थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला, मंदे, अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.
विद्याताईंनी घाई घाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले कविराज, फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले.
गदिमांना अंगात दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून, पपा आजोबा बोलत कां नाहीत' म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते सर्वजण का जमलेत?, ताईआजी कां घाबरली आहे? डॉक्टर काय करत आहेत ?
इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले, मला काही करू नका. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली.
तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना ( शिवपुरी,अक्कलकोट ) जोरात हाक मारली, महाराज, मला आता सोडवा, त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले.
अखेर संध्याकाळी पावणेसात च्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.
सकाळचाच प्रसंग बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता. बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ, दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.
फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता बनुताईचां प. महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली,
बनुताईंसमोर ही बातमी सांगता येत नव्हती पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या त्यासाठी अडून बसल्या, शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली,
सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यां सकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता, सगळाच दैवदुर्विलास.
पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्याच्यां निळ्या कोचावर सुद्धा, घरातले सगळे रडत होते,प्रचंड माणसे जमली होती,
सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते, त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होता, कधीनव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होता. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.
माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता, एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता, माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.
१५ डिसेंबर १९७७, प्रचंड अंतयात्रा निघाली होती, पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली,
जेव्हा अंतयात्रा डेक्कन वर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते. इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,
संगीतकार राम कदम अण्णा अण्णा म्हणत आक्रोशाने धावत होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष, वृध्द, राजकारणी, कलावंत, अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.
सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
संत माळेतील मणी शेवटला
आज ओघळला एका एकी.
अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी.
ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.
सुमित्र माडगूळकर ...
समाप्त .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा