मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2478. पैलतीर

 रोजच्या प्रमाणे हाॅस्पिटलमध्ये शिरत असताना आमच्या वाॅचमनकाकांनी मला अचानक थांबवलं आणि एक धक्कादायक पण आनंदाची बातमी दिली.
"मानकरकाकांकडून आज सर्वांना आईस्क्रीम मागवण्यात येणार आहे आणि ह्याच सगळं श्रेय तुम्हाला आहे हे इथला प्रत्येक जण जाणतो."
एव्हाना मी आल्याची बातमी मोठ्या डाॅक्टरांना समजली असावी कारण ते त्यांच्या प्रशस्त केबिन बाहेर माझी वाट बघत उभे होते. मला बघताच लगेच पुढे होऊन त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन करून म्हटले," अरे केदार, मानकरकाकांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बदलाचं सगळं श्रेय तुझं आहे."
"डॉक्टर, मानकर काकांनी खुप उशीराने का होईना पण पैलतीर शब्दाचा सकारात्मक अर्थ घेतला ह्याच खुप समाधान वाटते. ही गोष्ट ऐकून इतरही रूग्ण त्या दृष्टीने नक्की विचार करतील अशीच आशा आपण करूया."
🏥💉💊🩹🩺🧪.🥗.
जिन्यावरून माझ्या खोलीकडे जाताना मला मानकरकाकांबरोबरची पहिली भेट आठवली. संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने आमच्या हाॅस्पिटलमध्ये आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांना घरच्या अडचणींमुळे शक्य नसल्यास इथेच वास्तव करण्याची सोय एका वेगळ्या वाॅर्डमध्ये केलेली आहे आवश्यक ते शुल्क आकारून. ह्याच वाॅर्डमध्ये खिडकीतून शून्यात एक टक नजर लावून बसले होते काका. संभाषण करायला कायम नाखुष असायचे. त्यांना बोलतं करण्यासाठी मी किती जीवाचा आटापिटा केला होता ते आठवून हसू आलं मला. आजुबाजुला असलेल्या रूग्णांसोबत ते कधीच बोलत नसत. येवढं काय बघता खिडकीतून बाहेर ह्या माझ्या प्रश्नावर त्यांचे कायम एकच उत्तर असायचं," पैलतीर".
जगण्याचा अर्थ गमावून बसलेले काका माझ्या सारख्या समुपदेशकासाठी खरंच आव्हान होतं. पण मी जिद्दीने काकांसोबत अधिकाधिक वेळ घालवू लागलो. विविध उदाहरणे देऊन पैलतीर ह्या शब्दात सर्वसाधारणपणे भरलेली नकारात्मकता मी सकारात्मकतेमध्ये बदलण्यात यशस्वी झालो होतो.
असंच एकदा खिडकीतून बाहेर बघताना काकांना अचानकपणे शाळेचे गणिताचे मास्तर आठवले आणि तीच आठवण ठरली टर्निंग पॉइंट . तोच आठवणींचा धागा मी अलगदपणे पुढे नेत गेलो आणि काका शाळेच्या दिवसांतून एकेक करत काॅलेजच्या रम्य आठवणीत रमू लागले. पुढे नोकरीची आणि संसाराची सुरुवात झाली. आठवणींची गाडी ज्या उत्साहाने सुरू झाली होती ती अचानक करकचून ब्रेक लागल्यागत थांबली जेव्हा काकांच्या तोंडून काकूंच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली. तेव्हा पासून काका जे खचून गेले ते अगदी काल परवा पर्यंत त्याच स्थितीत होते. घरी काकांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून काकांच्या मुलाने काकांच्या इथल्या वास्तव्यासाठी वेगळे पैसे भरले होते.
पण " पैलतीरावर आणखी काय काय असतं ते एकेक करत मी काकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी झालो होतो. आनंद मिळवत मन प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टींचं "पैलतीरावर" असलेले लक्ष्यवेधी अस्तित्व काकांनी हळूहळू नुसतं मान्यच केले नाही तर ते त्यात रमून गेले. काका गाणी श्लोक स्तोत्र म्हणत इतर रुग्णांचे मन रमवू लागले. काका आजकाल उत्साहाचा धबधबा म्हणून ओळखले जायला लागले.
🏥🥗🧪🩺🩹💊💉
आणि आज काकांकडून मिळणाऱ्या आईस्क्रीमची गोष्ट काकांच्या पूर्णपणे माणसात येण्याच्या माझ्या खात्रीवर  शिक्कामोर्तब करणारी ठरली.
     मी काकांच्या वाॅर्डात पोहोचल्यावर काकांनी मला अचानकपणे गच्च मिठी मारली आणि ते म्हणाले, "केदार मला माणसात आणण्यासाठी तु जे जे केलंस न थकता आणि न कंटाळता त्याला तोड नाही. इथे बसून खिडकीतून दिसणाऱ्या पैलतीरावर मला आनंदाने उडणारे पक्षी दिसले.पाठीवर दप्तर लावून शाळेत जाणारी इवली इवली पावलं दिसली. मंदिरात वाजणारी घंटा आणि म्हटली जाणारी आरती ऐकू आली . आजवर खुप काही गमावल्याची खंत आहे मला. पण मी आता ठरवलंय. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आनंदाने दणक्यात स्वागत करायचे आणि प्रत्येक क्षण न क्षण मस्तपणे जगायचं आणि आपल्या आनंदात इतरांनांही सामावून घ्यायचे. आज हा माझा निर्धार आणि निर्णय सेलिब्रेट करण्यासाठी मी सगळ्यांना आईस्क्रीम देणार आहे."
निराश आणि जगण्यातील उत्साह काही कारणाने गमावलेल्या प्रत्येकाने मानकरकाकांप्रमाणेच जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मला खात्री आहे जीवनातील सकारात्मक पैलतीर त्यांच्या नक्कीच दृष्टीक्षेपात येईल ह्यात शंकाच नाही.
© सतीश बर्वे
      १३.१२.२५.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...