मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2479. चटका

     "हल्ली रात्रीची झोपच लागत नाहीये रे. प्रचंड प्रखर असा प्रकाश तोंडावर पडल्यासारखा भासतो. अगदी चटका लागतो. पण दचकून डोळे उघडले की मात्र, आजूबाजूला मिट्ट काळोख असतो. मग काय करा झोपेची आराधना. आणि पुन्हा डोळे मिटतायत ना मिटतायत, तर फिरून तोच अनुभव. अगदी तस्साच चटका पुन्हा."
त्याची आई हतबल होत, त्याला हे सांगत होती. तिच्या बाबतीत घडणारा हा प्रकार.
"मानसिक असेल गं सगळं. असं कसं शक्य आहे. स्वप्न वगैरे पडत असेल तुला. 'Recurring Dream' म्हणतात ह्या प्रकाराला. आपल्याला एकच गोष्ट, सतत स्वप्नात दिसत राहते. हे सगळे मनाचे खेळ असतात अगं. तू रिलॅक्स रहा. शांत चित्ताने झोपत जा."
त्याने असा एक मोघम सल्ला, दिला खरा त्याच्या आईला... पण आईच्या डोळ्यांखालची गडद झालेली काळी वर्तुळं पाहून, तो ही जरा अस्वस्थ झालेला खरा.
बाबा गेल्यावर हट्टाने एकट्याने राहणाऱ्या आईला... त्याने चारेक दिवस माझ्याकडे येऊन रहा, असंही सांगून पाहिलं... ती अजिबात ऐकणार नाही हे माहीत असूनही. आणि आईकडून अपेक्षित नकार ऐकून, मग त्यानेच ठरवलं होतं... आपणच आता दोन दिवस आईसोबत यावं रहायला. म्हणजे आपल्याला बघता तरी येईल की, नेमकं काय होतंय आईला... हे असं रात्रीचं.
ठरल्याप्रमाणे मग तो आला आईसोबत रहायला. साडेदहाच्या सुमारास आईच्या वक्तशीरपणानुसार सगळं आवरलं जाऊन, नीजानीज झाली. तो मुद्दामहून जागाच राहिला होता... आणि आईकडे लक्ष ठेऊन होता, तोपर्यंत अंधाराला सरावलेल्या डोळ्यांनी. आई शांतपणे झोपली होती.
पण... साधारण बाराच्या सुमारास, त्याची आई एकदम विव्हळली. त्याने लगेचच त्याच्या मोबाइलचा लाईट धरला आईच्या तोंडावर... नी त्याला दिसली त्याची आई तोंडावर उपडा हात ठेऊन, अस्वस्थ होत कण्हतांना. त्याने पटकन उठत दिवा लावला, आणि आईपाशी गेला तो. तिच्या कपाळावर हात ठेवला त्याने... पण चांगलाच चटका बसून, पटकन हात मागे घ्यावा लागला त्याला. एव्हाना आई सुद्धा उठून बसली होती. त्याने मात्र आईला त्याला बसलेल्या चटक्याबद्दल काही कळून न देता, पाणी आणून दिलं तिला. पुढली अख्खी रात्र मग दोघेही जागेच होते... आई रोजच्या सवयीने, आणि तो आईच्या काळजीने.
पहाटेच्या सुमारास त्याला जराशी झोप लागली... आणि खाड्डकन डोळे उघडले त्याचे, त्यांची कुलदेवता स्वप्नात येऊन. अत्यंत तेजस्वी अशा रूपात दिसली होती त्याला कुलदेवता. तो ताडकन्न उठून बसला गादीवर, आणि त्याने पलंगावर नीजलेल्या आपल्या आईकडे पाहिलं. अतिशय शांतपणे झोप लागलेली दिसत होती आता आईला. तो मात्र प्रचंड अस्वस्थ झाला होता. देवीचं इतकं प्रकाशमान रूप, ह्या आधी कधीच असं स्वप्नात आलं नव्हतं त्याच्या. त्याने वेळ पाहिली तर, सकाळचे सव्वा सहा झाले होते.
काहीतरी सुचून त्याने तातडीने फोन लावला त्याच्या बायकोला, आणि विचारलं... "काल रात्री नेमकं किती वाजता किचनमधलं सगळं आवरून, ट्यूबलाईट बंद केली होतीस तू?... आणि आज सकाळी पुन्हा किती वाजता लावली होतीस?". बायको काम करता करताच म्हणाली... "अरे नेहमीप्रमाणेच... साधारण रात्री बाराच्या सुमारास बंद केली ट्यूब, आणि आज आत्ता सकाळी सहा वाजता मुलांच्या टिफिनच्या तयारीसाठी लावली". त्याने ठीकेय म्हणत घाईतच फोन ठेवला.
आता तो आईच्या, आपणहून झोप चाळवण्याची वाट पाहू लागला. साडे सातच्या दरम्यान आईला जाग आली. पलंगावरून उठत, ती उतरून चालू लागणार... तोच त्याने तिला अडवलं. आईला पुन्हा हळूवारपणे पलंगावर बसवत, विचारलं त्याने... "हा असा अचानक चेहरा भाजल्यासारखा वाटण्याचा, नी नंतर रात्रभर झोप न लागण्याचा प्रकार... नेमका कधीपासून सुरु झालाय?". आईने तत्परतेने सांगितलं... "साधारण दिवाळी आटोपल्यानंतर लगेचच". त्याने पुढे विचारलं आईला... "साधारण किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत, हा असा अस्वस्थपणा जाणवत असतो". आईने ठामपणे सांगितलं... "रात्री बारा ते सकाळी सहा... पण पुढे दिडेक तास मात्र, मला शांत झोप लागते".
आईकडून हे ऐकून, खरंतर तो हादरलाच होता... पण तसं चेहऱ्यावर काहीही न दाखवता, शक्य तितका चेहरा कोरा ठेवला त्याने. मनातल्या मनात मात्र, त्याने त्याच्या आईला खात्री दिली होती की... ह्यापुढे तिला हा असला त्रास, कधीच होणार नाही.
त्यानंतर आलेल्या रात्री, तो मग पुन्हा जागा राहिला... आईकडे लक्ष ठेऊन, तिला कळणार नाही अशा बेताने. आई छान झोपली होती. रात्रीचे बारा वाजू लागले, तसा अस्वस्थ होऊ लागला तो... आणि कुलदेवतेचं स्मरण करू लागला. बारा वाजले... वाजून गेले... साडे बारा झाले. त्याची आई अजूनही शांतपणे झोपली होती, अजिबात कुठलाही त्रास न होता. प्रचंड आनंदला तो. जागचं उठत, देव्हाऱ्यापाशी जात... त्याने कुलदेवतेला मनोभावे हात जोडले. पुन्हा आत येत, त्याने आईच्या अंगावर पांघरूण ओढलं... नी कपाळाला हात लावून पाहिला तिच्या. व्यवस्थित नॉर्मल होतं कपाळ आईचं. मनोमन सुखावला तो, आणि झोपी गेला तो ही.
आदल्या दिवशी जेव्हा त्याला कळलं होतं की... आईबाबतीत हा प्रकार, दिवाळीनंतर सुरु झालाय... आणि अचूक रात्री बारा ते सकाळी सहा ह्या वेळेतच हा घडतोय, तेव्हाच त्याच्या लक्षात आलं होतं ह्यामागचं नेमकं कारण. अर्थात ते कारण त्यांच्या कुलदेवतेनेच ध्यानात आणून दिलं होतं त्याच्या, स्वप्नात अत्यंत तेजोमय रूपात येऊन दर्शन देत.
झालं होतं असं की... दिवाळी दरम्यानच कधीतरी त्याच्या घरामधील देव्हाऱ्यातील, झिरो पॉवरचा दिवा गेला होता... आणि सणासुदीच्या गडबडीत, तो नवा आणायचा त्याच्याकडून राहून गेला होता. तेवढ्यात दिवाळी संपली म्हणून त्याने कंदील, माळा आवरल्या... नी त्यावेळी कंदीलातील थर्टी पॉवरचा दिवा, अगदी अंधार नको म्हणून तात्पुरता देव्हाऱ्यात लावला. रात्री बारा वाजता जेव्हा त्याच्या बायकोचं किचन मधलं काम आटपे... तेव्हा ती ट्यूब बंद करून, तो दिवा चालू करत असे. रात्रभर तो दिवा चालूच राही मग. सकाळी सहा वाजता किचनमध्ये आल्यावर... तो दिवा बंद करून, पुन्हा ट्यूब लावत असे त्याची बायको. तो पेटता दिवा, बरोब्बर त्यांच्या कुलदेवतेच्या फोटोतील चेहऱ्याजवळच येत असे. आणि हेच त्याच्या लक्षात येऊन, त्याने काल दुपारीच बायकोला फोन करून सांगितलेलं... ह्यापुढे रात्री तो देव्हाऱ्यातील दिवा अजिबात न लावण्याबद्दल. आणि त्याचा हा अंदाज बिनचूक ठरला होता. जवळपास दिडेक महिन्यानंतर, त्याची आई त्या रात्री शांतपणे नीजू शकली होती. हे त्याला सुचलेलं, वा त्याला सुचायला भाग पाडलेलं... त्याने मात्र ना आईला सांगितलेलं, ना बायकोला. आपली श्रद्धा दुसऱ्या कोणासाठी अंधश्रद्धा ठरू शकते... आणि हे उगीच कोणाच्या गळी उतरवायला जाण्याची गरजही नसते, हे चांगलं जाणून होता तो. पुन्हा हात जोडले त्याने कुलदेवतेला, आणि आईकडे पाहिलं त्याने.
खूपच साम्य दिसत होतं त्याला आता... त्याच्या आईच्या, आणि त्यांच्या कुलदेवतेच्या चेहऱ्यांत.

- सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...