गाण्यांच्या भेंड्या अगदी रंगात आल्या होत्या. भल्या पहाटे हॉटेल सोडून आम्ही चौघीजणी महेश्वरच्या दिशेने निघालो होतो. नर्मदा परिक्रमा जमत नाही तर नाही. पण निदान रेवामैय्याचं दर्शन तर घेऊ आणि अर्थातच माहेश्वरी साड्या हे मुख्य आकर्षण होतंच. दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचलो. हॉटेल अगदी मस्त होतं. एक जुना ऐतिहासिक राजवाडाच होता म्हणे तो.
"आत्ताच नदीकाठी जाऊन येणं बरं किनई. छान वारं असेल. सकाळी खूप ऊन होईल, निवांत बसता येणार नाही" म्हणत पटापट आवरून आम्ही लगेचच बाहेर पडलो. रम्य, प्रशस्त दगडी देवळं, ऐतिहासिक वाडे आणि लांबवर दिसणारा किल्ला - महेश्वरचं रूपडं छान होतं. ते सगळं पहात, उद्या यापैकी कुठे कुठे भेट द्यायची वगैरे ठरवत, रमत गमत आम्ही घाटावर पोहोचलो. केवढे प्रशस्त सुंदर घाट ते. दगडी बांधीव घोटीव पायऱ्या. आकाशातले मनोहर संध्यारंग. संथ वाहणाऱ्या नर्मदेच्या पाण्यात परावर्तित झालेल्या त्या रंगांमुळे जादुई चमकणारे पाणी. आणि शांत आल्हाददायक वारं. कसं छान वाटत होतं. आम्ही आपोआपच शांत झालो. एका जागी बसून आसमंत न्याहाळू लागलो. मंदिरांच्या घंटा निनादत होत्या. भाविकांची लगबग सुरू होती. कुणी पाण्यात डुबकी घेत मावळत्या सूर्याला अर्घ्य देत होते. गाई, गुरं, कुत्री यांचा मुक्त वावर होता. हार, प्लॅस्टिक, नारळ वगैरे कचरा दिसत होता. त्यातच लहान मुलं खेळत होती. कुणी आमच्यासारखेच आजूबाजूला शांत बसले होते. कुणी ध्यान लावून बसले होते, कुणी धुनी पेटवली होती, कुणी काही योगक्रिया करत होते. हे काय परिक्रमा करणारे साधू म्हणायचे की काय? मी कुतूहलाने पहात होते. एवढ्यात खूप छान झुळूक आली आणि त्यासरशी कुठल्या देवालयात लावलेल्या धूप आणि उदबत्त्यांचा दरवळ सुखावून गेला आणि मी डोळे मिटले.
कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माझी तंद्री भंग पावली. मला अचानक कळेच ना की मी कुठे आहे ते. नदीचे पाणी अचानक वाढल्यासारखं का दिसतंय? आणि ते ही किती स्वच्छ. आकाशसुद्धा गहिरे निळे दिसत होते. आजूबाजूला भरगच्च वनसंपदा दिसत होती. त्यात आजवर कधी न पाहिलेले पक्षीही किलबिल करत होते. घाट आणि मंदीर दोन्ही किती वेगळं दिसत होतं ! फुलं, हार, प्लास्टिक वगैरे सर्व कचरा जाऊन सगळा परिसर जणू नवा आणि स्वच्छ दिसत होता. आणि आजूबाजूचे लोक, त्यांची वेशभूषा आणि त्यांची बोली. किती वेगळी. मी उठले. अगोबाई. माझ्या अंगावर हे परकर पोलकं कुठून आलं. मनाशीच नवल करत मी दुडदुडत निघाले. एकाच वेळेस मला हे सगळं अनोळखी होतं आणि तितकंच ते परिचितही होतं. रस्ते ??? छे ... नव्हतेच. कच्ची सडक होती छोटीशी. त्यावरून तुरळक लोक इकडून तिकडे जात होते. मध्येच कुणी घोड्यावर बसून गेले. मी नवलाईने पहात राहिले. पण मी अशी नक्की कुठे चालले होते? मी नक्की कोण आहे? मी अशी छोटी कशी झाले? आहे तरी कुठे नक्की मी? या सर्व प्रश्नांनी भ्रमित झाले होते आणि तरीही माझी पावले आपसूक पुढे पडत होती. समोरच एक भव्य वाडा दिसला. आत कुठेतरी ओळखीची खूण पटली. पण पुढच्या मुख्य दरवाजाने घरात न शिरता जणू काही सवयीने मी त्या वाड्याला वळसा घालून मागच्या दाराने आत गेले. आणि एक कडाडता आवाज कानावर पडला.
