"साहेब चला, पाटील साहेब बोलावताहेत."
महत्वाच्या कामात गुंतलेल्या अजितला शिपाई म्हणाला तसं अजितने मान वर करुन त्याच्याकडे रागीट नजरेने पाहिलं
"आता काय काम निघालं साहेबांचं? मी कामात आहे जरा. येतो थोड्या वेळाने "
"अर्जंट आहे असं म्हंटले साहेब. घेऊनच ये म्हणे साहेबांना ताबडतोब."
"ठिक आहे. तू चल पुढे, मी येतोच आवरुन." मोठ्या नाराजीने अजित म्हणाला. शिपाई गेला तसा त्याने लॅपटाॅप बंद केला. खरं तर त्याचा कामाचा मुडच गेला होता. पाटीलसाहेबांनी बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट सुनावण्यासाठी बोलावलं असणार याचा त्याला अंदाज होता. कारण पाटीलसाहेब चुकूनही त्याच्याशी कधी चांगलं बोलल्याचं त्याला आठवत नव्हतं. आपल्याकडून काय चुक झाली असावी याचा विचार करतच तो साहेबाच्या केबिनजवळ पोहचला." संतोष पाटील, प्राॅडक्शन मॅनेजर" या पाटीवर त्याची नजर गेली. "संतोष" या नावाचं त्याला हसू आलं." कसला संतोष? हा तर असंतोष फैलावणारा माणूस" त्याच्या मनात आलं. दारावर टकटक करुन तो आत गेला. नाकावर घसरलेल्या चष्म्याने पाटील साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं.
" सर तुम्ही मला बोलावलंत?"अजितने शक्य तितक्या नम्रतेने विचारलं.
"मि. शेवाळे कलकी डे शिफ्टमें प्राॅडक्शन कम क्यू हूँआ?"
मराठी असुनही साहेबाने पुन्हा त्याच्याशी हिंदीत बोलावं हे पाहून अजितचं डोकं सणकलं.
" सर मशीन खराब झाली होती ती रिपेअर करण्यात दोन तास गेले. तसा रिपोर्टही मी सबमिट केलाये."
" मशीन क्यूँ खराब हुई? आप लोग मशीनको मेंटेन नही रखते हो इसलिए ना?"
"सर मशीन जुनी झालीये. तिचे बरेच पार्टस गंजलेत. तिला रिप्लेस करणं आवश्यक आहे." अजित समजावत म्हणाला
"मेरेको सिखा रहे हो क्या? और मैने तुमको कितनी बार बोला है की हिंदीमें बात करो लेकीन तुम्हारी तो मनमानी चल रही है. "
साहेब उर्मटपणे बोलला तशी संतापाची एक तिडीक अजितच्या डोक्यातून गेली. तो जरा जोरातच बोलला
" साहेब तुम्ही मराठी मी मराठी. मग आपण हिंदीत बोलायचं कशाला?"
"इस कंपनीचा मालिक बिहारका है तो वो जिस भाषामें बात करता है उसी भाषामें हमे बात करना है."
"साहेब असा कुठे नियम आहे? आपले जी. एम. साहेब तर साऊथ इंडियन आहेत ते तर नेहमी इंग्रजीतून बोलतात. आपल्या एच.आर.ही साऊथ इंडियन आहेत त्यांच्याशी ते तामिळ भाषेत बोलतात. मग दोन मराठी माणसांनी आपसात हिंदीत कशाला बोलायचं ?"
"इसका ये मतलब हुआ की मै गलत हूॅ यार मेरेको तुमसे कोई बहस नही करनी. मैने जिस कामके लिये तुम्हे बुलाया है वो सुनो. झारखंड के रांचीमे अपना एक प्लांट एस्टॅब्लिश हो रहा है वहाॅ कुछ इंजीनियर्स की जरुरत है. मैने तुम्हारा नाम प्रपोज किया है. तय्यार रहो, एक हफ्तेंमे तुम्हारे ऑर्डर आ जायेंगे"
ते ऐकून अजित एकदम सुन्न झाला. त्याच्यावर जणू आकाशच कोसळलं.
"साहेब माझी आई खेड्यावर रहाते तिला कॅन्सरच्या ट्रिटमेंटसाठी वारंवार मुंबईला न्यावं लागतं. घरात चार महिन्यांचं बाळ आहे. कसं शक्य आहे मला इतक्या दुर जाणं? आणि आपल्याकडे दुसरे बिहारी इंजीनियर्स आहेतच की, त्यांना पाठवा ना तिकडे. ते एका पायावर तयार होतील."अजित गयावया करत म्हणाला
"मै कुछ नही सुनना चाहता.अपने यहाॅ इतने बिहारी काम करते है.इनकी भी तो कोई प्राॅब्लेम होगी ! क्या उनको माॅ-बाप, बिवीबच्चे नही है? ये तो कभी तुम्हारे जैसी कहानियाॅ सुनाते नही."
"साहेब ही कहाणी नाही."
"तुम मराठी लोगोमें यही तो प्राॅब्लेम है. तुम लोगोंको सब चीजे घरके घर में चाहिये. देखो भाई तुमको जाना तो पडेगा. नही तो नोकरी छोडके घरपे बैठ जाना. तुम्हारे जैसे निकम्मोकी कंपनीको कोई जरुरत नहीं है. जाओ अपना काम करो ऑर्डर के लिए तय्यार रहना."
अपमानित झालेला अजित खचलेल्या मनाने तिथून बाहेर पडला. संताप, निराशा आणि रांचीला गेल्यावर आईवडिलांचे,बायकोचे होणारे हाल यांच्या चित्रांनी त्याच्या मनात वादळं निर्माण होत होती. ही कंपनी एका बिहारी मालकाची होती. स्थापन केल्यानंतर त्याने अगोदर स्थानिक मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची भरती केली होती. अजित त्याचवेळी इथं एका बिहारी मित्रामुळेच जाॅईन झाला होता. काही दिवसांनी मराठी कामगार आणि सुपरव्हायझर्सची गळती सूरु झाली. मराठी कामगार काम करत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं. काम सोडून गुटखा, तंबाखू खाणं, गप्पा मारणं, टाईमपास करणं, सुपरव्हायझर्सला दमदाटी करणं असे प्रकार कामगारांकडून सुरु होते. सुपरव्हायझरही या गुंड कामगारांना घाबरुन असत. अजून काही दिवसांनी स्थानिक राजकीय नेते कंपनीत युनियन स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजल्यावर मालकाने मराठी कामगारांना डच्चू द्यायला सुरुवात केली. अजितचं काम चांगलं होतं. खेड्यातल्या शेतमजुराच्या गरीब कुटुंबातून तो आला असल्यामुळे त्याला नोकरीची नितांत गरज होती. त्यामुळे तो आपलं काम इमानेइतबारे करत होता. शिवाय तो मेहनती आणि हुशारही होता. त्यामुळे कंपनीने त्याला धक्का लावला नाही. हळूहळू कंपनी बिहारी कामगार आणि सुपरव्हायझर्सनी भरुन गेली. अजित एकटाच मराठी इंजीनियर तिथे उरला. मागच्या वर्षी संतोष पाटील नावाचा प्राॅडक्शन मॅनेजर कंपनीत रुजू झाला तेव्हा अजितला आपला मराठी माणूस आल्याचा खुप आनंद झाला होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. संतोष पाटील इतर बिहारी सुपरव्हायझर्सशी प्रेमाने बोलायचा. त्यांना शाबासकी द्यायचा. पण अजितशी तुसडेपणाने वागायचा. त्याच्या कामात मुद्दामच चुका काढून कामगारांसमोरच पाणउतारा करायचा. अजित त्याच्याशी मराठीत बोलायला लागला की तो हटकून हिंदीत बोलायचा. मराठीत बोलण्यावरुन त्याने अजितला" मेरे मराठी होनेका गलत फायदा उठानेकी कोशीश मत करना." अशी अनेकदा ताकीदही दिली होती. बिहारी मालकाला इंप्रेस करण्यासाठी तो हे करतोय हे अजितला समजत होतं.तो मनातल्या मनात त्याला खुप शिव्या घालायचा. पण बाॅस असल्याने मर्यादेने वागणं भाग होतंच. शिफ्ट संपली. अजित कंपनीतून निघाला तो डोक्यात राग घेऊनच. एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाचा जाणूनबुजून छळ करावा याचा त्याला राहूनराहून संताप येत होता. ऐका वळणावर तो डावीकडे वळणार तोच राँगसाईडने एक बाईकवाला येऊन त्याला धडकला. अजित वाचला पण त्याची बाईक खाली पडली.
"काय रे हरामखोर. ट्रॅफिक रुल माहित नाहिये तर गाडी चालवतोच कशाला?" अजित त्याच्यावर ओरडला. तसा तो बाईकवाला बाईकवरुन खाली उतरला.
" हरामखोर कुणाला म्हणतो रे ×××××"
दोघांची बाचाबाची सुरु झाली. शब्दाला शब्द वाढत गेला. दोघांभोवती गर्दी जमा होऊ लागली. लोक दोघांना समजावू लागले. पण दोघं पेटले होते. दोघांची हाणामारी सुरु होणार इतक्यात ट्रॅफिक पोलिस पळत आला. दोघांना समजावून बाजुला केलं. अजित जायला निघाला. पोलिसाने गर्दी पांगवली आणि राँग साईड घुसणाऱ्या पोराला बाजूला कोपऱ्यात नेलं. त्या पोराने पाचशेची नोट काढून पोलिसाच्या हातात ठेवली आणि बाईकला किक मारुन तो निघून गेला. अजितने ती देवाणघेवाण पाहिली आणि तो अधिकच संतापला. पण स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आपल्या बाईकचं तुटलेलं मडगार्ड पाहून त्याने बाईक उचलली आणि घराकडे निघाला.
तो घरात शिरला तेव्हा बेडरुममधून बाळाच्या रडण्याचा आवाज त्याला आला. बॅग ठेवून तो बेडरुममध्ये गेला तेव्हा अनू बाळाला कडेवर घेऊन त्याला थोपटत फिरत होती.
" काय झालं का रडतोय तो?"अजितने विचारलं. त्याच्या स्वरातला कठोरपणा पाहून ती चकीतच झाली पण शांत स्वरात त्याला म्हणाली
"अहो काही नाही त्याने सू केलीये म्हणून रडतोय. बदललेत मी त्याचे कपडे. जरा बेडवरची चादर बदलायची राहिलीये. जरा धरता का याला. थोडं फिरवा. तोपर्यंत मी चादर बदलून घेते"
अजितने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला घेऊन बाहेरच्या हाॅलमध्ये आला. त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला. पण आज बाळानेही त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं असावं. तो थांबायचं नाव घेत नव्हता. दिवसभर घडलेल्या घटनांनी तापलेल्या अजितच्या डोक्यात आता संताप शिरु लागला.
"ए बाबा, बस कर ना आता. किती रडशील? आधीच डोकं तापलंय माझं. बस कर "
तो बाळावर ओरडत म्हणाला पण बाळ शांत व्हायचं नाव घेत नव्हता. अजितने जरा जोरातच त्याच्या पाठीत चापट मारली.
"पटकन शांत हो म्हंटलं ना तुला. बस कर" अजित त्याच्यावर खेकसला. पण चापट मारण्याने आणि अजितच्या खेकसण्याने बाळ अजुनच जोरात रडायला लागला. अजितचा आता संयम संपला. बाळाला दोन्ही हाताने त्याने समोर धरलं आणि तो मोठ्याने ओरडला
"बंद कर तुझं रडणं"
एक क्षण बाळ शांत बसलं. दुसऱ्याच क्षणी त्याने दुप्पट आवाजात भोकाड पसरलं. अजितचा संताप अनावर झाला आणि त्याने बाळाला सोफ्यावर फेकून दिलं.अजितच ओरडणं पाहून बाहेर येत असलेल्या अनूने ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात किंचाळली
"अहो काय करताय?" आणि ती सोफ्याकडे धावत गेली. इतक्या वरुन फेकल्यामुळे क्षणभर स्तब्ध झालेलं बाळ आता किंचाळू लागलं.अनूने पटकन त्याला उचलून छातीशी धरलं.
"असं फेकतात होय बाळाला?"अजितकडे रागाने आणि दुःखाने पहात ती म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.
" लवकर शांत कर त्याला. त्याच्या रडण्याने डोकं फाटतंय माझं."अजित तिच्यावर ओरडला.
"अहो आजारी आहे तो. ताप आहे त्याला. तापात रडतातच मुलं." रडतरडत अनू म्हणाली आणि बाळाला घेऊन बाहेर अंगणात गेली. अजित कपडे न काढताच बेडरुममध्ये गेला आणि बेडवर त्याने स्वतःला झोकून दिलं. मणामणाचे घाव त्याच्या डोक्यात पडत होते. दिवसभरातल्या घटनांनी त्याचं मानसिक संतुलन पार बिघडून गेलं होतं. बराचवेळ तो तळमळत पडला होता. एक तासाने त्याला मन शांत झाल्याने जरा बरं वाटू लागलं. त्याने कानोसा घेतला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. आपण मगाशी बाळाला फेकल्याचं त्याला आठवलं आणि भीतीची एक शिरशिरी त्याच्या शरीरातून निघून गेली. बापरे ! त्याला काही झालं तर नाही ना? अनू त्याला दवाखान्यात तर नाही घेऊन गेली? खरंच त्याला काही झालं असेल तर? मानेला काही झटका बसून.....!त्याविचारासरशी तो घाबरून ताडकन उठला. बाहेरच्या हालमध्ये आला.अनू आणि बाळ दोघंही तिथे नव्हते. तो बाहेर अंगणात आला मग गेट उघडून तो बाहेर रस्त्यावर आला. पण कुठेही त्या दोघांचा पत्ता नव्हता.तो परत आत आला. मोबाईल उचलून त्याने अनूला फोन लावला. रिंग वाजली पण अनूचा मोबाईल समोरच टेबलवर होता.ती मोबाईल घरातच ठेवून गेली होती. बाळाच्या काळजीने आता अजितला घाम फुटला. त्याचा तो गोड ,हसरा चेहरा आठवून त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. जीव कासावीस होऊ लागला. तिरीमिरीत तो उठला. अनूला आता शोधणं भाग होतं. न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.
"कुठे गेली होतीस?" त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली. बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं. अजित आत आला.
" बरं वाटतंय का त्याला?"त्याने विचारलं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली. मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.
" साॅरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे....."
उत्तर न देता अनू रडत राहिली. अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं. त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला. रात्री दोन वाजता त्याला जाग आली. अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. तो उठून बाहेर आला. अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.
"मी घेऊ त्याला?"त्याने अनूला विचारलं. तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं. अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते. मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही, ओरडत नाही. प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते. बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही. त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या. दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं. पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती. फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक. तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही. अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची. कंपनीत आलं की अजितला आज ऑर्डर येणार तर नाही ना याची सतत भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं. नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणऊतारा केला. राचीची ऑर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने चौकशी केली तर पाटील मुंबईच्या ऑफिसमध्ये गेल्याचं कळलं. नक्कीच तो आपली ऑर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली. पण आता त्याने मनाची तयारी केली होती. किंबहूना त्याशिवाय पर्यायच नव्हता. अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती. पण एकदा तिथं गेल्यावर तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हे त्याला माहित होतं. आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला वारंवार सुटी घेऊन यावं लागणार होतं. धावपळ होणार होती पण इलाज नव्हता. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार फार कठीण होतं. तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं. त्यात दुपारी शिपाई जी. एम. साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला. जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.
" मे आय कम ईन सर"
" येस कम ईन"
तो जी. एम. साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.
" हॅव अ सीट माय बाॅय "
अजित बसला. जी.एम. साहेबांनी ड्राॅवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.
"धीस इज युवर ऑर्डर"
शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती ऑर्डर आली होती. पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं. अजितच्या पायातलं त्राण गेलं. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.
"काँग्रॅच्युलेशन्स फाॅर युवर प्रमोशन " त्याच्या कानावर जी.एम. साहेबांचे शब्द पडले तसे त्याने खाडकन डोळे उघडले.
"प्रमोशन? विच प्रमोशन?"त्याने आश्चर्याने विचारलं.
"येस ! यू हॅव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट ऑफ प्राॅडक्शन मॅनेजर."
अजितला फारसा आनंद झाला नाही. राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला आणि तिथल्या स्टाफला सांभाळणं सोपं काम नव्हतं.
" सर राचीका प्लांट कैसा है? जस्ट आस्कींग टू हॅव अ नाॅलेज बिफोर जाॅयनिंग"
"यु आर नाॅट गोईंग टू राची. यु विल वर्क हिअर ॲज प्राॅडक्शन मॅनेजर"
"व्हाॅट?"अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.
"येस माय बाॅय" जी. एम. साहेब हसत म्हणाले.
"व्हाॅट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?"
"उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाॅज व्हेरी ॲरोगंट पर्सन. ही नाॅट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हॅड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाॅज व्हेरी मच नाऊन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाॅर धीस पोस्ट "
जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. पाटील फार अहंकारी होता शिवाय कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राॅडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खुप नुकसान झालं होतं. म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता. आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला. वाटेत त्याने पेढे घातले. घरात तो शिरला तर बाळ हाॅलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता. अनू किचनमध्ये काहितरी करत असावी. अजित बॅग ठेवून बाळाकडे गेला. बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला. त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला. त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला. त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला. त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला. अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला. मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला. त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.
"द्या इकडे त्याला माझ्याकडे " अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.
" राहू दे ना थोडावेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय."
"नको. तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना." अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण बाळाचा मुड वेगळाच होता. त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली. आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला. अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.
" बदमाश ! विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते." हताश होऊन अनू म्हणाली.
"अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज" अजित कळकळीने म्हणाला
"तो विसरेल. तुम्हीही विसराल हो. पण मी कशी विसरेन. नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात. त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं. बरं तरी सोफ्यावर आदळलं,फ रशीवर आदळलं असतं तर..." बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.
" चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्यादिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो."
" पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय. पण ऑफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही. त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटॅक आला होता. त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता "
"अरे बापरे ! अगं मग सांगायचंस ना ! आपण गेलो असतो त्यांना भेटायला"
" काय सांगणार? मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात. मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली."
" आय ॲम एक्स्ट्रिमली साॅरी अनू. खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं. खुप पश्चाताप होतोय गं. माफ कर ना मला प्लीज"
" मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस आणि निष्पापांचाच बळी गेला आहे. माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता. बस. परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे."
" तुझी शपथ, अनू मी परत असं कधीही करणार नाही"
बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं. आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.
"एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राॅडक्शन मॅनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली. बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ."
"अहो त्यांना माईल्ड अटॅक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाॅक्टरांनी घरी पाठवलं."
"मग तर पेढे खायलाच पाहिजे." असं म्हणून अजितने बॅगेतला पेढ्यांचा बाॅक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.
©️ दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " गिफ्ट-भेट हृदयस्पर्शी कथांनी "या कथासंग्रहातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )