ती गेली. रस्त्यावरून झपझप चालायची ती, जणू रस्ताच चालतोय. इतकी कसली घाई तिला? मुली घरी आहेत ना, तिचे परवलीचे उत्तर. मुलींची फार काळजी तिच्या डोक्यात. मुलींना वाढवायचे, शाळेत पाठवायचे, मोठे करायचे तिचे स्वप्न. एका पाठी एक अशा तीन मुली झाल्या तिला. दहा, आठ नि दोन वर्षाची धाकटी. तिला मुलीचं झाल्या म्हणून नवरा, सासू तिचा काळासारखे राग करायचे. तिला, मुलींना खायला द्यायचे नाही, औषधपाणी तर दूरच. तीच मुलींसाठी झटायची. कमवून आणायची. प्रेमाने खाऊ घालायची. हिडीसफिडीस करणाऱ्या नवऱ्याची दिवेलागणीच्या वेळी वाट बघायची. तो यायचा नशेत तर्र. रागे रागे पहायचा विनाकारणच. मुलींकडेही अक्षम्य दुर्लक्ष करायचा. ज्या माणसापासून आपल्याला केवळ मुलीचं झाल्या, निव्वळ एक्स एक्स क्रोमोझोमचेच दान मिळाले, त्यासाठी ती नवऱ्याचा अजिबातच दुस्वास, तिरस्कार करत नसे. ती त्याच्यावर अन् मुलींवर फक्त न् फक्त प्रेमच करत असे. तिच्यावर मुलासाठीचा दबाव वाढत गेला. 'सासरच्या' मर्जीने पुन्हा तिला दिवस गेले. आम्ही मैत्रिणीच चर्र घाबरलो. परिस्थितीने मानसिक, आर्थिक, शारीरिक दृष्ट्या गंजलेली ही अशक्त स्त्री कशी जन्माला घालेल चवथे मूल? भरीला धाकटीच्या आधी दोन अबॉर्शन झालेले. जाऊ द्या, काटकुळी असली तरी काटक आहे. आम्हीच आमचे समाधान करून घेत असू.
जमेल तसे पैसा, खाणे पिणे पुरवत असू. तिला स्वतःसाठी काही नको असे, मुलींसाठी मागे. स्वाभिमान मागे टाके. ओशाळे हसे. कधी नव्हे ते तिला दम लागू लागला आणि आमचे मन थरथरले. दिवस जात राहिले, तिचे दिसणे कमी झाले. आराम करत असेल आमचा 'सुशिक्षित' समज. आमचा 'व्यस्त' व्याप. एकदिवस संधिप्रकाश फाकला. ऑफिसमध्ये कुणीतरी म्हणाले सवाष्ण जाते ना तेव्हा पसरते अशीच लालिमा. मा. म्हणजे आई, नाही का? काहीतरीच काय, चार पाच दिवसांपासून तिची तीव्र आठवण येते त्याचा या संधिप्रकाशाशी काय संबंध? मन म्हणजे द्वाड वासरू. मन म्हणजे काळजातल्या अभिसूचनांचेही सूचक कोवळे केंद्रच ना? तो संकेत वेळेवर समजायची सजगता हवी ना? पहाटे चार वाजता ती गेली, निरोप आला. अंतःकरणाला इतका धक्का बसला की डोळ्यांत पाणीही आले नाही. कानावर शब्द आदळत होते, रात्री आठ वाजता मुलगा झाला, बारा एक वाजता फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनला नवरा, सासूने परवानगी दिली. त्यानंतर काय झाले देव जाणे, पण सतत धुसफूसत नाराज राहणाऱ्या सासरच्या मंडळींच्या ओटीत गुटगुटीत मुलगा टाकून ती परलोकी निघून गेली.
अशी कशी निघून गेली ती? मुलींमध्ये केव्हढा जीव होता तिचा. त्यांचा विचार नाही आला इच्छाशक्ती क्षीण होतांना. मोती घरंगळावा तसा श्वासच तुटून गेला तिचा. विश्वासंच बसत नाहीये. मुलगा देऊ शकत नाही म्हणून प्रचंड छळवाद सोसणारी ती, देखणा पुत्र देऊन, प्रचंड थकून, ताणतणावाच्या ग्लानीत मृत होऊन बसली. आज देश महासत्ता होण्याकडे जातोय. स्त्री सर्वथा सक्षम होतेय. पण अशी एखादी अश्राप 'ती' अकस्मात निघून गेल्यावर अजूनही पुत्रकामेष्टीची लालसा बऱ्याच घरात बेमालूम रांगत असून, सर्रास 'तिचा' बळी घेतेय हे वारंवार सिद्ध होतंय. चार दिवस शोक केल्यावर तिचा असा अपुरावा खून करणारा तिचा नवरा आणि तिची सासू काळाच्या पटलावर उजागिरीने फिरेल. बाळाला आई हवी म्हणून नवरा दुसरे लग्न करेल. सर्वांना ते नॉर्मलच वाटेल. तिचा एक प्रकारे मर्डर झाला आहे हे कुणाच्या ध्यानातही येणार नाही.
तिची अंत्ययात्रा निघाली तेव्हा आभाळाचेही डोळे गळले. मृत्यूनंतरही काही जग असेल तर, त्यातून बघताना तिचा जीव तीळ तीळ तुटेल. मुलासाठी तगादा लावताना तिच्या दुर्बल आरोग्याचा, कमजोर सहनशक्तीचा जराही विचार न करणाऱ्या तिच्या नवरा आणि सासू नामक मारेकऱ्यांना काही शिक्षा होईल का? की अजूनही ते भयानक वंशपिसाट मोकाटच फिरेल?
अजूनही...
अजूनही....
©जयश्री दाणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा