गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2453. मोक्ष

    अजूनही ती थिजलेल्या मनाने त्या रांगेत उभी होती. तिच्यापुढे तिचा पती, दीर आणि जाऊ रांगेत होते. चहूबाजूला बर्फ पडत होता. थंड बोचरे वारे वाहत होते. पण आश्चर्य म्हणजे तरीही तिला थंडी वाजत नव्हती. नेहमी तर पुण्यात जरा थंडी पडली तरी तिला स्वेटर घालावा लागत असे. थंडी तिला अजिबात सहन होत नसे. तिला याच गोष्टीच राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आजूबाजूला बर्फ पडत असतानाही तिला अजिबात थंडी वाजत नव्हती. रांगेतून डोकावून तिने पुढच्या बाजूला पाहिले. तिच्यापुढे दहा-बारा लोक उभे होते. काही पुरुष तर काही स्त्रिया. ती रांग एका प्रशस्त टेबलापासून सुरू झाली होती. त्या टेबलाच्या मागे एक राजबिंडा देखणा पुरुष एका उच्चासनावर बसला होता. टेबलापुढे येणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तो त्याच्या पुढील जाडजूड पुस्तकाची पाने उलटत होता. त्यानंतर त्या व्यक्तीशी काहीतरी बोलल्यावर शेजारी उभे असलेले शिपाई त्या व्यक्तीला दुसरीकडे नेत होते. ती इकडे कशी आली हे काही केल्या तिला आठवत नव्हते. अस्वस्थपणे ती इकडे तिकडे बघत होती. अचानक तिच्या हाताकडे तिचे लक्ष गेले. हातावर रंगवलेल्या टॅटू कडे पाहत असताना तिला सारे काही आठवू लागले. 
हा टॅटू तर तिने दुबईमधील एका मॉलमध्ये काढून घेतला होता. अगदी काल-परवाचीच गोष्ट. ती, तिचा नवरा, दीर आणि जाऊ असे चौघे जण दुबईत सहलीसाठी गेले होते. कालच्याच फ्लाईटने ते परत भारतात येणार होते. मग आता आपण इथे या रांगेत कसे काय उभे आहोत? तिला प्रश्न पडला होता. विमानाने भारतात येण्यासाठी रात्री टेकऑफ केलेला तिला आठवत होत. त्यानंतर ती शांतपणे झोपी गेली होती. तासाभराने कसल्यातरी धक्क्याने तिला जाग आली. विमान गदागदा हलत होते. सर्व प्रवासी हवालदिल झाले होते. शेजारी बसलेल्या नवऱ्याचा हात नकळत तिने घट्ट धरून ठेवला. विमान वादळात सापडले होते. शक्तिशाली वारे विमानाला इकडे तिकडे भिरकावत होते. आणि शेवटी नको तेच घडले. त्यांचे विमान अरबी समुद्रात कोसळले.
       अचानक तिला सत्याची जाणीव झाली. ती मृत्यूनंतर कुठल्यातरी अनोळखी जागी आलेली होती. रांगेत तिच्यापुढे उभ्या असणाऱ्या नवऱ्याचा हात धरण्याचा तिने प्रयत्न केला पण तिला तो धरता आला नाही. ती जखडल्यासारखी जागीच उभी होती. त्याला हाक मारण्याचा तिने प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ही रांग कसली आहे? मेल्यानंतर चित्रगुप्ता पुढे सगळा लेखाजोखा होतो असे तिने जिवंत असताना वाचले होते. हा राजबिंडा पुरुष म्हणजे चित्रगुप्त असावा का? रांग हळूहळू पुढे सरकत होती तिच्यापुढे तिचा नवरा त्यापुढे दीर व जाऊ उभे होते.
 चौघांमध्ये पहिला नंबर जावेचा लागला. चित्रगुप्त आणि जावेमधील संवाद तिला स्पष्ट ऐकू आला.
"माझ्या डोळ्यात पहा. तुमची गेल्या जन्मातील सर्व पाप पुण्य दिसतील. त्यानुसार पुढचा जन्म तुम्हाला ओमान मधील मस्कत मध्ये मिळणार आहे. तुम्ही पुरुष डॉक्टर असाल आणि आयुष्य पंच्याऐशी वर्षे असेल." चित्रगुप्त म्हणाला. प्रतिवाद करण्याचा प्रश्नच नव्हता.
 चित्रगुप्ता शेजारील शिपायाबरोबर तिची जाऊ अज्ञात स्थळी जाण्यासाठी चालू लागली. अचानक तिच्या जावेने मागे वळून तिच्याकडे पाहिले. दोघींची नजरा नजर झाली जावेच्या नजरेतील अपराधी भावना तिला स्पष्ट दिसत होती. आयुष्यभर जावेनं  तिचा दुस्वास केला होता. जाऊ उच्चशिक्षित वकील, तर ही साधी कॉमर्स ग्रॅज्युएट.  पण हिला लाभलेलं अलौकिक सौंदर्य जावेला खूपत असे. संधी मिळेल तेव्हा तिचा अपमान करणं जावेनं कधीच सोडलं नव्हतं. अनेक वेळा ती कमालीची दुखावली गेली होती. जाऊ नजरेनच तिची माफी मागत होती. तिला खूप वाईट वाटलं. ही शेवटचीच भेट. पुढील जन्मात एकमेकांच्या सहवासात येण्याची शक्यता धूसर होती. तिने नजरेनच जावेला माफ केलं.
 दिराचा फैसला झाला आणि तिचा नवरा चित्रगुप्ता पुढे उभा राहिला.
"पुढचा जन्म अमेरिकेतील शिकागो शहरात. आयुष्य सत्तर वर्षे. त्यातील शेवटची तीस वर्षे तुरुंगात. या जन्मात अनेक निष्पाप लोकांची आर्थिक फसवणूक आणि बायकोशी केलेल्या प्रतारणेची  शिक्षा." चित्रगुप्त बोलायचा थांबला. तिचा नवरा मान खाली घालून शिपायाबरोबर जायला निघाला. नवऱ्याला मिळणाऱ्या अलोट पैशांचे रहस्य आणि लग्नानंतरही नवऱ्याचे बाहेर चालू असलेले प्रेम प्रकरण या दोन्ही गोष्टी आता या क्षणी तिला समजल्या होत्या.
"थांबा.. मी माफ करते माझ्या नवऱ्याला. प्लीज त्यांना एवढी कठोर शिक्षा नका देऊ." क्षणाचाही विलंब न करता तिने ओरडून चित्रगुप्ताला सांगण्याचा प्रयत्न केला. चित्रगुप्ताला तिचे म्हणणे ऐकू गेले की नाही ते तिला कळले नाही पण नवऱ्याने दिलेला हुंदका तिला स्पष्ट दिसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले व नकळत त्याचे हात जोडले गेलेले तिने पाहिले. तिचा नंबर आला होता. ती चित्रगुप्ता पुढे उत्सुकतेने उभी राहिली.  तिच्याकडे पाहून चित्रगुप्त छानपैकी हसला. 
"तुझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीबरोबर आता यापुढे तुला राहायचे आहे. तो बघ तिकडून रथ येतोय. त्यात आहे ती व्यक्ती." बोट दाखवत चित्रगुप्त म्हणाला. तिने वळून पाहिले. सुंदर सजवलेल्या रथातून तिचे मित्र मैत्रिणी तिला हात दाखवत होते. अत्यानंदाने तिने रथाकडे धाव घेतली. रथात चढल्यावर मात्र तिने आश्चर्याने त्या सर्वांकडे पहात विचारले,
"तुम्ही सगळे येथे कसे ? माझा तर विमान अपघात झाला होता ..." 
कोणीतरी मोठ्याने हसले. मित्र-मैत्रिणींच्या मागे सीटवर आरामात टेकून बसलेल्या त्याला पाहिल्यावर ती हरखून गेली. तो तिचा प्राणप्रिय सखा तिच्याकडे बघून अल्लडपणे हसत होता.
"अग वेडे मीच तर होतो या सगळ्यांच्या रूपात. मीच तर असतो या विश्वातील प्रत्येक चांगल्या गोष्टीत. चल आता तुला कायम माझ्यासोबतच राहायचे आहे वृंदावनात." 
     तिच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आयुष्यभर निरपेक्ष भावनेने केलेली भक्ती फलद्रूप झाली होती. अत्यानंदाने तिने त्याला मिठीत घेण्यासाठी हात पसरले. मोक्ष म्हणजे काय या गहन प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...