मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2489. सावली

  परिस्थितीने गांजलेल्या लोकांमध्ये तसा भावनिक एकोपा खूप असतो पण या जीवनातील प्रलोभने, चमकधमक, आजूबाजूचे दिखाऊ वातावरण या एकोप्याला खिंडार पाडण्याचे काम करू शकते ज्यातून वेगाने वाहणारा वारा आपल्यासोबत सर्व भावनिक बंध, आपल्यावर केलेले उपकार, आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता, उपसलेले कष्ट, केलेला त्याग या सर्वांना सोबत वाहवून नेतो आणि मागे रहातो तो फक्त पालापाचोळा, ज्यालाच आपण जीवनातील आनंद समजलेलो असतो. पण नियती आपल्या कर्माचे फळ आपल्या पारड्यात टाकतेच, ज्याच्यापुढे आपले निर्णय, प्रतारणा, मनस्ताप याचे मोजमाप होते पण त्यात वेळ निघून गेलेली असते. एखाद्या चित्रपटाची असावी अशी कथा आज सामायिक करीत आहे. 
 
                                   --🌼--
 
     किसन राठोड यांचे घर आंब्याच्या तोरणांनी सजले होते. सनई चौघाड्यांच्या मंद मंद मंजुळ स्वरात हळद लागून नवरदेवाची वरात नवरीच्या दारी पोहोचली होती. 'कुर्यात सदा मंगलम्!' म्हणत अक्षदांच्या वर्षावात मांडव भिजून निघाला होता. दोन जीव हे एकमेकांच्या गळ्यात हार घालून नव्याने संसार करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली पाहुणे मंडळी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त होत होती.
      किसन हा वीट कामगार होता तरी त्याने आपल्या परीने चांगली बडदास्त ठेवली होती. आपल्या हातून कोणतीही कमतरता राहू नये याची त्याने काळीज घेतली होती. अर्थात गणपत पवार त्याचा सोयरा देखील खूप काही भरला पुरला नव्हता. पण मोलमजुरी करणारं त्याचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. त्याचा एकुलता एक मुलगा प्रकाश शहरातील एका खाजगी कंपनीत नोकरीवर होता.
      गरीब असले तरी दोन्ही कुटुंब आब राखून होते.आपण बरे आणि आपले काम बरे या पठडीतील दोन्ही कुटुंब सोयरिक साठी उत्तम होते. त्यामुळे सारे काही निर्विघ्नपणे पार पडले. आणि यथावकाश प्रकाश आणि लक्ष्मीचा शहरातील संसार सुरू झाला.
     प्रकाशने दिवसभर काम करावे. संध्याकाळी घरी यावे. लक्ष्मीनेही घरचं सारं आवरून दोन घरी काम करायला जावं. सारं सुरळीत सुरू होतं पण त्यात सहजता नव्हती. उत्साह नव्हता. एक उदासीनता जाणवत होती. लग्नाला दोन महिने होत आले होते. पण लक्ष्मी काही खुलत नव्हती. प्रकाशच्या लक्षात येत होते की लक्ष्मी काही या लग्नाने सुखी समाधानी दिसत नाही. नेहमी कसल्यातरी विचारात हरवलेली असते.
     त्याने त्याबद्दल तिला विचारायचे ठरवले. आणि एका सकाळी ती चहा करत असतांना तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "लक्ष्मी! कुठे हरवलीस?"
     "काही नाही! कुठे काय?"
     "मग आपल्या लग्नाला दोन महिने झाले, पण तू खुश दिसत नाही. कसला विचार करते? तुला हे लग्न मान्य नव्हते का? तुला मी आवडत नाही का?" चहा ढवळत, आपल्याच विचारात हरवलेल्या लक्ष्मीकडे पाहत प्रकाश म्हणाला.
     "नाही हो ! तसं काही नाही. तुम्ही खूप चांगले आहात."
      "पण मी नेहमी बघतो तू नेहमी काहीतरी विचारात असतेस, उदास दिसते. तुझ्या मनात काय आहे? ते सांग गं! मी माझ्या परीने समजून घेईन." प्रकाश काकुळतीला येवून म्हणाला.
   प्रकाश... अतिशय गरीब कुटुंबातील साधासुधा मुलगा...!परिस्थितीमुळे जेमतेम बारावी होवून एका बऱ्या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्याचे आईवडील गावाकडे शेतमजुरी करायचे. त्यामुळे सासू सासाऱ्यांचा जाच असं काही नव्हतं.
    कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा प्रकाश आपले काम इमान इतबारे करत असल्याने नोकरीत बऱ्यापैकी टिकून होता. गरजा मर्यादित ठेवल्याने आपल्या पंधरा हजार पगारात तो खाऊन पिऊन सुखी होता.
     जेव्हा लग्न करण्यास निघाला तेव्हा त्याला असंख्य अडचणी आल्या. कारण आई वडीलांजवळ जमिनीचा अगदी छोटासा तुकडा होता, त्यामुळे दोघांच्या मजुरीवर घर चालायचे. त्याचा पगारही बेताचा होता. समाजात मात्र मुलींची संख्या कमी झाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्याने कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. आणि शेवटी वीट भट्टीवर काम करणाऱ्या किसनची ही काळी सावळी पण नाकीडोळी नीट असलेली लक्ष्मी त्याच्या आयुष्यात सहचारिणी म्हणून आली. 
     किसन तरी काय करणार होता. आधीच हातमजुरीवरचे पोट, त्यात पाच पोरी! सगळ्यांचे लग्न करता करता त्याचे कंबरडे मोडले होते. लक्ष्मी तशी हुशार, पण घरातले एक खाते तोंड कमी होईल या हेतूने आपली ऐपत पाहून, तरी बरे असे खाते पिते घर पाहून लक्ष्मीला त्याने उजवुन टाकले.
     गणपत पाटीलही साजेशी सून मिळाल्याने खुश होते. आता मुलाचे जीवन मार्गाला लागले म्हणून तेही निश्चिन्त झाले होते. शहरात येऊन त्यांच्या संसाराची घडी बसवून ते पुन्हा गावाकडे निघून आले. त्यांचं सारं आयुष्य शेती मातीत गेल्याने त्यांनी तिथेच राहण्याचे ठरवले होते.
      लक्ष्मी चांगली होती. गरिबीत वाढल्याने कामही नीटनेटके करायची. संसाराला हातभार म्हणून दोन घरी काम पण करायची. पण नेहमीचं उदास दिसायची. त्यामुळे न राहवून प्रकाशने विचारले. 
      विश्वासाने ठेवलेल्या त्या प्रेमळ आश्वासक स्पर्शाने आश्वस्थ होऊन लक्ष्मी बोलली, "मला ना अजून शिकायचे होते. मी पोलीस भरतीचा फॉर्मही भरला होता. पण बाबांनी घरातील एक जबाबदारी कमी होईल म्हणून माझे लग्न करून दिले."
     "अरेच्चा!एव्हढचं होय...? मला वाटलं, मी तुला आवडत नाही का?" प्रकाश हसत म्हणाला. "परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही. तुझी इच्छा आहे तर नक्की शिक. मी तुला सर्वतोपरी मदत करीन." प्रकाश आश्वासक शब्दात म्हणाला.
     तो बोलला खरा पण त्याने तिच्या अभ्यास, प्रशिक्षण, त्यासाठी बाहेर राहणे यासाठी खर्च तर लागणार होता. त्याच्या तुटपुंज्या पगारात फक्त रोजचा खर्च भागत होता. पैशाची तजवीज कशी करावी ते त्याला समजत नव्हते. शेवटी त्याने जमिनीचा जो एक लहानसा तुकडा होता तो विकून टाकला. त्याचे आईवडील त्यामुळे नाराज झाले.
पण त्याने समजावले, "बाबा! आज जरी आपल्याला जमिनीचं तुकडं विकावं लागलं तरी लक्ष्मी चांगल्या पगारावर लागली की आपण घेऊ की पुन्हा!" नाईलाजाने ते तयार झाले.
      लक्ष्मीनेही मिळालेल्या संधीच सोनं केलं आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र झाली. आता ती कामावर रुजू झाली होती. त्यांचा संसार आता दोन घरात विभागला होता. दोघेही आपापल्या कामाच्या ठिकाणी रहात असत. त्यामुळे आता विक एन्डला सुटी असेल तसे भेटत त्यांचा संसार सुरू होता. पैसे बरे मिळू लागल्याने तसे बरे चालले होते.
    पण आता झाले काय? कामाच्या व्यापात वारंवार घरी येणे लक्ष्मीला शक्य होत नव्हते. त्यामुळे तिचे घरी जाणे आपसूकच कमी होत गेले.
      आता स्वतः चांगल्या पदावर असल्याने एक स्वयंपूर्ण स्वावलंबी स्त्री झाल्याचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा स्मार्टनेस आला होता. त्यामुळे कदाचित तिला आता तिच्या नवऱ्याची थोडीफार लाज वाटू लागली होती.
      विकास...! पोलीस स्टेशनमधील एक रुबाबदार पोलीस सबइन्स्पेक्टर...! हसरे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व...! ती त्याच्या हाताखाली काम करत होती. दोघेही नेहमी कामानिमित्त मोहिमेवर जातांना सोबत असत. त्यामुळे दोघांच्या मनात नकळत भावबंध तयार झाले. ती तरुण आणि रुबाबदार पोलीस सबइन्स्पेक्टर विकासकडे आकृष्ठ झाली होती, तर तोही लक्ष्मीच्या मृगनयनी डोळ्यांवर, सुबक कमनीय बांध्यावर फिदा झाला होता. एकमेकांना हवाहवासा सहवास सहज मिळत होता. सहवासाने त्यांचं प्रेम फुलत होतं. त्याच्यासाठी ती डब्यात गोड धोड करून आणीत होतं. तो तिच्यासाठी काहीबाही आणून देत होता. भेट झाली नाही तर दोन्हीही कासावीस होत होते.
     आणि मग एकदा हिम्मत करून त्याने तिला मागणी घातली, "तू माझी होशील का? माझ्याशी लग्न करशील का?" 
     "नाही हो! माझं लग्न झालंय."
     "हो, मला माहित आहे. पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत!"
     "मलाही तुम्ही आवडता. पण काय करू मी? माझा नवरा खूप चांगला आहे. आज तो होता म्हणून मी अशी समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा कसा घेऊ?नाही... नाही! ते पाप आहे. तुम्ही मला विसरून जा."
     "नाही शक्य होणार मला ते!त्यापेक्षा मी लग्न करणार नाही."
     "असं नसतं. तुम्हाला चांगली मुलगी मिळेल. ती तुम्हाला माझा विसर पाडण्यास भाग पाडेल. प्रेम हेंच सारं काही नसतं, तुम्ही मला विसरून जा."
       "त्यापेक्षा मी वरिष्ठांना सांगून माझी पोस्टिंग बदलवून घेतो. मात्र मी तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करू शकत नाही लक्ष्मी!"
    लक्ष्मीला काही कळेना काय करावे? तीही त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. प्रेमाची आग दोन्ही बाजूंनी लागून त्याची धग लक्ष्मीच्या संसाराला लागली होती.
      लक्ष्मी जरी सुसंस्कारी असली तरी प्रेम आंधळं असत. ती पतीधर्म विसरून वाहवत जाऊ पाहत होती. प्रकाश की विकास या द्वंद्वात ती भरकटत होती. एकीकडे विकासचं प्रेम... दुसरीकडे आपला सालस नवरा... तिला काय करावे सुचत नव्हते. रात्र रात्र झोप लागत नव्हती.
     तिची द्विधा मनस्थिती प्रकाशने अचूक हेरली. अशीच एकदा ती घरी आली असता तिची अस्वस्थता पाहून त्याने विषय काढला, "लक्ष्मी!काय झालंय? तुला कोणी त्रास देतंय का? हल्ली तू कसल्यातरी तणावात दिसते?" 
      प्रकाशाचे बोलणे ऐकून लक्ष्मीला हुंदका दाटून आला आणि तिने सारे खरेखरे त्याला सांगितले. "मला समजते आहे हे चुकीचे आहे, पण काय करू मी?" तिने कासावीस होऊन त्यालाच विचारले.
      तिच्यावर खरेखुरे प्रेम करणाऱ्या प्रकाशला हा घाव वर्मी लागला होता. पण त्याने स्वतःला सावरले. "संसार असा बळजबरीने होत नसतो. तू जाऊ शकते" हृदयावर दगड ठेवून प्रकाश म्हणाला आणि त्याने तिला कायदेशीर घटस्फोट देऊन आपल्या बंधनातून मुक्त केले.
    आता निश्चिन्त होऊन तिने सब इन्स्पेक्टर विकाससोबत नव्याने संसार मांडला. तशी ती आताशा सुखी होती. पण आपल्या प्रथम पतीशी प्रतारणा केली होती याची एक बोच कायम तिच्या अंतरात होतीचं.
     आणि नियतीच्या मनात वेगळेच होते. चंद्रपूरमध्ये त्या दोघांची पोस्टिंग लागली होती. नक्षलवादी लोकांच्या कारवाया तिथे चालू असत.
     एकदा तेथील जंगलात नक्षलवादी लपले आहेत असा सुगावा लागल्याने त्यांचा बिमोड करण्याची जबाबदारी सबइन्स्पेक्टर विकासवर आली. नक्षलवाद्यांसोबत त्यांची घमासांग लढाई सुरू होती. नक्षलवाद्यांकडे देखील भरमसाठ शस्रसाठा असल्याने दोन्हीकडून गोळीबार होत होता. डोळ्यात तेल घालून पोलीस पुढे सरकत होते. नक्षलवाद्याना जंगलाचा कोपरा न कोपरा माहीत असल्याने म्हटले तितके यश येत नव्हते. पण धाडसाने पाऊल टाकत त्यांनी चार नक्षलींना ठार केले. त्यातल्या दोघांनी समर्पण केले. पण ती कारवाई करतांना सबइन्स्पेक्टर विकास यास मात्र  हौतात्म्य प्राप्त झाले आणि लक्ष्मीचे कुंकू पुसून गेले. त्यामुळे तिचे सुखाचे दिवस सरले आणि तिला एक प्रकारचे वैराग्य आले.
    आपण मोहात पडून एका सुशील समंजस व्यक्तीच्या सात्विक प्रेमाला दूर केले ह्याची खंत तिला नेहमीच वाटत होती. पण आता पुलावरून बरेच पाणी गेल्याने ती परतीचा विचार करू शकत नव्हती. तिने स्वतःला कामात झोकून दिले.
      तिला विरक्ती येऊन त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर तिने समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आणि आपल्या शूर धाडशी पतीच्या स्मरणार्थ 'सावली'च्या माध्यमातून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम सुरू केला.
     इकडे प्रकाशचे जीवन असे तसे चालले होते. आईवडील वारले होते. 'एकला चलो रे!' ची वाट धरून प्रकाश जीवन कंठत होता. आला दिवस ढकलत होता. आताशा त्याची कंपनी पण सुटली होती.
    वार्धक्याने त्राण नसलेला प्रकाश रस्त्याने जात असताना अपघात होऊन त्याचा पाय कापला गेला होता. त्यामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले आणि तो परावलंबी झाला. त्यामुळे नाईलाजाने तो सावलीच्या आश्रयास आला. तिथे त्याला पाहताच लक्ष्मीच्या तोंडातून आपोआप शब्द उमटले, "तुम्ही?"
     प्रकाशला समोर पाहून लक्ष्मी उठून उभी राहिली. तिने त्याचे चरणस्पर्श करून मोठ्या आदराने त्याला खुर्चीत बसवले. त्याची ती दयनीय अवस्था पाहून तिला गलबलून आले. "काय झाले? कसे झाले?" तिने आस्थेवाईकपणे त्याची चौकशी केली. जातीने स्वतः लक्ष घालून त्याची खाण्यापिण्याची राहण्याची उत्तम व्यवस्था केली. त्याला काय हवं नको ते स्वतः पाहू लागली.
      त्याच्या ऋणातून ती पूर्णपणे उतराई होऊ शकणार नव्हती पण आपल्या परीने जे करता येईल ते सर्व करत होती. आपल्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची आहुती देणारा पुण्यात्मा आज तिच्याकडे आला होता. त्याची  सेवा करण्याची संधी ईश्वराने तिला मिळवून दिली होती. ती तिने सार्थकी लावली.
    आता सावलीला तिची सावली मिळून ती कृतार्थ झाली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...