सरीता साधना सावित्री, देशपांडे काकांच्या तीन मुली. तिघी दिसायला सुंदर. पण परिस्थिती सामान्य. देशपांडे काकांनी कधी तीन ही मुलीच म्हणून कपाळाला हात लावला नाही की नशिबाला दोष देत बसले नाहीत. काकूनी पण आपल्या परीने संसाराला हातभार लावला, काटकसर केली, मनाला मुरड घातली पण घरातील वातावरण कधी हिरमुसलं होऊ दिलं नाही. पदरात तीन मुली म्हंटल्यावर मैत्रीणीच्या सासूबाईंकडून शिलाई शिकल्या. साध्या बाजारातून कापडं आणून तीन ही मुलींचे वेगवेगळ्या पध्दतीचे कपडे शिवले शिलाई वर हात बसवला. मग जम बसवला. चार पैसे त्याचे मिळायला लागले. काका पण कामावरून आल्यावर टायपींगचं काम घेऊन बसायचे. मोठ्या दोघींचा प्रश्न नव्हता त्या साध्या सरळ सागरगोटे खेळण्यात रमणाऱ्या होत्या धाकटीच जरा द्वाड होती. हट्टी होती आणि अभ्यासातच काय एकूणच हुशार होती. तिला स्वतःची मतं होती. स्वतःचे हट्ट होते. त्यातला पहिला हट्ट म्हणजे आई बाबांना निवांत सुखाचे चार दिवस दाखवल्या शिवाय लग्न करणार नाही. त्यासाठी मिळेल ती नोकरी करत. ती आणखी आणखी शिकत राहिली. मोठ्या दोघींची ठरल्या वयात लग्न झाली. मोठी कोल्हापुरात दिली. साधना कल्याणात गेली. यांच्यापेक्षा दोघींच्या सासरची परिस्थीती चांगली होती. काका काकू ना त्यातच समाधान. दोघी मुली सुखी होत्या. सासरी कसला जाच नव्हता. घोर सावित्रीबाईंचाच होता. काका सावित्री ला टग्या म्हणायचे आता टगोबा म्हणायला लागले. काकू त्यावरून काकांना रागवायला लागल्या सारखं टग्या टग्या म्हणत आलात ना म्हणून ती स्वतःला मुलगाच समजायला लागली. मुलीच्या लग्नाचं एक वय असतं हे लक्षातच येत नाही घोडीच्या. घोडनवरी म्हणवून घेण्यासारखं दूःख नाही. इतकी स्थळं येतात, मागण्या येतात पण ही मनावर घेईल तर ना? पण सावित्रीला असला विचार करायला वेळ होताच कुठे? कर्तबगार मुलीला कुठे वयाचं भान असतं. डोंगरा एवढं काम उपसलं तरी डोंगराएवढं काम उरतच डोक्यावर.
पण सावित्रीबाईनी तीशी ओलांडली आणि काकूंनी बंडच पुकारलं. सावित्री दोघांना एक महिना युरोप टूर ला पाठवणार होती पण काकू नी स्पष्ट नकार दिला तुझ्या बाबांना पाठव आता तुझी रीतसर पाठवणी केल्याशिवाय मी काही कुठे जायची नाही. काय सुखाचे दिवस दाखवायचे होते ते दाखवलेस. घरात तुझं दर्शन दुरापास्त झालं पण या भल्यामोठ्या घरात आणून ठेवलस. खाली बघताना धडकी भरावी इतक्या उंचीवर आणून ठेवलस. अंधाऱ्या खोलीत शिलाई करत होते आता घरभर लख्ख प्रकाश आहे पण माझी शिलाईच बंद केलीस. पण आमचं सुख यात नाहीचे. तुम्हा मुलींचे सुखाचे संसार पाहण्यातच आमच्या आयुष्याचं सार्थक आहे. सावित्रीबाई शेवटी आईच्या हट्टापायी लग्नाला नाही पण स्थळं बघायला तयार झाली. पण त्यासाठी तिचं बुड स्थीर होतं कुठे? ती व्हिडिओ काॅलचा पर्याय सुचवत होती. पण काकूंना ना तो पर्याय अजिबात मान्य नव्हता. लग्नगाठ काय अशी व्हिडिओ काॅलवर ठरवायची?उद्या म्हणशील लग्नासाठी हाफ डे घेते, लग्नासाठी वेळ नाही म्हणजे काय? मग काकूंनी आणखी एक बंड पुकारलं बाहेर जाताना घरची गाडी वापरणार नाही. बसने जाईन, पायी पायी जाईन, पण तुझ्या गाडीत पाऊल टाकणार नाही. असा फतवा त्यांनी काढला यात काकांना काही बोलायचा प्रश्नच नव्हता. कारण तुम्हीच टगोबा टगोबा करत तिला शेफारून ठेवलीत. असा तोफगोळा त्यांच्यावर पडला असता. हिला पहिली मागणी आली तेंव्हाच कान धरून बोहल्यावर चढवायला हवी होती. कशी राजाची राणी होऊन राहिली असती. यावर सावित्रीबाई म्हणायची की आता पण मी राणीच आहे की, माझ्या मर्जीची मालकीण. मग झालच काकूंचा दोन तीन दिवसाचा अबोला निश्चित. अन्नसत्याग्रहाच्या धमक्या. मग सावित्रीबाईंचं कधी समोर बसून कधी फोनवर बोलून समजावणं सुरू. आईचा अबोला म्हणजे काकांचा टगोबा एकदम हेल्पलेस, कुठल्या कामात लक्ष च लागायचं नाही.
पण हे वातावरण एकदम बदललं जेंव्हा रोहीत बेलापुरकरचं स्थळ सांगून आलं. रोहीत बेलापूरकर? रोहीत बेलापूरकर? नाव आठवायला वेळ लागला नाही खूप ओळखीचं नाव वाटत होतं. पण लक्षात येत नव्हतं. 'तो' तोच असेल या वर विश्वास ठेवायला मन तयार नव्हतं. पण तिने स्वतःवर ताबा मिळवला मन शांत करायला वेळ लागला आणि तिची खात्री पटली हा रोहीत तिला एक वर्ष सिनियर होता. समस्त मुली त्याच्या नावाने वडाला दोरा बांधायला उत्सुक. अशावेळेस आपण त्याला धुडकावून लावला स्पष्ट नकार दिला आणि इतक्या वर्षांनंतर तो पून्हा आयुष्यात डोकावला ? कसं शक्य आहे? भेटायची गरज नाही आधीच होकार देऊन टाका असं म्हणण्या इतकं तिचं मन अधीर झालं तितकच ते नस्त्या शंकेने धास्तावलं. मन चिंती ते वैरी नं चिंती तसं तिचं झालं. त्या वयातल्या अपमानाचा वचपा त्याला या वयात काढायचा असेल तर? आता मला भेटून त्याने ठरवून नकार दिला तर? आईला किती टेंशन येईल, ती फारच मनाला लावून घेईल आणि त्याचा परीणाम म्हणुन आपल्याला घाईने लग्नाचा निर्णय घ्यावा लागेल. या विचाराने तिची एक्साईटमेंटच संपली. उरली ती फक्त धास्ती तिने आपली धास्ती आपल्या तायांजवळ बोलून दाखवली. समजूत काढायला दोघी माहेरी हजर झाल्या आणि काकूंच्या जिवात जीव आला. त्याना वाटलं होतं सगळा जुल्माचा राम राम आहे. मुला समोर कशी वागेल कोण जाणे? पण दोन्ही तायांनी समजावलं आणि बैठक ठरली. बैठकीचा दिवस ठरला आणि ठरल्या प्रमाणे उगवला. आणि बैठकीच्या वेळी वेगळाच बेलापूरकर समोर आला.
एका व्यक्ती सारख्या जगात सात व्यक्ती असतात. मग रोहीत बेलापूरकर नावाचे चार काय चाळीस मुलगे असू शकतात. तिला आपल्याच विचाराने हसू आलं तसा हा रोहीत बेलापूरकर सुध्दा खुप छान हसला. तो ही कर्तुत्ववान च होता. फार लहान वयात त्याने काचेचा कारखाना सुरू केला होता. त्यात यशस्वी ठरला होता. शिवाय मोठ्या मोठ्या गायकांना साथ करायला तो तबल्यावर असायचा. त्यासाठी तो परदेश वार्या ही करायचा. कित्येक गायकांना तबल्यावर रोहीतच लागायचा. त्याला त्या क्षेत्रात ही खूप मान होता. दोघं खूप छान हसले आणि तो म्हणाला आपली ओळख जुनी आहे पण आपण भेटतोय पहिल्यांदी. त्याच्या या बोलण्याने सगळेच अचंबित झाले. सावित्री पण गोंधळली नकळत ती म्हणून गेली "हो, नाव ऐकल्यावर मला वाटलं होतं आपली जुनी ओळख आहे . पण तुम्हाला पाहिल्यावर लक्षात आलं ते तुम्ही नाही." "तो अग्रहाने म्हणाला तो मिच आहे रोहीत बेलापूरकर."
कसं शक्य आहे? ती अविश्वास दाखवत म्हणाली. तो शांतपणे म्हणाला सांगतो !
शाळेत असतांना तुम्ही जवाहर बुक डेपोतून सेकंड हँड पुस्तकं घ्यायचात ना? ती श्वास रोखून बघत राहिली. तो म्हणाला त्या प्रत्येक पुस्तकावर माझं नाव ठळक अक्षरात असायचं रोहीत बेलापूरकर. मी सुध्दा ब्रिलियंट स्टुडंट होतो. मी जवाहरमधे पुस्तकं घ्यायला जायचो तेंव्हा दिलीप काका आवर्जून सांगायचे रोहीत पुस्तकं अगदी जपून वापर तुझ्या सारख्याच ब्रिलियंट स्वाभिमानी मुलीला ही पुस्तकं वापरायची आहेत. म्हणून पुस्तकाचं प्रत्येक पान उलगडताना मी सांभाळून उलगडायचो जणू तुमची जबाबदारी माझ्यावरच आहे. सातवी ते दहावीपर्यंत हा सिलसिला सुरू होता. दरवर्षी तुम्ही माझ्या पुस्तकात डोकावत होतात. दिलीप भाई म्हणाले होते कौतूकाने मी तिला सगळा सेट गिफ्ट करू शकतो. पण तिला ते आवडणार नाही. सेकंड हँड तर सेकंड हँड ती पुस्तकं विकतच घेईल. साॅलीड ग्रेट वाटलं होतं तेंव्हाच. मग योगायोग असा की दहावीला मला एक्याणव टक्के मिळाले आणि तुला सुध्दा. मी विज्ञान शाखेकडे वळलो आणि काच हा पदार्थ द्रवं असून तो घनपदार्था सारखा दिसतो याचं पृथक्करण करताना मला तू आठवायचीस. परिस्थीपेक्षाही तू घेतलेल्या निर्णयाने टफ झालेली. जेंव्हा मला जोशी काकूंकडून कळलं आई वडिलांना सुखाचे दिवस दाखवल्या शिवाय मी लग्न करणार नाही असा तुझा निश्चय आहे त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. काकूंना म्हणालो मी आजन्म थांबायला तयार आहे या मुलीसाठी फक्त तिने लग्नाचा निर्णय घेतला तर सगळ्यात आधी मला सांगा. त्यांचा मला फोन आला आणि माझी तपस्या संपली.
गुदमरलेला श्वास मोकळा करत गळ्यातला हुंदका सय्यमाने तिने त्याच्या कुशीत दडवला. ती रोहीतच्या मिठीत कोसळली म्हणजे एका अर्थी मिसळली. आई बाबांना सुखाचे दिवस दाखवून झाले होते त्यावर हा अतीव सुखाचा दिवस तिने दाखवला.
चं गो (©®Chandrashekhar Gokhale )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा