तू खरोखरच मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहेस?"
"कोई शक?"
"बेशक शक है"
"का?"
"तुझ्या एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कागदी कपातला चहा आहे. अलिकडच्या काळात मेडिकल सायन्स आणि हेल्थ सायन्स ही दोन शास्त्रं वेगवेगळी झालीत की काय? असं वाटलं रे.."
एक क्षणभर त्याचा चेहरा अत्यंत त्रासिक झाला. ऐन थंडीत सकाळी सकाळी रामाच्या पारी तळजाईच्या टेकडीवर मी त्याला धरला होता. पंधराच दिवसांपूर्वी तो मला भेटून गेला होता. वजन नव्वद किलोच्या वर गेलं होतं, hba1c टेस्ट वर 7.0+ स्कोअर आला होता. आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस येथेच्छ मांसाहार आणि दारू ही त्याची आवड होती. थोडक्यात म्हणजे, मधुमेही होण्याकडे त्याचा सुपरफास्ट वेगानं प्रवास सुरु होता.
"अरे,ही आयुर्वेदिक सिगारेट आहे. ह्यात लवंग आहे." तो म्हणाला.
"पण माझ्या माहितीनुसार,आयुर्वेदतज्ज्ञ असली कुठलीच उत्पादनं बनवत नाहीत. तसं असतं तर,किमान एक तरी आयुर्वेद तज्ज्ञ रिलमध्ये किंवा पॉडकास्टमध्ये त्याविषयी काहीतरी बोलला असता की नाही? पण मला तरी तसं कुठं दिसलं नाही." मी त्याला विचारलं. गप्प बसण्यापलीकडे तो काहीही प्रतिक्रिया देऊ शकला नाही. कागदी कपातून गरम पेय घेणं आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती नसेल का? धुम्रपान करण्याचे धोके त्याला माहिती नसतील का?
आपली पचनसंस्था कशी काम करते,जठर कसं काम करतं, स्वादुपिंडाचं कार्य काय असतं,हे सगळं आठवी- नववीपासूनच अभ्यासक्रमात आहे. कुठल्या अन्नघटकातून आपल्या शरीराचं पोषण कसं होतं,हेही शालेय अभ्यासक्रमात आहे. शिवाय ज्या सर्च इंजिनवर ही सगळी gen z मुलंमुली दिवसभर पडीक असतात, त्यावर तर आरोग्यविषयक माहितीचा महापूर आहे.
मग दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून अकरावी-बारावी शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन, लाखो रुपयांचा कोचिंग क्लास मेडिकल एन्ट्रन्स एक्झामसाठी लावून आणि त्यातून मेडिकल सायन्सला प्रवेश घेऊन दोन वर्षे शिक्षण घेईपर्यंत स्वतःच्याच आरोग्याविषयी एवढी साधी काळजीसुद्धा घेता येऊ नये? याला काय म्हणावं? अज्ञानी म्हणावं की पढतमूर्ख म्हणावं?
दिवसातले दहा-दहा तास सीए कोर्सच्या फायनल अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारा विद्यार्थी - पण त्याला पीपीएफ चे फायदे सांगता आले नाहीत, सोन्याचांदीचे भाव अचानक का वाढायला लागले हे सांगता आलं नाही. क्रेडिट कार्ड कुणी वापरावं आणि कुणी वापरु नये, हे सांगता आलं नाही. हे तर सोडाच पण,ऑनलाईन फ्रॉड पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हेसुद्धा त्याला सांगता आलं नाही. मग इयत्ता अकरावीपासून जवळपास नऊ दहा वर्षं कॉमर्सचा रोजच्या रोज दहा तास अभ्यास करुन तो नेमकं काय शिकतो आहे? आजतागायत एकही चार्टर्ड अकाऊंटन्ट ची मुलाखत त्यानं ऐकली नाही, तो अर्थसंकल्प बघत नाही, आर्थिक घडामोडी बघत नाही. मग ज्याला कॉमर्समधलं सामान्य ज्ञानसुद्धा नाही,असा मुलगा सीए फायनल पर्यंत गेला तरी कसा?
मराठीमध्ये एम.ए. करत असलेल्या दोन मुली मला भेटायला आल्या होत्या. दोघीही पुण्यातल्या नामवंत कॉलेजमध्ये शिकतात. त्या कॉलेजची लायब्ररी अत्यंत उत्कृष्ट आहे,हे मलाच काय,सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मागच्या सहा वर्षांत त्या दोघीही एकदाही कॉलेजच्या लायब्ररीची पायरीसुद्धा चढलेल्या नव्हत्या. सहा वर्षात त्यांनी मृत्युंजय, महाश्वेता, सूर्य पाहिलेला माणूस वगैरे तर सोडाच, पण गणगोत वाचलेलं नाही. कृष्णकिनारा वाचलेलं नाही. एक होता कार्व्हर वाचलेलं नाही. साधं पंचतंत्रसुद्धा वाचलेलं नाही. त्यांना बोरकरांची कविता ठाऊक नव्हती. तिथं ग्रेस, आरती प्रभू वगैरे तर सोडाच. मला आश्चर्य वाटलं, त्यांना "मन तुझं जलतरंग" माहिती होतं, पण त्याच कवीनं लिहिलेलं "कैवल्यगान" मात्र माहिती नव्हतं. याला काय म्हणावं?
स्वरगंधर्व, मी वसंतराव, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांच्यासारखे प्रेरक चित्रपट पाहण्याची अभिरुची नाही. त्यातून आपण काही शिकावं असं वाटत नाही. चांगलं काव्य, चांगलं नाट्य, चांगलं संगीत यांचा सहवास नाही. तो मिळवावा अशी इच्छाही नाही. एखाद्या क्षेत्रात, एखाद्या विषयात अभ्यास करण्यासाठी झोकून द्यावं, दिवसरात्र साधना करावी, अहोरात्र त्या विषयाचा ध्यास घ्यावा, असं स्वप्नातसुद्धा येत नाही. अशी शंभरातल्या ९५ जणांची अवस्था आहे. मग कागदोपत्री उच्चशिक्षित होऊन ही पिढी नेमकं काय साध्य करतेय, याचा विचार कुणी करतंय का?
गडकिल्ल्यांवर फिरण्याची आवड असणाऱ्यांनी अनेकांनी गोनिदा वाचलेलेच नसतात, समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी महर्षी कर्वे वाचलेले नसतात, बालशिक्षण आणि बालविकासाचा कोर्स करणाऱ्यांना अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक माहितीच नसतात. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्याने लोकमान्यांचे अग्रलेख वाचलेले नसतात. कारण काय? कारण एकच आहे - आम्हाला या सगळ्याची गरजच वाटत नाही..!
"मोटिव्हेशन फॉर स्टार्टअप" या विषयावर प्रोजेक्ट करणारा विद्यार्थ्यांचा एक गट मला भेटायला आला होता. सगळे गूगल मास्टर होते. मी त्यांना शंतनुराव किर्लोस्करांचं "कालापुढती चार पाऊले" हे पुस्तक वाचायला दिलं आणि पंधरा दिवसांनी पुन्हा बोलावलं. आठ जणांपैकी फक्त एकानं ते पुस्तक वाचलं होतं..!
बाकीचे सगळे आम्ही किती बिझी होतो आणि आम्हाला कसा वेळच मिळाला नाही हे मला पटवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते..! त्यांनी ते पुस्तक न वाचल्याचं कारण मला कळलं होतं - "आम्हाला गरज नाही !"
आपण पदवी प्रमाणपत्र आणि मार्कलिस्ट मिळवली की, सगळं झालं असं नसतं. कागदावरचं प्रमाणपत्र पुरेसं नसतं. आपण आयुष्यात नेमकं काय करतो आहोत, नेमकं कसं जगतो आहोत, कशासाठी जगतो आहोत,आपली नैतिकता कशी आहे, आपलं आपल्या कामाच्या क्षेत्रातलं योगदान कुठल्या दर्जाचं आहे, अशा अनेक गोष्टींना अत्यंत महत्त्व असतं.
विद्यार्थी मित्रांनो, "आधी केले मग सांगितले" या तत्वाला आयुष्यात खूप किंमत आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि खरोखर तन्मय होऊन केलेले कष्टच उत्तम फळाला येतात. नुसत्या पाट्या टाकून काहीही हाती लागत नाही, उलट नुकसान मात्र नक्की होतं. उथळपणापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवणं, आजच्या काळात फार कठीण आहे. आपण जितके आपल्या ध्येयाशी आणि तत्त्वांशी घट्ट चिकटून राहू, तितकं आपलं करिअर उज्ज्वल आहे. वरवरचा अभ्यासाचा आभास शक्य तितक्या लवकर सोडा आणि तुम्ही ठरवलेलं तुमचं करिअर प्रत्यक्षात जगायला सुरुवात करा. स्वतःच स्वतःला शिस्त लावून घ्या. आपापल्या क्षेत्रातली अतिशय कष्टानं नावारूपाला आलेली माणसं, त्यांची चरित्रं शोधून काढा. ज्या ज्या माणसांमधलं जे जे काही चांगलं असेल, ते स्वतःमध्ये उतरवण्याचा ध्यास घ्या.
आणि पालक मित्रांनो, तुमच्या सोयीनं तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहू नका. पटकन आणि इन्स्टंट यश मिळावं म्हणून त्यांना शॉर्टकट्स मारायला शिकवू नका. तुमच्या कमावलेल्या पैशाच्या जोरावर आज तुमच्या कुटुंबापुरते शॉर्टकट्स खपून जातील. पण खऱ्या जगात ते अजिबात खपवून घेतलं जात नाही आणि अशा मुलामुलींना कुणी फुकटसुद्धा कामावर घेत नाही. "लाखो रुपये खर्च करूनही आमच्या मुलाचं काही धड होईना", असं जेव्हा वाटतं, तेव्हा आपण त्याच्या बाबतीत किती शॉर्टकट्स कसे कसे मारले आणि त्यालाही मारायला शिकवलं, हे आठवून पहा. त्याची यादी खूप मोठी होईल. म्हणूनच खात्रीनं सांगतो, जे जे चकाकते ते सोने नसते, हे खरंय. पण शुद्ध सोने चकाकतेच, हेही तितकंच खरंय. तुमची मुलं उत्तम घडवण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. जगात बाकी काहीही उलथापालथ झाली तरीही उत्तम चारित्र्यवान, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि कष्टाळू माणसांची प्रगती कधीही थांबणार नाही हे सत्य मात्र नेहमी ध्यानी धरा.. कारण, तुमची मुलंमुली अव्वल दर्जाची पढतमूर्ख न होणं ही आपल्या देशाची गरज आहे.
लेखक © मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ,संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.
9135329675
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा