुजबुजला...  त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांबरोबर एक अतिशय घाणेरडा वास माझ्या नाकामध्ये शिरला..
सडलेल्या मांसाचा वास..
एक भयानक किंचाळी माझ्या तोंडातून बाहेर पडली...
मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होतो...
माझा तो केविलवाना प्रयत्न बघून तो हातातातील सुरा हलवत एखाद्या छोट्या मुलासारखा नाचत होता... नाचताना अतिशय किळसवाणे हसत होता...
मी शरीरातील संपूर्ण ताकद लावून त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होतो... पण त्याच्या त्या बारीक दिसणाऱ्या शरीरात प्रचंड अमानवीय ताकद होती... मी तसुभरही हलू शकत नव्हतो..
त्याने माझे केस पकडलेला हात मागच्या बाजूला खेचला.... आणि पुढच्या क्षणी तो धारदार सुरा माझ्या गळ्यावर चालवला...
मला त्या क्षणी वेदना जाणवली नाही, फक्त एक गरम प्रवाह छाती वरून ओघळताना जाणवला... माझे डोके धडापासून वेगळे होताना मला दिसत होते... पुढच्याच क्षणी माझे थरथरणारे धड खाली कोसळले, पण माझी दृष्टी शाबूत होती... मी ते बघत होतो..
माझ्या डोळ्यांनी..
भयंकर गोष्ट ही होती की मी मेलो नव्हतो... माझे कापलेले डोके आता त्या टेबलावर होते आणि मी माझ्याच रक्ताळलेल्या शरीराला जमिनीवर पडलेले पाहू शकत होतो...
तो नराधम आता माझ्या कापलेल्या डोक्याचे केस पकडून टेबलासमोर असलेल्या आरशामध्ये बघुन विकृत हसत होता... 
ते हसणे.. ते रूप.. माझ्या बघण्याच्या सहनशक्ती पलीकडचे होते.. मी डोळे मिटून घेतले..
डोळे जरी मिटले होते.. तरी कान बंद करायला माझ्या त्या मस्तकाला हात कुठे होते.. हात तर दरवाजाजवळ पडलेल्या धडाला होते..
त्यामुळे त्याचे ते घाणरेडे बोलणे माझ्या कानात घोळतच होते...
"रवी.. रवी..  बघ कसा शांत दिसतोय.. आता उठ ना...
पुढच्या वेळी लवकर पार्सल घेऊन ये.. हा एक लक्षात ठेव.. पार्सल माझ्या जवळ पोहोचे पर्यंत गरम असायला हवे... समजले का रवी तुला.." 
“रवी… रवी… उठ ना…”
मी दचकून डोळे उघडले.
संपूर्ण शरीराला एक झटका बसला होता. समोर सकाळचा उजेड पसरलेला होता...मी आजूबाजूला पाहिले...
मी बेडवर होतो...
माझ्या शेजारी सायली उभी होती.
“काय झालं? जोरात ओरडला होतास,”
ती काळजीने म्हणाली....
मी काही क्षण तसाच शांत बसून राहिलो...छातीची धडधड हळूहळू कमी होत होती.
“काही नाही… जास्त थकलो होतो बहुतेक,” मी तिला उत्तर दिले..
ती समाधानाने मान हलवून स्वयंपाकघरात गेली...
घरात नेहमीसारखे सकाळचे आवाज सुरू होते...
कुकरची शिट्टी, भांड्यांचा आवाज, बाहेरच्या रस्त्यावरची वर्दळ…
मी आंघोळ केली... कपडे घातले....
आरशात स्वतःकडे पाहिले.... सर्व अगदी नॉर्मल होते... 
"रवी, डोके ठिकाणावर नाही की काय? कसली पण स्वप्ने बघतोस.." 
आरशात बघत मी स्वतःलाच चिडविले...
नाश्ता करताना सायली बोलली.. “लवकर आवरा आणि निघा…
आज वेळेवर या…आणि हा आज आईसाठी नथ आणायची आहे…
पैसे कपाटात ठेवलेत…”
मी मान हलवली... कामावर निघालो.... दिवस अगदी रोजच्यासारखाच गेला....
ऑर्डर्स, ट्रॅफिक, घाम, हॉर्न…
दुपारी चहा घेताना डोके थोडे जड वाटत होते... पण मी त्याकडे दुर्लक्ष केले...
“रात्री नीट झोप झाली नाही, एवढंच,”
मी स्वतःशीच म्हणालो...
सायंकाळ कधी झाली कळलेच नाही. शेवटची ऑर्डर डिलिव्हर करून मी बाईकवर बसलो.
घराकडे निघणार तेवढ्यात खिशातला फोन वायब्रेट झाला...
वैतागून मी मोबाईल काढला.
स्क्रीनवर लाल अक्षरात नोटिफिकेशन झळकत होते...
“URGENT NIGHT DELIVERY FROM HOTEL BLACK LEDGER – EXTRA PAY (1000 rupee Incentive)”
माझ्या अंगातून थंड शिरशिरी गेली.
मी पुन्हा मोबाईलकडे पाहिले...
मोबाईलवर वेळ बघून माझ्या पायाखालची जमीन हादरल्याचा भास झाला.. 
७:४५.
कारण आता ते स्वप्न नव्हते....

©® लेखक: रूद्रदमन

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2489. सावली

  परिस्थितीने गांजलेल्या लोकांमध्ये तसा भावनिक एकोपा खूप असतो पण या जीवनातील प्रलोभने, चमकधमक, आजूबाजूचे दिखाऊ वातावरण या एकोप्याला खिंडार पाडण्याचे काम करू शकते ज्यातून वेगाने वाहणारा वारा आपल्यासोबत सर्व भावनिक बंध, आपल्यावर केलेले उपकार, आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता, उपसलेले कष्ट, केलेला त्याग या सर्वांना सोबत वाहवून नेतो आणि मागे रहातो तो फक्त पालापाचोळा, ज्यालाच आपण जीवनातील आनंद समजलेलो असतो. पण नियती आपल्या कर्माचे फळ आपल्या पारड्यात टाकतेच, ज्याच्यापुढे आपले निर्णय, प्रतारणा, मनस्ताप याचे मोजमाप होते पण त्यात वेळ निघून गेलेली असते. एखाद्या चित्रपटाची असावी अशी कथा आज सामायिक करीत आहे. 
 
                                   --🌼--
 
     किसन राठोड यांचे घर आंब्याच्या तोरणांनी सजले होते. सनई चौघाड्यांच्या मंद मंद मंजुळ स्वरात हळद लागून नवरदेवाची वरात नवरीच्या दारी पोहोचली होती. 'कुर्यात सदा मंगलम्!' म्हणत अक्षदांच्या वर्षावात मांडव भिजून निघाला होता. दोन जीव हे एकमेकांच्या गळ्यात हार घालून नव्याने संसार करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली पाहुणे मंडळी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त होत होती.
      किसन हा वीट कामगार होता तरी त्याने आपल्या परीने चांगली बडदास्त ठेवली होती. आपल्या हातून कोणतीही कमतरता राहू नये याची त्याने काळीज घेतली होती. अर्थात गणपत पवार त्याचा सोयरा देखील खूप काही भरला पुरला नव्हता. पण मोलमजुरी करणारं त्याचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. त्याचा एकुलता एक मुलगा प्रकाश शहरातील एका खाजगी कंपनीत नोकरीवर होता.
      गरीब असले तरी दोन्ही कुटुंब आब राखून होते.आपण बरे आणि आपले काम बरे या पठडीतील दोन्ही कुटुंब सोयरिक साठी उत्तम होते. त्यामुळे सारे काही निर्विघ्नपणे पार पडले. आणि यथावकाश प्रकाश आणि लक्ष्मीचा शहरातील संसार सुरू झाला.
     प्रकाशने दिवसभर काम करावे. संध्याकाळी घरी यावे. लक्ष्मीनेही घरचं सारं आवरून दोन घरी काम करायला जावं. सारं सुरळीत सुरू होतं पण त्यात सहजता नव्हती. उत्साह नव्हता. एक उदासीनता जाणवत होती. लग्नाला दोन महिने होत आले होते. पण लक्ष्मी काही खुलत नव्हती. प्रकाशच्या लक्षात येत होते की लक्ष्मी काही या लग्नाने सुखी समाधानी दिसत नाही. नेहमी कसल्यातरी विचारात हरवलेली असते.
     त्याने त्याबद्दल तिला विचारायचे ठरवले. आणि एका सकाळी ती चहा करत असतांना तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "लक्ष्मी! कुठे हरवलीस?"
     "काही नाही! कुठे काय?"
     "मग आपल्या लग्नाला दोन महिने झाले, पण तू खुश दिसत नाही. कसला विचार करते? तुला हे लग्न मान्य नव्हते का? तुला मी आवडत नाही का?" चहा ढवळत, आपल्याच विचारात हरवलेल्या लक्ष्मीकडे पाहत प्रकाश म्हणाला.
     "नाही हो ! तसं काही नाही. तुम्ही खूप चांगले आहात."
      "पण मी नेहमी बघतो तू नेहमी काहीतरी विचारात असतेस, उदास दिसते. तुझ्या मनात काय आहे? ते सांग गं! मी माझ्या परीने समजून घेईन." प्रकाश काकुळतीला येवून म्हणाला.
   प्रकाश... अतिशय गरीब कुटुंबातील साधासुधा मुलगा...!परिस्थितीमुळे जेमतेम बारावी होवून एका बऱ्या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्याचे आईवडील गावाकडे शेतमजुरी करायचे. त्यामुळे सासू सासाऱ्यांचा जाच असं काही नव्हतं.
    कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा प्रकाश आपले काम इमान इतबारे करत असल्याने नोकरीत बऱ्यापैकी टिकून होता. गरजा मर्यादित ठेवल्याने आपल्या पंधरा हजार पगारात तो खाऊन पिऊन सुखी होता.
     जेव्हा लग्न करण्यास निघाला तेव्हा त्याला असंख्य अडचणी आल्या. कारण आई वडीलांजवळ जमिनीचा अगदी छोटासा तुकडा होता, त्यामुळे दोघांच्या मजुरीवर घर चालायचे. त्याचा पगारही बेताचा होता. समाजात मात्र मुलींची संख्या कमी झाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्याने कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. आणि शेवटी वीट भट्टीवर काम करणाऱ्या किसनची ही काळी सावळी पण नाकीडोळी नीट असलेली लक्ष्मी त्याच्या आयुष्यात सहचारिणी म्हणून आली. 
     किसन तरी काय करणार होता. आधीच हातमजुरीवरचे पोट, त्यात पाच पोरी! सगळ्यांचे लग्न करता करता त्याचे कंबरडे मोडले होते. लक्ष्मी तशी हुशार, पण घरातले एक खाते तोंड कमी होईल या हेतूने आपली ऐपत पाहून, तरी बरे असे खाते पिते घर पाहून लक्ष्मीला त्याने उजवुन टाकले.
     गणपत पाटीलही साजेशी सून मिळाल्याने खुश होते. आता मुलाचे जीवन मार्गाला लागले म्हणून तेही निश्चिन्त झाले होते. शहरात येऊन त्यांच्या संसाराची घडी बसवून ते पुन्हा गावाकडे निघून आले. त्यांचं सारं आयुष्य शेती मातीत गेल्याने त्यांनी तिथेच राहण्याचे ठरवले होते.
      लक्ष्मी चांगली होती. गरिबीत वाढल्याने कामही नीटनेटके करायची. संसाराला हातभार म्हणून दोन घरी काम पण करायची. पण नेहमीचं उदास दिसायची. त्यामुळे न राहवून प्रकाशने विचारले. 
      विश्वासाने ठेवलेल्या त्या प्रेमळ आश्वासक स्पर्शाने आश्वस्थ होऊन लक्ष्मी बोलली, "मला ना अजून शिकायचे होते. मी पोलीस भरतीचा फॉर्मही भरला होता. पण बाबांनी घरातील एक जबाबदारी कमी होईल म्हणून माझे लग्न करून दिले."
     "अरेच्चा!एव्हढचं होय...? मला वाटलं, मी तुला आवडत नाही का?" प्रकाश हसत म्हणाला. "परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही. तुझी इच्छा आहे तर नक्की शिक. मी तुला सर्वतोपरी मदत करीन." प्रकाश आश्वासक शब्दात म्हणाला.
     तो बोलला खरा पण त्याने तिच्या अभ्यास, प्रशिक्षण, त्यासाठी बाहेर राहणे यासाठी खर्च तर लागणार होता. त्याच्या तुटपुंज्या पगारात फक्त रोजचा खर्च भागत होता. पैशाची तजवीज कशी करावी ते त्याला समजत नव्हते. शेवटी त्याने जमिनीचा जो एक लहानसा तुकडा होता तो विकून टाकला. त्याचे आईवडील त्यामुळे नाराज झाले.
पण त्याने समजावले, "बाबा! आज जरी आपल्याला जमिनीचं तुकडं विकावं लागलं तरी लक्ष्मी चांगल्या पगारावर लागली की आपण घेऊ की पुन्हा!" नाईलाजाने ते तयार झाले.
      लक्ष्मीनेही मिळालेल्या संधीच सोनं केलं आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र झाली. आता ती कामावर रुजू झाली होती. त्यांचा संसार आता दोन घरात विभागला होता. दोघेही आपापल्या कामाच्या ठिकाणी रहात असत. त्यामुळे आता विक एन्डला सुटी असेल तसे भेटत त्यांचा संसार सुरू होता. पैसे बरे मिळू लागल्याने तसे बरे चालले होते.
    पण आता झाले काय? कामाच्या व्यापात वारंवार घरी येणे लक्ष्मीला शक्य होत नव्हते. त्यामुळे तिचे घरी जाणे आपसूकच कमी होत गेले.
      आता स्वतः चांगल्या पदावर असल्याने एक स्वयंपूर्ण स्वावलंबी स्त्री झाल्याचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा स्मार्टनेस आला होता. त्यामुळे कदाचित तिला आता तिच्या नवऱ्याची थोडीफार लाज वाटू लागली होती.
      विकास...! पोलीस स्टेशनमधील एक रुबाबदार पोलीस सबइन्स्पेक्टर...! हसरे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व...! ती त्याच्या हाताखाली काम करत होती. दोघेही नेहमी कामानिमित्त मोहिमेवर जातांना सोबत असत. त्यामुळे दोघांच्या मनात नकळत भावबंध तयार झाले. ती तरुण आणि रुबाबदार पोलीस सबइन्स्पेक्टर विकासकडे आकृष्ठ झाली होती, तर तोही लक्ष्मीच्या मृगनयनी डोळ्यांवर, सुबक कमनीय बांध्यावर फिदा झाला होता. एकमेकांना हवाहवासा सहवास सहज मिळत होता. सहवासाने त्यांचं प्रेम फुलत होतं. त्याच्यासाठी ती डब्यात गोड धोड करून आणीत होतं. तो तिच्यासाठी काहीबाही आणून देत होता. भेट झाली नाही तर दोन्हीही कासावीस होत होते.
     आणि मग एकदा हिम्मत करून त्याने तिला मागणी घातली, "तू माझी होशील का? माझ्याशी लग्न करशील का?" 
     "नाही हो! माझं लग्न झालंय."
     "हो, मला माहित आहे. पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत!"
     "मलाही तुम्ही आवडता. पण काय करू मी? माझा नवरा खूप चांगला आहे. आज तो होता म्हणून मी अशी समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा कसा घेऊ?नाही... नाही! ते पाप आहे. तुम्ही मला विसरून जा."
     "नाही शक्य होणार मला ते!त्यापेक्षा मी लग्न करणार नाही."
     "असं नसतं. तुम्हाला चांगली मुलगी मिळेल. ती तुम्हाला माझा विसर पाडण्यास भाग पाडेल. प्रेम हेंच सारं काही नसतं, तुम्ही मला विसरून जा."
       "त्यापेक्षा मी वरिष्ठांना सांगून माझी पोस्टिंग बदलवून घेतो. मात्र मी तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करू शकत नाही लक्ष्मी!"
    लक्ष्मीला काही कळेना काय करावे? तीही त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. प्रेमाची आग दोन्ही बाजूंनी लागून त्याची धग लक्ष्मीच्या संसाराला लागली होती.
      लक्ष्मी जरी सुसंस्कारी असली तरी प्रेम आंधळं असत. ती पतीधर्म विसरून वाहवत जाऊ पाहत होती. प्रकाश की विकास या द्वंद्वात ती भरकटत होती. एकीकडे विकासचं प्रेम... दुसरीकडे आपला सालस नवरा... तिला काय करावे सुचत नव्हते. रात्र रात्र झोप लागत नव्हती.
     तिची द्विधा मनस्थिती प्रकाशने अचूक हेरली. अशीच एकदा ती घरी आली असता तिची अस्वस्थता पाहून त्याने विषय काढला, "लक्ष्मी!काय झालंय? तुला कोणी त्रास देतंय का? हल्ली तू कसल्यातरी तणावात दिसते?" 
      प्रकाशाचे बोलणे ऐकून लक्ष्मीला हुंदका दाटून आला आणि तिने सारे खरेखरे त्याला सांगितले. "मला समजते आहे हे चुकीचे आहे, पण काय करू मी?" तिने कासावीस होऊन त्यालाच विचारले.
      तिच्यावर खरेखुरे प्रेम करणाऱ्या प्रकाशला हा घाव वर्मी लागला होता. पण त्याने स्वतःला सावरले. "संसार असा बळजबरीने होत नसतो. तू जाऊ शकते" हृदयावर दगड ठेवून प्रकाश म्हणाला आणि त्याने तिला कायदेशीर घटस्फोट देऊन आपल्या बंधनातून मुक्त केले.
    आता निश्चिन्त होऊन तिने सब इन्स्पेक्टर विकाससोबत नव्याने संसार मांडला. तशी ती आताशा सुखी होती. पण आपल्या प्रथम पतीशी प्रतारणा केली होती याची एक बोच कायम तिच्या अंतरात होतीचं.
     आणि नियतीच्या मनात वेगळेच होते. चंद्रपूरमध्ये त्या दोघांची पोस्टिंग लागली होती. नक्षलवादी लोकांच्या कारवाया तिथे चालू असत.
     एकदा तेथील जंगलात नक्षलवादी लपले आहेत असा सुगावा लागल्याने त्यांचा बिमोड करण्याची जबाबदारी सबइन्स्पेक्टर विकासवर आली. नक्षलवाद्यांसोबत त्यांची घमासांग लढाई सुरू होती. नक्षलवाद्यांकडे देखील भरमसाठ शस्रसाठा असल्याने दोन्हीकडून गोळीबार होत होता. डोळ्यात तेल घालून पोलीस पुढे सरकत होते. नक्षलवाद्याना जंगलाचा कोपरा न कोपरा माहीत असल्याने म्हटले तितके यश येत नव्हते. पण धाडसाने पाऊल टाकत त्यांनी चार नक्षलींना ठार केले. त्यातल्या दोघांनी समर्पण केले. पण ती कारवाई करतांना सबइन्स्पेक्टर विकास यास मात्र  हौतात्म्य प्राप्त झाले आणि लक्ष्मीचे कुंकू पुसून गेले. त्यामुळे तिचे सुखाचे दिवस सरले आणि तिला एक प्रकारचे वैराग्य आले.
    आपण मोहात पडून एका सुशील समंजस व्यक्तीच्या सात्विक प्रेमाला दूर केले ह्याची खंत तिला नेहमीच वाटत होती. पण आता पुलावरून बरेच पाणी गेल्याने ती परतीचा विचार करू शकत नव्हती. तिने स्वतःला कामात झोकून दिले.
      तिला विरक्ती येऊन त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर तिने समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आणि आपल्या शूर धाडशी पतीच्या स्मरणार्थ 'सावली'च्या माध्यमातून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम सुरू केला.
     इकडे प्रकाशचे जीवन असे तसे चालले होते. आईवडील वारले होते. 'एकला चलो रे!' ची वाट धरून प्रकाश जीवन कंठत होता. आला दिवस ढकलत होता. आताशा त्याची कंपनी पण सुटली होती.
    वार्धक्याने त्राण नसलेला प्रकाश रस्त्याने जात असताना अपघात होऊन त्याचा पाय कापला गेला होता. त्यामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले आणि तो परावलंबी झाला. त्यामुळे नाईलाजाने तो सावलीच्या आश्रयास आला. तिथे त्याला पाहताच लक्ष्मीच्या तोंडातून आपोआप शब्द उमटले, "तुम्ही?"
     प्रकाशला समोर पाहून लक्ष्मी उठून उभी राहिली. तिने त्याचे चरणस्पर्श करून मोठ्या आदराने त्याला खुर्चीत बसवले. त्याची ती दयनीय अवस्था पाहून तिला गलबलून आले. "काय झाले? कसे झाले?" तिने आस्थेवाईकपणे त्याची चौकशी केली. जातीने स्वतः लक्ष घालून त्याची खाण्यापिण्याची राहण्याची उत्तम व्यवस्था केली. त्याला काय हवं नको ते स्वतः पाहू लागली.
      त्याच्या ऋणातून ती पूर्णपणे उतराई होऊ शकणार नव्हती पण आपल्या परीने जे करता येईल ते सर्व करत होती. आपल्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची आहुती देणारा पुण्यात्मा आज तिच्याकडे आला होता. त्याची  सेवा करण्याची संधी ईश्वराने तिला मिळवून दिली होती. ती तिने सार्थकी लावली.
    आता सावलीला तिची सावली मिळून ती कृतार्थ झाली होती.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...