"लग्न झालंय तुझं आता. शुद्ध आहे का काही? खुशाल अंधार पडेपर्यंत बाहेर भटकत राहतेस. उद्या सासरी गेल्यावर या घराचं नाव तर खराब करशीलच आणि आपल्या माळव्याचं पण. कुठे गेली होती एकटीच? नदीवर गेली असशील ना नेहमीसारखी. आता काय शिक्षा द्यावी हिला म्हणजे जन्माची अद्दल घडेल?"
"सासूबाई, मी बघते आज तिच्याकडे. तुम्ही घ्या फराळ करून. दिवसभर उपास केलाय. त्रास होईल तुम्हाला.
माई, आत ये आधी. आज नीटच बघते तुझ्याकडे."
माझ्या आजीला खाणं देऊन, मला खसकन ओढत आत नेत माझ्या या आईने मला माजघरात नेऊन चार फटके दिले.
"कधी सुधारणार तू माई? का असं करते गं? सासरी धिंडवडे निघतील गं बाई आपल्या दोघींचे. किती वेळा समजावून सांगितलं तुला, ऐकत कशी नाहीस तू?"
"आई, मला दूर पाठवणार आहेस ना सासरी? आता अगदी लांब. मग नंतर मनात आणलं तरी मला आपली रेवामाई भेटणार नाहीये गं. तू सांगितलेली सगळी कामं करते ना मी? अगदी लगेच आणि तू शिकवलीस तशीच. मग थोडा वेळ तरी नदीवर जाऊ दे की मला."
"पोरी, दहा वर्षाची झालीस तू. वर्ष झालं लग्न होऊन. पुढच्या वर्षी सासरी जाशील. आपल्या प्रत्येक बोलण्या चालण्यावरून आपली परीक्षा केली जाते बाळा. आणि फक्त तुझीच नाही, तर मुलीच्या आईचीही परीक्षा केली जाते. तुझ्या सासरी एवढे लोक. एकाची जरी मर्जी फिरली तरी संसाराचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. माझे बाई शाहण्यासारखी वागत जा."
बोलता बोलता आईने पदर डोळ्यांना लावला. तेवढ्यात कुणाची चाहूल लागली तशी सावरून ती मला परत रागे भरू लागली.
"पूर्वीचे दिवस गेले आता. आपण मुजरा घालत असलो तरी होळकरांचं राज्य राहिलं नाही म्हणतात. लोकांना काही धाक राहिला नाही आता आपल्या सरकारचा. आता ते टोपीवाले सरकार आलंय म्हणे. उद्या तुझ्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर? उद्या बाहेर पाऊल ठेवलं तर याद राख. चल आता. कंदील आणि चिमणी घासायला घे. तेलपाणी भरून वाती लाव. मी तोवर देवापाशी दिवा लावते. देवाला नमस्कार करून, मोठ्यांना नमस्कार करून रांधायला मदतीला ये चल लवकर."
