त्याची चिडचिड जरा जास्त वाढली होती. सहाजिकच होतं. खाणारी तोंडं पाच. त्यात सासुबाईंचे आजारपण. सगळं तसं कठीणच होतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीला आपण थोडीच जबाबदार आहोत. शहरात नोकरी आहे, मागे फार व्याप नाही. एक मतीमंद भाऊ मात्र आहे आणि सासुसासरे आहेत. सगळं आपले वडिल बघुन आले होते. आईने खरंतर चांगला विरोध केला होता 'नको, परिस्थिती तशी बेताची दिसते' म्हणून, पण वडिल तेंव्हा म्हणाले होते, "अगं आपल्या आटोक्यातलं ठिकाण आहे. फार मागणी नाही, दाराशी लग्न लावलं तरी चालणार आहे आणि पोरगा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. आता खोडा नको काढू."
आपल्याला आवडला होता. तसा मनातुन स्वच्छ होता. पहिलेच सांगुन टाकलं होतं 'आहे त्यात भागवावं लागेलं हं.' आपणही उत्साहात 'हो, नक्की' म्हणत केली सुरुवात. पण हल्ली सासूबाईंच्या खर्चाचे ताण, दिर त्यांची औषधं, सगळं अवघड होत चाललेलं आणि त्यात आपण आज पैसे मागितले, स्वतःसाठी नाहीच, सासुबाईंची आज 75 तरी, खुप काही कार्यक्रम नाही करणार तर निदान एखादी साडी कॉटनची घेऊ असं वाटलं आपल्याला. तर खुशाल म्हणतो, "कमवायला शिक जरा स्वतः, मग कळेल कसा एक एक रुपया कमवायचा तर कष्ट लागतात. काही गरज नाही तिला साडी घ्यायची. सध्या खर्चाचा ताळमेळ बसवून मीच बेजार आहे."
'तू कमव' हे वाक्य लागलंच आज आपल्याला. पण आपलं तर धड शिक्षण नाही, वडिलांची परिस्थिती बेताची. एका पाठोपाठ पोरींची लग्न करून तेच बेजार. नाही शिकवलं मग त्यांनी. 'गजानना तुच मार्ग दाखव आता. डोळ्यातलं पाणी पुसत तिने हातातल्या दूर्वा आपल्या लाडक्या बाप्पाला वाहिल्या. मनातल्या विचारांचं काहूरही अश्रूंनी त्याच्या समोर मांडलं. तिला आता जरा मोकळं वाटलं. गल्लीतलं हिरव्यागार गवतात असलेलं हे छोटंसं मंदिर एरवी एकटं असणारं, पण चतुर्थीला अगदी माणसांच्या गर्दीने फुलणारं. बसस्टँडच्या अगदी जवळ असल्याने संध्याकाळी खुप गर्दी वाढते या पावन गणेशाला. एरवी नवऱ्यासोबत ती हि संध्याकाळी यायची. निरखत बसायची नारळातल्या त्या छोट्याश्या शेंदरी गणपतीला. आताही देवापुढे अश्रूंना वाट करून दिल्यावर तिला जरा मोकळं वाटलं. तिला तिचंच कळत नव्हतं आपला राग त्याच्यावर आहे की स्वतःवर. कोपऱ्यात वाती करत बसलेल्या आजीचं लक्ष होतंच. त्या मुद्दाम म्हणाल्या, "ताई वाती देऊ का ? 10 रुपयातच आहे."
ती म्हणाली "नको," पण तिला तिथंच थोडं रेंगाळाव वाटलं. ती आजींना म्हणाली,
"आजी नेहमी येता का तुम्ही इथे?
आजी म्हणाली, "हो चतुर्थी आणि गणपतीच्या दिवसात अगदी नक्की येते."
ती परत म्हणाली,"एवढं वय झालं कशाला दगदग करता हो?"
आजी उदास हसत म्हणाली,"अग घर खर्चाला काही कमवायला पाहिजे ना. दोन वर्षापूर्वी हे गेले. मुलबाळ नाही. ह्यांना काही नोकरी नव्हती. पौरोहित्य करत होते. सगळं अंधारून आलं गं. मग वाटलं, हातपाय गाळून चालणार नाही. अशीच उदास होऊन इथे बसले होते. चाकरमान्या बायका संध्याकाळी दर्शन घेऊन जात होत्या. एकीने विचारलं 'आजी वाती कुठे मिळतील हो विकत.'
घरच्यासाठी वळतच होते. म्हंटल 'ह्याच घे.' मग ती, तिच्या पाठोपाठ मैत्रिणी अश्या खुप जणांनी ऑर्डर दिली. फुलवात, वस्त्रमाळा, इतर वाती. सगळ्या ऑर्डर ठरलेल्या आहेत. आता 5 वाजता सगळ्या बसस्टँडवर जाण्यापूर्वी इकडे येतात आणि महिनाभराच्या वाती घेऊन जातात. 1000 एक रुपयांच्या वाती विकते मी इथे. काही घराजवळ ऑर्डर येतात त्या वेगळ्या. गजाननाने वाट दिली आहे मला." आजीने वाती करतानाच त्या गणेशाला हात जोडले.
"माझी एक सखी पण होती गं. ती मोदक घेऊन यायची. नवसाला पावतो म्हणून 21 मोदक खुप जणी वाहतात त्याला. ऑफिसवाल्या बायका म्हणतात हलवायापेक्षा तुमच्याकडून घेऊ.
ती पण असायची जोडीला. तिलाही मस्त गिऱ्हाईक होतं, पण 10 दिवसापूर्वी पडली. मग भाऊ घेऊन गेला. आज त्या बायकांना मोदक कुठे मिळतील की? बघेल तो विनायक."
तेवढयात हवेने घंटी जोरात वाजली. हिच्याही डोक्यात वाजली. "आजी, किती वाजता येतात त्या बायका?"
आजी म्हणाली, "5 वाजेनंतर येतात गं."
आता 3 वाजले. "आजी मी आणते मोदक करून. मलाही काहितरी करायचं आहे. हि संधी असावी."
आजी म्हणाली, "हो आण. तुला चार पैसे संसाराला होतील."
ती धावतच घरी गेली. मोदक तिच्या बाप्पाला आवडणारे. ते बनवण्यात ती तरबेजच. सासुबाईंना सगळं सांगितलं. त्यांचीही मदत झाली. डबाभर मोदक भराभर संपले. खुप जणांनी 'फराळाचे काय काय बनवून देऊ शकता' ह्याची चौकशी केली. काही ऑर्डर मिळाल्या. तेवढ्यात कार मधुन एक जोडपं बाळाला घेऊन उतरलं. दर्शन घेऊन हिच्याकडेच आलं. "आम्हाला नवसाचे 2100 मोदक येत्या गणेशचतुर्थीच्या दिवशी पाहिजे आहेत, जमेल का?" तिने "हो" म्हणताच 1000 रु तिला ऍडव्हान्स दिला. सगळी गर्दी संपली. आजी लवकरच निघून गेली होती. बरोबर 21 मोदक डब्यात शिल्लक होते. तिने ते गजानना समोर धरले, "बस असंच सकारत्मक मार्ग दाखवत राहा. तुला दर चतुर्थीला असेच 21 मोदक वाहात जाईल गणेशा."
मंदिरात आनंदाने रडवेली ती आणि पाठीमागे कौतुकाने आपल्याला साथ देणारी आपली बायको न्याहाळणारा तो होता. त्याचेही डोळे पाणावले. तिने हातातले पैसे दाखवले. तो हसला. दोघांनी दुकानात जाऊन सुंदर साडी घेतली. आईची 75तरी अगदी आनंदात झाली. झोपताना तिने डोळ्यासमोर परत ती नारळातली शेंदरी मूर्ती आणली. पण तिथे तिला वाती वळणारी आजीच दिसत होती. संकटांना घाबरू नको असं सांगणारी 😊
Copy And paste post 🙏🏼©स्वप्ना मुळे (मायी) औरंगाबाद.
(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा