“अरे, जिच्यासोबत मी सोळा वर्षे संसार केला ती माझी होऊ शकली नाही. तिला मी पूर्ण समजलो नाही. आता येणारी तर एकदम नवीन असणार. तिला मी काय समजू शकणार?” आभाळाकडे नजर लावून सूरज उदास मनाने बोलत होता. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. त्याची पत्नी जाऊन आज तीन वर्षे झाली होती. ती जिवंत असताना दोघांचे कधीही पटले नाही. सगळा संसार ओढून ताणूनच सुरू होता. सूरज कधीतरी नंदूकडे यायचा. सगळ्या गोष्टी सांगायचा. मनातल्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी सांगण्याचं त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नंदू. अगदी बालवयापासूनच दोघांची मैत्री.
गावाबाहेर भैरवीच्या टेकडाजवळ हायवेला लागून ज्योतिर्लिंग चहा सेंटर होतं. पत्र्याचे शेड टाकून तिथेच चार प्लास्टिकच्या खुर्च्या टाकलेल्या होत्या. हायवेचे काम सुरू झाल्यावर गावातील केरबाने ही टपरी टाकलेली होती. नंतर त्याचं रूपांतर “ज्योतिर्लिंग चहा सेंटर” मध्ये झालं. नंदू आणि सूरज नेहमी इथेच बसायला यायचे.
नंदू म्हणाला, “तरीपण सूरज तू फेरविचार करायला हवास. पूर्वीचं झालं गेलं विसरून जायला हवं. नव्या जिंदगीला सुरुवात करायला हवी. असं कोरडेपणाने कुठपर्यंत जगणार आहेस?” चहा पिऊन झालेल्या रिकाम्या कपावर सूरज टिकटिक वाजवत होता. तो खूप खोलवर विचाराच्या तंद्रीत होता. नंदूचं बोलणं तो शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची उदासीनता पसरली होती. त्याला पराकोटीचा थकवा आला होता. आता कोणताच संवाद त्याला नको होता. तरी पण तो अशक्त आवाजात म्हणाला, “तुला खरं सांगू का? माणुसकी आणि जीवनावरूनच माझा विश्वास उडाला आहे. आपण का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे प्रश्न तर मला सुरुवातीपासूनच पडायचे. जगण्याचे प्रयोजन आजपर्यंत सापडलेले नाही. ज्या प्रेमासाठी आपण रात्रंदिवस राबतो ते प्रेम ही मला उमगलं नाही. कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील. कदाचित माझं थोडंफार चुकीचं असू शकेल. परंतु समजून घेणारं मला कोणी भेटलं नाही. जी भेटली होती ती तशी…”
सूरज प्रचंड निराश झाला होता. तो बोलत होता तेही खरं होतं. खरं म्हणजे त्यांच्या संसारामध्ये दुःखाचं काहीही कारण नव्हतं. कोणतंही असं मोठं संकट आलं नव्हतं. गरीबीचा किंवा पैशा-अडक्याचा सुद्धा प्रश्न नव्हता. खाऊन पिऊन सुखी असणारा तो परिवार होता. परंतु काही केल्या दोघांची वेव्हलेंथ जुळत नव्हती. सूरज असा वक्तशीरपणा जपणारा. काटेकोर स्वभावाचा. पूर्ण डिसिप्लिन. पण या उलट कामिनीचं होतं. ती कधीच कोणत्या गोष्टी गांभीर्याने घेत नव्हती. आपण जिंदगी मनसोक्त जगण्यासाठी जन्माला आलो आहे असंच ती म्हणायची. तिला दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं कधीच वाटत नव्हतं.
कामिनी आयटी कंपनीत जॉब करत होती. महिन्याला ऐंशी हजार रुपये कमवत होती. सूरजला ती नेहमी म्हणायची, “माझं संपूर्ण शिक्षण माझ्या आई-वडिलांनी केलं आहे. मला जो जॉब लागला आहे तोही त्यांच्यामुळेच लागला आहे. त्यामुळे माझ्या पगारावर केवळ आणि केवळ माझा अधिकार आहे. त्या पैशाचं काय करायचं, काय नाही ते मी ठरवणार. मला माझ्या पगाराबाबत कोणीही विचारलेलं आवडत नाही.”
सूरज म्हणाला, “तुझ्या पगारातला एक रुपया सुद्धा आम्हाला नको आहे. परंतु बाबांचं म्हणणं आहे की आपलं कुटुंब हे ‘एकत्र कुटुंब’ आहे. त्यामुळे येणारा सगळा पगार आणि त्याचा हिशेब घरी द्यायला हवा. मीही माझा संपूर्ण हिशेब घरी देत असतो. केवळ कुटुंब प्रमुख म्हणून बाबांना या गोष्टी हव्या असतात. त्यांनी कधी आपल्याकडून रुपयची अपेक्षा केलेली नाही.”
“पण मी हिशेब का द्यायचा? मी कष्ट करते. मी पैसे मिळवते. माझ्या पगाराचा हिशेब मागणारे तुम्ही कोण? मला पूर्ण शिक्षण देऊन, जॉब लावला तरी आई-वडिलांनी कधी हिशेब विचारला नाही. तुम्ही मात्र दर महिन्याला मला हिशेब विचारत राहता.”
सूरज म्हणाला, “तू पण मला दर पगाराला विचारतेस. मी माझा सर्व हिशेब तुझ्याकडेच देत असतो. माझे एटीएम कार्ड तुझ्याकडेच आहे. मी कधी तक्रार केली का? आई बाबा तर केवळ हिशेब विचारतात. तुझ्याकडे पन्नास लाख शिल्लक असले तरी त्यातले पन्नास रुपये सुद्धा कोणी मागत नाही. तुम्ही मिळवताय. तुम्ही तुमच्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी बचत करा. हेच त्यांचं सांगणं असतंय. काय चुकतंय त्यांचं?”
“मला माझ्या पगाराबाबत कोणीही विचारलेलं चालणार नाही. बस्. या पलीकडे मला काही बोलायचे नाही.”
“आता तंद्रीतून बाहेर या. दिवस मावळायला गेला आहे. उर्वरित भागावर उद्या चर्चा करूया.” नंदू हसत हसत म्हणाला. त्याने चहाचे बिल भागवले. नंतर सूरज जवळ येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली. उठून दोघेही गावाकडे जाण्याच्या रस्त्याला लागले.
सायंकाळ व्हायला आली होती. सगळीकडे हळूहळू अंधार पसरू लागला होता. नंदू आणि सूरज गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत जात होते. घरात कुणीच नव्हतं. सूरजची आई पाच-सहा दिवसांपूर्वीच तिर्थयात्रेला गेली होती. ती बिचारी मुलाच्या भविष्याच्या काळजीने खंगली होती. एकुलता एक पोरगा. तीन-चार वर्षांपूर्वी बाप ही अचानक निघून गेला. सुनेचं वागणं त्यांना पसंत नव्हतं. मुलाच्या आयुष्याचं कसं होणार या काळजीने त्यांना मधुमेह झाला होता. रक्तदाब तर अगोदरच वाढला होता. एके दिवशी निमित्त फक्त तापाचं झालं. दोन दिवस स्वानंद हॉस्पिटलला ऍडमिट केलं. तिसऱ्या दिवशी गावाकडे प्रेतच आलं. घर ओसाड पडलं.
सूरजने घराचे कुलूप काढले. दरवाजा उघडून तो आत गेला. उजव्या बाजूला त्याची प्रशस्त बेडरूम होती. तिकडे नजर गेल्यावर त्याला आठवलं. वीस बाय वीसची बेडरूम नको म्हणत असताना बाबा म्हणाले, “पुढे मुलं झाल्यानंतर ही सुद्धा अपुरी पडणार आहे. त्यांना चालता येईपर्यंत व्यवस्थित खेळता यायला हवं.” बेडरूम करतानाच बाबांनी अशी भव्य दिव्य केली होती. आपली नातवंडे मनसोक्त खेळली पाहिजे. सुसंस्कारित निपजली पाहिजेत. अशिषची दुसरी पिढी स्वाभिमानी बनली पाहिजे. कसली कसली स्वप्नं पाहिली होती बाबांनी.
पण दुर्दैव हे की सुट्टीच्या दिवशी पुण्याहून ज्या-ज्या वेळी कामिनी आणि सूरज गावाकडे आली त्या-त्या वेळी कामिनी गावाकडे कधीच थांबली नाही. एक दिवस जीवावर उदार होऊन मुक्काम केला की लगेच आई-वडिलांच्याकडे जात असे. तिथे मात्र ती चार चार दिवस रहात असे. परत ड्युटीवर जात असताना तिथूनच जात असे.
सूरजच्या दोन्ही मुलांना आजी आजोबांचा लळाच लागू शकला नाही. कामिनीने जाणीवपूर्वक तो लावून घेतला नाही. एके दिवशी सूरजने तिला समजावून सांगितले. म्हणाला, “मुलं आजी-आजोबा सोबत लहानाची मोठी झाली तर त्यांच्यावर संस्कार चांगले होतात. त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आपणास विचार करावा लागेल. गावी गेलो की मुलं गावीच खेळलेली बरी.”
त्यावर संतापाने कामिनीने डोळे वटारले. म्हणाली, “इथे आज्जी-आजोबा आहेत आणि तिकडे कोण आहे? तिकडे आजी-आजोबा नाहीत? का ते संस्कार करू शकत नाहीत? तुम्हाला तुमच्या आई बापाचं कौतुक वाटत असेल. परंतु आतून ती कशी आहेत हे मलाच माहित आहे. माझ्या मुलांच्यावर त्यांची सावली सुद्धा पडता कामा नये कामा नये.”
सूरजचा संयमच तुटला. वाटलं उठावं आणि दोन तडाके लावावेत. परंतु ते त्याच्या संस्कारामध्ये बसत नव्हतं. तो गप्प बसला. रात्रभर तळमळत राहिला. इतक्या हेकट स्वभावाची बायको आपल्याला मिळाली याचा त्याला पश्चाताप वाटू लागला.
बेडरूमकडे पाहत तो तसाच किचनमध्ये गेला. गॅस पेटवला. पातेल्यामध्ये रात्रीसाठी भात टाकला. पुण्याला तो कधीकधी स्वतः स्वयंपाक करायचा. त्याला बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता. हँगरचा टॉवेल काढून तो बाथरूम मध्ये गेला. थोड्याच वेळात फ्रेश होऊन बाहेरच्या कोचवर निवांत बसला.
आई सात दिवसांकरिता तीर्थयात्रेला गेली होती. घरी सूरज एकटाच होता. एकटा असला की घर खायला उठतं. दिवसभर नंदू बरोबर वेळ जात होता. पण रात्र झाली की अंगावर काटा यायचा. खरं म्हणजे आता भीतीचं कारण नव्हतं. परंतु पूर्वी झालेले वाद, नवरा बायकोचे भांडण आणि एकमेकांना दिलेली शिवीगाळ हे काही केल्या त्याच्या लक्षातून जात नव्हते.
कुकरची शिट्टी वाजताच तो उठला. गॅस कमी केला. पुन्हा कोचकडे परतला. समोरचा टीव्ही बंद करून तो तसाच पडून राहिला. तो छताकडे पाहत विचार करीत राहिला. दोन्ही मुलांना तिने फक्त आई-वडिलांपासून तोडलं नाही, तर माझ्यापासूनही तोडलं. घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर कामिनीने डायरेक्ट कोर्टाला प्रश्न विचारला होता. “साहेब, माझे शिक्षण माझ्या आई-वडिलांनी पूर्ण केलं. मला त्यांनीच जॉब लावला. नंतर माझं लग्न झालं. त्यामुळे माझ्या येणाऱ्या पगारावर माझाच पूर्ण अधिकार आहे. तरीही सासरची माणसे मला हिशोब विचारत राहिली. मी अजिबात दिला नाही. माझं काय चुकलं सांगा साहेब. माझ्या पगारावर माझा पुर्ण अधिकार आहे की नाही?”
न्यायालयात कोर्टाने सांगितले, “तुम्ही तुमच्या वकिलांशी चर्चा करा. त्यातून तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा.”
कोर्ट हॉलच्या बाहेर आल्यानंतर वकिलांनी तिला समजावून सांगितले. वकील म्हणाले, “आपल्या हिन्दू धर्मामध्ये लग्न म्हणजे पवित्र बंधन असते. एकदा लग्न झाले की आई बाप, भाऊ-बहीण या सर्वांशी तुमचा संबंध तुटला. तुमचे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव हे सुद्धा राहत नाही. हे सर्व सासरचेच लावावे लागते. आंतरजातीय लग्न असेल तर ज्याच्या बरोबर लग्न केले जाते, त्याची जात तुम्हाला चिकटते. त्यामुळे लग्नानंतर तुम्ही स्वतः आणि तुमची जी काही मिळकत आहे त्या सर्वावर अप्रत्यक्षपणे सासरचा अधिकार राहतो. सासरच्या मिळकतीमध्ये तुम्हाला हिस्सा मिळतो. परंतु पती जिवंत असेपर्यंत त्याबाबतही कुठे खटला दाखल करता येत नाही. कारण नवरा आणि बायको हे दोन्ही एकच आहेत असे कायदा मानतो.”
कामिनी म्हणाली, “म्हणजे माझ्या पगारावर सासरच्या लोकांचा अधिकार आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?”
वकील म्हणाले, “तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या आहेत. तुम्ही जो अर्थ काढणार आहात तो काढा.”
कुठल्याच बाबतीमध्ये ती मागे हटायला तयार नव्हती. तिचा पगार म्हणजेच तिला सर्वस्व वाटत होतं. कोर्टापुढे प्रकरण मिटवण्यासाठी आले तेव्हा कोर्टाने सांगितले, “मुलाच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. दोन मुलं झाली आहेत. आता घटस्फोट घेऊन काय करणार आहात?”
कामिनी म्हणाली, “साहेब मी महिन्याला ऐंशी हजार रुपये मिळवते. मला माझी दोन मुलं जड नाहीत. मी त्यांचं भवितव्य उज्वल बनवू शकते. शिवाय मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. मला कुणाच्या टेकूची गरज नाही. मला माझ्या आई वडिलांनी स्वाभिमानाने राहायला शिकवले आहे. त्यामुळे या केसमध्ये मी कदापी तडजोड करणार नाही. माघारी तर अजिबात घेणार नाही. मला घटस्फोट हवा आहे. राहता राहिली मुलांची जबाबदारी. दोन्हीही मुलं सासरमध्ये जगू शकणार नाहीत. त्या दोन्ही मुलांची मी जबाबदारी घेत आहे. मी तसे लिहून देते. यापुढे मला तिकडे जायचे नाही.”
सूरज म्हणाला, “इतकी भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. विचार करण्यासाठी अजून थोडा कालावधी घे. आपण ज्या मार्गाने निघालो आहे तो मार्ग अत्यंत विषारी आहे. आपण दोन जीव जन्माला घातले आहेत. तुझ्या पगाराचा हिशेब आणि तू मिळवतेस तो पैसा याचा विषय आता कधीच संपला आहे. तुला घरातील नव्हे मी सुद्धा विचारणार नाही. गेली दहा वर्षे मी तुला कधी विचारले नाही. आता काय विचारणार आहे? तू किती कमवतेस? किती खर्च करतेस? याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. परंतु आपण आत्तापर्यंत एकत्र राहिलो. आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच राहूया ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. केवळ तुला पैसा मिळतो म्हणून भरलेला संसार मोडणे योग्य नाही. अजून विचार कर.”
कामिनी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. अत्यंत क्रूर चेहऱ्याने तिने पेपरवर सह्या केल्या. तो पेपर वकिलांच्याकडे देत वकिलांना म्हणाली, “साहेब तुम्ही तुमचे काम पुढे चालू ठेवा. आपल्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.” तिने सूरजकडे पाहिले सुद्धा नाही. सूरजकडे पाठ करून ती कोर्टाबाहेर ताडताड चालत गेली.
सूरजच्या वकिलांनी सूरजला सांगितले, “आता कोणताच इलाज नाही. ज्या काही घटना घडत आहेत त्या तुम्ही स्वीकारायला शिका. एखाद्या व्यक्तीला आपण समजावू शकतो. परंतु समजावून घेण्याची इच्छाच नसेल तर तेथे प्रश्न मिटतो. तुम्ही आता शांतपणे निर्णय घ्यायला हवा.”
सूरजने गपचूप पेपरवर सह्या केल्या. शांतपणे तो कोर्टाच्या बाहेर पडला.
सायंकाळचे पाच वाजून गेले होते. रस्त्यावर रहदारी वाढली होती. दिवसभर ड्युटी करून थकलेले कर्मचारी आपापल्या घराकडे निघाले होते. सूरज मात्र भकास चेहऱ्याने गाडी चालवत होता.
घरी आल्यावर जवळजवळ तो कोसळलाच. आई पळत आली. आईने विचारले, “काय काय झाले? आज कोर्टामध्ये प्रकरण मिटवणार होते ना? मिटले का प्रकरण?” त्याने आईला जवळ घेतले. तिचा हात हातात घेतला. म्हणाला, “तिने सोडचिठ्ठी घेतली.”
आई काहीच न बोलता पुन्हा स्वयंपाक घरात गेली.
त्यादिवशी रात्री त्याला झोप अशी लागली नाही. इतकी समजूत घालून सुद्धा कामिनीने ऐकले नाही, याचा अर्थ तिला फक्त निमित्त हवे होते. तिला तिच्या नोकरीचा आणि पैशाचा भयंकर गर्व होता. ती म्हणेल त्या पद्धतीने शेवटी आम्ही सर्वजण चालत राहिलो. दोन्ही मुलं इकडची राहिलीच नाहीत. ती एक तर कामिनी किंवा त्यांचे आजी-आजोबा यांच्याकडेच लहानाची मोठी होऊ लागली. तरीही आईने किंवा बाबांनी कधी तक्रार केली नाही. बाबा तर नेहमी म्हणायचे, “तुम्ही दोघे सुखी राहा. आमचं काय? झालं गेलं. परंतु तुमच्यातली तक्रार आमच्या कानावर आली की आमचा जीव तीळ तीळ तुटत राहतो. कृपा करून तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आनंदी राहा. समाधानाने राहा. तुमच्या दोघांच्या कमईमधला आम्हाला एक रुपया देऊ नका. परंतु भांडत एवढं बसू नका. आमची एवढी तुम्हा दोघांना कळकळीची विनंती आहे.”
सकाळी दारावरची टकटक ऐकून सूरज जागा झाला. त्याने झटकन पांघरून बाजूला सारले. घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजले होते. खिडकीतून उन्हाची तिरीप आत आली होती. एवढ्या लवकर कोण आलं असेल याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला. दारात आई आणि मित्र नंदू उभा होते.
नंदू म्हणाला, “झोप झाली नाही वाटतं. किती उशीर दरवाजा वाजवतोय. तरी जागा झाला नाहीस.” सूरज डोळे चोळत चोळत म्हणाला, “रात्री झोपायला खूप उशीर झाला.”
आईकडे पाहत म्हणाला, “तू कधी आलीस? नंदूची गाठ कुठे पडली?”
आई म्हणाली, “मी पहाटेच आले आहे. परंतु अगोदर नंदूकडे गेली. तिथे चहा नाश्ता झाला. नंतर आपल्या घरी आली. तू आंघोळ करून घे पटकन. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे.”
बाथरूमकडे जाता जाता सूरज म्हणाला, “माझ्या लग्नाचा विषय सोडून दुसरं महत्त्वाचं काय आहे? तोच विषय असणार आहे.”
सूरज आंघोळ करीत होता तोपर्यंत आईने सर्वांसाठी कॉफी बनवली. गरम काॅफीचे कप घेऊन ती हॉलमध्ये आली. इतक्यात आंघोळ आटोपून सूरज सुद्धा आला. कोचवर बसताना सूरज म्हणाला, “बोला काय महत्वाचं बोलायचं आहे.”
कॉफीचा घोट घेता घेता नंदू म्हणाला, “काल आपण दोघे बोलत बसलो होतो. तू लग्न करणार नाहीस असा निर्णय घेतला आहेस, तो तुला बदलावा लागणार आहे. आई तीर्थयात्रेला गेली नव्हती. ती तुझ्या चुलत मामाच्या गावी गेली होती. चुलत मामाची मुलगी सुद्धा घटस्फोटीत आहे. तिच्याबद्दल साकडे घालण्यासाठी आई गेली होती. त्या मुलीला तू पसंत आहेस. तिची काही चुकी नसताना तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले आहे. तिचा सर्व इतिहास तुला माहिती आहे. आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. आईने त्यांना आपली सर्व सत्य परिस्थिती सांगितली आहे. तिचे आई वडील तयार झाले आहेत. मुलगीने तर स्पष्टपणे होकार दिला आहे. आता तू विचार करायचा आहेस.”
सूरज खाली मान घालून सर्व काही ऐकत होता. तो काहीच बोलत नव्हता. आई त्याच्याकडे पाहत होती. नंदू पुन्हा म्हणाला, “सूरज, एक वस्तू खराब लागली म्हणून संपूर्ण मार्केट खराब नसते. तुला कामिनी तशी भेटली म्हणून उषा पण तशीच असेल हा विचार डोक्यातून काढून टाक. तुझी किंमत तिला कळाली नाही. यात तुझा काय दोष? ती तिच्या पैशावर प्रेम करत राहिली. तू तिच्यावर जीव ओवाळून टाकत होतास. परंतु तिला या सर्व गोष्टी समजल्या नाहीत. तिच्या आकलनाच्या पलीकडच्या या गोष्टी होत्या. तिचा तरी शेवट कुठे चांगला झाला? दोन मुले पदरात असताना ती अचानक गेली. तिचा मृत्यू संशयास्पद आहे. अजूनही तिच्या मृत्यूचा आणि शरीराचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्याची कारणेही समजलेली नाहीत. ते जाऊ दे. शेवटी तुझ्यासाठी राहू दे, पण तुझ्या आईसाठी तरी तुला निर्णय घ्यावाच लागेल.”
सूरज मनातल्या मनात विचार करत होता. चुलत मामाची मुलगी ‘उषा’ बीकॉम झाली होती. शाळेत आणि कॉलेजमध्ये ती अत्यंत हुशार होती. परंतु पैशाच्या पाठीमागे लागून मामाने तिला चुकीच्या ठिकाणी दिली. तिला त्या घरामध्ये काडीची किंमत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे नवऱ्याचे बाहेर संबंध होते. या सर्व गोष्टीचा शेवट त्यांच्या घटस्फोटात झाला. त्यानंतर उषा त्या घरी गेली नाही. घटस्फोट होऊन चार वर्षे झाली होती. परंतु नारोबाची उषा म्हटलं की सुसंस्कारीत मुलगी अशीच तिची प्रतिमा होती.
सूरजला वाटले, आपण तरी आपली जिंदगी का जाळून घ्यायची? कामिनी आयुष्यात आली. तिने काही दिवस संसार केला. त्यानंतर तिने बदला घेण्यासाठीच आयुष्य घालवले. आपण सगळे सोसत राहिलो. याचा अर्थ इथून पुढची जिंदगी आपण अशीच बरबाद करावी असा होत नाही. आपण आता निर्णय घ्यायला हवा. नंदू म्हणतोय ते अगदी खरं आहे. आईसाठी का होईना पण तो निर्णय घ्यायला हवा. उषा समजूतदार आहे. समंजस आहे. शिवाय तिलाही अत्यंत कटू अनुभव आला आहे. दोघेही समदुःखी आहोत. होकार द्यायला काय हरकत आहे?
सूरजचा चेहरा उजळला. झालं गेलं विसरून तो नव्या जीवनाची स्वप्ने पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नाजूक हास्य उमलले. नंदूने पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर जोराची थाप मारली. म्हणाला, “सूरज कसला गहन विचार करायलायस? विचार करण्यासारखं यात काय आहे? तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. अजून चार-पाच वर्षे थांबलास तर पुन्हा आयुष्यात लग्न होणार नाही. आता संधी चालून आली आहे. तुला कामिनी NO म्हणाली. NO चा अर्थ नेक्स्ट वन असा असतो. आईने तुझ्यासाठी चार-पाच दिवस घालवले. खरं म्हटलं तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती अशीच तळमळत आहे. पण शेवटी बिचारीने चुलत भावाकडून शब्द आणला. आता तू आणखी कसला विचार करणार आहेस?”
सूरज उठला. त्याने नंदूला आणि आईला जवळ घेतले. म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय म्हणून नव्हे, परंतु माझ्या व आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने मला निर्णय घ्यावा लागणार आहे.”
आईकडे पाहून तो म्हणाला, “मामाला फोन कर. मी लग्नाला तयार आहे म्हणून सांग…!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा