गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2455. माणूसकी

     दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत ऑफिसमध्ये प्रचंड शांतता होती. फक्त एका जुन्या छडीचा जमिनीवर टेकतांना टक-टक आवाज येत होता. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने वर मान करून पाहिलं, दारात एक कृश, वृद्ध माणूस उभा होता. पांढरे केस, जुना फाटलेला सदरा, आणि हातात निळे प्लास्टिक फोल्डर. कदाचित बायोडाटा. तो हळूहळू आत आला. जणू प्रत्येक पाऊल उचलताना त्याला वेदना होत होत्या. 
रिसेप्शनिस्ट मुलीने विचारलं.. “आपण ?”
तो वृद्ध म्हणाला, “नोकरीसाठी… अर्ज द्यायचा होता.”
     त्या एका वाक्याने संपूर्ण ऑफिस अवाक् झालं. HR मॅनेजर अभिषेक त्याच्याकडे पाहून थक्क झाला. ६८–७० वर्षांचा माणूस, काठी टेकत चालत. नोकरी मागण्यासाठी आला होता. अभिषेकने अचंबित होऊन विचारलं,
“आजोबा, नोकरी? कोणती नोकरी हवी तुम्हाला?”
वृद्धाने फोल्डर पुढे केला. त्यांचे हात थरथरत होते. “काहीही काम चालेल बेटा. मी शिकून घेईन.” त्याच्या आवाजात अशी वेदना जाणवत होती की, जणू आयुष्याने त्यांचं सगळं काही हिरावून घेतलं होतं.
     अभिषेकने त्यांचा बायोडाटा उघडला आणि वाचताच त्याचे डोळे पाणावले.
बायोडाटा:
नाव: सुरेश पाटील
वय: ६९ वर्षे
शिक्षण: बारावी पास
अनुभव: ३२ वर्षं सरकारी शाळेत शिपाई. शाळा उघडणे, साफ- सफाई, मुलांना मदत, चहा-पाणी.
निवृत्ती: ९ वर्षांपूर्वी
पण शेवटची ओळ वाचून अभिषेक थबकला -
“पेन्शनचे पैसे फसवणुकीने गेले.  घरात कोणी कमावणारा नाही. दोन नातवंडे शाळेत जातात. सुनेची तब्येत बरी नसते. नोकरी नाही मिळाली तर घर चालवणं अवघड होईल.” 
 अभिषेकने त्याच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यांत फक्त नव्हती तर विवंचना होती. ऑफिसमध्ये कुजबुज सुरू झाली.
“या वयात नोकरी?”,
“आता या वयात काय काम करणार?”
“चॅरिटी थोडी चाललीये इथे?”
      पण अभिषेकच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांचा चेहरा आला. ‘जर माझ्या बाबांवर कधी अशी वेळ आली तर?’ त्याचं मन ढवळून निघालं. तो म्हणाला, 
“आजोबा, बसा ना. छोटासा इंटरव्ह्यू घेऊया.”
वृद्ध थोडा गोंधळला. “बेटा, इंटरव्ह्यू नको… फक्त काम दे. मी सगळ्यात आधी येईन, मेहनत करीन.”
अभिषेक हसला. “ठीक आहे, पण सांगा ना... नोकरी का हवी आहे?”     
      ते ऐकून वृद्धाचा गळा भरून आला. “बायको गेली तीन वर्षांपूर्वी. मोठा मुलगा ट्रक अपघातात गेला. सून एकटी आहे. दोन नातवंडं शाळेत शिकत आहेत. लहान भावाने फसवून पेन्शन घेतली. केस चालू आहे पण न्याय कुठे इतक्या लवकर मिळतो?” त्याने हलकेच हसत म्हटलं.. “सून आजारी आहे, मुलं शिकत आहेत. शाळेची फी भरू शकत नाही, म्हणून झोप येत नाही. घरात धान्यही नाही राहिलं. शेजाऱ्यांकडून उधार मागितले तेव्हा तर खूप अपमानित वाटलं होतं," त्याचे डोळे पाणावले. म्हणूनच बेटा, नोकरी हवी आहे. कोणतीही.”
अभिषेक गप्प झाला. मग तो थेट मालकीण मीरा किल्लेदार यांच्याकडे गेला.
सगळं ऐकल्यावर मीरा म्हणाल्या, “अशा लोकांना आपण टाळतो अभिषेक. काहीतरी करायला हवं.”
अभिषेक म्हटला, “मॅडम, त्यांना दया नको… सन्मान हवा आहे.