मी पटपट कामाला लागले आणि ते तेवढ्यावरच राहिलं. दुसऱ्याच दिवशी मोठे चुलते शेतसारा भरायला म्हणून सरकारकडे जायला निघाले. सकाळी सकाळी बैलगाडी जोडली. साऱ्यासाठी कापसाच्या गठड्या भरल्या गाडीत आणि न्याहरी करून तहानलाडू भूकलाडू बांधून घेऊन गेले. सोबत माझे दोन भाऊ पण होते. ते गेल्यावर मी घरात फिरून पाहू लागले.ओसरी, पडवी, अंगण, बैठकीची खोली, माजघर, मुदपाक, परसू, माळवद वगैरे चांगलं ऐसपैस घर होतं ते. बैठकीच्या खोलीत दोन हंड्या टांगल्या होत्या. बाहेर पितळी फुल्या असलेल्या शिसवी पाटाचा मोठा झोपाळा होता. पण त्यावर आम्हा मुलींना जायला परवानगी नव्हती. मोठं देवघर, त्यात मोठमोठ्या समया, कसले कसले टाक, देवांची आसने होती. एकजात सगळे देव पितळी होते. स्वैपाकाला वापरली जाणारी सर्व भांडी, ताटं, पातेली, परात वगैरे सगळं सगळं पितळी होतं आणि सगळी भांडी अगदी मोठमोठी होती. परसात एका बाजूला मोठा गोठा होता. त्याची सगळी उस्तवार माझे वडील बघायचे. आमच्या कुटुंबात दोन शिलेदार होते. माझे मधले दोन काका. त्यांचे दोन घोडे एका बाजूला तबेल्यात होते. त्यांची मोठी बडदास्त असायची. पूर्वी हे दोघे होळकरांच्या सैन्यात शिलेदार होते म्हणे. घरची मोठी शेती होती. मला कितीतरी भावंडे होती. तीन काकू होत्या, एक आत्या होती. आम्हाला सारखं कुणी न कुणी रागावतच असायचं. कामांना तर अंतच नव्हता. त्यात मी आणि माझी चुलत बहीण यमी, दोघींची लग्न झालेली असल्याने आम्हाला 'वळण' लावण्याचा सर्वांनी मोठा चंग बांधला होता. यमी सुंदर होती, आज्ञाधारक होती, हळू बोलायची, हळू हसायची, त्यामुळे तीच सर्वांची लाडकी होती. पण तिला माझ्यासारखी पटपट कामं कुठे जमत होती. मी घासलेली भांडी तर अशी सोन्यासारखी चमकायची. बाबा तर पूजेचं ताम्हण मलाच घासायला सांगायचे. शिवाय मी तर आत्ताच स्वैपाकसुद्धा शिकले होते. तरी आपलं सगळ्यांना तिच्या रांगोळ्यांचंच कौतुक. त्या काही मेल्या मला नीट जमायच्या नाहीत बाई. तिच्या रूपामुळे तिला तालेवार घर मिळालं होतं म्हणे. म्हणजे काय कोण जाणे. आणि मी म्हणे दांडगोबा होते. त्यामुळे मला रागवायची एक संधी कुणी सोडायचे नाही. अशा वेळेस आई हताशपणे माझ्याकडे पहायची. डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी असायचं, पण ती काही बोलायची नाही. रात्री मात्र मला पोटाशी धरून काहीबाही समजावत राहायची. त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी सारा भरायला गेलेले चुलते परतले नाही. घरात काळजीचे वातावरण पसरले. सगळ्या बायका घाबऱ्या घुबऱ्या झाल्या. मोठ्या चुलतीने तर अन्न पाणी सोडून जप करत डोळ्यांना पदर लावून एक कोपरा धरला. आजी तिच्या शेजारी. एकमेकांची समजूत काढता काढता दोघी रडायला लागायच्या. रात्र कशीबशी उलटली. झुंजूमुंजू होताच माझे बाकी दोन्ही काका त्यांच्या घोड्यांवरून चुलत्यांच्या शोधाला निघाले. त्या दिवशी काळजीने घरात कुणालाच जेवण गेलं नाही. नाही म्हणायला शेजारच्या वहिनींनी आंबील करून आणली होती, ती मात्र बळंबळं प्रत्येकाला प्यायला लावली. बाबांनी समजूत काढल्यावर दुपारी सर्वांनी उगीच चार घास खाल्ले. हातावर पाणी पडतंय तोवर गेलेल्या गाड्या परत आल्या.
'इथून पुढे तुमच्या शेतातला माल सारा म्हणून चालणार नाही' म्हणत गोऱ्या सरकारने नेलेला कापूस घ्यायला नकार दिला. 'सारा म्हणून रोख पैका भरायला पाहिजे फक्त' असं फर्मान निघालं होतं म्हणे. पैका आणला नाही म्हणून त्यांनी काकांना दिवसभर उन्हात उभं करून ठेवलं होतं. माझे दोन्ही दादा काही बोलायला गेले तर त्यांना चाबकाचे चार फटके दिले आणि रोख पैसे घेऊन यायला सांगितलं. बिचारे माझे भाऊ गाडी घेऊन तो कापूस विकायला म्हणून पुढल्या गावी गेले. तिथे गोऱ्या सरकारच्या धाकाने कुणी कापूस घेईना. शिवाय माल घेऊन पैसे द्यायला तो होता कुणाजवळ? एकमेकांना गरजेच्या वस्तू द्यायचीच पद्धत होती तर काय. मग फिरंगी सरकारच्याच कुठल्या तरी गोदामाने तो कापूस घेतला आणि पैसे दिले. ते घेऊन, तेच सगळे पैसे गोऱ्याला द्यायला गेले तर साऱ्याचे पूर्ण पैसे आले नाहीत म्हणे. आता नियमाप्रमाणे चौथा हिस्सा कापूस दिला तरी सारा अपुरा कसा हे कोडं काही उलगडलं नाही. तोवर माझे दोन्ही काका पोहोचले तिथे. मग जरा दादापुता करत रदबदली करून सर्वांना सोडवून घरी घेऊन आले. पण दोन महिन्यांच्या आत जर साऱ्याचे पूर्ण पैसे दिले नाहीत तर जमीन जप्त करू म्हणून धमकी दिली होती त्या टोपीवाल्यांनी. आईने सांगितलं म्हणून दादाच्या जखमेवर लावायला तेल गरम करून घेऊन गेले.
"आयाई गं... कसले वळ उठले होते. एका ठिकाणी तर चक्क जखम झाली होती."
तो महिना असाच गंभीर वातावरणात गेला. आजूबाजूला अशाच बातम्या ऐकायला येऊ लागल्या. रोज कुणाला तरी नवनवीन शिक्षा दिली असायची त्या गोऱ्या साहेबाने. माझं नदीवर आणि देवळात जाणं तर बंदच झालं होतं.
"घरात काय चाललंय ऐकत्येस ना? सगळी माणसं काळजीत आहेत. बाई माणसाने घरातली परिस्थिती पाहून हुशारीने वागायचं असतं. घरातल्या लोकांना राग येईल असं आपण वागूच नये गं. आता या परिस्थितीत बाहेर कुठे जायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस बघ."
सारा भरायला पैशांची तजवीज काही होत नव्हती. अशात शेजारच्या गावातून बातमी आली की चौथाई भरली नाही म्हणून त्यांच्या जमिनीचा एक तुकडा सरकारने जप्त केला होता. गावात विणकर खूप होते. हातमागावर छान वस्त्र विणायचे. त्यांना कापूस द्यायला गोऱ्या सरकारने सर्व शेतकऱ्यांना बंदी केली. आता शेतातला माल ते म्हणतील तिथेच बाजारात न्यायचा आणि विणकरांनी गोरा साहेब देईल त्याच सुताचे कापड विणायचे अशी सक्ती होऊ लागली. कुणी जुमानत नसेल तर भयंकर शिक्षा व्हायच्या. दाद कुणाकडे मागायला जाणार? चुपचाप सहन करण्यावाचून पर्यायच नव्हता. 1818 मध्ये झालेल्या होळकरांच्या पराभवानंतर गेल्या दोन वर्षात झपाट्याने परिस्थिती बदलत चालली होती. फंद फितुरीला ऊत आला होता. नाही नाही ते बिनकामाचे बाजारबुणगे याच्या त्याच्या कानाशी लागून सूड घेत होते. सगळीकडे संशयाचे वातावरण होते. दुसरा महिना संपत आला तरी साऱ्याचे पैसे पुरेसे जमा झाले नव्हते. त्यामुळे मोठ्या काकांनी एक निर्णय घेतला.
"उद्या आपल्यावर काय परिस्थिती येईल काही सांगता येत नाही. आपण लोकांच्या लेकी सांभाळत आहोत. त्या आपापल्या घरी जाऊ देत. मोठ्या व्हायची वाट बघत बसू नका. पुढच्याच महिन्यात घरी जातील हे बघा."
मी आणि यमी दोघींना सासरी पाठवायची तयारी सुरू झाली. आमच्या सासरच्या गावी 'मूळ' गेलं. आमच्या सोबत पाठवायच्या सामानाची जुळवाजुळव होऊ लागली. सासरी कसं वागायचं, नेहमी खाल मानेने वावरायचं, कुणाला उलट उत्तर द्यायचं नाही, प्रश्न विचारायचे नाहीत, पडेल ती कामं हसतमुखाने करायची. माहेरच्या गोष्टी सासरी सांगायच्या नाहीत, तिकडच्या तक्रारी इकडे आणायच्या नाहीत. एक ना दोन. अशा उपदेशाचा आमच्यावर भडिमार होऊ लागला. बघता बघता तो पाठवणीचा दिवस उजाडला. चार दिवस आमच्या डोळ्यांचं पाणी खळलं नव्हतं. आता हे घर परत दिसेल की नाही, दिसलं तर कधी आणि कसं, काहीच सांगता येत नव्हतं. भल्या पहाटे मोजके दागिने घालून, चिरडी नेसून आम्ही तयार झालो. आमच्या सोबत येणाऱ्या आमच्या पाठराखिणीही तयार होत्या. बैलगाडीत जाजम अंथरलं. दोघींची गावं जवळजवळ होती. सामानाची गाडी दुसरी होती. मी आणि यमीने एकमेकींना कडकडून मिठी मारली. अंगणाच्या ज्या कोपऱ्यात आम्ही खेळायचो तिकडे हळूच गेलो. तिथे एक खड्डा खणला आणि आमची भातुकलीमधली दोन दोन बोळकी तिथे हळूच पुरून टाकली. आम्ही परत आलो की ते काढून घेणार होतो. आमची अशी खूण ठरलेली होती. ओटी भरून झाल्यावर आजी, आत्या आणि आईने पोटाशी घेऊन आम्हाला मंदिराकडे चालवलं. सगळे मंदिरात आलो. देवीची ओटी भरली. रेवामाईची ओटी भरली. नदीकडे डोळे भरून पाहून घेतलं. साडीचा आणि पदराचा घोळ सावरत आम्ही दोघी सर्वांच्या पाया पडलो. आता इथून आमच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. डोळे पुसत जड पावलांनी आम्ही गाडीत बसलो. सगळ्या बायकांचे पदर डोळ्यांना लागले. आमच्या गाड्या वेशीच्या बाहेर मार्गस्थ झाल्या. सगळे लोक अंधुक होत होत दिसेनासे झाले. सोबत आलेल्या माझ्या पाठराखण ताईने माझी समजूत काढून मला कुशीत घेतलं. मी आणि यमीने एकमेकांचे हात घट्ट धरले होते. डोळ्यातून पाणी वाहातच होतं. असाच किती वेळ गेला कोण जाणे. कसल्याशा कर्कश आवाजाने मी दचकून उठले. बाहेर रहदारी खोळंबली होती बहुधा आणि गाड्यांचे कर्कश हॉर्नस वाजत होते.मी आजूबाजूला पाहिलं. अरेरे, तेच बकाल स्वरूप, तोच कचरा. मैत्रिणी जवळ आल्या.
"डोळ्यात का गं पाणी? काय होतंय?" खरंच की माझ्या डोळ्यांतून अजूनही आसवे वहात होती. त्यांना काय माहीत मी केवढा मोठा फेरा करून आले होते. काय होतं ते? स्वप्नं? आम्ही परत निघालो. आणि वाटेत एक घर दिसलं. अगदी तेच. माझं. मी नकळत तिकडे धावले. आता त्या घराची अगदीच अवस्था झाली होती. बऱ्याच भिंती ढासळल्या होत्या. तण आणि गवत माजलं होतं. काही भिंती जळालेल्या दिसत होत्या. मी शेजारी एका आजीबाईंना विचारलं.
"आजी, हे घर कुणाचं?"
"काय माहीत बाई. माझे सासरे सांगायचे म्हणे ते लहान असताना पूर्वी कधीतरी जप्ती आणली होती गोऱ्या सरकारने या घरावर आणि मग सरकारी ऑफिस होतं तिथे खूप दिवस. नंतर ऑफिस नव्या इमारतीत गेलं आणि मग कुठल्याशा पक्षाचं कार्यालय म्हणून होतं ते. आता मात्र खूप जुनं झालं म्हणून कितीतरी वर्षं असंच पडून आहे. पण तू कोण गं बाय? कुठून आली? असं का विचारते आहे?"
त्यांना काय उत्तर देणार मी?
मी पुढे झाले. मोडकळीस आलेल्या त्या घरातून फिरू लागले. अचानक मला काय जाणवलं. मी मागच्या त्या अंगणात गेले. अंदाजाने कोपरा गाठला आणि खड्डा खणू लागले. मैत्रिणी चक्रावून गेल्या.
"अगं ए ... काय करतीयेस?"
तोवर माझ्या हाताला काही लागलं. भातुकली खेळायची पितळेची दोन जुनी बुडकुली होती. माझ्या डोळ्यांना परत धारा लागल्या. माझ्याकडे आश्चर्याने पाहणाऱ्या माझ्या मैत्रिणींना पण मी काहीच उत्तर देऊ शकले नाही. मातीने माखलेली ती बुडकुली मी हातात घट्ट धरली आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसत मी हॉटेलकडे निघाले.
© स्वाती प्रताप जोशी
डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा