मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2488. गार्डिअन

     आज तिने सुट्टी घेतली होती... आॅफिसमधलं प्रोजेक्ट कम्प्लिशनचं काम शेवटच्या स्टेजला होतं... तरिही... कारण हे काम तिच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. नवर्‍यालाही ती काहिच बोलली नव्हती. "जरा कणकण वाटतीये अंगात" या खेरीज. मुलं शाळेत गेली, नवरा आॅफिसला गेला आणि तिने ज्या कामासाठी सुट्टी घेतलेली, ते काम सुरु केलं. सुरुवात मोठ्या लेकाचं कपाट तपासण्यापासून केली. 
     मुलांचं कपाट म्हणजे, त्यांचं अंतरंगच असतं खरंतर. ते जसं लावलंय त्यावरुन कळतात, त्यांच्या प्रायोरिटीज आपल्याला. अभ्यासाची पुस्तकं होतीच... त्याशिवाय होती गुझबम्प्स सिरिजची पुस्तकं... पोकेमाॅनची शेकडो कार्ड्स... काही कार्डबोर्ड्स च्या पुर्ण - अपुर्ण कलाकृत्या. आणि... आणि एक पुडी मिळाली तिला... एका कोपर्‍यात ठेवलेली... अगदी लपवल्यासारखी. तिने ती हातात घेऊन पाहिली... त्यातली थोडी पावडर बोटांवर घेऊन चोळूनही पाहिली... पिक्चर्समधून दाखवतात तसं ते बोटाचं टोक, जिभेच्या टोकाला लावण्याचं धाडस मात्र काही झालं नाही तिचं. पण दरदरुन घाम फुटला होता तिला... घशाला कोरड पडली तिच्या... ती पुडी तिने स्वतःकडे ठेवत... कपाट पुन्हा जैसे थे करुन ठेवलं... अनटच्ड वाटावं असंच. 
आता ती मुलांची वाट पहात होती शाळेतून येण्याची... दोन्ही मुलं आली. सहा वर्षांचा छोटा लेक येतांनाच पेंग घेऊन आला होता डोळ्यांवर... जी तो रोज सोडून जायचा घरी बिच्चारा, सकाळी साडेसहालाच घराबाहेर पडतांना... कपडे कसेबसे बदलले त्याने नी तो झोपलाही. तिने मोठ्याला जेवायला वाढलंं नी जाणवलं तिला की आपल्याला घरी बघून, आता पुर्वीसारखा आनंदत नाही हा... वाईट वाटलं तिला खूपच. आता कळू नये अशा बेताने, मोठ्यावर लक्ष ठेऊन होती ती... मोठा लेक काहिच कल्पना नसल्याने नाॅर्मलच वावरत होता घरात. 
आणि अचानक अस्वस्थ झाला तो... दोन - तिन फोनही येऊन गेले होते त्याला तेवढ्या वेळेत. कदाचीत ती पुडी सापडत नसावी, म्हणून होती ती अस्वस्थता. आता तिचा लेक प्रचंड घाबरला होता, हवालदील झाला होता... तिला आता बघवेना आपल्या बाळाची दयनियता... आणि तिने त्याला जवळ बोलावलं. त्याच्या केसांतून हात फिरवत, कुरवाळत त्याला... कुशीत घेऊन पापे घेतले त्याचे... नी विचारलं त्याला त्याच्या बेचैनपणाचं कारण. एव्हाना तिचा मुलगा पार कोसळला होता आतून, नी त्याचे पडसाद लगोलग ऊमटलेच बाहेरही. ओक्साबोक्शी रडू लागला तो... आणि त्याने सगळं खरं सांगितलं आईला...
"आपल्या घरी कोणच नसतं दिवसभर, म्हणून शेजारच्या विंगमधला ओजस दादा त्याचं काही सामान ठेवतो आपल्याकडे... वेगवेगळ्या पुड्या, ईन्जेक्शन्सच्या सिरिंज, कुठल्याशा गोळ्यांच्या स्ट्रिप्स आणि... आणि पाॅर्न मॅगझिन्सही... पण मी ह्यातल्या कशालाही हात लावत नाही... मी खरंच काही बघतही नाही... तो फोन करुन घरी येतो, नी जे पाहिजे ते घेऊन जातो... आज तो त्याने माझ्याकडे ठेवायला दिलेली, एक पुडी मागत होता... तू घरीच आहेस म्हणून मला सांगतोय तो आता, पुडी घेऊन खाली यायला... पण ती पुडीच मिळत नाहिये... त्याने सांगून ठेवलंय मला, की ज्या दिवशी तू सपोर्ट करणार नाहिस आम्हाला... त्याच दिवशी खाली खेळायला आलेला तुझा लहान भाऊ, पुन्हा घरी येणार नाही". 
हे एवढं बोलून ढसाढसा रडायला लागला लेक तिचा... बारा वर्ष वयाच्या कोवळ्या मनावर, हे क्रूरपणे लादलं गेलेलं मणभर ओझं बघून... तिलाही रडू अनावर झालं मग. काहितरी ठरवून मनाशी, निग्रह करुन कसलासा... डोळे पुसत लेकाचे नी स्वतःचेही ती बोलली त्याला... "चल... ती पुडी माझ्याकडे आहे... देऊन येऊ त्याची त्याला...आणि अजिबात घाबरु नकोस... मी आहे तुझ्याबरोबर आता... त्याचं ते बाकिचं सगळं सामान ही घे, जिथे कूठे लपवलं असशील... नी चल पटकन". तिच्या लेकाची भिती कुठल्याकूठे पळाली होती आता... आईला कडकडून मिठी मारली त्याने. तिने मग लेकाला पुढे पाठवलं... आणि जिन्यावरच ऊभी राहिली ती दबा धरुन. ओजस आणखीन दोन - तिन मुलांबरोबर, तिच्या लेकाजवळ आला... पुन्हा त्याला घाबरवणं, हसत - खिदळत त्याच्या टपल्यांत मारणं, त्याचे गाल ओढणं, त्याच्या पोटात चिमटे काढणं... चालू झालं त्यांचं. ती आता बाहेर पडून त्यांच्या समोरच जाणार, तितक्यात एक हात तिच्या खांद्यावर आला मागून...प्रचंड आश्वस्त... आणि ऊडालीच ती... तिचा नवरा होता तो. डोळ्यांनीच दिलासा देत तिला, खात्री देत की 'मी आहे ना ईथे समर्थ... बायको - मुलांची काळजी घ्यायला'. 
आपली बॅग त्याने तिच्या हातात दिली... फुलशर्ट दुमडून त्याने कोपरापर्यंत घेतला... तिच्या गालावर हलकेच टॅप केलं त्याने, नी वार्‍याच्या वेगात तो आठ आणि तिन अशा पायर्‍या ऊतरत त्यांच्या समोर ऊभा ठाकला. त्या चारही गर्दुल्ल्यांना मग त्याने असा काही पकडून पकडून चोपला... आपल्या लेकाचं बाल्य भयावह करण्याचा गुन्हा करणार्‍यांना, तो अक्षरशः तुडवत होता. विशेष हट्टा - कट्टा नसुनही कुठून आली होती त्याच्याकडे ईतकी अफाट ताकद, कोण जाणे. त्याच्या मागूनच खाली ऊतरलेली त्याची बायको... नी त्यांचा लेक तोंडाचा 'आ' वासून बघत होते त्याच्याकडे. "पुन्हा माझ्या लेकांच्या आसपास जरी दिसलात, तरी पोलिसांत देईन तुम्हाला... नी तुमच्या घरच्यांसमोरुन तुम्हाला फरफटवत न्यायला लावेन"... ईतकं बोलून त्याने पळवून लावलं चौघांनाही. 
"मी ही आज गेलोच नव्हतो आॅफिसला... मला ही छडा लावायचाच होता या गोष्टीचा... गेटबाहेरच ऊभा होतो, पण तू मला दिसली नाहिस आॅफिसला जातांना... मला साधारण अंदाज आलाच मग, तुझ्याही घरी थांबण्याचा... मुलांची स्कुल व्हॅन आली, नी तासाभराने मी घरी आलो... दरवाजा ऊघडणारच होतो किल्लीने, की तुमचा दोघांचा आवाज आला मला बाहेरच... सगळं ऐकलं मी... तळपायाची आग मस्तकात गेली होती माझ्या... तितक्यात तुम्हाला दरवाजा ऊघडतांना पाहून मी वर गेलो... नी पाठोपाठ ऊतरलो मग तुमच्या... जिवंत असेपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही मी फाॅर शुअर... माझा तेरावं लागलेला लेक जेव्हा अचानकच, एकाच आठवड्यात तिन वेळा अंथरुणात युरिन करतो... तेव्हा नक्किच तो कुठल्यातरी जबरदस्त मानसिक दबावाखाली आहे, हे न कळण्या एवढा हा बाप निबर नाही... जरी... जरी सख्खा नसला... अॅज आय नो व्हेरी वेल दॅट, अॅम नाॅट ओनली अ पेरेन्ट बट अ 'गार्डिअन' टू... अॅन्ड लाॅट आॅफ रिस्पाॅन्सिबिलीटी रिअली लाईज ईन धिस वर्ड 'गार्डिअन'.
तिचे डोळे भरुन आले नी ती बिलगली त्याला... सिंगल मदर असलेल्या तिला, दहा वर्षांपूर्वी मनापासून स्विकारणार्‍या... अन् तिच्या पदरात असलेल्या मुलाला, आत्मियतेने आपलं नाव देणार्‍या... तिच्या नवर्‍याला. पण तिच्या आधीच 'गार्डिअन' ह्या शब्दाचा डिटेल्ड अर्थ नुकताच कळून आलेला त्यांचा मुलगा... त्याच्या बाबाच्या छातीवर डोकं टेकून, जवळ आलेल्या आईच्या अंगाभोवती हाताचा विळखा करत... निरभ्र ऊभा होता, काळे ढग ओसरल्याचा आनंद डोळ्यांतून ओसंडवतं.
---सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...