शनिवार, २० डिसेंबर, २०२५

2460. प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा

 हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की, ‘ हे जग कुणी निर्माण केले? ’ तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली? त्यावर तो सांगेल, ‘ ते मात्र मला कळत नाही. ’ पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी कर्ता असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्या अर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.
आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदु:ख मानण्याचा काय अधिकार आहे ? समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का ? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे ? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदु:खे बाधत नाहीत.
आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराममहाराजांसारखे झालो तर वाईट काय ? बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे ! प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल.
हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे. अडखळण्याची भितीच नाही.
----------------------------------------------------------------

लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच !

ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय.

सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसेसुद्धा एकासारखी एक कुठे असतात ? पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकाला मारक असूनदेखील कसे जगतात, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात. परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते, म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारीत नाही. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो, अशा कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखविणे, ही हिंसाच समजावी. दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे, हे काही बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात; उदाहरणार्थ, रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे, वगैरे. वास्तविक हे कसले नियम ! तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय, शेवटी दिवा लावावा लागतोच ! त्यापेक्षा, ‘ मी कुणाचे अंत:करण दुखविणार नाही ’ असा नियम करावा. प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच ‘ नको नको ’ म्हणते; कारण न जाणो, चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा ! हे जसे ती सांभाळते, त्याप्रमाणे आपण कुणाचे अंत:करण न दुखवण्याचा नियम केला की, आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू! भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावे ? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावे हाच एक उत्तम मार्ग आहे.

अंतःकरण न दुखवता बोलणे, हे वाचेचे तप आहे असे म्हणतात.
----------------------------------------------------------------------------

कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे.

जगामध्ये आणि जीवनामध्ये दु:ख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्के दु:खच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्य्र इत्यादींचे दु:ख बाहेरून येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दु:ख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दु:ख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दु:ख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दु:खही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगिकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दु:ख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दु:ख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे; तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस, भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दु:ख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो, आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वत:तूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो, तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.

आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या, असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत, आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना ? ते करीत असताना मी अनीती, अधर्माने वागलो नाही ना ? आता जे व्हायचे ते होऊ दे; कुठे काळजी करा ! ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल.

देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे.
---------------------------------------------------------------------------

परमेश्वर आपल्या हृदयात आहे.

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ - हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! ‘काशी ’, ‘ गंगा ’, असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, जर ‘ काशीस जावे नित्य वदावे; ’ म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की, देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का ?

स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि नि:स्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तीमध्ये नाही तो नि:स्वार्थी समजावा. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. देव आहे असे नि:शंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...