मीरा म्हणाल्या, “ठीक आहे. त्यांना ऑफिस असिस्टंटची नोकरी द्या. हलके फुलके काम द्या. आणि प्रत्येक महिन्याला थोडं जास्त पेमेंट देऊया. पण त्यांना असं वाटलं पाहिजे की हा त्यांचा कष्टाचा पैसा आहे, मदत नाही.”
      जेव्हा दोघे बाहेर आले ते वृद्ध आजोबा हातात फोल्डर घट्ट पकडून उभे होते. कदाचित आता नकार मिळेल. असा भाव त्यांच्या डोळ्यांत होता.
मीरा हसून म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील ?”
वृद्ध दचकून उभा राहिला.
"तुमची नियुक्ती झाली आहे.”
क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. “ख…खरच ?” त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
“हो आजोबा, उद्यापासून काम सुरू.”
तो फोल्डर छातीशी घट्ट धरून रडू लागला. “बेटा, आज तुम्ही माझं अंधारं घर उजळून टाकलं.”
अभिषेक म्हणाला, “आता तुम्ही आमच्या ऑफिसचे आजोबा आहात.”
      दुसऱ्या दिवशी तो वृद्ध व्यक्ती स्वच्छ कुर्ता घालून आला, दाढीही थोडी ट्रिम केली होती. पाणी ठेवणे, फाइल्स नेणे, झाडांना पाणी देणे. सगळी कामं प्रेमाने करत होता. एका महिन्यानंतर त्याला पगार मिळाला ८,००० रुपये + ३,००० बोनस.
      आजोबा सदगदित होऊन म्हणाले. 
“इतके पैसे मी कधीच पाहिले नाहीत बेटा...” त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
अभिषेक म्हणाला.. “हे पैसे तुम्ही कमावले आहेत आजोबा. ही तुमची स्वाभिमानाची कमाई आहे."
      पण दोन महिने झाल्यावर एका सकाळी तो कामावर आला नाही. फोन करून तपास केला तर सून म्हणाली - “दादा, बाबा आजारी आहेत. आम्ही रुग्णालयात आहोत.”
     अभिषेक आणि मीरा धावत दवाखान्यात गेले. बेडवर आजोबांना ऑक्सिजन लावलेला होता. अभिषेकला पाहताच आजोबा हसले. म्हणाले, 
“बेटा… कामावर येऊ शकलो नाही… सॉरी…”
अभिषेकचे डोळे भरून आले.
आजोबा म्हणाले, “आज नातवाची फी भरायची होती… तेवढी तू भरशील ना बेटा?”
अभिषेक म्हणाला, “आजोबा, ती मी आधीच भरली आहे. तुमच्या नावाने.” 
आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं. “देव तुझं भलं करो बेटा. तू मला पुन्हा माणूस असल्याची जाणीव दिलीस.” आणि पुढच्याच क्षणी त्यांचा हात सैल झाला. आजोबा गेले. त्या दिवशी ऑफिसमध्ये कुणाचंही कामात मन लागलं नाही. सगळ्यांनी दोन मिनिटे शांत राहून मौन पाळलं.
मीरा म्हणाल्या, “श्री सुरेश पाटील आमचे कर्मचारी नव्हते, ते आमच्या कुटुंबाचा भाग होते. त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी उचलेल.”
     अभिषेकने त्यांचा फोल्डर उघडला, त्यात एक चिठ्ठी होती. “जर मला नोकरी मिळाली, तर माझा नातू शिकेल. नाही मिळाली, तर तो शाळा सोडेल. माझी एकच इच्छा. तो माझ्यापेक्षा चांगला माणूस बनो.”
अभिषेकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, “आजोबा, तुमचा नातू नक्की काहीतरी मोठं काम करेल.”
कंपनीने आजोबांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली.. ‘सुरेश पाटील स्मृती शिष्यवृत्ती’. अनेक गरीब मुलांची फी त्या निधीतून भरली जाऊ लागली. 
     काही लोक बायोडाटामध्ये कौशल्य लिहितात, पण त्या आजोबांनी माणुसकी लिहिली होती. कारण कधी कधी नोकरी म्हणजे फक्त पोट भरणं नसतं, ती एखाद्या घराची आशा, एखाद्या नातवाचं भविष्य, आणि एका वृद्ध बापाची इज्जत असते.
'आणि सुरेश आजोबा शेवटपर्यंत इज्जतीने जगले…'
तुम्हीही कुणाच्या आयुष्यात 'अभिषेक' आणि 'मीरा' होऊ शकता का?

© ® ज्योती निंबाळकर.
(आवडल्यास सामायिक करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच सामायिक करा ही विनंती. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...