गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2459. निरपेक्ष

 त्याचं ड्रिंक संपवून तो बिल मागवणारच होता,  इतक्यात  'ती' मुलगी त्याच्या टेबल जवळ आली. ब-याच वेळेपासून ती त्याच्यावर नजर लावून बसली होती. एकवीस-बावीस वर्षे वय असावं तिचं फार तर फार. त्याने तोवर तिच्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते.
शेवटी धाडस करुन ती त्याच्यासमोर येउन उभी राहिली.
'सो..हँडसम..शनिवारची रात्र आहे..हाउ अबौट सम फन?'
त्याने तिच्याकडे पाहिलं...
त्याला प्रेटी वूमन मधल्या ज्युलीया राॕबर्टसची उगीचच आठवण झाली. म्हणजे रिचर्ड गिअर...
स्वतःच्या मनात आलेल्या विचारांना तो हसला व तिला म्हणाला 'सॉरी मिस..नाॕट इंटरेस्टेड'
ती थोडीशी नाराज झाली..
पण मग एका वेगळ्याच निर्धाराने त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली. शांतपणे एक सिगारेट शिलगावत त्याला म्हणाली
'कमीटेड आहेस? मी पहातेय तु एकटाच आहेस..असतोस. नेहमी विकेंड्सना बघते इथे तुला..एकटाच येतोस..बिअर पितोस..जातोस..कधी कोणी मुलगी बरोबर नसते.' 
सिगरेटचा एक झुरका घेत ती हळू आवाजात मिश्कीलपणे म्हणाली  'प्लीज 'गे' आहेस असं सांगू नको मला आता..'
तो परत हसला. तिने सोडलेल्या सिगारेटचा धूर हलकेच हाताने दूर सारत तो म्हणाला, 'नाही मी 'गे' नाहीये..एवढच समज की मला यात इंटरेस्ट नाही'.
ती तिच्या खुर्चीत रेलली. तिची फिगर आता अधीकच उठावदार भासत होती. कदाचित् हे जाणूनबुजून होतं. पार्ट आॕफ बिझनेस. 
त्याने त्याची नजर तिच्या चेह-यावर रोखून ठेवली होती.नजर खाली घसरु न देण्यासाठी परिश्रम पडत होते.
ती एक सुस्कारा टाकत म्हणाली
'मला एखादं ड्रिंक तरी आॕर्डर करशील का, की तेही नाही?'
तो हसला. मागे वळून त्याने बार अटेंडंट ला हात केला..
'ओके..काय चालेल तुला?'
ती त्याला डोळा मारत हळूच म्हणाली
'तसं तर बरंच काही चालेल डिअर..पण सध्या एक ग्लास वाईनच मागव..'
त्याने तिच्यासाठी वाईन मागवलं व तिला कंपनी देण्यासाठी स्वतःला एक टिन बिअर मागवली. 
'सो हँडसम..तु जवळपास राहतोस का?' तिने विचारलं. 
त्याला तिच्या प्रश्नाचा रोख आवडला नाही हे त्याच्या चेह-यावरुन तिच्या लक्षात आलं. तरीही त्याने उत्तर दिले
'हो मी जवळपास राहतो..'
त्याने मागवलेल्या बिअरचा एक सिप घेत तो म्हणाला
'पण ही चौकशी का? काय कामाची ही तुला?'
'वेल...ते तुझ्यावरच अवलंबून आहे..' ती भुवया उडवत म्हणाली, 'तु जवळ राहतोस हे आपल्या 'दोघांच्याही' कामाचं होउ शकतं..फक्त 'माझ्याच' नाही काही..'
'हे बघ..' तो आता थोडासा रागावून म्हणाला,'मी तुला बोललोय, मला यात इंटरेस्ट नाहीय...तरीही तु का मागे पडतेहेस माझ्या..तुला या नाइट क्लबमधे इतर कंपनी मिळणार नाही का?'
भोवताली एक नजर टाकत तो पुढे म्हणाला 'मला तर तुझ्यावर खिळलेल्या ब-याच नजरा दिसताहेत या बार मधे..'
तिने आपला वाईनचा ग्लास उचलला, एकाच दमात अर्धा अधीक संपवला व खाली ठेवत त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली 'मी भले एक काॕलगर्ल असेन, डार्लींग, बट आय टू हॕव चाॕइसेस..!!' 
तो पुढे काही बोलला नाही...
काही वेळ स्तब्ध शांततेत गेला. बारमधील इतर लोक मात्र त्यांच्यावर नजर ठेउन होते. तो तिच्या 'गळाला लागतो' का याची त्यांना जास्त उत्सुकता होती. 
तिची वाईन संपेपर्यंत त्याने वाट पाहिली.
'बरं..आता मला निघायला हवं..' आपलं घड्याळ पहात तो म्हणाला 'तुला ड्रिंक मागवायचं असेल अजून तर मागवू शकतेस..मी पे करुन जाइन..'
 
तो निघणार या विचाराने तिचा चेहरा पडला.
प्रश्न पैशाचा नव्हता. त्याच्यात काही खास होतं..
ती त्याच्या डोळ्यात खोल पहात म्हणाली..
'तु मला खरच घरी घेउन जाउ शकत नाहीस? बघ विचार कर..जर नेलस तर तुझा अपेक्षाभंग होणार नाही...माय प्राॕमीस..!'
मग काही तरी सुचून म्हणाली..'हे बघ मी तुझ्याबरोबर आल्याने तुला आॕकवर्ड वाटत असेल तर मला तुझी सोसायटी व फ्लॕट नंबर सांग..मी पोहोचून जाईन..'
त्याने तिच्याकडे पाहिले..व तो पुन्हा  हसला. 
ओह..त्याचं ते हसणं..वेड लावणारं होतं त्याच हसणं..जीव ओवाळून टाकावं असं. 
'ठीक आहे' तो अचानक म्हणाला व ती भानावर आली,
'तु येतेहेस माझ्याबरोबर..पण एका अटीवर....ज्याक्षणी मी तुला जायला सांगेन त्या क्षणी तुला माझ्या घरातून निघून जायला लागेल..कुठलेही आढेवेढे न घेता..मान्य आहे तुला?'
'ओह..यस..' लगेच आपल्या जागेवरुन उठत ती म्हणाली. आपल्या कानांवर व नशिबावर तिचा त्याक्षणी विश्वास बसत नव्हता.
त्याने बिल भरलं व त्यांनी तो नाइट क्लब एकत्र सोडला. क्लबमधले इतर मुली व पुरुष एक सुस्कारा टाकत त्यांना जाताना पहात राहिले.
तो रहायचा ती सोसायटी जवळच होती. त्याच्या होंडा सिटी मधे बसल्या पासून दहाव्या मिनीटाला ते त्याच्या फ्लॕटच्या दारात होते. त्याने त्याच्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला व आत गेला.
दरवाजातून आत येताच त्या सुरेख हाॕलमधे तिला पहिली गोष्ट जी नजरेत भरली ती म्हणजे एक मोठा फोटो. त्या फोटोत 'तो' होता व एक खूप 'गोड चेहरा' होता..तो झब्बा कुर्ता मधे व 'ती' साडी मधे.
म्हणजे महाशय शादीशुदा आहेत तर..पण बायको इथे याच्याजवळ  नसते बहुधा..कदाचित....
'हो..ती माझी बायकोच आहे.. प्रिया..' तिचा चेहरा वाचत तो म्हणाला..'आणि...आम्ही बरोबरच राहतो..'
त्याने पुढे होत हाॕल लगतचा एक दरवाजा उघडला आणि शांतपणे तिच्याकडे पहात म्हणाला 'ती या खोलीत आहे..'
त्याच्या त्या वाक्याने ती मात्र हादरुन गेली.
"हा माणूस वेडा आहे का..याची बायको घरात आहे आणि हा 'मला' घरी घेउन आलाय…" तिच्या मनात विचार आला.
त्याच्याकडे रागाने पहात ती दरवाजातून बाहेर पडायला वळणार तसा तो म्हणाला 'थांब..' ती जागीच थबकली. 
त्याने पुढे येउन तिचा हात पकडला व तिला शांतपणे त्या खोलीकडे घेउन आला. तिला काहीच समजत नव्हत तो काय करतोय. ती निमुट त्याच्या मागे त्या बेडरुम मधे गेली.
बेडरुममधे मंद आवाजात एक लाइट वेस्टर्न संगीताची सी.डी. वाजत होती. सगळी रुम सिलींग मधे लावलेल्या छोट्या छोट्या एल.इ.डी. दिव्यांच्या प्रकाशात उजळली होती..प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या रंगांचे आकर्षक वाॕलपेपर लावले होते..
खोलीच्या मध्यभागी एका हास्पिटल सदृश्य बेडवर 'प्रिया' झोपली होती. फोटोपेक्षाही ती इथे सुंदर दिसत होती. 
तिच्या शेजारी लावलेल्या एका स्टँडवर एक सलाइनची बाटली अडकवली होती. ज्यातून थेंब थेंब पडणारे औषध बारीक नळीवाटे तिच्या शरिरात मिसळत होतं. श्वासोश्वास घेण्यासाठी एक नॕझल कॕनूला तिच्या तोंडावर होता ज्याच्या साह्याने तिचा श्वास मंदपणे चालू होता. चेह-यावरुन असं वाटत होतं की आता उठेल व म्हणेल 'हाय..मी प्रिया..'
तिने त्याच्याकडे पाहिलं..बोलायला काही शब्दच सुचत नव्हते..
'ओह डिअर....काय झालय हिला..?' ती कशीबशी म्हणाली. 
तो सलाईनच्या बाटलीजवळ गेला..त्याचा फ्लो थोडासा वाढवला
'प्रिया तीन वर्षांपासून कोमात आहे..' तो शांतपणे बोलला, 'तिचा एक मोठा अॕक्सिडेंट झाला तिच्या पंचविसाव्या वाढदिवशी..मला भेटायला येताना...' 
हे म्हणताना त्याच्या चेह-यावर अतीव वेदना दिसली.
'तिच्या कारला एक भरधाव ट्रकने उडवलं..' तो पुढे म्हणाला, 'पन्नास मिटर फरफटत गेली गाडी तिची..दोन वर्ष..हाॕस्पिटलमधे मृत्युशी झुंझ देत होती. मेंदुत रक्तस्त्राव..ब्रेन हॕमरेज झाल होतं..तीन आॕपरेशन झाली..दोन वर्षे व्हेंटीलेटरवर होती..तिची जगण्याची जिद्दच शेवटी तिला मृत्युच्या दाढेतून परत घेउन आली..'
'ओह डिअर...ओह डिअर.. बिचारी..कसं सहन केल असेल'  ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.
तो प्रिया शेजारी खुर्चीत बसला. आपले हात सॕनिटायझरने साफ करुन त्याने तिच्या चेह-यावरुन  व केसांतून हलकेच हात फिरवला.
'आमचा साखरपुडा झाला होता..बाहेर लावला आहे  तो फोटो आमच्या साखरपुड्यातलाच..तिचे आई वडिल नासीकला असतात..त्यांना अजून दोन मुली आहेत प्रिया च्या पाठी..त्यांनी जेवढं करायच तेवढ खूप केलं..पण हे प्रियाचं शुद्धीत येण्याची वाट पाहणं आता त्यांना शक्य नव्हतं..मानसिक व आर्थिकदृष्ट्या देखील ते कोलमडले होते. मी त्यांची परवानगी घेउन हाॕस्पिटलमधून डिश्चार्ज घेण्याआधीच प्रियाशी रितसर लग्न केलं.. आणि तिला इथे घरी घेउन आलो..हाॕस्पिटल रुम प्रमाणे इथे सगळी सोय केलीय..एक नर्स असते बारा तास..सकाळी आठपासून स़ध्याकाळी आठपर्यंत..मग मी असतो तिच्याबरोबर...एकटाच..गप्पा मारतो तिच्याशी..पुस्तकं वाचून दाखवतो तिला..गाणी ऐकवतो..वेस्टर्न क्लासीकल तिला आवडतं..ते लावून ठेवतो दिवसभर तिच्यासाठी..'
त्याने तिच्याकडे पाहिलं..'मग तू म्हणतेस तसा मी एकटा कसा असेन? प्रिया चोवीस तास असते..माझ्याबरोबर..'
ती त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रु होते. 
त्याच्या समोर गुडघ्यावर बसली त्याचा हात धरत ती म्हणाली..
'हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल नसतं तर विश्वास बसला नसता. खरंच देव प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा मित्र, प्रियकर, नवरा का देत नाही रे. मी तुला आधी जे जे बोलले त्यासाठी खरंच मला माफ कर. माझी या घरात यायची लायकीही नाही रे..हे मंदिर आहे तुझं आणि प्रियाचं..कळायला लागलं तेंव्हापासून मी पुरुषांच्या डोळ्यात फक्त वासनाच पहात आलेय..मी विसरलेच होते की या जगात खरं प्रेमही अस्तित्वात आहे...सच्चं..निरपेक्ष..प्रेम.' 
डोळे पुसत व उठत ती म्हणाली 'थँक्स..ते असतं हे मला दाखवून दिल्याबद्दल..'
आपली बॕग घेउन ती निघाली...मागे वळून तिने प्रियाकडे पाहिलं.. 'तुझी हरकत नसेल तर कॕन आय किस हर वन्स?'
'हो..नक्कीच' म्हणत त्याने सॕनिटायझर तिच्या हाती दिला.
हात स्वच्छ करुन तिने प्रियाच्या हातांना स्पर्श केला. तिच्या थंड हातांमधेही तिला एक वेगळीच उब जाणवली. तिच्या माथ्याचं चुंबन घेउन ती निघण्यासाठी उठली. तिचे डोळे पुन्हा भरुन आले होते.
त्याने तिला सोसायटीच्या गेटबाहेर सोडलं. जाता जाता तो तिला म्हणाला 
'मला हे बोलायचा कदाचित अधिकार नाही..पण..मला वाटतं..तु एक चांगली मुलगी आहेस..खूप चांगली..' 
तिच्या हात हातात घेत तो पुढे म्हणाला,
'एखादा छान लाइफ पार्टनर बघ..हे सर्व आता करते आहेस ते सोडून देउन आयुष्य नव्याने सुरु कर. मला खात्री आहे..तू नक्की यशस्वी होशील..गुड लक !!'
तो निघून गेला. त्याने परत वळून पाहिलं नाही. जर पाहिल असत़ं तर त्याला ती दिसलं असती. त्या अपार्टमेंटसमोरच्या बाकावर बसलेली. हमसून हमसून रडत. एखाद्या लहान मुलीसारखी.

© सुनील गोबुरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...