आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला. माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात. ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात. त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात. जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल.
काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय, टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची, अन संडास वेगळे असायचे. आता दोघांना एकत्रित करून ते वॉशरूम झाले, केवढा हा बदल. हल्ली 'संडास' शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो; त्या ऐवजी टॉयलेट, वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात, म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.
शहरीकरण झाल्या नंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात, पण एकंदरीत वाट पण लावून जातात, असच म्हणावं लागेल. कारण माणुसकीचा ओलावा कमी झाला, निसर्गाची वाट लागली. सुख सोयी जेवढ्या जास्त; तेवढे श्रम कमी, तेवढी स्वास्थ्य हानी जास्त.
नाश्ता, आजचा प्रचलित शब्द, भारतात कानाकोपऱ्यात वापरात येणारा शब्द. हा पठ्ठ्या आहे पारसी, पण कधी भारतात येऊन मिसळला ते कळलंच नाही. लहानपणी न्याहरी हा शब्द माहीत होता. त्या न्याहरीचा 'नाश्ता' किंवा गोऱ्यांचा 'ब्रेकफास्ट' हा बदल कधी झाला ते कळलच नाही. आज खेडेगावात पण न्याहरी ऐवजी नाश्ताच संबोधले जाते. आता नाश्त्या भोवती घुटमळत असल्याने त्यावर थोडं खोलात जायलाच हवं.
न्याहरी म्हणुन मी शिळी ज्वारीची भाकरी, ठेचा, चटणी पुड, मेतकूट ह्याचे दह्यातील मिश्रण, त्यावर थोड तेल, कांदा ह्यालाच प्राधान्य देईन. सकाळचा नाश्ता म्हणुन चपाती भाजीचा स्वाद लहानपणा पासून ते २०१४ पर्यंत घेतला. मग का कोणास ठाऊक त्याला बगल दिली गेली. आता कधी कधी असं वाटतं की त्याला बगल का दिली? म्हणुन, हा बदल काही योग्य नव्हे असं आता मला वाटू लागलंय. पण त्याला काही कारणं होती. काही बदल गरजेनुसार, सोयीनुसार करायचे असतात, त्यातलाच हा बदल.
आता रोजचा नाश्ता म्हणजे मऊ पोहे, तर कधी लावलेले पोहे. कधी उप्पीट उपमा तर कधी इडली. कधी पोळ्यांचा कुस्करा, तर कधी फोडणीचा भात; दोन्ही आदल्या दिवशीच उरलं असल्यास. काहीच नाही सुचलं तर दलिया. पण ह्या बदलाचा कधी कधी कंटाळा येतो. वर गृहिणींना प्रश्न पडतो की, आज नाश्त्याला काय करायचे? घरोघरी हाच प्रश्न गृहिणींना भेडसावत असणार.
एकंदरीत जीवन शैली बदलली, त्याचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. बरेचदा काही बदल पचनी नाही पडत, त्यास अंगीकृत करायला वेळ लागतो. आपल्या जीवनात, जीवनशैलीत, राहणीमानात, आपल्या पेहरावात, खाण्या पिण्यात बदल हे वयानुसार, सोयीनुसार, ऐपतीनुसार करीत रहावे ह्या मताचा मी, नाही तर जीवन बोरिंग कंटाळवाणं वाटतं, होतं.
आता घरापुरतं बोलायचे झाल्यास घरातील वस्तूंच्या जागांची अदलाबदल मी अधुन मधून करीत असतो. तसेच काही जुन्या वस्तु वापरून बघुन कंटाळा आला असतांना त्यांना बाजूला सारून त्याऐवजी नावीन्यपूर्ण असं आणुन त्यांची मांडणी करणं असली प्रक्रिया चालूच असते. मधेच घरातील इंटिरियर मधे अधुन मधून बदल करणे. इंटिरियर हा हल्ली प्रचलित झालेला ओव्हर स्मार्ट शब्द.
आता स्वतःच्याच बाबतीत बोलायचं झाल्यास स्वभावात बदल शक्य नाही, त्याला वारंवार बदलू शकत नाही. जो है वो है, हम ऐसे है. म्हणजेच आंतरिक बदल शक्य नव्हे, पण बाह्य रुपी बदल अर्थात फॅशन रुपी बदल शक्य व आवश्यक आहे. जे मी जमेल तसे करत असतो. तेच तेच बघुन, घालून कंटाळा आला असतांना काही तरी वेगळं स्वतःला साजेसे आवडीचे कपडे परिधान करावे.
बिझनेस वर्ल्ड मधे वावरतांना डार्क सेल्फ लायनींग पॅन्ट, त्यावर पांढरा, स्काय ब्लू, तत्सम प्लेन अथवा सेल्फ लायनींगचा शर्ट, असल्या ड्रेसला माझी नाईलाजाने पसंती असायची. कधी कधी कंटाळा पण यायचा, पण पर्याय नव्हता. नंतर नंतर तेथे वावरतांना स्मॉल चेक्स चे शर्ट घालायला सुरुवात केली.
बाहेर मात्र मोठ्या चेक्सचे शर्ट, टी-शर्ट परिधान करायचो, आताही करतो. ७० च्या दशकात बेलबॉटम पँट ने धुमाकूळ घातला होता, त्याचा वापर मी १९७५ ते १९८० च्या दरम्यान केला (वय वर्ष १७ ते २२), त्याची बॉटम असायची ४२ ते ४६ इंच. लांबीला एवढी असायची की चालतांना जमीन स्वच्छ करीत जायची.
राजेश खन्नाचा गुरु कुर्ता फेमस झाला, तर आता मोदींचा मोदी कुर्ता, असे अनेक फॅशन मधील बदल बघायला मिळाले. फॅशन मधील बदल एका लहानशा वर्तुळात होत असतो. फॅशनची जिथून सुरुवात होते शेवटी तिथेच येऊन संपते. फार पूर्वी धोतीचा वापर होत असे, तीच धोती आता लग्न समारंभात सर्रासपणे लोकांनी परिधान केलेली बघायला मिळते. तसेच नऊ वारी साडी पण. शक्यतोवर आपल्या tradition ला बगल देऊ नये.
हल्ली हल्ली for a change व आवड म्हणुन मी जीन्स वर प्रिंटेड शर्ट घालायला सुरुवात केली, लोक काय म्हणतील त्याची तमा न बाळगता. पण seniors साठी जणु काही ती फॅशनच आहे, असं माझ्या निदर्शनात आलं. ते एअरपोर्ट व इतर ठिकाणी माझ्या सारखी बरीच लोक प्रिंटेड शर्ट घालून वावरतांना दिसली, तेव्हा हा पण एक आनंद देणारा बदलच. जीन्स पँट वर कुठलाही शर्ट, टी-शर्ट, कोट, जर्किन, जॅकेट शोभून दिसत, त्यामुळे कोव्हीड नंतर मी फक्त अन फक्त जीन्स पँटचा वापर करून राहिलो आहे, पुढेही करत राहणार. दुसरा जीन्सचा फायदा म्हणजे किमान एक महिना रोज वापरू शकतो, इस्त्रीची गरज पडत नाही.
वयोमानानुसार स्वतःत, स्वतःच्या जीवन शैलीत बदल अत्यावश्यक आहे. आपण कितीही पांढरे केस घातक रसायनांचा वापर करून काळे करून तरुण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, तरी आपला चेहरा वाढीव वयाचा दाखला जगाला देतोच. मी पण आजतोवर तसच काहीसं करीत आलो होतो. पण एके दिवशी तडकाफडकी निर्णय घेतला व नैसर्गिकरित्या झालेले पांढरे केस अनैसर्गिक रित्या काळे करून वावरायला कायमचा राम राम ठोकला.
तीन चार महिन्यांपूर्वी सलून मधे हेअर कट करण्यासाठी गेलो असतांना दोन तीनदा स्वतःलाच आरशात न्याहाळून बघितल्यावर विचार केला की आता हेअर डाय नाही करायचं. नैसर्गिक पांढरे केस ठेवायचे एक बदल म्हणुन, अन दोन तीन महिने त्याची ट्रायल घेतली. ह्या लूक मधे बरा दिसतो हे थोडे दिवस वाटलं, पण नंतर परत पूर्वपदावर आलो, अन आता हळू हळू परत नैसर्गिक लूक द्यायचा विचार करतोय.
खाद्य पेय पदार्थांच्या बाबतीत पण तसच आहे. तेच तेच खाऊन पिऊन कंटाळा आला असतांना, अधुन मधुन एखाद्या हट के चटपटीत खाद्य पेय पदार्थाचा आस्वाद घ्यावा. ते हल्लीच्या कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स इत्यादी डाएट निगडित शब्दांना विसरून त्याची चिंता न करता. अधुन मधुन मित्रांसोबत पार्ट्या कराव्या. हाय काय नाय काय, खाओ पियो और अपने हिसाब से ऐश करो.
संगीतात पण कधी रोमँटिक गाणी ऐकतो. कधी विरहाची गाणी, कधी शास्त्रीय संगीत. तर कधी जझ, कधी कव्वाली, तर कधी गझल. कधी लोकसंगीत तर कधी कोळीगीत. कधी फुजन, तर कधी सुफी. कधी कानडी, तर कधी मराठी. कधी कोंकणी, तर कधी भोजपुरी. कधी हिंदी, तर कधी हिंग्लिश. कधी मलयाळम, तर कधी तेलगू व इतर भाषांमधील गाणी ऐकत असतो, एक बदल म्हणुन. तसे पण सुदैवाने संगीतात भाषेचा भेदभाव नसतो, त्याला कुठली जात पात भाषा नसते. थोडक्यात काय तर संगीत ऐकण्यात पण बदल हवा, तेच तेच ऐकून कंटाळा येतो. सकाळी मॉर्निंग वॉकच्या जागा पण बदलाव्या, म्हणजे वॉकिंगचा कंटाळा येत नाही, मी बदलत असतो.
१९७९ पासून मी ठाण्यात राहत आहे, सुरुवातीच्या काळात आम्ही तिघे चौघे स्टेशन जवळील एका सोसायटीत एका फ्लॅट मधे paying guest म्हणुन राहत होतो. माझ्या सुदैवाने सकाळचा नाश्ता व दुपारचं जेवण कंपनीत मिळायचे. रात्री कुठल्या तरी हॉटेल मधे आम्ही क्षुधाशांती करून यायचो. काही दिवस ठराविक हॉटेल, खानावळ येथे जायचो. बरं वाटायचं. पण नंतर नंतर कंटाळा यायचा. मग हॉटेल बदली करायचो. वर्षभरात ठाण्यातील सर्व हॉटेल्स पालथी घातली. मग मुलुंडची हॉटेल्स पालथी घातली. शेवटी घाटकोपरला जाऊन पण जेऊन यायचो. सर्व ठिकाणी चव सारखीच. फक्त बदल असायचा तो जागेचा, गल्ल्यावरील माणसाचा, हॉटेल मधील कर्मचाऱ्यांचा. येथे पण बदल आवश्यक होता तो कंटाळा दुर करण्यासाठी, समाधानासाठी.
आता घरी आम्ही दोघे एकटेच असतो. प्रेमळ, सौम्य गप्पा गोष्टी मारून मारून किती मारणार, त्याचा पण कंटाळा आला की काहीही कारण नसतांना वादाला तेवढ्या पुरती सुरुवात करून त्याला पूर्ण विराम देण्यात येतो. दैनंदिन जीवनात हा बदल पण आवश्यक. हा थोडा गंमतीचा भाग झाला, पण आयुष्याचा प्रवास जोडीने करतांना असले खटके अधुन मधुन उडू द्यावेत, नाही तर आयुष्य मिळमिळीत जेवणासारखं वाटायचं, असं मला वाटतं.
स्वतः मधे हवा तसा बदल जरी घडवता येत नसला, तरी जिव्हाळ्याची नाती जपण्यासाठी, टिकवण्यासाठी स्वतःला बदलावच लागतं. स्वभावाला काही प्रमाणात मुरड घालावीच लागते. तेच तेच बघुन, वापरून, खाऊन, रूटीन दीनचर्येचा कंटाळा येणारच; त्यात बदल केल्यास जीवन रटाळ नाही वाटणार.
सुंदर आयुष्य उपभोगायचं असल्यास संकुचितपणाला बगल देणं गरजेचं. आपल आयुष्य आपल्या मर्जीने जगायचं. लोक काय म्हणतील ह्याचा विचार मुळीच करायचा नाही. आपल्यातला मस्तीखोरपणा जिवंत ठेवा. जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना यू समझ लो की वो जबरदस्ती जिंदा है. ना किसी के अभाव मे जियो, ना किसी के प्रभाव मे जियो, ये जिंदगी है आपकी, उसे आप अपने अंदाज मे जियो.
वयाच्या आकड्यांना दुर्लक्ष करून आता लाभलेले बोनस रुपी आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार, आवडीनुसार घालवण्यातच मजा आहे. दुसऱ्यांना आवडेल म्हणुन नीट नेटकं, टॉप टीप राहायचं नसतं, तर स्वतःला बरं वाटेल म्हणुन रहायचं असतं. कुठलेही चांगले बदल, सामाजिक बदल हे स्वागतार्ह आहे. काळानुसार बदला पण माणुसकी जिवंत ठेवा. माणुसकीचा, भावनांचा ओलावा कमी होणार नाही ह्याची काळजी घ्या, त्यात बदल मुळीच नको.
बदल सुधारणेसाठी हवा, पण प्रगतीच्या नावाखाली अधोगती होता कामा नये जे आज दुर्दैवाने आढळून येते. काळानुसार शैक्षणिक बदल हवा, पण त्याचे बाजारीकरण निषेधार्थ. देशाच्या उन्नतीसाठी आर्थिक बदल गरजेचे, पण समाजातील आर्थिक विषमता वाईट. सामाजिक बदल आवश्यक, पण सामाजिक विषमता वाईट.
प्रत्येकाची जीवनशैली भिन्न असु शकते, प्रत्येकाची आवड भिन्न असु शकते. प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असु शकतो. मला काय आवडतं ते मी लिहिलं. ते प्रत्येकाला आवडेल असं जरुरी नाही. तसेच माझे विचार प्रत्येकाला पटतील असं पण नाही. but change is must.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा