शहराच्या एका बाजूला असलेल्या त्या शांत सोसायटीत मी नुकताच नवीन राहावयास आलो होतो. माझ्या अपार्टमेंटच्या ग्राउंडफ्लोअरला माझा फ्लॅट होता. मला पहिल्या दिवशीच खूप शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे पहाटे उठून मी माझ्या शिरस्त्याप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. अंगणात पाऊल टाकताच शेजारच्या अंगणातून मधुर स्वर कानी पडले. मी मान वळवून बाजूला बघितलं. शेजारची गृहिणी तुळशीवृंदावनासमोर दिवा ठेवून भक्तीभावाने प्रार्थना करत होती. मला खूप बरं वाटलं. एकविसाव्या शतकात सुद्धा अशा पवित्र स्त्रिया आहेत हे पाहून मला समाधान वाटलं. अगदी प्रसन्न चित्ताने मी फिरायला गेलो. पुढचे काही दिवस हाच क्रम सुरु राहिला. मग एके दिवशी मी रात्री गाढ झोपेत असताना मला कसल्याशा आवाजाने जाग आली. मी कान देऊन ऐकू लागलो. शेजारच्या फ्लॅटमधून दबक्या आवाजात रडण्याचा आवाज येत होता. मी खूप अस्वस्थ झालो.
सकाळी उठल्यावर मी रात्रीच्या प्रकाराचा छडा लावायचा निश्चय केला. सोसायटीतील माझ्या ओळखीच्या लोकांना मी त्याबद्दल विचारले असता खूप धक्कादायक माहिती कळली.
माझ्या शेजारी राहणारे जोडपे मध्यमवयीन होते. लग्नाला दहा वर्षे झाली तरी त्यांना अजून मूलबाळ झालेले नव्हते. त्याचा सगळा दोष पत्नीवर ठेवून तिचा पती तिला छळत होता. तो अति मद्यपान करुन घरी यायचा आणि त्या पतिव्रता स्त्रीला काय वाटेल ते बोलायचा. ती स्त्री स्वभावाने खूप चांगली होती व तिच्यावर अत्यंत चांगले संस्कार झालेले होते. त्यामुळे ती बिचारी सर्व काही सहन करत राहायची.
हे ऐकून मी फार व्यथित झालो. मला त्या अभागी स्त्रीबद्दल खूप कणव वाटली.
असेच काही महिने गेले. सोसायटीतील इतर लोकांकडून त्या माणसाला कळले की मी पत्रिका बघतो. मग एक दिवस त्याने माझी गाठ घेऊन भेटीचा दिवस आणि वेळ ठरवली.
ठरलेल्या दिवशी , ठरलेल्या वेळी तो त्याची व त्याच्या पत्नीची जन्मपत्रिका घेऊन आला. मी दोन्ही पत्रिका अत्यंत काळजीपूर्वक तपासल्या कारण मला त्या अभागी स्त्रीवर विनाकारण अन्याय होऊ द्यायचा नव्हता. मी संपूर्ण अभ्यास झाल्यावर बऱ्याच वेळाने त्याच्याकडे पाहून गंभीरपणे म्हणालो ," तुमच्या पत्नीच्या पत्रिकेत संततीसंदर्भात कसलाच दोष आढळला नाही. पण तुमच्या पत्रिकेत मात्र संततीस्थान सदोष आहे. त्यामुळे तुम्ही मेडिकल चेकअप करुन शंकेनिरसन करुन घ्यावे असा माझा तुम्हाला सल्ला आहे. "
यावर तो कुत्सितपणे हसला. मग माझ्याकडे अत्यंत तुच्छ नजरेने बघत तीव्र आवाजात बोलला , " तुमची काहीतरी चूक होत आहे. तुम्ही पुन्हा एकदा पत्रिका पहावी असं मला वाटत आहे कारण या संपूर्ण काॅलनीत माझ्यासारखा धिप्पाड , ताकदवान मर्द गडी नाही हे सर्वांना ठाऊक आहे. "
मी माझा संयम ढळू न देता त्याला शांतपणे समजावून सांगितलं , " लग्नकुंडलीतील आरोग्यस्थान माणसाचं बाह्य शरीर दाखवत असतं आणि नवमांश कुंडलीतील आरोग्यस्थान माणसाची खरी आतली ताकद दाखवत असतं. तुमच्या लग्नकुंडलीत तुमचं धिप्पाड शरीर व बळकट स्नायू नक्कीच दिसत आहेत. पण तुमच्या नवमांश कुंडलीत मात्र तुमचं शरीर आतून हळूहळू पोकळ होत चाललं आहे अशी शक्यता दिसत आहे. म्हणून तुम्ही उगीचच जोखीम न घेता मेडिकल चेकअप करुन घ्या असं माझं म्हणणं आहे."
त्याला माझं बोलणं पटलं होतं पण तो सहजासहजी हार मानणार नव्हता. कारण त्याचा पुरुषी अहंकार खूप मोठा होता. म्हणून निकराचा प्रयत्न करत तो म्हणाला ," उगीचच मला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका. मी किती पाॅवरफुल आहे ते मला माहीत आहे. हायवेवर असलेल्या बारबालांना माझी " मॅनपाॅवर " चांगलीच ठाऊक आहे. "
त्या वासनेच्या दलदलीत रुतलेल्या माणसाला खऱ्याखोट्याचंही भान उरलं नव्हतं. बारबाला त्याला उल्लू बनवत होत्या आणि त्याला ते खरं वाटत होतं. बोलण्याच्या आवेशात आपले बारबालांशी अनैतिक संबंध आहेत याचीही कबुली त्याने देऊन टाकली होती.
मी किंचित हसून म्हणालो , " कोणतीही तरुणी स्वखुशीने बारबाला बनत नसते.
त्या दुर्दैवी बारबाला काही मजबूरी असल्यामुळे अशा व्यवसायात येत असतात. तुमची वारेमाप स्तुती करणं हा त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग असतो. त्यांना तुमच्या मॅनपाॅवरशी काही घेणंदेणं नसतं. त्यांना फक्त तुमची मनीपाॅवर हवी असते. तुम्ही खिशातून भराभर नोटा काढाव्यात म्हणून त्या तुमची खुशामत करत असतात.
लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी तुम्हाला अजून स्त्रीचं मन कळू शकलेलं नाही. तुम्ही फक्त तिच्या शरीरातच गुंतून पडला आहात. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला स्त्री उमगलेलीच नाही. जगातील कोणतीही स्त्री ही क्षणकाळची पत्नी व अनंतकाळची माता असते हे पक्कं लक्षात ठेवा. शरीरसंबंधाने स्त्रीला तात्पुरतं सुख मिळत असले तरी तिचा सर्वोच्च आनंद हा मातृत्वात सामावलेला आहे हे समजून घ्या. स्त्रीला मातृत्वाची ओढ असते कारण त्यातच तिच्या जीवनाचे सार्थक असते , साफल्य असते. निसर्गाने तिची रचना नवजीवनाचं सृजन करण्यासाठीच केलेली आहे. त्यामुळे तेच तिचं इतिकर्तव्य आहे.
तुमचा खरा पुरुषार्थ , तुमची मर्दानगी तुम्हाला बारबाला सांगू शकणार नाहीत तर ती तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या तृप्तीत , समाधानात तुम्हाला दिसू शकेल.
त्यासाठी तुम्हाला ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंट सुरु करावी लागेल. एखाद्या तज्ज्ञ , निष्णात डॉक्टरांची भेट घ्या आणि उपचार सुरु करा. काही वर्षांत तुम्हाला संतती प्राप्त होऊ शकते.
मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय उपाय दिले असते पण तुमच्या अति मद्यपान , अनैतिक संबंध अशा स्वैर वागण्याने त्यांचा परिणाम व्हायची शक्यता कमी आहे.
त्यामुळे तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेऊन तुमच्या पत्नीला मातृत्वाचा सर्वोच्च सन्मान बहाल करु शकता. ती सुखी झाली की तुम्हीसुद्धा आपोआप सुखी व्हाल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. "
तो माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. माझे बोलणे संपल्यावर तो काही वेळ निश्चल बसला. मग उठून त्याने माझी कन्सल्टेशन फी दिली. त्यानंतर तो सावकाशपणे एक एक पाऊल टाकत निघून गेला.
काही दिवसांतच तो फ्लॅट विकून त्याच गावात दुसरीकडे राहावयास गेला. रोजच्या रुटीनच्या रहाटगाडग्यात मी ही घटना पार विसरुन गेलो.
अशीच काही वर्षे गेली.
एक दिवस मी सहज संध्याकाळी फिरायला म्हणून एका बागेत गेलो होतो. तिथं निसर्गसौंदर्य व समोर घसरगुंडीवर खेळणारी लहान मुले पाहत राहिलो. काही वेळाने मी बाकड्यावरुन उठलो. मी उठताक्षणी अचानक कुठूनशी एक स्त्री तीरासारखी येऊन माझ्या पाया पडली. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं तर ती तीच होती. माझी शेजारीण.
मी तिच्याकडे पाहत असतानाच समोर खेळणारा एक गोजिरवाणा चिमुकला धावत येऊन तिला बिलगला आणि त्याने तिला आई अशी हाक मारली.
तिचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते.
ती हलकेच डोळे पुसून मला म्हणाली, "माझ्या पतीने मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. आम्ही तुमच्या शेजारची जागा विकून दुसरीकडे गेल्यावर माझ्या पतीने काही दिवस खूप विचार केला. मग मनाचा निर्धार करुन तो मला एके दिवशी एका सुप्रसिद्ध डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे आमच्या दोघांच्याही वेगवेगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या. तुम्ही अंदाज केला होता तसा त्यांच्यातच दोष निघाला. पण त्यांनी न डगमगता पूर्ण ट्रीटमेंट घेतली. मग काही वर्षांनी आम्हाला संतती प्राप्त झाली. तुमच्या केवळ एका अचूक सल्ल्याने आमचं आयुष्य आज अतिशय सुखात व्यतीत होत आहे. आता त्यांनी मद्यपान पण खूप कमी केलं आहे.
मी तुम्हाला कधीही विसरु शकणार नाही. "
हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहत होता.
स्त्री ही क्षणकाळची पत्नी व अनंतकाळची माता असते हेच खरं आहे.
मग तिच्याशी काहीवेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो.
‐- जितेंद्र अभ्यंकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा