शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

291. मी अतिरेकी पालक आहे ?

        "तिचा अभ्यासच होत नाहीय सर. किती प्रयत्न करतेय ती,पण यशच नाही बघा तिच्या कष्टांना.." असं म्हणून ती माऊली फोनवरच रडायला लागली. इयत्ता बारावीत शिकणारी मुलगी. रोज दिवसभर अभ्यास करते,रात्रीही जागरणं करते,पण आता परिक्षा जेमतेम महिन्यावर येऊन ठेपली आहे,तरीही माझा अभ्यासच झालेला नाही,असं म्हणून रोज घरात रडते, असं तिच्या पालकांचं म्हणणं. 
        मी आईवडिलांना भेटायला बोलावलं. बोलता बोलता असं लक्षात आलं की, आपली मुलगी अभ्यास करते,एवढं एकच वाक्य ते ठामपणे सांगतात.पण ती अभ्यास करते म्हणजे नेमकं काय करते, हे मात्र दोघांनाही सांगता येत नाहीय. कारण काय? कारण,तिला घरात स्वतंत्र खोली आहे आणि त्या खोलीचं दार सतत बंद असतं. मुलगी नेहमी तिच्या खोलीतच असते आणि अभ्यासही तिच्या खोलीतूनच चालतो... हे ऐकलं आणि मला शंका आली.
     सध्या "मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र स्पेस दिली पाहिजे" असं सूत्र बऱ्याच मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यवर्गीय कुटुंबांमध्ये फार निगुतीनं,कसोशीनं पाळलं जाताना दिसतंय. "आम्ही आमच्या मुलांसाठी काहीही करायचं बाकी ठेवलेलं नाही" एवढा एकच राग आळवून, उरलेल्या सगळ्या गोष्टी मुलांच्या गळ्यात घालून पालक मोकळे होताना दिसतात. अभ्यासासाठी घरात जागा असावी, इथपर्यंत ठीक आहे.पण जागा असावी म्हणजे स्वतंत्र खोली असावी असा त्याचा अर्थ नव्हे. अभ्यास चांगला व्हावा यासाठी वातावरण शांत असावं, ही गोष्ट एक साधा नियम म्हणून मान्य.पण त्यासाठी संपूर्ण घरादारानं मौनव्रतात वावरावं किंवा जरासुद्धा आवाज होऊ द्यायचा नाही, ही कुठली पद्धत? दहावी-बारावीच काय पण, अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत सुद्धा 'अभ्यासासाठी स्वतंत्र खोली विथ आतून कडी फॅसिलिटी' ची अजिबात आवश्यकता नाही. पण कितीतरी घरांमध्ये भलताच प्रकार दिसतो. मुलांना अभ्यासासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी टॉयलेट ॲटॅच खोली, खोलीत स्वतंत्र वायफाय, स्वतंत्र डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, आणि स्मार्टफोन तर असतोच, इतक्या सोयी.. खोलीचं दार आतून बंद असण्याची परवानगी. दोन्हीं वेळचं जेवण, चहा-कॉफी-दूध-बोर्नव्हिटा, नाश्ता हे सगळं खोलीतच नेऊन देण्याची सोय. घरातल्या घरातसुद्धा डिस्टर्ब करायचं नाही म्हणून बंद खोलीतूनच व्हॉट्सॲपवरून मेसेजेस येतात,त्या मागण्या तात्काळ पूर्ण करायच्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आतूनच धमक्यांचे मेसेजेस किंवा आदळआपट, तोडफोड सुरु होणार हे नक्की. मग त्या मेसेजेस मध्ये 'ताबडतोब मॅगी पाठव' इथपासून ते 'PDF पाठवतो आहे - त्याच्या प्रिंट्स ताबडतोब हव्यात' अशा ऑर्डर्स येतात. त्या 'शून्य मिनिटांत' पूर्ण कराव्या लागतात. अन्यथा कुळाचा उद्धार होतो. 'माझ्यासारखा मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरात जन्माला यावा अशी तुमची लायकीच नाही' हे ऐकून घ्यावं लागतं. 
         आईवडिलांच्या प्रत्येक गोष्टीची टिंगल टवाळी करणं आणि खवचटपणानं टोचून बोलून त्यांचा सतत अपमान करत राहणं, हा मुलामुलींचा फॉर्म्युला होत चालला आहे. कुठल्या एका वीकली टेस्टमध्ये एक मुलगा भरघोस मार्कांनी नापास झाला. घरच्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केली तर, " कालच्या शिळ्या पोळ्यांना सकाळी फोडणी देऊन पोट भरणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी बघितली पाहिजे. आयआयटी ची फी भरण्याची सोडाच, ऐकण्याची तरी लायकी आहे का तुमची?" असं पालकांना भरल्या ताटावर ऐकून घ्यावं लागलं आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात मुलाच्या स्वतंत्र खोलीत खाऊ आणि सुक्यामेव्याचे डबे भरुन ठेवलेले मी पाहिले, आणि ते कायम भरलेले ठेवावे लागतात,असं ते पालक मला सांगत होते.तेही इम्पोर्टेड लागतात. देशी सुकामेवा चालत नाही.साडेसात ते आठ हजार रुपये दर महिन्याला फक्त सुकामेवा खरेदीसाठी लागतात,असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वर्षाला जवळपास एक लाख रुपयांचा खर्च कुटुंबातल्या फक्त एका माणसाच्या फक्त सुक्यामेव्यासाठी..! 
बारावीत बायोलॉजी घेतलेल्या आणि मेडिकल प्रवेश परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीला 150₹ किलोने मिळणारे कच्चे शेंगदाणे पोषक नसतात,पण ₹1800 किलो दराने मिळणारे बदामच तेवढे पोषक असतात म्हणे.घरचं जेवण करून एनर्जी मिळत नाही अन् कॅडबरी खाऊन,ओरिओ मिल्कशेक पिऊनच एनर्जी मिळते,ही यांची धारणा. बरं,एवढं करुनही तब्येत चांगली नाहीच..! 
         अगदी माझ्या डोळ्यांसमोर ह्याची अक्षरशः शेकडो उदाहरणं आहेत. गेली दहा वर्षं महिन्याला ४५ ते ५० हजार रुपयांचा खर्च करत,पुण्यात भर मध्यवस्तीतल्या उच्चभ्रू परिसरात,संपूर्ण एसी फ्लॅटमध्ये केवळ अभ्यासाच्या नावाखाली राहणारा आणि दिवसभर ऑनलाईन क्लासच्या नावाखाली चौदा-चौदा तास पॉर्न फिल्म्स आणि वेबसिरिजेस पाहण्यात वेळ घालवणारा एक दिवटा माझ्या पाहण्यात आहे.वयाची तिशी नुकतीच पूर्ण झाली आहे,एक दमडीसुद्धा कमवत नाही.९५₹ लिटर या दराचं A2 दूध त्याला लागतं. ₹३००० दरानं देशी गायीचं शुद्ध तूपच तो खातो. कुठल्यातरी हस्तरेखा तज्ज्ञाकडं सारखा जातो, त्यांची एका व्हिझिटची फी ₹११,००० आहे. ती महिन्यातून कमीत कमी एकदा तरी द्यावी लागतेच.हा सगळा खर्च वडीलच करतात.तरीही हा बहाद्दर स्वतःया वडिलांचा चारचौघात अपमान करायला मागंपुढं पाहत नाही.उलट वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती लवकरात लवकर माझ्या नावावर करावी,अशीच त्याची स्पष्ट इच्छा आहे आणि आजकाल तो तसं बोलूनही दाखवायला लागलाय. 
          एका विद्यार्थिनीच्या वडिलांचा मला फोन आला. मुलीचे प्रश्न अनेक होतेच.पण बोलता बोलता त्यांनी मला एक प्रकार सांगितला.जुलै महिन्यात कॉलेज सुरु झालं आणि डिसेंबर महिन्यात परिक्षा होती. वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी मुलीनं डझनभर वह्या आणून ठेवल्या.पण एक अक्षरही लिहिलं नाही.सगळ्या वह्या तशाच..!पण परीक्षेच्या महिनाभर आधी तिनं वडिलांकडे दहा हजार रुपये मागितले. कशासाठी? तर रेडिमेड नोट्स च्या झेरॉक्स साठी.. "अगं,एवढ्या रकमेच्या झेरॉक्स? काय वेड-बिड लागलंय का तुला?" वडील म्हणाले. "बाबा,सगळे असंच करतात. लिहित कोण बसणार? मोड्यूल घ्यायचं आणि झेरॉक्स काढायच्या.झालं काम.." मुलगी म्हणाली...! वडिलांनी गुमान पैसे काढून दिले. दहा हजार रुपये..
         पण प्रकरण आणखी आहे.परिक्षेच्या आधी आठ दिवसांपासून मुलगी प्रचंड अस्वस्थ दिसायला लागली. दिवसरात्र सारखी रडायची. घरच्यांनी तिला कारण विचारलं.तर तिनं सांगितलं, "झेरॉक्स काढण्यासाठी ज्या दुकानात गेली होती,त्यानं परिक्षेच्या आधी पेपर देणार म्हणून सांगितलं होतं आणि प्रत्येक पेपरसाठी दीड हजार रुपये यानुसार नऊ हजार रुपये घेतले होते. म्हणून सगळेजण निवांत निर्धास्त होते.  आणि आता अचानक तो माणूस "मी प्रश्न देतो,पण तेच प्रश्न पडतील ह्याची गॅरंटी नाही"असं म्हणायला लागला. त्यामुळं सगळ्यांची पाचावर धारण बसली..!" आता अभ्यासच केलेला नाही, हजारो रुपयांच्या नोट्स हातात आहेत, पण कुठल्या नोट्स कशाच्या आहेत हेसुद्धा पाहण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळं, ऐनवेळी एवढा भलामोठा अभ्यास होणार कसा? याचं टेन्शन आलं..! 
          स्वातंत्र्य मिळालं तरी ते नेमकं वापरायचं कसं? कुठं? किती? केव्हा? आणि कशासाठी? ह्याची स्पष्टता नसेल तर, तेच स्वातंत्र्य अनर्थाचं कारण होऊन बसतं. "आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण केलं बघा" असं म्हणणारे पालक नक्की काय सुचवू पाहत असतात? याचा जरा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. "तो म्हणेल तसं सगळं केलं, त्यानं जे जे मागितलं ते ते दिलं, सगळ्या सोयी केल्या, गाडी दिली, लॅपटॉप दिला, फोन दिला. पण ह्याला साधं पास होणं सुद्धा जमेना.." असं म्हणणारे कित्येक पालक आहेत. ह्यांच्या मुलांची माहिती काढून बघितली की,धक्काच बसतो. कारण,ज्या गोष्टींची अजिबात आवश्यकता नाही,अशाच कित्येक गोष्टी पालकांनी सोय म्हणून दिलेल्या असतात. 
         उदाहरणार्थ, एसी. "अभ्यासात व्यत्यय नको,उकाड्याचा त्रास नको,निवांत अभ्यास व्हावा, म्हणून मुलाच्या खोलीत एसी बसवला. एसी बसवल्याचं भरमसाठ बिल यायला लागलं. तेही भरलं. पण हा एसी लावून चक्क झोपा काढतो. दिवसासुद्धा बेडवर अंगभर रग पांघरून घेऊन बसतो. लोळत पडतो. अभ्यास तर लांबच राहिला. पण आता त्याचं घरातल्या घरात हॉलमध्ये येणंसुद्धा बंद झालंय. एसी नाही तिथं बसवतच नाही, असं म्हणतो. घरी अभ्यास होईना हे लक्षात आलं, म्हणून आम्ही अभ्यासिका लावली. तर तिथंसुद्धा ह्यानं एसी असलेलीच अभ्यासिका बघितली. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हा एसी बसवला असं झालंय आता."अशी तक्रार घेऊन दोनच दिवसांपूर्वी एक पालक आले होते.
      दुसरं उदाहरण,म्हणजे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं लायसन्स. "तसा तो सहावी-सातवीत असल्यापासूनच गाडी चालवायला लागला.मीच शिकवली गाडी. म्हटलं, मला मिळाली नाही, त्याला मिळू देत. सोसायटीच्या आजूबाजूला चालवायचा. आठवीपासून सकाळी लवकर ट्यूशन असायची. त्याला गाडी घेऊन जायचा. तेवढाच वेळ वाचेल म्हणून आम्हीही दुर्लक्ष केलं. दहावीची परिक्षा झाल्या झाल्या लगेच लायसन्स काढून दिलं. बारावीच्या परीक्षेनंतर लगेच फोर व्हीलरचं लायसन्स काढून दिलं. आता रात्री- अपरात्री फोर व्हीलर घेऊन फिरतो. रोज कॉलेजला कार घेऊन जातो. रात्री दोनच्या आत घरी येत नाही. सकाळी अकरा वाजेपर्यंत उठत नाही. घरचं एकही काम करत नाही. घरचं जेवण नको असतं. रोज कुठल्या न कुठल्या मित्राचा वाढदिवस असतोच. मग रात्री कार घेऊन फिरायचं, बाहेरूनच खाऊन यायचं आणि झोपायचं. कुठून झक मारली आणि ते लायसन्स काढून दिलं असं झालंय आता.." असं रडणारे कितीतरी पालक दर आठवड्याला मला भेटतात.आताशा अशा पालकांचं प्रमाण वाढायला लागलंय.
         ज्याची अजिबात आवश्यकता नाही,अशा गोष्टी आपण मुलांना सोयीच्या नावाखाली का देतो? आणि त्या गोष्टींचा खरोखरच जो वापर अपेक्षित असतो, तोच वापर आपली मुलं करतात का? हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या मुलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं सामाजिक आयुष्य आणि त्यांचं करिअर हा चौरस जर नीट जुळायला हवा असेल तर मुलांना सोय म्हणून देत असलेल्या गोष्टींबाबत दक्ष व्हा. पूर्ण आणि साधकबाधक विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ऐपत हा मुद्दा पूर्ण बाजूला ठेवा आणि 'गरज की चैन ?' याची स्पष्टता आधी मिळवा. सोयीसुविधांचा अतिरेक टाळायला सुरुवात करा. आणि *"आम्हाला आमच्या वयात मिळालं नाही, म्हणून देतो"हा राग आळवणं बंद करा. कारण,त्यातला प्रत्येक सूर विसंवादीच आहे.* 
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले" ही जशी वस्तुस्थिती आहे, तशीच " घाम गाळून कष्ट केल्याशिवाय आणि त्याचं अपेक्षित फळ मिळवून दाखवल्याशिवाय काहीही अधिकचं मिळणार नाही" हा नियम कुटुंबात रुजवण्याची फार आवश्यकता आहे.पण असे निर्णय घेणं पालकांना फार जड वाटतं. धाडस होत नाही. मुलांना नाही म्हणणं जमत नाही. कठोर व्हायला नको वाटतं.
        पण खरंच एक फायद्याची गोष्ट सांगतो, ज्यांच्या मित्रपरिवारात चांगल्या समुपदेशकांचा अंतर्भाव आहे, ज्यांच्या कौटुंबिक मित्रांमध्ये कुणी उत्तम काऊन्सेलर आहे, आणि वेळप्रसंगी प्रत्येक महत्वाचा निर्णय घेताना त्याच्याशी चर्चा करुनच गोष्टी ठरवल्या जातात, तिथं समस्या कमी असतात. म्हणून,"काऊन्सेलरशी नित्य संवाद" फायद्याचा..! 

@everyone 
©️ मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, करिअर काऊन्सेलर 
संचालक - प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

290. साठीच्या व्यथा, पिंजऱ्यातील बाप

         प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने बहुतेक घरात साधारण हीच परिस्थिती असते.बहुतेक सगळेच बापांना नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातात, आणि त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोप ठेवले जातात. घरोघरचे आरोप त्याच त्या स्वरुपाचे असतात आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की ,आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी  करताना आयुष्यभर स्वत:लाच शिक्षा देत आलो, त्यांनीच का बरं आपल्यावर आरोप पत्र ठेवावं ? वाढलेल्या वयात, मानसिक ताण सहन होत नसतानाही का त्या आरोपांसाठी होणार्‍या उलट तपासणीला सामोरं जावं.
         तुम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले ? हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुम्ही, ते तर सगळेच बाप करतात,” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते. तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही ! असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं ? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं. अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती. तुम्हाला दूरदृष्टीच नाही ! ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 
         माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय ? असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक. म्हणून रूजू झाली. तुम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो ?  तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला,खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता.समाजात एक वेगळा स्टेटस् ,दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते,काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले. आता ती हा विचार मात्र करत नाही की, तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही, शोभत नाही, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.
        मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो, त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे ?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं. तुम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात. विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना, एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो.जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व  संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे. आता बापांनी आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा. जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा.  
         ज्यांच्यासाठी  त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे ना. एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत, मस्तीत व्यतीत करायचं. सकाळ  संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतीत करायचे, त्यांचेशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासायचे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 
         शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे", "ये तो होना ही था."
       माझ्या सर्व मित्रांनो, आपल्याला हे पिंजऱ्यातील जीवन तितकेच आनंदात जगायचं आहे. जमेल  मित्रांनो,पहा प्रयत्न करुन !!!

(लेखक :-- प्रत्येक सामान्य बाप..!)
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

288. उपरती...

   “जरा म्हणून व्यवस्थितपणा नाही अंगात… काम थोडं अन् पसारा जास्त!” सुमनची भुणभुण. “जाळे पहा रूम मध्ये… आईच्या घरी काय केलं काय माहित?” इति सुमन.
      “साधी वरणाची फोडणी जमत नाही तिला, म्हणून बोलावं लागतं! मला काय हौस थोडीच आहे ओरडायची?” प्रभाकरला ऐकू जाईल असं मोठ्या आवाजात सुमन बोलली.
      “काहीही बोललं की हसण्यावर घ्यायचं…. जराही गंभीरपणा नाही. कसं होईल ते होवो बाबा! मी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर अवघड आहे रे बाबा पराग तुझं ! घर व्यवस्थित ठेवता आलं नाही, पोटाला चांगलं चवदार खायला नाही मिळालं तर मग काय फायदा?” सुमन नेहेमीप्रमाणे तक्रारीचा पाढा पराग समोर वाचू लागली. 
       गेल्या आठ दहा दिवसांपासून हे रोजचंच झालं होतं. सुरूवातीला परागने ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं, पण गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यालाही आईचं म्हणणं पटू लागलं. नेहेमी आनंदी आणि उत्साही रहाणारा पराग थोडासा परेशान, त्रस्त राहू लागला. नेहा माहेरी गेल्यावर फोनवर नेहेमी हसत, थट्टा विनोद करत नेहाशी बोलणारा पराग यावेळी मात्र तुटक बोलू लागला.
       नेहा आणि पराग लहानपणापासून एकाच वर्गात शिकले आणि वयात आल्यावर एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्याच वर्षी लग्नबंधनात अडकले. दोघंही सतत उत्साही आणि हसतमुख असणारे, थट्टामस्करी करणारे आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवणारे.
      शिक्षण झालं, दोघांचे जॅाब सुरू झाले आणि आता लग्नही झालं. जसा पराग वागायचा तशीच नेहाही अगदी मनमोकळेपणाने सासरी वावरायची. परागसोबत गप्पा, थट्टामस्करी, येतायेता बाहेर काहीतरी खाऊन येणं, आवडलं ते खरेदी करणं, सगळं पुर्वीसारखंच ! 
      खरं म्हणजे त्यात काही गैर नव्हतंच, पण सुमनच्या हे पचनी पडत नव्हतं. लग्नानंतर काही दिवस तिने दम पकडला. पण दोनेक महिन्यातच हळूहळू आवाजातला नाराजीचा सुर कडक ओरडण्यात आणि रागावण्यात बदलला.
       पराग कडून नेहाला सुमनच्या तापट आणि शीघ्रकोपी स्वभावाची ऐकून माहिती होतीच आणि आता पुरेपुर अनुभवही येत होता. सुमनच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तिने स्वतःत भरपूर बदल करून घेतले. सुमनचं बोलणं, टोकणं, शेरेबाजी, टोमणे ती हसतच स्वीकारायची आणि त्याप्रमाणे वागायचा शक्य तितका प्रयत्न करायची. नेहा गुपचूप ऐकते, उलट उत्तरं देत नाही हे लक्षात आल्यावर तर सुमन कोणतीच संधी सोडेनाशी झाली.
       आठदहा दिवसांपूर्वी मात्र छोट्याशा कारणावरून दोघींत थोडीशी धुसफुस झाली, गोष्ट पराग पर्यंत गेली सुमनमुळे. परिणामी नेहा आणि पराग यांच्यातही धुसफुस सुरू झाली आणि बरीच वाढली. 
      प्रभाकरने मधे पडत दोघांची समजूत काढली. “नेहा बेटा, चार आठ दिवसांसाठी तुम्ही दोघं कुठेतरी जाऊन या, जरा बदल झाला की आपोआप सगळ्यांचीच चिडचिड कमी होईल!”
      “मला आता वेळ नाही…” पराग तणतणत म्हणाला.
      “मला तरी कुठे सुट्टी आहे? मी ही रिकामी नाही…” नेहा.
       “नेहा, पराग ताणलं तर तुटतं! सोडलं तर टिकतं! ताणाताणी होऊ लागली तर एकानं माघार घ्यावी, विचार करण्यासाठी अवधी आणि अवकाश द्यावा, असं माझं मत!” प्रभाकर परत समजावणीच्या सुरात म्हणाला.
       सुमन मात्र निवांत पेपर वाचायचं निमित्त करून यांचं बोलणं ऐकत बसली, जणुकाही जे झालं त्यात तिची काहीच भुमिका नव्हती!
      “पराग तु किंवा नेहा दोनचार दिवस आत्याकडे जा आणि तिथून ॲाफिस करा, मी सांगतो तिला तसं!”
      “बाबा मी जाते आठ दिवस , पण आईकडे माहेरी, आत्याकडे नको!” नेहा शांत होत म्हणाली.
       सकाळीच नेहा बॅग भरून माहेरी निघून गेली. पराग चिडचिडत होता आणि सुमन नेहाच्या चुकांचा पाढा वाचून त्यावर फोडणी देत होती. पराग ॲाफिसला निघून गेला.
      “बस सुमन जराशी, तुलाही आराम हवा! नेहावर आणि तिच्या चुकांवर सारखं लक्ष ठेऊन तुही दमली असशील!” प्रभाकर म्हणाला.
     “मी काय मुद्दाम करतेय का? मला समजतंय, मी तिला बोललेलं तुम्हाला पटत नाही ते. पण मग तिला आपल्यासारखं वळण कसं लावणार?” सुमन रागात बोलली.
      “आपल्यासारखंच तिने बनावं हा हट्ट कशासाठी?”
      “परागसाठी! कारण परागला आपली सवय आहे.”
      “त्यांचं सहजीवन, त्यांचा संसार आहे. ती दोघं ठरवतील कुणी कुणासाठी किती बदलायचं ते ! आपण नाही!“
      “असं कसं? पराग का बदलेल तिच्यासाठी त्याच्या आवडीनिवडी आणि सवयी?“
      “पराग साठी नाही पण ती तुझ्यासाठी तिच्या वागण्याबोलण्यात, उठण्याबसण्यात, स्वयंपाक आणि ईतर कामात तुझ्या कलाकलाने बदल करतच आहे की! ते नाही का लक्षात येत तुझ्या? तिच्या चुका दिसतात, पण त्या दुरूस्त करायची धडपड दिसत नाही. 
       काल पहिल्यांदा उलट बोललेलं दिसलं आणि थेट परागपर्यंत तु विषय नेलास! इतक्यांदा तु तिच्यावर रागावलीस, पाडून बोललीस, तिने वाढवला का विषय? तुझं बोलणं हसत स्वीकारलं तिने प्रत्येक वेळी. परागवर रागावते का तु असं?
       नेहाने टापटीप सगळं काम उरकावं असं तुला वाटतं ,पण परागने फेकलेला टॅावेल असो वा मोजे, ते तुला दिसत नाहीत? दोघंही सारखीच शिकलेली आणि बाहेर सारखंच कर्तुत्व दाखवणारी, मग हा फरक का करतेस? अशानं परागला स्वतःच्या बेफिकीर वागण्याची तर जाणिव होणार नाहीच, पण नेहाने स्वतःत केलेले बदल आणि घरकामाचे कष्ट याचीही होणार नाही !”
      “बायकांचं कामच असतं ते, मी नाही का बदलले तुमच्या साठी?”
       “बायका निसर्गतःच नव्या वातावरणाशी अगदी सहजतेने जुळवून घेऊ शकतात म्हणून त्या बदलतात. पण प्रत्येक वेळी त्यांनीच तडजोड करावी असं मी आपल्या संसारातही कधी वागलो का?”
      “नाही. पण….”
      “नेहा आपल्या घरी परागसाठी आलीय, आपल्यासाठी नाही, हे तर मान्य आहे ना?”
       “हो.”
       “ मग ती परागला जसं आवडतं तसं वागतेय, शिकतेय ते त्याच्यावरील प्रेमासाठीच ना? तु तिला इतक्यांदा बोललीस, तिने कधी परागकडे चुगली केली?”
       “नाही.”
       “पण ती तुला बोलल्याबरोबर तु परागला यात ओढलंस आणि तो तिला रागावला. नवरा जर प्रेमाने वागत असेल तर कोणतीच सुन सासरच्या इतर मंडळीचं बोललेलं मनाला लावून घेत नाही. पण जर ज्याच्या भरवशावर ती इथे आलीय तोच बोलू लागला तर ती स्वतःला मानसिकरीत्या असुरक्षित समजते आणि ऐकणंही सोडते.”
      “हम्म…”
       “मला वाटतं घरात आनंदी आनंद हवा असेल तर, तु परागच्या मनात तिच्याविषयी काही भरू नकोस. उलटपक्षी ज्यासाठी तिला बोलतेस त्याच चुका आपला राजकुमारही करतो, तेव्हा त्यालाही त्याच्या चुका दाखव ! त्याच्या पसाऱ्यासाठी तिला जबाबदार धरू नकोस. पटतंय का?”
       “खरंच की! नेहा तशी खुप चांगली मुलगी आहे. पण माझ्याच वागण्यात सासूपणा आणि दूजाभाव आला आणि तिला रागात बोलणं वाढलं .चुकलंच हो माझं! आता काय करायचं?”
      “काही नाही, आपल्यामुळे त्यांच्या मनात दरी पडेल, एकमेकांविषयी अढी निर्माण होईल असं वागायचं, बोलायचं नाही. कधी त्यांच्यात दुसऱ्या कोणत्या कारणाने वितुष्ट आलं तर ते दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. ती सुन म्हणुन जितक्या पटकन तिच्या चुकांवर बोट ठेवतो तितक्याच पटकन परागचीही चुक त्याला दाखवून द्यायची. जितक्या मोठ्या मनाने परागच्या छोट्याछोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तसंच नेहाचं करतानाही मोठेपणा दाखवायचा! बास्स, बाकी काही नाही!”
      “अहो खरंच की! माझं सगळं आयुष्य आत्तापर्यंत परागच्याच अवतीभवती करण्यात गेलं, तोच माझं विश्व होता. नेहा आली आणि वेळेची विभागणी झाली. पण मी त्याला चुकून प्रेमाची विभागणी समजले आणि मीच किती चांगलं परागचं लक्ष ठेवते हे सगळ्यांवर बिंबवत गेले. पण मनात नेहासाठीही तोच प्रेमाचा भाव ठेवला तर दुप्पट प्रेम मिळेल हे विसरले! चला आता पटकन आवरा बरं, बाजारात जायचंय!”
       “बाजारात? कशासाठी?”
       “कशासाठी काय? पहिला संक्रांतसण आहे नेहाचा, मस्त पैठणी आणि तिळगुळ घेऊन जाऊ तिच्या माहेरी आणि तिला घेऊन येऊ. नातं तिळासारखं पुष्ट आणि गुळासारखं घट्ट बांधून ठेवणारं नको का करायला?”

लेखिका  : रश्मी लाहोटी. ©️

289. माणसाला आनंदी ठेवणारी चार संप्रेरके..

     बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, "असे का वाटते तुला?"
"मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे. पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे."
आता मी स्वतःला विचारू लागलो की खरच मी स्वतः आनंदी आहे का?
काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला - नाही ! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.
माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?
आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.
त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.
तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-
१. एंडॉर्फिंस
२. डोपामाईन
३. सेरोटोनिन
४. ऑक्सिटोसिन
आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.
इंडॉर्फिंस
आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.
हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.
मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.
हसणे हा इंडॉर्फिंस निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे.
आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.
डोपामाइन
आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.
जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.
यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.  आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?
सेरोटोनिन
जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.
जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.
हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.
ऑक्सिटोसिन
हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो.
जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.
मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.
तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.
तर मित्रांनो, खूपच सोपे आहे.
दररोज व्यायाम करून इंडॉर्फिंस मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा! 😊😊
अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल.
आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. 
आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी...
१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा.-इंडॉर्फिन
२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका.-डोपामाइन
३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा.-सेरोटोनिन
४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.-ऑक्सिटोसिन
*आनंदी राहा, मस्त जगा! *साभार 🙏

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

287. आमचाही एक जमाना होता...

बालवाडी हा प्रकार नव्हता.
पुढे 6 वर्षा नंतर स्वतः च शाळेत जावे लागत असे.  
सायकलने/ बसने  पाठवायची पद्धत नव्हती.
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
 भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.
  
पास / नापास हेच आम्हाला  कळत होतं...
%  चा  आणि आमचा संबंध कधीच नव्हता.
शिकवणी लावली,  हे सांगायला लाज वाटायची....
 कारण  "ढ" असं  हीणवलं जायचं...
पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून 
आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...

कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून
पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता
हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो 
त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, 
हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...

 वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि  
विकत घेण्यात  आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.   
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व 
दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो?
हे आता आठवतही नाही...

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन 
उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळला जाताना 
आमचा  'ईगो' कधीही आडवा  येत नव्हता, 
खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं...

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. 
मार खाणारा यासाठी की,  'चला, कालच्यापेक्षा तरी  आज कमी धोपटला गेलो  म्हणून 
आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून......

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी 
लाकडी बॅट ने  वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट
खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. 
छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. 
सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.

 आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, 
आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला 
आय लव यू' म्हणणं माहीतच नव्हतं...

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. 
काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही 'काय माहीत....?'
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि 
स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय 
ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र, कुठे हरवलेत ते...!

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, 
आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो........
कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं 
आम्हाला कधी जमलंच नाही. 
भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो 
हे आम्हाला माहीतच नव्हतं.

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने 
आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला  जगायला मदत करतायत.
जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी  काहीच तुलना होणार  नाही.,,,,,,,,

आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही  एक 'जमाना' होता.....

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

286. नजर...

           खूप लोकं म्हणतात रवी तू खूप समाजसेवा करतो राव, तुला प्रवासामुळे खूप संधी मिळतात असं करायला. पण मला वाटते असे काही नसते. प्रत्येकाला आपल्या सभोवताली संधी असते, गरज आहे ती फक्त नजरेची. डोळे आणि मन उघडे असेल तर दिसते आपल्याला. फक्त ती "नजर" हवी, बस, जमलंच मग. असो तर झालं असं...
        वेळ सकाळी 10 ची. तपोवन एक्सप्रेसने औरंगाबादला निघालो होतो. रिझर्वेशन असल्याने सीटचं टेंशन नव्हतं पण सीटपर्यंत पोहचायला 10 मिनिट लागले. कुणी जर या मार्गावर तपोवन, जनशताब्दी या गाड्यांनी कधी प्रवास केला असेल तर त्यांना माहीत आहे की किती भयानक गर्दी असते या गाड्यांना 12 ही महिने. त्यात मुंगीला ही घुसायला जागा नसताना खाद्य विक्रेते दर एकमिनिटाला 5 ते 10 लोक गर्दी तुडवत असतात. रिझर्वेशन डबा हे काय असते हे पण लोकांना जणू माहीतच नसते, आरक्षित लोकांपेक्षा अनारक्षित लोकं 4 पट असतात बोगीत. अश्या भाऊ गर्दीत बरीच लोकं खाली बसलेले असतात.  माझ्या सीटपासून तीन सीट पुढे खाली एक 75 वर्षाचे म्हातारे बाबा बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाणी विक्रेत्याला विचारत होते, 
बाबा : केवढ्याला रं दादा पाणी.
विक्रेता : 20रु बाबा, देऊ का ?
बाबा : नगं.
       असं दोन तीन वेळा झालं आणि माझं लक्ष गेलं. मी समजलो बाबांकडे पैसे नसतील किंवा कमी असतील. मी पटकन माझी बाटली काढली आणि उठलो पुढच्या सीटवर बसलेल्या सभ्य गृहस्थाला म्हणालो : साहेब एवढी बाटली त्या बाबांना देता का प्लिज ? करडी नजर माझ्यावर टाकून त्या माणसाने जरा नाखुषीने ती बाटली त्या बाबाला दिली. बाबांनी बाटली घेतली काही विचार न करता गटगट पिऊन टाकली. सर्व शांत झाले, कुजबुज सुरू झाली आजूबाजूला, बाजूच्या सिटवरच्या आजीने थम दाखवून माझं कौतुक केलं. पण मी समजलो बाबा खूप तहानलेला आहे. एक पाणीवाला आला मी एक बाटली घेतली आणि परत पुढच्या माणसाला ती बाबांना द्यायला लावली, बाबांनी परत ती एका घोटात अर्धी संपवली आणि त्या माणसाकडे पाहत दोन्ही हात जोडले. आता मात्र तो माणूस जरा नरमला आणि बाबांना बोलला : बाबा मी नाही ह्या मागच्या साहेबांनी दिलं ते.
बऱ्याच सीटचे डोळे माझ्याकडे वळले. 
पुढच्या सीट वर एक घरंदाज आणि श्रीमंत दिसणारी एक स्त्री बसली होती, उठली वळून पाहत मला म्हणाली : छान केलंत, आम्ही जवळ असून आम्हाला नाही सुचलं, पण या पुढे लक्षात ठेवेन, धन्यवाद तुमच्यामुळे चूक उमगली.
मी : थँक्स मॅम, फार काही मोठं नाही केलं, माझे आजोबा आठवले बाबांना पाहून, म्हणून पटकन पाणी दिलं बस.
ती : अहो पण हे पण सुचायला हवं नं ?
त्या बाईचा आवाज एवढा मोठा होता की सर्वच माझ्याकडे कौतुकाने पाहत होते.
मला जरा अवघडल्यासारखे झाले.  मी मंद हास्य केलं बस.
बरीच चर्चा झाली त्यावर आणि सर्व शांत झालं, प्रत्येकाला वाटलं की हे आपण पण करू शकलो असतो.
पण मित्रानो खरी गम्मत अजून संपली नव्हती, कसं असतं ना, ती नजर च हवी.
गाडी मनमाड ला येऊन थांबली, बरीच लोकं खाली उतरतात चहा, नाश्त्याला. मी उठलो बाबांकडे गेलो आणि म्हटलं : बाबा या खाली.
बाबा : नको नको जागा जाईल म्यावाली. 
मी : नाही जाणार या.
बाबा खाली आले, 
मी : बाबा काही खायचं का?
बाबा : नको
मी : का? तुम्ही तर उपाशी आहात, दीड बाटली घोटात पिणारा माणूस म्हणजे उपाशी असणारच.
बाबांच्या डोळ्यात पाणी आले.
बाबा : काल दुपार धरून अन्नाचा कण नाही बा पोटात.
मी : आलं लक्षात बाबा, या काय घेता सांगा.
बाबा : भजी घे बाबा, नको उगा तुला फटका.
एक प्लेट भजी, दोन पाव,आठ दहा मिरच्या, चार इडल्या, चटणी, घेऊन दिलं. म्हटलं बाबा बसा इथंच घ्या खाऊन, गाडी थांबते 20 मिनिटे. खाऊन झालं आणि बाबा आणि मी मस्त चहा पिलो.
सर्व मंडळी खिडकीतून आमच्याकडे पाहत होती. रेल्वेने हॉर्न दिला, आत आलो, आपापल्या जागेवर बसलो. 
मघाची ती घरंदाज स्त्री उठली आणि म्हणाली : सर करोडपती आहे मी घरची. नेहमी कारनेच प्रवास असतो. पण आज ट्रेनने यावे लागले काही कारणांनी. पण येऊन आज सार्थक झालं माझं. डोळे उघडले कायमचे आणि तुम्ही तर परत बाबांना खायला देऊन आमच्या परत कानाखाली मारली. एवढं पाणी पिल्यावर आम्हाला का नाही सुचलं हे. पण , भाऊ म्हणू का तुम्हाला ? 
मी : हो हो का नाही.
ती: भाऊ शपथ घेते की यापुढे एकही संधी नाही सोडणार कुणाला मदत करायची. मी एक शिक्षिका ही आहे पण आज जाणवलं की अजून खूप शिकायचंय आयुष्यात.
मी काय बोलणार यावर, म्हटलं ताई जगात वाईट कुणीही नसतं, तुम्ही नका मनाला लावून घेऊ.
संधी आपल्या आजूबाजूलाच असतात, फक्त ती "नजर" हवी बस.  दृष्टी तर जन्मजात मिळत असते. पण कमवायची असते ती नजर. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखण्याची...  

लेखक- अनामिक. 
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

285. हार्मोन्स...

  दुपारच्या निवांतक्षणी फोन वाजला. स्क्रीनवर "आई" नाव वाचून मी सुखावले. आईबरोबर गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानी ! हा आनंदाचा ठेवा लुटायला मी नेहमी अधीर असते..... माहेर दूर असल्याने प्रत्यक्ष भेटीचे योग दुर्लभच, त्यामुळे ह्या शब्दभेटीवर आम्ही मायलेकी समाधान मानतो.
        ख्यालीखुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, "अगं, नुकतंच "गुरुचरित्राचे कथाप्रवचन " ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत !  ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला."
        आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश ! गुरुभक्ती, नामसाधना, सत्संग असे अनेक विषय तिच्या रसाळ गप्पांतून मला प्रसन्न बनवत होते. आई सांगत होती, "समोरच्या 'श्रावणधारा' हौसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती - श्रद्धा यांचे दाखले देत किर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी - जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना, श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतां पती-पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ. कडे आलेली ही केस.....
        साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषांप्रमाणे दाढी - मिशा येत होत्या. दाट दाढी आणि मिशा. ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी ! कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित ,तज्ज्ञ स्टाफ !  माहेरही तसेच Wel - Educated ! दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली. अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित.उपाय दिशाहीन.  पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढीमिशीसारखी ही दाढीमिशी रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला आँफिसला जावे लागे. कोणीतरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या. ह्या उच्चपदस्थ ,स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडीपरिक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.
        सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मनमोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, "हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला, त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बाँस ही तुमची प्रतिमा ! कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार ! कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील. तो ताणतणाव, बाँसचा अँटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या मनात, तुमच्या रक्तात, नसानसात भिनलाय. खरंतर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरूषी स्वभावाचे लक्षण आहे. स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे मनातच दडपले.....आणि आँफिसरूटीनचे पुरूषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; मनात भिनविले , ते ह्रदयात, काळजात रुतून बसले की  20-22 वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे हार्मोन्स बदलले. 'स्त्रीत्व' संपून ते 'पुरुषी' बनू लागले. त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढीमिशा !
        बाई दचकल्या.... हे निदान अनपेक्षित होतं.... तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, "यावर उपाय आहे, तुमचा अँटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना,पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला ! 'स्त्री' सारख्या दिसा ! केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा."
          बाई स्तंभित. डॉक्टरनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दिड महिन्यात फरक जाणवला. दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ....
         डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नाँर्मल झाल्या !"
         आई थांबली, म्हणाली, " घटना ऐकताना मला तुझी आठवण आली. तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी.....
         सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला धन्यवाद देत मी फोन ठेवला.

सुमन संतोष पाटणकर
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

284. मोह-आसक्तीचे चक्र...

        एक सेठजी होते. बऱ्यापैकी म्हातारे झाले होते. धान्याची चक्की होती, ते त्यांच्या दुकानात बसले होते, म्हातारा असूनही तो दळत होता. चालता चालता म्हणत- "या जीवनापेक्षा मरण बरे." त्याचवेळी एक साधू दुकाना जवळून जात होते. सेठजींचे हे शब्द ऐकले, वाटले किती दुःखी आहे हा माणूस. त्यासाठी मदत केली पाहिजे.
'साधु त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले - सेठ, तुम्ही खूप उदास दिसत आहात. माझ्याकडे एक अशी विद्या आहे! तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला स्वर्गात नेऊ शकतो. चालले तर जाऊया. इथल्या दु:खांपासून मुक्ती मिळेल. सेठने साधूकडे पाहिले; म्हणाले- “तुम्ही खूप दयाळू आहात, पण मी कसे जाऊ? मी एवढा म्हातारा झालो आहे, तरीही मूल झाले नाही. मला मूल झाले तर मी नक्की जाईन. साधू म्हणाला - "खूप छान." आणि निघून गेले.
काही वर्षांनी सेठला दोन मुलगे झाले. साधू परत आला आणि म्हणाला - "चला शेठ! आता तुला एक मूल आहे. सेठ म्हणाला – “हो, ती गेली, पण ती अजून पात्र नाही. पोरं थोडी मोठी झाली की तूम्ही या. मी नक्की जाईन
मुलं मोठी झाली आहेत. साधू पुन्हा आला तेव्हा सेठ तिथे नव्हते. त्याने विचारले सेठ कुठे आहेत? तेव्हा कळले की त्याचा मृत्यू झाला आहे. साधूने योगाच्या सामर्थ्याने पाहिले की मृत्यूनंतर तो कुठे गेला? तेव्हा त्याला कळलं की दुकानाबाहेर बांधलेला बैल हा मागच्या जन्माचा तोच सेठ आहे. त्याच्याकडे जाऊन साधू म्हणाला - तू आता स्वर्गात जाशील का?
सेठ (बैल) डोके हलवून म्हणाला - "कसे जायचं?" मुलं अजूनही बेफिकीर आहेत. मी निघून गेलो तर कोणीतरी दुसरा बैल आणेल. मी जसा भार उचलतो तसाच दुसरा बैलही ओझे उचलणार नाही. त्यामुळे माझ्या मुलांचे नुकसान होईल. नाही भाऊ, मी आता जाऊ शकत नाही, अजून थोडा वेळ थांब.
पाच वर्षे उलटून गेली. साधू पुन्हा आला. पाहिले - आता दुकानासमोर बैल नाही. दुकान मालकांनी ट्रक विकत घेतला आहे. त्याने इकडे तिकडे विचारले बैल कुठे गेला? ओझे वाहून नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मग साधूला त्याच्या योगशक्तीचा वापर करून कळले.
तेव्हा कळलं की - तो सेठ आपल्याच घराच्या दारात कुत्र्यासारखा बसला आहे. साधू त्याच्याकडे गेला आणि म्हणाला - आता भार वाहण्याचा प्रश्नच नाही. आता मी तुला स्वर्गात घेऊन जातो.
कुत्र्याच्या अंगात बसलेला सेठ म्हणाला- अरे कसं घेणार! माझ्या सुनेने किती दागिने घातले आहेत ते दिसत नाही? माझी मुलं घरी नाहीत, चोर आला तर सुनेला कोण वाचवणार? नाही, नाही! तू जा, मी आता जाऊ शकत नाही. ऋषी गेले.
वर्षभरानंतर तो परत आला आणि तो कुत्राही मेलेला आढळला. त्या साधूला तो सेठ त्याच्या योगशक्तीने पुन्हा सापडला. त्यामुळे घराजवळून वाहणाऱ्या घाण नाल्यात तो किड्यासारखा बसल्याची माहिती होती. साधू त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले - "हे बघा सेठ! याहून मोठी आपत्ती कधी येईल का? कुठून कुठपर्यंत पोहोचलात.  तरीही माझं ऐका. मी तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. किड्याच्या अंगात बसलेला सेठ ओरडला - "जा इथून! स्वर्गात जायला मी एकटाच उरलो आहे का? त्यांना घेऊन जा आणि मला इथे पडून राहू दे . नातवंडांना इथे येताना पाहून मला आनंदी होतो.  स्वर्गात काय तुझा चेहरा पहात राहिल?
  बोध
  हे मोह आसक्तीच्या चक्रात अडकल्याचा परिणाम आहे. हे आसक्तीचे चक्र आत्म्याला खाली ढकलत राहते. "नाही" अशा प्रकारचे काम करू नका. काम करा, पण आसक्ती आणि आपुलकी मोहापासून दूर जा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

283. सोडून द्यावं...

एक दोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं 
मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं  सोडून द्यावं.
मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं सोडून द्यावं .
एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं  सोडून द्यावं.
संपत्ती, ज्ञान आणि इतर गोष्टी आपल्या मुठीत आणि डोक्यात  जेवढे मावेल तेवढेच घ्यावे 
आणि राहिलेले इतरांना दान तसेच सांगून सोडून द्यावं. 
स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देऊन टोमणे मारणाऱ्यांच्याकडे लक्ष देणं सोडून द्यावं. 
आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  सोडून द्यावं.
इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.
प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं.
आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं.
कोणत्याही एका विनोदावर जास्त वेळ हसता येत नाही. त्यामुळे एकाच दुखण्यावर जास्त वेळ रडत बसणे  सोडून द्यावं. 
मेंदूवर, हृदयावर कामाचा जास्त ताण पडत असेल, टेन्शन येत असेल तर अति विचार करणं सोडून द्यावं. 
चांगल्या गोष्टींचं व्यसन धरून ठेवावं आणि वाईट गोष्टीचं व्यसन वेळेतच सोडून द्यावं. 
समजलं तर ठीकच आहे, नाहीतर, हे ही सोडून द्यावं.!
कारण काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्याच धरून ठेवल्या कि पसारा होतो. गोष्टींचाही आणि आयुष्याचाही.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

282. शेवटचे सत्य आणि परमसत्य...

         मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की, मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल."
         त्याची मुलगी सारा  म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या."
थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..
मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....?
यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत."
मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची  मुलगी आहेस? "
पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..."
इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..."
सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.    
        एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, "माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते. तरी सचोटी, शिस्त  आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप-खूप श्रीमंत होते.
"आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही."
मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 
"मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?"
यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते."
आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..?
किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्यारूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हाच वारसा ठेवावा...चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते याची जाणीव सदैव मनी असू द्या... आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या... आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका... कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात...पैसा पचला नाही तर देखावा वाढतो... बातचीत पचली नाही तर चुगली वाढते... प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो... टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते...गोपनीयता टिकली नाही तर खतरा वाढतो. दुःख पचले नाही तर निराशा वाढते...आणि सुख पचले नाही तर पाप वाढते. "संयम" हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे. समोर अंधार असला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा. "शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो..."कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते... माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपडयाचीं स्तुति लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुति परमेश्वर करतो.
         आणि हो सर्वात शेवटी सत्य म्हणजेच ईश्वर आहे आणि परमसत्य म्हणजेच परमेश्वर आहे व ते आपण अंतर्मुख होऊन स्वतः अनुभवू शकतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

281. मनसोक्त...

    मालतीबाईंनी दिव्याची वात पेटवली. दिव्यात घालायला काही विशेष तेल नव्हते. खरतंर कशासाठीच काही नव्हते. एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावांकडे टाकली..त्यांच्याकडे पाहून त्यांनाच वाईट वाटले. काय हे आयुष्य! सरकारी कंपनीमधून रिटायर्ड झालेला आपला नवरा आता अंथरुणावर खिळून आहे. आताशी त्यांना काहीच समजत नाही. किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचे नाही. डॉक्टरांनी  काहीतरी आजार आहे असे लेबल लावूनदिले आहे त्यांच्या मागे.  कधीतरी माझ्याकडे नजर लावून बघतात. काय बघत असतात त्यांनाच माहिती? काय उरले आहे नक्की त्यांच्या आयुष्यात?  एकुलता एक मुलगा होता, वाईट संगतीला लागून कुठेतरी निघून गेला. कुठेतरी आपल्याच संस्कारात कमी राहिले असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी चटकन खालती ओघळले. 
       पदराने डोळे टिपून मालतीबाईंनी त्या तसबिरी मधील गणपती समोर हात जोडले आणि त्याला रोजच्या प्रमाणे प्रार्थना केली. "तुला वाटत असेल तर जिवंत ठेव नाहीतर एकदाचे घेऊन जा आम्हाला. फक्त एकाला नको दोघांनाही ने. दररोज जेवणाचा नैवेद्य दाखवते ते उगाच का? तुला त्या जेवणाची शप्पथ आहे" क्षणभर तसबिरीमधील बाप्पाकडे रागाने पाहत त्या उठल्या. मालतीबाई निस्सीम गणपती भक्त. विनायकी आणि संकष्टी कधी चुकल्या नाहीत. कसबा गणपतीला जाऊन  जास्वंदाचा आणि दुर्वेचा हार कायम स्वतःच्या हाताने केलेला वाहणार. देवासमोर बसून सगळी स्तोत्रे म्हणणार. घरातल्या घरी अभिषेक करणार आणि प्रेमाने केलेला स्वयंपाकाचा नेवैद्य बाप्पाला दाखवून मग उपवास सोडणार.  पण माधव घर सोडून गेल्यापासून त्या आतल्या आत खचल्या होत्या... आता कसबा गणपतीला जाणे नाही व्हायचे तरी जे जमेल ते घरात करायच्या. घरात असणाऱ्या एकुलत्या एक विजेच्या दिव्याला त्यांनी चालू केले. खोलीतला अंधार गुपचूप पळून गेला आणि तिथे पांढऱ्या प्रकाशाचे साम्राज्य पसरले. आता भाकरी आणि पिठले करायला घेतली पाहिजे या विचाराने त्यांनी स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला. स्वयंपाक घर म्हणायला. दरवाज्यापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती. बाजूला न्हाणीघर आणि मागच्या व्हरांड्याला जोडणाऱ्या जागेत छोटेसे शौचालय. तिथपर्यंत कसेतरी मोहनराव चालायचे म्हणून भागत होते नाहीतर त्यांना एकटीला सगळे कितपत जमले असते कुणास ठाऊक. येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शन वर ते घर चालू होते.  त्यांनी भाकरीचे पीठ परातीत घेतले तेवढ्यात बाहेरून आवाज आला, 
"मालती मावशी, येऊ का?"
तेव्हढ्याश्या दिव्यात त्यांना कळले नाही की बाहेर कोण आहे. गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू चालत त्या दारवाज्यापाशी आल्या.  बाहेर एक गोरापान तरणाबांड मुलगा, खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता. 
"ओळखले नाही का मावशी?"
मालतीबाईंनी खरंच ओळखले नव्हते. त्या नुसत्याच उभ्या राहिल्या.
"अहो मावशी, मी अथर्व. तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो...काही आठवले का?"
मालतीबाईना काही आठवेना. पण तो एवढे म्हणतो आहे तर असावे हा विचार करून त्या म्हणाल्या, "ये ना रे, ये!" 
तो आत आला आणि एकदम मोहनरावांनी डोळे उघडले...
"अहो, अथर्व आला आहे...आपल्या कोकणातील घरासमोर राहायचा...आठवतेय का?"
त्यांनी एक क्षणभर त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाही. 
" पुण्यात आलो होतो..तुम्ही काही गावी येत नाही. तुमचा पत्ता मिळाला आणि म्हणले भेटून घ्यावे तुम्हाला."
"बरे केलेस हो, नाहीतर आम्हाला भेटायला कोण येते आजकाल? आमचा माधव गेल्यापासून आम्ही दोघे म्हातारे एकटेच..त्यात यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही. 1 तारखेला पेंशन घ्यायला जायचे तेवढे. बाकी दूधवाला, भाजीवाला, किराणा सगळे घरीच येऊन देतात. खालती राहणारा छोटू माझे लाईट बिल भरून देतो. आता मी कुठे जात नाही... ना बाहेर, ना कोकणात..आता आम्ही इथेच...शेवटपर्यंत. मनातला हुंदका दाबत त्या म्हणाल्या.
अथर्व ने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिले.
थोड्या वेळाने मालतीबाई शांत झाल्यावर त्यांनी विचारले, "अथर्व पिठलं भाकरी चालेल ना रे तुला?"
त्याने हसून मान डोलावली. 
त्यांनी भाकरी चे पीठ मळायला घेतले. चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचे पीठ काढले.
 "मावशी, तुम्ही कोकणातील घरी आता येणार नाही का परत?" 
 "आता काय करू येऊन? ज्याच्यासाठी जागा घेतली तोच आम्हाला सोडून गेला. आता तिथे जाऊन काय करायचे? आमचे कोणी सुद्धा तिथे नाही" 
 "पण तिथे बाकीचे लोक आहेत की. पुणे सोडून या तिकडे. गावाची हवा घेतली की तुम्हा दोघांनाही बरे वाटेल." 
 "एकदा केला होता विचार, पण तिथे हॉस्पिटले नाहीत. रात्री बेरात्री यांना काही लागले तर कुठे धावपळ करायची? त्यामुळे इथेच पुण्यात बरं आम्हाला. इथला मालक महिन्याला फक्त 200 रुपये घेतो आमच्याकडून जागेचे. आता यांना 9000 पेन्शन आहे. यात सगळे आम्ही भागवतो. जे उरेल ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी जपते" 
"पण तुम्ही सोने विकून ती कोकणातील जागा घेतली होती ना?"
त्याचे हे बोलणे ऐकून त्यांनी  चेहरा तिकडे घेऊन आपले डोळे लपवले.
"मावशी...?"
"काही नाही रे,  कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन करू शकत नाहीत ना...आता वय झाले...साठीला पोचले की मी." त्या हसत म्हणाल्या.
तो ही हसला...
 दोन क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या, "सगळ्या गावाला माहिती आहे हे. पुण्यात घर घेता येणार नाही म्हणून ह्यांच्या ओळखीने एक जागा कोकणात मिळाली. हे रिटायर्ड  झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडे जाऊन राहणार होतो, आंब्याची शेती करणार होतो. जेवढे सोने होते तेवढे मोडून घर घेतले. मोठी जागा मागे..वाडीच बनवायची होती तिथे....आम्ही दर सुट्टीत तिथे जाऊन राहायचो.चांगले 2 महिने तिथे असायचो. हे कुठून कुठून आंब्याची रोपे घेऊन यायचे आणि मी त्यांची काळजी घ्यायचे... खूप स्वप्ने पाहिली होती त्या झाडांबरोबर....पण आमची सगळी स्वप्ने माधव घेऊन गेला...आता 3 वर्षे झाली त्याला जाऊन ...तो येणार नाही परत हे आता मी मान्य केले आहे"
"हे म्हणाले होते की, मालते तुझे सोने आत्ता घेतोय पण आपण गावी जाऊन एवढे आंबे पिकवू की तुला सोन्याने मढवेन बघ. कसले काय आणि कुठले काय? जे राहिले ते राहिलेच." 
बोलता बोलता पिठले भाकरी तयार झाले. मालतीबाईंनी त्यातला एक भाग फोटोतल्या गणपतीसाठी काढून ठेवला. दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचे अथर्वला दिले. 
ताटात पिठले भाकरी, लाल ठेचा आणि हिरवी मिरची असे पाहून अथर्व खुश झाला. बराच भुकेलेला दिसत होता तो. जेवणावर मनसोक्त ताव मारत होता. त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर मालतीबाईना हसू आले पण मग आपले जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण भरभर भाकऱ्या केल्या. 
"सकाळचा थोडा भात आहे घेणार का?" त्यांनी विचारले. 
याने लगोलग मान डोलावली. 
त्यांनी भाताला तव्यावर गरम केले आणि पिठल्या सोबत दिले.
मनसोक्त जेवल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन
"अन्नदाता सुखी भव." असे म्हणत तो उठला.
 मोरीत जाऊन तांब्याने हात धुवून तो परत त्यांच्या समोर येऊन बसला. 
 "खूप दिवसांनी एवढे मनसोक्त जेवलो मावशी. हाताला खूप गोडवा आहे तुमच्या" 
 त्याच्या बोलण्याने त्या प्रसन्न हसल्या. खूप दिवसांनी त्यांना सुद्धा अतीव समाधान वाटत होते. 
 "मावशी मुख्य काम सांगायचं राहूनच गेले." 
 "काय रे?" त्यांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले. 
 "तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते तेव्हा तिथे खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली. उघडल्यावर त्यात खूप सारे सोने सापडले. सरकारने ते त्यांच्या जवळ ठेवले पण तुमच्या जागेत सापडले म्हणून त्याचे 10 टक्के बक्षीस म्हणून तुम्हाला पैसे पाठवले आहे बघ." 
 असे म्हणून त्याने त्याच्या बॅगेतून एक पुडके बाहेर काढले आणि त्यांच्या हातात दिले. 
मालतीबाईंनी ते पुडके घेतले आणि बघितले तर आत खूप साऱ्या नोटा होत्या. एवढ्या नोटा त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या निःशब्दपणे त्या नोटांकडे आणि त्याच्याकडे बघत होत्या.
"एवढे पैसे???"
""मावशी तुमचेच आहेत ते. यातून तुमचे सोने पण तुम्हाला आणता येईल आणि काकांचे योग्य उपचार पण करता येतील"
"पण मी काय करू एवढे पैसे घेऊन?"
"मावशी, तुम्हीच देवाला म्हणायच्या ना, तुला वाटत असेल तर जिवंत ठेव, मग बघा त्याने म्हणूनच हे पैसे पाठवले असतील"
"अरे पण..."
""बघा त्या देवाचीच ईच्छा असेल तुम्ही अजून जगावे. छान राहावे. गावी जाऊन शेती करावी. रिटायर्ड जीवन उत्तम जगावे."
"पण त्याने खरंच माझे ऐकले असेल..?"
"म्हणून तर तुम्हाला आत्ता हे पैसे मिळाले ना? जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते"
"पण हे पैसे देण्यापेक्षा त्याने आम्हा दोघांना नेले असते तर बरे नसते झाले का?"
"असे का म्हणता मावशी? अगं आपली कर्मे केल्याशिवाय, आपले भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला? मग आता तूम्ही दोघे सुखाचे दिवस भोगा आता."
त्याचे हे बोलणे ऐकून मालतीबाई स्फुंदून स्फुंदून रडायला लागल्या. बऱयाच वेळ त्या रडत होत्या शेवटी डोळे पुसून त्या मोहनरावांकडे गेल्या. 
"अहो ऐकले का? आपल्या शेतात खजिना सापडला आहे. त्याचे पैसे घेऊन अथर्व आला आहे. आता आपण कोकणात जाऊ. परत शेती करु. तुम्हाला मी बरे करेन. तिथली माती, तिथली हवा सगळे तुम्हाला बरे करेल. आपण उद्याच जाऊयात. हा अथर्व घेऊन जाईल आपल्याला. चालेल ना रे अथर्व?"
त्यांनी त्याच्याकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना. त्यांनी दारात पाहिले, जिन्यात पाहिले कुठेही तो नव्हता. 
खालती छोटूला हाका मारून त्यांनी विचारले की त्याने एका मुलाला पाहिले का?
त्याने नाही म्हणले तेव्हा त्या एकदम दचकल्या. 
आत जाऊन त्यांनी पाहिले तर नोटांचे पुडके तसेच होते सही सलामत. पण अथर्वचा पत्ता नव्हता.
तेवढयात त्यांना आठवले,
"मावशी, मी अथर्व. तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो...!" आणि कोकणातील त्यांच्या घरासमोर तर कुठलेच घर नव्हते.
 त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटेसे गणपतीचे मंदिर घरासमोर अंगणात बांधले होते जिथं त्या रोज नेमाने पूजा आणि अथर्वशीर्ष आवर्तन करायच्या. 
 "घरासमोर मंदिर..अथर्व...गणपतीचे नाव!" 
 मालतीबाईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या धावत गणपतीच्या तसबिरी समोर गेल्या. तिथल्या तसबिरीत त्यांना त्यांचा घरातील गणपती त्यांनी स्वतः  केलेल्या नैवद्याने तृप्त दिसत होता. 
 कोकणातील त्यांचा गणपतीरुपी अथर्व आज त्यांच्या हाकेला धावून आला होता हे सांगायला की, 
 " अजून जिवंत राहायचे आहे तुम्हाला, मनसोक्त आयुष्य जगायला!" 

 लेखक : अमित मेढेकर ✍️©®

सोमवार, १० एप्रिल, २०२३

280. रेबन_गॉगल...

 “काय गरज होती एवढा महागडा फोन घ्यायची??पहिला होता ना” पप्पा चिडले.
“अहो,आता तो कमावता आहे, असेल हौस,तुम्ही नका लक्ष देऊ" आईने समजावले. 
“पगार झाला की लगेच उधळपट्टी सुरु,गरज काय फालतू खर्च करण्याची.” पपांची बडबड सुरुचं.
आई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. प्रकाश सगळे बोलणे ऐकत होता. त्यामुळे आईला टेन्शन आले. तिने खुणेने प्रकाशला गप्प राहण्यास सांगितले.
           हे घरातलं रोजचच वातावरण. बाप-लेका मध्ये नेहमीच खडाजंगी चालयची आणि आईची त्यात मध्यस्ती.
खरंतर पप्पाचा प्रकाश अतिशय लाडका. एकुलता असल्यामुळे लाड जरा जास्तच. प्रकाश मोठा होऊ लागला तसे दोघांच्यामध्ये अंतर पडायला लागले कारण दोघांचे परस्परविरोधी स्वभाव. दहावीनंतर पुढे काय करायचे यावरून दोघांचे वेगवेगळे विचार होते.त्यामुळे मोठा वाद झाला पण प्रकाशसुद्धा वडिलांप्रमाणे हट्टी म्हणून त्याने स्वतःला पाहिजे तेच केले.चांगले मार्क्स असूनही तो आर्ट्सला गेला.त्याला कला क्षेत्रात करियर करायचे होते अर्थातच पपांना हे मान्य नव्हते. हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघात जे बोलणे व्हायचे ते फक्त कामापुरते. वाद घालताना मात्र दोघेही मागे हटत नसत. दोघांमध्ये फार मोठे असे काही भांडण नव्हते पण विचार आणि वागण्याची पद्धत वेगवेगळी होती. जनरेशन गॅपचा परिणाम. पप्पा व प्रकाश यांच्यामध्ये नेहमीच आईचे सँडवीच व्हायचे. दोघेही घरात असले म्हणजे ती बिचारी कायम धास्तावलेली. शिक्षण पूर्ण करून प्रकाश नोकरीला सुद्धा लागला पण घरातल्या परिस्थितीत फारसा पडला नाही.केवळ आईमुळे घर टिकले. प्रकाश चांगली चित्र काढायचा त्यामुळे त्यातच त्याने करियर केले.एका अँडव्हटाझिंग कंपनीत त्याला जॉब मिळाला. पहिला पगार झाला आणि त्याने नवीन मोबाईल घेतला, आईसाठी फूड प्रोसेसर आणला.तो पाहून आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. काहीच बोलली नाही. आधी फोन मग फूड प्रोसेसरची खरेदी,पपांना भडकायला निमित्त पुरले. त्यांची बँटींग पुन्हा सुरु झाली पण आश्चर्य म्हणजे यावेळी प्रकाश शांत होता. काही बोलत नव्हता पण आई पपांवर चिडली.
“लेकराने,घरासाठी वस्तू आणली त्याचे कौतुक करायचे सोडून, कुरकुर कसली करत आहात.”
आईच्या बोलण्याने पपा संतापले आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले.
“विनाकारण खर्च करण्याची तुझीच सवय त्याला लागली आहे,सेविंग करायला पाहिजे, आपण करोडपती नाही. पैसे वाचवायचे की असे फालतू खर्च करायचे? आपल्यासारखेच दोन खोल्यांमध्ये हासुद्धा आयुष्य काढणार” “अहो,काहीही काय बोलताय, आपण केली अडजेस्टमेंट,मन मारून पै पै साठवली पण आता चांगले दिवस आले आहेत.  माझा पोरगा हुशार आहे.तो नक्की चार रूमचा फ्लॅट घेईल.”
आईच्या डोळ्यात प्रकाशविषयी अपार कौतुक होते.
“तसं झालं तर चांगलंच आहे”
“चला जेवायला उगीचच वाद घालत बसता”
“मी वाद घालतो” पप्पा उवाच...!
“आज आईस्क्रीम खाऊ,मी आणतो” असे बोलून प्रकाशने हळूच पपांकडे पाहिले. पपा काहीच बोलले नाही.
        जेवण झाल्याबरोबर आई वरच्या मजल्यावरील काकूंकडे गेली पप्पा व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते. प्रकाश मोबाईल मध्ये हरवला तेवढ्यात कुरियर आले. पपांना वाटले प्रकाशचे पार्सल आले. त्यांनी हाक मारली पण प्रकाश मुद्दामच पुढे आला नाही आपल्या नावाचे पार्सल पाहून पपांना फार आश्चर्य वाटले. पार्सल आपलेच आहे का याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. कुरियरवाला निघून गेला. बराच वेळ पप्पा पार्सलकडे पाहत होते. पुन्हा एकदा त्यांनी पार्सलवरचे नाव आणि पत्ता तपासला. टिपिकल मध्यमवर्गीय वृत्तीचे पप्पा पार्सल उघडू की नको विचारात पडले होते. शेवटी प्रकाशच बाहेर आला.
“पप्पा,कसलं पार्सल आहे, उघडा की”
“नको रे, कसलं पार्सल, कोणी पाठवलं आहे ते माहित नाही”
“नाव,पत्ता तुमचाच आहे मग कशाला विचार करताय”
“मग फोडू म्हणतोस”
पपांनी पार्सल फोडले आणि त्यात नवाकोरा “रेबन गॉगल” होता.
आश्चर्याने पपा गॉंगलकडे एकटक पाहत होते.
“पप्पा, आवडला का गॉगल, माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट” प्रकाशने विचारले.
“रेबनचा गॉगल तोही माझ्यासाठी” पप्पा जोरात ओरडले. त्यांना प्रचंड आनंद झाला.
“ओरीजनल रेबन आहे.”
“महाग असेल.”
“फार नाही, आवडला का तुम्हांला?”
“न आवडायला काय झाले, कसला भारी आहे” पपांनी अलगदपणे गॉगल हातात घेतला.
“पपा, मला माहिती आहे तुम्हांला गॉगलची खूप आवड आहे. आयुष्यात एकदा तरी ओरीजनल रेबन घ्यायचा हेच तुमचं स्वप्न होते. त्याविषयी अनेकदा तुम्ही बोलायचा. तेव्हाच मी ठरवले होते की कमवायला लागेल तेव्हा तुम्हांला ओरीजनल रेबन गिफ्ट म्हणून द्यायचा”. “एवढा खर्च कशाला केलास, परत करून टाक, वडिलांची आवड लक्षात राहिली, काही घ्यावेसे वाटले यातच मला सगळे काही मिळाले,”.
“हा गॉंगल तुमच्यासाठीच घेतला आहे, तुम्ही तो रोज वापरायचा आणि पप्पा,थँक्यू सो मच”
“कशासाठी??” गॉगलकडे पाहत असलेल्या पपांनी विचारले. 
“सगळ्याच साठी, खूप काही केलंत माझ्यासाठी,”
 पपांनी चमकून प्रकाशकडे पाहिले.
“त्यात काय विशेष. सगळेच आईबाप आपल्या मुलांसाठी करतच असतात.” 
“बाकीच्यांचे माहिती नाही.. पण आई-पप्पा ,तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. आतापर्यत तुम्ही मला गिफ्ट देत आलात. अनेकवेळा स्वतःचे मन मारून माझ्यासाठी तडजोड करीत आलात. सगळे ताण-तणाव,त्रास सांभाळून नोकरी करीत राहिलात. स्वतःपेक्षा मला महत्व दिले. तेही आपल्या दोघांचे फारसे पटत नसताना. वाद नेहमीच व्हायचे पण तुमची तळमळ मला समजत होती.” 
प्रकाशच्या बोलण्याने पपा इमोशनल झाले.
“जे झाले ते झाले फार मनावर घेऊ नकोस, तुझ्या भल्यासाठीच सगळा आटापिटा होता. तुझी फार काळजी वाटायची,”
“पप्पा, प्रत्येक घरात वडील आणि मुले यांच्यात एक अदृश्य भिंत असते. मुलं आईशी जेवढं मनमोकळ बोलतात वागतात तसं वडिलांशी नाही वागता येत. भितीची अदृश्य  भिंत मधे येत असते. माझंही तसचं झालं तुमच्याशी कधीच मनमोकळ बोलता आलं नाही, कारण माहित नाही पण तुमच्याशी वागताना आपसूक बंधने यायची.” 
अचानक प्रकाशने पपांना मिठी मारली. पपांच्या डोळ्यात पाणी आले, ते लपविण्यासाठी त्यांनी पटकन रेबन गॉंगल घातला.
“कसा दिसतोय??”
“एकदम कडक” दारातूनच आई म्हणाली.
“आलोच आरशात बघून”
 लगबगीने पपा घरात गेले. मधले दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पपांच्या आनंदाश्रुमध्ये नवाकोरा रेबनसुद्धा न्हाऊन निघाला.
         
जाणकारांनी लेखकाचे नाव सांगावे...
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

279. बायकोची किंमत...

    रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले.‌ अरुण म्हणाला,” किशोर, परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत. मुलं सासुरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात..”
 ” हो.. पण मध्येच कुठं निघाला आहात?” किशोरनं विचारलं.
 ” अरे, जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे. तापोळा, भिलार महाबळेश्वर. चार पाच दिवस नाही आता” अरुण म्हणाला.
”मध्येच कसं काय ठरवलं? तुमची प्राॅपर्टीची कामं झाली की नाही? बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना!!!” किशोर म्हणाला.‌त्याचा सूर ओळखून अरुण हसला. बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा…अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला.
   ” अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं. फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होतं असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर. सगळी क्रियाकर्मं घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा. आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं.. मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे?”अरुण म्हणाला.
         किशोर घरी आला. अनुराधानं अंथरुणं घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडं एकदा पाहीले नी पुन्हा मोबाईल मध्ये वाचण्यात बुडून गेली.‌ आताशी अनुराधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय विसंवाद सुध्दा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सारं. आपणच तिला हाडतुड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची. काहीतरी सांगायची. पण आताशी हे सारं टाळते असं वाटतं.
” अनु….” त्यानं हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला केला.
” हं…बोला.” त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा.
” आत्ता बाहेर अरुण भाटिया भेटला होता. शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत. चार पाच दिवस. जरा लक्ष ठेव घराकडं म्हणत होता”
“बरं” असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला.
” का जाणार आहेत विचारलं नाहीस”
” मला माहीत आहे.. शर्मिलानं सांगितलं आहे मला. बाबांच्या आजारपणात, ते गेल्यावर तिला झालेल्या दमणूकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत.” अनुराधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईल मध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाकी वाटू लागलं. गेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला. कशी रसरशीत होती. सगळं हौसेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं. आई इतकी रडली होती..अनु मी फार त्रास दिला तुला, पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं. सतत तिला आईच्या उशा पायथ्याशी थांबावं लागायचं. अनुराधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधांच्या वेळा, जेवणातलं पथ्यपाणी, येणारी जाणारी माणसं..त्यांचं अगत्य..काही काही कमी केलं नाही तिनं. चार दिवस ताई माहेरी आली नी मग थोडी उसंत मिळाली तिला. ताईला तिची कुचंबणा समजत होती. सतत आईच्या भोवती रहाताना आपलं बायको म्हणून किशोरकडं दुर्लक्ष होतं आहे असं तिचं वाटणं.. मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा. ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला.
” वहिनी, तू आराम कर थोडा. दादा सोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासा विरंगुळा होईल तुला.‌किती करावं लागतं तुला. खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ.” असं तिनं सांगितलं.
बिचारी अनुराधा… त्यादिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हाॅटस्अपवर मेसेज केला,”आपण कुठंतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ”
           किशोरला ते इतकं मुर्खपणाचं वाटलं. लग्नाला वीस वर्षं झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणतेय. त्यानं उत्तर द्यायची सुध्दा तसदी घेतली नाही. अनुराधा खूपवेळ उत्तराची वाट पहात होती. किशोरनं लक्षही नाही दिलं. दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला,” कशाला मला व्हाॅटस्अपवर मेसेज करतेस गं? इकडं जाऊया नी तिकडं जाऊया..” अनुराधा इतकी वरमली. त्यांच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती.. मग तिनं ओठ घट्ट मिटले. दोन महीन्यात आई गेली. किती ताण आला होता अनुराधावर. आईचे दिवसकार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली. किशोर तिच्या फोनची वाट पहात होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती ऑनलाईन  दिसायची पण मेसेज बाॅक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. अनुराधा बोलली पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं. आज अरुण भेटला नी हे सारं किशोरला आठवलं.‌आपण अनुराधा वर अन्याय केला काय? त्यादिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं? आणि तिच्या मेसेजेस बद्दल पट्कन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं ..तिला लग्न करुन आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काहीही मागायचं नाही.. आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का!!!
         एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही..हे मनाची समजूत काढायला ठिक वाटतं पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या. त्याची कदर करा. नाती जपा, ती कौटुंबिक असोत, मित्र मैत्रिणींसोबत असोत, सहकाऱ्यांसमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत.कदर करा.वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायला ही वेळ देत नाही नी नंतर त्याला अर्थ रहात नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो कारण त्यांची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परीणाम होतो तो फार भयंकर होतो… वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात…ती फुंकर घालायला उशीर करु नका!!!
 
अज्ञात लेखकास सादर समर्पित
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

278. मी असे पर्यत येत रहा...

 मी असे पर्यत येत रहा... अगदी काळजात धस्स करणार वाक्य.....
       ऊभ्या आयुष्यात  कधीही न झुकलेला, न थकलेला,  हार जीत,  उन पाऊस सगळ धिरानं पचवलेले माझे बाबा आज बेडवरुन ऊठु शकत नाहीत.  सुन मुलगा करतात सगळं पण, त्याला नाईलाजाची किनार आहे की, कर्तव्य की, प्रेम माहीत नाही...  आणि सासरी गेलेल्या लेकी, त्यांच्या जगात व्यस्त आहेत. नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात.  आणि बाबा म्हणतात, "मी असेपर्यत येत रहा..." डोळ्यातुन गंगा यमुना वहातात. 
      अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा, रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप, शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारे बाबा, सायकल शिकवताना  "हो जमतय... जमतय, बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ" . म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा, कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारे बाबा, स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा, बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा. आपल्याला नेहमी हसताना दिसतात जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके, कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतात. नोकरी, छोकरी आपल्याला मिळते पण, आभाळाएवढं कौतुक त्याना असत.  आपल्या पहिल्या पगारातुन आपण घेतलेला शर्ट, घड्याळ साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतात.
      आई रागावली की, बाबा बुलेटप्रुफ जँकेट सारखा बचाव करायला उभा असतो. 
"करु दे ग तिला तिच्या मनासारखं" अस म्हणतो खर पण, आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो. पण त्यात लेकीची काळजीच असते.. मुलीच, मुलाचं लग्न ठरल की, तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो. जणु तिसऱ्या अंकाची नांदी.. "काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या..." अस हात जोडुन सांगणारा बाबा सगळ्यांनाच माहीती आहे. पण, त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई-वडिलांना, "काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे.." अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा बाबा असतो.  तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. म्हणुनच, "बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा.." अस गॉसिपींग करणाऱ्या सुना घरोघरी दिसतात. पण, सुन आणि सासऱ्यात ठिणगी, स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा संघर्ष कधीच नसतो...!  असो आणि समजा पत्नी अगोदर गेली, तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाबा बघायला मिळतो. मग नातवांना पाढे, कविता, श्लोक, गीता शिकवण्यात रमतो. आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो. कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो.  मागे सुटलेले, विस्कटलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो.  कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो, "काही नाही बर आहे ना सगळं, सहजच फोन केला गं..." म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो.   मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई, मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा.  आजार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत.घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात.  त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत.. आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाबा.  बाबा गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी यातना होते.  भाऊ-वहिनी भाच्या-भाचे सगळ मनापासुन करतात नणंदेच माहेरपण.  ती ही दुःख विसरुन सगळ्यांवर बाबाचं पांघरुण घालते.  पण ती सल, ती उणीव, ते खालीपण कुठेतरी आत जाणवत रहाते.
 
मित्र मैत्रिणिंनो, तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की,
"मी असे पर्यत येत रहा..." 
   तर अगदी सर्व काम, लायबिलीटीज, कमिटमेंट, मिटींग्ज, सेमिनार, सेशन्स, टुर आणि अजुन काय जे असेल, ते बाजुला टाकुन बाबाला भेटा... सुरकुतलेल्या हातांवरुन,  परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या...सांगा, "हो बाबा, मी तुम्ही असे पर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेन." 
तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल.. "मी असे पर्यत येत रहा . . ."
काळजात धस्स करणार वाक्य.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

277. आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक...

    एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं.. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता..मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं;
 "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!"
कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते. मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञता भावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; 

१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :
म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं,  याबद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. 

२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे : 
आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. 

३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे : 
म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का?  चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती?  या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? 

४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :
मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का? विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.  त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यू" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा  दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. 
       या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं ...म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

276. स्त्रीचा पदर...

         पदर  काय  जादुई  शब्द  आहे  !! हो  मराठीतला !! काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन अक्षरी  शब्द. पण  केवढं विश्व सामावलेलं  आहे त्यात....!!  किती  अर्थ, किती  महत्त्व...  काय  आहे  हा  पदर......!? 
        साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खांद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग. तो   स्त्रीच्या  " लज्जेचं रक्षण" तर करतोच. सगळ्यात  महत्त्वाचं हे कामच त्याचं.पण,आणखी   ही बरीच  "कर्तव्यं" पार  पाडत  असतो.
 या पदराचा उपयोग  स्त्री केव्हा, कसा  अन्‌  कशासाठी  करेल  ते  सांगताच  येत  नाही..!?सौंदर्य  खुलवण्यासाठी "सुंदरसा" पदर असलेली " साडी" निवडते..! सण-समारंभात   तर   छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.सगळ्या  जणींमध्ये चर्चाही तीच. लहान  मूल  आणि " आईचा  पदर " हे अजब नातं आहे. मूल  तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन  " अमृत  प्राशन" करण्याचा हक्क बजावतं. जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ लागलं, की त्याचं  तोंड पुसायला आई पटकन तिचा  " पदर " पुढे  करते.. मूल   अजून   मोठं   झालं.,   शाळेत जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चालताना  आईच्या " पदराचाच आधार " लागतो.. एवढंच   काय...! जेवण  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल ऐवजी  "आईचा  पदरच" शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा वाटतात  मुलानं पदराला  नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही.
        त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला " आईचा पदरच " सापडतो. महाराष्ट्रात  तो  " डाव्या खांद्या  वरून " मागे सोडला जातो. तर  गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो. कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान  राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा  झाकून  घेतात.
 तर  काही  जणी  आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं " पदरच " झटकतात.  सौभाग्यवतीची "ओटी "भरायची ती  पदरातच  अन्‌  "संक्रांतीचं वाण "लुटायचं ते " पदर "  लावूनच. बाहेर जाताना " उन्हाची दाहकता " थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर ओढला  जातो. तर  थंडीत  अंगभर पदर लपेटल्यावरच " छान  ऊब " मिळते. काही  गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच  " गाठ "  बांधली   जाते. अन्‌ नव्या नवरीच्या " जन्माची गाठ " ही नवरीच्या   पदरालाच. नवरदेवाच्या  उपरण्यासोबतच बांधली   जाते. पदर हा शब्द किती अर्थांनी  वापरला  जातो  ना. नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते. पण संसाराचा राडा दिसला..!  की  पदर कमरेला  खोचून कामाला लागते. देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....? माझ्या चुका  पदरात  घे..! 
       मुलगी मोठी  झाली, की "आई " तिला साडी   नेसायला   शिकवते, पदर सावरायला शिकवते   अन्‌   काय म्हणते  अगं.! चालताना  तू  पडलीस तरी  चालेल..! पण,  " पदर "  पडू   देऊ   नकोस ! अशी आपली भारतीय संस्कृती...!  अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा " विनयभंग " तर  दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून  साधे पाहणार ही नाहीत..!   ऊलटे तिला वाट देण्यासाठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या पदरात..  ही आहे आपली भारतीय संस्कृती... 

जय श्री राधे कृष्ण
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

275. Busy Busy काय करता....

Busy Busy काय करता, वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो, संसाराचा गाडा...

खूप काम, रजा नाही, मिटिंग, टार्गेट,फाईल. 
अरे वेड्या यातच तुझं, आयुष्य संपून जाईल

नम्रपणे म्हण साहेबांना, दोन दिस रजेवर जातो 
फॉरेन टूर राहिला निदान जवळ फिरून येतो.

आज पर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास
खरं सांग कधी तरी तू  मनाप्रमाणे जगलास ?

मस्त पैकी पाऊस झालाय, धबधबे झालेत सुरू .
हिरव्यागार जंगला मध्ये, दोस्ता सोबत फिरू.

बायकोलाही म्हण थोडं चल येऊ फिरून.
पंजाबी घाल, प्लाझो घाल, पुन्हा होऊ तरुण.

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी.
स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी.

गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या. 
दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या.

जोरजोरात बोलावं लागेल, होशील ठार बहिरा
मसणात गवऱ्या गेल्यावर, आणतो का तिला गजरा ?

तोंडात कवळी बसवल्यावर, कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का ?

अरे बाबा जागा हो, टाक दोन दिवस रजा 
हसीमजाक करत करत मस्तपैकी जगा

दाल-बाटी,भेळपुरी आईस्क्रीम सुद्धा खा
आरोग्य उत्तम राहण्यासाठी शहरा बाहेर फिरायला जा

Busy Busy काय करता वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा....
आयुष्यभर चालूच असतो  संसाराचा गाडा....

सर्व प्रापंचिकांना समर्पित.
संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार

274. LOVE YOU...

 दररोज उठसूठ 'I LOVE YOU' म्हंटलच पाहिजे असं थोडीचं असतं...
           मीठ कमी पडलेल्या भाजीत जराही न मीठ घालता ती भाजी आनंदानं खाणारा तो ILU तर म्हणत असतो. अन त्याच्या आवडीचा पदार्थ त्याने न मागताही आठवणीने बनवून त्याच्या हव्या त्या वेळेला बनवून देताना ती ILU तर म्हणत असते.कधीतरी अचानकपणे आठवणीनं तो तिच्यासाठी गजरा घेऊन येतो, तेंव्हा त्या गजऱ्यात त्याचं ILU लपलेलं असतं ...अन त्याच्या पिकलेल्या केसांना वचवच करत मेंदी लावताना ती तिचं ILU तर चोपडत असते...
       'अहो जरा कांदा कापून द्या' असं तिनं हुकूम सोडल्यावर भणभण करत तो कांद्याबरोबर मिरच्या, कोथिंबीरही कापून देतो तेंव्हा त्यांचं ILU त्याच्या डोळ्यातून ओघळत असतं...अन ' आज थालपीठं कर ' असं त्यानं म्हंटल्यावर लगेच चिडून नकार देत थोड्यावेळात गरमागरम थालपीठ ती वाढून आणते तेंव्हा तिचं चमचमीत ILU त्या थालपीठात तर असतं...तिनं न पाळलेली पथ्य आणि वेळेवर न घेतलेली औषधं यावरून तो वाद घालतो तेंव्हा तो ILU तर गुरगुरत असतो...अन त्याच्या सुटलेल्या पोटावर ती जातायेता टोमणे मारता मारता, जेवणातील तेल, मसाला कमी करते तेंव्हा ती ILU ची काळजीचं करत असते...
           तिच्या शॉपिंगला नेहमी नावं ठेवताना तिला दोन साड्या आवडल्या तर 'त्या दोन्ही घे' असा आग्रह तो करतो तेंव्हा त्याचं ILU त्या साडीत रेंगाळत असतं...अन त्याच्या अडचणीच्या वेळी ती तिच्या भिशीतून साचवलेले पैसे तणतण करत हळूच काढून देते तेंव्हा ती ILU तर उधळत असते...जाता येता तिला हळूच धक्का देत ओझरता स्पर्श करताना तो तिला चोरटा ILU तर म्हणत असतो आणि त्याने ते तसं केलं तर ते हवंहवंसं वाटूनही त्याच्यावर उगाचंच डोळे वटारते तेंव्हा तिचं ILU लाजतचं असतं...सुट्टीच्या दिवशी तो उशिरापर्यंत शांत झोपला असताना जराही आवाज न करता त्याच्या अंगावर पांघरूण टाकून ती बेडरूमचे दार अलगदपणे लावून घेत बाहेर जाते तेंव्हा ती तिचं ILU तिथेचं त्याच्यापाशी सोडून येत असते... आणि रोज सकाळी ती उठायच्या आत स्वतः पटकन उठून तिच्यासाठी तो चहा बनवतो तेंव्हा त्याचा प्रसन्न ताजाताजा ILU घरभर पसरलेला असतो....
घरात असेच कितीतरी ILU जागोजागी सोफ्यावर, पडद्यावर, टेबलावर, खुर्चीवर, कपाटात,  किचनमध्ये, बाल्कनीत, बेडरूममध्ये पडलेले, सांडलेले, लवंडलेले, पसरलेले, विखुरलेले, सुस्तावलेले असतात...आपण फक्त ते टिपायचे अन ओळखायचे असतात.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

273. पूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी...

"... मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत...
 गेली छत्तीस वर्षं संसार केलात...
आमच्या पिढीला का गं जमत नाही  हे ?
" तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. 
चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता.
"प्रश्न विचारलास, का ?
पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 
" उत्तर हवंय, का   ?
'हो"
"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 
"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;
"आम्ही 'कसं जमवता येईल' ते शोधत होतो, तुम्ही 'जमलं तर पाहू' म्हणताय.
"आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं; तुमच्या काळात ते केलं जातं.
"आम्ही साथीदार व्हायचो; तुम्ही पार्टनर बनवता. 
"आमच्यात प्रेम ही सहजता होती; तुमच्यात तो अट्टहास झालाय.
"आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं; तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं. 
"आमच्या वेळी मैत्री विश्वासात रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.
"आम्ही कविता लिहायचो; तुम्ही त्या फॉरवर्ड करताय. 
"आमचे जीवनसाथी होते; तुमचे बॉयफ्रेन्ड नि गर्लफ्रेन्ड आहेत.
"आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम 'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे', म्हणून केलं जातंय. 
"आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, 
"आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची कैलक्युलेशन्स असतात. 
"आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात. 
"आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय. 
"आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत. 
"आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय."
..."बाळा; जमणं - न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेव्हलप करायची
 असते..!
      जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे... 
आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...