सकाळी सकाळी कविताला आईचा फोन आला म्हणून ती गडबडली पण आई ठीक होती.
“कवी, मला बरचं सामान आणायचं आहे गं वाण्याकडून. संध्याकाळी जाऊया?” आईला नेहमी काही ना काहीतरी हवं असायचं.
“अगं आई दोन दिवसांपूर्वी तर सगळं सामान आणलय ना! आता काय हवयं अजून?” कणिक भिजवत फोन कानाला धरून कविता नवऱ्याला चहा तयार आहे असे डोळ्याने दाखवत होती..
“अग,परवा बदाम, पिस्ते व कोको वगैरे बरंच काही घ्यायचं राहिलं..उद्या कोकोच्या वड्या कराव्यात म्हणते..शिवाय काही डाळी पण विसरल्या घ्यायच्या” आईला अजिबात घाई नव्हती.
“आई मला लिस्ट दे. मी करते ॲार्डर ॲानलाईन.” कविता नवऱ्याचा चहा व मुलांचं दूध ओतत होती. कोकोच्या वड्या ही कुणालाही करतेय कोण जाणे..स्वत:ला तर डायबेटिस आहे..
आईकडून काही उत्तर आलं नाही..
“आईं.. कविताने फोन चालू आहे का नाही बघितलं. तेवढ्यात आईचा आवाज आला, “ॲानलाईन नको बाई! मला डोळ्यांनी बघून सगळं घ्यायला आवडतं.
कविता बरं म्हणाली. आई मुद्दाम काही गोष्टी यादीमधे लिहित नाही याची तिला खात्री होती. कविताला मुलांचे अभ्यास, ॲाफिसचं काम, स्वयंपाक पाणी यात रात्रीचे सात वाजत असतं आणि जवळच राहणाऱ्या आईला कायम खरेदीला जावसं वाटत असे. कविता संध्याकाळी येते म्हणाली पण ॲाफिसमधे काम संपायलाच सात वाजले.
“आई, उद्या येते ग. अजून ॲाफिसातच आहे”. तिनं फोन बंद करून काम संपवायला सुरूवात केली.
दुसरे दिवशी मात्र ती संध्याकाळी पाच वाजता आईकडे जाऊन पोचली. एका गावात रहात असल्या तरी रहदारीमुळे आईकडे पोचायला चांगला अर्धा तास लागायचा..
आई फोनवर कुणाशी तरी बोलत होती.. टेबलावर कोको, बदाम, पिस्ते, डाळी सगळं आणलेलं दिसत होतं. कविताचा राग अनावर झाला..कळवायचं तरी की मी आणलयं सगळं म्हणून! हेलपाटा पडला ना मला!
“हे बघा, पुष्पाताई, मुली कामात असतात. नुसतं या म्हटलं तर तुम्हाला त्या दोन दोन आठवडे दिसणार नाहीत.. काही निमित्त सांगा म्हणजे येतील पण आजारांचं निमित्त नका सांगू बरका.. मी बरेचदा काही गोष्टी “विसरते” खरेदी करायला! नंतर कवितास विचारते मला घेऊन जाशील का म्हणून! ओरडली तरी भेटते हो! आणि त्यातून मुलगी आली नाही तर वाईट वाटून घेऊ नका बरं.. अहो त्यांना त्यांचा संसार आहे.. “ कविता चमकली.
आईला केवळ आपण सोबत हव्या आहोत..खरच बिचारी आप्पा गेल्यापासून ती एकटी पडली आहे..पण माझ्याकडे ये म्हटलं तर मात्र येत नाही. मी माझ्या घरीच बरी म्हणते..पण एकटेपणानं घर खायला उठत असेल! तिच्या सामानाच्या यादीतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे “लेकीची कंपनी”! जी गोष्ट कधीच पूर्ण होणारी नाही..एकेकाळी नातेवाईकांच्या गोतावळ्यात राहिलेली बाई ही.. आता माणूस दृष्टीस पडत नाही तिच्या आणि वयानं कुठे एकटं जावसं वाटत नाही.
आईनं चपापून मागे बघितलं. आपलं बोलणं कविताने ऐकलं नसलं म्हणजे झालं म्हणून ती कविताचा अंदाज घेत होती.
“कवी, काल तुला वेळ झाला नाही म्हणून मी समोरच्या नंदूला ॲानलाईन ॲार्डर कर म्हणून हे सगळं मागवलं पण तुलाच कळवायला विसरले.. काय म्हणावं बाई मला तरी!”आई सारवासारव करत होती.
“बरं झाले कळवलं नाहीस ते! आपण भेटलो ना त्यामुळे!
चल मस्त चहा करते.. अगबाई बटाटेवडा केलेस? अगं नको करत जाऊ तळणी एकटी असताना!” कविताने एक बटाटा वडा तोंडात टाकला..
“अहाहा.. काय केलायस ग बटाटा वडा! तुला आठवतंय मी सातवीत असताना बटाटा वडा कर म्हणून तुझ्यामागे लागले होते आणि तुला शाळेतील परीक्षांचे पेपर तपासायचे होते.. मी रडारड केली म्हणून तू बटाटे घेऊन आलीस व वडे केलेस आणि रात्री एक पर्यंत पेपर तपासत बसली होतीस..
“हो ग.. किती छान होते ते दिवस! आप्पांचा आवडता पदार्थ! म्हणायचे - बाईसाहेब तुमच्या हाताची चव इतरत्र कुठेही नाही.. आईचे डोळे भरून आले..
चहा घेत आईनं अनेकदा सांगितलेल्या चार गोष्टी परत तेवढ्याच नवलाईनं सांगितल्या पण यावेळी “माहित्येय ग” हे वाक्य कविता बोलली नाही. तिनं शांतपणे आईचं बोलणं ऐकून घेतलं. आप्पांच्या आठवणीत दोघी रडल्या.. देवमाणूस ग आप्पा.. आई पदरानं डोळे पुसता पुसता आप्पांनी केलेले विनोद सांगून हसत होती.
“पुष्पाताई फार एकट्या पडल्या आहेत. त्यांची लेक दोन दोन महिने गावांत असून त्यांना भेटत नाही कारण तिची नोकरीच तशी आहे.. विशाखाताईंची लेक सिंगापूर मध्ये असते आणि अलाकाताईंची मुलगी अमेरिकेत.. त्या मानाने मी किती नशीबवान आहे बघ.. जेवतेस का? पिठलं भात खाऊ..” आईनं कविता नाही म्हणणार याची तयारी ठेऊन विचारलं.
एक मिनिट थांब.. तिनं घरी फोन करून मुलांना व नवऱ्याला मी आज आईकडेच झोपेन सांगितलं. ॲाफिसमधे दुसऱ्या दिवसाची रजा टाकली व पिठलं भात खात ती आईशी सुखदु:ख बोलत राहिली..गप्पा मारताना रात्री कधी झोप लागली कळलं नाही.
दुसरे दिवशी दोघी पुष्पाताईंकडे गेल्या..
“पुष्पामावशी मस्त शिरा कर ग.. केव्हापासून तुझ्या हातचा शिरा खावासा वाटतो आहे..”
पुष्पाताई उत्साहाने उठून स्वयंपाक घरात जाताना त्यांचे गुडघे दुखले नाहीत! बदाम, वेलदोडे, केशर घातलेला शिरा खात पुष्पामावशीच्या कुशीत शिरून थॅंक्सु ग मावशी म्हणताना शिऱ्यात साखर कमी पडलेली असून शिरा तिला गोड लागत होता..
गप्पागोष्टी करताना तिनं निश्चय केला की ज्यांच्या मुली लांब आहेत अशा आईच्या मैत्रिणींना असचं जाऊन भेटायचं.. त्यांचे सुरकुतलेले हात हातात घेऊन त्यांचं सुखदुःख ऐकून घ्यायचं.. त्यांचे डोळे पुसायचे.. तुमची मुलं असेनात का लांब.. मी आहे ना म्हणायचं..
त्यांचा एक कंटाळवाणा दिवस सोनेरी करायचा..
एक दिवस ती खुर्ची मोकळी असणार आहे..
एक दिवस ते डोळे कुणाचीच वाट बघणार नाहीत..
जे करायचं ते आज आत्ता करायला हवं!
तिनं निर्धार केला ..
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.🎉
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा