मंगळवार, ४ जून, २०२४

1196. माणिक मोती

        मी पॅालला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो साधारण ५० वर्षाचा होता. माझी नोकरी जवळच्या हायस्कूलच्या I.T. डिपार्टमेंट मधे सुरू झाली होती. पॅाल हायस्कूलची स्वच्छता ठेवत असे. लहान मोठ्या गोष्टी दुरूस्त करणे, दारांच्या काचा पुसण्यापासून ते प्रिंटर पेपर आणून देणे असं लागेल ते काम तो करत असे. सहा फूट उंची, लालसर गोरा रंग, कुरळे सोनेरी केस, सोनेरी काडीचा चष्मा, नेव्ही शर्ट व सतत हसरा चेहरा असणारा पॅाल विद्यार्थ्यांमधे अतिशय प्रिय होता. कधी डोनट व कॅाफी घेऊन तो जिंकलेल्या किंवा हरलेल्या स्पोर्टस् टिमचं कौतुक करताना दिसे तर कधी ब्रेक-अप होऊन रडत बसलेल्या मुलीचं सांत्वन करताना दिसे. कधी डाऊन्स सिंड्रोम असलेल्या मायकेलशी हास्य विनोद करत उभा असे तर कधी अरेरावी करणाऱ्या मुलाला चार शब्द ऐकवत असे.  कामाच्या पहिल्याच दिवशी माझ्या ॲॅाफिसच्या दाराच्या काचा पुसताना पॅाल दिसला. हसून म्हणाला, “माझं नाव पॅाल. Welcome to our school. तुला काही हवं असेल तर मला सांगत जा. बरं वाटलं तुला भेटून !”
नंतर दोन वेळा दिसला तेव्हा मी विचारलं, “कसा आहेस पॅाल?” तर म्हणाला,”आजच्या एवढा चांगला दिवस नाही. एकदम मस्त आहे आज. फार एन्जॅाय करत आहे.” दिवस एवढा का चांगला विचारत बसायला मला वेळ नव्हता म्हणून Great म्हणून मी कामाला लागले.  पुढील काही वर्षात पॅाल जवळचा मित्र बनला. बायकोसाठी लाल गुलाबाच्या २४ फुलांचा गुच्छ नेताना दिसला. मी विचारलं,”लग्नाचा वाढदिवस आहे? तर म्हणाला, ”नाही ! असंच कौतुक करतोय.” त्याचा मुलगा सुतार होता व मुलगी एका हॅाटेलमधे सेक्रेटरी होती. सुट्टीच्या दिवशी पॅाल कुठे चर्च मधली खोली रंगवताना, कुणाच्या बागेत झाड लावताना तर कधी एखाद्या शेजाऱ्याचं छप्पर दुरूस्त करताना दिसे. सुरूवातीपासूनच एक गोष्ट मला जाणवू लागली होती की कधीही पॅालला विचारलं “कसा आहेस?” चं उत्तर “आजच्या एवढा चांगला दिवस नाही”, आज मी उत्तम आहे. एवढं मनासारखं झालंय सगळं आज” असच मिळायचं.  मला हे उलगडत नव्हते. पोटापुरता पगार मिळत होता. लहान असलं तरी स्वत:चं घर होतं. पण इतकं आनंदी कोण असतं? आधी व व्याधी कुणाला सुटल्या आहेत? हा नेहमी सुखी माणसाचा सदरा घालून कसा हिंडत असतो? मी विचारायचे ठरवलं. पण पॅाल त्या आठवड्यात दिसला नाही. त्याची बायको आजारी आहे असं समजलं. आठवडाभर कुठलीही काच चमकली नाही. पॅाल आठवड्याने परत आला. 
“कसा आहेस पॅाल?” मी विचारलं. आज पॅाल वेगळं उत्तर देणार याची खात्री होती पण “Haven’t been better than today! बायको हॅास्पिटलमधे होती. खूप सेवा केली तिची. उत्तम डॅाक्टर भेटला बघ. एकदम हूशार! सर्जरी उत्तम केली त्यानं.” पॅाल म्हणाला. 
“पॅाल तुला कधी त्रास होत नाही कशाचा? काळजी वाटत नाही? वाईट वाटत नाही?  तू नेहमी haven’t been better कसे म्हणू शकतोस?” मी न राहवून विचारलं.  तो हसला. “अग काही वाईट झालं तर त्रास होईल ना ! सगळं छान चाललंय ! घरात खायला अन्न आहे. बायका मुलांचं प्रेम आहे. इथे पोरं जीव टाकतात. तुम्ही सगळे कौतुक करता. मी आजही काचा इतक्या चकचकीत करू शकतो की लोकांनी बघत रहावं. आकाशात रोज सुर्य उगवत आहे. सकाळी उठल्यावर श्वास घेता येत आहे. हात पाय धड आहेत. ज्यानं जन्म दिला तो काळजी घेत आहे. एवढं सगळं मिळाल्यावर कशाची तक्रार करायची?”
तरी मी विचारलं, “बायकोच्या ॲापरेशनच्या वेळी काय वाटलं?”  पॅाल म्हणाला, ”उत्तम डॅाक्टर शोधणं हे माझे काम होतं ते मी केलं. तिला आधार देणं हे काम होतं ते मी केलं. तिची औषधे वेळेवर देणं मी करत आहे. तिला धीर देत आहे. एवढंच माझ्या हातात आहे. त्याच्या पुढच्या गोष्टी ज्यांच्या हातात आहेत त्यांनी त्या उत्तम केल्या की झालं. तो डोळे बारीक करून म्हणाला, "तुला एक सिक्रेट सांगू? आपले विचार युनिव्हर्स ला ऐकू जातात बरं. स्वानुभवातून सांगतोय. ते बरोब्बर ऐकतं आणि तस्से करतं. म्हणून एकच करायचं - No matter how stressed you are Remember how blessed you are ! बरं ऐक, मला चालताना धाप लागतेय हल्ली. पण डॅाक्टर उत्तम मिळालाय. स्ट्रेस टेस्ट कशी झाली कळवेन तुला. कदाचित ॲंजिओग्राफी लागेल.”
मी डोळ्यात आलेले दोन अश्रू पुसत कामाला लागले. भगवत् गीतेतल्या कर्मयोग्याशी गाठ घालून दिली होती श्रीकृष्णाने. अशी काही माणसं असतात जी भेटली की उर्जा देतात. सकारात्मकतेचे माणिक मोती वाटत पुढे जातात. जीवनाचा अर्थ शिकवतात. शिक्षण नसून ज्ञानी असतात. हिमालयात न जाता योगी असतात. जमिनीवर राहून आकाशाशी नाते जोडतात आणि युनिव्हर्स चं सिक्रेट शिकवून जातात. जरी ह्रुदयविकार निघाला तरी पॅाल उत्तम राहिल हे मला माहीत होतं. तो खचणार नाही की डगमगणार नाही.  अगदी अंतिम क्षणी जरी पॅालला कोणी विचारलं की तू कसा आहेस?  मला खात्री आहे की तो म्हणेल, ” देवाघरी चाललोय.. Haven’t been better than today!”😊

©️®️ ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...