आपल्याकडं हायवे, गल्लीबोळात, बांधकामाची साईटवर कुठंही जेसीबीचं काम सुरू असतांना बघ्यांची गर्दी झालेली आपण बघतो..‘इतकी गर्दी काय बघतेय?’ हे बघून बघ्यांचा गुणाकार होत असतो पण जेसीबी म्हणजे नक्की काय? या अद्याक्षरांचा फुल फाॅर्म नक्की काय? हे कधीपासून वापरता येऊ लागलं? हे कुणी शोधलं? असे प्रश्न फारसे कुणाला पडत नाहीत.. आज या जेसीबीचीच गोष्ट सांगतो.. ‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाँच झालं.. साल होतं १९४५.. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नांव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नांव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नांव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. इंजिनाचं नांव होतं जेसीबी.. हे नांव म्हणजे ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याच्या नांवाची अद्याक्षरं आहेत.. शोधकर्त्याचं नांव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’....
‘जोसेफ’ यांचा जन्म इंग्लंडमधील स्टॅफोर्डशायर इथल्या अटाॅक्सेटरमध्ये एका कॅथलिक कुटुंबात झाला..‘बॅमफोर्ड शेतकी अभियांत्रिकी उद्योग प्रा.लि.’ हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय.. योक्साॅलमध्ये जन्मलेले त्याचे आजोबा "हेन्री" यांचं धातू विक्रीचं दुकान होतं जिथं पन्नास माणसे, दहा मुले आणि तीन बायका नोकरी करत.. हळूहळू त्यांचं हे दुकान देशातलं कृषी साहित्य मिळण्याचं महत्त्वाचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं.. सुक्या गवताच्या पेंढ्या बनवण्याचं यंत्र, दाताळे, उपटणी यंत्र, कापणी यंत्र, ट्रॅक्टर इ. कृषी साहित्य त्यांच्याकडं मिळत असे पण काही कारणास्तव हे सगळं एके दिवशी बंद झालं.. लँकेशायर इथल्या स्टोनीहर्स्ट महाविद्यालयातून आपलं औपचारिक शिक्षण संपवून जोसेफनं काॅव्हेन्ट्री या ठिकाणी अल्फ्रेड हर्बर्ट कं. इथं काम सुरू केलं.. त्यावेळी ही कंपनी तिथली सगळ्यात मोठी यंत्र उत्पादक कंपनी होती. जोसेफ त्यांचा प्रतिनिधी म्हणुन ‘घाना’ या ठिकाणी रुजू झाला.. तिथून परतल्यावर मात्र त्यानं आपल्या घरच्या व्यवसायाची कास धरली. मात्र तिकडं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला 'राॅयल एअर फोर्स' विभागाकडून बोलवणं आलं.. इथं ‘रसद पुरवठा’ विभागात काम केल्यानंतर तो ‘अमेरिकन’ विमानं मध्यपुर्वेत जाण्यापुर्वीचं स्टेशन चालवण्यासाठी डिझेल इंजिनीअर म्हणून ‘आफ्रिकेत’ रवाना झाला.. दुसरं महायुद्ध तर संपलं आणि जोसेफचं काम ही.. पण आता त्याच्या पाठीशी मोठा अनुभव गोळा झाला होता.. त्याला वेल्डिंगचं तंत्र आणि मंत्र अवगत झालं होतं. तो पुनश्च एकवार कृषी साहित्य निर्मितीत उतरला.. त्यानं एक जुनं गॅरेज साप्ताहिक ३० शिलींग रक्कमेच्या भाडेतत्वावर घेऊन आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आणि त्याच दिवशी त्याला आपलं पहिलं पुत्ररत्नही लाभलं.. ‘आपलं कुटूंब आहे अन् आपल्याकडे पैसे नाहीत’ या एकाच विचारानं जोसेफ अहोरात्र मेहनत करू लागला.. इकडं युद्धपश्चात शेतीचं थोडं आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत होतं.. कृषी साहित्यानंतर जोसेफनंही हायड्रोलिक्स संयंत्राचं उत्पादन सुरू केलं आणि हाच त्याच्या व्यवसायात ‘टर्निंग पाॅईंट’ ठरला..
१९५३ साली जोसेफच्या कंपनीनं पहिलं उत्खनन यंत्र बाजारात आणलं जे ट्र्रॅक्टरवर बसवलं होतं. पण हा ट्रॅक्टर १८० अंशात वळू शकेल अशी योजना केली.. १९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन योजना केली जी भयंकर यशस्वी झाली.. या यंत्रानं कृषी व्यवसाया व्यतिरिक्त बांधकाम व्यवसायातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम व्यवसायातही धुमाकूळ केला.. कुठल्याही कंपनीचं यश त्यांच्या उत्पादनाच्या दर्जावर आणि मार्केटींगच्या कौशल्यावर अवलंबून असतं. आपण भारतीय कुठंतरी एका ठिकाणी मार खातो... पण जोसेफ व्यक्तिश: या दोन्ही ठिकाणी शब्दश: बाॅस होता.. त्याचं अभियांत्रिकी कौशल्य आणि समस्या दूर करण्याची जिद्द यांचा संगम त्याच्या या व्यवसायाला प्रचंड पुरक ठरला.. जोसेफचं एक सोपं तत्त्व होतं ‘सिम्प्लिकेट... डोन्ट काॅम्प्लिकेट’ जे त्यानं आयुष्यभर पाळलं..आपल्या ‘मोडेल पण वाकणार नाही’ या मराठी बाण्याला हे अतिशयोक्ती वाटेल पण अभियांत्रिकी कौशल्यांच्या पलिकडं जात जोसेफनं जेसीबी ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये किटलीचीही योजना केली अन् पहिल्या १०० जेसीबींची डिलिव्हरी त्याने स्वत: वैयक्तिकपणे दिली.. ज्या जेसीबीमुळं इकडंतिकडं नोकरी करणारा जोसेफ रोल्स राॅईसमध्ये बसला होता त्या जेसीबीशी तो स्वत: नेहमीच कृतज्ञ राहिला.. त्यानं त्याच्या रोल्स राॅईसच्या नंबर प्लेटवरही जेसीबी चितारला होता..परदेशी ग्राहकांना भेटण्यासाठी जोसेफनं खाजगी विमान विकत घेतलं ज्यात तो नेहमी ठराविक आसनावरच बसत असे.. जोसेफनं अत्यंत उच्च दर्जाचा पारितोषिक विजेता कारखाना तयार केला होता..
एकदा तर अगदी फॅशन शो प्रमाणे जेसीबीचा ‘रॅम्प वाॅक’ असलेला ‘डान्सिंग डिगर्स’ नावाचा शो त्यानं आयोजित केला होता..त्याच्या प्रत्येक हालचालीत सुक्ष्म मार्केटिंग कौशल्य आणि इंजिनीअरिंगवरचं प्रेम दडलं होतं..जोसेफनं ‘मोक्कार’ मार्केटिंग करत ‘चिक्कार’ पैसा छापला पण काही मुलभूत तत्त्व त्याने कधी सोडली नाहीत..त्यानं कुणाची लाच घेतली नाही अन् दिलीही नाही. किंबहुना व्यवसायातून आलेला फायदा उत्पादन अजून दर्जेदार कसं होईल यासाठीच वापरत संशोधनावर खर्च करण्यावर भर दिला.. त्यानं आपल्या व्यवसायाची जागा पहिल्या दिवसापासून निकोप ठेवण्यावर मेहनत घेतली.. आपल्या कर्मचारी वर्गाशी बोलतांना तो नेहमी एक गोष्ट सांगत असे, ”स्पर्धेची एक समस्या असते ती लवकर उठायला अन् लवकर झोपायला भाग पाडते.” जोसेफच्या कंपनीनं ४५०० लोकांना रोजगार दिला आणि जवळपास बारा कारखान्यांतून सुमारे तीस हजार यंत्र ते तीन खंडांना पुरवू लागले..या कंपनीनं जगभरातल्या १४० देशात ८५० मिलियन $ इतकी उलाढाल केली..जोसेफ वयाच्या ७५व्या वर्षी औपचारिकपणे निवृत्त झाला तरी जबाबदारी मुलाच्या खांद्यावर सोडत तो थेट स्वित्झर्लंडला निघून गेला आणि याट्चचं डिझाईन आणि जमिनीच्या संरचनेवर अभ्यास करू लागला.त्याचं प्राणप्रिय इंजिनीअरींग त्यानं शेवटपर्यंत सोडलं नाही..जोसेफनं वयाच्या ८४व्या वर्षी हे जग सोडलं पण आपलं नाव तो थेट शब्दकोषात कायमचं कोरून गेला ते म्हणजे 'जेसीबी'..
१ मार्च हा जेसींबींचा स्मृतीदिन....
विनम्र अभिवादन श्री. जेसीबी💐
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा