राधा अप्रतिम सुंदर होती. गौर वर्ण, लांब केस, मासोळी सारखे डोळे व त्यातला सात्विक भाव आतल्या सौदर्याची जाणीव करून देत असे. लहानपणापासून श्रीकृष्ण तिचा सखा बनला होता. कृष्ण सखा तिला मंदिरात दिसे, पुस्तकात भेटे, संगीतात उमगे, मोर पिसाऱ्यात जाणवे ! पावसाच्या धारात, उमललेल्या फुलात सर्वत्र तिला तो वेगवेगळ्या रूपात भेटत राहिला. घरी आईने लग्नाचा विषय काढला की राधा म्हणे आई मला माझा कृष्ण भेटला आहे. हा विनोद नव्हता हे आईला माहित नव्हते. आई म्हणायची, "आलीस मोठी श्रीकृष्ण भेटणारी. आणि बोलली तरी आहेस का या श्रीकृष्णाशी?"
"हो आई ! आमचे विचार जुळतात. आम्ही एकमेकाला खूप आवडतो पण त्यांचे लग्न झालाय आई !” राधा म्हणाली.
"राधे, काय हा निर्लज्जपणा ग? लग्न झालेल्याच्या मागे गेली आहेस?" आई कडाडली.
"अग आई, त्याचे रुक्मिणीशी लग्न झालय ग !" आईने कपाळावर हात मारून घेतला.
आई ऐक माझे ! तू ठेवलस ना माझे नाव राधा? "राध" हा संस्कृत धातू, ज्याचा अर्थ "आराधना"! त्याला "आ" प्रत्यय लागला आणि शब्द बनला राधा. जी आराधना करते श्रीकृष्णाची, ती राधा. आणि जिची आराधना (श्रीकृष्ण) करतात ती राधा. राधा बोलत राहिली. मला नाही करायचं लग्न इतर कुणाशी !”
"राधे हे कोड्यात बोलणे बंद कर. अनिरुद्ध कर्वे तुला भेटायला येत आहे रविवारी. मुकाट्याने भेट त्याला. उत्तम स्थळ आहे. आई म्हणाली व तिने राधेचं पुढचं बोलणं ऐकून घेतलं नाही.
रविवारी अनिरुद्ध व त्याचे आई बाबा राधाच्या घरी आले. राधा नाखुशीने मोरपंखी रंगाची साडी नेसून तयार झली. आईचे ओरडणे कमी व्हावे म्हणून ! रूपवान राधा श्रीकृष्णाच्या मोरपिसात लपेटल्यासारखी सुंदर दिसत होती. अनिरुद्ध व राधा गच्ची वर जाऊन बसले. सहा फूट उंच, गव्हाळ वर्णाचा देखणा व मिष्कील अनिरुद्ध M.B.A. झाला होता. वडीलांचा दूध डेअरीचा बिझनेस होता. उत्तम नोकरी नाकारून त्याने बाबांनी सुरू केलेली डेअरी चालवायचं ठरवलं होतं. त्यांच्या किरकोळ गप्पा झाल्या. राधाने त्याला सांगितले, "श्रीकृष्ण हे माझे सर्वस्व आहे. ती जागा इतर कोणी घेऊ शकेल असे मला वाटत नाही." मॉडर्न काळातील ही राधा बघून अनिरुद्धला आश्चर्य वाटलं. राधा त्याला मनापासून आवडली होती.
तो विचार करून म्हणाला, "मी काही सांगू का तुम्हाला? अनंत कोटी बह्मांडामधील चर-अचर, जड-चेतन, स्थावर-जंगम असे जे जे आत्मे आहेत ते फक्त पृथक आहेत असं वाटतं पण ते वेगळे नाहीत. त्यांचेच नाव राम, कृष्ण, गोविंद आणि अनिरूध्द सुध्दा !. पण आत्म्याचे परमात्म्याशी जे नाते आहे त्याचेच दुसरे नाव राधाराणी ! राधा चमकली. अनिरूध्द इतकं गहन बोलेल असं तिला वाटलं नव्हतं. ”कुछ तो बात है” असं तिला वाटलं. जाताना त्याने तिला विचारलं, ”गावात भागवत सप्ताह आहे त्याला आपण जाऊया का?” तिला धक्का बसला पण हल्लीच्या काळातल्या मुलाला भागवताला जायचंय याचा आनंदही झाला.
“जीवाला दिलेलं घर म्हणजे शरीर. शरीराचे सर्व अवयव आतमध्ये वास्तव्य करणाऱ्या तेजस्वी निखाऱ्यासारख्या लखलखत्या चैतन्याची किंवा आत्म्याची चाकरी करतात. आत्मा त्याचे परमात्म्याशी नातं सतत शोधत असतो. पण त्या परमात्म्याचा आत्मा कोण? श्रीकृष्णाचा आत्मा आहे राधा ! आत्मा तू राधिका तस्य ! राधेची आपल्याबद्दल असणारी अनन्य भक्ती अनुभवून श्रीकृष्णाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात. त्या धारा म्हणजे राधा. धारा सतत उच्चारता शब्द बनतो राधा. राधा ही श्रीकृष्णाची शक्ती आहे, प्रेरणा आहे, चैतन्य आहे.” बुवा भागवताचं पानं न पानं उलगडून त्यातलं सौंदर्य दाखवत होते. अनिरूध्द बरोबर भागवत ऐकणं, चर्चा करणं यात सप्ताह रंगला. पण त्यानंतर दोन दिवस त्याचा टेक्स्ट आला नव्हता. राधा दाखवत नव्हती पण मनात अस्वस्थ होती. तत्वज्ञानाचे नवे पैलू दाखवून देणारा अनिरूध्द अगदी वेगळा होता. तिला त्याच्याशी मैत्री करावी असं वाटत होतं. लग्न नाही. राधा नेहमीप्रमाणे मुरलीधर कृष्णाचे रूप ध्यान करायला बसली. डोळ्याची कवाडं बंद झाली की तिचा शाम तिच्यापुढे साकार होत असे पण काही वेळात डोळ्यापुढे अनिरूध्द दिसू लागला. हे काय बाई विचित्र. तिचं ध्यान लागेना. आई म्हणाली, “राधे, अनिरूध्दच्या आईंनी तुला त्यांचे घर बघायला बोलावलय.” राधा मनोमन हरखून गेली पण तिनं तसं दाखवलं नाही. दुसरे दिवशी कर्व्यांकडे पोचताच तिची नजर अनिरूध्दला शोधत होती. आईनं घर दाखवलं. अनिरूध्दचे आई वडील लवकर गेल्यानं त्याला आपण दत्तक घेतल्याचं सांगितलं. अनिरूध्दची बहीण सीमा तिला खूप आवडली. सीमा म्हणाली, “अग आज डेअरीला २५ वर्ष पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम आहे तिथेच दादा बिझी आहे.” तिघी डेअरीच्या हॅालमधे गेल्या.
“कृष्ण राधेचा” हे नाटक सुरू झालं. सावळा अनिरूध्द केसात मोरपीस लावून कृष्ण वेशात शोभून दिसत होता. सुंदर अभिनय करत होता. “दादा स्वत: वाजवतो आहे हं बासरी !” सीमा म्हणाली. शेवटचं कृष्णाचे स्वगत ऐकून राधेच्या अंगावर काटा आला. कृष्ण म्हणत होता, “ राधा आणि कृष्ण यांची बुद्धी एक, मन एक, आत्मा एक आणि ज्ञान एक आहे म्हणजे श्रीकृष्णची भक्ती केली काय आणि राधेची भक्ती केली काय ! एकूण एकच. जसे दुधापासून त्याचा सफेद रंग बाजूला काढता येत नाही तसेच राधा आणि कृष्ण विभक्त करता येत नाहीत ! तिनं डोळे मिटले. अनिरूध्द नाटक संपवून तिच्याजवळ आला. “राधा...” त्यानं हळूवार हाक मारली. तिने डोळे उघडले. अनिरूध्द म्हणाला,” आवडलं? उद्या डेअरीचं काम दाखवेन. आत्ताच एक नवीन वासरू जन्माला आलय. चल दाखवतो” ती मोहरून गेली होती. ते सुंदर वासरू कसंबसं उभं राहताना बघून तिचे डोळे कृतज्ञतेने भरून गेले. तिनं डोळे मिटले.बंद डोळ्यापुढे कृष्ण सखा आला व म्हणाला,”अजून किती पुरावे हवेत तुला? योग्य व्यक्तीशी मी तुझी भेट घडवून आणली आहे ! आता “त्या”अनिरूध्दाची राधा होऊन जीवन सत्कारणी लाव.”
अनिरूध्दने हलक्या हाताने राधा म्हणत तिच्या खांद्यावर हात ठेवला. डोळे उघडताच केसात मोरपीस घातलेला, हातात मुरली धरलेला,सावळ्या चेहऱ्यावरचे मिष्कील हास्य असलेला, दुध दह्यात रमलेला, वासराला कवटाळणारा अनिकेत जवळ उभा होता का साक्षात श्रीकृष्ण उभा होता ते तिला कळत नव्हतं.” आत्मे पृथक आहेत असं वाटतं पण फरक नसतो. राम, कृष्ण, गोविंद काय आणि अनिरूध्द काय ! सगळी त्याचीच रूपं.” आठवतं होतं. जिथं मन स्वस्थ होईल, जिथं उपासना असेल आणि जिथं अनिरूध्द आहे अशी जागा श्रीकृष्णानेच दाखवून दिली होती. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. अनिरूध्द गायीचे दूध कसे काढायचे नवीन कामाला लागलेल्या मुलाला शिकवत होता आणि आता उघड्या डोळ्यानीच आज तिचं ध्यान लागलं होतं !आता कृष्ण आतही होता व बाहेरही होता. तिचं मन कृतज्ञतेने भरून गेलं होतं.
आत्मा तू राधिका तस्य ! अनिरूध्द सारं समजून मिष्कील हसत होता.
©® ज्योती रानडे ✍️
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा